यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' १२ ते १९ जानेवारीदरम्यान

Submitted by चिनूक्स on 16 December, 2016 - 13:35

तर, यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यंदा १२ ते १९ जानेवारी, २०१७दरम्यान होणार आहे. यंदा या महोत्सवाचं हे पंधरावं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात अडीचशेहून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेक कार्यशाळा, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचा अंतर्भावही महोत्सवात असेल.

PIFF 2017 - Theme Logo.jpg

'पर्यावरण' ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महोत्सवाचं बोधचिन्हही याच संकल्पनेवर आधारलेलं आहे. या बोधचिन्हाचं वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्री. जिव्या सोमाजी म्हसे यांनी चितारलेला वाघ या बोधचिन्हाच्या केंद्रस्थानी आहे.

यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधले विभाग खालीलप्रमाणे –

‘फोकस’ विभाग

१) मध्यवर्ती संकल्पना (पर्यावरण) - या विभागात मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्रपट असतील. 'पर्यावरण' ही संकल्पना असली तरी 'झाडे जगवा, झाडे वाचवा', 'पाण्याची बचत करा' असे संदेश देणारे अनुबोधपट या विभागात नाहीत. मनुष्य आणि त्याचं पर्यावरण, त्याचं पर्यावरणाशी असलेलं नातं यांचा वेध घेणारे चित्रपट या विभागात असतील.

२) सामाजिक जाणीव - 'पर्यावरण' म्हणजे केवळ झाडं, नद्या, डोंगर असा निसर्ग नव्हे. राजकीय, सामाजिक पर्यावरणही आपल्या जगण्याचाच एक भाग आहेत. या विभागातले चित्रपट याच संकल्पनेवर आधारित असतील.

३) फेदेरिको गार्सिया लॉर्का यांच्या साहित्यावर आधारित चित्रपट - भारत आणि स्पेन यांच्या मैत्रीला यंदा साठ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं दोन खास विभाग यंदाच्या महोत्सवात असतील. पहिला विभाग आहे सुप्रसिद्ध स्पॅनिश लेखक-कवी फेदेरिको गार्सिया लॉर्का यांच्या साहित्यावर आधारित चित्रपटांचा. गार्सिया लॉर्काच्या लेखनाचा, विचारांचा स्पेनच्या, किंबहुना युरोपच्या सामाजिक - सांस्कृतिक - राजकीय जीवनावर फार मोठा प्रभाव होता. त्याच्या लेखनावर आधारित चित्रपट स्पॅनिश व युरोपीय संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा आहेत.

४) चित्रपटांतील स्पॅनिश नृत्यप्रकार - स्पॅनिश नृत्यप्रकार हे अनेक चित्रपटांच्या केंद्रस्थानी आहेत. असे काही निवडक चित्रपट महोत्सवात दाखवले जातील.

५) सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह)

६) पुरस्कारप्राप्त चित्रपट

७) चित्रपट महोत्सवात दरवर्षी चित्रपटसृष्टीशी संबंधित भारतीय व परदेशी दिग्गज स्पर्धाविभागासाठी परीक्षक म्हणून काम करतात. या परीक्षकांचा सहभाग असलेले चित्रपट हे या महोत्सवाचं एक आकर्षण असेल.

<स्पर्धा-विभाग -

१) आंतरराष्ट्रीय चित्रपट

२) मराठी चित्रपट

३) फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट


‘ग्लोबल’ विभाग –

१) ग्लोबल चित्रपट

२) आशिया खंडातील चित्रपट

३) लॅटिन- अमेरिकन चित्रपट

४) देश-विशेष (कंट्री फोकस)

५) वेगवेगळ्या देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप)

‘अदर्स’ विभाग –

१) इंडीयन सिनेमा टुडे

२) मराठी सिनेमा टुडे

३) जेम्स फ्रॉम 'नॅशनल फिल्म्स् अर्काईव्ह्स् ऑफ इंडिया (एन.एफ.ए.आय)'

४) 'फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया'नं तयार केलेले चित्रपट

५) श्रद्धांजली

***

पुण्यासह पिंपरी-चिंचवड, मुंबई व औरंगाबाद इथे दरवर्षी भरविण्यात येणारा हा महोत्सव यंदा सोलापूर व नागपूर इथेही आयोजित केला जाईल. नागपूरमध्ये हा महोत्सव 'ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' या नावानं भरवला जाईल. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

पुण्याबाहेरच्या महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे -

१. मुंबई - यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २० जानेवारी ते २६ जानेवारी, २०१७

२. नागपूर - ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २७ जानेवारी ते २९ जानेवारी, २०१७

३. औरंगाबाद - ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०१७

४. सोलापूर - १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, २०१७

***

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी शुक्रवार दि. १६ डिसेंबर, म्हणजे आजपासून सुरू करण्यात आली आहे. सिटीप्राईड (कोथरूड आणि सातारा रस्ता), मंगला चित्रपटगृह व आयनॉक्स (बंडगार्डन रस्ता) इथे २९ डिसेंबरपासून सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नोंदणी करता येईल.

विद्यार्थी व फिल्म क्लब सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांच्यासाठी नोंदणीशुल्क रु. ६०० इतकं आहे. इतरांसाठी नोंदणीशुल्क रु. ८०० आहे. यंदाच्या वर्षी रोख रकमेचा तुटवडा असल्यानं रोख रकमेबरोबरच क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.

महोत्सवातल्या चित्रपटांचे इतर तपशील लवकरच जाहीर केले जातील.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users