आशा पारेख

Submitted by चीकू on 16 December, 2016 - 10:08

आशा पारेख

Ashaparekh.jpg
आशा पारेख! नाव उच्चारताक्षणीच डोळ्यासमोर येते ती ६०-७० च्या दशकातली लोकप्रिय सिनेअभिनेत्री. काही लोक तिला अभिनेत्रीपेक्षा भरपूर मेकअप, विविध केशभूषा आणि वेशभूषा करणारी शोभेची बाहुली म्हणूनच ओळखतात. कोणाला तुझी त्यावेळची आवडती अभिनेत्री कोण असं विचारलं तर आशा पारेखचं नाव अभावानंच कोणाच्या ओठावर येईल. तिच्या समकालीन साधना, वैजयंतीमाला, नंदा, माला सिन्हा या केवळ शोभेच्या बाहुल्या नव्हत्या, त्यांनी आपलं अभिनयसामर्थ्य अनेक चित्रपटांतून दाखवून दिलं होतं, वेगळ्या वाटांवरच्या भूमिकाही त्यांनी लक्षवेधी केल्या होत्या (उदा. साधना - परख, वैजयंतीमाला - साधना, मधुमती, नंदा - इत्तेफाक, माला सिन्हा - अनपढ, बहुरानी, जहाआरा). आशा पारेखचा असा कोणताही चित्रपट पटकन आठवत नाही. तिच्या बहुतेक चित्रपटात ती छान दिसणारी, छान नाचणारी आणि छान गाणी असलेली म्हणूनच राहिली. ती नृत्यकुशल होती, बहुतेक तिच्या चित्रपटांमधे एक तरी तिचे नृत्य असायचेच, किंवा मुद्दाम ती सिच्युएशन तयार केली जायची. उदा. जिद्दीमधे काहीही कारण नसताना आणि भूमिकेची गरज नसताना 'रात का समा, झूमे चंद्रमा' घातलं गेलं, अर्थात ते गीत आणि आशाचा नाच सुरेखच होता. इतर चित्रपटांमधेही तिने सुरेख नृत्ये सादर केली आहेत. जब प्यार किसीसे होता है - तुम जैसे बिगडे बाबू, छाया - छम छम नाचती आयी बहार, लव्ह इन टोकियो - कोई मतवाला आया मेरे द्वारे, तेरी सूरत मेरी आखे - नाचे मन मोरा, कन्यादान - परायी हू परायी, आये दिन बहार के - खत लिख दे सावरिया के नाम, शिकार - पर्दे मे रहने दो, तीसरी मंझिल - आजा आजा, अशी असंख्य उदाहरणे सापडतील. पण नर्तिका म्ह्णून जशा वैजयंतीमाला आणि हेलन डोळ्यासमोर येतात तशी आशा पारेख येत नाही. चित्रपटातली तिची केशभूषा आणि वेशभूषा हा विवादाचा विषय असेल, आता तिचे चित्रपट बघताना तिच्या टोपल्यासारख्या विग्जची, चेहर्‍यावर थापलेल्या मेकपच्या थरांची, शरीराचं बोजडपण वाढवणार्‍या तंग कुर्ता-चुडीदारची खिल्ली उडवावीशी वाटते. पण त्याकाळी ती खूपच लोकप्रिय होती, त्या दशकातील गाजलेल्या बर्‍याच चित्रपटांमधे ती होती. अर्थात चित्रपट गाजण्याची मुख्य कारणे म्हणजे लोकप्रिय संगीत ( आये दिन बहार के, जिद्दी, लव्ह इन टोकियो, कटी पतंग, फिर वही दिल लाया हू, मेरे सनम इत्यादी), क्वचित रहस्याची फोडणी (तीसरी मंझिल, शिकार, साजन), सहकलाकारांचा सशक्त अभिनय (मेरी सूरत तेरी आंखे, तीसरी मंझिल, मेरा गाव मेरा देश, उपकार) पण प्रत्येक चित्रपटाचा कॉमन दुवा म्हणजे आशा पारेख आणि तिच्यावर चित्रीत झालेली सुमधूर गाणी आणि तिचा एखादा नाच. मै तुलसी तेरे आंगनकी, बहारोंके सपने या चित्रपटांतून तिने थोड्या वेगळ्या भूमिका करायचा प्रयत्न केला पण तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही त्यामुळे ती परत त्या वाटेला फारशी फिरकली नाही.

asha-parekh.jpg
जॉय मुखर्जी, शम्मी कपूर, मनोज कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र अशा अनेक कलाकारांबरोबर तिने काम केलं पण कोणाबरोबर तिची खास जोडी जमली नाही. तिचे नाव चित्रपटाबाहेरही कोणाबरोबर जोडले गेले नाही. तिची आठवण सांगताना मनोजकुमार म्हणाला होता, ती शांत, एकदम नम्र, सर्वांशी मिसळून वागणारी होती, पण आपण बरे आणि आपले काम बरे अशी होती, बाहेरच्या पार्ट्यांमधे ती क्वचितच दिसायची. पण वेळेबाबत आणि आपल्या कमिटमेंटबाबत एकदम काटेकोर होती. तीसरी मंझिल च्या वेळी आजा आजा मै हू प्यार तेरा गाण्याचे चित्रीकरण होते. त्यावेळी आशाच्या अंगात ताप भरला, पण चित्रीकरण पुढे ढकलले तर परत तारखा मिळणार नाहीत आणि निर्मात्याचे नुकसान होईल हे ध्यानात घेऊन तिने भरपूर पेनकिलर औषधे घेऊन त्या तापातच तो नाच केला. उपकार चित्रपटाच्या वेळीही शेवटचा उगवत्या सूर्याच्या बरोबर एक शॉट होता, आडगावच्या खेड्यात चित्रीकरण होते पण आशा वेळ चुकू नये म्ह्णून सर्व तयारी करून मध्यरात्रीपासूनच जागी राहिली होती. तिचा हा सिन्सिअर स्वभाव तिला अनेक चित्रपटात घ्यायचं महत्वाचं कारण होता. सेटवर ती कधीही उशिरा आली नाही की काही नखरेही तिने केले नाहीत. निर्माते, दिग्दर्शक आणि सह्कलाकारांना सदैव सहकार्यच द्यायचं असा तिचा स्वभाव होता. तिने धर्मेंद्रबरोबर केलेले आये दिन बहारके, शिकार, आया सावन झूमके हे सर्व चित्रपट गाजले. त्यावेळी धर्मेंद्र तिच्यापुढे तिच्यामानाने तसा नवखा कलाकार होता पण त्यानेही तिच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.

लग्नाच्या बंधनात न अडकता तिने आपल्या चित्रपटांवरच लक्ष केंद्रित केलं, नवीन अभिनेत्रींपुढे आपले स्थान डळमळीत झाले हे तिने वेळीच ओळखले. मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक केली. लग्न न केल्याचा वा मुलेबाळे न झाल्याचा खंत वा खेद अजिबात बाळगला नाही. नृत्यकलेचे शि़क्षण देणारी शाळा काढली, देश परदेशात नृत्यकला सादर केली. मधून मधून काही चित्रपटात सहायक भूमिका केल्या, काही मालिकांची निर्मीतीही केली. समाजाचं आपण देणं लागतो हे ओळखून सामाजिक कार्यांसाठी सढळ हाताने मदत केली. मुंबईतील आशा पारेख हॉस्पिटल तिने दिलेल्या देणगीतूनच उभे राहिले आहे. अनेक सामाजिक संस्थांशीही ती संलग्न आहे.

अशी ही आशा पारेख! माझी आवडती अभिनेत्री असं नाही म्हणता येणार पण तिच्या प्रत्येक चित्रपटात तिचा वावर खेळकर, प्रसन्न असायचा. तिचे बहुतेक सारे चित्रपट पाहिले आहेत आणि सगळ्यात एकाच छापाच्या भूमिका असल्या तरी कधीच ती कुठे सवंग किंवा चीप वाटली नाही. कालच जिद्दी परत पाहिला आणि या निमित्ताने तिची आठवण येऊन तिच्यावर लिहावसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नासीर हुसेनच्या एका मुलाखतीत वाचले होते की आशा पारेखला जवळपास कधीच रिटेक द्यायला लागत नसे. प्रत्येक शॉट ती पहिल्याच प्रयत्नात ओके देत असे.

छान लिहीलय. आशा पारेख आवडणारे लोक अभावानेच आढळतात, पण तिचा सिनेमातला वावर सुखद होता. अगदी तिच्या नावाला नाक मुरडणारे सुद्धा ती चं काम वाईट होतं असं नाही म्हणत.

मला आवडते आशा पारेख. शम्मी सोबत तिच्या इतकी धमाल क्वचित कुणी केली असेल.
ओ मेरे सोना रे सोना.. वन ऑफ फेव्हरिट!

बाकी हे सोनाक्षी, विद्या ह्या सध्या फॉर्ममध्ये आल्यात त्यापाठचं हे 'ग्रेट इंडियन फिगर' प्रकरण गाजवणाऱ्या हिरॉईन्समध्ये आशा पुढे आहे.

तिला खुप सुंदर गाणी मिळाली, त्यामूळे बघायला आवडायची ती पडद्यावर. तिथे कथ्थकचे कार्यक्रम केल्याचे आठवतेय पुढे.

आजा पिया तोहे प्यार दू,
गोरी बैया तोपे वार दू

किसलिये तू ईतना उदास,
सुखे सुखे ओठ, अंखियोंमे प्यास

किसलिये.... हां किसलिये ..

अफाट आवडायची मला आशा पारेख.
किंबहुना माझे नववी दहावीच्या वयातले क्रश होते असे सुद्धा बोलू शकता.
आमच्या घरी जुने पिक्चर आईमुळे सर्रास लागायचे. काही नाही तर जुनी गाणी..
मला जुने पिक्चर बघायची तशी आवड नाही पण आशा पारेख दिसली की मी थांबलो.
कटी पतंग आणि कारवा पिक्चर मी एक फक्त आणि फक्त तिच्यासाठीच बघायचो. मला या दोघांतला तिचा उदास इनोसंट लूक कॅरेक्टर बेहद्द आवडायचे.
माझ्यासाठी तिचे वय तेव्हा तेच होते जे ती मला पडद्यावर दिसायची.
वर माझी आईही म्हणायची खूप सुंदर दिसते ना ही..
पण त्यापुढे हे देखील म्हणायची की किंचित डोळ्याने कानी आहे.
मी मनोमन म्हणायचो असू दे.. मला चालते Happy

गंमत म्हणजे त्याच सोबत मी तिचे आईच्या भुमिकेत असलेले पिक्चरही पाहिले आहेत. त्यातला एक बहुतेक संजय दत्तचा हत्यार लक्षात राहिलेला. पण माझ्यासाठी या दोन्ही आशा पारेख वेगळ्याच असायच्या. माझा मेंदू एक्सेप्टच नाही करायचा की मला आवडणारी आशा पारेख आणि हि आईचे रोल करणारी एकच आहेत.

उत्तमच अभिनेत्री... एकदम बॅलन्स्ड व्यक्तिमत्व वाटावं अशी.
आशा पारेख, नंदा, साधना, वहिदा.... त्या काळच्या सगळ्याच अभिनेत्री आवडत्या... Happy

असं बोललं जातं की आशा पारेख आणि नासिर हुसेन लाँग टर्म रिलेशनशीप मध्ये होते.
पण ठिक आहे खूप ग्रेसफुली आयुष्य जगलेली अभिनेत्री. त्याकाळचे फार काही अपडेट्स माहित नाहीत
पण मोस्ट्ली कोणत्या गॉसिपमध्ये गोवली गेली नसावी.

हे खरंय की मला अतिशय आवडणारी काही गाणी आशा पारेखवर चित्रीत झाली आहेत

आखोंसे जो उतरी है दिलमे (फिर वही दिल लाया हू)
जाइये आप कहा जायेंगे (मेरे सनम)
ओ मेरे सोना रे सोना रे (तीसरी मंझिल)
इतना ना मुझसे तू प्यार बढा (छाया)
ना जाओ मेरे हमदम (प्यार का मौसम)
क्या जानू सजन (बहारोंके सपने)
सुनो सजना पपीहेने (आये दिन बहारके)
सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था (जब प्यार किसीसे होता है)
इक बार जरा फिर कह दो (बिन बादल बरसात)
ये किसकी जुल्फ बिखरी (तेरी सूरत मेरी आखे)
तेरी आखोंके सिवा दुनियामे रखा क्या है (चिराग)
तुम मुझे यू भूला ना पाओगे (पगला कही का)

खालील गाणी नायक आशा पारेखला उद्देशून म्हणतो

तुमने मुझे देखा/ दीवाना मुझसा नही (तीसरी मंझिल)
लिखे जो खत तुझे (कन्यादान)
ये शाम मस्तानी (कटी पतंग)
आजा रे आ जरा (लव्ह इन टोकियो)
पुकारता चला हू मै (मेरे सनम)
आखोमे मस्ती शराबकी (छाया)
जिया ओ जिया ओ कुछ बोल दो ( जब प्यार किसीसे होता है)

यादी अपुरी पडेल इतकी लोकप्रिय गाणी आशा पारेखवर चित्रीत झाली आहेत, हे तिच्या यशस्वी कारकीर्दीचे एक महत्त्वाचे कारण!

लेख छान लिहिलाय.
आशा पारेख म्हणजे नायिकांमधला राजेंद्रकुमार म्हणायला हरकत नाही. अनेक लोकप्रिय गाणी तिच्या वाट्याला आलीत. लहानपणी टीव्हीवर चित्रपट पाहिले तेव्हा ती; आवडणे, न आवडणे अशा कोणत्याच कॅटेगरीत ढकलायची गरज पडली नाही.
मूळ लेखात लिहिलेले डान्स नंबर आवडतातच.
शिवाय पहिल्याच 'दिल देके देखो' या चित्रपटात शम्मी कपूरसमोर उभं राहतानाचा आणि नाचतानाचा कॉन्फिडन्सही.
अभिनय ग्रेट नाही आणि वाईट पण नाही. पण आवाज आता मात्र अगदीच बद्द वाटतो.
आता कधी ते चित्रपट/गाणी पाहिली तर तिच्या फॉल्स आयलॅशेसकडे जास्त लक्ष जातं
जाइये आप कहाँ जाएंगे या गाण्यात ओपी आणि आशा (भोसले) ने ज्या जागा पेरल्यात त्यांवर अभिनय करणं कठीण गेलंय.
आणखी एक चित्रपट आठवतोय आशा पारेख-सुनील दत्तचा, ज्यात कसल्याशा स्फोटात तिच्या डोळ्यांना इजा पोचते. (आणि अर्थातच ती आंधळी होते) पण तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली जाते, तेव्हाही डोळ्यांचा सुंदर मेकप शाबूत आहे.

चांगला आढावा घेतलाय.

नायिकांमधला राजेंद्रकुमार>> खरंच की Happy
ओपींची खूप गाणी आशा पारेखच्या वाट्याला आलीयेत. पूर्वी आवडायची. आता मर्यादा जाणवतात.

चित्रपटप्रेमी ज्या काळात नर्गीस, मीनाकुमारी, मधुबाला, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान यांचे चित्रपट पाहाण्यासाठी थिएटर तिकिट खिडकीवर गर्दी करत असत त्यावेळी या नावांना त्यांच्या अभिनयकौशल्यासाठी मनापासून दाद दिली जात असे. पुढील पिढीतील आशा पारेख, सायरा बानू, साधना यानी लोकप्रियतेच्याबाबतीत अगदी पहिल्या रांगेत स्थान जरी मिळविले असले तरी कुणीही यांच्या अभिनयाची तुलना पहिल्या पिढीतील श्रेष्ठ अभिनेत्रींसमवेत कुणी करत नसत. त्याची काही गरजही नव्हतीच कारण या तिघींचे व्यक्तिमत्वच असे काही बनले होते की यानी केवळ काश्मिर, डेहराडून, डलहौसी, कुलूमनाली इथे जायचे आणि बिनधास्त गाणीबिनी, नर्तनबर्तन करून पडद्यावरील देव आनंद, शम्मी कपूर, धर्मेन्द्र, शशी कपूर, जीतेन्द्र, राजेश खन्ना यांचे हृदय जिंकण्याचे काम करत राहायचे. खरे म्हणजे त्या विशिष्ट काळातील प्रेक्षकांना नेमकी एकच गोष्ट हवी होती....ती म्हणजे निव्वळ निखळ मनोरंजन...अडीच तीन तासाचे. ते आशा पारेख सारखी अभिनेत्री विनातक्रार पूर्ण करत असे यात दुमत नव्हते.

चीकू यानी वरील लेखात आशा पारेखच्या कारकिर्दीच्या आढावा छानच घेतला आहे.

कधीच आवडली नाही.. जरासुद्धा. Sad

आशा पारेख आणि दिलीप कुमार इतके सुपरहिट का झाले कुणास ठाऊक. तरी आशा पारेख अभिनेत्री म्हणून महान मानली जात नाही, दि.कु. तर देव बनलाय !
असो.

मलाही आशा पारेखचा आवाज आजिबात आवडत नाही. काहीतरी विचित्र आहे त्यात.

पण बाईंचे नशीब जोरदार असले पाहिजे. ओ पी नय्यर, आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, क्वचित सलील चौधरी, रवी, उषा खन्ना, कल्याणजी आनंदजी असल्या प्रतिभावान संगीतकारांची प्रतिभा बहरात असताना जी गाणी बनली त्यात सहभागी असल्यामुळे आशा पारेखचे नाव गाजले.

शम्मी कपूर, देव आनंद, जॉय मुखर्जी हे एका पिढीतले आघाडीचे हिरो आणि राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र हे त्या नंतरचे. पण दोन्ही गटातल्या हिरोंबरोबर आशा पारेखचे सिनेमे गाजले.

आशा पारेखचा अभिनय ग्रेट नसेल. पण "हिला कशाला घेतलंय सिनेमात?" असं वाटण्याइतका भंगारही नव्हता. हेमामालिनी नंबर १ ची स्टार शकली हे लक्षात घेतलं, तर तक्रारीला जागा नाही.
अर्थात आधीच्या पिढीतल्या नूतन आदींशी आणि समकालीन वहिदाशी तुलना होऊ शकत नाही. पण त्या काळातल्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत आणि जे चित्रपट केले त्यांची अभिनयाची मागणी पूर्ण करण्यात बाई कमी पडल्या असे अजिबात वाटत नाही.

मला आवडतात आशा पारेख ची गाणी. खास करुन निसुलताना रे आनि रात का समा.
आता तिचे चित्रपट बघताना तिच्या टोपल्यासारख्या विग्जची, चेहर्‍यावर थापलेल्या मेकपच्या थरांची, शरीराचं बोजडपण वाढवणार्‍या तंग कुर्ता-चुडीदारची खिल्ली उडवावीशी वाटते. पण त्याकाळी ती खूपच लोकप्रिय होती>>>> मला उलट कौतुक वाटत की त्या हे सगळ किती सफाईदार कॅरी करत होत्या.

पण त्या काळातल्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत आणि जे चित्रपट केले त्यांची अभिनयाची मागणी पूर्ण करण्यात बाई कमी पडल्या असे अजिबात वाटत नाही. >>> +१

मला आवडायची. अभिनयाला खूप मर्यादा होत्या पण त्या ओळखूनच तिने आपला मार्ग आखला.

ती आवडण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या काही अप्रतिम गाण्यांना तिने प्रेक्षणीय केले. नाही तर त्या काळातील अनेक लाजवाब गाणी फक्त श्रवणीय असायची पण पडद्यावर बघताना मात्र अगदीच वाट लागलेली असायची. असे तिच्या बाबतीत कधीच झाले नाही. वानगीदाखल दोन माझ्या आवडीची गाणी. दोन्ही आशाने गायली आहेत आणि आर.डी.चेच संगीत आहे:

१. दय्या रे मै कहा आ फसी - आशाने धमाल गायलय हे गाणे. पडद्यावर ती धमाल त्याच्या तोडीस तोड सादर केलीये आशा पारेखने.

२. आजा आजा मै हू प्यार तेरा - बस नाम ही काफी है Happy

>>> मला चक्क आवडायची. 'ही कशाला यात' असे कधीच वाटले नाही. <<<< अगदी अगदी.
आजही आवडते, खास करुन तिचे डोळे
बाकी मूल्यमापन करताना (सर्वसामान्य) लोकं, मंडईत भाजी घेताना, कांदेबटाटे निवडताना ज्या नजरेने बघतात, जितका चोखंदळपणा दाखवितात, त्याच नजरेने कांदेबटाटे निवडण्याइतपतच चोखंदळपणा इकडेही दाखवित, आवडीनिवडी बनवतात, असे माझे मत. Proud
अन तसे नसेल, तर एकंदरीत चार लोक काय बोलताहेत त्या री मधे री मिसळतात Lol तसा रीवाजच आहे

>>>ती आवडण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या काही अप्रतिम गाण्यांना तिने प्रेक्षणीय केले. नाही तर त्या काळातील अनेक लाजवाब गाणी फक्त श्रवणीय असायची पण पडद्यावर बघताना मात्र अगदीच वाट लागलेली असायची. <<<<
अचूक विश्लेषण माधव. १००% सहमत.
आजही जुनी गाणी टीव्हीवर लागतात, तर ऐकायला बरी वाटतात्, बघायला नाही हे जाणवते. आशा पारेखच्या बाबतीत असे झाले नाही.

>>>> ka kon jaane mala ti nehami aged vaataayachi <<<< Lol चालायचेच..

याच न्यायाने मला तर खानत्रिकुट, धर्मेंद्र जितेंद्र वगैरे वगैरे सगळे "नट" एज्डच वाटायचे, दिलिप्कुमार्/सुनिलदत्त वगैरे तर आजोबा वाटायचे..... Biggrin
कारण मनातील सूक्ष्म मत्सर असुया हो, दुसरे काही नाही ... Wink

तसे तर त्या काळात अनेक नट नट्या वयस्कर होते आणि दिसायचे पण,
अगदी ३५/४० वयाचा बाबा म्हातार्‍या आईच्या (किंवा वडिलांच्या) पाया पडून म्हणायचा,
माँ (किंवा बाबूजी) मैं बी.ए. पास हो गया और मुझे मॅनेजर की नौकरी मिलगयी हैं
हे पाहून अगदी Uhoh असे व्हायचे.

अन ते "मैने तुम्हारि पसंद का गाजरका हलवा बनायां है" मधिल गाजरकाहलवा चिरकाल टीकणारा आहे, हल्लीच्या सिनेमातूनही अधुन मधुन दिस्तो.....
आता खरे तर हल्लीच्या सिनेमात गाजरका हलवा ऐवजी व्हेज मॉन्च्युरिअन / पास्ता असे काही यायला हरकत नसावि... नै?
अगदीच चेंज हवा असेल, तर "बनाया/बनवाया है" ऐवजी, "तुम्हारे लिये तुम्हारी पसंदका पिझ्झा मंगवाया है" असेही चालू शकेल...... Lol

मलाही तशी आवडायची ती. म्हणजे एकदम टॉप फेव्ह नाही . पण आवडायची.
मला एकूणच तो इस्टमन कलर माहोल आवडायचा... शिमला, कश्मिर, डलहौसी वगैरे चं चित्रीकरण , मोठा वळणदार जिना असणार्‍या भल्या मोठ्या हवेलीत राहणारी हिरॉईन (शर्मिला टागोर, आशा पारेख, राजश्री, नंदा , साधना इ इ) , तंग कपडे, केसांची उंच रचना, तिचे ते चिरुट ओढणारे 'रायसाब' वगैरे भारदस्त नाव असणारे वडिल, थोराड दिसणारा जॉय मुखर्जी, राजेंद्रकुमार, विश्वजीत, शम्मी...असा कुणीतरी हिरो, त्याचा मेहमूद सारखा हरहुन्नरी मित्र, अतिशय सुमधुर गीत - संगीत, प्राण सारखा ग्रेसफुल व्हिलन....., "मै न कहती थी.." अशा वाक्याने सुरु होणारे संवाद, कुणी आजारी असलं की बॅग घेऊन येणारे डॉक्टर व ते निघाले की अदबीने , " आईए डॉकसाब.." असं म्हणून त्यांची बॅग उचलून घेऊन जाणारा हिरो.......

Happy अहाहा!
मन अगदी गुंतून जायचे..कुठलेही लॉजीकल प्रश्न पडायचे नाहीत हल्ली सारखे!

==
मला एकूणच तो इस्टमन कलर माहोल आवडायचा... शिमला, कश्मिर वगैरे चं चित्रीकरण , मोठा वळणदार जिना असणार्‍या भल्या मोठ्या हवेलीत राहणारी हिरॉईन, तंग कपडे, डोईवर शिप्तर, तिचे चिरुट ओढणारे 'रायसाब' असे भारदस्त नाव असणारे वडिल, थोराड दिसणारा जॉय मुखर्जी, राजेंद्रकुमार, विश्वजीत, शम्मी...असा कुणीतरी हिरो, त्याचा मेहमूद सारखा हरहुन्नरी मित्र, अतिशय सुमधुर मेलडी....., "मै न कहती थी.." अशा वाक्याने सुरु होणारे संवाद, कुणी आजारी असलं की बॅग घेऊन येणारे डॉक्टर व ते निघाले की अदबीने , "डॉकसाब.." असं म्हणून त्यांची बॅग उचलून घेऊन जाणारा हिरो.......
==

पूर्ण अनुमोदन. हे सगळे मला आजही आवडते. कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा येत नाही. मस्त वर्णन केले आहे.
हिंदी (वा उर्दू) भाषेला मानाचे स्थान देणारे हे सिनेमे. इंग्रजीची अतिरेकी उसनवारी न करता, अस्सल हिंदी भाषेत सादर केलेले. आता इतिहासजमा झाले तरी माझ्या मते चिरतरूणच.

Pages