एका प्रेमाची दूसरी गोष्ट

Submitted by अमोल परब on 15 December, 2016 - 08:47

तो धावत धावत CCD मध्ये शिरला. अचानक आलेल्या पावसामुळे त्याची पंचाईत झाली होती. बाईक पार्क करून पळतच तो जवळच्या त्या CCD पोहचला होता, तरी तिथे पोहचेपर्यंत तो अर्ध्याच्या वर भिजलाच. आत शिरल्या शिरल्या A.C ची एक थंड हवेची लहर, हलकेच त्याच्या पुर्ण शरीरावरुन फिरली. आधीच पावसामुळे तो ओला झाला होता. त्यात त्या थंड हवेच्या त्या अलवार स्पर्शाने तो अलगद शहारला. त्याने आत आल्या आल्या आपली भिरभिरती नजर त्या संपुर्ण केफेमधुन फिरवली. दुपारची वेळ, त्यात तो आठवड्याचा पहिलाच दिवस, वर अचानक आलेला पाउस त्यामुळे केफेमध्येही मोजकीच माणसे होती. समोरच एक टेबल रिकामी होतं. तो पटकन त्यावर जाऊन विसावला.

आज तो ऑफ़िसमधुन लवकर निघाला होता. विशेष असं नाही पण आज सकाळ पासून त्याच्या जिवाला एक अनामिक अशी हुरहुर लागली होती. का ते कळत नव्हतं. ऑफिसमधे तसही आज काही तातडीचं काम नव्हतं. म्हणुन हाफ-डे टाकुन तो निघाला. अर्ध्या रस्त्यातच पोहचला असेल की हा अचानक पाउस सुरु झाला. आज सोबत कार न आणता बाईक आणल्याचा पश्चाताप त्याच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होता. पण आता पाउस उतरे पर्यंत त्याच्याकडे दूसरा काही पर्यायही नव्हता.
तो त्या केफेच्या खुर्चीत निवांत होतच होता की, तेव्हढ्यात त्याच्या खिश्यातला फोन वाजला. पाहिलं तर ऑफिसमधुन फोन आला होता. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने तो फोन कट केला. त्याला आता निवांतपणा हवा होता. एक दोन क्षण गेले असतील की, पुन्हा त्याचा मोबाईल वाजला. आता केफेमधल्या इतर लोकांनीही त्याच्याकडे त्रासीकपणे पाहिलं. आता मात्र त्याचा नाईलाज झाला. त्याने तो फोन रिसीव्ह केला त्याच्या अपेक्षेनुसार अत्यंत निरर्थक कामासाठी ऑफिसमधून कॉल आला होता. त्याने वैतागुन फोन ठेवून दिला आणि पुढच्याच क्षणाला त्याने मोबाईल स्विच्ड ऑफ़ करून टाकला.

मोबाईल स्वीच्ड ऑफ़ केला तरी त्याची चिडचिड काही कमी झाली नव्हती. ज़रा कधी लवकर निघालं की नेमकं आपल्यामागे ऑफिसमधे काहीतरी महत्त्वाचं काम अडणार. नेहमीचच झालं होत हे. पण आता बास......आता नाही जीवाला त्रास करून घेणार. भरपूर झालं इतरांसाठी स्वत:ला खपवून घेणं. तो स्वत: वरच वैतागत होता.

त्याने डोळे बंद केले आणि हलकेच गुबगुबीत खुर्चीच्या हेडरेस्टवर त्याने आपली मान टेकवली.
केफेत FM वर "तेरे बीना जिंदगी से कोई..शिकवा तो नही " हे लताच अप्रतिम गाणं लागलं होत. बाहेरचा पाउस, केफ़ेतलं शांत वातावरणं आणि सोबत लता.

वाह क्या बात है!!!!!!!!

तो ह्या स्वर्गीय अनुभुतीत हरवून गेला.

त्याला आता फार शांत वाटत होतं. सकाळपासुन वाटत असलेली हुरहुर आता काही प्रमाणात कमी झाली होती. तो आता डोळे बंद करून त्या खुर्चीच्या मऊशार हेडरेस्टवर मान टेकवून निवांत पहुडला होता.

इतक्यात त्याला त्याच्या टेबलावर हालचाल जाणवली. त्याने पटकन डोळे उघडून पाहिलं तर एक वेट्रेस त्याच्यासमोर वाफ़ाळलेली कॉफ़ी घेउन उभी होती.
One cafe latte with fresh cream...your order Sir" आपल्या ठोकळेबाज इंग्रजीत आपल्या चेहर्यावर व्यवसाईक हास्य कायम ठेवत ती वेट्रेस त्याला म्हणाली.

तो आश्चर्यचकीत झाला.

अरेच्चा हिला कशी माहीत आपली चॉईस. आपण तर ऑर्डर दिलीच नाही. तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला. पण उत्तर नकारार्थी होतं. त्याला खात्री होती की आपन ऑर्डर दिलीच नव्हती.

"Excuse me, हि ऑर्डर कुणी दिली."

त्याने असं विचारताच, उत्तरादाखल त्या वेट्रेसने पुन्हा एकदा हसून कोपर्याजवळच्या एका टेबलाकडे बोटं दाखवलं. त्याने लगेच त्यावेट्रेसने दाखवलेल्या दिशेला पाहिलं. तिथे एक व्यक्ती पाठमोरी बसलेली त्याला दिसली. त्याला काही अंदाज येत नव्हता. त्याला नवल वाटलं. तो अजुन निरखून पाहू लागला.

"Shall i???" वेट्रेसने त्याच्या चेहर्यावरचे भाव ओळखुन त्या दुसऱ्या टेबलावर त्याची कॉफ़ी नेउन ठेवण्याची परवानगी मागितली.

त्याने होकार देताच तिने तो कॉफ़ीचा ट्रे उचलला आणि त्या कोपर्याकडे जाऊ लागली. तसा तोही तिच्या मागाहून त्या टेबलाकडे निघाला. त्या वेट्रेसने त्या व्यक्तीच्या टेबलावर कॉफ़ी नेउन ठेवली आणि त्या व्यक्तीकडे पाहून एक स्माईल दिली. उत्तरादाखल त्या व्यक्तीनेही आपल्या केसाची बट मागे सारत तिला हसून प्रत्युत्तर दिलं.

तो थबकला. म्हणजे त्याच्या कॉफ़ीची ऑर्डर देणारी ती व्यक्ती स्त्री होती तर. तो अजुन गोंधळला.

कोण असावी ही?

ह्याचा विचार करीत तो त्या टेबलाजवळ येउन पोहचला. त्याला कुठलाही अंदाज बांधता येत नसल्याने तो थोडासा नर्व्हस झाला होता, पण ती व्यक्ती स्त्री असल्यामुळे ज़रा त्याला कुतुहलही वाटतं होतं.

तो टेबलाजवळ पोहचल्यावर त्या वेट्रेसने त्याची खुर्ची ओढून त्याला बसायला मोकळिक करून दिली.
"Enjoy your coffee sir" ती हसून त्या दोघांकडे पहात निघून गेली.

खुर्चीत सावरून बसल्यावर त्याने समोर पाहिलं तर तो हडबडला. त्याच्या चेहर्यावरची कुतुहलाची जागा आता अविश्वासाने घेतली. समोरच्या खुर्चीतल्या त्या स्त्रीला पाहून त्याला धक्काच बसला होता. इतक्या वर्षानंतर ती अशी अचानक समोर येईल ह्याचा त्याने कधी स्वप्नांतही विचार केला नव्हता. ह्या परिस्थीतीला कसं रिअक्ट व्हावं त्याला कळतंच नव्हतं. त्याला फार अवघड्ल्या सारख वाटतं होतं.

ती मात्र शांत होती. तिने त्याच्याकडे पाहिलंही नाही. बहुतेक त्याची ही प्रतिक्रया तिला अपेक्षित होती. ती अजुनही बाहेरचा पाऊस पहात तिची कॉफ़ी पीत होती.

*********************************************************************

तो अजुनही सावरला नव्हता. तिला असं अचानक समोर पहातच त्याचा सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटतं होतं.

वसईच्या भाऊसाहेब वर्तक कॊलेजमधुन तो अभियांत्रिकीचा डिप्लोमा पास झाला. आता डिग्री शिक्षणासाठी त्याची मोर्चेबांधणी सुरु झाली होती. आधीच जातीचा खुला वर्ग आणि पोटापुरते मिळालेले मार्क्स पाहून तो थोडा हिरमुसलाच होता. मुंबई शहरातल्या कॊलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही हे त्याला पक्कं ठावुक होतं. त्याची अवस्था म्हणजे "पोहत पोहत आला आणि काठावर बुडाला" अशी झाली होती.

डिग्री ऎडमिशनची पहिली प्रक्रिया पूर्ण झाली होती. नुकत्याच जाहिर झालेल्या मेरिटनुसार त्याचा नंबर पहिल्या हजारातही नव्हता. आता शिक्षणासाठी मुंबईबाहेर जाणे हे जवळ जवळ निश्चितच होते. नेमक्या शेवटच्या वर्षाला त्याच्या बाबांनी घरी नको ते तमाशे केले नसते, तर कदाचित आज तो पहिल्या पन्नासांत नक्की आला असता. तेव्हढी त्याची गुणवत्ता नक्किच होती. त्याचा फ़ायनल ईयरचा निकाल पाहुन त्याचे मित्रच नाही तर प्रोफ़ेसर्सही चक्रावले होते…….
त्याला तो तरी काय करणार.

त्याच्या आई बाबांमधील वाद अगदी विकोपाला गेले होते. आधीच त्याच्या वडिलांचा स्वभाव संशयी आणि त्यात त्यांचे दारुचे व्यसन. सुरुवातीला त्या दोघांमध्येच सुरु असलेली धुसफ़ुस आता त्याच्यासमोर खुल्लेआम होउ लागली होती. शिव्या, गलिच्छ वर्णन तर नेहमीचीच झाली होती. आतातर ते त्याच्या आईला मारतही होते. शेवटी तो मधे पडुन त्याच्या आईला त्यांच्यापासुन सोडवायचा. शेवटच्या पेपरच्या अगोदरची रात्र तर त्याने आणि त्याच्या आईने अक्षरश: जागुन काढली होती.

इतक्या वर्षापासुन एकटीच सहन करत आलेल्या ह्या प्रकाराला, आता तोंड देता देता तिही थकली होती. म्हणूनच की काय, त्याला त्याच्या लहानपणीची आठवणारी हसरी, गुणगुणारी आई आता एकदम अबोल झाली होती. आजुबाजुच्या गजबजाटातही कुठेतरी थंड नजर लावून बसायची. लहान वयातच त्याच्यावर त्याच्या आईची जबाबदारी येऊन पडली होती.

नाही म्हणायला नातेवाईक कधीतरी उगवायचे आणि सांत्वन करुन जायचे. त्याला तर वीटच यायचा ह्या सगळ्या प्रकाराचा.....

"साले, आमच्या वाईट परिस्थीतीवर ….. चुकचुकताना………….स्वत:चं कसे ह्याउपर मस्त चाललयं ह्याचा माज त्यांच्या सांत्वनातून जाणवायचा.
ते लोक असली बिनकामाची नाटकं
करुन गेले की त्याला फार राग यायचा………..
त्याच्या वडिलांचा, आईचा आणि सरतेशेवटी स्वत:चाही....मग त्याला खुप रडू यायचं, एकदम एकटं एकटं असल्यासारखं वाटायचं.

अखेर त्याच्या अंदाजाप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. त्याच एडमिशन पनवेलच्या M.G.M.C.E.T. अभियांत्रीकी कॉलेजला झालं होतं. खरतर तो घर सोडुन इतक्या लांब जायला तयार नव्हता. आईला असं एकटं सोडुन येताना त्याच्या जिवावर आलं होतं. पण तिला ह्या सगळ्या ससेमिर्यातुन सोडवायचं असेल तर त्याला हे करावंच लागणार होतं.
त्याला खुप मोठं बनावं लागणार होतं.
भरपूर मोठं......आभाळा एव्हढं मोठं.

************************************

त्याने नव्याने सुरुवात केली होती. घरापासून लांब असल्याने त्याच्या जिवाला थोडा निवांतपणा लाभला होता. दर संध्याकाळी न चुकता तो घरी फोन करायचा. आईची खुशाली घ्यायचा. तिने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिची विफल मनस्थिती त्याला तिच्या आवाजातुन जाणवायची, मग तो पेटुन उठायचा आणि मग एकदम पिसाटल्यासारखा आभ्यासाच्या मागे लागायचा. त्याचा हां आततायीपणा नकळत त्याला त्याच्या ध्येयापाशी घेउन जात होता. पहिलं सेमिस्टर सोडता नंतरच्या प्रत्येक सेमिस्टरला तो टॉप आला होता. आता कॉलेजचं फायनल इअर सुरु झालं होतं. ह्या वर्षी काहीही करून दोन्ही सेमिस्टरला डिस्टिंक्शन मिळवायचच हा निर्धार त्याने केला होता. सगळ त्याने ठरवल्याप्रमाणे सुरु होतं. पण एकेदिवशी मात्र गडबड झाली.

तो लायब्ररीमधे त्याच्या फायनल इअरच्या प्रोजेक्टच काम करत बसला होता. इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे हालचाल जाणवली. त्याने मागे वळुन पाहिलं तर.....

ती उभी होती.....त्याच्याच वर्गातली रोल नं 33.

तिच्यासोबत तिची एक मैत्रीणही होती. त्याला असं पटकन मागे वळालेले पाहून, तिची ती मैत्रीण तिथून लगेच निघाली. पण जाताना तिने तिला नजरेने काहीतरी खुणावल्याचं त्याच्या नजरेतुन सुटले नव्हते.

आपली मैत्रीण अशी अचानक निघून गेल्यामुळे ती थोडी बावरली होती, पण त्याची तिची नजरानजर होताच आपल्या गोबरया गालावरची नाजुकशी खळी सांभाळत त्याच्याकडे पाहून हळुच हसली.

"Hi.....मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं" कपाळावर रुळाणारी कुरळ्या केसाची एक बट आपल्या नाजुक बोटांनी कानामागे सारत ती त्याला म्हणाली.

ती त्याच्या वर्गात असुनही आजवर कधी त्या दोघांत बोलणं असं झालं नव्हतं. कुणाशी स्वत:हुन जाउन बोलण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. आपण बरं आणि आपला आभ्यास बरा ह्याच सुत्रावर तो आजवर चालत आला होता. त्याने मुक्यानेच तिला होकार दिला. तशी ती खुश होऊन त्याच्यासमोर येउन बसली.

तिला त्याच्या नोटस हव्या होत्या. त्यावर त्यानेही जास्त आढेवेढे घेतले नाहीत. उद्या आणुन देतो असं म्हणुन तो पुन्हा त्याच्या कामाला लागला. ती अजुनही समोर बसली होती. त्याला ते जाणवताच त्याने मान वर करून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्यावर तिने एकदम हात पुढे केला.

"Friends...?”

तो बावरला. त्याने एकदा तिने शेकहेंडसाठी पुढे केलेल्या हाताकडे आणि एकदा तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर मिश्किल हसू होतं. त्याने स्वत:च्या नकळत तिचा हात हातात घेउन शेक हेंड केलं.

"चल येते मी. उदया भेटु" इतकं बोलून ती तिथून निघून गेली. जाताना तिने पुन्हा त्याला एक मस्त स्माईल दिली. तो तिच्या पाठमोर्या आकृती कडे कितीतरी वेळ पहात होता.

************************************

नोट्स देण्याच्या निमित्ताचं झालेल्या ओळखीच रुपांतर मैत्रीत कधी झालं हे त्याच त्यालाच कळलं नाही. तसे त्याचे मित्र भरपूर होते, पण मैत्रीण म्हणुन हिच पहिली आणि एकमेव होती. फार मस्त होती ती.

एकदम दिलखुलास......

तिच्या आयुष्यात टेंशन हां प्रकार जणु अस्तित्वातच नव्हता. तिच्या वागण्या बोलण्यात सदा एक उत्साह भरलेला असायचा. नेहमी उर्जेने भरलेली असायची ती. तिच्या सोबत असलं की, तो सगळ्या कळकट गोष्टी विसरून जायचा. त्याला सगळ्याचा विसर पडायचा. त्याच्या परिस्थितीचा, घरच्या कटकटींचा, एकटेपणाचा.....अगदी स्वत:चाही....
त्याला सगळ्यात जास्त तिच्याबद्दल आवडाचं
त्या म्हणजे तिच्या कविता......
तिच्या कविताही तिच्यासारख्या होत्या. सुंदर, उत्कट, प्रेमात पाडणाऱ्या...
तिच्या सानिध्यात तोही आता बदलू लागला होता. हल्ली एकटा असताना गाणी गुणगुणायला लागला होता. आभ्यासातुंन उरलेला वेळ विचार करण्यात घालवण्यापेक्षा तिच्यासोबत घालवू लागला होता.
तशी तीही तिच्या आभ्यास आणि करिअरच्या बाबतीत सिरिअस होती. दोघे जण लेक्चरल, लायब्ररीमधे केंटीन मधे इतकच काय तर कॉलेज सुटल्यावर समोरच्या गार्डन मधेही आता एकत्र दिसायला लागले होते. त्या दोघांची मैत्री कॉलेजमधे आता चर्चेचा विषय झाली होती. पण त्या दोघांनाही त्याचा काही फ़रक पडत नव्हता.

************************************

आज सेंकडलास्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला होता. त्याने ठरवल्याप्रमाणे डिक्टिंक्शन हिट केलं होतं. त्यावेळेस मुंबई विदयापिठात फ़र्स्ट क्लास मिळावायची मारामार असताना डिक्टिक्शन मिळवणं हि खरच कौतुकास्पद गोष्ट होती. प्रिन्सिपलसह सगळ्यानी त्याचं कौतुक केलं होतं. पण त्याची नजर कुणाला तरी शोधत होती.

त्याच्या कौतुकाच्या गर्दीत "ती" कुठेच नव्हती.

त्याने कॉलेजभर तिला शोधलं. पण ती कुठेच सापडली नाही. संध्याकाळी लायब्ररीमधून तो घरी चालला होता. सगळं मनासारखं घडुनही एक रितेपण मनात साचलं होतं.
ती कुठे गेली असेल?
त्याने हताश होऊन समोर पाहिलं आणि तो चमकला. ती समोर फ़ुलांचा बुके घेउन त्याच्याकडे हसत पहात उभी होती. तिला पाहुन त्याला खुप आनंद झाला.
ती धावत त्याच्याजवळ आली आणि त्याला पटकन मिठी मारली. मग अलगद त्याच्यापासून दूर होत त्याच्या डोळ्यात पहात ती हलकेच बोलली.

"Congratulations!!!!!!!!"

तिच्या अश्या शुभेच्छा देण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने तो रोमांचित झाला. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारा आला होता. काही क्षण कुणीच कुणाशी बोलले नाही. तिच्या अश्या कौतुकाने तो थोडा अवघडला होता. तो तिच्याकडे पाहून कसनुसं हसला. त्याने तिचही अभिनंदन केलं. तिलाही हायर फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या रात्री तो हॉस्टेलवर जेवायला गेला नाही.

************************************

हॉस्टेलच्या बेडवर झोपायच्या तयारीत असताना तो तिच्याबद्दल विचार करत होता. आजच्या सारखी ती कधीच वागली नव्हती. आज तिच्या डोळ्यातली चमक त्याला थोडी वेगळी वाटली. तिचं संध्याकाळच त्याला अस एकांतात भेटणं, रात्री जेवतानाही त्याच्याकडे एकटक पहाणं, तिला घरी सोडुन परत निघतानाही तिच तो नजरेआड होईस्तोवर दारात उभं असणं त्याला थोडं विचित्र वाटलं होतं.

आपला अंदाज जर खरा असेल तर त्यांची मैत्री आता वेगळ्या वळणावर येउन पोहचलीय ह्याची जाणिव त्याला झाली होती.

हा विचार मनात येताच तो झटका बसल्यासारखा भानावर आला. आपण आपल्या ठरवलेल्या ध्येयापासून विचलीत होतोय ह्याची जाणीव त्याला झाली. आपल्याला हयात अडकणं झेपणार नाही आणि परवडणार सुध्दा नाही. त्याने तिचा विचार झटकत डोक्यावर पांघरुन ओढुन घेतलं.

************************************

दुसऱ्या दिवसापासून त्याने तिच्याशी बोलणं सोडलं. तो तिची वाट टाळु लागला. त्यांच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी ती हल्ली एकटीच दिसू लागली होती. तिला त्याच असं वागणं नवीन होतं. अचानक हा असा का वागतोय हे तिला कळतचं नव्हतं. ती मात्र वेड्यासारखी त्याला फ़ॉलो करत होती. त्यालाही तिच्याशी अस तुटक वागणं जड जात होतं. कारण नाही म्हटलं तरी ती आता त्याच्या सवयीचा भाग झाली होती. शक्य तितकं तो तिच्यापासून दूर रहात होता. आणि ती तितकचं त्याच्या जवळ येउ पहात होती. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्यांच्यातल्या अबोल्याला आता आठवडा झाला होता.

पण एकेदिवशी.....

संध्याकाळी लायब्ररीतून निघताना त्याला ती पेसेजमधे उभी असलेली दिसली. त्याच्याकडे एकटक पहात. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि तो तिला ओलांडून पुढे जाऊ लागला. तिच्या बाजूने जाताना तिने त्याचा हात पकडला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते.
तिने त्याच्याकडे पहात नजरेनेच

'प्लीज, नको ना असं वागुस' असं खुणावलं.

तिचे भरलेल्या डोळ्यातली आर्जवे त्याला बरचं काही सांगुन गेली. तिची अशी अवस्था पाहून, इतके दिवस रोखलेला त्याचाही बांध अखेर सुटला. त्याने तिला हलकेच कुशीत घेतलं. तशी ती हमसाहमशी रडू लागली. तो मात्र तिच्या पाठिवरुन हात फिरवीत हिला आपली परिस्थिती कशी समजवावी ह्याचा विचार करत होता.

***********************************

हॉस्टेलवर परत आल्यावर तो स्वत:वरच वैतागला होता. एव्हढं ठरवुनही त्याला तिला टाळता आलं नव्हतं. जाऊ दे....अजुन फ़क्त चार महिनेच काढायचेत तोवर तीही नॉर्मल होइल असा विचार करून अखेर त्याने तिला टाळायचा प्रयत्न सोडुन दिला.

घडल्या प्रकारानंतर तिच्या वागण्यात आता नोटिसेबल बदल झाला होता. तिला आपल्याबद्दल विशेष भावना आहेत हे त्यालाच काय तर इतरांनाही जाणवलं होतं. आपण तिला आवडतो हे त्याला समजत होतं. तिच्या कवितांमधे त्याला त्याचं अस्तित्व जाणवायचं. कित्येकदा त्याने तिची त्याच्यावर खिळलेली नजर पकडली होती. सुरुवातीला बावरायची मग नंतर मात्र त्याच्याशी नजर भिडताच त्याला डोळा मारण्याइतपत धीट झाली होती.

तो हे सगळं नजरअंदाज करत होता. खरतर त्यालाही ती आवडत होती पण त्याचा नाईलाज होता. त्याला तिच्यात गुंतणं जमण्यासारख नव्हतं. त्याच्यासाठी त्याच करिअर फार महत्त्वाचं होतं. त्याला खुप मोठं व्हायच होतं. त्याच्या आईसाठी....आई आणि तिच्यामधे त्याने आईला निवडलं होतं. त्यामुळे मनात असुनही त्याने तिला त्याच्या भावना कधी कळु दिल्या नाहित. तो तिची नजर टाळायचा, पण गुपचुप तिचं लक्ष नसताना मात्र तो तिला न्याहाळायचा.

पण त्याला वाटत होतं तितकी ती ह्या सगळ्या गोष्टीपासुन अनभिज्ञ नव्हती. त्याच्या सगळ्या गोष्टी तिला समजत होत्या. फ़क्त तिला हे कळतं नव्हतं की, तो एव्हढ सगळं लपून करतो मग त्याच प्रेम मान्य का करत नाही. कित्येकदा तिला वाटायचं की, त्याची ही चोरी रंगेहाथ पकडावी पण ती घाबरायची हा कायमचा निसटला तर म्हणुन मग ती ही मग काही बोलायची नाही. जोवर तो स्वत:हून काही विचारत नाही तोवर तिने थांबायच ठरवलं. एक ना एक दिवस हा समोरून आपल्याला विचारेल अशी तिला आशा होती.

बघता बघता लास्ट सेमिस्टर संपलं. शेवटच्या पेपरची वेळ संपल्याची घंटा वाजली. कॉलेज संपलं होतं. आता फ़क्त रिझल्टची प्रतिक्षा... आता पुन्हा कधी कोण कुणाला कुठे कसा भेटेल हां नशीबाचाच भाग होता.

आपली ही शेवटची भेट साजरी करण्यासाठी त्याच्या वर्गाने गोव्याला पिकनीक काढायची ठरवली. हा तयार नव्हता. पण तिने त्याला मनवलाच.

तस त्यानेही स्वत:ला थोड मोकळं करायचं ठरवलं होतं. आजवर त्याने आभ्यासाच्या नावाखाली स्वत:ला बांधुन घेतलं होतं. आता बाहेरच्या जगातल्या स्पर्धेसाठी तयार होण्याआधी त्याला थोडा विरंगुळा हवा होता.

गोव्याला त्याने फार धमाल केली. त्याच एक वेगळं रूप सगळ्यांना बघायला मिळालं. वर्षभर त्याच्या studies attitude च्या नावाने बोटं मोडणार्यानीही त्याच्यातल्या लपलेल्या खर्या "त्याला" अनुभवताना तोडांत बोटं घातली होती. नेमके एकामेकांपासुन वेगळे व्हायच्या वळणावर त्याच्याशी सगळे जोडले गेले होते. ती तर भलतीच खुश होती. कितीतरी दिवसांनी त्याच्यातला "तो" तिला सापडला होता. ती त्याच्यासोबत मिळालेला प्रत्येक क्षण अक्षरश: जगत होती. त्याच्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला आपल्या आठवणीच्या शिदोरीशी जोडत होती. तिच्यासाठी सगळं जग फ़क्त तो आणि त्याच्यापुरतच मर्यादित झालं होतं.

************************************

रात्री 3 वाजता ते दोघे रिसोर्टच्या स्विमिंगपुलमधे पाण्यात पाय सोडुन बसले होते. रात्रीच्या त्या शांततेत चंद्राचा निळसर प्रकाश पुलमधल्या त्या पाण्यावरुन तिच्या चेहर्यावर पडत होता. तिच्या कुरळ्या केसांच्या बटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या. आज तिने त्याला आवडणारा रेड स्लिव्हलेस घातला होता. रात्र जशी चढत होती तसा हवेत गारठा वाढत होता. तिच्या उघड्या बाहुंवर उठलेला शहारा त्याला जाणवत होता. त्याक्षणी ती एका रोमन देवतेसारखी त्याला भासत होती. तो नकळत तिच्यात हरवून गेला होता.

"काय पहातोयस?"

तिच्या ह्या प्रश्नाने तो भानावर आला. आज तिने त्याची नजर पकडली होती. तो खजील झाला. उत्तरादाखल त्याने काहिनाही अशी फ़क्त मान हलवली आणि हसून दुसरीकडे पाहू लागला. तिला त्याची नाटकं समजत होती. तीने जाणलं की हिच योग्य वेळ आहे. आज इस पार या उस पार.. तिने त्याचा हात हातात घेतला आणि......

"तू मला खुप आवडतोस....i love you....." तिने त्याला शेवटी प्रपोज केलाच.

तो चमकला. कधी ना कधी हे होइल ह्याची त्याला खात्री होती. पण नेमक्या आजत्या क्षणाला तो बावरला होता. तिला असं आपल्या डोळ्यात पाहत स्वत:च हृदय उघड करताना पाहून थोड्यावेळासाठी त्यालाही मोह आवरला नाही. तो तिला होकार देणारच होता की इतक्यात तो भानावर आला.

"नाही, हे नाही होउ शकत...मला नाही जमणार...." त्याने अलगद तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत तिची नजर टाळत तो तिला म्हणाला.

"पण का?" तिचा आवाज आता कातर झाला होता. तिच्यासाठी त्याचा नकार हां फार मोठा धक्का होता.

"कधी कधी काही प्रश्नांना उत्तर नसतात? मी फ़क्त एव्हढच सांगु शकतो की मला नाही जमणार. मला माफ़ कर...." एव्हढं बोलून त्याने निग्रहाने तिच्याकडे पाठ फिरवली.

तिने पुन्हा त्याला आपल्याकडे फ़िरवलं. पुन्हा त्याला त्याच्या नकाराच कारण विचारलं. पण त्याच उत्तर ठाम होतं. ती पुन्हा त्याला विनवत होती पण तो तितक्याच वेळा तिला नकार देत होता. ती रडत होती पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ह्यावेळेस आपण काहीही झालं तरी कोलमडायच नाही हे त्याने स्वत:शी पक्कं ठरवलं होतं. ती अजुनही त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती. अक्षरश: त्याच्यासमोर याचना करत होती. त्याला हे सगळं असहय्य होत होतं.

"Why don't you understand? I just can't do this. Please leave me alone forever......"
तो जोरात तिच्यावर खेकसला.

तिला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्याचा निर्धार कायम आहे हे पाहून तिचाही मग नाईलाज झाला. ती तशीच रडत रडत तिच्या रुमकडे धावत निघून गेली. तो ही तिथेच पुलच्या साईडला मटकन खाली बसला.

************************************

गाडी पनवेल स्टेशनाला आली. त्याचे बरेचसे मित्र मैत्रीणी तिथे उतरले. ती देखिल उतरली. तो आणि त्याचे चार मित्र पुढे जाणार होते. गाडी सुटायला आता थोडाच अवकाश होता. सगळयांचा निरोप घेताना ते दोघे शेवटी एकामेकांच्या समोर आले. त्याने तिच्याकडे पहिलं. गोव्याला येतानाची ती आणि आत्ताची ती हयात जमीन अस्मानाचा फरक होता. तिचा चेहरा उतरला होता. रडून रडून तिचे डोळे सुजले होते.

"Only friend????" असं म्हणत त्याने शेक हेंड साठी हात पुढे केला.

ती त्याच्याकडे एकटक पहात होती. एक दोन क्षणानंतर तिने त्याचा पुढे आलेला हात हातात घेतला. त्याचा हात हातात घट्ट पकडून मानेनेच नकार दिला. तिच्या डोळे भरुन आले होते. तो गहिवरला.
इतक्यात गाड़ी ने निघतानाची शिट्टी वाजवली. तो गाडीत चढला. तिने अजुनही त्याचा हात हातात धरला होता. गाडी हळूच सुरु झाली. ती त्याचा हात धरून गाडी सोबत चालु लागली. तिची नजर अजुनही त्याच्याकडे विनवणी करत होती. तिच्या डोळ्यातली आर्जवं त्याला आरपार बोचत होती. त्याला वाटत होतं की बास झाली आपली नाटकं असच उतरावं आणि तिला मिठीत घ्यावं. पण त्याने मोठ्या प्रयासाने तिची नजर तोडली आणि एक झटका देत आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला.

गाडी आता वेग पकडला होता. स्टेशन मागे सुटत होतं

आणि त्याच्या आयुष्यातून ती ही.........

आज आयुष्याच्या बेसावध क्षणी ती अचानक समोर उभी ठाकली होती. खरतर तो त्या संध्याकाळीही तिच्यासाठी prepared नव्हता आणि आजही नाही. तो सरळ उठला आणि तिथून निघायला लागला.
"कसा आहेस?" तिचा आवाज ऐकून त्याची पावलं अडखळली. कित्येक वर्षानंतर तो तिचा आवाज ऐकत होता. त्याने तिच्याकडे एकवार पाहिलं. ती अजुनही बाहेरचा पाउस बघत होती.

"Perfect" तो मुद्दामून थोड्या उसन्या बेफिकिरीने म्हणाला. खरतर त्याला त्याच्या मनातली घालमेल तिच्यासमोर उघड करायची नव्हती.

त्याच्या ह्या उत्तरावर ती खुदकन हसली. तिच्या गोबऱ्या गालावरली खळी पुन्हा त्याच्या उरात धडधड वाढवुन गेली.

"का? काय झालं असं हसायला?" त्याने चमकून तिला विचारलं

"काही नाही, सहज आठवलं ....... एव्हढ्या वर्षानंतर अजुनही तुझा हा रिप्लाय अजुन बदलला नाहीय" ती पुन्हा एकदा हसत म्हणाली. अजुनही तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं.

"तुला अजुन लक्ष्यात आहे तर?" खरतर तिला हां प्रश्न विचारताना तो मनातून सुखावला होता.
त्याच्या ह्या प्रश्नावर तिने बाहेरच्या पावसाकडे पहात एक सुस्कारा सोडला.

"काही गोष्टी ठरवुनही विसरता येत नाहीत. फार कमी लोकांना ती कला अवगत असते, ठरवून विसरायची." मगासपासुन पहिल्यांदाच ती त्याच्या डोळ्यात पहात उत्तरली.

तिने दिलेली चपराक त्याला सणसणित बसली होती. त्याने तिची ती काळजाचा वेध घेणारी नजर टाळली.

दोघेही जण आता शांत होते. बाहेर पावसाचा जोर आता वाढला होता. जणुकाही तो इतक्या दिवसापासुन साचलेल्या स्वत:ला, आज रिता करत होता.

काही क्षण गेल्यावर त्याने तिला विचारलं,

"तू कशी आहेस?"

"मस्त.....तुला कशी वाटते?" एक दीर्घ श्वास घेत ती त्याच्याकडे पहात म्हणाली.

तो पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती खरच छान दिसत होती. अगदी पुर्वीसारखी. वाढत्या वयासोबत आंदण मिळणार्या पोक्तपणामुळे चेहरयावरचा बालीशपणा पुसला गेला असला तरी, तिची कपाळावरची रुळणारी चुकार बट अजुनही बघणार्याचं लक्ष वेधून घेत होती. डोळ्यांखाली सुरु झालेली पुसटशी काळी वर्तुळं तिचा सध्याच्या धकाधकीच्या आयुष्याची जाणीव करून देत असली, तरी हसताना तिच्या उजव्या गालावर पडणारी खळी आजही समोरच्याचा हृदयाचा ठोका चुकवण्यास पुरेशी होती. तोच मानेवरचा तीळ, तेच काळजात खोल उतरणारे डोळे, पुन्हा तीच दिलखेच अदा.
सगळं अगदी पुर्वीसारखं
निरागस
लाघवी
तिच्या प्रेमात पाडणारं

ह्या सगळ्या गोष्टीत मात्र त्याला फ़क्त एक गोष्ट खटकली होती.

तिच्या मानेवरचा तीळ,
ज्याला तिची नजर चुकवून तो नेहमी पहात रहायचा. आज तोच तीळ, दोन पदराच्या काळ्या मण्यांआड त्याच्या नजरेपासुन लपत होता.
तिच्या गळ्यातलं नाजुकसं पण रेखीव मंगळसुत्र पहाताच एक हलकी कळ त्याच्या काळजात उठली.
हिचं लग्न झालं?
त्याला उगीचच चुकचुकल्यासारखं झाल. त्याने आपली नजर लगेच खिडकीबाहेर फेकली.

बाहेर पाउस आता तूफ़ान कोसळत होता. बाहेरच सगळं आता धूसर दिसत होतं. पावसाच्या सरींची एक झालर त्या फुल साईज खिडकीवरुन खाली उतरत होती.

"तुझं लग्न झालं?" तिने अचानक त्याला विचारलं.

"हो"

तो चपापला. आपल्या ह्या उत्तराचं त्याच त्यालाच नवल वाटलं. आपलं लग्न झालेल नसताना, आपण तिला आपलं लग्न झालयं असं खोटं का बोललो हे त्याचं त्यालाच कळलं नव्हतं. तो तिला खरं सांगणारच होता, पण त्याच्या ह्या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्माईल पाहून, त्याने आपला निर्णय बदलला.

"Good" ती आपल्या मंगळसुत्राशी खेळता खेळता त्याच्याशी बोलत होती. सुरुवातीपेक्षा आता ती बरीच relaxed वाटत होती.

"काय करते ती?"

"जॉब करते. सध्या आउट ऑफ़ टाउन आहे." तो तुटकपणे म्हणाला.

"हम्म........." तिने तिच्या कॉफ़ीचा एक सीप घेतला.

"Love marriage???" तिने विचारलं.

"Love cum arranged" तो हसून उत्तरला.

तिने त्याच्या ह्या उत्तराला अंगठा उंचावुन कौतुकाची दाद दिली.

"तुझं??" त्याने तिला विचारलं

"Arranged....."

"पुन्हा कधी प्रेमात पडायची हिम्मतच नाही झाली" ती त्याच्या डोळ्यात खोल उतरत म्हणाली.
तो अवघडला. त्याने विषय बदलला.

"तुझे मिस्टर काय करतात?"

त्याच्या ह्या प्रश्नावर ती दिलखुलास हसली.

"तो नेव्ही मधे आहे. शीप वर असतो. He is mechanical engineer. University topper you know?"

हां टोमणा तिने आपल्याला मारला आहे. हे त्याला कळलं होतं.

"कॉलेजनंतर ओळख झाली होती. बाबांच्याच मित्राचा मुलगा. खुप प्रेम करतो माझ्यावर....." ती बडबडत होती, तिच्या नवऱ्याबद्दल, तिच्या संसाराबद्दल अगदी तोंडभरून बोलत होती. पण ह्याच लक्षच नव्हतं. तो तिच्याकडे एकटक पहात अजुनही तिच्यासोबत तिच्या पुर्वीच्याच जगात रमला होता.

खरच त्या रात्रीचा आपला निर्णय चुकला होता का? की त्यावेळेस आपण फार ओव्हर सेफ खेळलो होतो? काय फ़रक पडला असता जर का मी तिला होकार दिला असता तर?

फायनल इअरला त्याने युनिव्हर्ससिटी टॉप केली होती. कॉलेज संपल्यानंतर लगेचच जॉब लागला होता. दोन वर्षात स्वत:च घर ही घेतलं होतं. नवीन घरात येण्याअगोदरच बाबा गेले आणि जिच्यासाठी आजवर जिवाच रान केल होतं ती आईही त्यांच्यापाठोपाठ त्याला सोडुन गेली होती.
आता उरला होता फ़क्त तो......एकटा.

आयुष्यात थोडं स्थिरस्थावर झाल्यावर त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला होता. नाही असं नाही. जिथून माहिती काढता येईल त्या सगळीकडे त्याने तिच्याबद्दल चौकशी केली होती. पण कुठुनही त्याला तिचा सुगावा लागला नाही. पण त्याला खरच मनापासून वाटत होतं की, ती त्याला एक ना एक दिवस नक्की भेटेल आणि ती भेटलीदेखिल.....पण दुसर्याची झालेली.

"शुक शुक....."

त्याच्या विचाराची तंद्री तुटली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं ती त्याच्याकडेच पहात होती. तो तिच्याकडे पाहून फ़क्त कसनुसं हसला.

दोघेही जण शांत होते. त्याने घड्याळात पाहिलं चार वाजून गेले होते. बाहेरचा पाऊसही आता विसावला होता. दोघेही केफेबाहेर आले. ती रिक्षा पकडायला धावली. तसा तो तिला अडवत म्हणाला.
"अग थांब, मी सोडतो तुला"

"पुन्हा???........." तिच हे उत्तर त्याच्या काळजात आरपार खुपलं.

तो निशब्द होउन तिच्याकडे पहात राहिला. ती रिक्षा पकडून निघून गेली. तो कितीतरी वेळ तसाच त्याच्यापासून दूर जाणार्या त्या रिक्षाकडे पहात तिथे उभा होता.

रात्री तो झोपायच्या तयारीत होता. पण संध्याकाळी घरी आल्यापासून त्याच कश्यात लक्ष नव्हतं. राहुन राहून तो सारखा तिचाच विचार करत होता.

बराच काळ शांत असलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर अचानक कुणीतरी एक दगड भिरकवावा आणि इतका वेळ कुठेतरी तळाशी बुडालेली वलयं एकामागोमाग एक वरती येत जावीत. असचं काहीसे त्याच्याबाबतीत आज इतक्या वर्षांनी ती अचानक सामोरी आल्याने घडलं होते. इतके दिवस मनात कुठेतरी खोल गाडलेल्या आठवणी, आज या संधीचा फ़ायदा घेउन पुन्हा वर येउ पहात होत्या. पण आज त्याने त्यांना नेहमीसारखे अड्वले नाही.

एकामागुन एक येणार्या आठवणीं हळुहळु मग त्याच्या अस्तित्वाचा परिघ व्यापू लागल्या. इतक्या की, भौतिकतेच्या सगळ्या नियमांची बंधन झुगारुन त्या पुन्हा त्याला परत नेत होत्या.

तिच्या जगात…

जे तिने कधीतरी त्याच्यासाठी आणि फ़क्त त्याच्यासाठीचंच बनवलं होतं.

ज्यात तीचं हसणं त्याच्यासाठी होतं.
ज्यात तीचं नटणं सजणं ही त्याच्यासाठीच…….
ज्यात तिच्या लटक्या रागावर त्याचा हक्क होता
ज्यात तीचं खोटं रुसणं ही फ़क्त त्याच्यासाठीच……

तिच्या नजरेचे इशारे……
तिच्या डोळ्यातील स्वप्ने…..
तिचा स्वत:वरचा विश्वास
घेतलेला प्रत्येक श्वास………..फ़क्त त्याच्यासाठीच

अवचित आलेला पाउस
क्षितिजावरती मालवणारी सांजरात
आवेगाने स्वत:लाच मारलेली गच्च मिठी
गालावर उमलेली खळी …….फ़क्त त्याच्यासाठीच

भेटीसाठी आसुसलेले तिचे दिवस
आठवणीत जागणार्या तिच्या रात्री.....त्याच्यासाठीच
अन
तो कायमचा दूर होत असता
त्याला नजरेत साठवताना भिजलेले डोळे देखिल……..फ़क्त त्याच्यासाठीच……..

*********************************************************

"HI...." त्याच्या मोबाईलवर तिचा मेसेज झळकला.
तिला रिप्लाय दयावा की न देवा ह्या विचारात असतानाच पुन्हा तिचा मेसेज आला.
"फार बरं वाटलं तुला भेटुन."
तिच्या ह्या मेसेजने त्याचा चलबिचलपणा अजुन वाढला. शेवटी न रहावुन त्याने तिला रिप्लाय पाठवला.
"Hi, मलाही खुप बरं वाटलं तुला इतक्या दिवसाने पाहून. पोहचलीस घरी?"
"कधीच.....तू?" पुन्हा तिचा रिप्लाय आला.
"मी पण....
चल बाय गुड नाईट :-)"
"गुड नाईट.... :-)"
तिचा रिप्लाय वाचुन त्याच्या चेहर्यावर हलकीशी एक स्माईल उमटली. हातातला मोबाईल आपल्या छातीशी कवटाळुन तो पुन्हा तिच्या आठवणीत रमून गेला.

*****************************************************************

रात्री बराच प्रयत्न करूनही त्याला झोप येत नव्हती. डोळे मिटले की सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता. शेवटी तो बेडवरुन उठला आणि उठून बाल्कनीमधे आला. आपल्या दहाव्या माळ्यावरच्या आलिशान टेरेस फ्लेटच्या बाल्कनीत उभा राहून तो समोरचा समुद्र न्याहाळत होता. मस्त Sea facing ला असलेली टेरेसच्या रेलिंगला टेकून समुद्रावरून येणार्या गार वाऱ्याला अंगावर झेलत तो समोरच्या रस्त्याकडे पहात होता. दिवसभराची दगदग सोसून आता कुठे थोडा निवांत झाला होता. एखाद दूसरी गाडी सोडली तर त्याच्या सोबतीला कुणीही नव्हतं.

अगदी त्याच्यासारखा....

वेळ घालवण्यासाठी त्याने मोबाईल काढला. कानात हेड्फ़ोन्स लावून FM चालु केलं.

"आज मैंने दिल से
बादलो से मिलके......"

मस्त गाणं लागलं होतं....one of his favorite. पण पुन्हा त्याला ह्या गाण्याच्या अनुषंगाने तिची आठवण आली.

पूर्वी कॉलेजला असताना आपल्या आवडीचं गाणं FM वर लागलं की तो तिला मेसेज करायचा. तिला ही ते सेम FM स्टेशन लावून ते गाणं तो तिला ऐकायला लावायचा. आताही त्याला तसच करावसं वाटलं, पण नंतर त्याने आवरलं स्वत:ला.

पण, तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तिचाच मेसेज होता.

"FM 98.3 लाव तुझ्या आवडीच गाणं लागलय." मेसेज वाचुन तो चमकलाच.

"आयला.. हिला अजुनही आठवतय सगळं"
तो स्वत:शीच हसला. उत्तरादाखल त्याने तिला हसणारी smiley पाठवली आणि पुन्हा fm वर लागलेल्या गाण्यात हरवून गेला. आज त्याला त्या गाण्याची प्रत्येक ओळ त्याच्याशी रिलेट होत असल्या सारखी वाटत होती.
******************************************************************

तो तिची ठरलेल्या ठिकाणी वाट पहात उभा होता. तो नेहमीच ठरल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटं अगोदर तिथे यायचा आणि कुठली तरी चांगली जागा बघून लपून रहायचा. जेणेकरुन त्याला ती दिसेल पण तिला तो दिसणार नाही. ती ठरल्या ठिकाणी आल्यावर पाच दहा मिनिटांनी तो तिथे जायचा आणि आत्ताच आलो असं भासवायचा. हे सगळं करण्यामागच कारण फ़क्त एकच की, ती पाच-दहा मिनिटं तो तिला डोळे भरुन पाहून घ्यायचा. नजरेत साठवुन घ्यायचा. आठवणींचा कप्पा तीच्या छबीने भरुन टाकायचा. त्याच्या ह्या विचित्र वागण्याचं कित्येकदा त्याच त्यालाच नवल वाटायचं.

आजपासून बरोबर महिन्याभरापुर्वी जेव्हा ती त्याला त्या CCD मधे भेटली होती. तेव्हा त्याने तिच्याशी आता जास्त सलगी वाढवायची नाही असं ठरवलं होतं. पण जस जशी ती त्याला पुन्हा पुन्हा भेटत गेली तस तसं त्याने त्याच्या ठरावाला स्वत: च तिलांजली दिली होती. मनाला लाख अडवले तरी ते तिच्याकडेच ओढ घेत होते. तिच्यासोबतच्या दररोजच्या Conversation ने ती त्याच्या अजुन जवळ येत होती. दिवस तिच्या good morning ने सुरु व्हायचा आणि संपायचा तिच्या good night ने. एखाददिवस जर एकामेकांचे मेसेज आले नाहीत तर लगेचच एकामेकांना कॉल जायचे. एकामेकांचा आवाज ऐकल्यावरच जीवात जीव यायचा. सुरुवातीला थोडे awkwardness ने सुरु झालेलं त्यांच्यातलं संभाषण आता more than personal झालं होतं.

ते हल्ली बरच काही बोलायचे एकमेकांशी. जास्त करून त्याची नेहमी ऐकणार्याची भूमीका असायची. कॉलेजपासुनची तिची बडबड त्याच्या सवयीची होती. पण हे त्याच्या दृष्टीने चांगलच होतं. त्यामुळे त्याला त्याच्या न झालेल्या लग्नाबद्दल कमी बोलायला लागायचं.
ती खुप बोलायची
तिच्याबद्दल...
तिच्या नवऱ्याबद्दल...
तिच्या संसाराबद्दल.....
तिच्या स्वप्नांबद्दल........
दरवेळेस तिच्या ह्या गोष्टी ऐकताना तिच्या नवर्याच्या जागी तो स्वत:ची कल्पना करायचा. त्याला जाणवायचं की हे चुक आहे पण त्याला आवडायचं हे स्वप्नरंजन.

पण कधी कधी त्याला तिच्या बोलण्यात का कुणास ठावुक पण एक प्रकारची विषण्णता जाणवायची. असं वाटायचं की, ही सांगतेय तेव्हढी खरच सुखी आणि समाधानी आहे का? की उगीचच आपल्याला वरचढ सांगतेय? त्याला बर्याचदा तिला ह्याबाबतीत विचारावसं वाटायचं, पण दरवेळेस तिच्या सोबत असताना तो तिच्या अस्तित्वात हरवून जायचा. तिच्याकडे पहाताना तिच्या टपोर्या डोळ्यात हरवून जायचा. त्याच्या आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी तिच्यात अलगद विरघळुन जाताना शेवटी फ़क्त ती आणि तीच त्याच्या सगळ्या आसमंतात भरुन जायची.

तिच्या नवऱ्याला शिपवरून परत यायला अजुन पाच महिन्याचा अवकाश होता. तसं ह्या शहरात त्याचही आपलं असं कुणी नव्हतं. ते दोघेही एकामेकांत स्वत:साठी एक सोबत शोधत होते.
आजकाल तर ते दररोज संध्याकाळी भेटत होते. कधी मरीन ड्राईव्ह, कधी गेट-वे, कधी जहांगीर आर्ट गेलरी, कधी मस्त एखादं नाटक तर कधी उगीचच कुठेही न ठरवता केलेली भटकंती. त्याचा शनीवार रवीवार तर तिच्याच नावाने लिहिलेला असायचा. दर दिवशी ती त्याला नव्याने भेटत होती. पुन्हा एकदा ती त्याला नव्याने उमगत होती. तो नकळत तिच्यात गुंतत चालला होता. दररोज तिचा निरोप घेताना त्याला आपलं काहितरी हरवल्याची चुटपुट लागायची. म्हणुन तोही तिच्यासोबत जास्तीत जास्त कसं रहाता येइल ह्याची कारणं शोधत रहायचा.

तो नेहमी तिला तिच्या घरापर्यंत सोडायला जायचा. मात्र तिच्या सांगण्यावरुन तो तिला तिच्या घराच्या थोडं अलीकडे सोडायचा. उगाच लोकांच्या नजरेत नको म्हणुन ही खबरदारी. त्याने देखील कधी ह्या बाबतीत तिला विचारलं नाही.

ती गल्लीच्या टोकाशी जाईपर्यंत तो तिथेच उभा असायचा. ती तिथवर पोहचल्यावर मागे वळुन त्याच्याकडे पहायची. हलकेच मग आपल्याला कुणी पहात नाहीं ना हे पाहून त्याला गुपचुप बाय करायची.

तरी तो तसाच उभा रहायचा. तिच्याकडे एकटक पहात.

तशी मग ती नजरेनेच त्याला दटावुन त्याला जाण्यास सुचवायची. पण तो तरीही हसून तसाच उभा रहायचा.

शेवटी नाईलाजाने ती तिथून निघून जायची. थोड्या वेळात त्याला मेसेज यायचा.

"पोहचली मी...जा आता"

पुन्हा एकदा त्या गल्लीच्या टोकाकडे पाहून तो बाईकला किक मारून परत वळायचा. हे आता नेहमीचच झालं होतं.

***************************************************************

एके संध्याकाळी तो तिला रत्नागिरीला त्याने नव्याने बुक केलेल्या सेकंडहोम प्रोजेक्टवर घेउन गेला. प्रोजेक्ट all most सगळा तयार झाला होता. फ़क्त आता रहायला यायच बाक़ी होतं.
मेन सिक्युरिटीला चेक इन करून त्याने आपली कार आत आणली. फार मोठा प्रोजेक्ट होता. एका टेकडीच्या उतारावर तो प्रोजेक्ट बांधला होता. त्या टेकडीच्या वरच्या बाजुला डोंगर आणि दुसऱ्या बाजुला अथांग रत्नाकर पसरला होता.

20-25 घर एकामेकांपासुन आपली प्राईव्हसी जपत अगदी रुबाबात उभी होती. प्रत्येक घर दुसर्या घरापेक्षा वेगळ आणि सुंदर होतं. साधारण पाच एक मिनिटाच्या ड्राईव्हनंतर ते दोघे एका घरासमोर येउन थांबले.

समोरच्या त्या घराकडे पाहून ती हरखून गेली.

"तुझं घर?"

त्याने नजरेनेच होकार देताच, कौतुकाने तिच्या भुवया उंचावल्या.

ते दोघे आत आले. ती भारावुन सगळीकडे पहात होती. त्याच घर त्या प्रोजेक्टमधे सगळ्यात उंचावर होतं. टेकडीच्या उताराचा फार सुरेख वापर करून घेतला होता त्याने. मस्त तीन बेडरुम, हॉल असलेला तो बंगला होता. खाली हॉल आणि किचन सोबत एक गेस्टरूम, वरच्या बाजुला दोन बेडरुम होत्या. एक कॉमन आणि एक मास्टर सोबत टेरेस. वरती जाण्यासाठी मस्त गोलाकार जीना. डबल हाईटच्या हॉलमधे लावलेले मोठाल्लं झुंबर लक्ष वेधून घेत होते. घरातली प्रत्येक गोष्ट वेगळी आणि कलात्मक होती. वरती मास्टर बेडरुममधे मोठा बेड, सुंदर गालीचा. त्याच्या टेरेसवर असलेला झोपाळा, सगळं तिला आवडलं होतं.

पण, तिला सगळ्यात जास्त आवडला होता तो खालच्या बाजुला बांधलेला स्विमींगपुल. आणि त्याला लागुन असलेलं मोठं लॉन.

ती घराबाहेर आली. त्या मऊशार गवतावरून बिना चपलेचे चालताना पायाला गुदगुल्या होत होत्या. ती स्विमींग पुल जवळ गेली. त्या निळ्या पाण्यात स्वत:चे प्रतिबिंब पहाताना तिला तिच्या बाजुलाच त्याचेही प्रतिबिंब तिच्याकडे पहाताना दिसले. तिने हलकेच त्या शांत पाण्यावरुन हात फिरवला. तशी ती दोन्ही प्रतिबिंबे एकामेंकात समरसून गेली.

लॉन मधे उभे असताना अचानक पाउस सुरु झाला. तो तिला हाक मारून धावत घराच्या दिशेने निघाला. पण थोडं दूर गेल्यावर त्याला जाणवलं की ती त्याच्यासोबत नव्हती. त्याने मागे वळुन पाहिलं तर ती तशीच त्या पावसात उभी होती. हात फैलावुन अंगावर पावसाच्या सरी झेलत.
तो परत तिच्याकडे आला. ती मस्तच दिसत होती. तो तिच्याकडे स्वत:च भान हरपून पहात होता. त्याला असं वाटत होतं की तिला गच्च मिठीत भरुन घ्यावी.

तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि ती तिची आवडती कविता गुणगुणायला लागली.

हवा एक पाऊस
मला गाफिल पाहुन
अवचित बरसणारा...
लटक्या रागावर माझ्या
लडिवाळ हसणारा...

हवा एक पाऊस
ओळखीच्या खुणांवर
उगीचच रेंगाळणारा...
ओल्या वाटांवरल्या
पाउलखुणा जपणारा...

हवा एक पाऊस
बेधुंद उत्कट सरींनी
मला वेढणारा...
घेऊनी मिठीत मजला
अलवार शहारणारा...

हवा एक पाऊस
दूर माळरानात
रातराणीस छेडणारा...
मालवून चांदण्या सार्‍या
रात्र नशावणारा...........

हवा एक पाऊस
फक्त माझ्या अन
माझ्यासाठीस झरणारा
पसरलेल्या आभाळातुन
ओंजळीत विसावणारा.........

एव्हढं बोलुन तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला. दोघे एकामेकांच्या नजरेत हरवून गेले होते. कितीतरी वर्षाने त्याला पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांत त्याच्यासाठी आसुसलेली नजर दिसली होती अन तिलाही ज्या गोष्टीसाठी तीने एकेकाळी आपल्या जीव झुरवला होता आज ती गोष्ट तिच्याजवळ होती.

काही क्षण असेच गेले आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या ओठांना तिच्या नाजुक ओठांचा स्पर्श त्याला सुखावून गेला.

त्या उत्कट क्षणांत दोघेही विरघळुन गेले. कुठलीतरी एक अपुर्ण असलेली गोष्ट आज पुर्णत्वास गेली होती.

एक दोन क्षण गेले असतील की ती भानावर आली. झटक्यात त्याच्यापासून दूर झाली. तिच्या अश्या अचानक दूर होण्याने त्याचीही समाधी तुटली. परिस्थीतीच भान येताच त्यालाही आपण हे काय करून बसलो ह्याची जाणिव झाली. तो ओशाळला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने लाजुन त्याची नजर टाळली. तिच्या चेहर्यावरची लाली त्याला पुन्हा खुणावत होती. पण मोठ्या प्रयत्नाने त्याने स्वत:वर ताबा ठेवला. ती धावत घराकडे निघून गेली. तो मात्र आता त्या अंगणात एकटाच पावसात भिजत राहिला.

**********************************************************************

त्यादिवशी सोमवार होता. तो त्याच्या ऑफिसमधे काम करत होता. आज संध्याकाळी तिला गडकरी रंगायतनला भेटायच होतं. "आयुष्यावर बोलू काही" ह्या संदीप-सलीलच्या कार्यक्रमाची तिने तिकिटं काढली होती.

अचानक त्याला त्याच्या केबीनच्या बाहेर गडबड ऐकू आली. तो लगबगीने केबीन बाहेर आला.
त्याने बाहेर येऊन पाहिलं तर, बाहेर एक त्याच्याच वयाचा माणुस मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता आणि त्याच्या ऑफिसमधली त्याची एक कलीग रडत रडत त्याला आवरायचा प्रयत्न करत होती. पण तो तीच काहिएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तिला फार घाणेरड्या शिव्या घालत होता. अचानक त्याने तिच्या कानाखाली वाजवली. तसे इतका वेळ शांत असलेले बाकीचे सहकारी मधे पडले आणि सिक्युरिटी गार्डच्या मदतीने त्याला ऑफिसबाहेर घेउन गेले. त्याच बरोबर त्याची ती कलीगदेखील त्यांच्या मागोमाग बाहेर गेली. सगळं काही इतक्या झटपट घडलं की कुणाला नक्की काय झालयं काही कळलंच नाही. थोड्याफार चौकशीनंतर त्याला एव्हढच कळलं की मगासचा तो धटिंगण त्याच्या त्या कलीगचा नवरा होता.
*********************************************************************
संध्याकाळी तो त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत केंटीनमधे चहा घेत होता. पुर्ण ऑफिसमधे आज दुपारी घडलेल्या प्रकरणाचीच गॉसीप चालली होतं. ह्यांचा गृपही त्याला अपवाद नव्हता. उलट त्यांच्या ग्रुपमधे तर ह्या सगळ्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखिल हजर होता. ज्याने हां प्रसंग अगदी सुरुवातीपासून पहिला होता. तो फार चवीने तो सगळा प्रसंग पुन्हा जसा घडला तसा रंगवुन सांगत होता.
".......आणि मग त्याने खणकन तिच्या कानाखाली वाजवली"
"अरे पण .....कारण काय?"
"अरे ज्याने तिला वाजवली तो तिचा नवरा होता. तो वर्षातले पाच सहा महीने कामानिमित्त बाहेर असायचा आणि ही इथे एकटी असायची. हा घराबाहेर असताना ह्याच्या बायकोचं बाहेर तिच्या कुठल्यातरी मित्रासोबत झेंगाट चालु आहे ह्याची भनक ह्याला लागली. त्यामुळे तो आज इथे आला होता. हि नाही नाही म्हणुन अस काही नाहीए असं त्याला समजावत होती. पण त्याच्याकडे पुरावे होते. जाम तापला होता तो. साला त्याच्या हातातून तिला सोडवताना नाकी नउ आले होते. त्यांना ऑफिसमधून बाहेर तर काढला. पण मला नाही वाटत तो तिला सोडेल म्हणुन. चांगला कोंबडी सारखा सोलणार तो तिला"
"चल रे काहीही काय बोलतोयस. तिच्या आणि तिच्या मित्रामधे चांगली मैत्री ही असू शकते" तो न रहावुन त्याच्या त्या मित्रांना म्हणाला.
"तू चालवून घेशील तुझ्या बायकोचा असला यार? जो तू समोर असताना पण तिच्या डोक्यात असतो. दिवसा आणि रात्रीही...."
मित्राच्या ह्या उत्तरावर तो गप्प झाला. कारण त्याचा मित्र अतिशयोक्ती बोलत असला तरी त्यात थोड तत्थ्य होतं. सध्या तो देखील तिच्याबद्दल थोडं posessiveness फिल करत होता.
"साला आपल्या बायकोने अस केलं असतं ना? तर आपण तिचा मर्डरच केला असता." त्यांच्याच गृप मधला अजुन एकजण बरळला, तसं चमकून त्याने त्याच्या त्या मित्राकडे पाहिलं.

********************************************************************

आज दुपारच्या प्रसंगानंतर तो सरबरला होता. त्याच्या डोळ्यासमोर सारखी ती आणि तिचा न पाहिलेला नवरा उभे रहात होते. खरच तिच्या नवऱ्याला आपल्यातल्या संबधाबद्दल कळालं तर काय होईल. तो स्विकारेल का त्यांची जगावेगळी मैत्री. की तो ही आजच्या माणसासारखा तिच्या जिवावर उठेल.

विचार करून करून त्याच डोक बधीर झालं होतं. त्याला त्याच्या महिला सहकार्याच्या ठिकाणी ती दिसू लागली. तिच्या नवर्याला त्याची मैत्री कळल्यावर तो स्वस्थ बसेल का?

आज ऑफिसमधे घडलेला प्रकार तिच्या आयुष्यात खरच घडला तर काय होईल? ह्या विचाराने तो घामाघुम झाला.

नाही......

आपल्याला तिला त्रास झालेला अजिबात चालणार नाही. आपल्याला वेळीच थांबायला हवं.
तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला. पाहिलं तर तिचाच फोन होता. त्याने पटकन घड्याळात बघितले. आज ह्या सगळ्या गडबडीत तो तिला भेटायचे विसरून गेला होता.
काय करावे?
भेटावे की आता हे सगळं थांबवावं?
मला ती हवीय आणि तिला ही बहुतेक मी हवाय. तिच्या नजरेत जाणवतं ते.
पण बाकीच काय?
तिला जमेल का सगळ माझ्यासाठी सगळं सोडुन यायला?
पण तिच्या नवऱ्याचं काय होईल?
तो पण तिच्यावर फार प्रेम करतो.
त्या बिचाऱ्याचा हया सगळ्यात काय दोष?
त्याने ह्या सगळ्या प्रकरणात स्वत:च काही बरवाईट करून घेतलं तर?
विचार करून करून त्याचं डोकं दुखायला लागलं होतं.
त्याला ती हवी होती पण, आपल्यामुळे तिचा भरला संसार उध्वस्त व्हावा अस त्याला मुळीच वाटत नव्हतं.

तो फार विचित्र तिढ्यात अडकला होता.

मोबाईल पुन्हा रिंग वाजायला लागली. त्याने एकवार त्या मोबाईल स्क्रीन वर झळकणार्य तिच्या नावाकडे पाहिलं. आणि मोठ्या मुश्किलीने तिचा कॉल रिजेक्ट केला.

**********************************************************************

तो मुंबई एअरपोर्टवर फायनल कॉलसाठी बसला होता. बोर्डिंग पास, चेक-इन वगैरे सगळे सोपस्कार पार पडले होते. मुंबई-मिलान (इटली) इंटरनेशनल फ़्लाईट आता थोड्याच वेळात गेट नंबर 33 ला लागणार होती. तो सारखा समोरच्या स्क्रीनवर फ़्लाईटसच स्टेटस चेक करत होता.
तेव्हढ्यात त्याचा फोन वाजू लागला. त्याला माहीती होत की हा कुणाचा फोन असणार ते. त्याने फोन बाहेर काढुन पाहिला. त्याचा अंदाज बरोबर होता. तिचाच फोन होता. त्याने पुन्हा तिचा फोन कट केला.

गेल्या आठवड्याभराच्या सरावाने त्याला तिचा फोन कट करणं आता जास्त कठीण होत नव्हतं. पण ती ही फार चिवट होती. त्याचा फोनचा कॉल लॉग तसेच मेसेजबुक सगळा तिच्याच नंबरने भरले होते.

तिचं नावं पुन्हा स्क्रीनवर दिसू लागलं. त्याने वैतागुन फोन स्विच्ड ऑफ़ करून टाकला. तिच्याशी असं तोडून वागाताना त्यालाही फार यातना होत होत्या पण त्याला काही इलाज नव्हता. तिला सुखात रहायच असेल तर त्याने तिच्या आयुष्यातून तड़ीपार होणं हां एकमेव पर्याय होता. आणि म्हणुनच त्याने त्याच्या ऑफिसने दिलेली ऑफर लगेच स्वीकारली. त्याच्या मिलानच्या ऑफिसला एका कर्मचाऱ्याची गरज होती. ह्याला सतत त्याबद्दल विचारणा होत होती. पण तो आतापर्यंत नकार देत होता. पण त्यादिवशी ऑफिसमधे घडल्या प्रकाराने त्याला हां निर्णय घेण्यास भाग पाडले होते. तसाही त्याचा shanghaiing visa अजुनही चालु होता. महिन्याभरातच त्याला वर्क परमीटही मिळणार होतं.
इतक्यात झालेल्या अनाउंसमेंटने तो भानावर आला. Al-italia एअरलाईन गेट नंबर 33 ला लागली होती. तो जागेवरून उठला आणि गेट नंबर 33 कडे चालु लागला.

इतकी वर्ष कामानिमित्त दूर दूर भटकत आला होता तो. पण आज का कोण जाणे. एक विचित्र हुरहुर मनात दाटुन आली होती. आयुष्यात पहिल्यांदा तो कुठला तरी निर्णय घेताना द्विधा मनस्थीतीत अडकला होता. नक्की काय करावं हे त्याला समजत नव्हतं. एव्हढा भावनाविवश तर तो तेव्हाही झाला नव्हता. जेव्हा त्याने तिला अगदी ठाम पणे नकार दिला होता. एव्हढा भावनाविवश तर तो तेव्हाही झाला नव्हता, जेव्हा ती स्टेशनवर उभी राहून त्याचा हात हातात घेउन त्याच्या होकाराची वाट पहात होती आणि त्याने रुक्ष पणे तिच्या हातातून आपला हात सोडवून घेतला होता.

पण मग आजच का?

विचार करता करता तो फ़्लाईटमधे कधी येउन बसला हे त्यालाच कळलं नाही. त्याने तिचे विचार मनातून झटकले. तो खिडकीतुन बाहेर पाहू लागला.

फ़्लाईटमधल्या एअरहोस्टेसने सगळ्या प्राथमिक सूचना दिल्या. त्याने सिट बेल्ट लावला. त्याचा चलबिचलपणा अजुन वाढला होता. विमान रन वे ला लागल. हा गहिवरला. विमानाने रनवेवरून टेक ऑफ़ घ्यायला सुरुवात केली होती. हा अजुन कासावीस होत होता. त्याचं मन त्याला खात होतं. असं वाटतं होतं की बस झालं थांबवावं हे विमान आणि तडक तिला जाऊं भेटावं आणि सागावं तिला की तू मला आवडतेस पण तो विचारच करत राहिला आणि विमानाने टेक ऑफ़ घेतलं.
आता सगळे पाश सुटले होते. तो तिच्या जगापासुन दूर दूर चालला होता......

कायमचा...........

************************************
महिन्याभरानंतर
************************************

एका प्रोजेक्टच्या किक ऑफ़ मिटिंगसाठी आज तो परत मुंबईला आला होता. साला फार टाईट शेड्यूल ठेवल होतं प्रोजेक्ट कॊर्डिनेटरनी. पण त्याने त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याने त्याची सगळी कामं वेळेवर उरकली होती. ठरवल्यापेक्षा एक दिवस अगोदरच तो मोकळा झाला होता. दुसऱ्या दिवशी रात्री त्याला पुन्हा इटलीसाठी निघायच होतं. त्याच्याकडे उद्याचा अख्खा दिवस आणि आजची अख्खी रात्र होती.
संध्याकाळी तो बर्यापैकी निवांत होता. हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून समोरच्या समुद्राकडे पहाताना हातातल्या कॉफ़ीचा आस्वाद घेत होता. सूर्य मावळुन बराच वेळ झाला असला तरी संध्याकाळ मात्र उगीचच अजुनही क्षितिजावर रेंगाळत होती.
काहीतरी मागे सुटल्यासारखी......
कुणाची वाट पहात होती कुणास ठावुक.
पण तिचा पाय तिथून निघत नव्हता हे मात्र खरं.
क्षितिजावरची ती एकाकी कातरवेळ पाहून त्याला गलबलुन आलं.
खरच कुणाचा इतका लळा का लागावा की कितीही ठरवले तरी मनातुन त्याची आठवण पुसली जाऊ नये?

दिवसातली हि वेळ त्याला अगदी नकोशी वाटायची. जिवाला नुसती एक अनामिक हुरहुर लागुन रहायची. फार जवळच काहीतरी गमावलयं ह्याची हुरहुर. हातात सगळं काही असुनही रितं रितं वाटायचं त्याला. फार एकटं एकटं वाटायचं त्याला आणि मग अश्या वेळी तिचा आठवणी त्याला
आजूबाजूच सगळं नाहिसं होउन फ़क्त "ती" उरायची.
तिचं हसणं,
तिचं लाडिक बोलणं,
तिचा लटका रुसवा,
तिची त्याच्यावर खिळलेली नज़र.
सगळं सगळं तीच…
तिने त्याच्या सोबत घालवलेल्या क्षणांनी ती त्याला पुरता वेढुन टाकायची. इतका की तो गुदमरुन जायचा.

आजही ह्या अश्या अबोल कातरवेळी त्याला राहून राहून तिची फार आठवण येत होती. तिला अखेरचं भेटुन आता महीना उलटला होता. सुरुवातीला नाही म्हटलं तरी त्याला थोडा त्रास झाला. पण त्याने स्वत:ला कामात फार बुडवुन घेतलं. इतकं की त्याने मनात आणलं तरी तिचा विचार आला नाही पाहिजे. आतातर त्याच वर्क परमीट देखील आलं होतं. म्हणजे आता कधी भारतात यायचं झालं तर कमीत कमी सहा महीने लागणार होते.
काय करावं तिला भेटावं का?
कशी असेल ती?
आपण तिला अचानक सोडुन गेलो. थोडा मुर्खपणाच झाला. आपण तिचा साधा निरोपही नाहीं घेतला. काय वाटलं असेल तिला?
खरतर तिला आयुष्यातून कायमचं दूर करताना त्याने आपण तिचा अजिबात विचार केला नाही ह्याची सल त्याला तिच्याशी अबोला धरल्यापासुन बोचत होती. तिकडे गेल्यावरही त्याला चैन पडत नव्हती. कित्येकदा वाटायचं की तिला फोन करावा. पण तो स्वत:ला अडवायचा.
पण आज त्याला अजिबात रहावत नव्हतं. निदान तिला भेटुन तिची माफ़ी मागावी नाहीतर आयुष्यभर तो ह्या ओझ्याखाली जगत राहिला असता. आणि त्याला हे अशक्य होतं. त्याने आपला फोन काढला आणि थरथरत्या हाताने तिचा नंबर डायल केला. तिचा फोन स्वीच्ड ऑफ़ येत होता. त्याला थोडं हायसं वाटलं. त्यातपुरतं तो स्वत:च समाधान करत होता की मी तर प्रयत्न केला होता पण नाही जमलं. पण दुसर्याच क्षणाला त्याला त्याच्या स्वार्थी विचारांची घृणा वाटली. आपण किती अप्पलपोटी झालो आहोत हे जाणवलं. त्याने पुन्हा एकदा तिचा फोन ट्राय केला. पुन्हा स्विच्ड ऑफ़ आला.

त्याच्या नात्यासारखा.........

सकाळी त्याची घालमेल अजुन वाढली होती. कालपासून तो तिचा फोन ट्राय करत होता. पण उत्तर तेच होतं.

काय करावं? तिच्या घराचा परिसर तर माहीती आहे. मोजुन तीन चार तर बिल्डिंग तर आहेत चौकशी केली तर सहज सापडेल.
मग जायचं का?
पण तिचा नवरा घरी असला तर.
असू देत. तिचा जुना मित्र आहे.
अगदीच कही नाहीं तर तिला निदान पहाता तर येईल. आणि आपण तिला असच टाकुन नाही गेलो ह्याचा तिला संदर्भही देता येईल.
स्वत:च्या ह्या प्लानिंग वर तो खुष झाला. त्याने घड्याळ्यात पाहिलं. त्याच्याकडे बराच वेळ होता. एक दिर्घ श्वास घेउन त्याने आज तिच्याबद्दलचा शेवटचा चान्स घ्यायचा ठरवलं. रूम सर्वीसला फोन करून त्याने टेक्सी मागवली.

************************************************************************
तो तिच्या दारासमोर उभा होता. नेहमीप्रमाणे त्याचा अंदाज बरोबर ठरला होता. तो तिला जिथे सोडायचा त्या गल्लीत आतमधे मोजुन तिसर्या बिल्डिंग मधे तीच नाव सापडलं होतं

C-404

त्याने धडधडत्या काळजाने आपल बोट डोअर बेल वर ठेवलं. हि बेल वाजवायची की नाही ह्या द्विधा मनस्थितीत तो होता. इतका वेळ जमवलेला धीर आता नेमका आयत्या वेळी त्याची साथ सोडायची धमकी देत होता. अखेर मनाचा हिय्या करून त्याने बेल वाजवलीच. घरातून बाहेर ऐकू आलेल्या त्या बेल च्या आवाजाने तो केव्हढ्याने तरी दचकला. त्याच्या अपेक्षेपेक्षा दार उघडायला थोडा जास्त वेळ लागत होता. समोरचं दार उघडायला जितका उशीर होत होता तस त्याचं मन अजुन कच खात होतं. त्याची हिम्मत तुटत होती. एकवेळ त्याला असं वाटलं की असचं परत निघून जावं. तिला सामोरं जाणं आपल्याला काही शक्य नाही. तो वळला देखील. तेव्हढ्यात पाठीमागे दार उघडलं.

त्याची पावलं अडखळली.

"कोण हवयं?"

त्या आवाजासरशी तो मागे वळला. त्याने पाहिलं की, दारात एक बाई उभी होती. साधारण त्याच्याच वयाची.

क्षणभर तो गोंधळला. त्याने स्वत:चे नाव सांगितले. त्याचं नाव ऐकून समोरची बाई विचारात पडली. तिला असं विचारात पडलेलं पाहून त्याने हळूच "तिचं" नाव सांगितलं.

तिच्या नावाचा संदर्भ ऐकताच दारातली ती बाई चमकली.

तिने दारातून बाजुला होत त्याला आत येण्यास वाट करून दिली.
"कधी आलास?"

"हल्लीच? तुम्ही मला ओळखता का?" त्याने आश्चर्याने विचारलं

"हो, तुम्ही जिला भेटायला आला आहेस. तिची मी बहीण. तिच्या तोंडुन बर्याचदा तुझं नाव ऐकलं होतं. बस....मी पाणी आणते" एव्हढं बोलून ती आत निघून गेली.

त्याला तिची ती बहीण थोडी शिष्ट वाटली. एकदम कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा होता तिचा. बोलताना चेहर्यावरची माशीदेखील हलत नव्हती. ह्याउलट ती किती छान आणि लाघवी बोलते. त्याचं मन उगाचच्या उगाच त्या दोघींची तुलना करत होतं.

तो सोफ्यावर बसला. आयुष्यात पहिल्यांदाच तो तिच्या घरी आला होता. घर त्याच्या इतकं मोठं नाही पण फार कलात्मक सजवलेलं होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वाची झाक त्या घरात जाणवतं होती. ह्याच्यापुढे आपलं मोठं पण ओंगळवाणं घर त्याला फ़िक्कं वाटत होतं. तो इथे तिथे पहात होता. एका बाजुला बुकशेल्फ, दुसर्याबाजुला एक मस्त टिव्ही युनीट. खिडकीवर टांगलेली विंड मील्सची किणकिण त्या शांततेत सुंदर नाद करत होती. त्याच्या समोरची एक अख्खी भिंत तर तिच्या फ़ोटोंनी भरलेली होती. तो उठून त्या भिंतीजवळ गेला. न रहावुन तिच्या फ़ोटोमधल्या गोबर्या गालावरून त्याने आपला हात फिरवला. पण लगेच भानावर येत आपण तिच्या घरात आहोत हे त्याला जाणवलं आणि तो तिच्या फ़ोटोंपासुन एकपाउल दूर उभा राहिला. तिचे फ़ोटोतले वेगवेगळे मूड्स त्याला खुणावत होते. पण आता आपल्याला इतक्या दिवसाने अचानक असं डायरेक्ट घरी आलेलं पाहून तिचा मुड कसा होईल ह्याचा अंदाज नव्हता त्याला.

तेव्हढ्यात त्याला फ़ोटोतल्या चेहरया वर एक प्रतिबिंब दिसलं. तो मागे वळाला. तर पाठीमागे तिची ती बहीण उभी होती.

तिच्या हातात पाण्याचा ट्रे होता. ती आलेली पाहून तो पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. तिने दिलेलं पाणी घेत तिला म्हणाला.

"ती कुठाय?" त्याने तिला विचारलं. खरतर तिला भेटण्यासाठी तो आतुर झाला होता.

"का आलास?" तिने शिष्टपणे त्याला विचारलं

"मला भेटायचय तिला" तो म्हणाला.

"का?" तिच्या बहिणीच्या अश्या चौकशीला तो वैतागला. पण चेहर्यावर तस न दाखवता तो शांतपणे तिला म्हणाला.

"Please तिला बोलवा. मला तिच्याशी फार महत्त्वाचं बोलायचय."

"काय बोलायचय?"

आता तो खरच इरिटेड झाला होता.

"हे बघा...मला तिच्याशी बोलयचय. मी तुमच्याशी नाही बोलू शकत. please तुम्ही तिला बोलवा.
फ़क्त एकदाच बोलवा....किंवा कुठेय ती.....तेव्हढं मला सांगा मी जाऊं भेटतो तिला.." त्याने असं म्हणताच तिच्या बहीणीच्या तोडुंन एक हुंदका बाहेर पडला. चेहर्यावरचा करारीपणा जाउन पुढच्याच क्षणाला ती रडायला लागली.

त्याला नवल वाटलं. तो गडबडला. हि अशी का रडायला लागली त्याला कळेच ना. तो आपल्या परीने तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.

"ती गेली." तिची ती बहीण रडता रडता म्हणाली.

"म्हणजे????" त्याने गोंधळुन विचारलं.

"म्हणजे ती नाही आहे आता आपल्यात. देवाघरी गेली ती. आपल्या सगळ्यांना सोडुन गेली." ती त्याला म्हणाली.

त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो पुन्हा तिच्या बहिणीला विचारू लागला.

"अरेपण कधी? आणि कसं?" त्याचा आवाज कातर झाला होता.

"गेल्या महिन्यात तिचा अपघात झाला. मरीन लाईन्सला. बघणारे सांगतात की चुक तिचीच होती म्हणुन. तिच कुठल्यातरी तंद्रीत होती." घरात भयाण शांतता पसरली होती. खिडकीतल्या विंड्मील ची किनकिन काय ती तिथल्या. तो एकदम ब्लेंक झाला होता.

"आणि ह्या सगळ्याला तु जबाबदार आहेस?" तिची बहिण त्याला म्हणाली.

तिचे शब्द त्याच्या कानात शिसवीच्या तेलासारखे पडत होते. त्याने गोंधळुन तिच्याकडे पाहिलं.

"हो.....ती फार प्रेम करायची तुझ्यावर. तु अचानक नाहीसा झाल्यापासून फार बिथरली होती ती. तूम्ही जिथे जिथे नेहमी भेटायचा तिथे सगळीकडे तुला शोधत फिरायची. त्या दिवशीदेखील ती मरीन लाइन्सला फिरत होती. तुझ्यासारखाच कुणीतरी तिला दिसला असणार. तुझं नाव पुकारत ती एका माणसाच्या मागे धावत निघाली आणि तो अपघात घडला होता." तिच्या बहिणीचा आवाज आता कातर झाला होता. तिच्या बहीणीच्या डोळ्यातुन अश्रु वहात होते.

त्याला हे सगळं ऐकून फार धक्का बसला होता. त्याला फार पश्चाताप होत होता. तिच्या बहीणीच्या बोलण्यात तत्थ्य होतं. तो चुकलाच होता. आपण तिला असं सोडुन जायला नको हवं होतं. निदान तिला एकदा भेटायला तरी हवचं होतं. खरतर आपण तिला भेटायलाच नको हवं होतं.

"तिचा नवरा कुठाय?" त्याने कसबसे शब्द जुळवुन तिला विचारलं.

"तिचा नवरा? तिचं तर लग्नच झालं नव्हतं" तिच्या बहिणीच्या ह्या उत्तराने तर तो मुळापासुन हादरला.

"पण हे कसं शक्य आहे?" त्याने आश्चर्याने तिला विचारलं. त्याच्यासाठी हे अगदीच अनपेक्षित होतं.
"ती सांगायची मला तिच्या नवर्याबद्दल, त्याच्या मेरिज लाईफ बद्दल, तिच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दल, हे सगळं कसं खोटं असू शकेल?" त्याला आता बोलणं जड जात होतं.
"नाही ती खोटं नाही बोलली तुझ्याशी. त्या सगळ्या तिच्या तुझ्याबद्दलच्या अपेक्षा होत्या. पण तू त्या कधी समजुनच घेतल्या नाहीस. कॉलेजला असतानाही तिला असाच अर्धवट सोडुन गेलास.
वेडी झाली होती ती तुझ्यासाठी. तिने कधीच तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार केला नाही. आम्ही तिला लग्नाबद्दल विचारायचो तर ती म्हणायची तिचं लग्न झालय.....तुझ्याशी आणि आता ती इतर कुणाचाही विचार नाही करू शकत तुझ्याशिवाय समजवण्याच्या पलिकडे गेली होती ती. तिला समजवाताना आईबाबा थकले. ते गेल्यावर ती इथे एकटीच रहायची. तिकडे मी ही एकदा तिला इंदौरला तिला माझ्या घरी बोलावून समजावलं होतं. पण नाही तुझ्याशिवाय तिला दूसरा कुठलाच पर्याय नको होता. ती तुझ्या नावानेच मंगळसुत्र बांधायची, तुझ्यासाठी एका विवाहितेने करावेत ते सगळे सोपस्कार करायची.

काळ नुसता पुढे सरत होता. ती मात्र तुझी वाट पहात तशीच थांबली.
तुझ्यासाठी...
तुझ्याशिवाय..."

तो सुन्न होउन सगळं ऐकत होता.

"पण एक दिवस, अचानक तू तिच्या आयुष्यात परत आलास. तिने सांगितलं मला. तुझं लग्न झालयं हे देखील सांगितलं. काळजावर दगड ठेवून तिने तुझं लग्न देखील स्विकारलं.
फ़क्त तुझ्यासाठी…..
तुझ्या सहवासासाठी…….
ती खुप खुष होती. आजवर ज्या गोष्टीसाठी तिने एव्हढा त्रास, एव्हढी अवहेलना सहन केली होती. ती तिच्या पदरात पडली होती. बऱ्याच दिवसाने आमची चिउ जगायला शिकली होती. ती मला फ़ोन करून सांगायची तुझ्याबद्दल कधीतरी. मला पटत नव्हतं तिचं हे वागणं, पण तिच्या त्या हसरया चेहर्यापुढे काही बोलता आलं नाही मला.तसहि तुझ्याबद्दल तिने कुणाकडुन काहीही ऐकून घेतलं नसतं. मी नंबर मागितलेला तुझा. पण तिने नाही दिला. तिला तुझ्या आयुष्यात तिच्यामुळे कुठलाही त्रास व्हायला द्यायचा नव्हता बहुतेक. पण तुला त्याची काहीच घेणदेणं नव्हतं. तू तेव्हाही तिला वापरलस आणि ह्या वेळेसही." तिच्या बहीणीला रहावलं नाही. ती उठून आत निघून गेली.

तो एकटक समोरच्या भितींवरच्या तिच्या फ़ोटोकडे पहात होता. नकळत त्याने तिच्या फ़ोटोला हात जोडले. तो मनातल्या मनात तिची माफी मागु लागला.

"मला खरच माफ़ कर ग. मला तुला दुखवायच नव्हतं. त्यादिवशी तुझ्या गळ्यातलं मंगळसुत्र पाहून मीही तुला माझं लग्न झालय अस खोट सांगितलं. तुला त्यानंतर कधीही भेटायच नाही असंदेखील खरच ठरवलं होतं पण मोह आवरला नाही ग. दरवेळेस तुला भेटल्यानंतर तुझ्याबद्दलची आस अजुन वाढत जायची. बर्याचदा तुला सगळं खर सांगावस वाटायचं पण भीती वाटायची की सगळं संपलं तर. म्हणुन शांतच राहिलो. जेव्हढे दिवस तुझा सहवास लाभेल जेव्हढ्या जमतील तेव्हढ्या तुझ्या आठवणी सोबत घेउन पुढच आयुष्य काढायचं ठरवलं होतं. पण मी तुझ्यात पुरता गुरफ़टलॊ होतो. तुही माझ्यात गुंतत होतीस हेही जाणवलं होतं. हे सगळं कधी संपू नए असचं वाटत होतं पण ह्या सगळ्यात तुझ्या नवर्याला मात्र मी विसरललो. त्याची हयात काहीच चुक नव्हती.

हळुहळु तिचा चेहरा धूसर होत होता.
*********************************************************
अचानक वाजणार्या विंड बेल ने तो भानावर आला. त्याच डोकं जडवलं होतं. तिच्या घरून आल्यापासून तो पीत होता.

ती ह्या जगात नाही हा धक्काच त्याला सहन होत नव्हता. त्याच डोकं बधीर झालं होतं. तिच्या आठवणींने तो रडकुंडीला आला होता. इतके दिवस ती आपल्याला भेटत होती. आपण तिच्याशी बोलत होतो. आपण जेव्हा जेव्हा तिच्याशी तिच्या नवर्याबद्दल बोलायचो तेव्हा तेव्हा ती विषय बदलायची हे आपल्याला कळलं का नाही? जेव्हा अगदीच नाईलाज व्हायचा तेव्हा तिच्या त्या वरचढ सांगण्याच्या तिच्या नवर्याच्या कौतुकात आपला भास् आपल्याला का जाणवला नाही?
साला तिच्या हसर्या डोळ्यातली दुखरी नजर आपल्याला का दिसली नाही?
आपल्याला हि गोष्ट कशी जाणवली नाही ह्याचाच फार राग राग होत होता. त्याने रागाने हातातला ग्लास जमीनीवर आपटला आणि डोकं धरुन बसला.

अचानक त्याची नजर समोरच्या टेबलावर पडली. टेबलावर एक पाकिट पडलं होतं. तिच्या घरून निघताना तिच्या बहीणीने त्याच्या हातात दिलं होतं. त्याने थरथरत्या हाताने फोडून पाहिलं.
त्यात एका कागदात एक वस्तु बांधली होती. त्याने ती कागदाची पुड़ी उघडली आणि तो कोलमडलाच.

त्याच तिचं मंगळसुत्र होतं.

जे ती आजवर त्याच्या नावाने बांधत आली होती.

त्याने ते मंगळसुत्र हातात घेतलं. त्या मंगळसुत्राकडे पहाताना त्याला ती आता ह्या जगात नाही ही जाणीव फार असहय्य होत होती आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार आहोत ह्यामुळे तो अजुनच खचला होता. त्याला तिच्या आठवणी अनावर होत होत्या. त्याचा बांध सुटला. तो तिच्या नावाने ओरडू लागला. तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला ती हवी होती.
आता
ह्याक्षणी
कायमची...
तो ते मंगळसुत्र डोक्याला लावून रडायला लागला.
अचानक त्याला त्याच्या ओपन टेरेसवर हालचाल जाणवली. तो धडपडत उठला. सळसळणार्या पडद्याआड त्याला कुणीतरी उभं असल्याचं जाणवलं. तारवटलेल्या डोळ्यांनी तो पडद्यामागच्या आकृतीकडे निरखून पाहू लागला.

"एक गोष्ट तुझी
एक गोष्ट माझी
आहे एक गोष्ट
तुझ्यामाझ्या गोष्टीची"

पुढच्याच क्षणाला त्याच्या चेहर्यावर आनंदाचे स्मित हास्य उमटले. त्याने डोळे पुसले.

"एक प्रीत तुझी
एक प्रीत माझी
जुळली एक प्रीत
तुझ्यामाझ्या मनीची

एक आभाळ तुझे
एक आभाळ माझे
भेटले एक आभाळ
तुझ्यामाझ्या प्रेमाचे"

तो त्या आकृतीच्या जवळ जाऊ लागला. त्याचे पाय अडखळत होते तो धडपडत होता, ठेचकाळत होता पण त्याला आता त्याची पर्वा नव्हती.

ती त्या पडद्यामागे उभी होती.

हो तीच उभी होती..

"एक रात्र तुझी
एक रात्र माझी
सजली एक रात्र
तुझ्यामाझ्या स्वप्नांची

एक चंद्र तुझा
एक चंद्र माझा
साक्षी एक चंद्र
तुझ्यामाझ्या मिलनाचा

एक साथ तुझी
एक साथ माझी
सुटली एक साथ
तुझ्यामाझ्या सोबतीची"

तो दुखर्या पायाने तिच्या जवळ जात होता. हाती आलेली संधी त्याला आता दवडायची नव्हती. आता काही करून त्याला तिला आपल्या पासून दूर जाऊ द्यायचे नव्हते. पण तो जसा जवळ जात होता तशी ती त्याच्यापासून दूर जात होती.

"एक कारण तुझे
एक कारण माझे
छोटेसे एक कारण
तुझ्यामाझ्या दुराव्याचे

एक सांज तुझी
एक सांज माझी
उगवली एक सांज
तुझ्यामाझ्या निरोपाची"

ती हळुहळु मागे जाताना ती टेरेसच्या रेलींगला अडली. ह्यापेक्षा ती त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हती. समुद्रावरून येणार्या वार्याने तिचे केस उडत होते. ती आपल्या हातांनी त्या उधळणार्या बटा सावरत होती. चेहर्यावरिल मिश्किल हास्य आणि त्या अनुषंगाने तिच्या गालावर पडणारी खळी त्याला खुणावत होती. तो तिच्या नजरेला नजर देत तिच्या अगदी जवळ आला.

"एक पाऊस तुझा
एक पाऊस माझा
उरला एक पाउस ......
तुझ्यामाझ्या आठवणींचा

एक गोष्ट तुझी
एक गोष्ट माझी
अधूरी एक कहानी
तुझ्यामाझ्या गोष्टीची"

तिने त्याच्या डोळ्यात पहात आपल्या कवितेच्या शेवटच्या ओळी म्हटल्या. तिने हळुवार डोळे मिटून घेतले. तिचा तो निरागस लाघवी चेहरा पहाताना त्याला आवरलं नाही. त्याचा स्वत:वरचा ताबा सुटला. त्याने आवेगाने तिला मिठीत घेतले. त्याच्या अश्या धसमुसळेपणाने ती दोघेही धडपडली. पण त्याने तिला आपल्या गच्च मिठीत सांभाळुन घेतलं. तिचा विरोध मावळला होता. ती त्याला अगदी पिसासारखी वाटत होती. तिला मिठीत घेउन त्याला अगदी हलकं हलकं वाटत होतं. तो तिच्यासोबत आता वेगळ्या दुनियेत जात होता.

"एका प्रेमाची गोष्ट" आता कायमची संपली होती.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए काय हे एवढा छोटा भाग??

पण सुरुवात इन्टरेस्टींग आहे.. लवकर टाक पुढचे भाग! Happy

चिंचे, व्यक्ती पाठमोरी बसलेली वगैरे असेल तर नाही कळत कधीकधी... स्त्री आहे की पुरुष ते. Happy

आवडली कथा! Happy
खरं सांगायचं तर छान आहे असं पण म्हणू शकत नाही.. पण खरंच मस्त लिहिलियंस.
मनाची घालमेल, तगमग, ओढ, प्रेम सगळं सगळं अगदी मस्त उतरवलंयस शब्दांतून. वाचायला सुरुवात केली नि गुंतुन जायला झालं प्रत्येक प्रसंगात. कम्माल लिहिलंयस. Happy

अमोल भौ...., कथेच्या सुरवातीलाच वाटल होत कि, तुमची कथा म्हणजे शेवट हा 'इमोशनलच' असणार....!! मस्त वाटली कथा....!!! खुप दिवसानी पोष्ट केली तुमची कथा मायबोलीवर.....!!! पण काही दिवसापासुन तुमच्या कडुन तुमच्या 'शैलीतल्या कथा' ( होरर, सस्पेन्स, थ्रिलर) वाचायला मिळाल्या नाही. तुमच्या कडुन असल्या कथाची अपेक्षा....!!

सॉरी पण शेवट मला तरी प्रेडीक्टेबल होता, तरीही कथा खुप सुंदर गुंफलीये, एका दमात वाचली

सॉरी पण शेवट मला तरी प्रेडीक्टेबल होता, तरीही कथा खुप सुंदर गुंफलीये, एका दमात वाचली

मला ह्यातल्या उपमा खूप आवडल्या.

"सूर्य मावळुन बराच वेळ झाला असला तरी संध्याकाळ मात्र उगीचच अजुनही क्षितिजावर रेंगाळत होती.
काहीतरी मागे सुटल्यासारखी......
कुणाची वाट पहात होती कुणास ठावुक.
पण तिचा पाय तिथून निघत नव्हता हे मात्र खरं.
क्षितिजावरची ती एकाकी कातरवेळ पाहून त्याला गलबलुन आलं.
खरच कुणाचा इतका लळा का लागावा की कितीही ठरवले तरी मनातुन त्याची आठवण पुसली जाऊ नये?"

पुर्ण कथेत छान आहे.

सुंदर आहे कथा. खूप आवडली.

फक्त विंड मिल्स च्या जागी विंड चाईम्स हवय का?

कथा छान आहे पण शेवट ओढून ताणून केल्यासारखा वाटला. तिला जर तो तिच्या आयुष्यात हवा होता तर भेटायला येताना गळ्यात मंगळसुत्र का घालून आली? ते पाहून कोणालाही वाटेल की हिचं लग्न झालय.

Pages