स्फुट ३७ - एक बिनडोक ठिणगी

Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2016 - 01:21

शुष्कतेचे तुरळक सह्य बोगदे
मिंध्या मममतेचे रेशमी उमाळे
निराधार प्रतिक्षेवर उभारलेला डोलारा
भातुकल्यांची भातुकली

विलासीनतेने भरलेलं आपलं पोट
करून टाकावं दान
एखाद्या दगडी नजरेच्या कळकट्ट मजुराला
एखाद्या विझलेल्या, थिजलेल्या म्हातार्‍याला
एखाद्या दूध न येणार्‍या लेकुरवाळीला
एखाद्या मलूल पडलेल्या नागड्या बाळाला
एखाद्या केविलवाण्या गावठी कुत्र्याला

मग आपल्या कंबरेवर
आपलीच छाती रोवून
अमर्याद भुकेच्या जाणिवेपासून सुटका करून घेत स्वतःची,
खुजे होऊन फिरावे
इतर इच्छांचा शोध घेत

तेव्हा कदाचित नव्याने आणि फक्त दिसतील
सुडौल बांधे, उन्मादक हेलकावे
ओसंडणार्‍या काया, दरवळणारी शरीरे
आणि मग पुन्हा जाणवेल
की अजून एक भूक अशीच अमर्याद आहे

तीही नष्ट करावी!
आपल्याच मांड्यांवर
आपलीच छाती रोवून
अधिक खुजे होऊन
फिरावे गर्दीतून

मग समजेल
श्वास घेता येत नाही
गुदमर होत आहे
पण प्राणवायूची भूक
नष्टही करता येत नाही
हा कदाचित शेवटचा शोध?
नाही!!

येथे समजतील पक्ष्यांची गाणी
कुत्र्यांच्या नजरांमधील लाचार मागण्या
मांजरांचे कावे
उंदरांची पलायने
पडत्या पानांचे रूदन

येथे जवळून मिळेल
मातीचा गंध,
आपल्या मुळांचा पत्ता समजेल येथे,
मग झाड व्हावंसं वाटू शकेल

म्हणजे पुन्हा इच्छाच!

इथल्या चराचरात
कणाकणात
अणूरेणूत
इच्छा ठासून भरलेल्या आहेत
आणि ह्यापलीकडचे काहीच
ऐंद्रिय क्षमतेतून आकलन होणारे नाही

कैदेवर कैदेची आवरणे
वेष्टनावर वेष्टने
आत कुठेतरी एक ठिणगी
मुक्त होऊन स्फोट घडवू पाहणारी

अश्या असंख्य ठिणग्या
असंख्य इच्छांच्या आवरणांखाली दडलेल्या

लहानातल्या लहान इच्छा
पूर्ण करण्यास झगडते
आतली एक ठिणगी
एक बिनडोक, स्वत्व विसरलेली ठिणगी!!

=======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users