कोशिंबीर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 December, 2016 - 04:29

सोनू अग भाज्या नको तर निदान कोशिंबीर तरी खा गं. काय ही तुझी खाण्याची नाटकं? रोज रोज किती सांगायचं तुला की कच्च्या भाज्या पण खाव्यात म्हणून.
आई प्लीज नको गं. मला नाही आवडत त्या भाज्या आणि कोशिंबीर. ती मुळमुळीत काकडी, ते कचकचणारं गाजर, तो काही कारण नसताना रडवणारा कांदा, तिखट मुळा, ते उग्र वासाच बीट आई ग्ग....
अग पण सगळं एकत्र केल्यावर आणि त्यात दही कूट घातल्यावर बघ कशी छान चव येते. अग एकदा खाऊन तर पाहशील?
नको गं आई प्लीज.
सोनू आईला टाळून धावतच खेळायला बाहेर पळते. सोनूची ही रोजचीच नाटके पाहून आई विचार करू लागते काय करावे म्हणजे ही कोशिंबीर, कच्च्या फळभाज्या खाईल? सोनू सारखी अजून बरीच मुले अशी कच्च्या भाज्या किंवा कोशिंबीर खात नाहीत अशी कुजबुज सोनूच्या आईच्या शेजारच्या मैत्रिणिंकडून कानावर येत असे. मग तिला एक युक्ती सुचते. काही दिवसांवरच गणेशोत्सव जवळ आलेला असतो. गणोशोत्सवात त्यांच्या सोसायटीमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम होत असतात. ह्याच कार्यक्रमात आपण एक नाटक बसवूया असे आईने ठरविले. तिने ही कल्पना सोनूला दिली. पण सोनूला नाटका पेक्षा नृत्यात जास्त रस असल्याने तिने ह्या वर्षी शेजारच्या काकू एक ग्रुप डान्स बसवणार आहेत त्यात व एक सोलो डान्स असे दोन डान्स घेतेय ना गं अशी आईला विनवणी केली. ती म्हणाली "पण आई तू बाकी सगळ्या छोट्यांना घेऊन नाटक बसव ना गं मला नाटक पाहायला आवडत". आईच्या हे पथ्यावरच पडले. कारण तालमी पेक्षा तिला पूर्ण तयार झालेले नाटक पाहिल्यावर तिच्यावर योग्य परिणाम होईल अशी तिची खात्री होती. आईने दुसर्‍या दिवशी सोसायटीतल्या काही लहान मुलांना बोलावले.

लगेच श्रावणी, राधा, अभिषेक, वेदांत, सुरभी, समिधा, विदीता सगळे जमले. आईने त्यांना विचारले आपण एक नाटक बसवूया ह्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात. तुम्हाला आवडेल ना? सगळ्यांनी लगेच जोरात होकार दिला. हो$$$$. सगळे कोणतं नाटक, कोणतं नाटक एकच गलका करू लागले. सोनूच्या आईने त्यांना सांगितले तुम्ही सगळे फळभाज्या बनायचं आणि आपण त्यांचे डायलॉग बोलायचं. आवडेल का तुम्हाला? पुन्हा एकदा सगळ्यांचा मोठा हो$$$$$ झाला.

आईने नाटकाचे संवाद लिहून काढले व दुसर्‍या दिवसापासूनच सराव चालू झाला. आईने प्रत्येकाला एक एक भाजीचा संवाद दिला. १५ दिवस सराव करून नाटक अगदी छान बसले व गणेशोत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमात कोशिंबीर नावाचे नाटक सगळ्या मुलांनी सोसायटीच्या स्टेज वर सादर केले.

सगळी पात्र त्यांची वेषभूषा करून आले होते. आता एका मागोमाग एक अशी एक एक कोशिंबिरीतली भाजी संवाद बोलत आली.
काकडी - काकडी मी काकडी मान माझी वाकडी तरी समजू नका मला गुणात तोकडी. रसाने मी भरलेली, मला खाऊन तुमच्या स्किनला येईल तकाकी

गाजर - लांबलचक मी गाजर, गुलाबी माझा कलर.खाऊन तर पहा कशी तेजस्वी होते नजर.

टोमॅटो - टोमॅटो मी लालबुंद, तेजस्वी ठेवेन तुम्हा अखंड मग खेळा तुम्ही मनसोक्त बेधुंद.

मुळा - मुळा मी मुळा जणू हत्तीचा सुळा. वायू पळतो माझ्याने खुळा, पोटाच्या तक्रारीला घालतो आळा.

बीट - बीट मी बीट रक्त ठेवतो मी नीट, मला नक्कीच खात जा तुम्हाला ठेवेन मी फिट

कांदा - जरी असलो तिखट मी कांदा तरी खायचा करू नका वांदा, मला खाऊन तुम्ही स्वास्थभरे

नंतर सगळे एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र येतात आणि एक एक जण बोलू लागतो. पहा आमच्या प्रत्येकात तुमचे शरीर चांगले ठेवण्याचा वेगवेगळ्या स्वरूपात गुणधर्म आहे. आणि जेव्हा आमची गट्टी जमते आम्ही एकत्र येतो म्हणजेच आमची कोशिंबीर होते ती किती हेल्दी होत असेल बरे. तेव्हा मित्रांनो कच्च्या भाज्यांचे सलाड बनवा किंवा कोशिंबीर बनवा आणि तंदुरुस्त राहा.

सगळ्यांच्या वेषभूषा आणि अ‍ॅक्टींग इतकी रसाळ आणि चविष्ट झाली होती की कधी जाऊन घरी कोशिंबीर खातोय असे सगळ्यांना झाले होते. त्यातच सोनूही होती. घरी गेल्यावर पहिला तिने जाऊन आईला विचारले. आई आज जेवणात कोशिंबीर आहे ना? आजपासून मी कोशिंबीर खाणार. ही कच्च्या भाज्या खाण इतकं महत्त्वाचं असत हे तू नाटकातून मला पटवून दिलंस आई. माझ्या सगळ्या मैत्रिणीही आजपासून घरी सलाड, कोशिंबीर खाणार आहेत म्हणत होत्या. हे ऐकून आईला प्रसन्न वाटले.

ऑगस्ट २०१६च्या महाराष्ट्र टाईम्स च्या पुरवणीत प्रकाशीत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

खुप छान कथा जागू ...मुलीला गोष्ट खुप आवडली... त्याहिपेक्षा नाटकं बसवणारी आई खूप आवडली तिला ,
तुम्हाला भेटण्याची / बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे तिने...

समृद्धी मला तुमचा रिप्लाय वाचून खरच खुप आनंद झाला. नक्की भेटूया.

अनिल, सई, नरेश, विनिता धन्यवाद.

मला वाटले, पाककृती चुकून बालसाहित्यात पडली की काय Lol

कल्पना छान आहे पण फारच जड संवाद आहेत मुलांसाठी. हो पण वाचुन कोशिंबीर खाविशी वाटते आहे हे मात्र नक्कीच Happy