तेलबैला

Submitted by योगेश आहिरराव on 7 December, 2016 - 01:04

"तेलबैला Bloggers Meet"

सकाळी साडेपाचच्या सुमारास स्टेशनवर सर्व लवाजमा पाठीवर घेऊन दाखल झालो. तिकिटाच्या रांगेतली गर्दीचा अंदाज होताच, मायबोलीकर तसेच गिरीविराजचा खंदा शिलेदार मित्रवर्य ‘सतीश कुडतरकर’ यालाच डोंबिवलीहून माझेही तिकिट काढायला सांगितले. पाच पन्नास च्या आसपास खोपोली गाडीची घोषणा झाली, गाडी फलाटावर येणार तेवढ्यात मोबाईल वाजला. वेळेवर तिकिट काढून सुध्दा बायो ब्रेक मुळे साहेबांची गाडी थोडक्यात हुकली. मग काय आता मागून येणार्या कर्जत लोकल पर्याय नव्हता. सकाळची पहिली खोपोली पकडून, खोपोलीहून साडेसातची पाली एस टी मिळण्याची शक्यता धुळीस मिळाली. आता जे होईल ते होईल असा विचार करत कर्जत लोकल मध्ये चढलो.
निमित्त होते ‘तेलबैला’ येथे होणार्या पहिल्या वाहिल्या ‘Bloggers Meet’ चे. सह्याद्रीत भटकंती करणारे येथील ऐतिहासिक संस्कृती आणि भौगोलिक तसेच जैवविविधता, किल्ले, लेणी, घाटवाटा, मंदिरे यावर आपल्या शैलीत लिखाण करणारी काही समविचारी माणसांची भेट. विचारांची देवाण घेवाण, अनुभव, मार्गदर्शन, सह्याद्रीच्या प्रती काहीतरी चांगले प्रबोधनात्मक कार्यासाठी हा एक प्रयत्न. पुणेकर मंडळी आपआपल्या गाडीने थेट तेलबैला गावातच दुपार पर्यंत पोहचणार होते. आम्ही मात्र शिळफाटा-तळोजा-कळंबोली-पनवेल असा घाणेरडा प्रदुषणयुक्त काळाकुट्ट मार्ग टाळून गाडीने जाण्यापेक्षा घाटवाटेने ट्रेक करत जाणेच पसंत केले. ऐकेकाळी लोणावळाची वारी वारी करणारा मी, काय माहित पण आता मात्र या मार्गावर बाईक आणि कार चालवायची मुळीच ईच्छा होत नाही.
कर्जतला उतरलो तेव्हा हवेत चांगलाच गारवा होता. एस टी स्थानकात गेल्यावर कळाले की कर्जत पाली एस टी वीस मिनिटांपूर्वीच निघून गेली. अररर… आलिया भोगासी असावे सादर! मग कर्जत पनवेल एस टी ने वाटेतले सकाळच्या उन्हात चमकत असलेले ‘माथेरान’, ‘प्रबळ’, ‘इरशाळ’ दुरवर ‘कर्नाळा’ पहात चौक फाट्यावर उतरलो. काही दुसरे वाहन मिळते का ते पहात असतानाच, टमटम वाल्याने खोपोली खोपोली आवाज दिला. टमटम मध्ये चार ट्रेकर ? तीन मुले एक मुलगी होते. बोलणे झाल्यावर कळाले ते सुधागडला निघाले होते. तीन मुलांचा वेगळा ग्रुप आणि मुलगी एकटी तिला कुणीतरी पालीला भेटणार मग ते पुढे जाणार. अर्थातच अभ्यास न करता पुरेशी माहिती नसताना हे हवशे नवशे गवशे फिरायला बाहेर पडले होते. शक्य झाली तितकी माहिती आणि कच्चा नकाशा रेखाटून दिला. टमटमचा स्पीड काही तीसच्या पुढे जात नव्हता. आधीच उशीर होतोय, पुढे गाडी नाही मिळाली तर खोपोली -परळी टमटम, पुन्हा परळी-पाली टमटम, पुढे पाली-बहिरमपाडा टमटम. असा दे धक्का ! होतोय कि काय असे वाटू लागले. एकदाचे खोपोलीला उतरलो लागलीच मागून ‘ठाणे नाडसूर- ठाणाळे’ एस टी आली.
शनिवार असल्यामुळे असेल कदाचित पण खुप गर्दी. उभे रहातच पाली पर्यंत प्रवास घडला. हिच एस टी आम्ही २००८ ला ऑगस्ट महिन्यात ठाणाळे लेणींना जाण्यासाठी पकडली होती. जांभुळपाडा सोडल्यानंतर सह्याद्रीची रांग स्पष्ट दिसू लागली, माथ्यावरचा तेलबैला त्याच्या विशिष्ट आकाराने चटकन नजरेत भरतो.
आमच्या नियोजनानुसार बहिरमपाड्यातून सवाष्णीघाटाने चढाई करून तेलबैला दुसर्या दिवशी वाघजाई घाटाने ठाणाळेत उतराई. मनात विचार आला गाडी थेट ठाणाळे पर्यंत आहे वाघजाईने वर जाऊन उद्या सवाष्णीने उतरू, उशिर होतोय वेळ ही वाचेल कदाचित. पण नाही ठरवल्या प्रमाणेच करूया.
साडेदहाच्या सुमारास धोंडसे फाट्यावर उतरलो. समोरच डावीकडे सवाष्णी घाट आणि उजवीकडे रम्य सुधागड आणि पाठीमागे दूरवर घाटमाथ्यावरचा घनगड व मारठाणा सहज ओळखता आले. अर्ध्या पाऊण तासात पायीच बहिरमपाड्यात पोहचलो.
पाण्याची आणि वाटेची चौकशी करतो तेवढ्यातच आग्रहाऩे देवाचा प्रसाद म्हणून जेवणाला बसवले. भैरवनाथाच्या मंदिरात आदल्या दिवशी एकादशीचे भजन किर्तन होते त्याचा हा महाप्रसाद. गरम गरम वरण भात, चवळी बटाट्याची भाजी, जिलेबी, शिरा आग्रहामुळे पोटभर जेवण झाले. पण एका अर्थी खऱच देवाचे बोलावणे असावे कारण सकाळपासूनच्या गडबडीत आम्हाला चहा नाश्ता साठी वेळच मिळाला नव्हता.
गावकरींकडून वाट आणि दिशा समजून घेत निघालो. "भैरवनाथ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही व्यवस्थित सुखरूप जाल" अश्या प्रकारे निरोप दिला. गावातून बाहेर पडून समोरचे टेपाड चढून वर आलो. दिशेप्रमाणे उजवीकडे चढाई होती. टेपाडवरच्या दोन तीन वाटांमधली दिशेला अनुसरून एक वाट घेतली पण ती जास्तच उजवीकडे सरकत बहुतेक खाली सुधागडाच्या मुख्य ओढ्या जवळ जाते की काय अशी शंका आली. पुन्हा मागे वळून दुसर्या एका वाटेचा मागोवा घेतला, हि वाट उजवीकडे थोडी वर चढून वळसा मारून पुढे जंगलातून बाहेर येत सरळ सोट आडवी चाल. बरेच अंतर गेलो तरी वाट काही चढणीला लागे ना, कारण गावकरींच्या सांगण्यानुसार पहिल्या पंधरा मिनिटातच चढ लागायला हवा होता. थोडे अंतर गेल्यावर उजवीकडे सुधागड जवळच, तसे आधी सुधागडला दोन तीन वेळा जाणे झाले असल्याने हा मुलुख तसा परिचयाचा. झक्क मळलेली पायवाट तरी सुद्धा मनात शंका आली, तितक्यातच ओढ्याजवळ समोरून दोघे तिघे जंगलातून लाकडे घेऊन येताना दिसले, विचारल्यावर उलगडा झाला हि वाट तर सुधागडावर जाते. पुन्हा माघारी येऊन त्यांनी एक वाट दाखवली चार पाच ढोरवाटांपैकी ती वाट ओळखणे थोडे मुश्कीलच होते. 'सरळ उजवीकडे चालत रहा, कुठेही डाव्या बाजूला वळू नका थेट वरच्या अंगाला जाल'. असे त्यांनी सांगितले. एक मात्र खऱ त्या टेपाडावर बर्याच ढोरवाटा चकवा देऊ शकतात. या प्रकारात वीस पंचवीस मिनिटे वाया गेली पण चांगला अनुभव मिळाला. पंधरा मिनिटात गावातून दिसनार्या सोडेंच्या टोकावर आलो. आता खाली बहिरमपाडा, धोंडसे आणि दुरवर सरसगड. उन्हाचा तसा फार त्रास नव्हता पण या वाटेच्या पहिल्या टप्प्यात तरी तशी झाडी कमीच या साठी सकाळी लवकर चढाईला सुरवात करणे हेच सोयीस्कर. त्या उजाड माळरानावरून उजवीकडे वळसा घेत पलीकडच्या पठारावर आलो. वाटेतला ओढा कोरडाठाक, थोडे अंतर गेल्यावर जुणे बांधकाम दिसले. इथून पुढे वाट जंगलात शिरून चढाईला जी सुरूवात झाली ते थेट धापा टाकत पाऊण तासातच शेवटच्या कातळटप्प्या खाली. थोडक्यात वाट चुकून सुध्दा आम्ही गावातून निघाल्या पासून दोन तासातच या शेवटच्या कातळटप्प्यापर्यंत आलो. आता काय हा टप्पा पार केला की आलाच माथा, मग तिथे थोडा वेळ विसावलो.
वरती काहीतरी हालचाल झाली पाहिले तर एक गावकरी भलेमोठे बाचके घेऊन तो कडा अलगद उतरत होता, तसे हे प्रसंग ट्रेक मध्ये बहुतेक वेळा येतातच त्यावेळी आपल्या शहरी अहंकाराला सणसणीत चपराक बसते. कातळटप्पा पार करून छोट्या ट्रेव्हर्स वर आलो इथून सुधागडचे मस्त दर्शन घडले. शेवटचा सोप्पा चढ पार करून माथ्यावर दाखल झालो.
सामोरा आला तो आमचा तेलबैला. आत्ता पर्यन्त तेलबैलाला पाच-सहा वेळा तरी येऊन गेलोय, पण दोन दगडी ब्रेडचे स्लाईस अशी प्रतिमा पहिल्या भेटीत माझ्या मनात कोरली गेली. डाईकअश्मची भिंत सह्याद्रीत तसे हे तेलबैला, मोरोशीचा भैरवगड, सातमाळ्याचा धोडप ही सर्व डाईकचीच उदाहरणे. प्रत्येकाचे रूप वेगळे तितकेच मोहक तेवढेच सुंदर. पठारावरून मळलेली पायवाट पकडली वाटेत एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जरा जास्तच आराम केला. पिवळ्याधमक पठारावरची वाट तुडवत दोन अडीचच्या सुमारास तेलबैला गावात ठरलेल्या ठिकाणी श्री. रोकडे यांच्या घरी पोहचलो. पुणेकर मित्रमंडळी तासभर आधीच दाखल झाले होते.
‘ओंकार ओक’, ‘विराग रोकडे’ आणि ‘तुषार कोठावदे’ सोडले तर बाकी मंडळींना मी आणि सतीश प्रथमच भेटत होतो. ‘विवेक काळे’ सर, ‘पंकज झरेकर’, ‘प्रशांत कोठावदे’, ‘अजय काकडे’, ‘विनीत दाते’, ‘चिन्मय किर्तने’, ‘देवा घाणेकर’ आणि ‘श्रध्दा मेहता’. घाटवाट चढून येण्याच्या निर्णायाचे या आमच्या पुणेकर मित्रांना भारी अप्रुप, मग आमची सकाळपासूनची स्टोरी ऐकवत गळाभेटी झाल्या.
मस्तपैकी दुपारचे गरमागरम जेवण करून मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. काही वेळातच मोकळ्या पठारावर तंबु उभे केले. रात्रीच्या निवारासाठी बढिया सोय झाली. पंकज आणि श्रध्दा ने या ‘ब्लॉगर मिट’ हेतू प्रत्येकासाठी खास स्मृतिचिन्ह तयार करून आणले, त्याबद्दल त्यांचे आभार.
आमचे मुख्य आदरणीय ज्येष्ठ सह्यमित्र ‘संजय अमृतकर’ यांचे आगमन होणे बाकी होते. कसारा कल्याण मार्गावर काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा पुढचा प्रवास विस्कळीत झाला होता. तरी ही अधून मधून फोनाफोनी सूरूच होती. कसेही करून लोणावळ्यात पोहचा, तुम्हाला घ्यायला येऊ वगैरे विनंतीवजा संदेश दिले गेले. सायंकाळच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण पठार उजळून निघाले. बहुतेकांनी ट्रायपॉड लावून आपआपले क्यामेरे सज्ज केले. सर्वत्र नुसता किल्ककिल्काट..
काही वेळातच श्रध्दाने पुढाकार घेऊन चहा तयार केला. चहा बिस्कीट झाल्यावर अगदी सुर्यास्तापर्यंत आकाशाच्या विविध रगाच्या छटा पाहत मनसोक्त फोटोग्राफी केली गेली. मध्येच संजय अमृतकर (नानांचा) फोन आला, रेल्वे मार्गावर झालेल्या ब्रेकडाउन मुळे ते काही येऊ शकले नाही. या वेळी नाही तर पुढच्या वेळी नक्कीच असो..
सुर्यास्तानंतर प्रत्येकाने आपली ओळख, काम धंदा वगैरे सोपस्कार पार पाडून, सद्यस्थितीतल्या काही महत्वाच्या बाबींवर चर्चा केली गेली. अर्थात विषय फक्त आणि फक्त सह्याद्री. चर्चेनंतर रात्रीचे जेवणाला सुरूवात चांदण्यारात्री मोकळ्या हवेत जेवणाची तर वेगळीच मजा. भरपेट जेवणानंतर पुन्हा गप्पा, काळे सर आणि पंकज ची नाईट मोड आकाशगंगेची,अगणित तारकांची जबरदस्त फोटोग्राफी.
आकाश निरीक्षण खगोलशास्त्र त्याबद्दलची चिन्मय आणि विरागने दिलेली माहिती. प्रत्येकाचे अनुभव, डोंगरातले किस्से, प्रथमोपचार, प्रस्तरारोहण, अपघात वगैरे या सर्व गोष्टींवर चर्चा प्रत्येकजण काय आणि किती बोलू या आवेशात असे तर रात्र तरी काय पुरणार ? हळूहळू एकएक जण तंबूत शिरून निद्राधीन झाले.
दुसर्या दिवसाची उत्साहवर्धक सकाळ, हवा एकदम स्वच्छ. अवघ्या काही तासांची झोप काढून ही बहुतेक सर्वच सुर्योदयाआधी हजर. एक मात्र खऱय डोंगरात जंगलात मोकळ्या स्वच्छ हवेतली रात्रीची काही तासांची झोप ही आदल्या दिवसाचा सारा शिणवटा घालवून टाकते. ट्रेकच्या सकाळी जो काही शरीराचा आणि मनाचा तजेला असतो त्याला तोड नाही. हे दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. पुन्हा सकाळच्या वातावरणात थोडी फोटोग्राफी मग अजय आणि श्रध्दाने मस्तपैकी चहा बनवला. पुन्हा गप्पा आणि चर्चा रंगल्या. विवेक सरांची फोटोची डीवीडी भेटवस्तु म्हणून सर्वांना देण्यात आली. सुर्यराव वर येऊ लागले तसा तंबू ईतर आवराआवरी करून, मुक्कामाची जागा स्वच्छ साफ करून रोकडेंकडे नाश्तासाठी गेलो. नाश्ता करून निरोप घेण्याची वेळ आली.
पुढच्या वेळी लवकरच पुन्हा एकत्र भेटण्याचा वादा करून, आम्ही परतीच्या मार्गावर वाघजाई घाटाकडे निघालो. गावातून मावळतीकडे बैलगाडीचा कच्चा रस्ता गेला आहे तोच पकडला पुढे वाट मोठ्या आंब्याच्या झाडाजवळून खाली उतरते हे माहित होतेच. सरळ तो कच्चा रस्ता थेट कड्यापाशी येऊन संपला. तिथेच हे चौकीवजा बांधकाम.
कड्याच्या जवळपास कुठेही वाट उतरत नव्हती. पुन्हा थोडे त्याच रस्त्याने मागे आलो वाटेतला कोरडा ओढा ओलांडल्यावर डावीकडे छोटी पायवाट गेली होती तीच वाट बरोबर कड्याजवळच्या आंब्याच्या झाडाजवळ घेऊन गेली तिथेच 'ठाणाळे लेणी' अशी पाटी लावली आहे. थोडक्यात तेलबैला गावातून या वाटेने निघाल्यावर दहा मिनिटातच दुसरा ओढा पार करण्याआधी उजवीकडे वळायचे मग मुख्य पायवाट लागते.
ओढा डावीकडे ठेवून वाट उतरू लागली. वाट बर्यापैकी प्रशस्त, कातळात पायरांची मालिका. पुर्वापार चालत आलेले हे दोन्ही घाट मार्ग कोकणात चौल वगैरे बंदरात उतरलेला माल याच घाटवाटेने देशावर नेण्यात येई. अनघाई घाट, कोराई घाट त्यांचे पहारेकरी अनघाई आणि कोराईगड. वाघजाई, सवाष्णी, भोरप्याची नाळ यांचे पहारेकरी सुधागड अन तेलबैला. पुढे ही यादी नाणदांड घाट ते घनगड पर्यंत वाढतच जाईल असो.
दहा मिनिटातच डावीकडचा छोटा पाणवठा पाहून वाघजाईच्या मंदिरात पोहचलो. मंदिरात शेंदुर लावलेल्या पुरातन मुर्ती. पुढे वळणावळणाची लयबध्द उतरण चालू झाली. खाली डावीकडे ठाणाळे गाव आणि उत्तरेकडे कोंडगाव धरण. काही अंतर उतरताच या दोन मुर्ती नजरेस पडल्या. थोडं पुढे जात एका ठिकाणी थांबून सोबत आणलेले संत्री, केक आणि बॉईल अंडी खाल्ली.
जिथे थांबलो त्या पलीकडेच छोटे पठार तिथून नजारा बाकी भारीच तसेच खालच्या बाजूला या भागातले सर्वात दाट जंगल तिथेच हुप्प्यांची मस्ती बाकी जोरात होती. इथून वळसा घेत वाट सरळसोट बर्यापैकी रूंद सोडेंवरून उतरू लागली इथे झाडी मात्र तशी विरळच. दहा पंधरा मिनिटातच ती सोंड उतरून मोकळ्या मैदानात आलो, दोन वाटा फुटलेल्या स्पष्ट दिसत होत्या अर्थातच दिशेप्रमाणे पदरातून डावीकडची वाट सरळ जात पुढे वळसा घालून ठाणाळे लेणींकडे जाते. तिथे थांबून निरीक्षण केले तर त्याच दिशेला एका झाडावर बाण दाखवला होता. मागे पावसाळ्यात जेव्हा ठाणाळे लेणीत तीन दिवस मुक्काम केला होता, तेव्हा घाटमाथा गाठाय़चा प्रयत्न केला होता पण भर पावसात धुके असल्यामुळे ते जमले नव्हते. आम्ही सरळ जाणारी वाट पकडली एक टप्पा उतरून पुन्हा मोकळवनात आलो. सरळ जात राहिलो मग लक्षात आले, गाव तर खाली डाव्या हाथाला आहे आणि वाट तर सरळच आणि अरूंद होत पुढेच जात आहे वळण घेऊन खाली उतरतच नाहिये. असेच पुढे गेलो तर ठाणाळे खाली मागे पडून कदाचित कोंडगावच्या दिशेला तर नाही ना जाणार ? शांतपणे आम्ही दोघांनी मागे पुन्हा वर चढून न जाता त्याच पदरातून मागे वळण्याचा निर्णय घेतला आणि तो अचुक ठरला. पुढे बारीक पाऊलवाटेने जात काही अंतरातच छोटा अगदीच नावाला पाणी असलेला ओढा पार करून बरोब्बर वरून येणार्या वाटेला काटकोनात भेटलो.
काय गल्लत झाली ते चटकन लक्षात आले.
मागे मी म्हणालो तसे जी वाट डावीकडे लेण्यांच्या दिशेला जात होती अगदी तीच वाट थोडे अंतर जात ओढ्याच्या अलीकडून उजवीकडे फूटून उतरणीला लागत होती आणि जी सरळ गेली ती थेट लेणीकडे. असो तर या अनुभव चांगला शिकवून गेला. म्हणूनच तर आपण सह्याद्रीला गुरू मानतो ना ! पुढे थोड्या अंतरावर खालच्या बाजूला कातळात पाण्यानी भरलेली दोन टाकी.
पाण्याला जनावरांच्या विष्ठेचा वास होता तसेच बेडकांचा मुक्त संचार होता. तरीही आपातकालीन समयी पाणी उपयोगात येणारच पण फेब्रुवारी नंतर हेच पाणी राहील की नाही याची काय शाश्वती ? हाथ पाय धुवून पुढे निघालो खालच्या कातळातल्या दोन चार कोरीव पायर्या उतरून झाडी भरल्या वाटेतून शेवटच्या टप्प्यातली उतराई सुरू झाली ठाणाळे गाव नजरेसमोरच हाकेच्या अंतरावर होते, गावात कुठला तरी कार्यक्रम असावा कारण लॉऊड स्पीकरवर मोठ्याने गाणी ऐकू येत होती.
वार्याच्या झोतानुसार गाण्याचा दुरून येणारा आवाज कमी जास्त ऐकू येत होता. पंधरा मिनिटात शेवटचा टप्पा पार करून ठाणाळे गावाच्या अलीकडच्या ओढ्यात उतरलो. ओढा पार करून वर ठाणाळे गावात आलो. गावात आदिवासी पाड्यावर लग्नाचा कार्यक्रम होता तिथलीच गाणी ऐकू येत होती. बाया माणसं गडबडीत तर छोटी पोरं इकड तिकडं फिरत होती. सायकलवरचा आईसक्रीमवाला तसेच दोघे तिघं फेरीवाले पोटापाण्यासाठी तिथेच उभे होते. गर्दीतून वाट काढत ऐके ठिकाणी हापशी वर हाथ पाय स्वच्छ धुवून घेतले. घड्याळात पाहिले तर अडीच वाजत होते, गाडीची वेळ विचारली तर कळाले तीनच्या सुमारास नाडसूरहून पालीली एस टी आहे. मग काय पायीच निघालो, मस्त जंगलवाट तुडवल्यावर भर दुपारी तेही कोकणपट्टयात डांबरी सडकेने चालण्यासारखी दुसरी शिक्षा नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात एका पिकअप ने लिफ्ट दिली. शाळेजवळ थांबलो तर कळाले की बसचा काही भरवसा नाही साडेतीन ला येते कधी चार ला तर कधी येत नाही. पण साडेचार ची ठाणाळे नाडसूर ठाणे मात्र वेळेवर चालते. काही वेळातच टमटम आली दहा पंधरा मिनिटात आणखी दोन जणांना घेऊन वाटेतली सीट भरत साडेतीनला पाली स्थानकात एकदाचे पोहचलो. पाली पनवेल एस टी मात्र सव्वाचार शिवाय निघाली नाही. खोपोलीत अगदी सहा वाजता जेमतेम लोकलच्या वेळेतच कसेबसे पोहचलो, सुदैवाने अथवा दुर्दैवाने लोकल उशिरा धावत होती म्हणून आरामात तिकिट काढून कशीबशी जागा मिळवली. बर्याच दिवसांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट ने धावत पळत अडकत रखडत एक चांगला ट्रेक केला. तसेच ब्लॉगरच्या माध्यमातून काही समविचारी डोकी एकत्र येताय हि तर चांगलीच सुरूवात म्हणावी, अजून काय लिहिणे पुन्हा भेटूच....

योगेश चंद्रकांत आहिरे.

फोटो साठी हि लिन्क पहा: http://ahireyogesh.blogspot.com/2016/12/telbaila-bloggers-meet.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users