इष्क मुबारक, दर्द मुबारक: मन मस्त मगन (भाग २ )

Submitted by विद्या भुतकर on 6 December, 2016 - 18:26

पहिला भागः http://www.maayboli.com/node/61010

"सामान सर्व आले नीट. हो ! हो ! आहे सगळं ठीक. श्वेता आहे घरीच. हो तिनेच जेवण बनवलं होतं. तुम्ही काही काळजी करू नका.मी उद्या करते कॉल परत. हो हा फोन नाही चालणार इकडे. तोवर श्वेताचा नंबर लिहून घ्या. हो, जेवून झोपणार आता. बाय, गुड नाईट. " रितू फोनवरून आईला सांगत होती. भारतातून निघतानाच प्रोजेक्टमधल्या मैत्रिणीशी बोलून सर्व ठरवले होते. तिलाही नवीन रूममेट हवी होतीच. हिलाही स्वतःची रूम आणि बाकीही सर्व सेट अप आयताच मिळाल्याने सर्व सोपं झालं होतं. सामान घेऊन घरी आले. घरी फोन केला, आनंदला फोन केला, इथे असणाऱ्या मॅनेजर ला कॉल केला. श्वेताने बनवलेलं जेवण करून ती झोपून गेली. इतक्या प्रवासाने बरीच दमणूक झाली होती.

दुसऱ्या दिवशी उठली तर रितूला एक प्रकारची शांतता जाणवत होती. भारतात असताना, रोज सकाळी उठलं की रस्त्यावरचे आवाज, दूधवाला, काम करायला येणाऱ्या मावशी, ऑफिसला जायची गडबड, सगळं कसं वेगळंच आणि धावपळीचं असायचं. पण इथे सर्व कसं शांत होतं. चुकून बोलायला गेलं तरी ती शांतता भंग पावेल असं वाटत होतं. आणि त्यात गेल्या काही दिवसांपासून चाललेली गडबड, दमणूक सगळं एकदम थांबलं होतं. तिचा एका पायरीपर्यंतचा प्रवास आतापुरता तरी संपला होता. त्या प्रवासातल्या अनेक गोष्टी मागे सोडून आपण इतक्या दूर आलोय याची जाणीव तिला पहिल्यांदाच होत होती.

'आनंद' ! किती दिवस झाले त्याच्याशी बोलून, भेटून, त्याला पाहून असं एकदम वाटू लागलं. तसं पाहिलं तर मोजून एक दिवस संपला होता. तिने आपला फोन चालू केला. असाही तो चालू नसल्याने, उगाचच फोटो चाळले. एअरपोर्टवरचे फोटो तिने नीट पाहिलेच नव्हते. आता जाणवलं, त्याने तिने गिफ्ट दिलेला शर्ट घातला होता. छान दिसत होता. 'साधं छान आहे बोलायचंही लक्षात आलं नाही आपल्या' असा विचार करून घड्याळात पाहिले. भारतात रात्रीचे नऊ वाजले होते.तिने श्वेताकडून फोन घेऊन त्याला फोन लावला. कॉल लागला आणि मागून एकदम जोर जोरात आवाज, गोंधळ, हसण्याचे आवाज येत होते.
"हॅलो ! हां बोल गं. नाही नाही सर्व ठीक आहे. आशिषचा बर्थडे होता ना आज. त्याच्यासोबत बाहेर आलोय सगळे. हां, थोड्या वेळाने कर परत कॉल. ऐकू येत नाहीये काही. तू ठीक आहेस ना? हो चालेल, थोड्या वेळाने कर कॉल. पण कर नक्की, मी वाट पाहतोय."

तिने नाईलाजाने फोन ठेवून टाकला. तो मस्त पार्टीत बिझी आहे आणि आपण त्याची उगाच आठवण काढतोय असं तिला वाटून गेलं. पण जाऊ दे ! म्हणत तिने ते विचार झटकले आणि आपलं सामान आवरायला सुरुवात केली. कपडे वगैरे कपाटात लावले. घरातलं सामान लावून घेतलं. श्वेतासोबत गप्पा मारत जेवण बनवलं. रूमवर कित्येक वर्षात जेवण बनवायची वेळच आली नव्हती. त्यामुळे हे असं स्वतः करायला मजा वाटली तिला. जेवताना तिने विचारलं, "काय करायचं आज? कुठे बाहेर जायचं का?"

श्वेता," अगं हो. प्लॅन होताच जायचा आमचाही. पण तू दमली असशील तर नको म्हणून काही बोलले नाही. तू तयार असशील तर जाऊ मग. "
"जाऊ या ना" म्हणत रितूने तयारी करायला सुरुवात केली.

गावातच एका ठिकाणी ice sculptures बनवले होते. ते पाहून आठवड्याचे सामान घायचे, बाहेर जेवून घरी परत यायचा बेत होता. थंडीतही छान आवरून रितू बाहेर पडली. श्वेताचे बाकी मित्र-मैत्रिणीही होते. सर्वांसोबत तिने मस्त फोटोही काढून घेतले. श्वेताने तिला भाज्या कुठून घेतो, इंडियन स्टोअर कुठे आहे हे सर्व दाखवलं. रविवार असल्याने सर्व लवकर बंद होणार होतं. त्यामुळे ते जेवायला जाऊन लवकरच घरी परतले. सर्व करताना नव्याची नवलाई तर वाटत होतीच. पण काहीतरी चुकत होतं. जे पाहतोय त्या गमती सांगायला कुणी नाहीये असं वाटत होतं. कदाचित पहिलाच दिवस आहे इथे म्हणून वाटत असेल असा विचार करून तिने ते सर्व मागे सारलं. जेटलॅग मुळे तिला अशीही जाम झोप येत होती. घरी येऊन क्षणभरात रितूची झोप लागली होती.

.....

सोमवारी सकाळी आनंद उठला तेव्हा त्याला पुन्हा एकदा आठवण झाली. रितुने रात्री कॉल केलाच नाही. आपलंच चुकलं. उगाच बाहेर गेलो. तिच्याशी बोलणं झालं असतं ना? त्याने स्वतःवर चिडचिड करत सकाळची तयारी केली.ऑफिसला पोचून तिला एकदा कॉल करावा का असं सारखं त्याला वाटत होतं .पण जेटलॅग मुळे ती लवकर झोपली असेल हेही माहित होतं. कसाबसा तो ऑफिसला गेला. तिथे जणू प्रत्येकजण डोळ्यांनी त्याची चौकशी करत होता. त्याच्या उदास असण्याच्या खाणाखुणा शोधत होता. त्यानेही मग लपवण्याचा प्रयत्न सोडून दिला. सकाळची सुरुवातीची कामं झाल्यावर त्याने फेसबुक चेक केलं तर त्याला तिथे रितूला टॅग केलेले २-४ फोटो दिसले. किती गोड दिसत होती ती त्या कपड्यांमध्ये. तिला हे घे म्हणत असताना किती काचकूच केली होती तिने. फोटोना लाईक केलं तरी तिला असे फिरताना बघून त्याला थोडंसं वाईट नक्कीच वाटलं होतं.

दिवसभर ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, अनेक कारणांनी त्याला तिची आठवण येत राहिलीच. संध्याकाळी कॉल संपवून तो थोडा वेळ तिची ऑनलाईन येण्याची वाट बघत होता. तिने ऑनलाईन आल्यावर लगेच त्याला मेसेज केलाच,"हाय". त्यानेही उत्तर दिले. तिने मग त्याला फोन केला आणि सकाळपर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींचा एक ओझरता आढावा दिलाच. तिलाही थोडं हायसं वाटलं आणि त्यालाही. आपण उगाच तिच्यावर थोडं का होईना खट्टू झालो याचं त्याला वाईट वाटलं आणि मनोमन तिलाही. तिच्याशी बोलून आपला दिवसाचा शेवट तरी चांगला झाला असं वाटलं. तर तिला आपली सुरुवात छान झाली असं. एकमेकांपासून दूर असल्याची जी भावना होती तीही बरीचशी कमी झाली.

हळूहळू रितूचे ऑफिस, रूम सर्व सेट अप झाले. फोनही ऑफिसकडून मिळाला. पुढे पुढे मग हे रोजचं रुटीनच झालं होतं. दोघेही आपापल्या सकाळी एकदा बोलत आणि रात्री एकदा. एकमेकांच्या वेळा, जागा,रुटीन चांगलंच माहित झालं होतं त्यांना. कधी ऑफिसच्या कामाबद्दल, कधी मित्रांबद्दल, कधी कुठे फिरून आलेल्या जागांबद्दल. पण एक होतं, रितूंचे ऑफिस तसे नियमित ८-५ असायचे. संध्याकाळी घरी आले की जेवण बनवणे, टीव्ही बघणे फारतर मैत्रिणीशी गप्पा इतकेच काय ते व्हायचे. कित्येक वर्षात संध्याकाळी तिला असा मोकळा वेळ मिळाला नव्हता आणि एकांतही. कातरवेळ म्हणतात ना? ती हीच ! थोड्या दिवसांनी तिला एकटं एकटं वाटू लागलं होतं. आणि अशा वेळी कितीही फोनवर बोललं ना तरी समोर माणूस हवं असतं. अशाच एका संध्याकाळी तिने आनंदला फोन केला.

"काय करतोयस?" जवळ जवळ रडतंच ती बोलली.
तिचा आवाज ऐकून तो उठूनच बसला.
"काय गं? काय झालं? रडतेयस की काय?", त्याने काळजीने विचारलं.
"नाही काही असंच. ", ती पुढे बोलली.

कितीतरी वेळ मग ते दोघे फोन कानाला लावून एकही शब्द न बोलता बसून राहिले. बिचारा आनंद, त्याच्याकडे पहाटेचे ४ वाजले होते. त्याने तिला मग आग्रहाने व्हिडियो चॅट करायला सांगितलं.

तिला समजावलं,"तुला हा अनुभव घ्यायचा होता ना? मग अशी दुःखी होऊन का बसतेस? जा ना फिरायला? गाडी नाहीये, तर ड्राइव्हिंग शिक, गाडी घे, एकटी फिरवयाला शिक. इच्छा खूप असतात आपल्या पण त्या पूर्ण व्हायला लागल्या की अजून हरवल्यासारखं होतं. उगाच एकटं वाटून ज्यासाठी गेलीयेस ते कारणंही विसरलीस?"

ती डोळे पुसत त्याला बोलली,"मला ना तुझ्या परत तिकडे येण्याचं कारण कळायचं नाही. इथे सर्व किती चांगलं आहे तरी तू उगाच परत गेलास असं वाटायचं. आता कळतंय किती एकटं वाटतं इथे."

"असंच काही नाहीये गं. मला माहित होतंच मला काय हवंय. मला कधी ना कधी परत यायचंच होतं त्यामुळे काही वर्षं झाल्यावर मी परत आलो. पण तू तर आताच गेलीयेस तिकडे. उगाच काहीतरी विचार करू नकोस. जा आवर आणि ड्रायव्हिंगची माहिती काढ. ", त्याने तिला हक्काने सांगितले.

पुढचे काही दिवस मग त्यानेच तिला सर्व नियम समजावले. ड्रायव्हिंगसाठी टिप्स दिल्या. तिनेही मग श्वेतासोबत जाऊन गाडीचे लर्निग लायसेन्स, पर्मनंट लायसेन्स घेतले. मोठा सोहळाच होता तो. तिला पुन्हा एकदा नवी दिशा मिळाली होती. कुठलेही स्वप्नं पूर्ण होऊन भागत नाहीच. त्याच्या पुढच्या स्वप्नाकडे जावंच लागतं, नाहीतर मग आयुष्य आहे तिथेच थांबून जातं. लायसेन्स मिळाल्यावर तिला मग अजून नव्या गोष्टींचा, नवं काही जाणून घ्यायचा, शिकायचा नादच लागला.

आनंदचे आयुष्य मात्र अजूनही तिथेच होते जिथे ती सोडून गेली होती. तिला कितीही प्रोत्साहन दिले तरी त्यालाही एकटं असल्याची जाणीव होतीच. कधीतरी प्रोजेक्ट मध्ये एखादे चांगले काम केल्यावर कौतुकाचे चार शब्द मिळायचे तितकेच काय ते. बाकी सर्व मात्र आहे तिथेच होतं. आणि त्यात घरूनही लग्नाचा आग्रह चालू होताच. आणि होतं काय? तुम्ही एका नात्यात असला ना? त्याला एक नाव असलं की त्याच्यात असलेल्या अपेक्षाही ठरलेल्या असतात. पण त्यांच्या नात्याला नावंही नव्हतं आणि अपेक्षांची ना व्याख्या होती ना मर्यादा होती. बरं आताशी वर्ष होत आलं होतं रितूला परदेशी जाऊन. आता कुठे ती सर्व काम नीट शिकत होती, नव्या गोष्टी करत होती. अशा वेळी तिला परत बोलवायचा स्वार्थीपणा तरी कसा करणार होता तो? तिला योग्य त्या संधी मिळणं हा तिचा हक्कच होता. आपण तो कसा हिरावून घेणार? कितीतरी वेळा त्याने प्रयत्न केला तरीही तिला विचारण्याचा.

एक दिवस त्याने सहज म्हणून विषय काढून तिला विचारलंही,"काय स्टेटस आहे सध्या प्रोजेक्टचं?".
ती,"हा चालू आहे रे. तो काही अजून ५-१० वर्षं तरी संपत नाहीये. बघू काय म्हणतो मॅनेजर. त्याला वाटत होतं मी अजून १-२ वर्ष इथे राहावं असं. "
तिने असं बोलल्यावर त्याने मग विषयच सोडून दिला.रितू आता तिच्या नव्या विश्वात रमली होती.
.......

वर्षभर झालंही या सगळ्या गोष्टींना. एक दिवशी रितूची रूममेट श्वेता थोडी टेन्शनमध्येच घरी आली. तिच्या प्रोजेक्टचे काम अचानक संपले आहे म्हणून सांगितले होते. खरंतर तिला अजूनही तिथेच राहायचं होतं. तिचा होणार नवराही जवळपासच असल्याने तिची खरंच वाईट अवस्था झाली होती. नोकरी सोडावी आणि त्याच्याशी लगेच लग्न करून इथेच राहावं की परत भारतात जाऊन व्यवस्थित नोकरी सांभाळूनच थोड्या दिवसांनी लग्न करावं हे तिला कळत नव्हतं. अनेकवेळा तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन येऊन गेला. रितूने तिला समजावलंही,"इतकं करियर चांगलं आहे तर उगाच का सोडतेस? थोडा धीर धर. इतके वर्ष या कंपनीत आहेस. असं सगळं सोडून देऊ नकोस. " तिकडे नवरा म्हणत होता,"तू सोडून दे आता नोकरी. आपण बघू पुढे. नवीन नोकऱ्या मिळतंच राहतील."

शेवटी हो-नाही करत मोठ्या जड मनाने श्वेताने परत भारतात जायचा निर्णय घेतला.. अजून थोडे दिवस नवीन प्रोजेक्ट मिळाला तर परत इकडे येऊ असे तिने ठरवले होते. समजा नाहीच मिळाला प्रोजेक्ट वर्षभरात तर येऊ मग 'डिपेंडेंट व्हिसा'वर अशी मनाची समजूतही काढली.

श्वेता परत गेली. घर रिकामं झालं. रितूला खायला उठलं. अनेकवेळा तिने आनंदला विचारलंही,"तू का नाही बघत प्रोजेक्ट इकडे एखादा? आपण पण ट्रिप काढू मस्तपैकी इकडे. किती दिवस राहणार आहे तिथे? शिवाय तुझा व्हिसा आहेच. ". तो मात्र तिकडे यायला नकोच म्हणत होता. एकूण काय गाडं अडकलेलंच होतं. तीही मग कामात व्यस्त झाली. एकटी राहिली तरी त्याचीही तिला सवय झाली. रोजची ऑफिसची कामे, बाहेरची थोडीफार करमणूक यातच व्यस्त झाली.

नाती थांबली ना मग त्याच्यासारखी वाईट नाहीत. रोज तोच 'हाय', तोच 'बाय', तोच 'जेवण झालं का' चा मेसेज आणि तेच गुड नाईट. कधी कधी मग आपण त्या व्यक्तीत का अडकलोय हेच कळत नाही. पूर्वी वाटणारी गंमत केव्हांच निघून गेलेली असते. मग केवळ तेच जुने क्षण आठवायचे आणि उदास हसून घ्यायचं. पण पुढे काय? नवीन काय? ते मग सर्वच कृत्रिम होऊ लागतं आणि एखाद्या दिवशी नाही केलं तरी काही फरक पडत नाही. नाही केला फोन त्यानेही आणि तिनेही. पुढच्या वेळी केला तेंव्हा थोडेसे भांडलेही. पण त्या भांडणात पण हक्क राहत नाही आणि अर्थही. असेच कित्येक महिने गेलेही.

श्वेता पुन्हा नोकरी सोडून नवऱ्याकडे आलीही. रितूला तिने हक्काने घरी बोलावलं. एका वीकेण्डला तिला भेटली. तिच्या लग्नातले आनंदचे फोटोही तिने पाहिले. रितूला एकदम त्याची आठवण झाली. तिला भेटल्यावर रितूला आपल्यात असलेल्या कमतरतेची जाणीव झाली. कितीतरी दिवसांत ती अशी मोकळेपणाने हसली नव्हती, बोलली नव्हती. ऑफिसच्या कामात गुंतून गेली होती. इतकी की, तिला श्वेताचा परत यायचा निर्णय फारसा पटलाही नव्हता.
श्वेताला तिने विचारलेही एकटी असताना,"तू कसं काय ठरवलंस परत यायचं? पुढे काय करणार आहेस?".
श्वेता म्हणाली,"अगं, मला कुठलाही निर्णय घाईत घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी परत गेले. तिथे गेल्यावर जाणवलं की धनूशिवाय मी राहू शकत नाही. मी मॅनेजरशी बोलले तेव्हा लक्षात आलं की सर्व सहजासहजी होणार नव्हतं. बरीच वाट पाहावी लागली असती. धनू माझ्यासाठी परत आलाही असता, पण मला इकडेच राहायचं होतं. मग म्हटलं नोकरीच्या भरवश्यावर माझं आयुष्य होल्ड वर ठेवू शकत नाही ना? आणि त्याच्यावरच सर्व निर्णय घेऊ शकत नाही. शिवाय माझे करियर काही इथेच संपत नाही. मी काही घरी बसणारी नाहीये त्यामुळे पुढे जे असेल ते बघूच. पण सध्या तरी मला हे हवं होतं आणि मी ते केलं. "

श्वेताशी बोलल्यावर रितूला लक्षात आलं की आपण विचारही केला नाहीये आपल्याला नक्की काय हवंय. जे चालू आहे तेच करत आहोत. रोज जे क्षण आपण आनंदसोबत घालवायचो ते आपण रुटीन म्हणून गृहीत धरलं ते कधी निसटूनही गेलंते कळलंही नाही. ते थांबवण्याचा काही प्रयत्नही केला नाही. छोट्या छोट्या गोष्टीत खूष होणारे आपण, छोट्या दुःखासाठी रडणारे आपण, इतके कसे निर्जीव झालो? ती किती बदलली आहे याची जाणीव तिला इतक्या दिवसांनी झाली. आपल्याला एखादी व्यक्ती इतकी प्रिय असते, तिच्याशिवाय आपण एकेकाळी क्षणभरही राहू शकत नसतो. पण तीच रुटीन होते आणि मग निसटून गेली तरी पत्ताही लागत नाही. आपण जर प्रयत्नच केले नाहीत थांबवायचे, भांडायचे, हक्काने मागायचे तर मग मिळणार तरी कसे आणि देणार तरी कोण? ज्या नात्याला कधी नाव दिलंच नाही ते तिला आता हवं होतं, अगदी आत्ताच्या आता हवं होतं.

ज्या प्रेमामुळे ती आनंदच्या इतकी जवळ होती ते तिला आठवत होतं. त्याचं तिच्या कामासाठी भारतातून रात्री जागणं, तिला सोबत देणं, कधी कुठे एकटी असेल तर तिच्याशी फोनवर बोलत राहणं, अगदी कधी नुसता फोन धरून बसून राहणं सर्व आठवत होतं. पण आता उशीर झाला होता का? काय माहित? ती बोललीच कुठे होती ती त्याच्याशी? आणि बोलायचं तरी कसं? हक्काने मध्यरात्री फोन करण्याची तिची हिम्मतही झाली नाही. तिने सकाळ झाल्यावर त्याला फोन लावला. पण त्याचा फोन लागत नव्हता. त्याच्या नवीन रूममेटचा नंबरही तिने घेतला नव्हता. सोमवारी सकाळी ऑफिसला गेले की त्याच्या मॅनेजर कडून त्याचा नंबर घ्यायचा आणि त्याच्याशी बोलायचे, हक्काने रागवायचे आणि सॉरीही म्हणायचे होते तिला. कितीतरी दिवसांनी तिच्यात अशी अधीरता आली होती. प्रेम म्हणजे केवळ रुटीन मध्ये सोबत देणे नसून दोघांनी एकमेकांना घेऊन पुढं जाणं असतं. कुणी थांबला तर त्याला हट्टाने सोबत ठेवायचं असतं. रागावला तर मनवायचं असतं. अर्थात हे सर्व करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला गृहीत धरायचं नसतं. कितीतरी वेळ ती स्वतःवर चिडत राहिली, त्याला असंच गृहीत धरल्याबद्दल.

कशीतरी सोमवारची सकाळ उजाडली आणि आज पुन्हा तिला काय हवंय हे स्पष्ट झालं होतं. तिने सकाळीच मॅनेजर सोबत मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं," सर मला येऊन आता जवळ जवळ दोन वर्षं झाली. I think my work is done here. तुम्ही माझी रिप्लेसमेंट शोधाल का? मला परत जायचं आहे.अर्थात लगेच हे सर्व शक्य होत नाही मलाही माहित आहे. पण माझी रिक्वेस्ट आहे शक्य तितक्या लवकर मला परत जायचं आहे. " सरांनीही तिला 'ठरवू लवकरच' असं सांगितलं. आता हे कधी ठरवणार आणि कधी मी परत जाणार असं तिला झालं होतं. त्यात आनंदचा नंबर अजून लागत नव्हता. एकूण दिवसच कंटाळवाणा होता.

दुपारी एकटीच ती कॅन्टीन मध्ये जेवत असताना तिला मागून आवाज ऐकू आला,"हाय!". हाच तो 'हाय' होता जो रोजच ऐकताना गृहीत धरला होता. रोज फोन ठेवताना उद्या येईलच म्हणून निष्काळजीपणे ठेवून टाकला होता. तोच आनंद प्रत्यक्षात तिच्यासमोर उभा होता. तिला विश्वास बसत नव्हता की तो तिच्यासमोर आहे. तिला एकदम रडू येऊ लागलं आणि तो वेडा नेहमीसारखाच हसत होता. आपण ऑफिसमध्ये आहे हे विसरून तिने त्याला मिठी मारली होती. कितीतरी वेळ रडून झाल्यावर तिने त्याला विचारलं,"कधी आलास? मला सांगितलंही नाहीस? इतकी परकी झाले का मी? " आणि पुन्हा रडू लागली.

त्याने तिला शांत केले आणि समजावले. "तू मला विचारत होतीस ना मी परत का आलो भारतात? हे असे श्वेता सारखे आणि अजून बरेच मित्र मैत्रिणी पाहिलेत मी. लग्न करायचे आहे म्हणून भारतात जातात, तिथेही ३ आठवड्यात परत येतात. प्रेम तर हवं असतं पण त्यासाठी काही सोडायची इच्छा नसते. जेव्हा सगळंच हवं असतं ना तेव्हा काहीतरी राहतंच. पैसे हवेत म्हणून मुले आणि बायको भारतात आणि नवरा इकडे, तर कधी बायको करियर साठी परदेशात आणि नवरा एकटा. बरं अमेरिकेत असलेलेही चांगली नोकरी हवी म्हणून वेगवेगळ्या शहरात किंवा कधी वेगळ्या राज्यांत. मग त्यात भेटायची खटपट, नाती सांभाळण्यासाठी धावपळ, त्यात होणारी भांडणे, सर्व सर्व पाहिलंय मी अगदी त्यात आपल्या आईवडिलांचे होणारे हालही. बरं लोकांना हेही कळत नाही की थोडे दिवस गेल्यावर परत काहीतरी वेगळे करता येईल. कधी नोकरी बदलली, पैसे थोडे कमी मिळाले किंवा भारतात राहिले किंवा नंतर जाऊ कधी परत म्हणून इथेच राहिले यांनी इतका फरक पडत नाही जितका जवळचं माणूस हरवल्यावर पडतो. प्रत्येकाच्या प्रायॉरीटीज असतात आणि गरजाही. पण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही कितीही पश्चाताप झाला तरी.

हे सर्व जवळून पाहिलं होतं मी. त्यामुळे मला माहित होतं मला भारतात राहायचे आहे. पण तू इथे आलीस, रमलीस आणि आपलं नातंही या बाकी लोकांसारखं होऊ लागलं. थोडे दिवस मीही हट्ट केला मला तिकडेच राहायचं आहे म्हणून. पण मग वाटलं मी तरी काय वेगळा होतो? म्हणून मग गेल्या काही दिवसांत प्रोजेक्ट बदलून घेतला. सहाच महिन्यांचा प्रोजेक्ट आहे. म्हटलं बघू तरी सहा महिन्यांत तू परत भेटतेस की नाही? प्रयत्न करणं माझ्या हातात होतं आणि ते करायचं मी ठरवलं. बस्स! बाकी काही नाही. " किती वेळ बोलत होता तो.

तिच्या डोळ्यासमोरून अश्रू वाहत राहिले. ज्या आनंदला तिने इतक्या जवळून पाहिले होते तो पुन्हा तिला भेटला होता. आणि त्याच्यासोबत थोडीशी तीही तिला पुन्हा गवसली होती. लवकरच सर्व उरकून त्याच्यासोबत घरी जायचं मनोमन पक्कं केलं होतं तिने.

तिच्या डोक्यात एकच गाणं रेंगाळत होतं.. तिच्या आवडत्या अरिजीतचं......

ओढ़ के धानी प्रीत कि चादर
आया तेरे शहर में राँझा तेरा
दुनिया ज़माना, झूठा फ़साना
जीने मरने का वादा सांचा मेरा

हो शीश-महल ना मुझको सुहाए
तुझ संग सुखी रोटी भाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

चाहे भी तो भूल ना पाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्या,
मस्तच लिहिलिस गोष्ट.
आणि अरिजित माझाही आवडता गायक आहे, हे गाणंही फार आवडतं आहे.

तुझ्या लिखाणात छान मॅच्युरिटी यायला लागलीय.

इतक्या छान गोष्टीबद्दल धन्यवाद!

छान कथा, विद्या....:-)
फक्त जर "रितू" च्या ऐवजी तृप्ती, अंजली, आरती, शर्वरी...असे मराठी नाव असते तर जास्त भावले असते.....हे जरा नॉर्थ इंडियन वाटते...आणि त्या अनुषंगाने डोळ्या समोर येणारी "रितू" इतकी डीप भिडत नाही मग मनाला...!!
'आनंद' कसा चटकन समजतो तसा.........................!!

Lovely

विद्या,
मनाची घालमेल अगदि मनाला भिडली.
( प्रेम तर हवं असतं पण त्यासाठी काही सोडायची इच्छा नसते. जेव्हा सगळंच हवं असतं ना तेव्हा काहीतरी राहतंच.)

खुप छान .....लिहीत रहा....

अरे व्वा ! छान ! प्रतिसाद सर्वान्चे. Happy आवडले.
साती, माझ्या लिखाणात बदलही तुम्ही नोटीस करत आहेत हे किती छान आहे. Thanks.
लिहिताना भीती वाटत होती की जे आधी लिहिले आहे ते प्रेम न दिसता रटाळवाणे होईल की काय.. पण एकदा लिहायला सुरुवात केल्यावर थाम्बले नाही.

रितू नाव नॉर्थचे वाटते पण या गोष्टीत मी कुठेच त्यान्ची भाषा, देश, गाव किन्वा चालीरिती सान्गित्लया नाहियेत. आणि considering this is an IT story, Ritu could be North Indian Or South Indian too. Happy

अपल्याला नावावरून्ही लोक आपले किन्वा परके वाटू शकतात, नाही का? Happy
Thank you so much for the encouragement.

Abdul, I'll definitely post if its really following the story. But for now, this is it. Happy

VIdya.

छान आहे!
ती ओ हेन्रीची कथा आहे ना: एकाच वेळेस केस विकून घड्याळाची अ‍ॅक्सेसरी आणणार्या बायकोची अन घड्याळ विकून हेअर अ‍ॅक्सेसरी आणणर्या नवर्याचीकथा आहे ना तशी वाटली एंडला.. Happy

बस्के, दाद, तुमच्या दाद-बद्दल धन्यवाद. Happy

ती ओ हेन्रीची कथा आहे ना: एकाच वेळेस केस विकून घड्याळाची अ‍ॅक्सेसरी आणणार्या बायकोची अन घड्याळ विकून हेअर अ‍ॅक्सेसरी आणणर्या नवर्याचीकथा आहे ना तशी वाटली एंडला.. >> त्यात होते तसे दोघेही एकाच वेळेस आपले प्रोजेक्ट सोडून भारतात आणि अमेरिकेतही आले तरी चालले असते. Happy म्हणजे मला तरी चालले अस्अते. आणि माझ्याबाबतीत असे होता होता राहिल्याने तर नक्कीच. पण मग कधी कधी सत्य नाटकापेक्षा नात्यमय अस्ल्याने ते लिहिल्यावरही नाट्यमय वाटल असते. असो. Happy

Thanks.