कथा एका दिवसाची

Submitted by सुहृद on 2 December, 2016 - 22:59

कथा एका दिवसाची

वेळ -, सकाळी 9.30
आज सकाळी जरा लवकर आवरले सगळे... विचार केला खुप दिवस बँकेची कामे अपूर्ण आहेत.. आज वेळ आहे तर पुर्ण करावीत ... ब्रांच नवीन घरापासून लांब होती. ती पण बदलायची, पीन घ्यायचा वै वै. घरातून निघाले.. बसला तुफान गर्दी.. एक तास फिरुन स्टॉप आला माझा. पटकन बँकेत शिरले, सहज मनात आले ATM कार्ड हातात ठेऊ, फारच सुधारली असेल बँक तर बरं हाताशी असलेले. सगळी बॅग उलथीपालथी केली पण पर्स सापडली नाही. मग माझी खात्री पटली आज आपली पर्स खरचं हरवली आहे (जवळपास मला रोजच असे वाटते की गेली वाटते पण डब्याखाली, डायरीमागे, फोल्डरच्या फ्लॅपमध्ये अडकलेली परत सापडते)

वेळ - 11.00
पहिली भावना चोराचे कौतुक, जी पर्स मला लगेच सापडत नाही ती त्याने मारली.. मान गये उस्ताद.. 2 मिनीटे पहिले माझी पर्स हरउ शकते हेच मला पटत नव्हते... पळत बाहेर आले आणि रिक्षा केली... पाठलाग.. हातात 56 रुपये होते... मीटरला 56 पडल्यावर बास सांगितले पण रिक्षा चालक भला माणूस निघाला. शेवटच्या स्टॉप पर्यंत नेले, आणि फक्त 56 रूपये घेतले. बसडेपोला जाउन बघीतले तर पर्स मिळालीच नाही. रिक्षा चालकाने विचारले की मी सोडतो तुम्हाला आणि काही पैसे देतो.. पण मला ते घेववेना. शेवटी लास्ट स्टॉपला मला तो सोडून निघाला. मी नवरा आणि आॅफिसला कळवले.

वेळ - 12.30
नवरोबा धुसफुसत निघाला. तोपर्यंत मी मानसिक तयारी केली आणि काय काय होते त्यात याची यादी करायला सुरु केली. नगद रक्कम जास्त नव्हती.. पण एकुणच कार्डाची लिस्ट संपेना. होतील तेवढी कार्ड ब्लॉक करायचा प्रयत्न, मग मात्र स्वतःचीच चिडचीड, रडारड.

वेळ- 1.15 दुपारी
नवरा आल्यावर जोडीने बँकेत गेलो. एकुण 4 वेगवेगळे फॉर्म भरून झाले. तोवर अहोंनी कॅश काढायचं कुपन घेतले, बँकेची ईतर कामे होई पर्यंत आमचा नंबर येण्याईतके आम्ही कुठले नशीबवान?

वेळ 2.30 दुपारी
आता आम्ही तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात.. एका पोलीस ठाण्यात गेलो. एकदम आम्हाला बसल्यावर वैगरे लगेच बरं वाटायला लागलं. आता मिळेल कदाचित. सगळं ऐकल्यावर बिचारा पोलीस म्हणाला अहो तो आमचा एरिया नाही. उठा.... राष्ट्रवीर हो... दुसर्‍या ठाण्याला चला..
दुसर्‍या पोलिस स्टेशनला पोहोचल्यावर लंच टाईम झाला होता... म्हणून बाहेर थांबलो. जेवण, जरा गप्पा टप्पा झाल्यावर साहेब आले. परत आमचं रडगाणं गायले,तोवर माझ्या सांगण्याला नेमकेपणा आला होता. मी ज्या ठिकाणी बसमधून उतरले त्यासमोर एक मोठे कॉलेज आहे. स्टॉपचं नाव म्हणून मी त्या कॉलेज चे नाव घेतले...
अहो ते आमच्या हद्दीत येत नाही...
हाहाहा... ( हे मनात)

वेळ 3.30 दुपार
एक मोठे साहेब बघायला आले. त्यांनी परत माझे निरुपण ऐकले आणि सांगितले, अरे हे आपल्या हद्दीत आहे.. तक्रार दाखल करून घ्या..
आम्ही एकदाचे स्थानापन्न... तर तक्रार लिहुन ज्या अर्जावर घेत, ते संपलेले.. एक शिल्लक प्रत आमच्या हातात ठेवून ते म्हणाले, जा, जरा झेरॉक्स घेऊन या, ईकडे पलिकडे मिळतात..
आम्ही चालतच निघालो... 10 मिनीटे चालल्यावर पलिकडचे दुकान आले. ते बिचारे पण नुकतेच जेऊन पडले असावेत. त्यान्ना जागे करुन, झेरॉक्स काढून, ठरल्याप्रमाणे सुट्ट्या पैशांचा घोळ घालुन परत गाडी ठेसनाला लागली.
आता सगळे तयार, एकदा निरुपण, हरवल्याची लिस्ट, त्यावर शेरा.. घरातील सगळी कार्डे तुम्हीच घेऊन फिरता की काय? हे सगळे पचवून आम्ही निघालो..

वेळ 4.30
नवर्‍याने बसस्टॉपवर सोडले, आणि त्याच्या महत्वाच्या कामाला (खरचं महत्वाचे) गेला.. मी परत खटारा जिंदाबाद करत एक ते दिड तासाचा प्रवास करत घरी टेकले...

आता बंद केलेली कार्डे परत कशीकशी सुरू करावीत असा विचार चाललाय...

हि एक काल्पनिक घटना आहे, याचा कोणाशीही कसलाही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल्पनिक आहे का.. छान लिहिलेय.
मला एक ईन जनरलच शंका आहे - अमुक तमुक मॅटर आमच्या हद्दीत घडला नाही तर रिपोर्ट नाही असे जे चित्रपटांत दाखवतात ते पोलिसवाले खरेच तसे करतात का? हे सर्व पोलिसस्टेशनं एकमेकांना जोडत का नाही? भारताचा डिजिटल ईंडिया झालाय तरी पोलिसखात्यासारख्या महत्वाचा जागी आपण अजून अठराव्या शतकासारखे कागदी कबूतरे का उडवतो?

पोलीस स्टेशनला का गेले कळलं नाही . बाकी मस्त लिहिलंय, वेग आणि तगमग जाणवली.

मला शेवट पर्यंत वाटत राहिलं कि घरीच पर्स विसरली असेल.

@अ. सा. धन्यवाद

@ राजसी-कागदपत्रे हरवली आहेत हे नोंद झाली पाहिजे ना, कोणितरी गैरवापर करु शकतो.

@ऋन्मेष
हो अगदी असेच असते.