कोंढाने लेणी व किल्ले राजमाची भटकंती

Submitted by किरण भालेकर on 1 December, 2016 - 01:49

कोंढाने लेणी व किल्ले राजमाची भटकंती रविवार दि.७ ऑगस्ट २०१६ रोजी पार पडली. यावेळी भटकंतीचे साथीदार होते लांजा कॉलेज ग्रुपचे आमचे जिगरी दोस्त आशीष रांबाडे,प्रमोद दरडे,अनिल दरडे. बारा मित्रांमधून अवघे चारजण शेवटच्या वेळी ट्रेकसाठी आले होते.तरीही न डगमगता ट्रेकला जायचे याचा निर्धार होताच.सकाळी ६ वाजता सर्वजन दादरला भेटलो.तब्बल वर्षभराने ही भेट होती.ट्रेकसाठी अतिशय नियोजित असा प्लान होता.त्यानुसार सकाळी ६.२४ची कर्जत फास्ट लोकल दादरवरून पकडली.गर्दी तुरळक असल्यामुळे बसायला जागा मिळाली.बरोबर ८.00 वाजता कर्जत स्टेशनला पोचलो.तिकडे नाश्ता उरकुन घेतला आणि बरोबर खाण्याचे सामान (बिस्कीट,केळी,वेफर्स)घेतले.१५ मिनिटे चालत श्रीराम पुलापर्यंत पोचलो तोपर्यंत ८.३० वाजले होते.आम्हाला कोंढाणे गाव गाठायचे होते.थोडीशी घासाघीस करुन वडापवाला आम्हाला राजमाचीच्या वाटेवर मंदिरापर्यन्त सोडण्यास तयार झाला.रस्त्याला मधोमध खड्डे पडल्यामुळे शरीराचा चांगलाच मसाज घडून झाला.राजमाचीच्या चढाईला बरोबर ९.३०ला आम्ही सुरुवात केली.१० मिनिटावरच एक स्वच्छ वाहणारा ओहळ आणि त्यावरून कोसळणारा धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते.ईथे जो भिजला नाही तो खरा ट्रेकर्स कसला ?जलधारानी सचैल स्नान केले.आणि फोटोग्राफीची हौस भागवुन घेतली.खऱ्या अर्थाने आता ट्रेकचा श्रीगणेशा झाला होता.

कर्जत स्टेशन पासून १५ किमीवर असणाऱ्या कोंढाने गावात घनदाट जंगलात लपली आहेत कोंढाने लेणीसमूह.निसर्गाचा आस्वाद घेत किर्र झाडीतुन 4 किमी चालल्यावर हा लेणीसमूह आपल्या दृष्टीस पडतो. लेणी दर्शन संध्याकाळी करायचे असल्याने राजमाची जवळ करू लागलो.लेण्यांच्या खालुनच ही वाट जाते.

राजमाची सारखा विशाल आणि निसर्गसौंदर्याने नटलेला गिरीदुर्ग.पावसाळ्यात याचे वैभव ज्याने पाहिले त्याच्याइतका नशीबवान कोणीच नाही.घनदाट जंगलातून जाणारी पायवाट सोबतीला खेकड्यांची सरसर,दुथडी भरून वाहणारे पांढरेशुभ्र् ओहळ,असंख्य कातळकडे,उंचावरुन कोसळणारे धबधबे,आकाशाशी स्पर्धा करणारे सुळके ,दाट धुके, शारीरिक क्षमता जोखणारी चढाई असा राजमाचीचा मार्ग सजला आहे.कोंढाणे लेण्यांपासून पुढे जवळच्या अंतरावर आणि राजमाचीच्या वाटेवर परत एक ओहोळ लागतो.त्याच्या डाव्या बाजूला काळजीपूर्वक जंगलात पाहिले तर एक प्रचंड मोठ्या आकाराचा जलप्रपात कड्यावरुन कोसळत होता.या परिसरातील हा मोठा धबधबा आहे.तिथपर्यंत पोचता येईल का यासाठी वाट शोधावी लागणार होती.दगडातुन आणि मोठ्या पाण्यातून ही वाट होती.अत्यंत काळजीपूर्वक या धबधब्याखाली जावून पाहणी केली.वेळ फार कमी असल्याने संध्याकाळी या ठिकाणी यायचे असे मनाशी ठरवुन अधिक वेगाने राजमाचीकडे वळलो.किर्र जंगलातून जाणारी पायवाट सोबतीला थंडगार वारा आणि धबधब्यांखाली चिंब भिजत चढाई न थांबता चालूच होती.७० वर्षाचे आजोबा काठी घेवून जंगलातून एकटेच खाली बाजाराला निघाले होते.ते पाहून थकवा कुठच्या कुठे पळून गेला.पठारावर येताच गडाची बेलाग तटबंदी दृष्टीक्षेपात येत होती.जवळच उधेवाडी गांव वसलेले आहे.३००० फुट ऊंचीवरचे हे गांव अतिशय दुर्गम असे आहे.येथील ग्रामस्थाना घरगुती सामान आणायचे झाले तरी २ तास पूर्ण डोंगर उतरुन कोंढाणेला जावुन बाजारहाट करुन परत चढावे लागते.उधेवाडीमध्ये घरगुती जेवण सांगून आम्ही पुढे निघालो.इथून कालभैरव मंदिरापर्यन्त पक्की वाट बांधलेली आहे.मंदिरापर्यन्त दुपारचे १२.०० वाजले होते.कालभैरव हे या गावचे ग्रामदैवत होय.शाहू महाराज आणि पाहिले बाजीराव यांनी या मंदिराला भेट दिलेली आहे.मंदीराच्या बाजुला तोफा ठेवलेल्या आहेत.समोरच तूटलेली दिप माळ,खंडोबाचा घोडा,उजव्या बाजूला पाण्याचे टाके आहे.मंदिराच्या समोरची वाट आपल्याला श्रीवर्धनकडे घेवून जाते.आणि पाठीमागची वाट मनरंजनकड़े घेवून जाते.तसे म्हटले तर हे दोन्ही छोटे किल्लेच आहेत.गेल्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी कालभैरव मंदिरापर्यन्त वेळेअभावी चढाई अर्धवट सोडावी लागली होती.देवाला दसऱ्याच्या दिवशी पुन्हा दर्शनाला येईन हे दिलेले वचन मी पाळले होते. श्रीवर्धन आणि मनरंजन बुरुज तसेच काळभैरव मंदीर गडाच्या वैभवात अजुन भर टाकतात.

श्रीवर्धनची वाट पकडून चालू लागलो.वाट थोडी धोकादायक उभ्या चढनीची आणि कडेकपारीची आहे.अर्ध्या तासात दरवाजाजवळ पोचलो.सर्वजण गडाच्या पाया पडलो.छत्रपतींची गारद आसमंतात दुमदुमुन गेली.सर्वानी त्याला साथ दिली.थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाण्याचे टाके लागते.पाणी खराब आहे.जवळच एक तोफ आहे.ते पाहून सरळ पुढे गेल्यावर धान्याचे कोठार लागते.हजारो टन धान्य राहु शकेल इतके प्रचंड कोठार नैसर्गिक कपारीमध्ये बांधलेले आहे.ईथे ग्रामस्थानी चहाची सोय केली होती.चहा पिऊन थोड़ी विश्रांती केली आणि पुन्हा चालू लागलो.थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाण्याचे टाके पाहून निशानाची जागा बुरुज बघितला.येथे एक पड़ीक वास्तुचे अवशेष दिसतात.भगव्याला प्रणाम केला आणि खालच्या बुरुजाकडे वळलो.गडावर गवत खुप वाढले आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. खाली उतरताना परत एक नितळ पाण्याचे टाकं आहे.श्रीवर्धनचा खालच्या बुरुजावर भगवा फडकत होता.समोर दरीमध्ये कित्येक फूटावरुन कोसळणारा विशालकाय असा धबधबा आपली नजर खिळवुन ठेवतो.तासनतास पाहत रहावे असे ते दृश्य आहे.इकडे थोडे फ़ोटो काढले.आणि पुढे निघालो जवळच एक चोरदिंडीवजा भुयार आहे.त्यातून खाली उतरलो आणि परत दुसऱ्या वाटेने बुरुजावर आलो.जंग्या,तोफांची जागा,तटबंदी पाहून परतीचा प्रवास धरणार तोच पावसाने बघता बघता रौद्ररूप धारण केले.प्रचंड हवा आणि मुसळधार पाऊस कोणाचा पाय जाग्यावर राहिना.तरीही त्या स्थीतीत अंगावर पाऊस झेलत आम्ही आल्या वाटेने गड उतरुन उधेवाडीत जेवणाच्या ठिकाणी पोचलो.

गावच्यासारखे घर,प्रशस्त अंगण,सारवलेली जमीन,दिलखुलास बोलणारी माणसे असे एकंदर वातावरण होते.जमिनीवर जेवायला बसण्यासारखे दूसरे सुख ते कोणते बरे ...!
गरम गरम भाकऱ्या,दोन भाज्या,वरणभात,लोणचेपापड,चटणीकांदा असा यथासांग मराठमोळा थाट होता.अप्पांच्या माचीवरचा बुधा कादंबरीचे नायक त्यांची हि मुले होत.
त्यांनी आमची आस्थेने विचारपुस केली.जेवणावर यथेच्छ ताव मारुन झाल्यावरही अंगातली हुडहुडी जाईना त्यामुळे थोडा आराम केला.एव्हाना ३.०० वाजले होते.घराच्या उजव्या बाजूने बाहेर पडणारी दगडी पायवाट आपल्याला एका प्राचीन हेमांडपती मंदीराकडे आणि तलावाकडे घेवून जाते.संपूर्ण दगडात बांधलेले गोधनेश्वर महादेवाचे मंदिर आहे.शिवपिंडी,समोर छोटे तळे त्यात गोमुखातुन बारमाही पाणी वाहत असते.आसनस्थ नंदी,दगडी दिपमाळ,गणपती आणि इतर देवतांच्या मुर्त्या प्राचीनतेची साक्ष देतात.मंदिर व खांब यावरील कलाकुसर थक्क करते.महादेवाची पूजा करुन थोडा वेळ मंदिरात घालवला.बाजुलाच असणारा प्राचीन उदयसागर तलाव पाहून आम्ही आल्या वाटेने परत फिरलो.3.30 वाजता आम्ही उधेवाडी सोडली.सकाळी पाहीलेला मोठा धबधबा नजरेसमोरुन हलत न्हवता.त्यामुळे वेगामध्येच मार्गक्रमणा चालू होती.धबधबा गाठेपर्यन्त संध्याकाळचे ५.०० वाजले होते.काळजीपूर्वक वाट काढत त्या जागी पोचलो.उंच कड्यावरुन पडणाऱ्या त्या जलधारांचा जंगलात एक वेगळाच नाद भरून राहिला होता.हे निसर्गसौंदर्य बराच वेळ डोळ्यात साठवुन घेण्याचा प्रयत्न करत होतो.उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता की बाहेर राहून सुद्धा भिजायला होत होते.पोट भरेपर्यंत फोटोग्राफी झाल्यावर आम्ही कोंढाने लेण्यांसाठी निघालो.

कोंढाने लेणी हा मानवी हातांचा अविष्कार आहे.दुसऱ्या वेळी येऊनही लेण्यांवरुन नजर हटत न्हवती. कान्हेरी,घारापूरी,महाकाली,मंडपेश्वर याबरोबर कोंढाणे हे प्राचीन मुंबई बेटाच्या अध्ययनाचे केंद्र होते.महायान व हीनयान पंथाचे बौद्व भिखु येथे अध्ययनासाठी वास्तव्याला असत.दर्शनी भागात मोठ्या आकाराचे स्तूप आहे आणि डाव्या बाजूला राहण्यासाठी खोल्या आहेत.लेण्यांच्या इथे बारमाही पाण्याचे टाके आहे.एका अखंड कातळात कोरलेली ही लेणी आहेत.लेण्यांच्या वरुन कोसळणाऱ्या धबधब्यांखाली मनसोक्त भिजलो.कपडे बदलून लेण्यांचा रामराम घेतला आणि सुसाट वेगाने मुंबईसाठी निघालो.कोंढाणे गावातुन कर्जत स्टेशनसाठी वडाप केली.बरोबर संध्याकाळी ७.०० वाजता कर्जत स्टेशनला पोचलो.गाडीला तब्बल अर्धा तास वेळ होता.तोपर्यंत फोटोंच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रम उरकला.७.४५ कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस गाडी पकडली.दादरला रात्री ९.३०ला ट्रेकची समाप्ती केली.आणि सर्वजण आपआपल्या घरी पांगले.बरोबर होते ओले कपडे आणि अविस्मरणीय आठवणींचे गाठोडे .....

लेखक
किरण प्रकाश भालेकर
bhalekar117.blogspot.com
bhalekar117.wordpress.com
Facebook.com/bhalekar117/

kiran.jpg मोठा धबधबा
watterfall big.jpg514-waterfall fort.jpgगोधनेश्वर महादेव


godhaneshwar mahadev.jpgकालभैरव मंदिर
kalbhairav mandir.jpgनितळ पाण्याचे टाके
511-panyache tak52_n.jpgचोरदिंडी
512-chordindi996_9058934089874690144_n.jpg श्रीवर्धन

shreevardhan.jpgकोंढाने लेणी

kondhane 1.jpgkondhane 2.jpgkondhane 3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्त! धबधब्याचे फोटो भारीच आहेत Happy

येथील ग्रामस्थाना घरगुती सामान आणायचे झाले तरी २ तास पूर्ण डोंगर उतरुन कोंढाणेला जावुन बाजारहाट करुन परत चढावे लागते. >>> या अश्या लोकांचे फार कौतुक वाटते. आणि एक कुठे आपण, आईने खालून चहापावडर आणायला सांगितली तरी कुरबूर..

छान.

बारा मित्रांमधून अवघे चारजण शेवटच्या वेळी ट्रेकसाठी आले होते.तरीही न डगमगता ट्रेकला जायचे याचा निर्धार होताच. >>> हे भारीच. असो मस्त झालाय ट्रेक.

मस्त फोटो आणि वर्णन

बाकी ट्रेक्स चेही वर्णन येऊ द्या

छत्रपतींची गारद आसमंतात दुमदुमुन गेली

हा शब्द पहिल्यांदा वाचला