भरवश्याचा किनार्याहून सागर

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 November, 2016 - 10:55

उसाचे कांडके पडते अगोदर
रसाचा स्वाद मिळतो त्याचनंतर

किनार्यावर नको टाकूस नांगर
भरवश्याचा किनार्याहून सागर

भडकली आग विरहाची विझवते
लपेटुन आठवांची घट्ट चादर

प्रवाहाला वळवणे शक्य आहे
स्वतःला ठाम कर अपुल्या मतांवर

नकोश्या भूतकाळाचे उपट तण
भविष्ये पेर तू फिरवीत नांगर

झगड़ते ताठ मानेने जगाशी
वरमते मी स्वतःला भेटल्यावर

युगांपासून आहे शोध जारी
युगांपासून नाही लाभले घर

मिठी मारायची म्हणते नभाला
धरेला समजवा...भलती अगोचर !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users