पुनरागमनाय च

Submitted by ऋतुराज. on 28 November, 2016 - 12:11

पुनरागमनाय च !

हिवाळा सुरु झाला की निसर्गप्रेमींना, मुख्यत्वे पक्षीप्रेमींना वेध लागतात ते स्थलांतरित पक्ष्यांचे. आणि यात पहिला नंबर लागतो तो फ्लेमिंगो, रोहित अर्थात अग्निपंखाचा. पुस्तकातून, प्रसारमाध्यमातून , प्रकाशचित्रांतून तशी ह्याची तोंडओळख जवळ जवळ सगळ्यांना आहेच. परंतु ते अप्रतिम सौंदर्य 'याचि देही याचि डोळा' अनुभवने काही औरच.

तर अश्या या फ्लेमिंगो दर्शनाची एक सफर .......

उत्साही मित्रमंडळाकडून ह्या वर्षी हे पाहुणे पक्षी पाहायचं अस ठरलं. कुठे ? तर ठाण्याच्या खाडीत. कसं जायचं ? भांडुप उदंचन केंद्रातून (मराठीत भांडुप पंपिंग स्टेशन). इथनं बोटीने खाडीत जाता येते. इथल्या नावाड्याने मोठी नामी युक्ती शोधलीये. त्याने आधीच एक व्हाट्स ऍप गट करून, त्यात ह्या पक्ष्यांचे सुंदर सुंदर फोटो टाकून पक्षीप्रेमींना भुलवायचं काम चोख केलयं. आम्ही त्याला भुललोही (मेकिंग इंडिया - डिजिटल इंडिया, या मोहिमेचा अचूक फायदा घेत नावाड्याने नाव काढलं). दिवस, वार, वेळ, ठिकाण ठरलं. मग, "आम्ही बिघडलो , तुम्हीही बिघडाना", या उक्ती प्रमाणे समानधर्मीय (लाईक माइंडेड) मित्रांना विचारणा झाली. त्यानंतर कुणी, कधी, कुणाबरोबर, कसं , कुठे यायचं याचे पत्ते यथासांगपणे फिसून झाले.

जायचा दिवस उजाडला. नोव्हेंबरमासे रविवासरे पंच पंच उष्:काले उठून ठाण्याला निघालो. तिथून मित्रांबरोबर भांडुप पंपिंग स्टेशनला. इथे या ऋतूत सकाळपासून अनेक फोटोग्राफर्सची वर्दळ असते. शनिवार - रविवारी अधिकच. अन माझ्यासारख्या नुसत्या बघ्यांची त्याहून अधिक. इथे चालता चालता देखील बरेच पक्षी दिसतात. अर्थात त्यासाठी दिव्य द्विजदृष्टी देखील असावी लागते. आम्ही अगदीच वेळेत पोहोचल्याने लागेचच बोटीत शिरलो (फ्लेमिंगोचे जवळून दर्शन हे भरती - ओहोटीच्या वेळेवर अवलंबून असते, परंतु आमच्या नावाड्याने पंचांग आधीच पाहून ठेवल्याने आमची ऐन वेळी काही पंचाईत झाली नाही). बोट चालू झाली आणि आमचा भांडुप कडून ऐरोलीच्या दिशेने खाडीत प्रवास चालू झाला. दोन्ही बाजूच्या दाट कांदळवनातून मार्ग काढत व निरनिराळे पाणपक्षी पाहत आमची बोट पुढे सरकत होती .एव्हाना मोठे बगळे (Great Egret), तुतारी (Common Sandpiper), राखी बगळे (Grey Heron), ढोकरी (Pond Heron), काळ्या डोक्याचा शराटी (Black-headed Ibis),चमचा (Spoonbill), काळ्या शेपटीचा पाणटिवळा (Black-tailed Godwit), पाणकोंबडी (Waterhen ),उचाटया (Pied Avocet), टीळवा (Redshank), पाणकावळे (Cormorant ) ..... असे अनेक पक्षी दिसू लागले. पक्ष्यांच्या पंखाच्या फडफडाटात कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट मिसळत होता. पक्ष्यांच्या अनेक मुद्रांचे फोटो टिपत मंडळी आपलं कौशल्य पणाला लावत होती. आमच्यासारखे काही मात्र दुर्बिणीतूनच हे 'शकुन्त'लावण्य पाहत होते. मधेच एखाद्या पक्षाची ओळख पुस्तकातून शिक्कामोर्तब केली जात होती.

आता लांबवर आम्हाला एक पक्षांच्या मोठ्ठाच्या मोठ्ठा थवा दिसू लागला. लांबून काहीच कळात न्हवते. पण जशी जशी बोट थव्याजवळ जाऊ लागली तसे तसे लोकांचे डोळे विस्फारू लागले. हो.... अगदी बरोबर.....तेच ते फ्लेमिंगो, अग्निपंख. अक्षरश: शेकडोंच्या संख्येत तो गुलाबी थवा डोलू लागला. जसजस जवळ जाऊ तसतसं विस्फारलेल्या डोळ्यांबरोबर विस्फारलेल्या तोंडातूनही वाहवाह येऊ लागली. आमचं घोडं खाडीत न्हालं.

आता त्यांच्या जितक्या म्हणून मुद्रा टिपता येतील तितक्या टिपण्याच काम चालू होत. त्या पक्षाचं लावण्या तरी काय वर्णाव, शिडशिडीत, कमनीय बांधा, लांबलचक भगवे-गुलाबी पाय, पिसांचा मनोहर गुलाबी व काळसर रंग, बाकदार मान आणि लालचुटुक चोच. प्रत्येक फ्लेमिंगो वेगळा, त्याच्या पिसामधील गुलाबी रंगाची छटा वेगळी. काहींचे पंख खरंच त्यांचं नाव सार्थ करीत होते. भारतात येणाऱ्या फ्लेमिंगोचे दोन प्रकार असतात, ग्रेटर व लेसर. त्यांच्या उंचीत, पंखात, चोचीत थोडा फरक असतो. थोड्याफार निरीक्षणातून तो कळतो. ह्या थव्यात दोन्ही प्रकारचे फ्लेमिंगो होते. बोटीतील प्रत्येकजण समोरच चित्र डोळ्यात व कॅमेऱ्यात जमेल तसे साठवत होते. एखाद दुसऱ्या कैकर (Osprey) व भोवत्याने (Harrier) देखील दर्शन दिलं.

अचानक आम्हाला दूरवर आणखी मोठ्ठं गुलाबी वादळ दिसू लागल. आणि बोटीने मोर्चा तिकडे वळवला. आता ते गुलाबी वादळ पाण्यावर तरंगू लागलं. बोट जवळ जाताच क्लिकक्लिकाट वाढला. आता थव्यातल्या गडद गुलाबी रंगांच्या, वेगळीच पोझ देणाऱ्या, पाण्यावर तुरुतुरु धावणाऱ्या (हो. हो, खरंच.. . हे उडण्या आधी काही सेकंद पाण्यावर धावतात), चोचीने पिसे खाजवणाऱ्या, मान मुरडणाऱ्या..... अश्या अनेकांचे पर्सनल फोटोशूट व निरीक्षण चालू झाले. त्यांच्या उडतानाच्या अनेक पोझ तर अप्रतिम. लांबलचक पाय व तेवढीच लांबलचक मान एका सरळ रेषेत ताठ ठेऊन अगदी आखीव रेखीव पद्धतीने पंख फडफडवत (फ्लयिंग स्टिक ) उडण्याचे कौशल्य हे कसे आत्मसात करत असतील असा विचार मनात आला. त्या विहंगांचे उडतानाचे दृश्य आणखीनच विहंगमय दिसत होते.

आता काही वेळाने बोटीने यू टूर्न घेऊन परतीचा मार्ग धरला होता. फ्लेमिंगो फोटोशूट व निरीक्षण चालूच होते. आता काही भुवई बदक (Garganey), थापट्या बदक (Northern Shoveller) यांचे थवेही दिसू लागले. थापट्या बदकांचे उडतानाचे पंखांतील चमकदार रंग सूर्यप्रकाशात अधिकच तेजाळू लागले. नदी सुरय (River Tern), काळ्या डोक्याचे कुरव ( Black-headed Gull),वारकरी (Common Coot ) यांचेही यथासांग व यथेच्छ फोटोशॉट झाले. परत फिरताना फ्लेमिंगोचे ते गुलाबी थवे प्रत्येकजण मनात साठून ठेवत होते.
बोटीतून उतरताना प्रत्येकाने हा अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल नावाड्याचे तोंडभरून कौतुक केले व त्याची दक्षिणादेखील दिली. त्यानेसुद्धा कृतज्ञतेने, " साहेब , तुम्ही खूष तर आम्ही खूष " अशी पोचपावती दिली.

असा हा एक नितांतसुंदर व अविस्मरणीय असा अनुभव घेऊन प्रत्येकजण तृप्त झाला होता.खरं तर फार अपेक्षा ठेऊन गेलो न्हवतो परंतु समर्थांनी म्हटल्याप्रमाणे 'चुकोनि उदंड आढळते' याचा प्रत्यय आला अग्निपंखाने खरंच सगळ्यांनाच पुन्हा त्याच्या दर्शनाची आस लावली होती. आणि जणू तो सर्वांना म्हणाला होता पुनरागमनाय च.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच...
माझा एक ठाण्याचा पक्षीप्रेमी, पर्यावरण रक्षक मित्र जातो इथे. त्यांचे फोटो पाहिले होते.

छान अनुभव

नावाड्याचा नंबर शेअर करता आला तर माझ्यासारख्या इतर निसर्ग प्रेमींना सुद्धा ह्या संधीचा यंदाच्या वर्षी लाभ मिळेल.

छान अनुभव. इथे जायचे जायचे म्हणत आमचे राहुन गेलेय, बघु कधी जमतेय.

सी वुड्स खाडीवरही हे पक्षी येतात पण रोज येतील याची खात्री देता येत नाही. वाशीला भरती आली की इथे येतात आणि झोपायला परत वाशीला. दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी इथे गेलोय. पाण्यात जेवण करणारे राखी रंगांचे फ्लेमिंगो, त्यांची पिल्ले, गुलाबी फ्लेमिंगो पाहिलेत. एका वेळेस शेकडो एकत्र.. एका संध्याकाळी गेलो तर फ्लेमिंगो वाशीला परत निघालेले. उडताना आधी पाण्यावरुन धावत अचानक हवेत झेपावणारे फ्लेमिंगो सुंदर दिसत होते. डोक्यावरुन जाताना पंखांचा आवाज सिल्क साडीच्या सळसळीची आठवण करुन देत होता.

इतके सुण्दर पक्षी ओरडतात तेव्हा पादण्यासारखा आवाज येतो Happy

(तिथे एका चहावाल्याची टपरी होती, त्याला फोन करुन विचारायचो आणि फ्लेमिंगो असतील तर लगेच जायचो. नंतर एनेमेम्सीने ती टपरी उडवली, लॉकडाऊननंतर गेलोच नाही. आता मुंबैत गेलो की फेरी मारायला हवी)

सर्वांना धन्यवाद, सर्वांचे आभार.
अni, आता भांडुप पम्पिंग स्टेशनला, या भागात जाण्यासाठी कडक नियम केले आहेत. माणशी ५० का १०० रुपये फी आहे. पार्किंग आणि कॅमेऱ्याची वेगळी. तसेच बोटिंग पण बंद आहे बहुधा या भागातून. तरीही बरेच पक्षीनिरीक्षक, फोटोग्राफर्स असतात येथे. हिवाळ्यात जाणे इष्ट. फ्लेमिंगो साठी आता ऐरोलीच्या बाजूने बोटी जातात. तिथे माणशी ५०० रुपये घेतात बहुधा. पण त्यापेक्षा नवी मुंबईतील पाम बीच रोड, टी एस चाणक्य या भागात जास्त व्यवस्थित फ्लॅमिंगो पाहता येतात. नोव्हेंबर डिसेम्बर महिन्यात जाणे योग्य.

Flamingo 1.jpg
.
Flamingo 2.jpg
.
Flamingo 3.jpg
.
Flamingo 5.jpg
.
Flamingo 4.jpg
.
Flamingo 6.jpg

त्यावेळी फोटो टाकले होते पण आता मलाही दिसत नाहीत.
आता शोधले आणि टाकले.
फोटो आभार: संदीप रानडे आणि अभिजीत भिडे.

जबरी

अरे मस्त च आहेत फोटो... बघूनच जावेसे वाटले त्या बोटीत. लिहिले सुद्धा छान आहे.
असा गटग होणार असेल तर मला सुद्धा पकडा त्यात

सी वुड्सचे.

IMG_9907.png

एनाराय कॉलनी फोटोत आहे, खाली पांढरा पट्टा आहे ते पक्षी..

IMG_9908.jpeg

अजुन एक

IMG_9907_0.png

२०१५ चे फोटो आहेत. जानेवारीत पिल्ले जास्त असतात, पंख लाल होत नाहीत.

शीर्षकावरून गणेशोत्सवाबद्दल लेख वाटला होता. हा निसर्गोत्सव नयनरम्य आहे, फोटो तर वरचा क्लास !

फक्त खाडीचा तिव्र वास सहन न झाल्याने हुकलेय हे दोनदा.

खाडीचा तिव्र वास सहन करत फ्लेमिंगो सफारी करण्यासाठी उपाय

फक्त त्यानंतर ते फोटो शूटिंग दरम्यान दोन दोन DSLR एकत्र वापरत आहेत असे वाटेल Light 1

छान लेख. वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
माझा भांडुप खाडीवरचाच एक लेख लिहू लिहू म्हणून बाकी आहे.
त्यातला हा एक फोटो..

भांडुप खाडीतील मासेमारी..
मागे फ्लेमिंगोज..


Pages