फ्री...? : भाग ५

Submitted by पायस on 22 November, 2016 - 16:39

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60640

खुराडे!! धोंडूच्या मते ती छोटीशी केबिन म्हणजे त्याच्यासाठी साहेबाने बांधलेले खुराडे होते. रात्रभर तिथे अंडी उबवत बसून राहायचे. त्याचे मूळ नाव कृष्णा. कृष्णाष्टमीला जन्मला म्हणून त्याच्या आत्येने मोठ्या हौसेने त्याचे नाव कृष्णा ठेवले होते. नंतर कळले कि ही आत्या वडलांपेक्षा जवळ जवळ पंधरा वर्षांनी मोठी होती आणि क्षयाने अंथरूणाला खिळून होती. त्याने कळत्या वयात तिला कधीच पाहिले नाही. शाळेत घातल्यावर तो कसाबसा लिहायला वाचायला शिकला. एकंदरीत डोक्यात नावाप्रमाणेच फक्त मोठा धोंडा! धोंडूची ही पार्श्वभूमि बघता त्याला ऑपरेटरची नोकरी मिळणे ही देखील आश्चर्याची गोष्ट होती. त्याचे काम फार सोपे होते. ठराविक वेळेला ट्रेन येत राहतील. आधी येणारी ट्रेन पॅसेंजर असेल, ती म्हैसूरच्या दिशेने गेली पाहिजे तर आधी येणारी ट्रेन मालगाडी असेल. तिने ट्रॅक बदलून काही अंतरावर असलेल्या कारखान्याकडे जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ती येताना दिसली कि मालगाडीला कंदील दाखवून थांबवायचे. ड्रायव्हर व इतर कर्मचार्‍यांच्या जेवणाची, आणि बर्‍याचदा पान तंबाखूची, सोय करायची. ट्रॅक बदलायचा, रूळांचे निरीक्षण करायचे. काही गडबड नाही ना, सर्व व्यवस्थित आहे ना, याची खात्री करायची. सर्व ठीक असेल तर ड्रायव्हरला हिरवा कंदील द्यायचा व जेवण उरकले कि ते लोक गाडी घेऊन आपल्या मार्गाने जायला मोकळे. मग सकाळी दुसरा ऑपरेटर येईपर्यंत तो ताणून द्यायचा. मग घरी परत येऊन उरलेली झोप व जेवण-खाण करायचे. रात्री पुन्हा सुपारी चघळत खुराड्याकडे जायचे. गेले कित्येक दिवस त्याचा हा दिनक्रम बदलला नव्हता.
रोजच्यासारखा तो खुराड्यात येऊन बसला होता. मालगाडीची वाट बघत होता. पॅसेंजर ट्रेन थोड्याच वेळापूर्वी गेली होती. जांभई देऊन त्याने सहज खिडकीबाहेर नजर टाकली. त्याला समोरच्या झाडीत काहीतरी हलल्यासारखे वाटले. त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा पाहिले. ते झुडूप वार्‍याने हलत होते. धोंडूने काही क्षण डोके खाजवले. आधी जे काही त्याला जाणवले ती वार्‍याने झालेली हालचाल नक्कीच नव्हती. एखादा ससा असेल का तिथे? धोंडूच्या तोंडाला पाणी सुटले. ससा खाऊन बरेच दिवस झाले होते. घोंगडे ओढून तो बाहेर पडला. हातात कंदिल घेऊन झुडूपाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत तो रूळाजवळ आला. ट्रेन येत नाही ना याची खात्री केली. मग मोठ्याने "कोण आहे रे तिकडे" अशी साद घातली. काही क्षण तसेच शांततेत गेले. वारा वाहत नसल्याने त्याचा आवाज येण्याची शक्यता नव्हती. तरी त्याच झुडूपातून पानांतून खसपस आवाज येत होता. आता त्याची खात्रीच पटली कि तिथे काहीतरी आहे. समजा ससा नसला तरी तिथे काय आहे याची खात्री पटणे गरजेचे होते. नरभक्षक फिरत असल्याची वदंता त्याने ऐकली होती. अशा वेळी नेहमीपेक्षा कितीतरी जास्त सावधगिरी बाळगणे गरजेचे होते. इतर वेळी कदाचित त्याने गपचूप केबिनमध्ये स्वतःला कोंडून घेतले असते पण सशाचा मोह त्याला बाहेर घेऊन आला होता. आता त्याच्याकडे पुढे होऊन त्या झुडूपाची पाने बाजूला करून त्या मागच्या अंधारात जे काही लपले होते त्याचा शोध घेणे भाग होते. काळजीपूर्वक एक एक पाऊल टाकत त्याने रूळ ओलांडले. झुडूप आता त्याच्यापासून जेमतेम पंधरा पावलांवर असेल. त्याने आवंढ्याबरोबर तोंडातली लाळ गिळली. मागे वळून पाहिले तर धुरकट प्रकाशात त्याची केबिन आणि चांदण्यात चमकणारे स्टीलचे रूळ सोडून काही दिसत नव्हते. पुढे पाहिले तर आता झुडूप शांत झाले होते. ससा पळाला कि काय? तेवढ्यात त्या झुडूपातून एक दगड आला व तो धोंडूच्या कपाळावर बसला. कळवळून तो जमिनीवर कोसळला. हातातून कंदिल पडून फुटल्याने आजूबाजूचा अंधार अधिकच गडद झाला. त्याने जखम गच्च दाबून धरली व कसेबसे उठण्याचा प्रयत्न केला. अंधाराला त्याची नजर सरावण्याच्या आत मागून "धप्प" असा आवाज झाला आणि धोंडू बेशुद्ध झाला. सलीलने हातातली वाळूची पिशवी खाली टाकली.
"आहे?" झुडूपामागून आलेल्या सलीलच्या साथीदाराने घाबरतच विचारले.
"थोडक्यात वाचला. आपलं कंदिलावर नेम धरायचं ठरलं होतं. तू त्याच्या कपाळावर का दगड मारला? वाळूच्या पिशवीच्या फटक्याने याची दगावण्याची शक्यता कमी म्हणून तर आपण ही योजना आखली ना?"
तो थोडा वेळ काहीच बोलला नाही. दोघांचे डोळे आता अंधाराला सरावले होते. सलीलने सुस्कारा सोडला व केबिन ताब्यात घेण्यास सांगितले. त्याने लपवून ठेवलेला कंदिल पुन्हा लावला. धोंडूच्या कंदिलाचा पार चक्काचूर झाला होता. त्याचे मोठे मोठे तुकडे गोळा करून त्याने झाडीत फेकून दिले तर उरलेला कंदिल जणू धुळीत नाहीसा झाला. धोंडूला दोरखंडाने व्यवस्थित बांधून त्याच्या तोंडात एक रुमालाचा बोळा कोंबला. त्याला केबिनमध्ये सोडले कि दुसर्‍या दिवशीच त्याची सुटका होणार होती. सलीलने कंदिल उंचावत पुन्हा एकदा ते जिथे लपले होते तिथे पाहिले. त्या झुडूपावर त्याची व बाजूला असलेल्या झाडांची सावली पडून ते काळेठिक्कर पडले होते. त्या झाडाला बिलगलेल्या वेलींनी जणू त्या काळ्या गोलावरून एक कमान निर्माण केली होती. त्या वेलीच्या पानांच्या टोकदारपणाने जणू केस उभे राहिले आहेत असा भास होत होता. सलील मनाशीच म्हणाला, अर्थात तुझा नेम चुकला. त्या काळ्या डोळ्यात कैद झाल्यानंतर असेच होणार.

~*~*~*~*~

चतुश्रुंगीच्या टेकडीच्या पायथ्याशी ते सर्व अर्धवर्तुळ करून उभे होते. ख्रिसला अ‍ॅलिस्टरकडे योजना आखण्याची जबाबदारी देण्याची कल्पना मुळीच पसंत नव्हती. पण त्याच्याकडे फक्त सदाशिव हा पर्यायी मनुष्य होता. सदाशिवला त्या जागेचा भूगोल माहित असल्याने त्यानेच योजना आखण्यात पुढाकार घ्यावा असे ख्रिसचे प्रामाणिक मत होते परंतु सदा ब्रिटिश नव्हता. अ‍ॅलिस्टरचा सदावर कितीही विश्वास असला आणि योजनेत त्याने सदाला कितीही सहभागी करून घेतले तरी तो सदाने घेतलेले सर्व निर्णय ऐकणे शक्य नव्हते. जोसेफचा टोला यावेळी ख्रिसला ऐकून घेणे भाग होते. "जर लंडनकर स्कॉटिश जनरलचे म्हणणे ऐकायला नाखुष असतात तर त्यामानाने अ‍ॅलिस्टर बराच बरा म्हणावा लागेल."
अ‍ॅलिस्टरने एकदा घसा खाकरला व तो स्पष्ट आवाजात बोलू लागला. "आपण सर्वजण मिळून आठजण आहोत. याशिवाय वस्तीत अनेक पोलिस फिरत आहेत. जंगलात बंडखोरांना बाहेरून मदत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. आत जंगलात फणींद्र व्यतिरिक्त सलील असेल. फार फार तर आणखी एक वा दोन जण असू शकतात. त्यापैकी फक्त फणींद्र आपल्याला जिवंत हवा आहे. आपण दोन दोन च्या गटात जंगलात घुसणार आहोत. बंडखोरांकडे मुश्किलीने एखादे पिस्तूल निघाले तर तेवढेच शस्त्र असेल. एनी क्वेश्चन्स?" ख्रिसचा जे काही ऐकले त्यावर विश्वास बसत नव्हता. एवढ्या साध्या सूचनांमध्ये काम होत असतं तर आज त्याला अ‍ॅलेक्सी व जोसेफ सोबत इथपर्यंत यायची गरज पडली नसती. त्याचा वासलेला आ मिटणार इतक्यात जोसेफने संधी साधली - सोशल एरर मिस्टर पॅक्स्टन! अ‍ॅलेक्सीने त्याच्याकडे बघून सूचक हास्य केले. जोसेफने मग सूत्रे हातात घेतली.
"मे आय सजेस्ट समथिंग मिस्टर लिटन?"
"आय से गो फॉर इट मिस्टर पॅक्स्टन."
"हे जे गट आहेत मी म्हणेन कि जर अ‍ॅलेक्सी आणि ख्रिस एका गटात राहिले तर आणि दुसरं ..."
"ओह ऑफ कोर्स. माझंही हेच म्हणणं आहे. मी तर म्हणतो कि ..." यावेळी ख्रिस, जोसेफ व अ‍ॅलेक्सी या तिघांच्या चेहर्‍यावर सोशल एरर लूक बघून सदालाही हसू आवरले नाही. अ‍ॅलिस्टरच्या एका जळजळीत कटाक्षाने तो गप्प बसला.
"दुसरं म्हणजे सदाला तुम्ही माझ्यासोबत द्या."
"का? आय मीन सदाला मी माझ्यासोबत ठेवण्याच्या विचारात होतो. आम्हा दोघांना एकमेकांसोबत काम करण्याचा बराच अनुभव आहे आणि मला थोडी मराठी पण समजते. त्यामुळे एकंदरीतच आम्ही दोघं अधिक चांगल्या प्रकारे शोध घेऊ शकू."
"मिस्टर लिटन, तुम्ही जसे सदाला ओळखता तसे या इतर तिघा सार्जंटना सुद्धा ओळखता. पण मी मात्र फक्त सदालाच ओळखतो. तुम्हाला नाही वाटत कि अशा वेळी मी ओळखत असलेल्या माणसाला बरोबर घेऊन जाणे जास्त योग्य आहे?"
अ‍ॅलिस्टरला याचा प्रतिवाद करणे शक्य नव्हते. प्रत्येक क्षण मोलाचा असताना फार वेळ घालवणे परवडण्याजोगे नव्हते. त्याने तोंड वाकडे करत का होईना पण जोसेफचे म्हणणे मान्य केले. त्याच्या मर्जीतल्या एका सार्जंटला घेऊन तो अंधारात दिसेनासा झाला. इतर दोन सार्जंटची जोडी सुद्धा दुसर्‍या एका पायवाटेने जंगलात घुसली. जोसेफने अ‍ॅलिस्टरला दाखवण्यापुरती वेगळी दिशा धरली पण लवकरच तो सदाच्या मदतीने ख्रिस व अ‍ॅलेक्सीला येऊन मिळाला. सदाने मग तोंड उघडले,
"सर या जंगलात राहायचं असेल तर त्याला पाणवठ्यापासून फार लांब राहून चालणार नाही. इथून थोड्या अंतरावर एक मोठे तळे आहे पण तो तिथे राहिला तर नाही म्हटलं तरी जंगलात भटकणार्‍या कातकरींना तो दिसू शकतो. पुन्हा तिथे अधिक प्रमाणात प्राणी येणार जे शक्य झाल्यास तो टाळेल. नदीजवळही तो राहणार नाही. अशावेळी त्याच्यापुढे एकच मार्ग उरतो. जवळ एक टेकडी आहे. टेकडीवरही एक बर्‍यापैकी आकारचे तळे आहे. पण त्या टेकडीच्या दुसर्‍या अंगाला छोटी तळी आहेत. तिथे फारसे कोणी फिरकणार नाही. अ‍ॅलिस्टर साहेबांनी तिथे माणसे पाठवण्यास नकार दिला कारण तिथेच वाघ फिरताना पाहिल्याची बातमी होती. पण ती जागा त्याला दुसर्‍या एका कारणाने सोयीची आहे. तिथून थोड्या अंतरावर एके ठिकाणी मालगाडी काही वेळ थांबते. तिथे तो बिनधोकपणे मालगाडीत चढू शकतो. आपण तिथे त्याचा शोध घेतला पाहिजे."

~*~*~*~*~

ओल्गा व उमा दोघीही हसत हसत आपल्या तंबूकडे जात होत्या. उमाने प्रथमच ओल्गाच्या नादाने घेतली होती. तिने व ओल्गाने त्या नादात एका नव्या खेळाची कल्पना मांडली होती. मलिकाने हसत हसत ती कल्पना उचलूनही धरली होती. त्या दोघीही अजून मलिकाने गायलेल्या गाण्यात मश्गूल होत्या,
बघ वर तो चंद्र, काऽपसाचा ढग
ऐक माझे म्हणणे गं
किती सुंदर हे जग, किती सुंदर हे जग |
या धुरकट रेषेत ही आगीची धग
लिहिते कोणासाठी गं
किती सुंदर हे जग, किती सुंदर हे जग |
या सर्कशीत येती, लोऽक अगणित
बघण्या आम्हास, इंद्रधनुषी तंबूत
होई टाळ्यांचा कडकडाट गं
किती सुंदर हे जग, होय! सुंदर हे जग |
बघ वर तो चंद्र, काऽपसाचा ढग
ऐक माझे म्हणणे गं
किती सुंदर हे जग, किती सुंदर हे जग
खरंच सुंदर हे जग, बघ .. किती सुंदर हे जग ||

........
........

"बघ ...." उमा भानावर आली. ओल्गा तिला गदागदा हलवून काही सांगत होती.
"उमा तिकडे बघ. रुद्रचा तंबू. काहीतरी गफलत आहे. ऐकलं का मी काय म्हणलं? रुद्रच्या तंबूकडे बघ."
उमाने डोळे चोळत त्या दिशेने पाहिले. तिला खरे तर खूप झोपही येत होती पण रुद्रचे नाव ऐकल्यावर तिची उत्सुकता काहीशी चाळवली. रुद्रचा तंबू म्हणजे केवळ नावापुरता तंबू होता. अनेकदा तो संग्रामबरोबर बाहेरच असे. क्वचित कधी थंडी जास्त असेल किंवा पाऊस पडत असेल तरच तो आत झोपे. अन्यथा वारा खात ते दोघे आळसावत. पण आज या दोन्हीपैकी कोणतीच परिस्थिती नव्हती. थोडा गारवा जरी असला तरी रुद्र आत झोपेल इतकी थंडी नव्हती. ओल्गा आणि उमा दोघी हळूच आत डोकावल्या. तंबूत कोणीही नव्हते.
"आता काय करूयात?" ओल्गाच्या या प्रश्नाचं उमा काय कप्पाळ उत्तर देणार होती. मनोमन तिला रुद्रचा शोध घ्यावा असे वाटत होते पण मलिकाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळत होता. अखेर तिने हे मलिकाच्या कानावर घालण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात त्या दोघी मलिकासमोर उभ्या होत्या. भद्रही तिथेच होता. हे ऐकताच त्याने जंगलात वाघ भटकत असल्याची आठवण मलिकाला करून दिली. हे ऐकताच उमाच्या अंगावर काटा आला. मलिकाने एक दीर्घ श्वास घेतला व तिने जवळच असलेली एक शाल लपेटली.
"भद्रा, मी रुद्रला परत आणते. तू इतर सर्वांना गोळा कर आणि निघण्याची तयारी कर. मला काही आजची रात्र ठीक दिसत नाही. हवं तर या दोघींना मदतीला घे."
"आणि ते काम?"
मलिकाच्या कपाळाला आठ्या पडल्या. तिने उमाकडे बघितले. "तुला सुरेफेक जमते ना? तू माझ्याबरोबर ये. ओल्गा तू भद्रासोबत जा. तो जे काही करायला सांगेल ते कोणतेही प्रश्न न विचारता कर. भद्रा ते काम लवकर आटोपून तू रेल्वेच्या रूळांपासून अदमासे एक कोस अंतरावर थांब. हा सगळा जथा आवरणे तुला कठीण जाऊ नये. गरज भासली तर नागराजला उठव. मीरने सामानाची आवराआवर करायला घेतलीच होती त्यामुळे तुला फक्त तंबू गुंडाळायचे आहेत."
उमाला मलिका मागोमाग चालताना, नव्हे धावताना, राहून राहून प्रश्न पडत होता. असं रुद्र काय करायला गेला आहे ज्यामुळे त्यांनी एवढी धावपळ करावी लागते आहे? तसेच भद्रदादा ओल्गाला घेऊन सर्कशीपासून काहीसा लांब का आणि कुठे गेला?

~*~*~*~*~

आठपैकी ते दोन सार्जंट दक्षिणेच्या दिशेने चालू लागले. अ‍ॅलिस्टर सोबत एका सार्जंटला घेऊन ईशान्येच्या दिशेने गेला. शंभर-दीडशे पावले चालले असतील तोवर त्यांना समोरून कोणाची तरी चाहूल लागली. त्यांनी लगेच आपापल्या संगिनी सावरल्या. समोरून कोणी घोडेस्वार येत होता. घोडा? उंचीला साडेचार फूट असावा. तट्टूच ते! जरा जास्तच तगडे दिसत आहे. जवळ आल्यावर तो घोडा नसून वेगळेच जनावर आहे हे स्पष्ट झाले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. एकाने खणखणीत आवाजात विचारले,
"हू आर यू? स्टॅंड व्हेअर यू आर. एल्स वी वुड हॅव नो ऑप्शन बट टू शूट यू. धिस इज द लास्ट वॉर्निंग!"
रुद्रने एक जांभई दिली. संग्रामच्या मानेजवळ त्याने हलकेच थोपटले. संग्रामला त्याचा अर्थ लक्षात आला आणि त्याने गर्भगळित करणारी अशी गर्जना केली. त्या आवाजाने दोन्ही सार्जंटांचे घोडे बिथरले व घोड्यांना सावरण्याच्या नादात त्यांचे लक्ष विचलित झाले. तेवढा अवधी रुद्रला पुरेसा होता. सिंह बहुतांशी वेळा ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावतात. पण क्वचित थोड्या अंतरावर असलेल्या सावजावर झडप घालताना काही सेकंदांपुरता त्यांचा वेग ऐंशी किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. त्यामानाने घोडा वेगवान प्राणी मानला जात असला तरी त्याचे खरे कारण घोड्याची तो वेग टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. घोडा सुद्धा ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावतो पण तो या वेगाने तासन् तास धावू शकतो. सिंह इतका वेळ धावू शकत नाही. पण घोड्याचा महत्तम वेग ताशी सत्तर किलोमीटर पेक्षा जास्त नसतो. एवढ्या छोट्या अंतरावर हा फरक खूप महत्त्वाचा ठरला. संग्रामच्या जबड्यात घोड्याच्या मानेचा एक मोठा तुकडा होता. रुद्रने शेवटच्या क्षणी उडी मारून संगिनीला चवड्याने रेटा दिला. आधीच संतुलन गमावलेल्या त्या सार्जंटसाठी तो रेटा म्हणजे उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती. जमिनीवर कोसळला तेव्हाही त्याने संगिन घट्ट पकडून ठेवलेली होती. फक्त तिचे टोक त्याच्या गळ्यातून जाऊन त्याच्या वासलेल्या तोंडातून बाहेर आले होते. त्यातून गळणारी लाळ रक्तात मिसळून अंधकारमय रात्रीची तहान भागवत होते. संग्रामने रुद्रच्या अंगाला आपली मान घासली. रुद्रनेही खुश होऊन त्याची आयाळ कुरवाळली व दुसर्‍या सार्जंटकडे पाहिले. रुद्रने नजर दिल्यावर तो भानावर आला व त्याने चाप ओढला. चाप ओढल्यावर गोळी सुटण्यासाठी बंदूक हातात तर हवी ना! या गोंधळात त्याची संगिन केव्हाच त्याच्या हातातून पडली होती. रुद्रच्या हातात काय होते कोण जाणे पण त्याने ते शस्त्र वापरून त्याचा गळा फाडला. या उन्मादात संग्रामने पुन्हा एकदा गर्जना केली. यावेळी मात्र त्या गर्जनेला तेवढ्याच गगनभेदी डरकाळीच्या रुपाने उत्तर मिळाले. दोघेही त्या डरकाळीच्या दिशेने वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडोर्‍यात दिसेनासे झाले.

~*~*~*~*~

अ‍ॅलिस्टर बरोबर त्याचा सदाच्या खालोखाल विश्वासातला सार्जंट हिल्टन एल्ल (elle) होता. अ‍ॅलिस्टरच्या मते हिल्टन सदापेक्षा अधिक हुशार होता. जर हिल्टनला स्थानिक लोकांमध्ये अधिक मिसळता येत असते तर त्याने एव्हाना फणींद्रला शोधून काढले असते असे त्याचे ठाम मत होते. यात हिल्टन परदेशी असण्यापेक्षा त्याचा विक्षिप्तपणा अधिक कारणीभूत होता. आत्ताही हिल्टनच्या डाव्या हातात एक लांबच लांब फांदी होती आणि ती त्याने जमिनीला टेकवली होती. उजवा हात त्याने कानाशी घेतला होता. जणू तो फांदी वाटे काही ऐकत होता. अ‍ॅलिस्टरने अखेर त्याला विचारलेच,
"हिल्टन अजून किती वेळ? या फांदीतून तुला काय ऐकू येणार आहे?"
"जंगल फार विचित्र असते अ‍ॅलिस्टर. त्याची भाषा आपल्या सामान्य कानांनी ऐकू येणे शक्य नाही. त्यासाठी आपल्याला जंगलाचेच कान वापरून त्याचे म्हणणे ऐकावे लागते. जंगल स्वतःशीच सतत संवाद साधत असते. ते जणू स्वतःलाच आपल्या अवतीभोवती काय घडते आहे सांगत असते. आपल्याला फक्त तो संवाद ऐकण्याची जरुर असते."
"मग आत्ता, या क्षणी काय म्हणतंय तुझं जंगल?" अ‍ॅलिस्टरने आपला त्रागा शक्य तितका आवरत विचारले.
"जंगल म्हणतं आहे कि आत्ता, या क्षणी जंगलात दोन राजे वावरत आहेत आणि त्याला समजत नाही आहे कि यावर काय प्रतिक्रिया द्यावी. तसेच एक राजा जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे."
अ‍ॅलिस्टर पुरता गोंधळला होता. हिल्टनच्या डोक्यावर त्याचा विश्वास होता पण या कोड्यांची उत्तरे शोधण्यात त्याला अजिबात रस नव्हता. फणींद्र पळत आहे असा त्याचा अर्थ होतो का?
"अ‍ॅलिस्टर. समजा फणींद्रला या लोकांनी गाठले तर तो सहजा सहजी कैद होईल का?"
"अर्थातच नाही. पण आपल्याला या लोकांच्या आधी त्याला पकडायचे आहे. त्या शिवाय या मोहिमेचे श्रेय आपल्याला कसे मिळेल?"
"अगदी अगदी. तत्पूर्वी फणींद्रला पकडणे सोपे नसल्याने तो अर्थातच पळण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीसाठी त्याने काहीतरी योजना आधीच तयार ठेवली असणार. सदाशिवप्रमाणे मी इतके दिवस फणींद्र लपला होता ती जागा शोधू शकत नाही. पण तो जिथून पळेल ती जागा मी सांगू शकतो. उत्तरेकडे काही अंतरावर ट्रेन ट्रॅक बदलते. आता थोड्या वेळात मालगाडी तिथूनच जाते. निश्चित तो त्या मालगाडीत चढण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला फक्त त्या ट्रॅकची गस्त घालायची आहे. तसेच फणींद्रला इथे पोलिस येण्याची अपेक्षा नसणार. विदाऊट अ स्पेक ऑफ डाऊट वी विल कॅच हिम देअर!"
अ‍ॅलिस्टरचे डोळे चमकले. इथे त्याला शोध घ्यायचा नव्हता. इथे कोणताही पाठलाग नव्हता. इथे शिकार आयती चालून येणार होती. त्याला फक्त हिल्टनच्या बरोबरीने सापळा लावून बसायचे होते. दोघांनी घोड्याला टाच दिली आणि ते ट्रॅकच्या दिशेने निघाले.

~*~*~*~*~

चौघांचेही घोडे धापा टाकत होते. प्रदेश समतल नसला कि घोडा पळवणे केवळ स्वारासाठीच कष्टप्रद नसते. भलेही मावळातील घोडे अशा डोंगरी प्रदेशात पळण्याचा अनुभव राखून असले तरी नेहमीच्या सरासरी वेगात पळणे आणि बेफाम वेगात पळणे या दोहोंत बराच फरक आहे. थोड्याच वेळात त्या घोड्यांना पुन्हा रपेट करायला लागण्याची शक्यता होती. अ‍ॅलेक्सीने लगेचच त्यांचे नाल वगैरे साफ करण्याचे व त्यांच्या पायांना हलका मसाज देऊन पुन्हा ताजे तवाने करण्याचे प्रयत्न चालू केले. सदाने एक कंदिल घेऊन सावकाश एक एक पाऊल त्या गुहेच्या दिशेने उचलायला सुरुवात केली. त्याच्या मागोमाग जोसेफ व ख्रिसही पिस्तुले सावरत निघाले. गुहा पूर्णतया रिकामी होती. तिथे मानवी वास्तव्याची कोणत्याही दृश्य खुणा दिसत नव्हत्या. किमान जोसेफ व ख्रिसला तरी इथे कोणी राहत असेल असे वाटले नाही. सदाला ते काही विचारणार इतक्यात सदाने त्यांना हाताने थांबण्याचा इशारा केला. गुहा काही फार खोल नव्हती. तोंडही तसे चिंचोळेच होते. टेकडीच्या पायथ्याला बरीच जवळ होती आणि थोड्याच अंतरावर सदाने सांगितलेले छोटेसे तळे दिसत होते. टेकडीवर याहून मोठे तळे असल्याचे सदाने सांगितले होते. सदाने जमिनीवर पडलेले काहीतरी उचलून हुंगले. स्वतःशीच तो काही पुटपुटला. त्याने गुहेच्या कोपर्‍यांना रुमालाने काळजीपूर्वक स्पर्श केला, न जाणो वटवाघुळे असली तर! मग त्याने नकारार्थी मान हलविली व तो बाहेर पडला.
"सर, इथे कोणीतरी नक्की राहत होतं. जे कोण होतं त्याने आपल्या बहुतांश खुणा मिटवल्या आहेत. पण अगदी कोपर्‍यात मशालीने धरणारी काजळी मिटवणे त्याला शक्य झाले नसणार. तसेच गुहेत पुष्कळच उब होती. सहसा इथल्या गुहांमधली हवा काहीशी थंड असते. पण त्याबरोबर मला हे पण मिळाले."
त्याने ती वस्तु दाखवली. ते केस होते. हलक्या सोनेरी रंगाचे केस. ख्रिस व जोसेफने एकमेकांकडे पाहिले. पण लगेचच त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. इथे एक वाघही वावरत होता.
"सर तो वाघ नरभक्षक असल्याची वदंता आहे. वाघ कोणावर हल्ला करेल हे तर कदाचित वाघही सांगू शकणार नाही. तरीही मला फणींद्र जिवंत असण्याची शक्यता मला जास्त वाटते. वाघाकडून जर तो मेला असता तर गुहेत त्याच्या वास्तव्याच्या अनेक खुणा मागे राहिल्या असत्या. पण इथे तर कोणीतरी पद्धतशीरपणे आपल्या अस्तित्वाच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. तो निश्चितच जिवंत आहे."
"मग तो आत्ता कुठे आहे? का तो निसटला?"
"नक्की सांगता येणे कठीण आहे सर. तीन शक्यता आहेत - एक तो पुण्यातून जाऊन अनेक दिवस झाले. हे जरा अवघड आहे कारण मग सलील रोज रोज जंगलात जायचा बंद झाला असता. दोन तो अजूनही जंगलातच कुठेतरी आहे पण त्याने जागा बदलली. हे जर झाले असेल तर आपल्याला अजून पुढे जाऊन शोधाशोध करावी लागेल. त्याने हा पर्याय निवडण्याची संभावना असली तर त्याला सलील बरोबर संपर्क ठेवायला अधिक कष्ट पडतील. पुन्हा तो अजून खोल जंगलात गेला तर राहण्यालायक जागा पण कमी आहेत आणि त्याचा छोट्या पाड्यांशी व गावांशी संबंध येईल. राहता राहिला तिसरा पर्याय जो मला तरी योग्य वाटतो."
"तो आज निसटला. हीच आहे ना तिसरी शक्यता?" ख्रिस म्हणाला.
"बरोबर. किंबहुना अगदी थोड्या वेळापूर्वी तो इथून गेला असणार. आज त्याला काहीतरी बातमी मिळाली असणार. त्या बातमीसाठीच तो इथे थांबला असावा. काम झाल्यावर इथे थांबण्यात त्याच्या दृष्टीने काही अर्थ नाही."
"परफेक्ट! म्हणजे तुझ्या तर्कानुसार तो आत्ता त्या ट्रेनला पकडण्याचा प्रयत्न करेल. ख्रिस आपल्याकडे घोडे आहेत. वी कॅन स्टिल मेक इट. लेट्स गो." जोसेफला मूक अनुमोदन देत ख्रिस घोड्यांच्या दिशेने धावला. अ‍ॅलेक्सी तयारच होता.
"अ‍ॅलेक्सी आपल्याला ट्रेन गाठली पाहिजे. तो ट्रेनने पळण्याचा प्रयत्न करतो आहे. जर हे थोडं आधी माहित असतं तर ट्रेन थांबवली असती. गॉड डॅम इट त्याला आजच पळायचं होतं." जोसेफचा त्रागा चालू असताना ख्रिसने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अ‍ॅलेक्सी काहीतरी निरखून बघत होता.
"मे आय ब्रिंग धिस टू युवर अटेंशन सर" त्याने बोट दाखवले त्या जागी राखेचा अगदी छोटा ढिगारा होता. काही थोटके देखील तिथे पडली होती. ख्रिसच्या कपाळाला आठ्या पडल्या. जोसेफ अजूनही निर्विकार होता.
"ख्रिस, यात विशेष काय आहे? फणींद्रला सिगारेटचे व्यसन असेल."
"जोसेफ. फणींद्र सिगारेट ओढत नाही. तो कोणतीही नशा करत असल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. वाघाच्या उग्र वासात हा वास फणींद्रला लक्षात आला नसावा किंवा हा दुसरा माणूस फणींद्र सोबतच असावा. वी हॅव अ‍ॅन इंटरेस्टिंग गेस्ट टू नाईट!" ख्रिस त्या थोटकावरची 'एच बी' अक्षरे बघत उद्गारला.

~*~*~*~*~

फणींद्र झपाझप पावले उचलत होता. तीन ते चार कोस अंतर त्याला पायी तोडायचे होते. नाईलाज होता, कारण इथे फणींद्रसाठी पोलिसांची नजर चुकवून घोडा आणणे सलीलच्या क्षमतेच्या बाहेर होते. फणींद्रची याबाबत काही तक्रार नव्हती. उलट चालत जात असल्यामुळे वेळ पडल्यास तो झाडाझुडूपांत सहज लपू शकत होता जे घोड्यावर बसून प्रवास करताना शक्य नव्हते. त्याचा वेग रुळांच्या जवळ आल्यावर थोडा मंदावला. लांबून त्याला थांबलेली ट्रेन दिसत होती. हीच सलीलने सांगितलेली मालगाडी असणार. अचानक तो मागे वळून उलटा चालू लागला. सहसा उलटा चालताना सामान्य मनुष्य किंचित मागे झुकतो. म्हणूनच उलटे पळताना बहुतांश जण वेग वाढवण्याच्या नादात तोल जाऊन पाठीवर पडतात. फणींद्रला वेग वाढवायची गरज नव्हती आणि तो सामान्यही नव्हता. त्याची टाच तो अगदी क्षणभर टेकवत होता तर चवड्याने स्वतःला पुढे रेटून तो अगदी सहज संतुलन राखत होता. यामुळे तो ताठ मानेने त्याने काही वेळापूर्वी तुडवलेला रस्ता पाहू शकत होता. किमान जेवढा तो अंधुक चंद्रप्रकाश त्याला पाहू देत होता. फणींद्रने आवाज चढवून साद घातली
"तू जो कोण आहेस समोर ये. यानंतर मी कुठे गायब होईन हे सांगणे कठीण आहे. त्याच्या आधी मला तुला किमान एकदा पाहायचे आहे. इतके दिवस मला तुझे अस्तित्व जाणवत होते पण मी तुला कधी शोधू शकलो नाही. तुला कधी पाहू शकलो नाही. तू कोण आहेस? समोर ये. तुला सुद्धा माझ्याकडून काहीतरी हवे आहे. उगाच का तू इतके दिवस माझा पाठलाग करत आहेस. उगाच का इतके दिवस माझ्यावर पाळत ठेवून आहेस. बॉम्बेत तुलाच मला भेटायचे होते ना? तेव्हा झालं ते झालं. तो दुसरा माणूस का आला, त्यामागची कारणे मला जाणून घेण्यात रस नाही. आता आपण दोघेच आहोत इथे. आता तरी समोर ये. तू कोण आहेस?"
"फणीदा .." फणींद्रने चमकून मागे पाहिले. खांद्यावर हात ठेवणार सलील होता. त्याच्या डोळ्यात गोंधळलेले भाव होते. त्याला काही बोलण्याची संधी न देता फणींद्रने खांद्यावरील हात झिडकारला. सलील आहे म्हणून तो समोर येत नाहीये का? फणींद्रने वैतागून पुन्हा एकदा त्या जंगलाकडे पाहिले. कधीतरी समोर येशीलच ना? सलीलला हाताने पुढे चालायला सांगून तो सलीलच्या मागोमाग ट्रेनकडे चालू लागला.

.......
.......
.......

"हेर पॅपी, याला भेटण्याची ही चांगली संधी होती. तो दुसरा कोण होता तो आला नसता तर याच्याशी इथेच संवाद साधता आला असता."
"हेर डेव्हिड, तो दुसरा आला नसता तरी याच्याशी इतक्यात बोलण्यात धोका आहे. जर शक्य झाले तर मी थेट दुसर्‍या कोणाबरोबर तरी वाटाघाटी करेन पण आत्ता तरी आपल्याकडे दुसरा कोणी पर्याय उपलब्ध नाही. याला बर्थोल्टच्या मृत्युबद्दल किती माहिती आहे, याचा त्याच्याशी संबंध आहे का हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर याच्याशी व एकंदरीत भारतीयांशीच जरा जपूनच वागायला पाहिजे."
"पण हेर पॅपी आपल्याकडे डिसेंबर पर्यंतच वेळ आहे. दुसर्‍या आघाडीवर कधीही रान माजेल त्याआधी इथल्या तयार्‍या पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत सगळं काही सेट असलं पाहिजे. कैसरना, चॅन्सेलरना आपल्या या योजनेकडून खूप अपेक्षा आहेत."
"हेर डेव्हिड, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. देश, राष्ट्रे, चॅन्सेलर, कैसर हे जगात अनेक आहेत. कुठे कैसर, कुठे झार, कुठे किंग अनेक नावांनी या संकल्पना वेगवेगळ्या व्यक्तिंच्या रुपात अस्तित्वात आहेत. पण जगात 'मी' एकच आहे. या 'मी'ला कुठल्याही प्रकारे धोका पोहोचता कामा नये. म्हणून तर बॅकअप म्हणून तुझ्या 'मी' सोबत माझा 'मी' पण आहे. विर सिंड स्पिझिएल डेव्हिड. सध्या याला निसटायला मदत लागली तर आपण तिथे असलो पाहिजे. चल."

~*~*~*~*~

मलिका व उमा दोघी घोडे जेवढ्या वेगात दामटता येतील तेवढ्या वेगाने दामटत होत्या. जेवढ्या टेकड्या टाळता येतील, तेवढ्या टाळत शक्यतो सपाट प्रदेशातून, रुळांना समांतर अशी त्यांची घोडदौड चालू होती. उमाला घोडा चालवायची सवय नव्हती. त्यामुळे ती कशीतरी हिंदकळत चालली होती. तिच्या खोगीराला एक चोरखिसा होता. येलेनाने हे खोगीर खास बनवले होते. त्या खिशात काही लांब मुठीचे सुरे होते. उमाला या सर्व प्रकाराची भयंकर भीति वाटत होती. जेव्हा मीरला सूचना देण्यापुरत्या ती व मलिका गेल्या तेव्हा येलेनाकडून तिने ते खोगीर घेतले होते. येलेनाने सर्व प्रकार ऐकून फक्त उमाचा दंड हलकेच पकडला. तिच्या नजरेत काहीसे करूण भाव होते. जणू ती उमाला धीर देऊ पाहत होती. तरसांच्या भेसूर हसण्याच्या आवाजाने उमा भानावर आली. सुदैवाने मलिका शीळ घालून उमाच्या घोड्याला नियंत्रित करू शकत होती. त्या दोघी त्या आवाजाच्या दिशेने वळल्या. तिथे एका घोड्याचे व दोन इंग्रज सार्जंटांची प्रेते पडली होती. दुसरा घोडा बहुधा पळून गेला असावा. सहा-सात तरसांचा कळप त्या मेजवानीवर ताव मारत होता. एकाने त्या दोघींची चाहूल लागून त्यांच्याकडे पाहिले. तो रक्ताळलेला जबडा भयानक दिसत होता. त्याने मलिकाच्या दिशेने झेप घेतली पण तेवढ्यात ठो असा आवाज झाला आणि त्या तरसाची झेप अपुरी राहिली. मलिकाच्या हातातील गावठी बंदूकीतून धूर निघत होता. ती तरसे त्या आवाजाने जराशी पांगली. त्याचा फायदा घेत तिने लगेचच एक संगिन उचलली व पुन्हा रुळांना समांतर दोन घोडे धावू लागले. उमाला हे अनुभव नवीन होते. तिने घोड्याच्या मानेला घट्ट मिठी मारली. तिकडे मलिका स्वतःशी पुटपुटत होती, आज दोन ... ?"

~*~*~*~*~

फणींद्रने एकंदरीत व्यवस्था पाहून सलीलची पाठ थोपटली. ड्रायव्हरच्या मुसक्या बांधून त्याला इंजिन रूममध्ये ठेवले होते. त्याच्याजागी सलीलच्या विश्वासातला दुसरा एक जण ट्रेन चालवणार होता. किंबहुना ती कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही असे बघणार होता. केबिनमध्ये सलील व त्याचा दुसरा साथी काही वेळ अजून थांबणार होते. एकदा ट्रेन दृष्टीआड झाली कि मग ते माघारी फिरणार होते. फणींद्रने त्याला हवे तिथे ट्रेनमधून उडी मारायची होती. त्याला फार इजा होऊ नये यासाठी तत्पूर्वी त्याने ट्रेनचा वेग कमी करण्याची सूचना करणे अपेक्षित होते. इंग्रजांचा दूर दूर पत्ता नव्हता. कधी नव्हे ते सलीलला फणींद्रच्या डोळ्यांवरचा काळा पडदा हलल्यासारखा वाटला.
"एवढ्या लवकर क्रांती यशस्वी होईल असे वाटले नव्हते ना?"
"होय फणीदा. आता फक्त डिसेंबरची वाट बघायची. १९१२ मध्ये स्वातंत्र्याची स्वप्ने बघतच आता उर्वरित महिने जाणार आहेत."
"सलील माझी विचारसरणी किंवा काम करण्याची पद्धत तुला पटली नाही तरी चालेल पण ही योजना यशस्वी झालीच पाहिजे."
"आणि त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कलकत्त्याला पोहोचले पाहिजेत. घाई करा फणीदा."
फणींद्र ट्रेनमध्ये चढणार एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला. अ‍ॅलिस्टर व हिल्टन दोघेही तिथे येऊन पोचले होते. अ‍ॅलिस्टरच्या चेहर्‍यावर एक छ्द्मी हास्य आले. त्याने बॉम्बेच्या माजलेल्या कारट्यांच्या आधी फणींद्रला शोधून काढले होते. हिल्टनचा तर्क खरा होता. त्याच्या घोड्याने ऐटीत एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. फणींद्र डोळ्याने काही खुणावत होता. अ‍ॅलिस्टरने लगेच बंदूक उंचावली. हिल्टन फांदी जमिनीला टेकवून जंगलाचा आवाज ऐकत होता.
"जंगल म्हणत आहे कि त्या रेषेत पुढे जाण्यात धोका आहे. अ‍ॅलिस्टर बॅक ऑफ!!"
अ‍ॅलिस्टरला काही कळणार इतक्यात त्याच्या मनगटाला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्याच्या डोक्यात अनेक विचार एकत्र थैमान घालू लागले. फणींद्र तिरका का दिसत आहे? नाही फणींद्र सरळच उभा आहे, मी पडतोय. मी नाही माझा घोडा पडतोय. हे काय आहे? आणि हाताशी हे ... या दोन ठिणग्या कसल्या? वाघाचे गुंजेसारखे लाल डोळे अंधारात इतक्या जवळून बघणे हा भयानक अनुभव अ‍ॅलिस्टर घेत होता. वाघाने त्याचा पंजा उखडला होता. अ‍ॅलिस्टरने हे असह्य होऊन किंकाळी फोडली. हिल्टन हे बघत शांतपणे उभा होता.
"जंगलाचा आवाज ऐकला नाही कि असेच होते अ‍ॅलिस्टर! जंगलात फक्त आणि फक्त जंगलाचेच आवाज ऐकले पाहिजेत." ठो असा आवाज होऊन हिल्टनही घोड्यावरून खाली पडला. त्याच्या वजनाने ती फांदी तुटली. फणींद्र तुच्छतापूर्वक हसत म्हणाला "कधी कधी आजूबाजूला होणारे बिगर जंगली आवाजही ऐकले पाहिजेत." सलीलने आणलेल्या ड्रायव्हरच्या हातातील बंदूकीतून अजूनही धूर निघत होता. हिल्टनने कानापाशी धरलेला हात तसाच होता. हरणाने झुडूपांमधून सुरकांडी मारावी तशी गोळी त्यातून जाऊन कानात घुसली होती.
"फणीदा बहुतेक गोर्‍यांना सुगावा लागलेला दिसतो आहे. तुम्ही निघा."
"नो नीड टू हरी फणींद्र. यू हॅव अ लाँग जर्नी अवेटिंग फॉर यू." ख्रिस मागून येत म्हणाला.

*****

ते चौघेही सदाने तर्क लावलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचले. केबिन व मालगाडी उभी असलेली त्यांना दिसत होती. ते सर्व अजिबात आवाज न करता हळू हळू पुढे सरकू लागले. एवढ्यात सदाने त्यांचे लक्ष थोड्या दूरवर असलेल्या झुडूपाकडे वेधले. तिथे लपलेला वाघ या कोनातून स्पष्ट दिसत होता. आता? हा प्रश्न सुटण्याआधीच अ‍ॅलेक्सीने हिल्टन व अ‍ॅलिस्टरच्या जोडीला पाहिले. ख्रिसने याचा फायदा घेऊन व्यूहरचना करायचे ठरवले. तो व जोसेफ दोघेच पुढे झाले. तेही अशा रीतिने कि त्यांना वाघ दिसत राहिल व ते फणींद्रच्या मागे येऊन उभे राहतील. हे सर्व चालू असताना अ‍ॅलिस्टर व हिल्टनचा मृत्यु त्यांनी पाहिला. ख्रिसने जोसेफकडे बघितले. जोसेफने त्याला मूक संमती दिली.
"नो नीड टू हरी फणींद्र. यू हॅव अ लाँग जर्नी अवेटिंग फॉर यू."
फणींद्र ख्रिस व जोसेफला बघून चमकला. सलीलने हळूच केबिनमधल्या साथीदाराला इशारा केला. तो हातात दगड घेऊन तयार बसला. फणींद्रने स्मित करून हात वर केले. ख्रिस अजून काही बोलणार इतक्यात रिंगणात आणखी एक खेळाडू आला. रुद्र व संग्राम वाघाच्या मागे मागे तिथपर्यंत आले होते. या गोंधळाचा फायदा घेत केबिन मधून दगड भिरकावला गेला. त्या दगडाने जोसेफच्या घोड्याचा डोळा फोडला. आणखी एक दगड जोसेफच्या दिशेने आला तो त्याने अंदाजाने चुकवला व एक गोळी त्या दिशेने झाडली. केबिनच्या लाकडी भिंतीने त्याचा बचाव केला. सलीलने जमिनीवर लोळण घेत ख्रिसने झाडलेल्या दोन गोळ्या चुकवल्या व झुडपाचा आडोसा घेतला. फणींद्र मालगाडीत चढला. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत ट्रेन चालवायला सुरुवात केली. फणींद्रची व रुद्रची नजरानजर झाली. त्या धुरकट प्रकाशातही फणींद्रने बुरख्यामागे लपलेल्या रुद्रला ओळखले. रुद्रनेही फणींद्रला ओळखले. फणींद्र मोठ्याने ओरडून म्हणाला,
"तुला आधी त्याला पार करावे लागेल." फणींद्रच्या वाक्यातला अर्थ जणू वाघाने ओळखला. अ‍ॅलिस्टरवरून लक्ष हटवून तो संग्राम समोर उभा ठाकला. तसा तो वाघ बराच म्हातारा होता. आकारनेही सर्वसाधारण वाघाएवढाच होता. तरीही रुद्रच्या डोळ्यांसमोर तोच येत होता. तोच वाघ जो त्याने अनेक वर्षांपूर्वी पाहिला होता. पुन्हा एकदा तोच सामना होणार होता.

~*~*~*~*~

अ‍ॅलेक्सी व सदाशिवकडे फार गोळ्या नव्हत्या. ख्रिस व जोसेफला सलील व केबिनमधला मुलगा दोघांवरही नेम साधणे कठीण जात होते. अखेर जोसेफने ख्रिसला पुढे होण्यास खुणावले. त्याने आपल्या चांगलाच गोळीबार करून ख्रिसला पुढे जाण्याची संधी दिली. सलीलने तरीही जीवावर उदार होऊन एक गोळी झाडलीच. पण त्याचा नेम चुकला आणि बदल्यात ख्रिसने झाडलेली गोळी त्याच्या पायात घुसली. त्याच्याकडे लक्ष द्यायला जोसेफला फुरसत नव्हती. जेव्हा त्याने सलीलचा शोध घेतला तेव्हा सलीलने गोर्‍यांच्या तावडीत सापडण्यापेक्षा आत्महत्या करणे श्रेयस्कर समजल्याचे लक्षात आले.
जोसेफचे लक्ष काही क्षण विचलित झाले आणि एक दगड त्याच्या खांद्याला चाटून गेला. हा नेम धरण्यासाठी केबिनमधून त्याला हात थोडा बाहेर काढावा लागला होता. त्याचा फायदा घेत अ‍ॅलेक्सीने अनेक गोळ्या झाडल्या. आता ते फणींद्रच्या मागावर जायला मोकळे होते. अशात अनेक घटना एका पाठोपाठ घडल्या.
अ‍ॅलेक्सी जोसेफच्या मदतीला पुढे सरकला. सदा झुडूपातून बाहेर आला. तेवढ्यात त्याला एक अंधूक ठिणगी दिसली. तिथे कोणीतरी सिगारेट पीत उभे होते. आधीच ख्रिस फणींद्रच्या मागावर होता. आता इतके सारे लोक ख्रिसच्या बरोबरीने जाण डेव्हिडला परवडण्यासारखे नव्हते. त्याने सिगारेट विझवली आणि नेम धरला. सदाला लक्षात आले कि आपल्या गोळ्या संपल्या आहेत. त्याने स्वतःला जोसेफ व डेव्हिडच्या मध्ये झोकून दिले. सदाच्या पाठीत दोन गोळ्या घुसल्या. ते तिघे काही क्षण थक्क होऊन बघत राहिले. जोसेफ सर्वात आधी सावरला. त्याने अ‍ॅलेक्सीला ख्रिसच्या मदतीला जायला सांगितले. तो स्वतः डेव्हिडच्या मागे धावला.

*****

रुद्र ती लढत स्वप्नामार्फत पुन्हा पुन्हा अनुभवून एक गोष्ट शिकला होता. संग्राम तितकासा चपळ नाही. भले छोट्या झेपा तो वेगात घेऊ शकत असला तरी वाघाप्रमाणे तो वेगवेगळ्या कोनातून तितक्या भरभर वळू शकत नाही. अशी मुसुंडी मारणे इथे फार फायदेशीर नाही. इथे फायदेशीर आहे संग्रामचा ताकदीचा वापर करणे. वाघही म्हातारा असल्याने फार चपळ नव्हता. त्याने प्रथम सवयीप्रमाणे श्वासनलिका फोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला आयाळीमुळे दात रोवता आले नाहीत. रुद्राने याचा लाभ उठवत हातातला मोठा सुरा त्याच्या पाठीत खुपसला. संग्रामनेही त्याला सावरण्याची संधी न देता पंजाच्या एका फटक्यात लोळवले. रुद्र आनंदातिशयाने थरथरत होता. त्याला ट्रेनच्या आवाजाने फणींद्राची आठवण झाली. फणींद्राच्या नजरेत आणि त्या वाघाच्या नजरेत त्याला विलक्षण साम्य जाणवले होते. त्याने ख्रिसचा घोडा पुढे धावताना पाहिला. खच्च ... काय आवाज झाला हे बघायला तो मागे वळला. उमा व मलिकाने त्याला गाठले होते. वाघाने एक शेवटचा प्रयत्न करून पाहिला होता पण उमाचा नेम त्याच्या वर्मी बसला होता.
"रुद्र, इथे फार काळ थांबून चालणार नाही. जल्दी कर."
"फक्त थोडा वेळ अजून मलिका. एक तर गेला, दुसरा त्या ट्रेनवर आहे. मला तुझी बंदूक दे." मलिकाच्या हातातून रुद्रने जवळ जवळ बंदूक हिसकावून घेतली. तो व संग्राम फणींद्राच्या मागावर धावू लागले.

*****

अ‍ॅलेक्सीने शक्य तितक्या वेगाने घोडा दामटत ख्रिसला गाठले. ख्रिस फणींद्रच्या पायावर नेम धरण्याचा प्रयत्न करत होता. पण ट्रेन व घोडा दोघेही प्रचंड वेगात धावत असल्याने अचूक नेम लावणे कठीण जात होत.
"अ‍ॅलेक्सी असेच चालू राहिले तर कधी तरी हा घोडा दमेल आणि हातातोंडाशी आलेला घास जाईल. एकच मार्ग आहे."
"सर?"
"मी ट्रेनला अगदी खेटून घोडा चालवत ट्रेनवर चढणार आहे. फणींद्र मला खाली पाडायचा प्रयत्न करेल. ते टाळणे तुझे काम."
"व्हेरी वेल सर."
फणींद्रला ख्रिसचा डाव लक्षात यायला फार वेळ लागला नाही. तो ख्रिस ज्या डब्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता तिथे येऊ लागला. अ‍ॅलेक्सीच्या गोळ्यांनी त्याच्या रस्त्यात अडथळे आणायला सुरुवात केली. हा डाव आणखी एका व्यक्तिच्या लक्षात आला होता. सिंहाचा दम घोड्याइतक्या वेळ टिकू शकत नसला तरी वेळ पडल्यास तोही ताशी पन्नास किमी वेगाने धावू शकतो. रुद्र व संग्राम अ‍ॅलेक्सीच्या पुष्कळच जवळ येऊन पोहोचले. फणींद्राच्या नजरेस ती जोडगोळी पडली आणि तो स्वतःशीच हसला. त्या दिवशी फणींद्रालाही रुद्राच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. तो मोठ्याने हसला आणि रुद्राला उद्देशून म्हणाला.
"जंगलचा राजा कोण? सिंह कि वाघ? मला माहित नाही पण तिसरा कोणी नाही हे तर नक्की ना?" बेभान झालेल्या रुद्राकडून नकळत चाप ओढला गेला. ख्रिस डब्यावर चढला होता. त्याने गोळीचा आवाज ऐकून मागे पाहिले. त्याचा घोडा अजूनही धावत होता. अ‍ॅलेक्सीचा घोडाही त्याच्याच थोडा मागे धावत होता. अ‍ॅलेक्सी जवळ जवळ त्या घोड्यावर रेलला होता. त्याचे हात हवेत अधांतरी लोंबकळत होते. थोड्याच अंतरावर एक भीमकाय प्राणी व त्याचा स्वार धावत होते. तो तरूणही हबकला होता. ख्रिसने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडून आवाज फुटेना. एवढ्यात त्याला मागून फणींद्रने जोरात लाथ घातली. ख्रिसने डब्याच्या कडेला कसेतरी पकडले. मान वर करून पाहिले तर त्याला फणींद्र दिसत होता. फणींद्र छद्मी हसला.
"तुझ्या गोळ्या ना या इंग्रजापर्यंत पोचतील ना माझ्यापर्यंत. तू ज्या वाघाला हरवून खुश होत आहेस तो पदच्युत झालेला, शक्तिहीन म्हातारा राजा होता. त्यामुळे तुझ्या सिंहाला अजून बरंच काही सिद्ध करायचे आहे. आणि तू! त्या दुसर्‍या इंग्रजालाही तुझी गोळी लागली कारण तू काही क्षण स्वतःला विसरला होतास. भानावर असताना तू तुझ्या मर्यादांना भेदू शकत नाहीस. ऑफिसर लेट मी टेल यू समथिंग. तुम्ही दोघेही काही प्रमाणात समान आहात. माय जजमेंट इज रेअरली राँग ऑन धिस अस्पेक्ट. तुम्ही इतके समान का आहात हे मी सांगू शकत नाही. कदाचित तुमच्या भूतकाळात याचे उत्तर दडलेले असेल. आणि त्यामुळेच मी हेही सांगू शकतो कि आत्ता या परिस्थितीत तुम्हा दोघांच्या क्षमता लक्षात घेता तुम्हा दोघांनाही माझ्यापर्यंत पोचणे शक्य नाही. साधने तुझ्याकडे जास्त असतील पण मानसिकरित्या तो अधिक सक्षम आहे. पण एवढे प्रयत्न केलेस त्या बदल्यात मी तुला काही माहिती नक्की देईन ख्रिस! आश्चर्य वाटायचे काही कारण नाही. माझ्याकडेही माहिती काढण्याचे अनेक मार्ग आहेत. तर ख्रिस मी ऐकल्याप्रमाणे तू बर्थोल्टच्या खुनाचा तपास करत आहेस. त्याच्या खुनाविषयी माझ्याकडे काही विशेष माहिती नाही पण येस आय मेट हिम! आणि हो आम्ही काहीतरी सबंध हिंदुस्तान, नव्हे संपूर्ण जग हादरून जाईल असं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते काय आहे? वेल आय वुड से यू आर स्टिल अंडरएस्टिमेटिंग अस. ट्राय हायर!!"
फणींद्रने ख्रिसच्या बोटांवर जोरात लाथ घातली. लोंबकणारा ख्रिस घरंगळत ठेचकाळत रुळांच्या बाजूला पडला. अंधारात फणींद्र त्याच्याकडे बघून हात हलवत आहे असा त्याला भास झाला. शुद्ध हरपण्यापूर्वी त्याला मलिकाचा आवाज ऐकू आला.
"आता पुरे! पुढच्या संधीची वाट बघण्यासाठी तरी आता इथून चल"

*****

जोसेफला त्या धुरकट प्रकाशात डेव्हिडचा शोध घेणे कठीण जात होते. त्यात डेव्हिड मधून मधून त्याच्या गोळीबार करत होताच. अखेर जोसेफच्या पायात गोळी लागली आणि तो कोसळला. डेव्हिड आता समोर आला. जोसेफला त्याच्या एकंदरीत आविर्भावावरून लक्षात आले कि डेव्हिड त्याला कोणतीही संधी देऊ इच्छित नव्हता. त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण पिस्तुलातल्या गोळ्या संपल्या होत्या. डेव्हिडने नवी सिगारेट शिलगावली व हातातले पिस्तुल जोसेफवर रोखले. तेवढ्यात जोसेफने कमालीच्या चपळाईने जवळचा दगड उचलून भिरकावला व कोलांटी उडी मारून तो झुडूपात लपला. डेव्हिडची गोळी जोसेफच्या कानाला चाटून गेली तर दगडाने पॅपीच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडवल्या.
"हेर पॅपी!!!!" डेव्हिडची किंकाळी एखाद्या जख्मी गरुडाचे रुदन वाटत होते. जोसेफच्या श्वासोच्छ्वासाची लय बिघडली होती. त्याने हळूच पाहिले तर डेव्हिड सर्वस्व हरवल्यासारखा पॅपीला हाक मारत होता.
"आय वोन्ट फरगेट धिस यू इंग्लिश पिग! इच वर्दे डास निख्ट व्हर्गेसेन!"
डेव्हिड निघून गेल्यानंतरही जोसेफ बराच वेळ तसाच पडून होता. त्याला एकच चिंता भेडसावत होती. जर ख्रिसलाही त्याचे सावज पकडता आले नाही तर म्हातार्‍याला काय उत्तर द्यायचे?

~~~~~*~~~~~
~~~~~*~~~~~
~*~*~ * ~*~*~
~~~~~*~~~~~
~~~~~*~~~~~

मे १९११ बॉम्बे, ब्रिटिश इंडिया

ख्रिसने हमालाच्या हातात त्याची बक्षिसी टेकवली व तो आपल्या बोगीत स्थानापन्न झाला. जोसेफने कोटाच्या खिशातून घड्याळ काढून वेळ पाहिली. गाडी सुटायला काहीच मिनिटे बाकी होती. ख्रिसची त्याने गळाभेट घेतली. जाण्याआधी तो पुन्हा एकदा म्हणाला,
"ख्रिस माहित नाही तू जो रस्ता चोखाळत आहेस तो कितपत योग्य आहे. म्हातार्‍यासमोर तू ज्या शक्यता वर्तवल्यास त्या अगदी तर्कसंगत आहेत. जर आपल्याला या होऊ घातलेल्या घटना टाळायच्या असतील तर मला तुझी गरज आहे. अ‍ॅलेक्सीबद्दल मलाही तितकंच दु:ख झालं आहे जितकं तुला पण म्हणून आपण हा तपास थांबवू शकत नाही."
"जोसेफ मी हा तपास थांबवला नाही आहे. फक्त हा तपास मी वेगळ्या मार्गाने करून पाहणार आहे. एनीवे यू हॅव युवर वर्क कट आऊट. सध्या तरी सर हेन्रींना माझ्या बुद्धिपेक्षा तुझ्या कामाच्या उरक्याची अधिक गरज आहे. आणि मी इंडिया सोडून जात नाही आहे. आय विल बी कॉन्टॅक्टिंग यू रेग्युलरली."
जोसेफने उगाचच हसण्याचा प्रयत्न केला. त्याने आपली बोलर हॅट किंचित झुकवून ख्रिसचा निरोप घेतला. ट्रेनने स्टेशन सोडले. जेमतेम दोन मिनिटे झाली नसतील तोवर ख्रिसच्या डब्याचे दार वाजले. ख्रिसने दार उघडले तर समोर एक तरुणी उभी. तिच्या वेषावरूनच ती भारतीय असल्याचे कळत होते. तिने जवळ जवळ ख्रिसला ढकलून आत प्रवेश केला. ख्रिस काही बोलणार इतक्यात तिने त्याचे पाय धरले व तोडक्या मोडक्या इंग्रजीत ती म्हणाली
"साहेब प्लीज माझी मदत करा. तो टीसी माझ्या मागोमाग येतच असेल." ख्रिस काही बोलणार इतक्यात त्याला फणींद्रचे शब्द आठवले. त्या नादात त्याने एक निर्णय घेतला. इतक्या दिवसात त्याचे हिंदी पुष्कळच सुधारले होते.
"मी टीसीला तुझ्याबद्दल काही सांगणार नाही पण तरी तू या डब्यात कुठे लपणार?"
"त्याची चिंता तुम्ही नका करू साहेब. तुम्ही फक्त टीसीला सांभाळा. हे बघा आलाच तो."
ख्रिसने दार पुन्हा उघडले. यावेळी टीसीच होता. त्याने अदबीने ख्रिसला डबा तपासण्याची परवानगी मागितली. ती तरुणी बिन तिकिटाची फर्स्ट क्लासच्या डब्यात घुसली होती. ख्रिसने त्यांना आत घेतले. डबा पूर्ण रिकामा होता. उघड्या खिडकीतून ख्रिसने वाकून बघितले पण त्याला काही दिसले नाही. त्याने खिडकी लावून घेतली. टीसीचे समाधान झाले व तो निघून गेला. ख्रिस खिडकीपाशी येऊन बसला. खिडकीवर टकटक झाली.
"साहेब खिडकी उघडा." ख्रिसने हसून खिडकी उघडली व तिला आत घेतले. सुटकेचा निश्वास टाकून ख्रिससमोरच्या सीटवर बसली. गहूवर्णीय, लांबसडक वेण्या, कानात झुमके व धुळीने मळलेला वेश. ख्रिसला जिप्सी लोकांची आठवण झाली. तिने काही गोंदवलेले नव्हते इतकेच. ती हसली कि तिच्या गालाला गोड खळ्या पडत होत्या.
"माझं नाव रश्मी. तुमचं साहेब?"
"ख्रिस्तोफर. ख्रिस म्हणालीस तरी चालेल."
"थँक यू साहेब. साहेब मी नक्की एक ना एक दिवस तुमच्या मदतीची परतफेड करेन. बघा ना ते शेजारच्या डब्यातले आमचे लोक माझी मदत करत नव्हते. तुम्ही देवासारखे धावून आलात. तशी मी वाटते तशी मुलगी अजिबात नाही साहेब. म्हणजे तुम्हाला काय वाटलं कोणास ठाऊक पण आपलं किलिअर केलेलं बरं!"
"रश्मी!!"
"साहेब?"
"मला आत्ता एकाच मदतीची आवश्यकता आहे. तू जितकं कमी तोंड उघडशील तितकी मला जास्त मदत होईल."
रश्मीने यावर मांडी घालून हाताची घडी तोंडावर बोट पावित्रा घेतलेला बघून ख्रिसला हसूच आले. तो खिडकीतून बाहेर बघू लागला. झाडांच्या रेषा मागे पळत होत्या. सर मॅक्सवेल यावेळी लायब्ररीत बसून विचारात गर्क होते. जोसेफ बग्गीवाल्याला चलण्याचा इशारा करत होता. रुद्र जेवणाचा घास चिवडत होता. या सर्वांप्रमाणेच ख्रिसच्या डोक्यातही विचारांची मालिका अखंड सुरु होती. ख्रिसने ज्या धाग्याचा माग काढण्याचे ठरवले होते तो त्याला कुठे घेऊन जाणार होता हे त्यालाही ठाऊक नव्हते.

डिसेंबर उजाडायला आता सात महिन्यांहूनही कमी वेळ होता.

~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/61022

Group content visibility: 
Public - accessible to all site users

nice.... fanindra n rudra mdhla suspense ajunhi tsach aahe n fanindrachya planchapn.... keep it up.... pn khup late kele ha part post krayla...

after so many days, not remembering the characters.....
will have read some old parts again...

लैच जोरात मोहरा मोहरी झालीये ह्या भागात... एकदम धुमशान.. फक्त दोनच्या ऐवजी चार पार्ट्या आहेत...

आता नवीन मोहर्‍यांच्या प्रतिक्षेत...

भारीच पायस. अभ्यास चांगला जमतो आहे. तो आगगाडीचा पाठलाग वाचून शोलेच डोळ्यासमोर आला. वर्णन मस्त झाले आहे. आणि सुरवातीचा धोंडूचा पॅराग्राफ ही चांगली कादंबरी होती आहे याची खुण आहे. आता फ्री ६ ची वाट पहातो Happy

पाठलागाच वर्णन एकदम झक्कास.सगळ डोळ्यांसमोर उभ राहिल.
रुद्र साठी थोड वाईट वाटल.अ‍ॅलेक्सी ला पण लवकर एक्झीट मिळाली Sad
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

धन्यवाद Happy
दोन भाग एकत्र केलेत का >> हो. बरीच गॅप झाली ना यावेळी मग म्हटलं मोठ्ठा भाग टाकावा.
तो आगगाडीचा पाठलाग वाचून शोलेच डोळ्यासमोर आला >> माझ्या रेफरन्सेस पैकी एक! पण मेन रेफरन्स स्टील बॉल रनची शेवटची डर्टी डीड्स डन डर्ट चीप फाईट - https://en.wikipedia.org/wiki/Steel_Ball_Run
अ‍ॅलेक्सीची एक्झिट - आता काही दिवस बिचारा ख्रिस बिन पुडिंगचा राहणार!! पण आता त्याच्यासोबत 'फ्राऊ' आहे. ख्रिसच्या भूतकाळात अ‍ॅलेक्सी पुन्हा परत नक्की येईल.

रच्याकने फणींद्रच्या योजनेविषयी एक अतिशय स्ट्राँग हिंट या भागात आहे. जर अंदाज लावला असेल तर ताडून बघण्यासाठी पुढच्या भागात त्याचं उत्तर आहे.

एक्स्ट्रॉ फीचर - सिगारेट्स
शेरलॉक होम्सला पाईप ओढताना पाहायची इतकी सवय झाली आहे कि अनेक वर्षे माझी अशी समजूत होती कि त्या काळात सिगारेट आणि सिगार खूप प्रचलित नसाव्यात. प्रत्यक्षात त्या काळात सिगारेट्स चांगल्याच प्रसिद्ध होत्या.
युरोपीयांना तंबाखूची सवय अमेरिकन इंडियन्सनी लावली. अ‍ॅझटेक्स व त्यापूर्वी माया संस्कृतीत पाईप ओढणे हा धार्मिक उपचार होता. त्यांचे अनुकरण करून मग चिरूट, सिगार, सिगारिलो व पाईप अशा चार प्रकारे धूम्रपान युरोपात सुरू झाले. अठराव्या शतकात फ्रान्सेस्को गोयाच्या एका चित्रात एक माणूस सिगारेट ओढताना दाखवला आहे. तोपर्यंत बहुतांशी सिगार हे मक्याच्या रेशांपासून बनवलेल्या खास कागदात तंबाखू गुंडाळून बनवत. मायांच्या विशिष्ट डिझाईनमुळे नशा करण्यासाठी धूर छातीत ओढण्याची गरज नसे पण त्यामुळे त्या महागही असत. एकोणीसाव्या शतकाअखेरीस फ्रेंचांनी सिगारेटच्या व्यापारावर वर्चस्व मिळवले. तरी एकंदरीत श्रीमंत वर्गापुरतीच ती मर्यादित होती. क्रिमिअन युद्धात प्रथमच युरोपीयांनी तुर्की व रशियन सैनिकांना वर्तमानपत्राच्या कागदाची सिगारेट करताना पाहिले आणि तिथून ते लोण पसरले. मग आपण आज बघतो तशी फिल्टर असलेली सिगारेट मिळायला सुरुवात झाली. इतके कि सर्व प्रमुख युरोपीय सत्तांनी आपल्या सैनिकांना अन्नसामुग्रीसोबत सिगारेटचे डबे द्यायला सुरुवात केली.
डेव्हिड एच अ‍ॅन्ड बी कंपनीच्या सिगारेट ओढतो. एच अ‍ॅन्ड बी म्हणजे हाऊस अ‍ॅन्ड बर्गमन. त्या काळात फ्रेंच कंपन्या बर्‍याच फेमस होत्या पण एखादा जर्मन माणूस किमान त्या काळात फ्रेंच ब्रँडची सिगारेट ओढेल असे मला वाटत नाही. ख्रिसला एच बी ची सिगारेट पाहून असे म्हणायचे होते कि फणींद्रसोबत आज कोणी जर्मन एजंटही या जंगलात आहे.

व्वा..ड़ोळ्यासमोर उभे ठाकले.
पण परत वाचायला हवा..वाचताना दमछाक झाली.
पात्रे/पात्रांची नावे.. अभारतीय असतील तर ती लक्षात ठेवण्यासाठी काही उपाय आहे का? मला ती पात्रे नीट आठवत नाहीत..परत आधीचे भाग वाचायला लागतात. :(.
होते असे की.. अश्या कथा वाचायची इतकी उत्कठां असते की..घटना वाचल्या जातात पण नेमकी पात्रे कोण काय अस गोंधळ होतो. काही सोप्पी युक्ती आहे का?
प्रतीसाद वाचले की हे कळते...की आपल्याला परत एकदा वाचायले हवेय Happy

एक सजेशन
हेर पोपी च्या दगडाने ठिकऱ्या उडाल्या हे चूक वाटते
दगडाने डोक्याच्या जागी घायाळ होईल, वर्मी बसून मरेल, ठेचले जाईल पण ठिकऱ्या काचसमान, चिनी मातीच्या वस्तू, यांच्याच उडतील

आशुचँप - पॅपी यांत्रिक पोपट आहे, कळसूत्री आहे. ठिकऱ्या उडाल्या हा शब्दप्रयोग तितका तर्कसंगत नसेलही पण घायाळ होईल असेही म्हणता येणार नाही.