त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो..

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 20 November, 2016 - 05:00

कधी कधी, कोणा कोणाला ..

मी तोंडाने तशी फटकळच आहे. असं माझ्या मैत्रीणींना वाटते. मी मात्र स्वत:ला स्पष्टवक्ती समजते. आज बसमधून प्रवास करत होते. सोबत एक मैत्रीण होती. तिचा स्वभाव म्हणजे अगदी माझ्या ऊलट. त्यामुळे बरेचदा माझ्यावर अंकुश ठेवायचे काम तिला करावे लागते. आज मात्र मी तिलाही जुमानले नाही. कारणच तसे होते. अचानक धुराचा वास येऊन मळमळल्यासारखे झाले. तो वास मी कधीही कशीही ओळखू शकते. पाहिले तर पुढच्याच सीटवर एक धुराचे नळकांडे धूर ओकत बसले होते. चक्क बसमध्ये. बहुधा बसची वाट बघत बसस्टॉपवर सिगारेट ओढत उभा असावा. बस आली तरी संपली नसावी. शेवटचे थोटूक फेकायला जिवावर आले असावे. कसे फेकणार, शेवटी काही झाले तरी कष्टाची कमाई, धुरांत उडवत असले म्हणून काय झाले. त्यांचे अन्नच ते, आणि अन्नाला टाकून अपमान कसा करणार, म्हणून अर्धवट सिगारेट हातात तशीच ठेवून बसमध्ये चढला असावा. आता खिडकीतून धूर बाहेर सोडायचा प्रयत्न चालू होता. गपचूप गपचूप. कंडक्टरची नजर चुकवून. पण धूरच तो, त्याला कितीसे मुठीत झाकणार. मागच्या खिडकीतून थेट आमच्या नाकातोंडावर फेकला जात होता. जगात मला माश्यांचा कचरा, भिजलेले मोजे, आणि तो एक प्रयोगशाळेतील हायड्रोजन सल्फाईड वायू यांच्या वासापेक्षाही जास्त कसली चीड असेल तर ती या सिगारेटच्या धूराची. वाटलं फाडकन चढवून द्यावी एक, किंवा त्याच सिगारेटने त्याच्या गालावर एक चटका द्यावा. ईतरांना त्रास देत, सहप्रवाश्यांचा जीव धोक्यात घालत होता. आणि दुसर्‍यांचेही सोडा, स्वत:च्याही फेफड्यांची काळजी न घेणारे हे लोकं स्वत:ला सुशिक्षित समजतात. चीडच येते. त्याच तिरमिरीत मी त्याला ठणकावले,
"ऐय, फेक ती सिगारेट .."
त्याने दचकून मागे वळून पाहिले.
"फेक म्हणाले ना आधी", मी पुन्हा चिडून म्हणाले. मला त्याच्याकडून कृती अपेक्षित होते. कसलेही स्पष्टीकरण नको होते.
आता सिगारेट फेकावीच लागणार हे त्याने ओळखले आणि फेकण्याआधी अधाश्यासारखे भकाभक शक्य तितका धूर आत ओढून घेतला आणि मग खिडकीतून तशीच बाहेर टाकली. न विझवता. धूरही काही गिळणार नव्हता. यथावकाश तो देखील बाहेर सोडला, आणि त्याच खिडकीच्या मार्गाने वार्‍यासोबत पुन्हा तो आमच्या तोंडावर आदळला.
मैत्रीणीने प्रसंगावधान दाखवत माझा हात घट्ट धरला आणि त्याचे थोबाड फुटण्यापासून वाचवले.
हो वाचवलेच, कारण याच कारणासाठी याआधी एकाच्या कानाखाली गणपती काढून झालाय माझा.
तुमची लाईफ तुमची चॉईस, एक सिगारेट ओढा, दहा ओढा. पण तुमच्या व्यसनाची किंमत आम्ही नाही चुकवणार, याची नेहमीच खबरदारी घ्या. एवढं सारं सिंपल आहे हे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात ना?
पण भारत तर व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल प्रसिद्ध आहे. लाल दिव्यातून खुश्शाल जाणे, लेनची शिस्त न पाळणे, कुठेहि कचरा फेकणे हे सगळे भारतात व्यक्तिस्वातंत्र्य असल्यानेच शक्य आहे - त्यातून पकडल्या गेलात तर एक चार पाचशे रु. टिकवा पोलीसच्या हातात - झाले काम.

उगाच बंधने पाळून स्वतःची इभ्रत कमी करून घ्यायची नाही.

सिरीयसली..... सार्वजनिक ठिकाणी (जिन्यात, रस्त्यावर इत्यादी) थुंकणे हि अशीच अजून एक सवय आहे. सिंगापोर सारख्या देशात Canning ची शिक्षा आहे. आपल्याकडे काही लोकांना तिची गरज आहे. एक दोघांना जरी पार्श्वभागावर फटके हाणले कि इतर बरेचजण आपोआप धडा घेतात. पण शिक्षा होण्याचे प्रमाण आपल्याकडे शून्य आहे. या गुन्हेगारी लोकांना आळा बसणार तरी कसा.

लाल दिव्यातून खुश्शाल जाणे
<<

लाल दिव्याच्या गाडीतून ना?

त्यांना याहीपेक्षा जास्त अगदी खूनही माफ असतात.

मी पण फुकाड्या होतो,पण सार्वजनिक ठिकाणी कधी असे केले नाही.आपल्यामुळे दुसर्याला कशाला त्रास.

सिगारेट बाबत आपण स्मोकिंग - नॉन स्मोकिंग झोन बनवू शकतो, आणि ईतरांचा त्रास वाचवू शकतो,
पण दारूचे काय?
सिगारेट आपण जिथे पितो तिथल्या लोकांना त्रास होतो, तो असे झोन बनवून टाळू शकतो. एकदा का सिगारेट पिऊन त्या ठराविक स्मोकिंग झोनच्या बाहेर माणूस गेला की मग त्याचा कोणाला त्रास नाही.
दारूबाबत मात्र दारू पिण्याच्या जागी माणूस पितो आणि नंतर कुठेही जाऊन धिंगाणा घालू शकतो, कारण ती नंतर चढते किंवा चढल्यावर काही काळ तिचा अंमल राहतो.

असो, ट्रेनच्या दारावर उभे राहूनही सिगारेट बिडी पिणारे नग पाहिलेत, त्यांना फटकारूनही झालेय. अश्याबाबतीत रिस्क नाही घ्यायची. मुळात हे असे करणे धोक्याचे आहे हे अश्यांच्या डोक्यावर बिंबवायला हवे.

ऐय, फेक ती सिगारेट .."
त्याने दचकून मागे वळून पाहिले.
"फेक म्हणाले ना आधी", >>>>>

लोक तुम्हाला आर्ची म्हणतात ते उगीच नसावं Happy

तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण सांगण्याची पद्दत मला पटली नाही. तुम्ही पहिला नम्रतेने सांगून बघायला पाहिजे. नाही ऐकले तर आवाज चढवायला पाहिजे होतं. असे सगळ्यांच्या पुढे त्यांचा अपमान करणे बरोबर नाही.

सार्वजनिक ठिकाणी (जिन्यात, रस्त्यावर इत्यादी) थुंकणे हि अशीच अजून एक सवय आहे.> ++१ अगदी. डोक्यात जातं तेही.

सस्मित हो, खरे आहे ते Happy
पण म्हणूनच त्या आर्ची नावाचा जास्त त्रास होतो हे देखील तितकेच खरे आहे. शेवटी ते एक फिल्मी कॅरेक्टर आहे. आणि मी कशी का असेना ओरिजिनल आहे. माझी ओरिजिनिलिटी कोणी मान्य करत नाही असे ते वाटते.

अभिषेक सावंत, पण सांगण्याची पद्दत मला पटली नाही. >>> खरे आहे हे. पण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो. त्यामुळे तो चुकीच्या गोष्टी विरुद्ध व्यक्त होतोय की चुकीच्या गोष्टीच्या बाजूने हे मग माझ्यासाठी जास्त महत्वाचे. मी चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाले असे तुम्हाला वाटत असेल, नो प्रॉब्लेम, मी मान्य करते. पण फक्त त्यासाठी म्हणून अश्या लोकांना सहानुभुती दाखवू नका ईतकीच अपेक्षा. त्याची चूक फटकारण्याचीच होती. मला हा अधिकार आहे की नाही हे एकवेळ बाजूला ठेवूया पण त्याला जी फटकार मिळाली ती योग्यच होती. असे माझे ठाम मत आहे. कारण प्रत्येक सिगारेट ओढणार्‍या व्यक्तीला ती कुठे ओढायची आणि कुठे नाही याचे सामान्य ज्ञान असतेच असते.
आणि हो, पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या हेतूनेच हा अनुभव शेअर केला आहे. जेणेकरून आणखी कोणाला अशी फटकारण्याची वेळ माझ्यावर येऊ नये Happy

सार्वजनिक ठिकाणी (जिन्यात, रस्त्यावर इत्यादी) थुंकणे
>>>
अगदी सहमत. आपल्याच्याने कचरा टाकला जात नाही. अनवधानाने टाकलाच तरी अर्रर असे कसे टाकले. कोणी पाहिले तर आपल्याबद्दल काय विचार करेल असे सतरा विचार मनात येतात. आणि लोकं थुकतात कसेही कुठेही. मला कोणी तोंडात तंबाखू गुटखा साठवलेला दिसला तरी मी त्याला अशी रोखून नजर देते की बस, मग मी तिथे असेपर्यंत तो कुठे थुंकेल, त्याची काय बिशाद. गिळतोच मग बिचारा Happy

मी पण फुकाड्या होतो, >>> जिनिअस, तुम्ही सिगारेट पासून दूर झालात याबद्दल आपले अभिनंदन

किरण, जसे गुन्ह्याचे स्वरूप तसे वागायचे. जितका आपल्याला त्रास होतो तितक्या प्रमाणात आपण प्रतिक्रिया देतो. तो उडणारा धूर माझ्या नाकावर नसता आला तर शांत डोक्याने समजावणे जमलेही असते.
उद्या आपल्या घरात चोर शिरला आणि आपल्याला ते समजले तर आपण त्याला पाठीवर थपथप करत पोलिसांना नाव सांगेन हा असे त्याच्या कानात खुसफुसण्यात काही अर्थ नाही. त्याला दणकाच द्यायला हवा.

>> त्यातून पकडल्या गेलात तर एक चार पाचशे रु. टिकवा पोलीसच्या हातात - झाले काम. <<<
८ नोव्हे. पासुन पुढे असे पाचशे हजाराच्या नोटा खिशात कोंबुन फिरणारे संख्येने लक्षणीयरित्या कमी दिसु लागले आहेत.

दोन थोतरीत मारायला हव्या होत्यात..... Happy झापलत ते देखिल बरे केलेत, बसमधिल बाकीच्या ४९ जणांनाही जरा अक्कल येऊदे...

तूमचा राग मला समजू शकतो. ( कारण मलाही त्याचा खुप त्रास होतो.) आता भारतात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान मनाईचे नियम / कायदे आहेत तरीही अगदी रस्त्यावर कुणी धुम्रपान करत असेल तर आपण बाजूला होण्याशिवाय फार काही करु शकत नाही. बसमधे तूम्ही कंडक्टरला किंवा ईतर प्रवाश्यांना सांगू शकला असता.

पण तरी आता हे प्रमाण ( सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याचे ) बरेच कमी झाले आहे, एवढे नक्की !

limbutimbu >> धन्यवाद, मला थेट त्रास होता म्हणून बाकीच्या ४९ जणांच्या आधी मी पाऊल उचलले. (खरे तर एवढे ४९ नव्हते, बस बरीचशी रिकामी होती, म्हणूनच त्याने चान्स घेतला.) जर तो मला पलटून काही बोलला असता आणि बाकीच्या प्रवाश्यांनी बघ्याची भुमिका घेतली असती तर मात्र त्यांचाही राग आला असता.

दिनेश,
रस्त्यावर कुणी धुम्रपान करत असेल तर आपण बाजूला होण्याशिवाय फार काही करु शकत नाही. >>> हे खरेय, आणि तशी एखादी व्यक्ती आपल्या पुढे चालत असेल तर त्याला घाईघाईत ओवरटेक करा किंवा स्पीड कमी करत अंतर वाढवा किंवा रस्ता बदला. त्रासापेक्षाही अश्यांच्या व्यसनाने आपल्याला का त्रास भोगायला लागतोय यामुळे जास्त चीडचीड होते.

पण तरी आता हे प्रमाण ( सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याचे ) बरेच कमी झाले आहे, एवढे नक्की ! >>> ऑफिस सुटल्यावर स्टेशनकडे जायला एकच रस्ता आहे, समोरासमोर दोन फूटपाथ आहेत. एक फूटपाथ बराचसा मोकळा आहे तर एका फूटपाथवर पाणीपुरी भेलपुरी आणि डोसे वाल्यांचे स्टॉल आहे त. त्या गर्दीतून वाट काढत जायला वैताग येतो. पण तरीही तिथूनच नाईलाजाने जावे लागते. कारण त्या मोकळ्या फूटपाथवाल्या बाजूला थोड्या थोड्या अंतराने बार आणि बारच्या बाहेर सिगारेटच्या टपर्‍या आहेत. ऊनसावलीचा जसा खेळ चालतो तसे धूर आणि मोकळ्या हवेचा खेळ करत जावे लागते. आणि मूळातच सिगारेट ओढत उभ्या असलेल्या पुरुषांसमोरून जाणे नकोसे वाटते. त्यापेक्षा समोरची फेरीवाल्यांची गर्दी परवडली.
पण हा किमान त्रास झाला, एवढा तर सहन केलाच पाहिजे Happy

सांगण्याची पद्दत मला पटली नाही. तुम्ही पहिला नम्रतेने सांगून बघायला पाहिजे. नाही ऐकले तर आवाज चढवायला पाहिजे होतं. असे सगळ्यांच्या पुढे त्यांचा अपमान करणे बरोबर नाही.
Submitted by Abhishek Sawant on 21 November, 2016 - 14:11

पूर्णपणे असहमत!
थुंके, फुंके आणि झिंगे यांना कोणत्याही प्रकारचा आदर देण्याची, त्यांच्याशी शांतपणे / सभ्यतेने बोलण्याची गरज नाही. ते सार्वजनिकरित्या अपमान करण्याच्याच लायकीचे असतात. केवळ कायदा परवानगी देत नाही म्हणून आपण त्यांची धुलाई किंवा इतर काही शिक्षा करू शकत नाही नाहीतर खरेतर अशांना गचांडी धरून बसच्या दारात आणून पार्श्वभागावर लाथ मारून चालत्या बसमधून खाली ढकलून दिले पाहिजे!

अर्चना सरकार नावाचा आयडी होता
मागेच माझे सर्व आयडी घोषित करून वापरणे बंद केले होते.
आता ते आयडी फोटो अपलोड करायला वापरतो. कारण माझ्या या मूळ आयडीची मेमरी फुलं झालीय.

मात्र या विषयावर चर्चा करू शकता. त्यात काही वावगे नाही.