बाजारात मिळणारे रेडी मिक्सेस जंक फुड समजायचे का?

Submitted by स्वाती आंजर्लेकर on 17 November, 2016 - 12:01

mom again मुळे हल्ली कामाचा व्याप वाढलेला असल्याने लेकाला डब्यात द्यायला म्हणून गिट्स चे इडली, डोसा, ढोकळा असे रेडी मिक्सेस आणलेत. छोटी सकाळीच उठली तर बाबा पटकन करून देईल म्हणून. पण हे सगळे प्रकार जंक फुड असेल कि काय असे वाटले. कोणी तरी मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात सोडियम कन्टेन्ट किती आहे बघ. शक्यतो अशा पदार्थात सोडियम खूप असते. नेटवर चेक कर किती पाहीजे प्रमाण. साधारण मोठ्याना २३०० ग्राम(की मिलीग्राम? ) पर्यन्त लागते. बरेच छोट्या सूप पाकीटामधेही २३०० पेक्शा जास्त असते. एकुणच असे पदार्थ आठवड्यातून एक्दा वगैरे ठीक असे मला वाटते.

विद्या.

जंक फूडच समजावे, कारण प्रिझर्वेटिव वापरली असतात. तरी काही ब्रँड्ज् वर 'झीरो प्रिझर्वेटिव' म्हटलेले असते, कृपया चेक करून घ्यावे.
घरगुती इन्स्टंट फूडमधे सकाळी दूध-साखर-पोहे / दूध-गूळ-पोहे / दूध साखर पोळी / गूळ तूप पोळी रोल/ साखरांबा पोळी रोल असे देता येईल.

तसेच घरगुती इन्स्टंट उपमा मिक्स करून ठेवता येते. थंडीच्या सीझनला ते फ्रीजबाहेर, पुण्याच्या हवेत व कोरडे - हवाबंद डब्यात ठेवल्यास सात-आठ दिवस आरामात टिकते. जरा जास्त तेलाची जिरे-हिंग-तिखट-कढीपत्ता-आले-उडीदडाळ घालून खमंग फोडणी करायची, त्यात भाजलेला जाडा रवा घालून भरपूर परतायचे. हे मिश्रण कढईतच पूर्ण गार करायचे व गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवायचे. एका व्यक्तीसाठी एक सर्विंगसाठी साधारण दीड कप पाणी लहान पातेल्यात गरम करायचे. त्यात चमचाभर तेल / तूप व चवीनुसार मीठ घालायचे. उपमा मिक्स थोडे थोडे घालत ढवळत राहायचे. दीड कप पाण्यास साधारण अर्धा कप मिक्स्चर पुरते. मिश्रण उकळू लागले की गॅस बंद करून गरम उपमा वाढायचा. वरून शेव, खोबरं, कोथिंबीर आवडीनुसार.

ज्वारी लाही पीठ, राजगिरा लाही पीठ, वरई लाही, नाचणी लाही, साळी लाही पीठ यातील काहीही गरम दूध + साखर घालून देता येते. नाचणी सत्व शिजवून दूध / ताकातून देता येते. सकसचे पूर्णाहार पीठ मिळते ते थोड्या तुपात भाजून दूध साखर घालून देता येते. सातूचे पीठही असेच देता येते. वेगवेगळे पौष्टिक लाडू देता येतील. शंकरपाळे गरम दुधात घालून तेही देता येतील. तयार राजगिरा लाडू मिळतात त्यात गरम दूध घालून पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो.

२३०० ग्राम(की मिलीग्राम? ) >>> मिलिग्रामच असावे ! २३०० ग्राम वर्ष दीडवर्षभराचे होइल एक माणसाला! Wink

सगळे प्रकार जंक फुड असेल कि काय असे वाटले. कोणी तरी मार्गदर्शन करावे.>>>>

शक्यतो घरी भाजणीचे पीठ, सातुचे पीठ असे पदार्थ बनवून ठेवावेत! तांदुळाच्या पीठाची खिशी पण चांगली होते जीरे वैगेरे घालुन. वरती बरेच प्रकार लिहलेत!

धन्यवाद अरुंधती.
मी रोज सकाळी त्याला करून देते डबा. क्वचित कधीतरी वापरायला म्हणून आणलेली. यावर नो प्रिझर्वेटिव म्हटलंय खरं तर. पण कोणास ठाऊक.
@ कृष्णा... खिशी म्हणजे काय?

कृष्णा बरोबर आहे २३०० मि. ग्रा. Happy आज सकाळी चितळे इडली मिक्स वापरले. त्यात ७ इडल्यामधे २२०५ मि. ग्रा. सोडियम आहे. म्हणजे जर ७ इडल्या खाल्या तर एकाच वेळी दिवसाचे सर्व सोडियम वापरले जाईल. बाकी दिवसभर मग उपाशी :). मुलाना तर अजून कमी मीठ हवे. त्यामुळे मी म्हणेन आठवड्यातून एकदाच ठीक आहे. त्यापेक्षा जास्त नको.

विद्या.

तांदळाची झटपट लापशीही होते मस्त. रात्री झोपताना तांदूळ स्वच्छ धुवून सुती फडक्यावर छान वाळवत ठेवावेत. सकाळपर्यंत खडखडीत कोरडे झालेले असतील. (तासाभरातच होतात, परंतु सकाळी घाईच्या वेळी आणखी काम नको असेल तर ही पूर्वतयारी करून ठेवावी.)
साजूक तूप, जिरे, हिंग, किंचित हळद व किंचित तिखटाच्या फोडणीत हे सुकवलेले तांदूळ घालून खमंग परतून घ्यावेत. तांदळाच्या साधारण तिप्पट ते चौपट पाणी घालावे व झाकण ठेवावे. तांदूळ शिजू लागले की चवीनुसार मीठ / सैंधव. आपल्या आवडीनुसार कमी-जास्त पातळ करावे. फोडणीत कढीपत्ताही घालता येईल. गरमागरम लापशी हादडायला रेडी. पोटभरीची व लगेच तयार होणारी.
यात काहीजण स्वादासाठी कोकम आगळ / आमसूलही घालतात. ते घालायचे नसेल तर वाढताना वरून थोडे मेतकूटही घालता येते.
आजारी, वृध्द व्यक्तींना ही लापशी / पेज नाश्त्याला छानच व लहान मुलांनाही! गरम मऊ भात - तूप - मीठ - मेतकूट हाही नाश्त्याला पोटभरीचा व सोपा पर्याय आहे.

@ कृष्णा... खिशी म्हणजे काय?>>>
तांदुळाचे पापड करतात त्यासाठी काढतात ती उकड का?>>

हो साधारण तसेच! त्यात जिरे अथवा जिरपूड चवी पुरते मीठ आणि चिमुटभर साखर. छान तुपात शिजवुन खायला द्यायचे.. पौष्टीक चविष्ट पोटभरीचे सगळेच होते..

जंक फूड प्रीजर्व्हेटीव्ह वगैरे हे एक झालेच.
पण त्या पॅकेट फूडने बोअर होते हो. तीच तशीच चव.
ऑफिसच्या चहा-कॉफी मशीनसारखे झाले ते. सतरा प्रकारचे फ्लेवर असले तरी कालांतराने बोअरच. पण तेच ऑफिसशेजारच्या टपरीवर चहा प्या. रोज एकाच जागी प्या. तरीही मूड रिफ्रेश होतोच.
मी आमच्याकडे कधीच असले रेडीमिक्स पॅकेटस आणत नाही ना शक्यतो घेऊ देत. कधी आईला वेळ नसेलच तर ती रिक्वेस्ट करते आज असे झटपट करू का, ती तेवढी मी अ‍ॅक्सेप्ट करतो Happy

गिट्स पेक्षा मला धनश्रीचे मराठमोळे मिक्सेस चांगले वाटतात. चव बरीचशी ताज्या पदार्थासारखीच येते.
आता बाजारात भाजलेला रवा पण मिळतो.

पुण्यात असाल तर सुरुची/ दीक्षित फूड्स यांचे प्रोडक्ट वापरून पहा. चव आणि क्वालिटी चांगली आहे. प्रिजर्व्हेटिव्ह वापरत नाहीत.

अग्रजकडे मिळणारी अनेक उत्पादनेही चांगली आहेत. घरगुती चवीची आहेत. जवळपास मिळत असतील तर वापरून बघा.

याखेरीज,
रताळी उकडून, सोलून, कुस्करून गरम / कोमट / गार दूध + साखर + वेलचीपूड घालून नाश्त्याला देऊ शकता. नुसते उकडलेले रताळे खायला आवडत असेल तर तसेही. सफरचंद फोडी करून / किसून / उकडून वरून दालचिनी पूड + पिठीसाखर / सैंधव - मिरपूड घालून देऊ शकता.
चिक्कू, केळी, पपई हेही देता येईल.
गव्हाचे, बार्लीचे, नाचणीचे पफ्स बाजारात रेडीमेड मिळतात. व्हीटफ्लेक्स किंवा कॉर्नफ्लेक्ससारखे गरम दुधात घालून खाता येतात.

रवा डोसा, रवा इडली वगैरेसाठी खरे तर रेडीमिक्सची गरज नाही. ढोकळा देखील घरी पटकन होतो.

अकु ने लिहिलय तसे उपम्याचे आणि तिखट सांज्याचे मिक्स मी होस्टेलला असताना बर्‍याच मुलींकडे असे. अगदी मूगडाळ खिचडीचेही मिक्स असे. उकळत्या पाण्यात प्रमाणत टाकले की पटकन तयार होते.

धन्यवाद सर्वांना.
रवा डोसा मी करते बर्याचदा. रवा इडली नाही केली कधी. उपमा मिक्स करून ठेवेन आता.
धनश्री रेडी मिक्स गिरगावात पाहिलेले. आणून बघेन.
@ अतरंगी... मी मुंबईत राहते.

रेडीमिक्सबद्दल मनात एक अढी आहे पहिल्यापासून, एक गुलाबजाम वगळता.पण ईडली डोश्याचे तयार ताजे पीठ छान मिळते आमच्याकडे. मी ते वापरते. आपल्या सोयीने कांदा मिरची कोथिंबीर टाकून आवडीनुसार जाड पातळ डोसे छान होतात. घरच्या चवीच्या बरेचसे जवळ जातात त्यामुळे आवडतात.

तांदुळाची लापशी, उकडलेली रताळी आरोग्यवर्धक आहेत पण लहान मुलं डब्यात दिलं तर खातील का?

स्वाती, सकाळची घाई होत असेल तर पदार्थांचं वेळापत्रक बनवून ठेवत जा. त्याप्रमाणे जमेल तेव्हा तयारी करून ठेवता येईल. उदा. ऱवा भाजून ठेवणे, दाण्याचं कूट तयार करून ठेवणे वगैरे. उद्याच्या डब्याला पराठे थालिपीठ वगैरे द्यायचे असेल तर आजच पीठ भिजवून ठेवता येईल. उपमा पोहे वगैरे करायचे असतील तर कांदा आज चिरून ठेवणे. खरंतर कांदा चिरून ठेवलेलाही चांगला नाही, पण हाय सोडिअम रेडी मिक्सपेक्षा बराच बरा. फोडणीत घालायचे मिरचीचे तुकडे कढिपत्त्याची पानं वगैरे एका डबीत घालून फ्रिजमधे ठेवता येतील. मी तर पोह्यांचा डबाही ओट्यावर काढून ठेवते. त्याची जागा बदलली असेल तर घाईच्या वेळी तोही सापडेनासा होतो.
सॅंडविच द्यायचं असेल तर बटर रात्रीच फ्रिजबाहेर काढून ठेवते. व्हेजिटेबल कटलेट द्यायचं असेल तर आज रात्रीच कटलेट वळून फ्रिजमधे, सकाळी फक्त शॅलो फ्राय करून द्यायचे.

आंबोळीचं तयार पीठ मिळतं. पुण्यात असाल तर ग्राहक पेठेत नक्की मिळतं. मुंबई ग्राहक पंचायतीची जी वितरण व्यवस्था आहे, त्यात मिळणारं आंबोळीचं पीठही खूपच चविष्ट असतं. त्यात काहीही preservatives नसतात. रात्री भिजवून ठेवलं की सकाळी पटकन धिरडी घालता येतात. तिखट-मीठ घालावं लागतं. आवडत असेल तर जिरेपूड, लसूण पेस्ट/ किसून.

माबोवर लाडवांचा एक धागा होता बहुतेक. सकाळी नाश्त्याला एखादा पौष्टिक लाडू व कपभरून दूध हाही उत्तम पर्याय आहे.
शेंगदाणा कुटाचा लाडू, पंढरपुरी डाळ्याचा लाडू, पोळीचा लाडू, सातूचा लाडू, कणकेचा लाडू हे झटपट होणारे, पौष्टिक, पोटभरीचे लाडू मुलांना नक्कीच आवडतात. थंडीचे दिवसांत डिंकाचा लाडू, हळीव लाडू, तिळाचा लाडूही मस्त! रेवड्या, चिक्की, रात्रभर भिजवून मऊ उकडलेले व किंचित कुस्करलेले काबुली चणे जरा चटपटीत परतून... Happy

Proud