जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १४): खेरवारा - अरवलीचे आव्हान

Submitted by आशुचँप on 16 November, 2016 - 09:45

http://www.maayboli.com/node/60780 - (भाग १३): नाथद्वारा - सुंदर अनुभव
======================================================================

नाथद्वाराचे मंदीर प्रसिद्ध असले तरी त्यांच्या अटी बऱ्याच चमत्कारीक होत्या. त्यामुळे काल हॉटेलवर जाऊन अंघोळ करून दर्शन घेऊन इच्छिणाऱ्यांची निराशा झाली. ओबी आणि काकांनी बातमी आणली की अर्धाच तास मंदिर उघडे असेल, तेही उद्या सकाळी साडेपाचला.

मी तिथल्या तिथे माघार घेतली. असेही देवळात जाण्याचा मला कधी उत्साह नव्हताच आणि त्यातून असल्या अटी वगैरे असतील तर मुळीच नाही. असेही तिथे मोबाईल, कॅमेरा न्यायला मनाई होती, मग तर अजूनच उत्साह मावळला पण बाकीचे उत्साहाने फसफसत होते. म्हणलं, जावा बाबांनो, आल्यावर मला उठवा. आणि गेले की त्याप्रमाणे पहाटे उठून अंघोळ वगैरे करून.

आल्यावर मात्र त्यांनी इतके भरभरून वर्णन केले की थोडी चूटपुट लागलीच. पण उसने अवसान आणून मी म्हणलो की ठीक आहे, तुमच्या नजरेतून पाहिले मी मंदिर. तर हेम खास खवटचपणा दाखवत म्हणाला
"तसे तर मग ट्रीप पण आम्ही तुला आमच्या नजरेतून दाखवली असतीच की रे..."

म्हणलं, पूर्वज तुमचे पुण्याचे काय रे, तर म्हणे नाही आम्ही कोकणी..म्हणलं, याचाच काका तो.

सगळ्यात किस्सा केला ओबीने. तिथे टीपिकल देवस्थान असल्याने हार, फुले वगैरे विकणाऱ्यांची गर्दी होतीच. पण एक बाई टोपली घेऊन चारा विकत होती. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना गौमाता को घास खिलाईये असे करत फोर्स करत होती. (टिपीकल देऊळ चित्रपट - करडीमाता) निघायच्या गडबडीत ओबी आला तिच्या समोर आणि तिने आग्रह केल्यावर म्हणाला, क्या है हम जरा जल्दी मेे हे, आपही खिलाईये

ती बाई जागीच भेलकांडली.

असो, तर आवरून पुन्हा त्या बोळकांडीतून बाहेर आलो. तिथे मस्त गरमागरम पोहे आणि जिलबी विकत होता एकजण. सकाळी सकाळी इतका पौष्टिक नाष्टा म्हणल्यावर सगळ्यांनीच ताव मारला.

...

...

...

असेही आज स्टॅमिनाची गरज होती. आज त्यातल्या त्यात मोठी अशी चढण होती. अरवली पर्वत रांग पार करून जायचे होते. एकदा ते उतरून खेरवारा गाठले की त्यानंतर पुढे सगळा गुजरातचा सपाट प्रदेश लागणार होता.

निघण्याआधी रेकॉर्ड केला आजचा व्हिडीओलॉग. नाथद्वारा गावातच डोंगराएवढे चढ लागले. आणि शरीर गरम व्हायच्या आधीच फुफुस्से पेटली. थोडा वेळ दम खायला थांबलो तर तिथे एक साधु मस्तमौला होऊन सिगारेट, फुंकत बसला होता. मला आधी वाटले चिलीम असेल पण नाही.

वेदांग आणि मी त्याची काही छानशी पोट्रेट काढली. एकदोनदा त्याने आमच्याकडे पाहिले आणि दुर्लक्ष करत आपल्या धुंदीत बसून राहीला.

सकाळचे कोवळे ऊन, मागे घाट, गुलाबी म्हणता येईल अशी थंडी आणि त्यात तो साधू हे दृष्य इतके मनावर कोरले गेले आहे की बस.

गावातून बाहेर पडलो आणि काल सोडलेला नॅशनल हायवे क्रमांक ५८ पुन्हा पकडला. घोराघाटीपर्यंत रस्ता तसा सरळ होता पण नंतर एक ग्रॅज्युअली त्याचे एलीवेशन वाढत चालले होते.

पण गंमत म्हणजे रस्ता दिसताना छान सरळसोटच दिसत होता. त्यामुळे बॉडी आणि माईंड यांच्यात तुफान मतभेद होऊ लागले. रस्ता दिसतोय सरळ मग बॉडी का ऐकेना असा प्रश्न मेंदूला पडत होता. आणि तो विचार इतका प्रभावी होऊ लागला की किमान दोन वेळेला मी उतरून मागचे चाक पंक्चर तर नाही ना हे चेक केले. चाके जणू रस्त्याला चिकटून बसली असावी असा जोर लावावा लागत होता. हेडविंड असले असते तरी ठीक होते पण होती ती हळूवार झुळूक आणि ती देखील अदृष्यपणे काम करत होती.

पण इतके असून मी मनापासून हा प्रवास एन्जॉय करत होतो. एकतर सकाळची वेळ असल्यामुळे प्रसन्न वाटत होते, त्यात ही भारतातील सर्वात जुनी अशी पर्वतरांग ओलांडताना सह्याद्रीची वारंवार आठवण येत होती. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. महाभारतातील मत्स्य देश हा अरवली पर्वतरागांमध्ये असल्याचे मानले जाते. हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बर्‍यापैकी पाऊस पडतो मात्र अरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. रणथंभोर, सारिस्का ही काही प्रसिद्ध अभयारण्य अरवली पर्वतात आहेत. (संदर्भ विकीपिडीया)
डोंगर, काही ठिकाणी दिसणारे गढीसांरखे बांधकाम आणि एखाद्या घळीतून जावे तसा जाणारा सुरेख खड्डेविरहीत रस्ता. मी दम लागल्याच्या मिषाने वारंवार थांबून ते दृष्य नजरेने पिऊन घेत होतो. काही फोटो काढून पाहिले पण तो भव्य कॅनव्हास कुठल्याही कॅमेरात न मावण्यापलिकडचा होता.

सुसाट गँग नेहमीप्रमाणेच निघून गेली होती, काका आणि सुहुद नजरेच्या टप्प्यात दिसत होते आणि मी, माझी सायकल आणि तो प्रवास एक सुंदर सिंफनी जमून आली होती. चढ नसता तर मी ते अजून एन्जॉय केलं असत पण त्याला नाईलाज होता. वाटेत काका थांबलेले दिसले तर मी माझ्या तंद्रीतच त्यांना अहो माझ्यासाठी थांबू नका, मी येतो हळूहळू तुम्ही व्हा पुढे असे म्हणतच निघून गेलो पुढे. ते बिचारे बरं बरं म्हणत मुकाट मागे येऊ लागले.

...

चांगला दमसास काढल्यावर लाल जर्सी दिसू लागल्या थांबलेल्या. तिथे एक धाबावजा हॉटेल होते तिथे चहापाणी उरकले. मला वाटले की आला घाटमाथा. आता फक्त उतार. पण मालक म्हणे, और थोडा है चढाई. थोडी म्हणे म्हणे तरी बरीच होती आणि डोंगराची टोके बघून पोटात गोळा येतोय तोच बोगदा दिसला. मस्त दगडातून कातून काढलेला तो बोगदा एक भन्नाट होता.

बोगदा पार केल्यावर मात्र उदयपूरपर्यंत मस्त उतार लागला आणि मी हा प्रवास अजूनच एन्जॉय केला. सायकल सुसाट चालली होती पण मी मध्ये मध्ये मुद्दाम थांबून जितका वेळ काढता येईल तितका काढत होतो. पुढे गेलेले वैतागणार होते हे निश्चित पण भुरदिशी जायचे असते तर सायकल कशाला हवी म्हणत मी माझ्या धुंदीत जात राहीलो.

राजस्थानचा अजून फिल यावा म्हणून मी मु्द्दाम सेव्ह केलेली प्लेलीस्ट काढली. लता मंगेशकरचा दैवी आवाज, ह्दनाथ मंगेशकर यांचे संगीत याने सजलेली लेकीन आणि चला वाही देस ची गाणी. या दोघांनी अक्षरश राजस्थान डोळ्यासमोर उभा केलाय यातून आणि प्रत्यक्ष त्या प्रदेशात असताना ही गाणी ऐकत जाणे हा एक सुवर्णयोग होता.
केसरीया बालमा, म्हारा री गिरीधर गोपाल, गढसे जो मीराबाई उतरी ही गाणी लूपमध्ये टाकून ऐकत राहीलो आणि मनात राजस्थान साठवत राहीलो.

उतार संपत आला तिथे तर एक मस्त तलाव होता आणि त्यावर कितीतरी पक्षी मस्त वॉटरबाथ घेत होते.

त्याच्याच थोडे पुढे काही पोरं पोरी खेळत होती. सावली बघून पाणी प्यायला थांबलो तर कोण लोक आहेत ते बघायचा धिटाईने पुढे आली. आणि त्यातल्या एका मुलीकडे चक्क टॅब होता आणि त्यावर ती गाणी ऐकत होती. अतिशय मळकट अवतारातल्या त्यामुलीकडे टॅब हे सर्वस्वी विसंगत चित्र होते. कुणाच्यातरी गाडीतून पडला असणार किंवा विसरला असणार हे उघडच होते पण ती त्यावर गाणी ऐकू शकत होती म्हणजे त्यांना त्यातले थोडेफार तरी कळत असणारच.

मी विनंती केल्यावर तीने लाजत लाजत का होईना फोटोसाठी पोझ दिली. दरम्यान, तिथला दादा म्हणता येईल असा एक टोणगा आला. तब्येतीने चांगला दांडगा होता आणि मस्त कपडे काढून तिथल्या पाण्यात डुंबत होता. मी या लहान पोरांशी बोलतोय म्हणल्यावर तो पटदिशी टॉवेल गुंडाळून आला. तो येताच ही पोरे कमालीची बुजली. इथल्या पोरांवर याची दादागिरी चालत असणार आणि त्याच्या अंगबोलीत, चेहऱ्यावर त्याचा माज स्पष्टपणे डोकावत होता. त्याचाही एक फोटो काढला आणि पुढे निघालो.

उद्यपुर आल्यावर गावातून जावे का बायपास घ्यावा हे ठरेना. बरेचदा आम्ही बायपास घ्यायचो, पण तो खुप लांबून जातो अशी माहीती एका स्थानिकाने दिली आणि आम्ही सिटीत घुसण्याचा निर्णय घेतला. मला त्यामुळे खूपच बरे वाटले. असेही माझ्या मूळ प्लॅनमध्ये उद्यपूरला मुक्काम होता. लेकसीटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात लोक लांबून लाबून बघायला येतात आणि आपण नुसती झलक घेऊन जायचे हे पटत नव्हते. त्यामुळे उद्यपूरऐवजी खेरवाराला मुक्काम करायाला माझा जोरदार विरोध होता. पण त्यामुळे पुढची सगळीच गणिते बिघडली असती त्यामुळे काळजावर दगड ठेऊन तो निर्णय मान्य करावा लागला.

वाटेत दिसणारे किल्ले, बुरुज पाहून एक कळ येत होती की इतक्या जवळ येऊनही मला ते बघता येत नाहीयेत. हेमची पण सेम रिएक्शन होती. आम्ही दोघेही प्रचंड किल्लेवेडे त्यामुळे मनापासून वाईट वाटत होते.

उद्यपुर गावात प्रचंड ट्रॅफिक लागलं आणि बायपासने गेलो असतो तर बरे असे म्हणायची वेळ आली. पण निदान किल्ल्यांचे जवळून दर्शन तरी झाले हेही नसे थोडके म्हणत पुढे निघालो, ते मनाशी खूणगाठ बांधत कि लवकरच पुन्हा इथे यायचे आहे आणि सगळे मिस झालेले किल्ले आणि ठिकाणी निवांतपणे पहायचे आहेत. आता लिहीतानाही तेच डोक्यात आहे, बाईकवरून एक जंगी ट्रीप मारावी का राजस्थानात. नुकताच मोटरसायकल डायरीज चित्रपट पाहीलाय, त्याने तर सॉलीड इन्स्पायर व्हायला झाले आहे.

एक मात्र कळले की सायकल आणि स्थळदर्शन होणे अवघड आहे. एकतर मग परदेशी लोकांसारखे महिनोमहिने घर सोडून भटकले पाहिजे किंवा मग असे लांब पल्ल्याचे प्रवास न करता, एक राज्य घेऊन तिथे सायकलने फिरले पाहिजे.

पण ही सगळी पुढची बात, आत्ता उन्ह मरणाचे पिडत होते त्याचे काय करावे कळत नव्हते. त्यातून सकाळी हळूवार झुळक आता वाऱ्यात बदलली होती आणि हेडविंडसचा राक्षस समोर उभा राहीला होता. कष्टाने एक एक पॅडल मारावे तेव्हा सायकल पुढे सरकत होती. दमछाक दमछाक दमछाक नुसती दमछाक.

त्यातल्या त्यात त्रास वाचावा म्हणून वेदांग पैलवानचा भरभक्कम ड्राफ्ट घेत चाललो होतो, पण ते अहीरावण लोक सावकाश चालवतील तर शपथ. मीही मग इरेला पेटलो आणि पाठ सोडली नाही. लान्स आणि वेदांग नेहमीप्रमाणे सुसाट सुटले आणि मी त्यांच्या मागे शेपटासारखा. मधून मधून वेदांग मागे वळून पाहत होता, मी मागेच असल्याचे त्याला आश्चर्य वाटत होते कारण एरवी मी ते वेगात सुटले की त्यांना तसेच वाऱ्यावर सोडून आपल्या गतीने जात असे, पण आत मी ऐकायचे नाहीच ठरवले होते.

एक दोन नाही तब्बल २०-२२ किमी अंतर आम्ही जवळपास अशाच राक्षसी वेगाने पार केले आणि एका खोपट्यापाशी मागच्यांची वाट पाहत थांबलो. वेदांग म्हणे चांगली चालवतोस की स्पी़डने, उगाच का रडत असतो. म्हणलं, भाऊ आपला उद्देशच नाही ना वेगात जायचा. तुमचे ठिक आहे, माझा मागच्या मागे जीभ बाहेर येऊन कुत्रा झाला होता.

पुढे एका हॉटेलला थांबलो. एकतर त्या उन्हाने आणि हेडविंडसने टेकीला आलेलो. दोन क्षण जरा सावलीत टेकावे म्हणून आत आलो. खायची इच्छाच नव्हती, नुसते पाणी पिऊन पिऊन पोट डब्ब झालेले.

आज जाताच एक फाटका माणूस समोर आला. इतक्या दुपारीही हिलेडुले होता. आणि बळंच पकवायला लागला. मी आधी दुर्लक्ष केले पण ऐकेचना, म्हणलं इसको इसीके भाषा मे अभी.

आधी त्याने सुरु केले, मै कैसे सायकल चलाता था वगैरे अबी मै पचास साल का हो गया
आपकी उमर कितनी है?
मी - लगभग ३०
बाल काफी सफेद हो गये, मेरे देखो अभीभी काले है
हमारे यहा पुणेमे ऐसेही होता है, कम उमर मै ही बाल सफेद होते है
मेरा बेटा अभी २६ साल का है
हो सकता है, आपकी उमर पचास तो उसकी २६ होनी चाहीये, हमारे यहा पुणेमे ऐसेही होता है
उसकी पैर की हड्डी टूट गयी (हे कुठे आलं मध्येच) पर भीर भी चलाता है
क्या सायकल?
नही ट्रक चलाता है
वो पैर से किधर, हाथ से चलाते है (यावर तो दोन क्षण मेजर कन्फुज झाला)
नही नही, पैर सेच, एैसे ट्रॅफिक हो, फिरभी चलाता है
हमारे यहा पुणेमे ऐसेही होता है, ट्रॅफिक मेंही चलते है ट्रक सारे
अभी दो साल मै वो २८ का हो जाऐगा (अर्थातच ना)
मै भी हो जाऊंगा ना
क्या हो जाओगे?
मै अभी लगभग ३० का हू, दो साल मै बराबर ३० का हो जाऊंगा
है???
हमारे यहा पुणेमे ऐसेही होता है

यावर तो हरलाच, आणि आपका बराबर है एकदम म्हणून शेकहँड वगैरे करून गायब झाला.

आमची गँग नुसती वेड्यासारखी हसत बसली होती.

जेवणे झाल्यावर जरा बरे वाटले की पुढे रामघाटीपर्यंत चांगला उतार लागला. त्यामुळे बरे वाटले पण घाटी संपल्यावर पुन्हा एकदा चढ नशिबी आले. च्यायला या चढाच्या तर ना असे करत करत कसाबसा तो कष्टप्रद भाग पार केला. ओबीसारख्या माणसाचीही आज पूर्ण कसोटी लागली. त्याचा रणगाडा वाहून नेता तोदेखील टेकीला आला आणि पहिल्यांदाच मागे राहीला असावा आख्ख्या मोहीमेत. त्याच्यासोबत अर्थातच काका. मोहीमेचा नेता कसा असावा तर काकांसारखा. कधीही कुरकुर नाही, चिडचिड नाही, मला एकट्यालाच मागे टाकून सगळे पुढे गेले म्हणून वैतागणे नाही, जो कोण शेवटचा मेंबर असेल त्याला सांभाळून आणण्याची जबाबदारी त्यांनी आपणहून घेतलेली आणि एकदाही त्याबदद्ल नाराजीचा सूर नाही. हॅट्स अॉफ.

वाटेत अनेक बुलेटवाले पास झाले. पण सगळे बुलेटवाले जातांना हाताचा काटकोन करुन थम्सप करायचे. सगळ्यांची युनिक स्टाईल. आम्हीही त्याच प्रकारे हात करून त्यांना बाय करायचो

पुढे मज्जा आली रिषभदेवपाशी. तिथे चहा प्यायला थांबलो तर शेजारीच एक पानाचे दुकान होते. एक टिपिकल राजस्थानी माणूस, टिपिकल तो फेटा, लांबरुंद मिश्या अशा अवतारात पान बनवत होता. ते पाहून मला हुक्की आली पान खायची. मी माझे पान सांगितले तर म्हणे, पुरा के आधा.
मला आधी काय टोटलच लागली नाही, मला वाटलं तो चहाच विचारतोय, म्हणलं, चाय हो गयी पान चाहीये.
अरे पानही पूंछ रहा हूं, पुरा चाहीये के आधा.
हायला, पानात पण असे प्रकार असतात मला माहीती नव्हतं
मी आपल्या अतिआत्मविश्वासाने पुरा म्हणन सांगिलते तर त्याने एक अजस्त्र आकाराचे पान घेतले. मी जर ते प्रत्यक्ष पाहिले नसते तर खायचे पान इतक्या आकाराचे असते यावर विश्वासच ठेवला नसता.
त्यावर सगळा त्याने मालमसाला ठेऊन असा मोठा तोबरा दिला तर कुरतडून खावे का काय असा प्रश्न मला पडला.
माझे एक्प्रेशन त्याला कळले असावे आणि नवखा भिडू आहे कळल्यावर त्याने त्याचे कात्रीने दोन भाग करून वेगवेगळे दिले. तो अर्धाभाग कसाबसा तोंडात माववला आणि दुसरा चक्क पार्सल करून घेतला. दुर्दैवाने त्याचा फोटो काढायचा विसरलो.

अर्थात त्या पानाचा व्हायचा तो परिणाम झालाच. सुरुवातीला तंद्रीत चालवली पण नंतर निसर्गाने जोरात पुकारले. तशीच रेटून नेली पण दहाबारा किमी राहीले असताना काका मागे राहिले म्हणून सगळे थांबलो. मी मग टाईमप्लिज केले आणि सगळ्यांना सांगून पुढे काढली सायकल. ते शेवटचे दहा किमी संपता संपेनात आणि कसाबसा एकदाचा मी त्या हॉटेलला पोचलो. हॉटेल कसले एक अतिशय भिषण स्वरुपाचे लॉज होते. डिडवानाचे हॉटेल त्यापुढे बरेच पॉश वाटले म्हणजे अंदाज करता येईल. कशीबशी घाईने सायकल लावली, सगळे सामान उतरवले. यात नाही म्हणता म्हणता बराच वेळ गेला पण बाहेर काही ठेवणे शक्यही नव्हते.

आणि मॅनेजरला माझ्या घाईशी काही घेणेदेणेच नव्हते, तो निवांत त्याच्या रजिस्टरमध्ये एन्ट्री शोधत राहीला. मी असा हताश होऊन त्याच्याकडे बघत होतो. शेवटी एकदाची प्रभुकृपा जाहली आणि त्याने रुम उघडून दिली. रुम साक्षात दिव्य होती, सुरु होताच संपलीसुद्धा. इतक्या त्या टिचभर जागेत त्यांनी डबलबेड माववला होता आणि एक टीव्हीसुद्धा. माणसाला जागा लागते किती या टॉलस्टॉयच्या वचनावर त्या मालकाची नितांत श्रद्धा असावी.

मला मात्र बाकी कशाशी काही घेणेदेणे नव्हते आणि एकदाचे सगळे काम आटोपले. लगे हातो आंघोळ करावी म्हणून शॉवर सुरु केला. तर गार पाण्याची करंगळीएवढी धार. गरम पाणी वगैरे लाड इथे होणे जरा अवघडच होते. असेही दिवसभर तापून आल्यावर ते गार पाणी अंगावर बरे वाटत होते पण करंगळीएवढी धार सगळ्या पेशन्सचा अंत बघत होती. कसेबसेे अंग ओले करून बाहेर आलो तो सगळी मंडळी आली.

दरम्यान हेम जरा अवस्थ दिसला. त्याला विचारले काय तर म्हणे खेरवाराच्या अलीकडे एक नुकताच झालेला अॅक्सिडेंट पाहिला.
"रक्त व आतड्यांचा सडा. मी तर भिरभिरलोच. ट्रकचं चाकच गेलेलं अंगावरुन. गंमत म्हणजे मला ओव्हरटेक करुन जातांना पहात ओरडत गेला होता धुर्राटमधे आणि थोड्या पुढेच हा प्रकार. एक पाय मांडीपासून वेगळा होऊन फेकला गेलेला..जम्मुहून निघाल्यावर रस्त्यावर अनेक मृत प्राणीपक्षी पाहिले. असंख्य कुत्री, मांजरं, खारुताई, कावळे, साप, मुंगुस, मरणासन्न वासरु वगैरे. पण आज माणसाचा छिन्न देह पहिल्यांदा पाहिला. तिथे न थांबता पुढे निघाल्यावर मी एकदम डिफेन्सिव्ह फेजला आलो. एकतर रस्त्याची कामं सुरु असल्याने मोठी ट्रकसारखी वाहनं समोरुनच येत होती. ते १०-१५ किमी मी तणावात केलं मी सायकलिंग.."

बापरे, ते ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला. मी जस्ट त्यांच्या पुढेच होतो. म्हणजे मी पास झालो आणि हा अपघात झाला असणार.

आज माझ्या खोलीत काका होते, त्यांनी ती धार बघूनच पोऱ्याला पिटाळले व बादलीभर गरम पाणी मागवले. आणि आले की राव. पु्न्हा एकदा अंघोळ करावी का असे मनात आले पण म्हणलं, मरुंदे आणि रात्रीच्या जेवणापर्यंत छानशी डुलकी काढली.

रात्री खालीच दालबाटी हाणली. असेही आजचा आमचा राजस्थानातला शेवटचा मुक्काम होता. उद्या बॉर्डर क्रॉस करून गुजरातेत प्रवेश करणार होतो. तिथे तरी उन्हाचा तडाखा कमी असेल अशी अपेक्षा करत डोळे मिटले.

===============================================================

आजचा हिशेब - १२८ किमी. नंतर बराचसा उतार दिसत असला तरी हेडविंडसने जोरदार मार दिला. पण प्रवास मस्त झाला.

-===========================================================
http://www.maayboli.com/node/61826 - (भाग १५): मोडासा - एक दिवस विश्रांतीचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसतायेत रे सगळे फोटो ..गूगलबाबाची कृपा !

झकास चालली आहे सफर .... "हमारे यहा पुणेमे ऐसेही होता है" - हा भारी टप्पू होता Happy

मस्त आहे हा ही भाग. तुमचं जिवंत लिखाण ही सिरीज फॉलो करायला भाग पाडत आहे.

पटापट पुढचे भाग टाका

आशुचँप.. वर्णन व फोटोही मस्त!.. धन्यवाद.. तुझ्यासोबत प्रवास करतोय( व आपणही हे सगळ अनुभाव ) असच वाटतय वाचताना.

सुरवातीच्या तुलनेत आताचे भाग लवकर देत आहात त्याबद्दल आभार. जसं छान सायकलिंग करता, तितकच मस्त लिहिताहि. ओबी म्ह्णजे बाबुभाई का ?

सगळे फोटो दिसताहेत, तो टिनपाट टोणगाही दिस्तो आहे....! Proud
वर्णन खासच, सगळी दृष्ये/प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडताहेत असे वाटते....
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद सर्वांना

सुरवातीच्या तुलनेत आताचे भाग लवकर देत आहात त्याबद्दल आभार.

काय करणार, लोक पार घरी यायच्या वगैरे धमक्या द्यायला लागले. जोक्स अपार्ट.
सध्या कामाचा व्याप थोडा कमी आहे म्हणून पटापट टंकून घेतोय. पुन्हा एकदा लोड वाढला की सांगता येत नाही.

ओबी म्ह्णजे बाबुभाई का ?

हो, ओंकार ब्रम्हेचा शॉर्टफॉर्म आहे तो

नेहमी प्रमाणे मस्तच रे.

बाईकवरून एक जंगी ट्रीप मारावी का राजस्थानात > > > करुया का प्लान ... बोल.. मी तर रेडी आहे.

धन्यवाद सर्वांना...

वर्णन खासच, सगळी दृष्ये/प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडताहेत असे वाटते....

धन्यवाद

तो उदय पूर चा उतार लेकिन ची गाणी ऐकत ते क्षण मस्त असणार.

हो, पु.ल. म्हणतात तसा मोरपिसासारखा तो प्रवास मनात घर करून बसलाय

करुया का प्लान ... बोल.. मी तर रेडी आहे.

नक्की का, मी पण रेडी आहे, करूया प्लॅन

खूप छान सुरू आहे सफर. फोटो सगळे दिसले. दमछाक, गंमत, अंगावर काटा, सगळं आहे ह्या भागात.
त्या हिलडुलेनं आणि 'सुरू होताच संपलीसुद्धा'नं हसू आलं Happy

भारी हा भाग पण मस्तच लिहिलाय आणि सगळे फोटो दिसले. खूपच स्टॅमिना आहे तुम्हा सगळ्यांचा म्हणून तर उन्हातान्हातून एन्जॉय करत सायकली चालवता.
ढोकळा, जिलेबी, फाफडा, पोहे क्या बात है मस्तच तोंडाला पाणी सुटलं.
तुमची डार्लिंग रुसल्या सारखी का दिसतेय.
आपके यहा पुणेमे कुछभी हो सक्त है| Lol Lol Lol

धन्यवाद, सई, गिरीकंद आणि आऊ

तुमची डार्लिंग रुसल्या सारखी का दिसतेय.

>>>>कुठल्या फोटोत?

ती फक्त दोनच वेळेला रुसली. एकदा पंक्चर झाली तेव्हा आणि अजून एकदा त्याचे वर्णन येईल पुढे

वर्णन खासच, सगळी दृष्ये/प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडताहेत असे वाटते....

धन्यवाद विशू

पुढचा भाग लवकर नाही, कारण आमच्या इथे जोरदार खोदकाम केले आहे त्यामुळे आठवडाभर टेलिफोन इंटरनेट बंद आहे, ते पूर्वस्थितील आल्यावरच, कधी येईल देव जाणे

मस्त झालाय हा ही भाग. उत्कंठा वाढत चालली आहे.
उदयपूरमधे रस्त्यालगत असलेली किल्लासदृश्य वास्तू पहायला हवी होती असे वाटले.