पत्थर

Submitted by जव्हेरगंज on 14 November, 2016 - 03:06

rock

जवळ जवळ अडीच तास मी त्या बसस्टँडवर उभा होतो. कोणतीही बस आली की पळत जाऊन बोर्ड वाचणे हे माझे कामच होऊन बसले. अतिशय अवजड अशी सुटकेस मी एका बाकड्याच्या शेजारी ठेऊन दिली होती. तीही कोणीतरी उचलून चोरुन घेऊन जाईल म्हणून मी मोकळ्या पटांगणातून तिच्यावर नजर ठेऊन होतो. कोल्हापूरला जायच्या सतरा बस येऊन गेल्या. एकाही बसमध्ये नीट उभा राहायलाही जागा नव्हती. वरच्या दांडक्याला धरुन अडिचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास एका पायावर उभा राहून करायच्या विचारानेच कडमडायला झाले होते. आता इथे दिवसरात्र बसून राहिले तरी हाती काय फारसे लागणार नव्हते.

सरळ सुटकेस उचलली आणि हायवेवर आलो. मी मनातल्या मनात फार विचार करतो अशी लोकं बोंबा मारतात. आता विचार करण्याच्या प्रक्रियेवर मी कसा काय कंट्रोल ठेऊ शकतो हेच मला कळत नाही. माझ्या फुलप्रुफ प्लॅनिंगचा भाग असलेलं वडापसुद्धा माझ्या डोळ्यासमोर धूर सोडत निघून गेलं. तसंही त्यात भरपूर माणसं कोंबलेली आढळली. त्यामुळं जास्त दु:ख झालं नाही.

एका टपरीवजा हॉटेलासमोर सुटकेस टेकवली आणि फळकुटावर बसून चहा मागवला. या रणरणत्या उन्हात चहाच प्यायचा असतो अशी जशी काय घरची शिकवण असल्यासारखा तो आम्ही घशाखाली उतरवला.

कुठुणतरी एक ट्रक येतो. आणि हॉर्न वाजवून निघून जातो.

आमच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली. आता हा ऍडव्हेंचेर प्रवास ट्रकनेच करायचा प्लॅन करुन टाकला. नाहितरी बऱ्याच दिवसांचे ते एक स्वप्न होतेच.

*******

अगदी दाटीवाटीनं कुठल्यातरी बोळकांडात मी बसलो आहे. वरती कोपऱ्यात फुटलेल्या स्पिकरमधून यावा तश्या कर्कश आवाजात हिंदी गाणांच्या भडिमार चालू आहे. तिकिटाचे साठ रुपये किन्नरनं अगोदरंच घेेऊन ठेवले आहेत. हे एक बरंय. येश्टीला चांगले दिडदोनशे लागले असते.

वाईट विचार करु नये. या सणासुदीच्या दिवसात तर मुळीच नाही. पण शेजारी बसलेलं हे कुण्या गावचं पाखरु जरा जास्तंच अंगचटीला येत आहे. तसंही कुण्या एके काळी "आली अंगावर, घेतली शिंगावर" म्हणायला आम्हीही कसली कसर केली नव्हती. पण ट्रकमध्ये जीव मुठीत धरुन प्रवास करताना गोष्ट वेगळी होती. न जाणो हा त्यांच्या प्लॅनचाच एक भाग असेल तर. गोड पाखरु पुढे करायचं मग सावज जाळ्यात पकडायचं आणि पैसे उकळायचे. तसंही माझ्याजवळ चारपाचशे रुपये होते. जे कि मी चोरखिशात लपवले होते. त्यामुळे तसा काही धोका नव्हता. तापलेल्या इंजिनामुळं तापलेलं केबिन आणि त्यामुळं तापलेलं पाखरु असा काहिसा हा मामला होता. मी सावधान स्थितीतच प्रवास सुरु केला.

*****

"चला वडवळ, वडवळ. उतरा खाली.." डायवरनं गाडी साईडला घेतल्यावर किन्नर ओरडायला लागला. तसा जागा झाल्यासारखा ताडकन उठून बसलो. झोप लागली होती असं काही मला वाटलंच नाही. जागाच तर होतो कि सगळ्या रस्त्यानं. पुढ्यातली सुटकेस सीटखाली दाबून मी उतारुंना जागा करुन दिली. एक एक करत सगळेच खाली उतारले. साली आख्खी होल फॅमीली वडवळचीच निघाली. म्हणजे ते पाखरुही त्यातलंच. सालं मनभरुन बघताही आलं नाही.

मला एकदम नुकतंच काहितरी हरवल्यासारखं वाटलं. असली गोंडस पाखरं कशाला म्हणून त्या ट्रक ड्रायव्हरला साथ देतील. आणि असली गोंडस पाखरं हातात आल्यावर ट्रक ड्रायव्हर तरी कशाला त्यांच्याकडून असलं काही करुन घेतील. मी माझ्या विचारांचे बाण असेच उगाचच कोठेही सोडले होते.

आता ट्रक ड्रायव्हर लूबाडणूक करतात हे खरे आहे. बऱ्याच बायकांना ते फूस लावून पळवून घेऊन जातात हे ही खरे आहे. केबिनच्या मागे एक गुप्त दरवाजा असतो. त्यात बायकांना घेऊन जातात आणि त्यांच्यावर चाक करतात. याबाबत मात्र थोडी शंका आहे. कारण तसा काही दरवाजा कुठे आढळला नाही.

ट्रक जेव्हा पुन्हा महामार्गाला लागला तेव्हा मी जरा घाबरलोच. कारण ट्रकमध्ये आम्ही तिघेच होतो. एक तो ड्रायव्हर, किन्नर आणि मी. खरंतर मी एकटाच होतो असंच म्हणायला पाहिजे. कारण ते दोघे माझ्या लेखी कोल्ड ब्लडेड क्रिमीनल असणार होते.

तसंही ते दोघे भुरटे अजूनपर्यंत तरी काहीच बोलले नव्हते. वडवळ म्हणजे आम्ही जवळ जवळ निम्म्यापेक्षा जास्त अंतर क्रॉस केले होते. अजून ४-५ तासाचा प्रवास फारंच कंटाळवाणा वाटत होता. त्यात ते मगाचं पाखरु नसल्याने
झरझर होणारा प्रवास अचानक मरगळला होता. पाखरासोबत लागलेली सुखाची झोप पण आता आमच्या नशिबात नव्हती. सताड डोळे उघडे ठेवून समोरून येणाऱ्या हेडलाईट्स बघत आम्ही आमचे साठ रुपये वसूल करत होतो.

तेवढ्यात ट्रक अजून एकदा थांबला. "सांगली न्हायतर मिरजला सोडता का?" म्हणत टोपीवाला एकजण आत चढला. हे एक बरं झालं. हे आता मला लुबाडू शकणार नव्हते. कारण माझ्या साथीला अजून एकजण तिथे आला होता.

*****

टोपीवाल्यानं आल्या आल्या सुपारी वगैरे कातरुन एकेड खोंड सगळ्यांना खायला दिलं.
"कुठला माल हाय टरकत...?" वगैरे चौकश्या सुरु झाल्या. मधनंच त्यानं टेप बंद करायला लावला हे एक चांगलं केलं.
"तुमी काय कुटं नुकरीला का?" त्यानं मला विचारलं. मी नुसती मुंडी हलवली.
"घ्या जरा सरकून.." म्हणून तो मस्त पसरायला बघत होता. त्याची पांढरी पिशवी त्यानं मला शिटाच्या पलिकडं ठेवायला दिली. त्याच्या इजारीत बरंच काही खुळखूळ करत होतं. मी आखडूनंच बसलो. वैतागच आहे.
किन्नरनं पान बनवून गप्पांच्या ओघात सगळ्यांना खायला दिलं. त्याच्या कळकट हातातलं पान मला काही तोंडात घालवेना. मी तसंच हातात पकडून बसलो. माझ्याजवळ त्यांना देण्यासाठी असं काही नव्हतंच. गेलाबाजार आपण तंबाखूतरी सुरु करावी असा विचार मनात तरळून गेला. माझ्या बॅगमधली बाटली काढून मी थोडं पाणी पिलो. गडद अंधारात आता टेप बंद झाल्याने चिडीचूप शांतता होती. ट्रकचाच काय तो घर्रर आवाज अगदी स्टो पेटल्यासारखा येत होता.

टोपीवाला पसरल्या जागी निपचीत झोपला होता. नि किन्नर आणि ड्रायव्हर माझ्याकडे वळून वळून पाहत होते. मला काय चाललंय ते कळेना. मधूनच त्यांनी कन्नड संभाषण सुरु केलं.

एका खडकाळ जागी आडवाटेला त्यांनी ट्रक उभा केला. बाहेर कुठे ढाबाही दिसत नव्हता. बहुतेक धार मारायची असेल. मी आपला मगाचंच ते सुपारीचं खांडूक चघळून फोडायचा प्रयत्न करत होतो.

किन्नरनं आतला लाईट लावला. म्हणाला " आपने पान नही खाया साबजी.."
"नै मै पान नही खाता.." आता त्याला काहितरी सांगावं म्हणून मी सांगितलं.
त्यांनी एकमेकांकडे चकित नजरेनं पाहिलं. दोघेही थोडे घाबरल्यासारखे वाटले.

टोपीवाला अजून झोपलेलाच?

आणि अचानक मला परिस्थितीची जाणीव झाली. एका क्षणात मी एवढा विचार केला की त्यांचा मास्टर प्लॅनच माझ्यासमोर उघडा पडल्यासारखा झाला. खरंतर जिथे दातखीळ बसायला हवी तिथे मी थंड डोक्याने म्हणालो,
"मै इसके बारेमे किसीको बताऊंगा नही, आपको इसके साथ जो करना है वो करो.. चाहे तो मै मदद करता हू.."

ड्रायव्हरनं बराच वेळ माझ्याकडं रोखून बघितलं. म्हणाला, "तो उठाओ उसे, फेको बाहर.."

बापरे. म्हणजे हे खरंच होतं. याआधी जेव्हा जेव्हा मी पुढचा विचार करत होतो. तेव्हा पुढं भलतंच काहितरी घडलं होतं. पण इथेतर तंतोतंत तसेच घडत होतं.

मग मी पुढे होऊन त्या टोपीवाल्याला उचलायचा प्रयत्न करु लागलो. तसा किन्नरही पुढे होऊन त्याच्या खिशातल्या वस्तू बाहेर काढू लागला. त्या टोपीवाल्याची पिशवीही त्याने माझ्याकडून घेतली. बरीच उचकली. सगळे मिळून हजार बाराशे भेटले असतील.
"साबजी, आपने पैले ऐसा कुछ किया है?" त्या किन्नरनं विचारलं.
"नै... लेकीन करना चाहता था " मी ही एक गावगुंडच आहे हे मला ठसवून द्यायचं होतं.

फारसा माल हातात न लागल्यानं ड्रायव्हर जरा घुश्श्यातच होता. कन्नडमध्ये त्यानं किन्नरला बऱ्याच शिव्या घातल्या. शेवटी आम्ही तिघांनी मिळून त्या टोपीवाल्याला कसाबसा ट्रकच्या बाहेर काढला. रस्त्याच्या कडेला खडकाळ माळरानात नेऊन त्याला झोपवला. मी आपलं उगाचच त्याच्या अंगाखांद्यावर माती टाकून त्याला पुरायचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, "ऐसा मत कर.."
मी म्हणालो "ठिक है.."

मग ते दोघे पुढे निघून गेले. त्यांनी ट्रकही चालू केला. मी मस्तपैकी धार मारुन मग ट्रककडे गेलो. उंच उंच डोंगरांत खडकाळ मातीत अर्धवट पुरलेला टोपीवाला आता अजिबात दिसत नव्हता. किन्नरला खालूनंच विचारलं ,"यार यहा पत्थर बहोत है. कुछ दिखता है?"
तो म्हणाला, "नै, अब आके बैठीये.."
"मै बस एकही मिनिट मे आया.." म्हणून मी पुन्हा एकदा त्या माळरानाकडं गेलो.

******

ट्रकमध्ये मी जेव्हा पुन्हा आलो तेव्हा ड्रायव्हर वैतागलेलाच होता. कन्नडमध्ये काय बोलत होता देवजाणे. बहुतेक मी ऊशिरा आल्याने बोंबलत असावा. तो जरा शांत झाल्यावर मी किन्नरला विचारलं," आपने ऐसा पहले कितनी बार किया है?"
"कभी कभी करते है.. जादा नै.. आदमी अकेला हो तो ही करते है.."

तेवढ्यात तो ड्रायव्हर पुन्हा भडकला.

"वो बोल रहे है आपसे बात मत करो.." किन्नर मला म्हणाला.
मी म्हणालो, "ठिक है, वैसेभी मै किसीको बतानेवाला नही हू.. लेकीन मुझे ये तो बताव, पान मे ही जहर मिलाया था ना?"

"अरे नै नै, जहर नै वो, खाली निंद की दवाई थी. आदमी गुंग हो जाता है. उससे.."

"अच्छा, तो फिर वो दुसरे दिन जाग जाएगा ना"

"बराबर, जाग जाएगा.." मुंडी हलवत तो म्हणाला.

मला काय ह्यांचा प्लॅन कळेना. मी गोधळून विचारलं, "मतलब आप लोग उसे मारना नही चाहते थे?"

"क्या बात कर रहे है साबजी.. बिलकुल बी नही.."

"लेकीन मैने तो......." माझं पुढचं वाक्य ट्रकच्या करकचून दाबलेल्या ब्रेकमध्ये विरुन गेलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

भारी Happy

Pages