भेट हवी की भेटवस्तू ?

Submitted by कुमार१ on 11 November, 2016 - 23:21

सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे ! कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे. यथावकाश यजमान मंडळी त्या हिशेब वहीची बारकाईने तपासणी करत. अशा तऱ्हेने लग्नसमारंभाच्या देण्याघेण्याचा हिशेब यजमानाच्या स्मृतीत व्यवस्थित नोंदला जाई. याप्रकारे ‘लग्न हा एक बाजार असतो’ या विधानाला पुष्टीच मिळत असे. लग्नातील ही भेटवस्तू संस्कृती पूर्वापार चालू होती.

साधारण १९८० च्या दशकामध्ये शहरी भागांतील लग्नांमध्ये यावर विचारमंथन होऊ लागले. सुशिक्षित व नवमतवादी तरुणांना या पारंपरिक पद्धती मधले काही दोष चांगलेच खटकू लागले. ढोबळमानाने ते दोष असे होते:
१. एखाद्याने आपल्याला दिलेल्या भेटवस्तूची अंदाजे किंमत आपल्या मनात पक्की नोंदली जाते आणि यथावकाश त्याच्याकडील कार्यात त्या हिशेबी वृत्तीनेच आपण भेटवस्तू देतो. विशेषतः नातेवाईकांमध्ये तर ‘फिट्टम फाट’ होणे फार गरजेचे असते !
२. वस्तूऐवजी रोख रक्कम देणारे लोक आपण किती कुटुंबीय लग्नाचे जेवणार आहोत त्या हिशेबाने ती रक्कम ठरवत. अगदी जेवण्याच्या ताटाचा अंदाजे दर गुणिले आपली माणसे असा व्यवस्थित हिशेब असे!
३. एकूणच देण्याघेण्याच्या वस्तू या दुय्यम दर्जाच्या असतात.किंबहुना ती वस्तू विकत घेताना दुकानदारही तसे सांगूनच देतो. समजा, त्याच प्रकारची वस्तू जर का आपल्या स्वतासाठी घ्यायची असती तर आपण ती नक्कीच वरच्या दर्जाची घेतली असती.
४. तसेच, जेव्हा एखाद्याकडे अशा ठोकळेबाज भेटवस्तू साठतात तेव्हा त्या स्वतःसाठी वापरण्याऐवजी अन्यत्र ‘फिरवण्यासाठीच’ घरच्या माळ्यावर साठवल्या जातात.
५. भेटवस्तूच्या किमतीवरून यजमान ती देणाऱ्या व्यक्तीची ‘आर्थिक लायकी’ ठरवतो. ही मनोवृत्ती तर खूपच खटकणारी. त्यावरून घराघरात होणारे मानापमानाचे संवाद तर ठरलेलेच.
६. एकूणच काय, तर भेटवस्तू देताना धनाढ्य माणसाला आपली श्रीमंती दाखवता येते तर गरिबाला मात्र मनातून चोरट्यासारखे वाटते.
वरील सर्व गोष्टी टाळण्याच्या उद्देशातून ‘भेटवस्तू नकोत’ हा विचार पुढे आला. असा विचार करणाऱ्यांनी सुरवातीस निमंत्रण देताना सर्वाना तसे तोंडी सांगून पाहिले. पण, केवळ या तोंडी आवाहनाने पूर्वापार चालत आलेली ही रूढी मोडणे खरेच अवघड होते. मग यापुढची पायरी होती ती म्हणजे निमंत्रण पत्रिकेत तसे स्पष्ट लिहिणे. अशा पत्रिकांमध्ये नेहेमीच्या मजकुराखाली ‘’आपली उपस्थिती हाच प्रेमाचा आहेर, कृपया भेटवस्तू आणू नयेत’’ अशी तळटीप झळकू लागली.

अशा प्रकारची पत्रिका मी प्रथम १९८५ मध्ये पाहिली. नक्की हा प्रकार कधी सुरू झाला याबद्दल मला कुतूहल आहे कारण, लग्नसमारंभांच्या बाबतीतला हा एक ऐतिहासिक बदल म्हणता येईल. माझ्या लग्नात मी या प्रकाराचे आनंदाने अनुकरण केले हे सांगणे नलगे. सुरवातीस निमंत्रितांकडून याला मिळणारा प्रतिसाद हा संमिश्र होता. परंपरावाद्यांकडून तर प्रखर विरोधच होता. त्यामुळे यजमानांना पत्रिका देताना अशांकडून ‘’विवाहाला रिक्तहस्ते कधीही जाऊ नये’’, ‘’तुमच्या विनंतीचा स्वीकार करायचा की नाही ते आम्ही बघू’’ यासारखी विधाने ऐकून घ्यावी लागत.
काही सनातनी तर ‘’तुम्ही जर आमच्याकडून भेट घेणार नसाल तर आम्ही लग्नाचे जेवायचे तरी कशाला?’’ अशीही मुक्ताफळे उधळत. समाजात कोणताही नवा विचार रुजवणे किती अवघड असते हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. मात्र, एकीकडे बरेच तरुण या विचाराने प्रभावित होत होते आणि त्यांचे पालकही याला राजी होऊ लागले. त्यामुळे ‘तळटीपयुक्त’ पत्रिकांची संख्या हळूहळू वाढत होती.

हळूहळू काही समंजस पाहुणे ही विनंती ऐकू लागले. मात्र, काही जण हट्टाने भेटवस्तू आणत तर अन्य काही फक्त पुष्पगुच्छ आणत. त्यामुळे यजमानही गोंधळून जात. अशा भेटी हट्टाने देणाऱ्याला मंचावर नकार देणे खूप जड जाई. नंतर निमंत्रितांचाही नक्की काय करायचे याबाबत गोंधळ होऊ लागला. काही जण भेटी देत असतील तर आपण तसेच कसे जायचे? मग काहीनी एक शक्कल लढवली. भेटवस्तू न नेता बरोबर फक्त रकमेचे पाकीट ठेवायचे आणि मग सगळे पाहुणे जसे करतील त्याप्रमाणे आपण करायचे. थोडक्यात, यजमान व पाहुणे या दोघांनीही बराच काळ याबाबत धरसोड वृत्ती अवलंबिली होती.

त्यानंतरची सुमारे १५ वर्षे ही याबाबतीत संभ्रमावस्थेची होती. कालांतराने शहरी पांढरपेशा वर्गात ‘भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ नकोत’ ही मनोवृत्ती चांगली रुजली. त्यामुळे अशा ‘तळटीपयुक्त’ पत्रिका सर्रास प्रचलित झाल्या.काही यजमानांची तर ‘’भेटवस्तू आणू नयेत, आणल्यास नाकारल्या जातील’’ इतके परखड छापण्यापर्यन्त मजल गेली. मग निमंत्रीतही त्या सूचनेचा आदर करू लागले. एक नवी सामाजिक संकल्पना समाजातील काही वर्गात तरी रुजल्याचे दिसू लागले. अशा समारंभांना जाताना पाहुण्यांना एक मोकळेपणा वाटू लागला. कधीही एखादे निमंत्रण आले तर ‘’आहेर काय द्यावा बुवा?’’ याचा विचारही करण्याची गरज संपली. लग्नाला निव्वळ उपस्थित राहणे हा निखळ आनंद ठरला. देण्याघेण्यापेक्षा एकमेकांना भेटणे व दिलखुलास गप्पा मारणे हे अधिक महत्वाचे असते, हेही मनात ठसवले गेले.

मात्र समाजातील अन्य काही वर्गांना मात्र या बदलाची दखल घ्यायची कधी गरज वाटली नाही. त्यांनी पारंपारिक राहणेच पसंत केले. त्यांच्यामते या समारंभात वस्तूंची देवाणघेवाण ही एक आवश्यक बाब असते. त्यात उगाचच काहीतरी नवे खूळ आणायची काही गरज नाही, यावर ते ठाम होते व आजही आहेत. या गटातील काही बुजुर्गांनी तर ‘’मला कोणाकडून काही नको’’ हा एक प्रकारचा अहंकार असल्याचा विचार मांडला. तसेच समाजातील श्रमिक वर्गाचे याबाबतीतले विचारही जुन्या परंपरेच्याच बाजूने राहिलेले दिसून येतात. कदाचित पुरेशी आर्थिक समृद्धी असल्याशिवाय ‘काही नको’ हा विचार पचवणे अवघड असावे.

तर, आजच्या घडीला यासंदर्भात शहरी समारंभांमध्ये काय दिसते? खालील प्रकारचे प्रतिसाद पाहायला मिळतात :
१. ज्या निमंत्रणामध्ये तळटीप नसते त्या समारंभांना झाडून सर्व पाहुणे भेटी आणतात. याला म्हणायचे परंपरेचे पालन !
२. ज्या निमंत्रणामध्ये तळटीप असते तिथे त्या सूचनेचे बऱ्याच अंशी पालन होते पण, अजूनही १००% नाही. काही पाहुणे( विशेषतः नातेवाईक) स्वतःला अपवाद करून लग्नापूर्वी किंवा नंतर यजमानाच्या घरी जाऊन भेटी देतातच.
३. अजून एक वेगळाच प्रकार गेल्या ५ वर्षात दिसतो आहे. यात यजमान ‘तळटीप’ जरूर छापतो पण, लोकांच्या घरी जाऊन निमंत्रण देताना मात्र एखादी छोटीशी वस्तू त्यांना पत्रिकेबरोबर देतो. आता यावर पाहुण्याने काय करायचे बरे? यजमानाला परतफेडीची अपेक्षा आहे असेच गृहीत धरावे लागते! मग प्रश्न असा पडतो की, जर देवाणघेवाण हवीच आहे तर ‘तळटीप’ छापायचे नाटक कशाला? केवळ फॅशन म्हणून?
‘ लग्नात भेटवस्तू हव्यात की नकोत’ या प्रश्नाचे उत्तर तसे अवघड असून तो एका चांगल्या चर्चा वा वादविवादाचा विषय आहे हे नक्की. आपल्याला जर वस्तूंची देवाणघेवाण हवीच असेल, तर तळटीप देण्याचे नाटक मात्र नको आणि जर तळटीप मनापासून दिली असेल, तर यजमान आणि निमंत्रित या दोघांनीही त्यानुसार वागण्याचे बंधन पाळावे हे उत्तम.

भेटवस्तूच्या औपचारिकतेपेक्षा एकमेकाला मनापासून भेटणे हाच तर समारंभांचा खरा हेतू असतो ना?
************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
एका लग्नात मुलाचे आई-वडील दिवसभर दिसलेच नाहीत. कुठे गेले म्हणून शोधलं तर कळालं की आहेर देवाण-घेवाण मध्ये मग्न होते!! आणि कुंकू लाऊन लाऊन काकांचा मोती रंगाचा सफारी पार तांबडा-लाल झालेला. देण्यासाठी घेतलेल्या साड्या-शर्ट्पीस च्या संख्येचा अंदाज चुकल्याने वस्तू कमी पडल्या. मग ऐन वेळेला आहेर मॅनेज करणार्‍या लोकांनी आलेल्या आहेरांची लगोलग जशी जमेल तशी फिरवा फिरवी करून टाकली. मग नंतर जेव्हा काकूंना त्यांच्या एका मैत्रिणीने "अगं मी दिलेली साडी नेसलीस का?" असं विचारलं, तेव्हा काकूंकडे काही उत्तर नव्हतं. त्या उलट आहेर मॅनेज करणार्‍या लोकांवरच डाफरल्या की बघून तरी फिरवा-फिरवी करायची!!! अशा अनेक गमती त्या आहेर देवाण-घेवाणीत होतात!!

एका आत्याकडे वास्तु-शांती झाल्यावर ८-१० भिंतीवर लावायची घड्याळे, ४-५ टी सेट, १०-१५ शो पीसेस, अनेक प्रकारची " फॅन्सी" भांडी वगैरेंचा खच पडला होता. त्याचे काय करायचे कळेना!!

आहेराचा आयटम कमी केला, की लग्न-कार्य अर्धी सोपी होतात असा अनुभव आहे.

३. अजून एक वेगळाच प्रकार गेल्या ५ वर्षात दिसतो आहे. यात यजमान ‘तळटीप’ जरूर छापतो पण, लोकांच्या घरी जाऊन निमंत्रण देताना मात्र एखादी छोटीशी वस्तू त्यांना पत्रिकेबरोबर देतो. आता यावर पाहुण्याने काय करायचे बरे? यजमानाला परतफेडीची अपेक्षा आहे असेच गृहीत धरावे लागते! मग प्रश्न असा पडतो की, जर देवाणघेवाण हवीच आहे तर ‘तळटीप’ छापायचे नाटक कशाला? केवळ फॅशन म्हणून? >>> हा प्रकार मात्र भयंकर त्रासदायक आहे. आम्हाला तुमचे काही नको. पण तुम्ही आमचे गिफ्ट घ्या. हा तद्दन शो-ऑफ आहे!

पण लोक हळूहळू सुधारताहेत हे आशादायक.

धन्स, शरी.

हा प्रकार मात्र भयंकर त्रासदायक आहे. आम्हाला तुमचे काही नको. पण तुम्ही आमचे गिफ्ट घ्या. हा तद्दन शो-ऑफ आहे! >> एकदम सहमत.
ग्रामीण भागात काय परि स्थिती आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

तिकडे तर लाऊडस्पीकर वरून अनौन्स होते काय गिफ्ट दिले ते >> अत्यंत खटकणारा प्रकार आहे हा. हे म्हणजे पाहुण्यांची जाहीर आर्थिक लायकी काढणे वाटते.

असे लोक मी पाहिले आहेत, जे स्वतःला पाहिजे ते करतात, इतरांच्या इच्छेचा जराहि विचार करत नाहीत, किंवा इतर कशाचाहि विचार करत नाहीत. मी एका घरी सांगितले की मी जेवून लगेच येतो. ते म्हणाले ठीक आहे. मी पोचल्यावर म्हणतात, आम्ही सगळेच तुमच्यासाठी जेवायला थांबलो आहोत, कारण घरी येणार्‍या पाहुण्याने जेवले पाहिजे अशी आमची घरची रीत आहे, तर तुम्ही परत जेवायला बसा, नि आम्ही आग्रह केला तर मोडू नका, नाहीतर आम्हाला वाईट वाटेल.
स्पष्ट शब्दात सांगितले, निमंत्रण पत्रिकेत लिहीले, की भेट आणू नका, तरी "आस्सं कस्सं, भेट दिल्याखेरीज जायला बरं नाही वाटत, नै क्का?" असे म्हणून भेट आणायची!

माझे एक मित्र, ज्यांची मुलगी अचानक वारली, त्यांनी सर्वांना निरोप जाईल अशी व्यवस्था केली की जरा आठ दिवस आम्हाला आमचे एकटे राहू दे, कुणी इतक्यात भेटायला येऊ नका. तरी पण "अहो, पण दोन दिवस झाले कळून, जायला नको का? त्यातून आम्ही चार दिवसांनी भारतात जाणार ते महिनाभर" म्हणून दोघी तिघी तडफडत गेल्या. अजिबात सोयीचे नव्हते, मित्राला, तरी पण आमच्या सोयीने, आम्हाला वाटते म्हणून "भेटणे उरकून घेऊ"ही वृत्ति!

जे दुसर्‍याच्या इच्छेचा, सोयीचा जराहि विचार न करता, आपल्याला हवे ते करतात त्यांनी एरवीहि काही केले तरी मनाला पटत नाही. असे वाटते, ते माझ्यासाठी काही करत नाहीयेत, स्वतःसाठीच!

इकडे असणारी गिफ्ट रजिस्ट्री अजून पूर्ण पचनी पडली नाहीये पण लग्नानंतर सगळेच आपला स्वतंत्र संसार थाटत असल्याने उपयोगी आहे/असावी असं वाटतं. बेबी रजिस्ट्री ही तशीच.

'तळटीपयुक्त' लग्नपत्रिका' सर्वप्रथम कधी ( किती साली) पाहण्यात आली ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

लग्नासारख्या प्रसंगी काहीतरी घेउन जावेसे वाटतेच ना. अशी तळ्टीप छापु नये. फार तर रिटृन गिफ्ट्ची व्यवस्था करावी. वस्तु आवडो, न आवडो, काहितरी उपयोग होतोच ना. दान करता येते, गरिबाला अप्रुपच वाटते, आपल्याला नाही आवडली तरी. आमच्या लग्नातल्या कितीतरी वस्तु मी गावी बायांना दिल्यात. त्या पुढे त्यांनी कुणाला दिल्या असतील, वापरल्याही असतील.

अलिकडचा महत्वाचा व स्तुत्य प्रकार विसरलात. आहेर घेत देत नाहीत, पण आलेले पैसे एखाद्या संस्थेला दान केले जातात. तसे स्पष्ट सांगितलेही असते. मला आवडले हे.

वाचताना अगदी अगदी झाले Happy

पूर्विच्या काळी (आणि अजूनही आर्थिक दृष्ट्या मागास वर्गात) यजमानाला आहेर देणे गरजेचे होते. कारण आर्थिक परीस्थीती बेताचीच असल्याने लग्नासारख्या समारंभाने कंबरडे मोडून जायचे. पण आता मात्र आहेराची देवघेव फक्त दिखाव्याकरताच होते बहुतेक वेळा.

अजून एक प्रकार म्हणजे पत्रिकेत तळटीप असेल तर देवाण्/घेवाण केळवणाच्या वेळेसच उरकली जाते - म्हणजे ज्यांच्याकडे केळवण होते त्यांच्यापुरतीच आहेराची देवाण्/घेवाण होते. बाकिच्यांना नाही. Happy

अलिकडचा महत्वाचा व स्तुत्य प्रकार विसरलात. आहेर घेत देत नाहीत, पण आलेले पैसे एखाद्या संस्थेला दान केले जातात. तसे स्पष्ट सांगितलेही असते. मला आवडले हे. >> अगदी योग्य. मी हे फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष पाहिले नव्हते म्हणून लिहीले नाही.

पोटे तुडुंब भरलेल्यांनी एकमेकांना देत बसण्यापेक्षा हा प्रकार खरोखर चांगला आहे.

पोटे तुडुंब भरलेल्यांनी एकमेकांना देत बसण्यापेक्षा हा प्रकार खरोखर चांगला आहे. >>>> + १ मी भेट वस्तु स्विकारत नाही व देतही नाही. मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेत तळटीप लिहली होती. शगुन है म्हणून बळजबरी हातात कोंबत होते. किती जणांना समजवत बसणार .... मारे लिहीलं होतं पण पाकीट स्विकारते..
अशी टीकाही ऐकावी लागली ...

छान लेख. आवडला.
कदाचित पुरेशी आर्थिक समृद्धी असल्याशिवाय ‘काही नको’ हा विचार पचवणे अवघड असावे. >> +१००
त्यामुळे शहरी भागात 'भेटवस्तू नकोत' हा विचार बर्‍यापैकी रुजला. पण ग्रामिण भागाने पारंपरिक राहणे पसंत केले.

आपल्याला जर वस्तूंची देवाणघेवाण हवीच असेल, तर तळटीप देण्याचे नाटक मात्र नको आणि जर तळटीप मनापासून दिली असेल, तर यजमान आणि निमंत्रित या दोघांनीही त्यानुसार वागण्याचे बंधन पाळावे हे उत्तम. >> असे बंधन न पाळणारे ढोंगी दिसून येतात खरे.