जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १३): नाथद्वारा - सुंदर अनुभव

Submitted by आशुचँप on 9 November, 2016 - 16:28

http://www.maayboli.com/node/60609 - (भाग १२): भिलवाडा - हजार किमी पार
======================================================================

आज बाकी दिवसांच्या तुलनेत जरा कमी अंतर होते ११५ किमी. त्यामुळे सगळेच रिलॅक्स होते आणि मी तर अगदीच. मी असाही १००-१२० पर्यंत कंफर्टेबल असायचो, नंतर एक एक किमी जीव खायचा. हे सगळ्यांना माहीती असल्यामुळे आज त्यांनी ठरवून मला बकरा केला.
आवरून जेव्हा बाहेर आलो तेव्हा सगळेच गंभीर चेहऱ्याने चहा पित उभे होते. मी हळूच विचारले काय झाले, तर मला म्हणे आपला जो आजचा रस्ता आहे, त्यावर खूप काम सुरु आहे, सगळा रस्ता खोदून ठेवला आहे.

म्हणलं, मग,
"आपल्याला दुसरा रस्ता घ्यावा लागेल, तो जरा लांबून आहे"
"किती लांब आहे असा?"
"जवळपास ५० किमी जास्त पडतील"
पन्नास....मी ओरडलोच...च्यायला पन्नास किमी जास्तीचे म्हणजे लईच झाले.

"तरी बरंय, आज अंतर कमी होते, नाहीतर आपली वाटच होती" - इती काका

माझे लगेच मनातल्या मनात हिशेब सुरु झाले, ११५ आधिक ५० म्हणजे १६५ म्हणजे अमृतसर ते मुक्तसरइतके. तेव्हा काय वाट लागलेली माझ्या चांगली लक्षात होती. आणि त्यानंतरच पायाचे दुखणे सुरु झालेले. मी ते आठवून एकदम हवालदील झालो. मग त्यातल्या त्यात आपला भिडू म्हणून हेमला बाजूला घेतले, त्याला म्हणले, इतके अंतर खूप होतायत, आपण थोडा वेळ टेंपो करण्यासाठी काकांना पटवू.
च्यामारी आमचे लोक इतक्या तयारीचे, हेमला मी बाजूला काढणार माहीती असल्याने त्यांनी त्याला आधीच फितवला होता. आणि त्या बिलंदराने मला मुळीच पत्ता लागू दिला नाही. म्हणे, मी बोललो त्यांना, पण ते ऐकत नाहीत. हे मलाही माहीती होते, की काका कितीही अंतर असले तरी टेंपो करायला मुळीच राजी होणार नाहीत.

मग मी सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दरम्यान, खाली आलो, तिथे एकजण उभा होता. त्याला विचारले, की "भय्या ये जो काम चल रहा है, वो कितना खराब है, सायकल भी नही जा सकती क्या..?"
तो एकदम ब्लँक, म्हणे "कौनसा काम, अभी कोई नही काम चल रहा"
आता यावरून तरी मला लक्षात यायला हवे होते, पण मी ते काकांच्या कानावर घातले, म्हणलं अहो काही काम सुरु नाहीये असे म्हणतोय.
तर म्हणे, "आपल्या हॉटेलच्या मॅनेजरचे तिथे घरच आहे, तो कालच आलाय. इतका रस्ता उखडलाय की गाड्यापण जाऊ शकत नाहीत. सगळ्या गाड्या वळून जातात."
म्हणलं, त्यांच काय जातयं एक दोन लीटर पेट्रोल जास्त लागत असेल. इथे आमचा लिटरभर घाम गळणार त्याचे काहीच नाही.

मी इतका बिच्चारा भोळा भाबडा असे बिच्चारे तोंड करून सायकल काढू लागलो. मी काहीच बोलत नाहीये म्हणल्यावर सगळे हसायला लागले. मी आपला टकाटका त्यांच्या तोंडाकडे बघतोय. माझी फिरकी घेतली हे जेव्हा मला समजले तेव्हा त्याचा राग यायचा ऐवजी आता आपल्याला इतके अंतर जास्त पडणार नाही याचाच आनंद जास्त झाला.

अशा गमतीजमतीतच वॉर्म अप करून पुढे निघालो. राजस्थानात दुपारी भास्करराव मरणाचे पिडत असले तरी ते कामावर यायच्या आधी मस्त गारठा असायचा. इतका की नाकावर रुमाल नसेल तर सुरसुर करत नाक वाजायचे. असेही आम्ही जॅकेट, वुलन ग्लोव्ज, कानटोपी वगैरे घालायचोच. कारण ही कोरडी थंडी अतिशय बेकार. एकदम हाडापर्यंत जायची. आणि जसे जसे उन्ह वाढायचे तसे एक एक वस्त्रप्रावरणे उतरवून कॅरीयरवर बांधून टाकायचो.

दरम्यान, मी सध्या रोज सकाळी मनात आस्था चॅनेल लावायला सुरुवात केली होती. सकाळचा वेळ प्रसन्न असताना, गाणी ऐकण्यापेक्षा मी मनातल्या मनात सगळी स्त्रोत्रे, आरत्या म्हणायचो. पार अगदी अथर्वशिर्षापासून, रामरक्षा, भीमरूपी, शिवमहिन्म (पूर्ण नाही, थोडेच), झाडून सगळ्या आरत्या आणि मग शेवटी पसायदान. मस्त वाटायचे.

हे रामदेव बाबा वेगळे आहेत. चौदाव्या शतकात अवतार घेतलेले बाबा हिंदुंचे देव आहेतच शिवाय मुस्लिम समुदायही त्यांना रामशहा पीर म्हणून भजतो.

तर अशाच मंगलमय वातावरणातून जात असताना काका मागे पडल्याचे लक्षात आले नाही. थोडे वेळाने लान्सला त्यांचा फोेन आला, त्यांनी आम्हाला सगळ्यांना मागे बोलावले. काय झाले असावे म्हणून मागे फिरलो, तर एक स्थानिक रहीवासी होता. त्याने सगळी चौकशी करून आपुलकीने आम्हाला नाष्टा अॉफर केला होता. काकांनी नाही म्हणून पाहिले पण तो ऐकेच ना. त्यामुळे आम्ही मागे फिरलो. एकंदरीत भिलवाडा गाव त्यांच्या आपुलकी आणि पाहुणचारासाठी चांगलेच लक्षात राहीले.

...

समोर गरमागरम कचोऱ्या बनवणे सुरु होते आणि आम्ही त्यांचे काम बघत टंगळमंगळ करत होतो तर माझ्या मनात वात्रट कल्पना आली. असेही मी आध्यात्मिक फेज मध्ये होतो. म्हणलं, आपल्या लान्सदादांवर का आरती रचू नये.

कारण लान्स म्हणजे सायकलचा बादशहा. कितीही अंतर असू दे, कितीही खडतर रस्ता असू दे तो एकदम स्थितप्रज्ञ. एकतर अफाट फिटनेस, चांगलाच वेग आणि माश्याने पोहावे इतक्या सहजतेने सायकल चालवायचा. चढावर ते फार जाणवायचे, आम्ही आपले दात ओठ खात, चेहरा वेडावाकडा करत चढ चढायचो, तर शेजारून लान्सदादा जणू फ्लॅट रोड आहे अशा आरामात पुढे जायचे. बाबुभाई अतिशय स्वे होत सायकल चालवायचा, वेदांग चित्तथरारक कसरती करायचा पण लान्सदादांची पोझीशन अजिबात हलायची नाही.

असेही त्यांच्याकडे प्राचिन अशा नृसिंहमंदिराचे पुजारीपण चालत आलेले, त्यामुळे आरतीखेरीज त्यांना काय देणार. म्हणून मी ओळी जुळवायला सुरुवात केली.

जय देव जय देव जय लॅन्सेश्वर दादा!
तुमचे पाय जणू भीमाची गदा जय देव जय देव!!

आयला, भारी जमलेय म्हणत मी सगळ्यांना सांगितले. आणि बिचाऱ्या लान्सदादांसमोरच आम्ही आपापल्या प्रतिभाशक्तींना धार लावायला सुरुवात केली.

वेग तुमचा ऐसा, नच कैसी भीती!
टेम्पो रिक्षावाले विस्मये पाहती!!
घेतली मेरिडा, गति ऐसी वाढे!
रोडबाईक्ससुद्धा हो पडताती मागे!!

जय देव जय देव

सगळे हसून हसून बेजार झालेले पण थांबायला तयार नाही कुणी. मग पुढचे कडवे आले.

एसआर होउनी आशीर्वाद द्यावा!
हेडविंड्स अन् चढाचा फेरा चुकवावा!!
शांत, सोज्वळ अशी दादांची मूर्ती!
त्यांच्या फिटनेसची त्रिखण्डात कीर्ती!!

जय देव जय देव

(एसआर - सुपर रँडोअर. एका वर्षात सगळ्या बीआरएम पुर्ण करणाऱ्या सायकलपटूला हा मान मिळतो)

दादांचे आशिर्वाद :प

पुढे गेलो एक गाव लागले आणि रस्ता इतका खराब कि नुसते खड्डे खड्डे. अतिशय अरुंद रस्ता, दोन्ही बाजूने दुकाने, कधी कधीतर बोळातून चाललोय का काय असे वाटावे इतपत. मध्ये एके ठिकाणी हवा भरायचे दुकान दिसले. एरवी आमच्याकडे पंप असायचे, पण इतके वेळा ते हापसत बसायचा कंटाळा म्हणून आयती हवा दिसली आणि सगळ्यांनी घाऊकमध्ये टायर टणक करून घेतले. त्याचे वेळी माझ्या लक्षात आले की माझा वुलन ग्लोव्ह कुठेतरी पडलाय. खायच्या वेळी मी तो हँडलबारबॅगवर खोचून ठेवला होता.

अरर, इतके वाईट वाटले, तो जम्मुच्या आर्मी दुकानातून घेतलेला मस्त ग्लोव्ह होता. आशा वाटली की खड्डाळ रस्त्यात कुठेतरी पडला असावा, म्हणून मी तब्बल एक-दोन किमी मागे गेलो रस्त्याने शोधत शोधत. आणि आता नाही सापडत म्हणत निराशेने परत फिरणार तोच रस्त्यात पडलेला सापडला. एक दोन गाड्यापण त्यावरून गेल्या असाव्यात पण टिकून होता.

त्याचा टिकाऊपणा आणि आमची साथ किती पक्की होती हे सांगायचे तर पुढे नंतर कधीतरी एकदा कॅरीअरवर काढून ठेवलेले असताना उडाला आणि एका गटारीत पडला. काळ्याशार पाण्यात. विचार आला टाकून द्यावा. पण नाही, मी तो काढला स्वच्छ पाण्याने धुतला, उन्हात कॅरीअरला लाऊन खडखडीत वाळवला आणि मग पावडर वगैरे लाऊन वापरणेबल केला आणि पुण्याला घेऊन आलो. अजून एकदा गुजराथेत हॉटेलवर विसरलो तर वेटरने आणून दिला.

असो, तर आता उन्हाचा कडाका मस्त वाढत चालला होता. फेब्रुवारीतच इथे इतके उन्ह असेल तर ऐन उन्हाळ्यात काय अवस्था असेल असा विचार करतच त्या उन्हातून सायकल रेटत चाललो होतो. खुडबुड गाव मागे पडल्यानंतर तर मस्तपैकी फोर लेन रस्ता लागला. म्हणजे, अजून रस्ता होत होता, पण तुरळक वाहतुक सुरु होती आणि बाजूला कॉक्रीटकरणाचे साहीत्य पडलेले दिसत होते. मी आणि हेम सोबतीने गप्पा मारत, पुढच्या ट्रेकचे बेत करत निवांत चाललो होतो आणि काकांना वरचेवर कामाचे फोन येत होते त्यामुळे ते थोडेसेच मागून येत होते. तशा उन्हातही स्पीड चांगला पडत होता, आणि आता सवय झाली असावी बहुदा पण ३ तासात ४० हे फार अवघड गणित वाटत नव्हते. पण या उन्हाचे काय करावे कळत नव्हते.

शेवटी एके ठिकाणी या वास्तूचे फोटो काढायला थांबलो तिथेच सावलीत बांधकामासाठी ठेवलेल्या वाळूचा ढीग दिसला. मी सायकल लावली आणि त्या वाळूवर सूर मारला. सुदैवाने ती वाळू सावलीत असल्यामुळे एकदम अशी गार होती आणि त्यावर पसरल्यावर तापलेल्या शरीराला जो काही थंडावा मिळालाय त्याला तोड नाही. माझे बघून हेमपण बाजूला पसरला. असेच आम्ही निवांत पडून मागून येणाऱ्या काकांची वाट पहात होतो तर हेम म्हणे, या काकांची पण कमाल आहे.
म्हणलं काय झालं रे..
तर म्हणे, अरे ते सातत्याने फोनवर बोलतायत आणि त्याच वेळी आपल्या स्पीडने सायकलपण मारतायत. काय अद्भुत आहेत हे.
म्हणलं, ते घाटपांडेकाका आहे बाबा, अजब रसायन आहे. त्यांनी कित्येक राईड अशा बोलत बोलतच पार केल्या आहेत.

आणि मग आल्यानंतर काकांनाही आम्ही जबरदस्ती त्या वाळूवर पडून गार व्हायला लावले आणि मगच पुढे निघालो.

नंतर तर अजूनच कडक रस्ता मिळाला. इतका सुंदर, खड्डेविरहीत रस्ता आणि आजूबाजूला विस्तिर्ण माळरान हा विरोधाभास इतका भन्नाट होता. मध्ये एक नदी लागली त्या ब्रीजवर पण डेकोरेशन आणि काय काय.

एकूणच एकतर इथे कुठल्यातरी मोठ्या कंपनीचा प्रोजेक्ट असणार याची कल्पना आली. कोकणात जसा एन्रॉन असताना रस्ता झ्याक होता, तसेच काहीतरी असणार. एक मोठा पॉवर प्लँटही दिसला त्यावरून खात्रीच पटली.
मी वाटेत मग एक ट्रॅव्हलॉग व्हिडीओ बनवला छोटासा. सायकल चालवता चालवता. पुढे सगळे थांबलेच होते. आज असेही अंतर कमी असल्यामुळे नाही म्हणलं तरी थोडा निवांतपणा आला होता. त्यामुळे पुढे जात असताना वाटेत एक शाळा दिसली. मधली सुट्टी झाली असावी कारण शिक्षकांसकट सगळी पोरे टोरे बाहेर मैदानावर होती. मी पुढे गेलेल्यांना हाकारून मागे बोलावले आणि म्हणलं, चला आपण शाळेला भेट देऊ. आणि वाट न बघता मी खाली उतरून शाळेत पोचलोसुद्धा. पाठोपाठ बाकीचे आले.

तोपर्यंत सगळी शाळा आमच्याभोवती जमा झाली होती. आमच्या सायकली, जर्सी, हेल्मेट, विविध गॅजेट हे सगळे बघून कुठल्या ग्रहावरचे लोक आलेत असे काहीसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्या इवल्या इवल्या डोळ्यात इतके कुतुहल दाटून आले होते.
मी पहिल्यांदा बाईंची परवानगी काढली, म्हणलं आपकी इजाजत हो तो बच्चोसे थोडी बातचीत कर लू.
त्या काय नाही म्हणतायत, त्यांच्या हे सगळे अवाक्याबाहेरचे होते. अचानक कुणीतरी अजब लोक येतात काय आणि मुलांशी बोलू म्हणातात काय. त्यांनी नुसती मान डोलावून होकार दिला.

मग मी थोडक्यात त्यांना आमच्या मोहीमेची माहीती दिली. जम्मुवरून कसे निघालो, जवानांना कसे भेटलो, ते कसे आपल्यासाठी तिकडे कडाक्याच्या थंडीत पहारा देतात. मग सायकलबद्दल बोललो, की सायकल चालवण्यामुळे कसे आरोग्य टिकून राहते, प्रदुषण होत नाही.

डोळ्यातली उत्सुकता बघा

मग वाटले नुसते बोलून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष दाखवावे म्हणून मी बाईंकडे भारताच्या नकाशाची मागणी केली. आणि धक्कादायकरित्या बाई म्हणल्या शाळेत नकाशाच नाही. मी इतका अचंबित की कारण शाळेत घंटा आणि शिपाई असण्याइतकेच नकाशा असणे हे मी गृहीत धरले होते. बर शाळाही काय बालवाडी नव्हती, चांगली पाचवीपर्यंतची होती. मुलांवरून कळत होतेच.

मग तेवढ्यात लक्ष भिंतीवर रंगवलेल्या नकाशाकडे गेले. त्यात फक्त सगळी राज्य ढोबळमानाने दाखवली होती. म्हणलं, इतकं तर इतकं. मग त्यांना अंदाजानेच जम्मु दाखवले, मग तिथून कसे पंजाब, अमृतसर करत आलो. मग गेल्यावर्षी कसे कन्याकुमारीला गेलेलो तेही सांगितलं. ते सांगताना असे वाटले, च्यायला लईच फिरलो राव आपण नाही म्हणत म्हणत.

सुरवातीला पोरे जरा बुजत होती, मग त्यांना अजुन खुलवायला म्हणून काही गंमती जमती सांगितल्या, काही प्रश्न विचारले. मग ती एकदमच बिलगली. त्यातला एक चुणचुणीत पोरगा होता. पुढे येऊन म्हणाला, मै भी आपकै जैसा सायकल चलाऊंगा आणि और आपके गांव आउंगा.

म्हणलं, शाब्बास रे पठ्ठ्या. प्रत्यक्षात तु येशील ना येशील ते पुढे, पण तुला डोक्यात तसे करावे वाटले हेच भरपूर आहे. मग सगळ्यांना मनसोक्तपणे सायकल हाताळून दिली. (अर्थात काही उपद्व्याप करत नाहीत ना हे बघूनच), फोटोसेशन केले. बाई इतक्या लाजत होत्या की त्याकाही आल्याच नाहीत फोटोत.

कॅमलबॅग अर्थात चोखनळीचे प्रात्यक्षिक करून दाखवताना हेम

हे वाचून तर अगदी सार्थक झाले

एकंदरीतच मस्त वाटले, त्या पोरांशी गप्पा मारून. जम्मुला भेटलेले जवान आणि इथे ही शाळकरी दोस्त मंडळी या दोन अनुभवांनीच इतके श्रीमंत झाल्यासारखे वाटले की यासारख्या अनेक मोहीमांना ती एनर्जी पुरून उरेल.

तिथून बाहेर पडताना ओबी आणि वेदांगनी मिळून किस्सा केला. ओबीने या ट्रीपसाठी म्हणून खास गोप्रो घेतला होता. आणि रोज सकाळी निघताना आज कुठे जाणार, कसे वातावरण आहे हे आणि संध्याकाळी दिवसभराचे वर्णन सांगायचे काम माझ्याकडे होते. पहिल्या दिवसापासून आम्ही हे करत आलो होतो, आणि आल्यावर एक संपूर्ण व्हिडीओ लॉग झाला असताना छानपैकी. तसेच वाटेत पण चालवता चालवता त्याने बरेच शूट केले होते. आणि शाळेपाशी त्याचे पहिले कार्ड संपले, ते बदलून नवे टाकले आणि तू ठेव मी ठेवच्या गोंधळात ते खाली पडले. तिथे खडी, माती आणि बारके दगड इतके होते की त्यात ते इवले कार्ड सापडता सापडता दमछाक झाली.

सगळे मिळून अगदी जमिनीला नाक लाऊन, डोळ्यात तेल घालून ते कार्ड शोधायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ते शेवटपर्यंत सापडले नाही. कार्ड गेल्याच्या दुख्खापेक्षा शूट केलेले प्रसंग गेले याची हळहळ जास्त होती. तब्बल पाऊण एक तास शोधूनही ते सापडले नाही मग नाद सोडून पुढे निघालो. ओबीच्या चेहऱ्यावर इतकी निराशा दाटली होती. शेवटी त्याला बरे वाटावे म्हणून मी म्हणलं, पाहिजे तर मी काय काय बोललो ते परत शूट करू. असेही आपण सकाळी कमी उजेडात आणि रात्री अंधारातच शूट केले आहे. आपण तसेच काहीतरी करू आणि दाखवू लोकांना, त्यांना थोडीच कळणार जम्मुत केले का राजस्थानात. या वर त्याला हसावे का रडावे कळेना.

द बँडीट्स :प

दरम्यान काकांना या प्रकाराची कल्पनाच नसल्यामुळे ते पुढे सटकले होते. मागून सुसाट ग्रुप त्यांच्या वेगाने पुढे गेला आणि मी आणि हेम पुन्हा एकदा सकाळचा धागा पुन्हा पकडून निवांत सायकल चालवत राहीलो.

आणि माझे आत्तापर्यंतच्या मोहीमेतले पहिले पंक्चर झाले. मी नवीन टाकलेले श्वाल्बचे व्हाईट वॉल टायर्स इतके भारी निघाले की गेल्या दीड वर्षातले हे पहिले पंक्चर होते. कन्याकुमारी राईडच्या आधी टाकलेले, त्यानंतर सायकल विकली पण टायर माझ्याकडेच ठेवले. नव्या सायकलला काही महिने ताबडवल्यानंतर मी पुन्हा श्वाल्बवर आलो आणि दोन अडीच हजार किमी चालवल्यावर पहिले पंक्चर. मी त्यामुळे इतक्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो की आपले टायर कधी पंक्चरच होणार नाही. त्यामुळे मी एकच स्पेअर ट्युब घेतली होती. आणि ती देखील सामानात आत कुठेतरी टाकली होती.

मग लान्सदादांकडची स्पेअर ट्युब घेतली पण त्यांना मी ट्युब आणली नाही हे फारसे पसंत पडले नाही. नंतर त्यांनी ते बोलून दाखवलेच.
आमचे पंक्चर काढणे सुरु असताना गाडीवरून दोघे आले. कुठल्यातरी स्थानिक वृत्तपत्रात काम करत होते. मग त्यांनी सगळ्यांची थोडक्यात मुलाखत घेतली, कुठून चालले वगैरे, फोटो काढला. मी खरे तर आपल्या क्षेत्रातला म्हणून भरभरून बोलणार होतो पण त्याने तेवढ्यात माती खाल्ली.

म्हणे, हमारा पेपर ज्यादा बडा नही है, एकदम सडकछाप है

आता यात त्याला नक्की काय ध्वनीत करायचे होते ते कळले नाही पण आपली रोजीरोटी ज्यावर आहे त्याला असे चारचौघात, अनोळखी लोकांसमोर इतके टाकून बोलणे मुळीच पसंत पडले नाही. मान्य आहे नसेल त्याला आवडत पण एक प्रोफेशनल एथिक्स म्हणून आपल्या कंपनीचा पाणउतारा कधीच करू नये या मताचा मी आहे. कंपनीच नव्हे तर आपले कलिग्ज, बॉस यांच्याबाबतही तेच. कितीही तुम्हाला त्यांचा तिटकारा असला तरी आपल्या फिलिंग्ज समोरच्या त्याही अनोळखी व्यक्तीसमोर झाकूनच ठेवल्या पाहिजेत.

त्याचा हा अप्रोचमुळे माझ्या मनातून तो पारच उतरला आणि मी पत्रकार हे सांगितले नाहीच शिवाय एक शब्दही बोललो नाही.

पुढे गंगापूर गावातून पुढे निघालो. या गावाची कहाणी अशी शिंदे घराण्याच्या महाराणी गंगुबाई या मेवाडचे महाराणा आणि देवघड राव यांच्यातील तंटा सोडवण्यासाठी आलेल्या असताना लालपुरा येथे त्यांचे आजारी पडून निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मेवाडने ग्वाल्हेर राज्याला लालपुरा आणि जवळपासची १२ गावे भेट दिली. लालपुरामध्ये त्यांची समाधी बांधण्यात आली, आणि तेच आजचे गंगापूर. (संदर्भ विकीपिडीआ)

त्यानंतर राजसमंड गावाची पाटी दिसली. पण गाव बरेच आत होते. इथे १७ व्या शतकात महाराणा राजसिंग यांनी एक अतिविस्तिर्ण तलाव बांधला होता. तब्बल ५१० स्क्वेअर मीटर इतक्या आकाराचा हा तलाव मानवनिर्मीत असल्यामुळे एक आश्चर्यच मानले जाते. इथल्या संगमरवरी पायऱ्यांवर मेवाड घराण्याचा इतिहास कोरला आहे. तब्बल २७ प्रचंड आकाराच्या संगमरवरावर कोरलेला हा इतिहास भारतातील सर्वाधिक लांबीचे कोरीवकाम म्हणून ओळखला जातो. (सं. विकी)

जसे जसे नाथद्वाराकडे सरकत होतो तसे तसे उंची वाढत चालली होती. अरवली पर्वतरांगा जवळ आल्याचे जाणवत होते. तरी नशिबाने आम्हाला पुर्ण रांग पार करायची नव्हती. आम्ही आपले त्यातल्या त्यात शेपटाचा थोडासा उंचवटा पार करणार होतो. पण तोही थोडका म्हणता येईल असा नव्हता.
आज दिवसभर आम्ही अपहील क्लाईंबच म्हणता येईल असे करत चाललो होतो पण चढ अगदी तीव्र नसल्यामुळे आणि नॅशनल हायवे पकडल्यामुळे फार त्रास होत नव्हता.

सगळ्यात गंमत आली ते जेव्हा नाथद्वाराला पोचलो तेव्हा. नाथद्वारा म्हणजे श्रीनाथजी अर्थात श्रीकृष्णाकडे जायचे प्रवेशद्वार. सातवर्षीय श्रीकृष्णाचे मंदिर असलेले ठिकाण सर्व वैष्णवच नव्हे तर सर्वांचेच एक तीर्थक्षेत्र आहे. असे म्हणतात की औरंगजेबाच्या वेडेचारात मुर्तीचे नुकसान होऊ नये म्हणून ती वृंदावन येथून हलवून सुरक्षित ठिकाणी नेत असताना बैलगाडीची चाके या जागी रुतुन बसली. कितीही प्रयत्न केला तरी हलेचनात. मग देवाचीच इच्छा असावी या भावनेने त्याच जागी मंदिर उभारण्यात आले.
तर एका लोककथेनुसार श्रीनाथजी त्यांची लहानपणीची मैत्रिण अजबकुंवारी हिच्याशी खेळायला इथे येत असत. पुढे ते वज्र येथे निघाले असता ती रुसून बसली. तेव्हा तिची समजूत काढताना त्यांनी मी योग्य वेळ येताच इथे पुन्हा येईन असे आश्वासन दिले. त्यानुसार ते इथे आले म्हणे. (संदर्भ विकी आणि मंदिराची वेबसाईट)

सर्व देवस्थानाच्या ठिकाणी असते तशी गर्दी, दुकाने, अरुंद बोळ इथेही होते. आणि आमचे हॉटेल अगदी मंदिराला लागून असल्याने तिथवर पोचणे ही मोठी टास्क होती. त्या बोळाबोळातून तुंदीलतनू शेठजी, शेठाणी यांच्यासोबतीला गौमाताही मुबलक होत्या. त्यांच्या शिंगापासून वाचवत आणि शेपटीचे फटकारे चुकवत कसेबसे हॉटेल गाठले तर चक्रावल्यासारखे झाले. त्या हॉटेलचा तोंडावळा थेट एखाद्या हॉस्पीटलसारखा होता.

आणि तो देखावा पूर्ण करायला म्हणून का काय, एक तरूण माणूस अटेंटडसारखा एका आजीबाईंना व्हिलचेअरवर बसवून सामोरा आला. माझी खात्रीच पटली की हे हॉटेल नाही. तोवर तिथला बॉय धावत आला. त्याला दोनदा विचारून मी खात्री केली की हे नक्की हॉटेलच आहे, हॉस्पीटल नाही.

हॉटेल होते मात्र मस्त एकदम आरामशीर. आणि एक मिळालेली खोली तर इतकी मोठी होती की त्यात पाच जण मावले आणि एकात मी आणि ओबी. सगळ्यात भारी प्रकार होता तो हॉटेलसमोरच गुजराथी थाळीची सोय होती. दोन तीन दिवस नुसते दाल बाटी खाल्यावर आज चेंज म्हणून तिकडे वळलो आणि अक्षरश जीव्हा तृप्त झाली.

...

अतिशय चविष्ट कढी, ढोकळो, फुलके, भाज्या. आणि वर स्वीट डिश म्हणून बाऊल भरून श्रीखंड. दिवसभर सायकल चालवल्यावर असले पक्वान्न समोर अाल्यावर त्याच्यावर तुटून पडणे अपरिहार्यच होते. मुळीच इकडे तिकडे न पाहत घासाघासाला अन्नदात्याला दुवा देत सगळी थाळी सफाचट केली.

आजूबाजूच्या लोकाशी हे विसंगतच होते. हे फार जनरिक स्टेटमेंट होईल हे मान्य आहे, पण माझा अात्तापर्यंतचा अनुभव असा की थाळी प्रकारात लोक खूप अन्न टाकून देऊन वाया घालवतात. आणि गुजराती लोकांमध्ये ते जास्त दिसून येते. हे मागव ते मागव करत सगळे पदार्थ थोडे थोडे चाखून बघत बरेचसे टाकून द्यायचे या प्रकाराची मला मनस्वी चीड आहे. असो. हे थोडे विषयांतर झाले.

आकंठ जेवणानंतर पान हवे म्हणून मार्केटचा फेरफटका मारायला निघालो. रात्रीही चांगलेच गजबजलेले आणि खायच्याप्यायच्या पदार्थांची नुसती रेलचेल होती.

...

आता आम्हाला एक घासही जाणार नाही अशी परिस्थीती होती म्हणून, नाहीतर थंडाई रिचवायचा बेत होता. तिथला माणूसही भारी होता. काऊबॉय हॅट घालून मिश्किली चालवलेली.

हे माहीती असतं, तर थोडी पोटात जागा ठेवली असती. पण, जाऊ दे पुन्हा कधीतरी म्हणत गारेगार रुम्सवर येऊन पडी टाकली.

=================================================

आजचा हिशेब - सलग चढ असल्यामुळे थोडी दमछाक झाली पण अंतर कमी असल्यामुळे ओक्के डन. उद्या आता अजून चढाई लागणार आहे. पण ते बघू आले की.

===============================================================
http://www.maayboli.com/node/60844 - (भाग १४): खेरवारा - अरवलीचे आव्हान

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटू सगळे दिसत नाहीयेत.. लिंक्स चेक कर एकदा...

नाथद्वारा भारी आहे एकदम.. मंदिरात जाऊन आलात की नाही.. दर्शनाच्या वेळा आहेत ठरविक आणि कसली लांबलचक लाईन असते तिथे...

नेहमीप्रमाणेच छान ! फोटो सगळेच नाही दिसत आहेत.
हे राजसामंदी म्हणजे संगमरवरासाठी प्रसिद्ध आहे तेच ना ? तिथे मी राहिलो होतो काही दिवस.

वर्णन नेहमीप्रमाणेच छान.
आणी दिवसभराच्या सायकलिंगला शरीर साथ देत असल्यामुळे तु प्रवास एंजॉय करतोयस हे तुझ्या लिखाणामधुन स्पष्ट जाणवतंय. Happy
दुर्दैवाने दोनच फोटो दिसतायत, एक लान्समहाराजांचा आशिर्वाद घेतानाचा, आणी एक शाळेतला. लिंक्स चेक करणार का प्लीज? बाकीचे फोटो पाहण्याची जाम उत्सुकता आहे.

या फोटोंच काय कराव समजत नाही राव. Angry

सगळी किचकट प्रक्रीया पार करतो तरी हे असं काहीतरी. आणि मला पीसी आणि मोबाईलवर दोन्हीकडे दिसतात. त्यामुळे कळतच नाही की नीट झालेत का नाहीत.

कुणी इच्छुक असेल तर त्यांनी कृपया मला लेख लिहून झाल्यावर फोटो अपलोड करून द्यायला मदत करावी. रु. १०० आणि ५० च्या नोटांमध्ये मोबदला दिला जाईल. Biggrin

सिरीयसली वैताग आलाय या प्रकाराचा.

काही काही फोटो दिसताहेत ... म्हणजे सुरुवातीचे ३, त्यानंतर कचोरी बनवतानाचा आणि लॅन्सदादाच्या आशिर्वादाचा, त्यानंतर शाळेतले ७ फोटो सलग (ग्रुप फोटो पर्यंत) आणि मग शेवटचे २ (मॅप आणि राईड ग्राफ) - एवढेच फोटो दिसताहेत. Chrome, IE, Firefox - तिनही browsers मधून बघितलं. फोटोच्या view property मध्ये काहीतरी घोळ झाला असावा.

मलाही नाही दिसत सगळे फोटो Uhoh Uhoh वाचायला़ जशी मज्जा येते तशी फोटो बघायला पण येते. Photo must aahet Sad Sad

शाळेतील मुलं खूप खुश झाली असतील. तो टोपीवर गॉगल लावलेला मुलगा तर तोंडात माशी गेली तरी कळणार नाही असा ऐकत आहे ( त्याच्या कडे बघून वर्गात एवढा लक्ष कधीच देत नसेल असा वाटत Lol Lol ).

न दिसणारा फोटो ओपन इन न्यु टॅब म्हणुन प्रयत्न केला तर गुगलचे लॉगिन विचारतो न्यु टॅब मधे, जेव्हा की दिसत असलेल्या फोटो बाबत असे न होता नविन टॅबमधेही फोटो दिसु लागतो.
तेव्हा गुगलचि सेटींग बघ, साईज बघ.

मंदिरात जाऊन आलात की नाही.. दर्शनाच्या वेळा आहेत ठरविक आणि कसली लांबलचक लाईन असते तिथे...

>>>>>त्याचा किस्सा पुढच्या भागात आहे.

दिवसभराच्या सायकलिंगला शरीर साथ देत असल्यामुळे तु प्रवास एंजॉय करतोयस हे तुझ्या लिखाणामधुन स्पष्ट जाणवतंय

>>>>>खरंय अरे, दुखणे थांबले आणि पुढची राईड करु शकतोय याचा आनंद फार मोठा होता.

मी आजच लान्स आर्मस्ट्रॉगचे वक्तव्य वाचले.

Pain is temporary. It may last a minute, or an hour, or a day, or a year, but eventually it will subside and something else will take its place. If I quit, however, it lasts forever.

म्हणलं, भाई काय बोल्लेत, लई भारी.

तो टोपीवर गॉगल लावलेला मुलगा तर तोंडात माशी गेली तरी कळणार नाही असा ऐकत आहे ( त्याच्या कडे बघून वर्गात एवढा लक्ष कधीच देत नसेल असा वाटत

>>>>>हाहाहाहा. शाळा म्हणजे आनंदच होता जरा. पण काही जण खुप चुणचुणीत होते. त्यांच्यातला स्पार्क जाणवत होता.

धन्यवाद सर्वांना

एक नंबर. फक्त तुम्ही फार वेळाने लिहिता. फक्त निवडक लेखांसाठी माबोवर येणार्‍या माझ्यासारख्या लोकांना एखादा लेख नजरेतून सुटायची भीती वाटते.

एक नंबर भाग, जिथे काही हॅपनिंग नसते तिथे तुम्ही लोकं काहीतरी धमाल करून प्रसंग हॅपनिंग बनवता, हा तुमच्या एकंदरीतच ग्रुपचा गुण खूप भावला आशुभाऊ, आम्हाला त्याची सवय आहे, करायला काही नसले की आम्हीही पोस्ट वर असेच करायचो. ते सगळे दिसून येते, तुमची फिरकी घेणे ते शाळेला भेट एकाच वेळी लान्स दादांची आरती हसवते अन शाळेतल्या पोरांपुढे बोलणे एक उबदार हृद्य अनुभव देते. ह्या सरकारी शाळा म्हणजे आपले भारतवर्ष आधुनिक काळात सुद्धा कसे एक आहे ह्याचे उत्तम उदाहरण असतात, शर्ट निळ्याचा पांढरा होईल, चड्डी खाकी होईल, कुठे टाय असेल कुठे नसेल, पण नजर बघा त्या चिमरड्यांची. सालं हे खरं धन रे माझ्या देशाचं, आसेतु हिमाचल पोरे दिसली की उर भरून येतो माझा, असाच एकदा कॉलेज वयात बाईक वर हिंडत असतात मेळघाटच्या दुर्गम भागात अक्षरशः अंगात पांढरा शर्ट अन खाली लंगोट अशी पोरं पोरी (होय आदिवासी मुली सुद्धा!!) खड्या आवाजात बे क बे बेंबटताना पाहिली तेव्हा मन जितके सकारत्मक भावनेने भरून आले होते तितकेच आज आले, कोण म्हणतो ह्या देशाला इथल्या लोकशाहीला भविष्य नाही?? अरे आखे खोलो और इन बच्चों के आखो की गहराई नापो. जबरदस्त कुतूहल, प्रचंड आत्मविश्वास, भरपूर स्वप्ने सबकुछ सापडेल त्यात. एक नंबर दर्शन घडवलेत देवा, वारीचं पुण्य लागावं आम्हाला असे वाटले एकदम. बहुत बढिया और मारो पायडल, कार/बाईक ने फिरताना असे सुंदर भावविभोर क्षण वेगात विरघळून जातात, सायकल चालवताना काळ थांबतो अन असे क्षण वेचता येतात आम्ही भाग्यशाली आम्हाला हा प्रवास वाचायला मिळतो ते, चले चलो भाई चले चलो Happy

आता दिसले सगळे फोटु... मज्जा आली बघताना...

>>>> आम्ही भाग्यशाली आम्हाला हा प्रवास वाचायला मिळतो ते, <<<< अर्थातच...! वुई आर लकी

वाह बापू काय लिहता तुम्ही फारच सुंदर, असं एकदम भारावून जायला होतं.

कार/बाईक ने फिरताना असे सुंदर भावविभोर क्षण वेगात विरघळून जातात, सायकल चालवताना काळ थांबतो अन असे क्षण वेचता येता>>> + 100

Pages