लेखणीला दान कर यौवन तुझे

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 November, 2016 - 23:02

जा जिथे नेईल हे प्राक्तन तुझे
मारते आहेस का तन-मन तुझे ?

पुस्तकांची जाहली पारायणे
माणसांचे राहिले वाचन तुझे

चाल माझी वाटते उलटी तुला ?
सोड बाबा सोड शीर्षासन तुझे

अनुभवांचा दे मुलामा देखणा
लेखणीला दान कर यौवन तुझे

वेस गावाची तुझ्या ओलांडली
स्वागताला धाड़ ना वाहन तुझे

घेतला हातात पेला...बाटले !
घसरले पाऊलही पावन तुझे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users