ऋतुबदल

Submitted by vt220 on 27 October, 2016 - 07:03

ऋतुबदल

पावसाळा झाला की ऋतुबदल म्हणजे सहसा डेंगू, चिकनगुनिया अशा येणाऱ्या संक्रमणकारी आजारांच्या बातम्या येत राहतात. वर्तमानपत्रातले आरोग्यविषयक रकाने भरून जातात. ऑक्टोबरच्या असह्य उकाड्याने त्रस्त व्हायला होते. पण गेल्या आठवड्यात एका वेगळ्या रीतीने मी ऋतुबदलाला सामोरे गेली. सकाळच्या ६:३०-७ ला जाग आलेली पण उगीचच अंथरुणात लोळत पडलेले. सकाळचे रोजचे आवाज कानावर पडत होते. घराघरातल्या स्वयंपाकघरातल्या घडामोडी, कुकरच्या शिट्या, खालच्या रस्त्यावर होणारी शाळेत येणाऱ्या मुलांची, वाहनांची वर्दळ आणि बरोबरीला म्हटलं तर ऐकू येतंय आणि म्हटलं तर नाही असे पक्षांचे कूजन... इमारतीखालील पिंपळावर कल्लोळ करणाऱ्या चिमण्या, खिडकीबाहेर भल्या सकाळी कबुतरांची गुतुर्र्गु, खिडकीपलिकडच्या इमारतीवर मैनांचा कलकलाट, रस्त्यापलीकडच्या झाडावर एखादा बुलबुल, कुठेतरी खारूटल्या कचकच आकांत करीत होत्या. आणि अचानक एक नवा आवाज आला... मी ताडकन उठून खिडकीत गेले आणि डोळे फाडून शोधू लागले. लवकरच नवा पाहुणा दिसला. रस्त्यापलीकडच्या झाडावर श्रीयुत आणि श्रीमती हळद्या आलेले. श्रीयुत हळद्या हवेत गोलगोल फेर्या मारून मला न दिसणारे कीटक पकडत होते. हिवाळ्याची ही नवी चाहूल सुखावून गेली. दुसऱ्या दिवशी परत साधारण त्याच वेळेस परत दिसले. ह्यावेळेस हिवाळ्यातल्या दुसऱ्या मित्राला, कोतवालभाऊंना घेऊन आलेले. कोतवाल हिवाळाभर दिसत असतो, पण हळद्या खुपच कमी दिसतो. दिवस चढल्यावर तर गायबच होतो. त्या दोन दिवसानंतर अजून दर्शन व्हायचे आहे.
हिवाळ्याची चाहूल अशीच वेगवेगळ्या प्रकारे लागत राहते. माझ्या ठाण्यातल्या मैत्रिणीला तो भेटतो सातवीनच्या मंद सुगंधाने. तिथे राम मारुती की गोखले रोडवर म्हणे सातवीन वृक्षांची रांग आहे आणि तिथून जाताना तो मंद सुगंध तिला हिवाळ्याची आठवण करून देतो. तिने त्याची इतकी स्तुती केलेली की मग मी सुद्धा बोरीवली, दहिसर मध्ये एक-दोन झाडे शोधली आणि हल्ली मुद्दाम वाट वाकडी करून तिकडे चालायला जाते. स्वर्गीय वगैरे असा काही सुगंध नाहीय... मला थोडा मसाल्याच्या वासासारखा वाटतो. पण वेड लावणारा आहे कारण चालताना कुठेही तो गंध आला की आपसूक नजर झाड शोधायला लागते.
बऱ्याच देशात ह्या दिवसात ऑटम कलर्स पर्यटन चालते. तिकडे थंडीत वृक्ष पर्णहीन होतात. त्यापूर्वी हा सोहळा होतो. हिरवे, पिवळे, भगवे, लाल, किरमिजी असे रंग बदलत शेवटी सगळी पाने झडून जातात आणि रुक्ष हिवाळा लोकांना तनामनातून गारठून टाकतो. मुंबई आणि (बहुतेक) महाराष्ट्रात कुठेही हा प्रकार बघायला मिळत नाही. नाही म्हणायला बदामाच्या झाडाची पाने लाल होऊन झडतात. पण फॉल कलर्सच्या सोहळ्यासमोर हे काहीच नाही. शिवाय बदामाची पाने हिवाळाभर हळुहळू करत झडतात. चार वर्षापूर्वी मात्र मला एक छान अनुभव आला. सकाळी ११च्या आसपास बोरीवली एस व्ही रोडवर कांदिवलीहून बोरीवलीच्या दिशेने येत होते. अचानक पँटॅलूनच्या दुकानासमोर एका झाडावर एकही पान दिसत नव्हते अन् फांद्यांच्या टोकावर लाल लाल कळे दिसत होते. नेमकी कसली फुले येतील ते पाहायला मी उत्सुक होते, पण दोन दिवस तिकडे जाणे झाले नाही. तिसऱ्या दिवशी खरतर मी विसरूनच गेलेले आणि अचानक ते झाड डोळ्यासमोर आले आणि फॉल कलर्सची आठवण झाली. लाल कळ्यांची लाल पाने झाली होती. म्हणजे बघा तिकडे झडणारी पाने रंगसोहळा करतात आणि इथे कोवळ्या पानांचा खेळ होता. गेल्या वर्षी त्या झाडाला बघायला जायचे ठरवले पण वेळच चुकली. नवी पाने होती म्हणून मला वाटले फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये पाहायला मिळेल. पण तेव्हा काहीच दिसले नाही. म्हणून जुने फोटो धुंडाळून तारीख बघितली तर नोव्हेंबर होता. आता सध्या २-३ दिवसात एकदा तिकडे फेरी मारून लक्ष ठेवून आहे.
दहिसर नदीसुद्धा ह्या काळात आपले रूप बदलते. पावसाळ्यात जोवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असतात तोवर पाण्याची पातळी जास्त असते. बगळ्यांना त्यात आरामात उभे राहता येत नाही, त्यामुळे पावसाळाभर वाहते पाणी असले तरी पक्षी कमीच असतात. शेवटी शेवटी एखादा कॉरमोरंट (बहुतेक पाणकावळा) सूर मारताना दिसतो पण कधीतरीच! पण पावसाळा संपला आणि बंधारा बंद केल्यावर पाणी उतरते आणि मग पांढऱ्या गायबगळ्यांची ड्युटी सुरु होते. नदीच्या काळपट पाण्याच्या पार्श्वभूमीवर रांगेत उडत जाणारे किंवा उडत येऊन बसणारे पांढरे बगळे फार सुरेख दिसतात. थोड्या दिवसांनी पाणपक्ष्यांची संख्या आणि प्रकार वाढत जातात. एरवी गटार/नाला अशी दहिसर नदीची हेटाळणी होऊ शकेल पण ह्या पाणपक्ष्यांमुळे दृश्य सुसह्य होते.
तर असा हा ऋतुबदल मनाला सुखावून जातो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ vt220, छान लिहिलंय. निसर्गाचे निरीक्षण करण्याचा आपला छंद कौतुकास्पद आहे. वाचताना लिहिलेले सर्व खरोखरीच नजरेसमोर उभे राहिले आणि मन प्रसन्न झाले.

अगोदर सांगायचे ते राहूनच गेले. का कोण जाणे मलाही मोठाल्या झाडांचे निरीक्षण करायला आवडते. त्या झाडांची उंची, आकार, रंग आणि विस्तार पाहून माझे मन मोहित होते. वड, पिंपळ, नारळ, चिंचेची झाडे हि माझी खास आवडती. विक्रोळी स्टेशनच्या पूर्वेला फक्त दहा मिनिटे चालत जाण्याच्या अंतरामद्ये एकूण पंधरा मोठी पिंपळाची झाडे पहावयास मिळतात. गुलमोहराची झाडे तर अगणित आहेत. त्यांना न्याहाळत चालणे हे माझ्याकरीता अवर्णनीय आहे.

आमच्या रहाण्याच्या ठिकाणी एका सद्गृहस्थाने वीस वर्षांपूर्वी दहाएक बदामाची झाडे लावलीयत. आज त्यांचे मोठया डेरेदार वृक्षांत रूपांतर झालेय. त्यावर लागलेले बदाम खायला विविध प्रकारचे पक्षी येत असतात. दहाबारा पोपट, मैना तर कायम झाडावर बागडताना दिसतात. बदामाच्या झाडाची पानगळ होते तेव्हा हिरवी पाने लालसर होऊन गळून पडू लागतात. झाड ओकेबोके दिसू लागते. त्याच वेळी नवीन पानांच्या कळ्याही दिसू लागलेल्या असतात. आणि पहाता पहाता सात दिवसात पूर्ण झाड नवीन पानांनी डवरते. हा सर्व सोहळा पहाताना माझे मन मोहोरुन जाते.

उटी येथील गव्हर्मेंट बोटेनिकल गार्डनमद्ये जाण्याचा योग आला होता. २२ हेक्टर जमिनीवर १८४८ सालापासून हि बाग जोपासलेली आहे. येथे विविध देशांतील मोठया वृक्षांची लागवड करून आपल्या देशातील हवामानातसुद्धा त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. काही वृक्ष तर शंभर दीडशे वर्षे वयाची आहेत. त्या ठिकाणी गेल्यावर मी तर हरखूनच गेलो होतो. माझ्या आयुष्यात कधीही पाहू न शकणारे असे वृक्ष पाहण्यात आले होते.

@ vt220, आपल्या दोघांची आवडनिवड बरीचशी जुळताना दिसतेय. Happy

धन्यवाद सचिन, मनीमोहोर, फेरफटका!

हो सचिन झाडांची रचना बघताना देवावर विश्वास बसायला लागतो... एरवी मी थोडी नास्तिकच आहे Happy

काही आठवड्यापूर्वी मी कोल्हापुर बंगळूर हायवे ह्या मार्गाने गोव्याकडे गेलेले. शहरातून बाहेर जाण्याच्या त्या मार्गावर इतके सगळे डेरेदार वटव्रुक्ष होते की मी आश्चर्यचकित झाले. ते मस्त डेरेदार व्रुक्ष बघताना का कोण जाणे कुणी एकदम हट्टाकट्टा जवळचा काका मामा आपल्याबरोबर आहे असेच वाटत होते... Happy

वा फार सुंदर. सचिन तुम्हीही छान लिहिलंत.

मलापण निवांत रस्त्यावरून झाडांशी गप्पा मारत, निरीक्षण करत चालायला आवडतं. वाहन रहदारी असेल खूप तर नाही इतकं जमत. झाडांकडे बघायची दृष्टी पहिल्यांदा माझ्या बाबांनी दिली आणि इथे निसर्गाच्या गप्पांवर ती माझी नजर विस्तारली, तरी अजून या बाबत मी अगदी बाल्यावस्थेत आहे Happy .