फ्री...? : भाग ४

Submitted by पायस on 25 October, 2016 - 07:01

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60553

उमा रुद्रच्या तंबूच्या दिशेने चालत होती. आधी संग्रामच्या भीतीने ती त्या जागेच्या आसपास जायलाही धजावत नसे. जेव्हा पहिल्यांदा ती चुकून तिथे आली होती तेव्हा संग्राम अनोळखी वास आल्याने केवळ गुरगुरला होता. ते गुरगुरणे सुद्धा उमाच्या छातीत धडकी भरवायला पुरेसे होते. ती या सर्कशीचा सदस्य बनणार हे पक्के झाल्यावर मलिका स्वतःच तिला संग्राम जवळ घेऊन गेली होती. संग्रामच्या आठवणीत उमाचा वास साठवणे भाग होते. अन्यथा त्या पशुबुद्धिकडून अपघाताने हल्ला होण्याची शक्यता जास्त होती. हळूहळू ती या वातावरणाला सरावली. तरीही ती भीति तिच्या मनात घर करून होती. पण आज जे झालं त्यानंतर रुद्रची माफी मागणे गरजेचे होते. त्याने तिच्यावर विश्वास ठेवला होता. त्या दिवशी जे काही झालं ते गुपित राखण्याची जबाबदारी तिची होती. तिला प्रचंड अपराधी वाटत होते. भद्रदादापाशी तिने आपले मन मोकळे केले होते. भद्राच्या मते उमाची चूक झालीच असेल तर ती त्याला व मलिकाला विश्वासात न घेणे ही होती. अर्थात त्याने ते बोलणे हसण्यावारी नेले व उमाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उलट परिणाम होऊन उमाची अपराधीपणाची भावना अधिक तीव्र झाली. अखेर ओल्गाने सल्ला दिला कि रुद्रबरोबर थेट संवाद साधणेच इष्ट!
रुद्र संग्रामच्या पोटावर डोके ठेवून झोपला होता. त्याला उठवावे कि नाही हा निर्णय घेण्याआधीच उमाला रुद्रच्या चेहर्‍यावर अस्वस्थता दिसली. दुरून तो अगदी शांत झोपलेला दिसत होता. पण अंधार भेदून त्याच्या जवळ उभं राहिलं तर त्याची चुळबूळ स्पष्ट दिसत होती. काय दिसत होतं त्याला? कसलं स्वप्न पडलं होतं त्याला?

*****

रुद्र एका सज्जात उभा होता. जवळच त्याची आई होती. इतरही काही बायका होत्या. समोर दिसणारं मैदान मोकळे होते. त्या मैदानाला वेढून टाकणारी गोलाकार बैठकव्यवस्था होती. आबालवृद्धांनी गर्दी करून ती जागा भरून टाकली होती. रुद्र स्वतःशीच बोलू लागला, हा एखादा आखाडा आहे का? बरोबर इथे कोणती तरी लढत होणार आहे. मी तीच पाहायला इथे आलो आहे. पण मग ते दोन मल्ल, दोन योद्धे .. कोण आहेत ते? कुठे आहेत ते?
तेवढ्यात एक घोषणा झाली आणि त्याचे लक्ष त्या दिशेने वेधले गेले. ती घोषणा या लढतीच्या आयोजकाच्या आगमनाची होती. बडोदा संस्थानचे सर्वेसर्वा सयाजीराजे गायकवाड येऊन आसनस्थ झाले. त्याबरोबरीने कोणी कर्नल होता. काल आईकडून त्याने ऐकले होते कि ही लढत या दोघांमधील एका पैजेमुळे होत होती. त्या पैजेचे कारण आखाड्यात आले. समोरील जनावर अतिशय सुंदर होते. त्याचे नाव पुकारले गेले. अ‍ॅटलस! मोरोक्कोहून खास मागवलेला अ‍ॅटलस नावाचा तो रुबाबदार सिंह प्रथम मैदानात प्रकटला. त्याची गर्जना अनेकांचा थरकाप उडवून गेली. आपला संग्रामही मोठा होऊन असाच दिसेल काय? मनोमन रुद्रने अ‍ॅटलस जिंकावा यासाठी प्रार्थनाही सुरू केली. स्वतः सयाजींनी सुद्धा अ‍ॅटलसवरच पैज लावली होती. अर्थातच सिंह जंगलचा राजा असतो. पण तेवढ्यात एक डरकाळी ऐकू आली आणि अ‍ॅटलसचा प्रभाव अचानक कमी झाला. दुसर्‍या बाजूने येणारा प्रतिस्पर्धीही तगडा होता. तो कर्नल मोठ्या उत्सुकतेने त्या राजेशाही डौलदार चालीने येणार्‍या प्राण्याकडे बघू लागला. शिमल्याहून आलेला तो एक नरभक्षक बंगाली वाघ होता. कर्नलच्या म्हणण्यानुसार सिंहाला जंगलचा राजा त्याच्या आयाळीमुळे समजले जाते पण प्रत्यक्षात रॉयल बंगाल टायगर इज द स्ट्राँगेस्ट कॅट!!
रुद्रला कधी नव्हे ते आपले रक्त सळसळताना जाणवले. त्याला या लढतीत कमालीचा रस निर्माण झाला होता. अ‍ॅटलसच्या जागी त्याला संग्रामच दिसत होता. समोरचा वाघ त्याला राजेशाही कमी आणि एकांडा शिलेदार अधिक भासत होता. असा कोणी जो प्रस्थापित राजवंशाला आव्हान देत आहे. जो भलेही रुबाबदार दिसत असला तरी त्या बिरुदाचा अधिकारी होण्यास पात्र नाही. अखेर राजा सिंहासनावर बसतो, व्याघ्रचर्मावर एखादा साधक शोभतो. दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडले. रुद्रच्या अपेक्षेपेक्षा तो वाघ खूपच चपळ होता. त्याने याचा फायदा उठवत अ‍ॅटलसवर हल्ला चढवला पण त्या सिंहानेही आपली अचाट शक्ती दाखवत त्याचा एक कान ओरबाडला. वाघाने तात्पुरती माघार घेतली.
तो आता अ‍ॅटलसला गोल चकरा मारू लागला. अ‍ॅटलसच्या आयाळीमुळे त्याला त्याच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच गळ्याजवळ सुळे रोवता येत नव्हते. हे लक्षात आल्यावर त्याने अ‍ॅटलसला दमवण्याचा पवित्रा घेतला. जणू त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता होती. अ‍ॅटलसने अनेकदा चढाई करून प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. पण वाघाने आपल्या चपळतेचे प्रदर्शन करून किरकोळ जखमांवर ते प्रकरण निभावले. याउलट जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अ‍ॅटलसला पाठीवर व पोटापाशी ओरबाडण्याचे सत्र वाघाने सुरु ठेवले. रुद्रला मात्र अजूनही आशा वाटत होती. आत्तापर्यंत तरी अ‍ॅटलस वाघापेक्षा अधिक शक्तिमान वाटला होता. मान्य कि वाघ अधिक चपळ व चतुर होता पण शक्तिशाली? जणू हे विचार वाघाने जाणले व हा गैरसमजही दूर झाला. अ‍ॅटलस आता काहीसा थकला होता. त्याच्या हालचाली मंदावल्या. तरीही त्याने सर्व शक्ती लावून पुन्हा एकदा झेप घेतली. यावेळी मात्र वाघाने ती झेप न चुकवता सिंहाला अंगावर घेतले. पण पडता पडता त्याने एक झटका देऊन त्याने त्या भीमकाय सिंहाला चक्क भिरकावून दिले!! यातून सावरण्याची अजिबात संधी न देता त्याने आपले दात खांद्यात रुतवले व अ‍ॅटलसच्या खांद्यामधील जवळ जवळ सर्व मांस एका फटक्यात निघून आले.
आता लढाईचा निर्णय जवळ जवळ स्पष्ट होता. क्षणभर अ‍ॅटलसची व रुद्रची नजरानजर झाली. त्यांच्यात काही मूक संवाद घडला. रुद्र तो अ‍ॅटलस आहे हे केव्हाच विसरला होता. त्याच्यासाठी तिथे पूर्ण वाढ झालेला संग्रामच उभा होता. जख्मी, हतबल पण अजूनही तोच दिमाख राखून असलेला संग्राम! वाघ अखेरच्या झटापटीसाठी पुढे सरसावला. आपल्या वेगाचा फायदा घेत त्याने अ‍ॅटलसच्या पोटात अखेर पंजे रुतवले व एका फटक्यात त्याची आतडी बाहेर आली. सर्वांनी वाघाचा जयजयकार करायला सुरुवात केली. पण अ‍ॅटलस अजूनही उभा होता. वाघ काहीसा बेसावध झाला आणि अ‍ॅटलसच्या पंजाचा एक जोरदार फटका त्याच्या हनुवटीखाली बसला. एखाद्या कसलेल्या बॉक्सरने अपरकट मारावा तसा तो अपरकट वाघाला वीस फूट दूर फेकण्यास पुरेसा ठरला. वाघाच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. तो मोठ्या प्रयत्नपूर्वक उभा राहिला. आता दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. अ‍ॅटलसने पुन्हा एकदा रुद्रकडे पाहिले व तो कोसळला. रुद्रने वाघाकडे बघितले तर त्याला त्याच्या चेहर्‍यावर एक क्रूर हास्य दिसले. जणू त्याला माहित होते, त्याला हा शेवटचा हल्ला अपेक्षित होता आणि म्हणून त्याने तो सहन केला. रुद्रला हा धक्का असह्य झाला आणि तो ओरडला......

*****

"संग्राम!!"
उमा दचकून मागे सरली. संग्रामही त्या आवाजाने जागा झाला. तो उमाकडे बघू लागला. पण रुद्रच्या स्पर्शाने त्याला शांत केले व तो पुन्हा एकदा पहुडला. रुद्राने बोटाने इशारा करून उमाला आपल्यापाशी बोलावले. ती जवळ आल्यावर तिला समोर बसण्याची खूण केली व तो म्हणाला
"इतक्या रात्री इथे का आली आहेस? जर संग्राम जागा असता तर काय केले असतेस?"
"ते .. ते .. मी .." उमा अडखळली. अंधुक प्रकाशात दोघांना एकमेकांचे चेहरे नीट दिसत नव्हते. रुद्रने कोणताही दिवा लावण्याची तसदी घेतली नव्हती. उमाने सोबत ठेवलेली मेणबत्ती खाली पडली होती. रुद्रने चटकन उठून तिथे पाणी ओतले व एक सुस्कारा सोडला.
"फार नाही पण अशा साध्या साध्या अपेक्षा तर मी ठेवू शकतो ना तुझ्याकडून?" उमासाठी एवढा शाब्दिक फटका पुरेसा होता. ती स्फुंदून रडू लागली. एवढ्यात तिला खांद्यावर रुद्रचा स्पर्श जाणवला. त्या स्पर्शात जरब नव्हती तर आश्वासकता होती. रुद्रने पुन्हा तिच्या समोर बसला.
"ते मी .... माझ्याकडून तू जे सांगितलं होतं .. अं .. अं ...... आय अ‍ॅम सारी."
"काय?" रुद्रला ते शब्द ऐकून हसायलाच आले.
"आय अ‍ॅम सारी. मला माफ कर." रुद्रला आता हसू आवरेना.
"तुला सॉरी म्हणायचं आहे का? ओल्गाने तुला इंग्रजी शिकवलं खरं पण उच्चार अजूनही इथलेच! उमा तू अर्धनारीनटेश्वराचे प्रतीक आहेस. आपल्या दोघांत काही समानता आहेत. मी तुझ्यावर कसा चिडेन? तसंही उद्या इथले शेवटचे शो आहेत. परवा आपण हे शहर सोडून गेलेलो असू. इथून पुढे काळजी घे इतकंच मी म्हणेन."
उमा जेव्हा आपल्या तंबूत परतली तेव्हा तिच्या मनावरचे ओझे पुष्कळ हलके झाले होते. पण अर्धनारीनटेश्वर? केवळ मला मिशा आहेत म्हणून? रुद्रला नक्की काय म्हणायचे होते? आणि त्याच्यात आणि माझ्यात काय समानता आहेत? त्याच्यावरही पूर्वी काही ...... उमा आता फार दमली होती. झोपेत यापुढचे विचार चालू ठेवणे तिला शक्य नव्हते.

~*~*~*~*~

सलील जेव्हा जंगलातून त्याच्या निवासस्थानी परतला तेव्हा त्याला आलेला घाम पाहून त्याचे सहनिवासी चक्रावले. ते सर्वदेखील सलीलप्रमाणेच इंग्रज सरकारविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले होते. सलीलने पाणी मागताच त्याच्यापुढे तांब्या सरकावण्यात आला. तो भांडे भरून पाणी प्यायला. सर्व त्याच्याच कडे बघत उभे होते. तेव्हा त्याने काहीसा आवाज चढवून त्यांना आपापल्या कामावर पिटाळले. तो स्वतःच्या खोलीत आला व कपडे बदलून खाटेवर अंग टेकवले. डोळ्यांवर उजवा हात ठेवून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला विश्रांतीची गरज होती पण झोप काही येत नव्हती. त्याचे संपूर्ण शरीर अजूनही थरथरत होते. हे बंगाली चळवळीत कोणालाही सामील करून घेतात की काय?

*****

सलील जेव्हा पहिल्यांदा फणींद्राला भेटला तेव्हा त्याला तो इंग्लिश पेहरावात येईल अशी अपेक्षा नव्हती. त्याला कळले त्यानुसार तो सर्वसाधारण मराठी तरुणाला साजेसा वेष करून बॉम्बेहून निघाला होता. त्याचे ते विशिष्ट डोळे ओळख पटवायला पुरेसे होते. चहाचा पेला हातात दिल्यावर फणींद्रने तोंड उघडले.
"मला एका अशा जागी थांबायचे आहे जिथे विदेशी घाण कधी पोहोचणार नाही. खूप दिवस नाही लागणार. जास्तीत जास्त महिना, कदाचित त्याहूनही कमी. एकदा ती बातमी पोचली कि मग आपण पुढची पावले उचलू शकू."
"पण फणीदा नक्की योजना काय आहे?"
फणींद्रने उत्तरादाखल असे काही पाहिले कि सलीलची आणखी प्रश्न विचारायची काय बिशाद! वरकरणी मात्र तो हसून म्हणाला,
"अजून सर्वकाही अधांतरीच आहे. जेव्हा योजना पक्की होईल तेव्हा यथावकाश सर्वांना कळेलच. तर, अशी एखादी जागा जिथे मला कोणीही त्रास देणार नाही. आहे का अशी एखादी जागा पाहण्यात?"
गणेशखिंडीमागचे जंगल हीच फणींद्राला हवी असलेली जागा असू शकत होती. सलील जेव्हा तिथल्या एका वापरात असलेल्या गुहेत फणींद्राला घेऊन गेला तेव्हा त्याच्या डोळ्यांत आलेली चमक त्याने योग्य जागा निवडली आहे याची पावती होती. फणींद्र नक्की कसली वाट बघत होता हे कळायला काही मार्ग नव्हता. त्यांचा एक बातमीदार बॉम्बेत होता. त्याच्याकडून येणार्‍या तारा फणींद्रपर्यंत पोचवायच्या एवढेच काम सलीलकडे होते. पण फणींद्र आल्यापासून एकही तार आली नव्हती. अर्थात फणींद्रच्या मते ते बरोबरच होते. बिनकामाच्या तारा तो कशाला पाठवेल?
मध्ये नरभक्षक वाघाच्या बातम्या आल्यानंतर त्याने फणींद्राला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाण्याचा विचार केला होता. पण फणींद्रानेच या कल्पनेला जोरदार विरोध केला. खरं सांगायचे तर सलीलला यामुळे हायसेच वाटले होते. तो फणींद्राचे अनेक किस्से ऐकून होता. त्याच्या विचित्र मानसिकतेचा तो अनुभवही घेत होता. एके दिवशी जेवता जेवता फणींद्रानेच वाघाचा विषय काढला,
"सलील तुला वाघ आवडतो का?"
"म्हणजे फणीदा?"
"म्हणजे तुला वाघ या प्राण्याविषयी काय वाटते? इथे वाघ असतील असं मला आधी वाटले नव्हते. बंगालचे वाघ पाहिले आहेस कधी?"
"नाही. वाघ अं... म्हणजे मी कधी प्रत्यक्ष पाहिला नाही. पण एकंदरीत त्याच्याविषयी मला प्रचंड आकर्षण आहे. त्याची ती सोनेरी कांती, त्यावरची पट्ट्या-पट्ट्यांची नक्षी, त्याला सुंदर म्हणणार नाही असा मनुष्य विरळाच!" कधी नव्हे ते सलीलची पाठ थोपटली गेली. फणींद्रचा आवाजही त्याला काहीसा मैत्रीपूर्ण भासला.
"मग जंगलचा राजा सिंह का?" हा प्रश्न त्याला चक्रावून गेला. हे संभाषण कुठल्या दिशेने चालले आहे त्याला कळेना. फणींद्रानेच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
"कारण राजा हा प्रजाहितदक्ष, रुबाबदार, एक चिन्ह, एक प्रतीक वगैरे वगैरे ..... आह्ह अर्थोहीन कथा आछे. राजा शक्तीचे प्रतीक असतो हे सगळे विसरूनच गेले आहेत. म्हणा आजकालचे हिंदुस्थानी राजे, ज्यांना कुठल्याशा विदेशी खेळाच्या प्रसारात अधिक रस आहे त्यांना वाघ तर सोडाच सिंह देखील म्हणता येत नाही. लक्षात ठेव वाघ हा सर्वाधिक शक्तिशाली प्राणी आहे. कारण तो सर्वांना एकट्याने तोंड देतो. तो उगाचच कोणात गुंतून पडत नाही. वाघ हा खरा राजा आहे. वाघ सर्वशक्तिमान आहे."
सलीलने मुकाट्याने मान डोलाविली. त्याला वाघाचे काहीही सोयरे सुतक नव्हते. किमान जोवर तो नरभक्षक त्याच्या समोर येत नाही तोवर तरी.

*****

आज अखेर एक तार आली होती. सलील झपाझप पावले उचलत फणींद्रच्या समोर जाऊन उभा राहिला. अंधार व्हायच्या आत घरी परतायचे होते. आज कोणीतरी त्या नरभक्षकाला पाहिल्याचे ऐकल्यावर तर त्याला लवकर परत जाण्याचे आणखी एक कारण मिळाले होते. तारेचा मजकूर पाहून फणींद्राचा चेहरा उजळला. त्याने खुशीत येऊन शीळ घालायला सुरुवात केली. ती शीळ कर्कश नव्हती पण मंजूळही नव्हती. ती धून ऐकून सलीलच्या पोटात ढवळले. त्याला तिच्या एक प्रकारचा धोका जाणवत होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. गर्द झाडीतून अगदी थोडा सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोचला होता. जसे गुहेत नदीचे पाणी झिरपत झिरपत पोहोचते व अगदी थेंब थेंब करत छतातून पडते तसाच तो सूर्यप्रकाश किरणांच्या स्वरुपात तिथवर झिरपला होता. जणू ती जंगल एक गुहाच होती आणि फणींद्र तिथला रहिवासी. दुर्लक्ष करण्याच्या नादात त्याचे लक्ष सभोवतीच्या वातावरणावर अधिकच केंद्रित झाले. हवेत कसलासा उग्र दर्प भरून राहिला होता. तो वास घाण नव्हता पण नाकाला झोंबणारा होता. जणू तिथे आणखी कोणीतरी होते व त्याच्या अस्तित्वाची बोचरी जाणीव तो दर्प करून देत होता. एवढ्यात फणींद्रचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. फणींद्र त्याच्याचकडे एकटक बघत होता. चेहर्‍यावरील भाव बघता तो खूपच आनंदात दिसत होता.
"आपले काम झाले सलील! या इंग्रज लोकांचे भारतातील दिवस भरले आहेत. दूरवरच्या देशांमध्ये घडणार्‍या घटनांचा असा परिणाम साधला जाईल असे मला अजिबात वाटले नव्हते. असो, मला इथे अधिक काळ थांबता येणार नाही. लवकरात लवकर मला इथून कधी निघता येईल?"
सलीलसाठी ते शब्द जादुई होते. ही ब्याद इथून गेलेलीच बरी या मताचा तो होता. त्याने काही क्षण विचार केला.
"तसं मी तुम्हाला ट्रेनमध्ये आज, आत्ता सुद्धा बसवून देऊ शकतो पण खूप घाई करून चालणार नाही. आपल्याच धर्माला फितूर झालेला तो सदाशिव! तो सध्या डोळ्यात तेल घालून कोणाचा तरी शोध घेतोय. माझ्यावर पाळत ठेवून होताच पण सध्या ही पाळत अधिकच दक्षतेने ठेवली जात आहे. नक्कीच कोणीतरी तुमच्या मागावर पुण्यापर्यंत येऊन पोचले आहे. अशा वेळी तुम्हाला तिकिटावर ट्रेनमध्ये बसवणे धोकादायक आहे. आणि तसेही पुण्याहून कलकत्त्याला थेट गाडी नाहीये."
"मग तू काय सुचवतोस?"
"मला थोडी तयारी करू द्या. मी तुम्हाला उद्या रात्री एखाद्या मालगाडीत बसवून देतो. दक्षिण दिशेने या गाड्या जातात. तुम्हाला ठीक वाटेल तिथे तुम्ही उतरा व मग इतर कुठल्यातरी स्टेशनवरून तुम्ही कलकत्त्याला जाणारी गाडी पकडू शकाल. याच्यात कमीत कमी धोका आहे."
फणींद्रने ते म्हणणे मान्य करत मान डोलाविली. त्याच आनंदी स्वरात तो पुढे म्हणाला
"सलील मी आज खूप खुश आहे. या जंगलात माझे फक्त दोन मित्र आहेत. एक तू आणि दुसर्‍याशी मी तुझी आज ओळख करून देतो. ये माझ्यामागोमाग ये."
सलीलला हे अनपेक्षित होते. तरीही तो फणींद्रमागोमाग चालू लागला. त्या गुहेपासून थोड्याच अंतरावर एक तळे होते. तळे कसले, डबकेच म्हणावे लागेल. एवढ्या छोट्या पाणवठ्यावर फारसे कोणी प्राणी फटकत नसत. फणींद्रची ती स्नानादि कर्मे उरकायची जागा होती. तळ्यात कोण बुवा याचा मित्र? फणींद्रने बोटाने काहीतरी दाखवले. तळ्यात जे काही होते त्यालाही जणू फणींद्र आल्याची जाणीव झाली. त्याने फणींद्रच्या नजरेला नजर मिळवली. त्या काळाशार डोळ्यांसमोर त्यानेही हार मानली होती. पिवळाजर्द वाघ पाणी निथळत बाहेर आला. त्याला पाहून सलीलची बोबडी वळली. त्याने फणींद्रचा हात झटकला व तो धावत सुटला. मागून फणींद्रच्या हाका ऐकू येत होत्या.
"अरे त्याचं पोट भरलं आहे, काही करणार नाही तो. आणि तो घाबरतो मला. असो उद्या रात्री भेटू. याची काळजी नको करूस. मी तयार राहीन. तू ही तयारी करूनच ये."

~*~*~*~*~

सदाने ती तार अ‍ॅलेक्सीच्या ताब्यात दिली. ख्रिस व जोसेफ टेबलावर नाश्ता करीत होते. आज अ‍ॅलेक्सीने सिलोनहून आलेली चहाची पाने वापरली होती. त्यात थोडेसे आंब्याचे बारीक काप मिसळले होते. सीझनल फळांचा वापर होत असेल तर आणखी काय हवे! ख्रिसला ती हलकी गोड चव फारच आवडली. जोसेफने मात्र एक चमचा साखर अजून घेतली. सोबत ऑम्लेट आणि ग्रिल्ड टोमॅटो होते. जोडीला इंग्लिश मफिन्स! ख्रिसने नाश्ता करता करताच अ‍ॅलेक्सीला तार वाचण्यास फर्मावले व मफिनचा तुकडा तोंडात टाकला.
"सर. तार सर मॅक्सवेल कडून आली आहे. 'फ्रेंचानी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला' इतकाच मजकूर आहे."
"थोडक्यात ख्रिस, जर्मन प्रतिक्रिया कधीही येऊ शकते. म्हातार्‍याने अल्टिमेटम दिलं कि काय आपल्याला?"
"आय डोन्ट थिंक सो. त्यांना माहित आहे कि अगदी फणींद्र पकडला गेला तरी जर्मन प्रतिक्रिया येणारच आहे. अर्थात याचा अर्थ असाही नाही कि वी कॅन स्लॅक ऑफ."
"मग तुला काय वाटतं? फ्रेंचांच्या या चालीने काय काय होऊ शकतं."
"मला वाटतं कि मला अजून एक कप चहा लागणार आहे. सदा तुलाही एक कप चालेल ना? अ‍ॅलेक्सी?"
"सर?"
"टू कप्स अ‍ॅन्ड मे बी सम बिस्किट्स वुड बी नाईस. त्यानंतर फ्रेंच अ‍ॅक्शनचे परिणाम काय असू शकतील याचं टिपण घेऊन ये. वी नीड टू स्टडी इट"
"अ‍ॅज यू से, सर"

*****

अ‍ॅलेक्सी हातात एक चोपडे घेऊन आला. त्याने शांत आवाजात वेगवेगळ्या शक्यता वाचायला सुरुवात केली. फ्रान्सचे मोरोक्कोतीले वर्चस्व उघड उघड मान्य नसलेली एकच सत्ता होती, जर्मनी!! सुदैवाने जर्मनीचा युरोपात एकच मित्र होता. ऑस्ट्रिया-हंगेरी! दोन वर्षांपूर्वी त्यांनी बोस्निया आणि हर्जेगोविना ही राष्ट्रे खालसा केली होती. या निर्णयामुळे त्यांनी रशियाशी शत्रुत्व ओढवून घेतले होते व बाल्कन प्रदेश धुमसत ठेवला होता. ऑटोमन साम्राज्याशीही त्यांचे फारसे जुळत नव्हते व त्यामुळे एकंदरीत तशी वेळ आलीच तर या प्रदेशांमधून ऑस्ट्रिया-हंगेरीवर दडपण आणणे कठीण नव्हते. दडपणाखाली जर्मनीपेक्षा ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्य बाल्कन प्रदेशातील हिताला जपणे श्रेयस्कर समजेल यात दुमत नव्हते. थोडक्यात सरळ पद्धतीने तरी मोरोक्कोच्या बरणीतून तूप निघण्याची शक्यता नव्हती. फ्रान्स तर जर्मनीला हातही घालू देणार नाही. १९०५ मध्ये हात पोळल्यानंतर जर्मनी काही ठोस योजनेशिवाय असा वाद उकरून काढणार नाही. ब्रिटनच्या दृष्टीने जोवर जर्मनी औद्योगिक क्षेत्रात त्यांच्या मागे राहील तोवर ब्रिटनचे काही बिनसत नव्हते. मध्यंतरी जर्मनांनी आघाडी घेतल्याचे वृत्त होते. त्यामुळे मोरोक्कोतून येणारा त्यांचा कच्चा माल त्यांना मिळणे बंद झाले तर ते हवेच आहे.
यात गोम एकच! पाच वर्षांपूर्वी केलेल्या संधीनुसार फ्रान्स जर्मनीच्या व्यापारिक हितांना आडकाठी आणणारी कोणतीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कृती करू शकत नाही. फ्रान्सने जर जरूरीपेक्षा अधिक सैन्य घुसवले तर जर्मनीला कांगावा करण्याची संधी मिळेल.
"फ्रेंचांकडून असा वेडेपणा होण्याची शक्यता बरीच आहे." जोसेफने शेरा मारला.
सध्या तरी फ्रान्सने केवळ सैन्य घुसवण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर त्यांनी इथे संतुलित भूमिका घ्यावी ही रास्त अपेक्षा आहे (ब्लास्फेमी - जोसेफ). पण समजा त्यांनी अधिक सैन्य घुसवलेच तर आत्ता कोणत्याही मोठ्या वादात थेट न गुंतलेले मित्रराष्ट्र या नात्याने ते ब्रिटिश साम्राज्याला हस्तक्षेप करायला सांगू शकतात.
"या हिशोबाने सध्यातरी जर्मनी बॅकफूटवर दिसत आहे. त्यांच्या गोटातून काही हालचाल झाली असती तर म्हातार्‍याने लगेच कळवले असते. या 'फ्रीडम' वाल्यांना पण आपले सैन्य आवरू शकते. मग याचा अर्थ काय घ्यायचा ख्रिस?"
ख्रिसही काही वेळ विचार करत होता. जर्मनीवर आपण दडपण आणू शकतो. ऑस्ट्रिया-हंगेरीची चिंता करायचे सध्या कारण नाही. फ्रेंचांनी मदत मागितली तर आपण जर्मनीवर दडपण आणू शकतो. फ्रान्सची सध्याची उघड उघड मित्रराष्ट्रे आपण व रशिया. रशिया बाल्कनमध्ये गुंतून पडला आहे आणि अंतर्गत अडचणी. तिथेही क्रांतिकारक! पण ठीक आहे किमान रशिया ऑस्ट्रिया-हंगेरीला गुंतवून ठेवेल. मग फ्रान्स आपल्याकडे मदत मागेल व आपण जर्मनीवर दडपण आणू शकतो. फ्रान्स आपल्याच कडे मदत मागेल कारण आपण कोणत्याही वादात गुंतलेलो नाही. ब्रिटन आत्ता तरी तणावमुक्त आहे. ब्रिटिश सैन्याचा एक मोठा हिस्सा भारतात आहे आणि या बंडखोरांचा बंदोबस्त होऊ शकतो. ब्रिटन कुठल्याही मेजर वादात अडकलेला नाही. ब्रिटन वादात ......
"ब्लडी हेल! त्यांना हे अपेक्षितच आहे कि आपले सैन्य भारतातील बंडाळीचा बंदोबस्त करू शकेल. पण आपण इथल्या गोंधळात अडकून पडलो कि युरोपात आपण तेवढ्या जोमाने लक्ष घालू शकणार नाही. पुन्हा जर्मनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलायला एक मुद्दा मिळेल. दॅट्स इट जोसेफ! हा एकच मुद्दा असू शकतो. एकदा इथे बंडाळी भडकली किंवा तशी पार्श्वभूमि तयार झाली कि मगच जर्मनी मोरोक्को प्रकरणात फ्रान्सला प्रत्युत्तर देईल. तोवर ते फार फार तर विरोध करतील पण तिखट प्रतिक्रिया येणार नाही. होनेसचा खूनी कोण हे कळेल तेव्हा कळेल पण आपल्याला ही गोष्ट त्याही आधी कन्फर्म केली पाहिजे. त्याने तुझी फ्रीडम थिअरी सुद्धा काही प्रमाणात जस्टिफाय होईल."
जोसेफ व अ‍ॅलेक्सी त्याच्याकडे बघत राहिले. जोसेफ यंत्रवत म्हणाला, "अ‍ॅलेक्सी वी नीड टू सेंड अ टेलिग्रॅम टू बॉम्बे, अ‍ॅज क्विकली अ‍ॅज पॉसिबल!"
"विल टेक केअर ऑफ इट, सर"

~*~*~*~*~

दुसर्‍या दिवशीची रात्र

सलील व त्याचे सहकारी रोमांचित झाले होते. दुपारचे जेवण घेऊन गेल्यानंतर सलीलने फणींद्रला आजच्या सूचना दिल्या होत्या. फणींद्रने सलीलला त्याची योजना सांगितली. जर्मनांच्या मदतीने देशव्यापी बंड! पाच दशकांपूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात सशस्त्र उठाव घडवून आणायचे. सलीलला यात जर्मनांचा काहीतरी स्वार्थ असल्याची शंका आली आणि ती त्याने बोलूनही दाखवली. फणींद्रने ती रास्त असल्याचे मान्य केले पण स्वार्थीच एकमेकांची मदत करतात नाही का? तापलेल्या तव्यावर पोळी भाजता येत असेल तर नाही का म्हणा?
सलीलने सगळ्यांना भूमिगत व्हायच्या सूचना दिल्या. न जाणो हे लोक पकडले गेले तर नव्याने मनुष्यबळ कुठून आणायचे? या सर्व घटनांचे टायमिंग जुळून येणे अत्यंत महत्त्वाचे होते. इतर ठिकाणी हाच संदेश व पुढील वाटाघाटींसाठी फणींद्र इथून निसटणे तितकेच गरजेचे होते. फणींद्रच्या सांगण्यानुसार त्याची जर्मन एजंटाबरोबर पुढील भेट कलकत्त्यात होणार होती. तिथेच त्यांना शस्त्रे मिळण्याचा संभव होता. सलीलला अजूनही फणींद्र एक व्यक्ती म्हणून फारसा आवडला नव्हताच, किंबहुना त्याची भीतिच वाटली. पण देशहितासाठी हा माणूस इथून सुखरूप बाहेर पडलाच पाहिजे.
आज रात्री सलील त्याला जंगलाच्या एका कडेला भेटणार होता. तिथून रेल्वे रूळ जवळ होते. मालगाडी तिथे वळण असल्याने काहीशी संथ चालते. एके ठिकाणी तर सिग्नल बघून चक्क थांबते. तिथल्या गार्डाला वश करण्यात आले होते. त्याच ठिकाणी फणींद्र गाडीत चढणार होता. प्लॅन सेट होता. इंग्रजांना भलेही फणींद्र इथे असल्याचा वास लागला असेल पण तो आज इथून बाहेर पडतोय हे कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आज काहीही झाले तरी ही योजना यशस्वी होणारच होणार!

*****

रुद्र आज नेहमीपेक्षा अंमळ कमीच जेवला. भरल्या पोटी जागरण करणे अवघड हे त्याला ठाऊक होते. अंधार पडल्यावर तो उठला व त्याने कपडे केले. शेवटच्या शो नंतर उद्या प्रवासाला निघण्यापूर्वी सगळे दंगामस्ती करण्यात मग्न असणार हे त्याला ठाऊक होते. केवळ मलिकाला तो काय करतो आहे याची कल्पना होती. तशी ती थोड्या प्रमाणात भद्रालाही होती पण मलिकाप्रमाणे त्याला त्यामागचे कारण ठाऊक नव्हते. नेहमी त्याच्या ट्रंकेच्या तळाशी असणारा तो योद्ध्याचा वेष आज त्याच्या अंगावर होता. डोक्याला केशरी रंगाचा फेटा होता. त्याच फेट्याचा दुसर्‍या टोकाला त्याने तोंडावर बांधले. रात्रीच्या अंधारात त्याची ओळख लपवायला तेवढे पुरेसे होते. संग्रामही तयारच होता. पाठीवर हलकेच थाप देताच तो चालायला लागला. अखेर त्याला त्या वाघाचा सुगावा लागला होता. आजच्या रात्रीच संधी होती. आज डाव साधणे गरजेचे होते. सर्कशीतले इतर सर्व नाचगाण्यात, जल्लोषात गुंग होते आणि रुद्र संग्रामसोबत जंगलात प्रवेश करत होता.

*****

ख्रिस, जोसेफ व अ‍ॅलेक्सी कपडे करून खाली आले. तिघांनीही पायात हंटिंग बूट चढवले होते. ख्रिस व जोसेफकडे भरलेली पिस्तुले होती तर अ‍ॅलेक्सीने एक मजबूत अशी लोखंडी काठी जवळ ठेवली होती. अ‍ॅलिस्टर व सदा त्यांची वाटच बघत होते. त्यांच्या बरोबर अजून काही पोलिस होते. जोसेफने काही न बोलता अ‍ॅलिस्टरकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. अ‍ॅलिस्टरने सर्व तयारी ओके असल्याचा इशारा केला. सदाने मग सूत्रे ताब्यात घेतली.
"हा जंगलाचा ढोबळ नकाशा. अगदी प्रमाणबद्ध नसला तरी साधारण अंतरांची कल्पना देते. या इथे, चतुश्रुंगी देवीची टेकडी आहे. त्याच्याही पलीकडे कुठेतरी सलील जातो हे नक्की. टेकडीच्या मागच्या बाजूला गुहांचे जाळे आहे. अगदी टेकडी नाही छोटे छोटे उंचवटे आहेत. असला तर फणींद्र तिथेच असणार हे नक्की. सलीलचा पाठलाग करण्यात अर्थ नाही कारण तो आपल्याला गुंगारा देण्यात एव्हाना चांगलाच पटाईत झाला आहे. त्यापेक्षा फणींद्रला बेसावध गाठलेले बरे."
सर्वांनी या योजनेला मान्यता दिली. प्रत्येकाने आपापल्या घोड्याला टाप दिली. ख्रिस जोसेफइतका तरबेज घोडेस्वार नसल्याने तो थोडा बिचकूनच बसला होता. एरवी जोसेफने त्याची खिल्ली उडवली असती पण आज वेळ वेगळी होती. लक्ष्यापासून नजर किंचितही ढळून चालणार नव्हती.

*****

फणींद्रने आवराआवर केली. आपल्या वास्तव्याच्या खुणा नाहीशा करायला सुरुवात केली. अंधार पडेपर्यंत त्याचे काम झालेले होते. सहज त्याने तळ्याकडे नजर टाकली. वाघ तिथे नव्हता. त्याचा निरोप घ्यायची फणींद्रची इच्छा अपुरी राहणार असे दिसत होते. त्याने खांदे उडवले. चिंधी गुंडाळलेली मशाल पेटवली. आता चांगलेच अंधारून आले होते. डोळे तारवटून त्याने सलीलने दिलेला नकाशा वाचला. पुन्हा एकदा काही राहिले नसल्याची खात्री करून घेतली व तो धुरकट चंद्रप्रकाशात रानवाट तुडवत निघाला.
त्याला निरखत उभी असलेली जोडगोळीही प्रकाशात आली. डेव्हिडने एकदा गुहेकडे नजर टाकली. ऑल ट्रेसेस क्लीन्ड टू परफेक्शन!! फणींद्रच्या मशालीचा ठिपका अजूनही दृष्टीआड गेला नव्हता. त्याला घाई नसती तर कदाचित डेव्हिडची दखल त्याने निश्चित घेतली असती व कुणी सांगावं तो कदाचित परत मागे आलाही असता. पण या परिस्थितीत तो असं काही करणार नाही याची डेव्हिडला खात्री होती.
"वास फुऽर आईन श्रेकलिकर मान!! (व्हॉट ए टेरिफाईंग मॅन!!)"
"अगदी मान्य डेव्हिड!!" पॅपीचा चिरका, कर्कश आवाज जंगलाची शांतता भंग पावत होता.
"हा आपल्या योजनेतला खूप महत्त्वाचा दुवा आहे. होनेसच्या जागी दुसरा कोणी मिळेपर्यंत याच्यापासून अंतर राखले पाहिजे व याला जिवंतही ठेवले पाहिजे."
"सहमत हेर पॅपी. आज याला ब्रिटिश इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाहीत. याची पडद्याआड राहून शक्य तितकी मदत केलीच पाहिजे."
"सुदैवाने डेव्हिड तुझ्या देशाने दहा वर्षांपूर्वीच या विजेर्‍या बनवायला सुरुवात केली. भले अजून सामान्य माणसाला उपलब्ध नसतील पण आपल्या आज कामी येत आहेत."
"पुन्हा एकदा सहमत हेर पॅपी. त्या टॉर्च (मशाल) पेक्षा ही टॉर्च कितीतरी अधिक सोयीस्कर आहे. अगदी या घनदाट जंगलातही आपण सहज वावरू शकू. मग याचा पाठलाग करूयात?"
"अर्थात डेव्हिड." डेव्हिडने ठराविक अंतर राखून फणींद्रच्या मागोमाग जायला सुरुवात केली.

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60903

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडा छोटा झालाय हा भाग.. एकदम पटकन संपला...

ह्या वेळेस एक्स्ट्रा इनिंग्ज मध्ये वाघाचे स्केच का?

जिथे तिथे हेर दिसताहेत एखादी तरी फ्राऊ आणा की!! Lol

जिथे तिथे हेर दिसताहेत एखादी तरी फ्राऊ आणा की!! Lol +१०१
दास इस्त आईनं टोलं इडे !! [ = ही भारीये कल्पना ;)]
फ्राऊ आहेत बर्याच पण एक सर्कशी ची मालकीण आहे आणि एकीला मधू खारकर सारख्या मिशा आहेत

सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद Happy

जिथे तिथे हेर दिसताहेत एखादी तरी फ्राऊ आणा की!! >> आणू की!! फॅन सर्व्हिस सगळ्यात आधी Proud

फ्राऊ आहेत बर्याच पण एक सर्कशी ची मालकीण आहे आणि एकीला मधू खारकर सारख्या मिशा आहेत >> हो ना Lol त्यांची स्केचेस टाकायला हवीत.

हे उशीरा पाहिलं. भारी आहे कि हे हिम्सकूल!!

एक्स्ट्रॉ फीचर - सिंह वि. वाघ
मार्जार कुळातील सर्वात मोठे सदस्य म्हणजे सिंह आणि वाघ. आकाराने सरासरी काढल्यास वाघ सिंहापेक्षा किंचित मोठा असतो. पूर्वी सायबेरियन वाघ सर्वात मोठे समजले जायचे पण गेल्या काही वर्षांपासून तो मान बंगालच्या वाघाला दिला जातो. खूप पूर्वीपासून या दोघांमध्ये अधिक शक्तिशाली कोण हा वाद चालू आहे? दोन्ही बाजूंचे अनेक खंदे पुरस्कर्ते आहेत. कित्येक नोंदी आहेत पण सर्वात प्रसिद्ध आणि जिच्या अधिकृततेविषयी कोणी शंका घेत नाही अशी एकच लढत - कथेत आलेली अ‍ॅटलस वि. सिमल्याचा वाघ.
सयाजीराजे गायकवाड यांचा सिंह हाच जंगलचा राजा व सर्वात शक्तिमान मार्जार असा विश्वास होता तर त्यांचा जवळचा मित्र कर्नल मेटलँड याचा पाठिंबा अधिक वेगवान वाघाला होता. दोघांत यावरून पैज लागली. अशियाई सिंह आकाराने लहान असतात म्हणून अ‍ॅटलस हा बर्बर सिंह खास मागवण्यात आला होता. अ‍ॅटलसविषयी जी मोजमापे नोंदींमध्ये आढळतात ती खरी मानली तर तो सार्वकालिक मोठ्या सिंहाच्या यादीत बराच वर असेल. कथेत आल्याप्रमाणेच या लढतीत वाघ जिंकला. सयाजींनी पैजेनुसार कर्नल मेटलँडला ३७,००० रुपये (आत्ताचे जवळ जवळ साडेसहा कोटी रुपये) दिले व सिंहाला शाही इतमामाने दफन करण्यात आले. या लढतीनंतरच वाघ सिंहापेक्षा अधिक ताकदवान हे मत तयार होऊ लागले.
असे म्हणतात कि सयाजींनी यानंतर वाघाला जंगलचा राजा ही मान्यता दिली व मेटलँडकडे वाघ सर्वात ताकदवान मांसाहारी प्राणी हे मत प्रदर्शित केले. यावर मेटलँडने ग्रिझली बेअर कडे बोट दाखवले. त्यानुसार सिएराहून खास अस्वल मागवण्यात आले होते व वाघ पूर्णपणे बरा झाल्यावर ही लढत होईल असे सयाजींनी जाहिर केले. परंतु वाघाच्या जखमा चिघळल्या व तो काही महिन्यांनंतर तो मरण पावला. त्यामुळे ही लढत होऊ शकली नाही.

my heart is beating, it's on repeating, i'm waiting for you!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!