निरर्थक जीवनाला अर्थ देताना दमत आहे

Submitted by बेफ़िकीर on 25 October, 2016 - 05:21

निरर्थक जीवनाला अर्थ देताना दमत आहे
शरीराची मला चिंताच नाही, मन रमत आहे

तुलाही मी नको आहे, मलाही मी नको आहे
चला कुठल्यातरी विषयात अपुले एकमत आहे

अरे हा का इथे आला, कुणी बोलावले ह्याला
जिथे जाईन तेथे माणसांचे हेच मत आहे

कुठेही सख्य नसताना जगाचा बार का झाला
इथे आता कुणाचेही कुणाशीही जमत आहे

फवारे मार विरहाचे, पुरावे नष्ट कर सारे
तिचे अस्तित्व ह्या खोलीत अजुनी घमघमत आहे

कधी अवतार कर्णाचा, कधी लाचार याचक तो
खरे सांगू? तसा दोन्हीकडेही तो नमत आहे

पुन्हा रमलीस ना त्याच्यासवे एका निशेपुरती?
तरी म्हटलो नभी तारा कसा हा चमचमत आहे

धुरांचे लोळ वार्‍याला दिशा सुचवून का गेले?
असावा 'बेफिकिर' बहुधा, चिता ज्याची शमत आहे

===================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users