द कॅमब्रियन पट्रोल

Submitted by सोन्याबापू on 23 October, 2016 - 11:30

जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ? ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते. अश्यावेळी कामी येतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले अन भयानक जास्त खडतर संयुक्त अभ्यास, वायुसेना क्षेत्रात ते रेड फ्लेग संयुक्त अभ्यास असतात, नेवी मध्ये आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्यु , ही नावे बरीच नावाजलेली आहेत, ह्यातील रेड फ्लेग अलास्का, संयुक्त संस्थाने अमेरिका इथे आयोजित होतात तर फ्लीट रिव्यु ला फिरते असते आयोजकपद. आर्मी करता असल्या अभ्यासाचा मुकुटमणी शोभावा असा एक अभ्यास असतो, इंग्लंड आर्मीने आयोजित केलेला हा कार्यक्रम, भयानक खडतर तर असतोच शिवाय तो एका सैनिकाची क्षमता, संघशक्ती, निर्णयक्षमता, फायरिंग मध्ये कौशल्य, ते फर्स्ट एड मधली कला सगळे काही तपासतो. अश्या ह्या कार्यक्रमाचे नाव आहे “ द कॅमब्रियन पट्रोल”
आता ह्या कार्यक्रमाबद्दल साद्यंत सांगायचे झाले, तर रॉयल ब्रिटीश आर्मी ह्या इंग्लिश सैन्याच्या भूदलशाखेतल्या टेरीटोरियल आर्मी मधल्या वेल्श सैनिकांनी ४० वर्षांपूर्वी सुरु केलेली एक परंपरा म्हणजे कॅमब्रियन पट्रोल . ह्याची रूपरेषा अतिशय साधी असते. एकूण ५५ किलोमीटरचा रूट, तो सहभागी झालेल्या देशाच्या सैन्य तुकडीने फुल कीट लोड घेऊन (अंदाजे २२ किलो माणशी) ४८ तासात कापायचा. ह्या प्रवासा दरम्यान त्यांना युद्धकैदी प्रबंधन (पिओडब्ल्यू मेनेजमेंट), काउंटर इंसार्जन्सी ऑपरेशन, मेडिकल एव्हक्युएशन, सर्च एंड रेस्क्यु, रेकी इत्यादी नेमून दिलेली कामे सुद्धा करावी(च) लागतात, रस्त्यात जर कुठे सामुग्री विसरली तर त्या विसरलेल्या सामुग्रीच्या बरोबरीने दगड सामानात भरून वजन कायम राखावे लागते , पण त्याने तुमच्या संघाचे मार्क कमी होतात. हा सगळा खेळ खेळला जातो तो उत्तर वेल्स, इंग्लंड मधल्या कॅमब्रियन डोंगरांत अन वेल्श दलदली भागात. म्हणूनच ह्या अभ्यासाचे नाव असते कॅमब्रियन पट्रोल.
आजच ह्या अभ्यासाबद्दल का लिहावे वाटले ? तर आज ह्या अभ्यासात सहभागी झालेल्या भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ ने (२/८ गोरखा रायफल्सने) सुवर्णपदक प्राप्त केले आहे, भारत सहभागी व्हायला लागल्यापासून हे भारताचे बहुतेक तिसरे पदक असून सुवर्णपदक प्राप्त करणे म्हणजे संबंधित संघाने पूर्ण अभ्यासात ७५% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणे होय, ह्या अगोदर डोगरा रेजिमेंट ने २०१४ मध्ये अन २०११ मध्ये ह्याच अभ्यासात सुवर्णपदक मिळवून भारताची मान गर्वाने ताठ करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. चला आज आपण सगळे मिळून ह्या विश्वातल्या सर्वात कठीण युद्धाभ्यासात सर्वात अव्वल आलेल्या आपल्या सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करूयात.

जय हिंद

काही क्षणचित्रे

Camb1

(करावी लागणारी कारवाई)

camb2

(गतविजेते डोगरा रेजिमेंटचे जवान)

camb3

(ह्या वर्षीचे विजेते गोरखा रायफल्सचे जवान)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती.

>>आज ह्या अभ्यासात सहभागी झालेल्या भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ ने (२/८ गोरखा रायफल्सने) सुवर्णपदक प्राप्त केले आहे, भारत सहभागी व्हायला लागल्यापासून हे भारताचे बहुतेक तिसरे पदक असून सुवर्णपदक प्राप्त करणे म्हणजे संबंधित संघाने पूर्ण अभ्यासात ७५% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणे होय, ह्या अगोदर डोगरा रेजिमेंट ने २०१४ मध्ये अन २०११ मध्ये ह्याच अभ्यासात सुवर्णपदक मिळवून भारताची मान गर्वाने ताठ करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.>> मनःपूर्वक अभिनंदन.

हे महान आहे. टोटल रिस्प्केट! परक्या मुलुखात, अपरिचित हवामानात जाउन असे यश मिळवणे हे फार मेहनतीचे आणि चिकाटीचे काम असेल. वर्षाच्या कोणत्या महिन्यात हे होते?

सोन्याबापू - तुम्हाला शक्य असेल तर आमच्या सर्वांच्या इथल्या अभिनंदनाच्या कॉमेण्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा Happy

भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ चे अभिनंदन ! आणि हि सर्व माहिती आमच्यापर्यंत
पोहोचवल्याबद्दल आभार !

अभ्यासात सहभागी झालेल्या भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ ने (२/८ गोरखा रायफल्सने) सुवर्णपदक प्राप्त केले आहे>>
अभिनंदन व हॅटस ऑफ!!

सोन्याबापु तुमचे धन्यवाद!!

भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ चे अभिनंदन ! आणि हि सर्व माहिती आमच्यापर्यंत
पोहोचवल्याबद्दल आभार !
+ १

कालच वर्तमानपत्रात ही बातमी वाचली.

भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ चे अभिनंदन ! आणि हि सर्व माहिती आमच्यापर्यंत
पोहोचवल्याबद्दल आभार !>>>> +१००

ग्रेट !! ही माहिती नव्यानेच कळाली!
गोरखा रेजिमेन्टच्या परंपरेबद्दल ऐकले होते पण अगदी लक्षात राहिलेले म्हणजे, एका कर्नल च्या अंत्यसंस्कारच्या वेळी - बहुधा कर्नल राय नाव होतं , त्यांची १२-१३ वर्षाची मुलगी अखेरच्या दर्शनाला आणि मानवंदना द्यायला आली, रडत होतीच बिचारी, पण पित्याचे राष्ट्रध्वजात गुंडाळलेले पार्थिव पाहून तिने अश्रू आवरून उस्फुर्तपणे "होइ के होइ ना!! " अशी जी गोरखा रेजि. ची पारंपरिक युद्ध आरोळी देऊन बापाला सॅल्यूट ठोकला !! तोच तिचा अखेरचा निरोप! इतरही जवानांनी मग त्या आरोळीचा गजर केला.तो व्हिडिओ पाहून काटा येतो अंगावर! वेगळ्याच मातीची बनलेली असावीत ही माणसं!!

गोरखांच्या परंपरा अतिशय जास्त झळाळत्या अन तेजस्वी आहेत मैत्रेयी जी, एक जुना वाचलेला किस्सा आठवतो,

सॅम माणेकशॉ त्याकाळी गोरखा रेजिमेंटच्याच एका बटालियनचे कामांडिंग ऑफिसर होते, एका रात्री ते मेस मधून परत येताना त्यांना दूर एक दृश्य दिसले एक तरुण लेफ्टनंट दर्जाचा अधिकारी एका नवख्या पोरसवदा ओआर (अदर रँक, शिपाई) समोर उभा होता, अन तो पोरगेलेसा जवान त्याला एकामागे एक पटापट सॅल्यूट करत होता, कुतूहल चाळवून सॅम तिथे पोचले तसे तो तरुण लेफ्टनंट अन पोरगेलेसा जवान दोघांनी त्यांना कडक सॅल्यूट केला तेव्हा त्याचा तितकाच कडक प्रतिसाद देऊन सॅम ह्यांनी चालू असलेल्या प्रकारचे कारण विचारले, त्यावर तो अधिकारी म्हणाला ,

"Sir, this young recruit displayed the audacity of not saluting a senior officer that is me when passing by me, so I have punished him to salute me a 1000 times so that he doesn't dares to break the authority anytime in future"

ह्यावर सॅम शांतपणे उद्गारले,

"Very well young officer thats nice of you striving to maintiain the shist (discipline) of the battalion, but make sure u reply each of the boy's salute with an equally weighted and passionate salute, begin!"

एकंदरीत फौजेत मान घेणेच मोठे नसते तर तो देणेही कटाक्षाने पाळले जाते, पाळावेच लागते, हे त्या तरुण अधिकाऱ्याला अतिशय नीट समजवण्याची ही रीत होती सॅम बहादुरांची.

खूपच अभिमान वाटतोय गोरखा रेजिमेंट बद्दल.. इंडियन आर्मी ला कडक सल्यूट!!
इतकी आगळी वेगळी माहिती मिळते ना तुमच्याकडून दरवेळी.. स्पेशल आभार!!!

पित्याचे राष्ट्रध्वजात गुंडाळलेले पार्थिव पाहून तिने अश्रू आवरून उस्फुर्तपणे "होइ के होइ ना!! " अशी जी गोरखा रेजि. ची पारंपरिक युद्ध आरोळी देऊन बापाला सॅल्यूट ठोकला !!>>> हे वाचताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिलेत.

make sure u reply each of the boy's salute with an equally weighted and passionate salute, begin!">>> हे बाकी मस्तच!!!

सोन्याबापु, भारतीय लष्करातील वेगवेगळ्या रेजिमेंट्स, बटालियन आणी त्यांच्या परंपरा, इतिहास याबद्दल आम्हा सामान्य नागरीकांना फारशी माहिती नसते. याबद्दल तुम्ही काहितरी लिहावे अशी विनंती आहे.

"सोन्याबापु, भारतीय लष्करातील वेगवेगळ्या रेजिमेंट्स, बटालियन आणी त्यांच्या परंपरा, इतिहास याबद्दल आम्हा सामान्य नागरीकांना फारशी माहिती नसते. याबद्दल तुम्ही काहितरी लिहावे अशी विनंती आहे." +१००