जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १२): भिलवाडा - हजार किमी पार

Submitted by आशुचँप on 22 October, 2016 - 16:05

http://www.maayboli.com/node/60472 - (भाग ११): अजमेर - चमत्कार झाला की हो
======================================================================

नवा दिवस, नवा उत्साह आणि नवी आशा असे काहीसे आजच्या दिवसाचे वर्णन करता येईल. एकतर पायदुखीचा ससेमिरा संपल्यामुळे मी लईच खुशीत होतोे. त्यातून ब्लिडींगचा त्रासही कमी आला होता. काल व्यवस्थित डाएट फॉलो केले आणि पाणीही सातत्याने पीत राहीलो. त्यामुळे आज एकदम प्रफुल्लित वगैरे म्हणता येईल असे वाटत होते.

काल त्या मालिशवाल्याने सांगितल्याप्रमाणे रात्री झोपताना क्रेप बँडेड लावले आणि सकाळी काढून शूज चढवले. मला टेन्शन होते की काल जे भयावह उतार उतरून आलो ते आता चढून जायचे. बॉडी पुरेशी वॉर्म नसताना अचानक चढ आले की कसे फाफलायला होते याचा चांगलाच अनुभव होता. त्यामुळे आज अगदी कसून वॉर्मअप केला.

पण सगळेच फुकट कारण आम्ही वेगळ्याच रस्त्याने शहराबाहेर पडलो. पुन्हा आलो त्या मार्गाने जाण्यापेक्षा दुसरा रस्ता घेतल्यामुळे आमचे चढउतार तर वाचलेच शिवाय २० एक किमी अंतर वाचून आम्ही डायरेक्ट हायवे ला लागलो.

है, म्हणलं, लई भारी, असं काहीतरी पाहिजे. अशी अंतरे झपाझप कमी व्हायला पाहिजेत. तर मज्जा.
आजचे पण अशा मज्जा येऊ देईल तर मोहीम कसली. थोडे पुढे जाताच एक हळूवार चढ लागला. दिसताना बारकाच दिसत होता, त्यामुळे बेसावध राहीलो. पण तो चढ संपायचे काय नावच घेईना. वळण घेऊन अजून वर वर जात राहीला. छातीचे भाते फुलले, फुफुस्से पेटली आणि लक्षात आले की हा एक फुल्ल लेग्थ घाटच आहे. कुठेही कसलीही पाटी नाही, काही नाही. डायरेक्ट घाटच.

आधी मी बाकींच्याबरोबर रेटली सायकल पण पाय नुकताच बरा झाल्याचे जाणवले आणि मनाला आणि पायाला लगाम घातला. शांतपणे सर्वात खालच्या गियरवर टाकली आणि आरामात रमत गमत घाट चढून आलो. घाटमाथा पार केला आणि मस्त उतार लागला. एकदम वळणावळणांचा पण इतरवेळी कसे घाटमाथ्यावरून कसे विहंगम दृश्य दिसते, तसे इथे काहीच नव्हते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अमाप झाडी त्यामुळे एखद्या बोगद्यातून जावे असे वाटत होते. वळणे वळणे त्यामुळे एका रेषेतही फार लांब काही दिसत नव्हते. आणि कित्येक किमी जाऊनही आमची गँग दिसेना, त्यामुळे मनात शंका आली की कुठेतरी आपण फाटा मिस तर नाही ना केला. वाटेत थांबून फोन लावण्याचा प्रयत्न केला पण रेंजही नव्हती.

मै और मेरी परछाई...अक्सर ये बात करते है

मग तशीच दामटत आलो. तर पुढे एका धाब्यावर थांबलेले दिसले. तेही अगदी नशिबाने कारण तो हायवे ला लागणारा फाटा होता आणि आजूबाजूला प्रंचड ट्रक थांबलेले होते, आणि त्या गर्दीत आतल्या बाजूला बसलेल्या लाल जर्सी दिसल्या आणि मी सायकल आत वळवली.

कितीही नाही म्हणले तर अचानक घाट चढण्यामुळे पायावर थोडा लोड आला होता, मग बाबुभाईने त्याच्याकडचे एक जादुई तेल दिले. ते छानपैकी चोळून लावले पायावर आणि पुन्हा सज्ज झालो.
पुढे नसीराबादच्या बायपास रोडने पुढे सरकलो. या गावाबद्दल एक भलतीच इंट्रेस्टींग माहीती मिळाली. नावावरून तरी कुणा नबाब किंवा मुघल वंशजाचे वाटते पण प्रत्यक्षात हे नाव दिले गेले इंग्रज अधिकारी David Ochterlony याच्या नावावरून. शाह आलमने या गोऱ्या साहेबाला Nasir-ud-Daula असा खिताब दिला होता, ज्याचा अर्थ राज्याचा रक्षणकर्ता.
असेही या गोऱ्याने भारतीय जीवनपद्धती पूर्णपणे अंगीकारली होती. बादशहाप्रमाणेच तो दरबार भरवत असे, भारतीय जेवण जेवत असे इतकेच काय तर त्याने १३ भारतीय बायकाही केल्या होत्या. आणि संध्याकाळी आपल्या जनान्यासोबत साहेबमजकूर शहराचा फेरफटका मारत असत. (संदर्भ विकीपिडीया)

असो, तर आमचे आजचे मुख्य लक्ष होते ते १००० किमी पार करण्यावर. नसीराबादच्याच थोडे पुढे, म्हणजेच अजमेरपासून ३८-४० किमी च्या टप्प्यावर कुठेतरी. त्यामुळे तिथून सगळे एकत्रच निघालो. माझा सायक्लोमीटर कन्याकुमारीच्या वेळी गंडला होता आणि सायकलवरून काढला की मीटर झीरो करायचा. त्यामुळे त्यावेळी मला पूर्ण राईड त्यावर घेताच आली नव्हती, पण मधल्या काळात माझ्या धाकट्या भावाने जुगाड करून मला ते फिट करून दिले होते. त्यामुळे मी एकदम उत्साहात होतो. नसिराबादला ४ लेन हायवे लागला. NH79.
जरी आमचा प्रवास एकाच मार्गावरून होत असला तरी मागे पुढे जाणे, किंवा अन्य काही कारणामुळे आमच्या सगळ्यांच्या सायक्लोमीटरवर वेगवेगळे आकडे असत. त्यातल्या त्यात मी आणि लान्स एका फ्रिक्वेन्सीवर होतो. त्यामुळे तोच आकडा अधिकृत धरायचे ठरले. पण आमच्यातही १०० एक मीटरचे अंतर होते. त्यामुळे लान्सचे १००० पूर्ण झाले तेव्हा मी अजूनही तीन आकडीमध्येच खेळत होतो.
मग एकाच जागी पूर्ण करायचे म्हणून मी पुढे जाऊन एक चक्कर मारून आलो.

..

अगदी १००० व्या काट्याला बरोबर सायकल थांबवायची यासाठी एकदम सावकाश चालवत होतो.
पण हाय रे दैवा, मला हे लक्षातच आले नाही की माझ्या ट्रीप मीटरला फक्त तीन आकडी दाखवायची सोय होती. त्यामुळे ९९९ झाले आणि आता कुठल्याही क्षणी १००० चा आकडा दिसणार या अपेक्षेत असतानाच त्याने सगळ्या फिगर्स शू्न्य करून टाकल्या.

आईशपथ्थ असली चिडचिड झाली ना. मला हे आधीच लक्षात यायला हवे होते. ओडोमीटर सेट केला असता तर त्याने चार आकडी संख्या दाखवली असती.
(याचे स्पष्टीकरण देतो - ओडोमीटर म्हणजे आपल्या बाईकचे किती किमी झाले ही दाखवणारी संख्या, ती सायक्लोमीटरवर पण असते, आणि आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राईड त्यात मोजल्या जातात. अर्थात ते मॅन्युअली सेट करता येते.) मी मागच्या वेळी सेट केल्यानंतर आत्तापर्यंत ४५०० किमी सायकलींग केले होते. त्याचा फोटो काढला आणि ओडोमीटर सेट करून १००० वर केला, तेव्हा कुठे मनाला समाधान मिळाले.

तर मुख्य मुद्दा होता की १००० किमी पूर्ण झाले होते. आणि कन्याकुमारीच्या बरोबर उलट फिलींग होते. तेव्हा हजार किमी पूर्ण झाले होते तेव्हा घरापासून खूप लांबवर आल्याचा फील होता, तर आता घर जवळ आल्याचे. अर्थात जवळ म्हणजे तरी आलो तितकेच, किंबहुना त्यापेक्षा अधिक अंतर बाकी होते. तरी हजार किमीचा पल्ला पार केल्यामुळे मोहीमेचा पूर्वार्ध पार पडला असे म्हणायला हरकत नव्हती. त्याच आनंदात बायकोला मेसेज टाकला, म्हणलं, मी हजारो किमी अंतर कापून जवळ आलोय.

'मेरीडा'र्लिंग

मग एक छोटेेसे सेलीब्रेशन करण्यासाठी पुढे डावीकडे लागलेल्या धाब्याकडे सायकली वळवल्या आणि दालबाटीची अॉर्डर सुटली.

दुपारी इतके जड जेवण म्हणजे कमाल होती, पण आज सगळ्याला सूट होती. अर्थात तो हायवेवरचा धाबा, खासकरून ट्रकवाल्यांसाठी. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाने बोंब असणार हे उघड होते, पण तो दाल जेव्हा टमरेलासारख्या भांड्यातून ओतू लागला तेव्हा अगदीच कसेतरी झाले. पण जातीच्या खाण्याऱ्याला स्वच्छतेचे इंद्रीय अावरावे लागते, असे पु.ल. म्हणून गेलेच आहेत, त्यामुळे लगे हातो आडवा हात मारला.

असेही आम्ही कुठलेही मिळेल ते पाणी, पार अगदी ड्रममधून वगैरे काढलेले असले तरी नाक वाकडे न करता पीत होतोच कारण राजस्थानात बिस्लेरी पाणी वगैरे चोचले फारसे नव्हतेच. तरी मला जिथे मिळेल तिथे मी माझी कॅमलबॅग भरून घेत होतो. त्यात दोन लीटर आणि सायकलला पुढे अडकवलेल्या बाटलीत एक लीटर असे तीन लीटर पाणी मला बराच काळ पुरत असे.

दुसरा मला फायदा होता तो माझ्या सायकलला लावलेल्या एरोबारचा. सुरुवातीचे काही दिवस त्याचे सेटींग नीट न जमल्यामुळे मी त्याचा पुरेसा वापर करू शकत नव्हतो. पण नंतर मी हेमकडून चांगला कसून पाना मारून घेतला आणि मग हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी, किंबहुना हाताला आणि पाठीला अधून मधून विश्रांती देण्यासाठी त्याचा वापर करत होतो. त्यामुळे कन्याकुमारीला जे हात बधीर होण्याचा त्रास होता, तो जवळपास नाहीच झाला. अर्थात एरोबारचाएक मेजर ड्रॉबॅक ही होता आणि त्याची किंमत मला पुढे चुकवावी लागलीच. ते येईलच पुढे ओघात.

...

हॉटेलवाला भलताच कवी मनाचा असावा...

एरवी नुसते निघायची घाई करणारे आज एकदम निवांत होते. काकांकडे बघून तर वाटत होते हे आज बहुदा इथेच मुक्काम करणार.

...

निवांत बसलेले अही-मही...एक दुर्मिळ दृश्य

पण नाही, सगळ्यांची पुरेशी विश्रांती झाल्यानंतर आम्ही निघालो. आता उन्हाचा तडाखा अजूनच वाढला होता आणि नॅशनल हायवे असल्यामुळे आजुबाजूला एक झाडही नव्हते. नुसताच रखरखाट आणि बाजूने गरम हवा टाकत जाणारी ट्रकची धुडे. अंगाची अक्षरश लाही लाही होत होती आणि त्या कमालीच्या गरम वातावरणातून दहा बारा किलो वजन लादलेल्या आमच्या सायकली ओढत नेण्याचे काम कमालीचे कष्टप्रद होते.

पण तरीही पायाचे दुखणे थांबल्यामुळे मी आनंदात होतो आणि त्यापुढे हे कष्ट काहीच वाटत नव्हते. आणि सुसाट गँगच्या पाठोपाठच राहत होतो. इतकेच काय तर गुलाबपुराच्या अलीकडून मी सायकल पुढे काढली, एरोबारवर रेललो आणि फुल्ल स्पीडने स्प्रींट मारली. सरळ रस्ता होता आणि भला मोठा त्यामुळे पॅडल सैल सोडून सायकल पळवायला छान वाटले. अर्थात दहा एक किमी नंतर अही मही रावणांनी आणि ओबीने मला पकडलेच.
ओबीची खरी मजा येत असे ती त्याला ओव्हरटेक करुन पुढे गेल्यावर.. तसं करणं म्हणजे त्याच्या कासोट्याला हात घालणं. कुणी ओव्हरटेक करुन गेला की ओबी दातओठपायकंबर सगळं खात त्याची सायकल दामटत असे. जोवर पुढे गेलेल्याला पाठी टाकून किमीभर अंतराचा फरक पडत नसे तोवर त्याला समाधान नसे. त्याच्या त्या जड झालेल्या/केलेल्या सायकलमुळे तो हतबल होता. खरं तर त्याला ओव्हरटेक करुन त्याची मजा घेणं हे विहिरीत पडलेल्या वाघाला माकडांनी चिडवण्याचा प्रकार होता..

बाबुभाई...और क्या चाहीये जिंदगी मै

मध्ये एके ठिकाणी खायला थांबलो तर तिथे ठंडी खीर असा मेनु दिसला. त्या फुफाट्यातून आल्यावर कोल्ड्रींकपेक्षा हा पर्याय बरा वाटला आणि सर्वानुमते मागवला. आणि भलताच भारी निघाला.

गारेगार खिरीवर मस्त चारोळ्यावगैरे टाकून दिलेल्या. आहा, मस्त वाटले, बाहेर कडक उन्ह आणि आत गारेगार खीर. तीपण अशी पौष्टिक. त्यांतर आम्ही दुपारी जिथे मिळेल तिथे खीरच ओरपत होतो. गुजरातमधलाही तो लोकप्रिय मेन्यु होता.

त्यानंतरही मी बराच वेळ सुसाट गँगच्या पुढेच चालवत राहीलो. मध्यंतरात वेदांग का सुर्हुदची सायकल पंक्चर झाली आणि काकांची परवानगी घेऊन मी पुढे निघालो. त्यानंतर लान्सदादा पुढे आले आणि मग बराच वेळ मी दादांच्या सावलीत वाटचाल करत राहीलो. तर हेमने ओबीची पाठ पकडली होती. सुह्ुद नेहमीप्रमाणेच मागे पुढे असे पक्ष बदलत राहीला.

आओ पधारो..म्हारो हॉटेल मा Happy

बाकी तसे मग मार्गात सांगण्यासारखे काही विशेष घडले नाही आणि पहिल्यांदाच सुसाट गँगला कुणासाठी थांबावे लागले नाही कारण भिलवाड्यात आम्ही सगळ्यांनी एकत्रीतच प्रवेश केला. यामुळे एक अतीव म्हणता येईल असे समाधान मिळाले. दुखण्याने माझा जो आत्मविश्वास पार अगदी रसातळाला गेला होता गेला होता त्याला सेेनेक्सप्रमाणे चांगलीच उसळी मिळाली. अर्थात त्याचे साईड इफेक्ट होतेच.
मधले जे दोन तीन दिवस मी शारिरीक आणि मानसिक पातळीवर झगडत होतो, त्याने हप्ता वसूली केली होती. जरी मी उत्साहाच्या भरात जोरजोरात सायकल चालवत आलो असलो तरी दमछाक होत होती आणि मला एनर्जीचा साठा असा बॉटम्सअप करून संपवायचा नव्हता. अजून बरीच राईड बाकी होती आणि पुरवून पुरवून, व्यवस्थित मॅनेज केले तरच मी फारसा त्रास न होता पुण्याला पोचू शकणार होतो. त्यामुळे मी या पुढे रावणांच्या नादी न लागता आपण आपल्या मध्यम वेगाने जाण्यावर भर देणे जास्त योग्य ठरले असते.

भिलवाडा ही टेक्सटाईल सिटी म्हणून ओळखली जाते. मोठमोठ्या टेक्स्टाईल कंपन्या आहेत. भिलवाडा यायच्या आधीच मयूर सुटींग्जची लांबलचक कंपनी लागली. भिलवाड्यात प्रवेश करतांना कुठली तरी नदी ओलांडतांना हेम आणि काका बरोबर होते तर एका स्कुटरवाल्याने चालतीवरच चौकशी सुरु केली. हॉटेल कुठे आहे ते सांगितलं. येउन आम्हालाही थांबवले आणि एका तिठ्यावर हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि प्रेमाने चहा पाजला.
भिलवाड्यातल्या स्वागताने जरा माणसांत यायला लागल्याचा फिल यायला लागला.

खरी मजा आली ती कुतुहलाने पहाणाऱ्या मुलांना टाटा करुन जातांना! प्रचंड आनंद दिसतो त्यांच्या चेहऱ्यावर..उत्साहाने उड्या मारत, ओरडत चिअरअप करतात. कदाचित त्या प्रत्येकाच्या मी कायम लक्षात राहीन.

आजचे हॉटेल होते लँडमार्क. अगदी मध्यवस्तीत आणि समोरच सगळ्या खासगी बस कंपन्यांचा डेपो होता. त्यामुळे कमालीची वर्दळ होती.

आज दिवसाढवळ्याच हॉटेलवर पोचल्यामुळे वेदांगची बाल्कनीतून सूर्यास्त बघण्याची इच्छा पूर्ण होणार अशी चिन्हे दिसत होती. पण काय गडबड झाली कळेना, अॅडव्हान्स बुक करूनही रूम मिळायला अडचण आली. मॅनेजरने काय घोटाळा केला होता देव जाणे पण त्याला काही नोंदच सापडेना. वेदांग, ओबी त्याच्याशी हुज्जत घालत होते तर मी, काका आणि सुह्दने वेळेचा सदुपयोग करत सायकलींना तेलपाणी करून घेतले. चेन, ब्रेकवर बारीक धुळीची पुटे चढली होती आणि त्यामुळे खरखर येत होती. मग मस्त चकाचक करून त्यावर छान ऑइलिंग करून आमच्या लाडक्यांना खुश केले.

अर्थात हे बघायला गर्दी झाली नसती तरच नवल. तोपर्यंत रुम मिळाल्याची सुवार्ता कळली. झाले होते असे की त्या मॅनेजरने कुठल्यातरी लोकांना लग्नाचे वऱ्हाड आले म्हणून परस्पर आमच्या खोल्या देऊन टाकल्या होत्या आणि आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावायला पहात होता. पण वेदांग आणि ओबीने दम भरताच त्याने एकदम तिसऱ्या मजल्यावरच्या बारक्या बारक्या खोल्या गळ्यात मारल्या.
आमच्याकडे असेही दुसरा काही पर्याय नव्हताच, अजून दुसरीकडे जाऊन हॉटेल शोधण्याचे पेशन्स आमच्यात नव्हते त्यामुळे आलीया भोगासी म्हणत आहे त्या रूममध्ये घुसलो. आणि मग थकल्या भागल्या अंगाने मऊ गादी दिसताच तिकडे झेप घेतली. अहाहा, दिवसभराच्या रगड्यानंतर त्या मऊसूत गादीवर पहुडण्याचे जे काय सुख होते त्याला तोड नव्हती. दरम्यान, आज ओबीच्या सल्ल्याने एका दुकानात हे तेल घेतले.

अतिशय गुणकारी होते. आख्ख्या राईड दरम्यान तर मी रोज या तेलाने पायाला मालिश केलेच शिवाय पुण्याला आल्यावरही बरेच दिवस वापरत होतो.

...

झ्याकपॅक खोलीला आणलेली कळा. इतका पसारा करून आम्ही सकाळी सगळे आवरून वेळेत कसे काय निघत होतो हे एक न उलगडणारे कोडे होते.

दरम्यान, त्या हॉटेलचे नष्टचक्र काय थांबत नव्हते. अंघोळीला गरम पाणीच येईना. मग रिसेप्शनला तक्रार केल्यावर त्याने बऱ्याच वेळानंतर प्लंबर पाठवला. त्याने खूप खाटखुट करून पाहीली पण काहीच नाही. त्यामुळे जसे येईल तसे गार-कोमट पाण्याने अंघोळी उरकल्या.

ओबीने मालकाचा चांगलेच धारेवर धरले आणि शेवटी त्याने आम्हाला शांत करण्यासाठी गरम गरम शेवयांची खीर पाठवली प्रत्येकाला वाडगाभर.
आता कुठे नको जायला, जेवणही इथेच मागवू असे वाटत होते. पण वेदांग ऐकेना. त्याला त्याच्या एका मित्राकडून भिलवाड्यातील दाल बाटी खासीयत असलेल्या हॉटेलचा पत्ता कळला होता आणि त्याने आमची तिथपर्यंत वरात काढली. ते होते बरेच लांब, शेवटी एक टमटम केली आणि सगळे असे कोंबून तिथे बसलो.

पण जाणे वसूल व्हावे असेच होते. अतिशय चविष्ट दाल बाटी आणि त्यावर मजबूत तूप. इतके की त्याच्याकडे दोन दुधाच्या मापासारखी मापटी होती, छोटा आणि बडा. बडा माप दहा रुपयाला आणि छोटा पाच.

आणि बडा घेतला तर अक्षरश पावशेर तूप पानात ओतले. अगो बाब्बो, तो पौष्टिक आहार संपवता संपवता धाप लागली.

खास पुणेरी पाटी म्हणावी अशी, पण संतुष्ट ग्राहक वगैरे हिशेबात बसत नाही Happy

इतक्या आकंठ जेवणानंतर सुस्ती आली असती तर नवल. सुस्ती कसली गुंगीच आली आणि कसेबसे रुमवर येऊन ठेपलो आणि क्षणार्धात झोपेने आमचा कबजा घेतला.

आजचा हिशेब...१३० किमी..आजही तीन तासात ४० सिस्टीम चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि मुख्य म्हणजे अंतर कमी असल्यामुळे दिवसाउजेडी मुक्कामी पोचलो. पहिल्या ग्राफ मध्ये लागलेला घाट दिसतोय. कसला सुळका आहे.

=========================================================
http://www.maayboli.com/node/60780 - (भाग १३): नाथद्वारा - सुंदर अनुभव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालाय हा ही भाग.. बरेच तूप गेलेय पोटात या वेळेला Proud

कोणत्याही अडचणीविना प्रवास पार पडलेला वाचून बरे वाटले.

मस्त!

अरे, तुम्ही लोकं सायकली एवढ्या रेटता तर प्लॅन मध्ये आजूबाजूचं काही बघायचं का नाही आखत? या नाही पण बर्‍याचश्या मागच्या लेखात इथे-तिथे काहीतरी बघण्याजोगे होते पण आमच्या कडे वेळच नव्हता असे म्हणत असतोस...थोड्या सायकली कमी हाकून ही आडबाजूची, आपण आवर्जुन कधी बघायला जाणार नाही, अशी ठिकाणं बघणं तत्वात बसत नाही का तुमच्या?? Happy

कसे आहे कि इच्छा खूप होती, पण पर्याय नव्हता. एकतर जम्मू पुणे झाली असती किंवा मग स्थळदर्शन झाले असते. एकतर 19 दिवसांची सुट्टी मिळणे महामुश्किल, त्यात सगळ्यांच्या तारखा जुळून येणे, तेवढ्या दिवसात पुणे गाठणे मस्ट होते. मला खूप वाईट वाटत होते पण काय करणार. पुढे मागे राजस्थान दौरा कारने करायचा विचार आहे, त्यावेळी ओव्हर क्रौडेड ठिकाणे टाळून अशी हटके ठिकाणास भेट देता येईल

वा !! लिखाणातुन तुझी दुखण्यातून झालेली सुटका जाणावतीये.

आता पुढच्या भागाची ओढ लागलीये, नेहमी प्रमाणेच !!

मस्त भाग. वाचूनच दमायला झाले. तो निवांत बसलेल्या लाल पागोटीवाल्या माणसाचा फोटो मस्त आला आहे. तो बघोन चित्र काढायचा प्रयत्न करीन. भीलवाड्याहून चांगल्या सूट लेंग्थ घ्यायच्या ना भाउ. इतकी मेहनत आहे तसे सूट बूट घालून फोटो आले असते. Happy गार खीर चे लॉजिक ग्रेट आहे. मापामापाने तूप म्हणजे एकदम अब्बब्ब झालं

तो निवांत बसलेल्या लाल पागोटीवाल्या माणसाचा फोटो मस्त आला आहे. तो बघोन चित्र काढायचा प्रयत्न करीन.

>>>अरे वाह, मस्तच, मलाही पाठवा काढलंत तर

भीलवाड्याहून चांगल्या सूट लेंग्थ घ्यायच्या ना भाउ. इतकी मेहनत आहे तसे सूट बूट घालून फोटो आले असते.

>>>>इच्छा झालेली, पण इतके ओझे कोण वागवत आणणार पुण्यापर्यंत, आधीच आमचे सामान ओसंडून वाहत होते

धन्यवाद स सा, रोमा

व्वा, मजा आली. मस्त केलय वर्णन. Happy सगळे प्रसंग जितेजागते नजरेसमोर उभे रहातात. अन अर्रर्र, आपणही त्यावेळेस तिथेच असायला हवे होतो असे राहुन राहुन वाटते.

>>>>> मै और मेरी परछाई...अक्सर ये बात करते है <<<<
मी फारच कमी म्हणजे नगण्य फिरलोय, पण जेव्हा फिरलोय, तेव्हा आख्ख्या सुनसान रस्त्यावर दमलेभागले असताना एकटेच असता, तेव्हा खरोखर काय फिलिंग येत ते अनुभवलय. अन तेव्हा तुमची सावली देखिल तुम्हाला तुमची "सोबत" वाटू लागते हा अनुभव घेतलाय.
अरे एका उण्यापुर्‍या ८६ किमीच्या टूर मधे शेवटच्या १० किमी मधे माझा असा पिट्टा पडला, की आख्ख्या आयुष्यात आईला जितक्या हाका घातल्या असतील, तितक्या हाका शेवटच्या साताठ किमीच्या घाटात घातल्या होत्या, दर श्वासागणीक आयाईग, आईग, करीत पुकारा....!
पण मजा येते..

>>>>> मै और मेरी परछाई...अक्सर ये बात करते है <<<<

सकाळी निघतांना उजवीकडे सोबत करणारी ही बया संध्याकाळी डावीकडे सोबतीस असायची. हिचं निरीक्षण करायचाही एक चाळा लागलेला राइड करतांना..
भिलवाड्यांत खूप छान स्वागत झालं. खूप लोक चिअरअप करत होते. चौकशी करत होते.
छान जमलाय लेख!

आख्ख्या सुनसान रस्त्यावर दमलेभागले असताना एकटेच असता, तेव्हा खरोखर काय फिलिंग येत ते अनुभवलय. अन तेव्हा तुमची सावली देखिल तुम्हाला तुमची "सोबत" वाटू लागते हा अनुभव घेतलाय.

>>>>अगदी अगदी

अरे एका उण्यापुर्‍या ८६ किमीच्या टूर मधे शेवटच्या १० किमी मधे माझा असा पिट्टा पडला

>>>>अंतर १६० असो वा ८०, शेवटचे १० किमी नेहमीच जीव काढतात. अगदी नकोसे होते ते सायकल चालवणे असे होते.

दुखापतमुक्त झाल्याच्या आनंदाची दाट सावली पडल्ये लेखभर !

>>>>हो रे बाबा, फार असे दडपण आले होते, त्यातून बाहेर पडल्याचा आनंद खरंच खूप जास्त होता.

हिचं निरीक्षण करायचाही एक चाळा लागलेला राइड करतांना..

>>>>>मी तर व्हिडीओ शूट पण केलय मोबाईल कॅमेरात...मस्त वाटतं

तुमचं दुखणं गेलं ते एक छान झालं पुढची राईड मस्त माजेत जाऊ शकला असाल . मागचा भाग आणि हा भाग पण मस्तच. लिखाणा बरोबर फोटो पण छान आहेत.
ती तुमची डार्लिंग उन्हाशी लपाछपी खेळतेय आणि सूर्याची किराणा बघ शोधला तुला असा सांगतात असा वाटतंय त्या फोटोत. त्या 3 सायकली काय ग आपण आत्ता 1000 किमी तरी चाललो असू ना अशा गप्पा मारतायत वाटतं.
दाल बाटी पण भारीच पावशेर तुपाबरोबर
Happy

वाह आऊ कसले सुंदर वर्णन केलंय. तुम्ही लिहिल्यानंतर पुन्हा एकदा ते फोटो त्या नजरेतून पहिले, अजून छान वाटले.
खूप खूप धन्यवाद

इंद्रा - धन्स रे मित्रा

मस्त

वाळवंट जरी असला तरी खूप सुरेख प्रदेश आहे हा, माणसे तर अति प्रेमळ. आम्हालाही आमच्या प्रवासात टप्प्या टप्प्या वर माणुसकीचे दर्शन घडत होते.

दालबाटी, चुरमा, गट्टे का साग, रोटी आणि वारेमाप तूप....... आहाहा.

पुढील भागाची वाट बघतोय.

वाह वा!! इस्कु बोलते जिगर, मस्त वर्णन आशुभाऊ, फोटो तर वट्ट सुरेख आलेत हे वेगळे सांगणे न लगे. राजस्थानात तुपाचे प्रस्थ भयानक आहे, काही अनुभव सांगायचे झाल्यास अचाट वाटतील असे किस्से आहेत. राजस्थानात प्रत्येक गावी एक 'घी मंडी' असतेच असते. तिथे पिढ्यांपिढ्या तुपाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक सापडतील. राजस्थानात घरी "पावणेसा"म्हणजे जावई आला की खास जेवण असते, तेव्हा घी मंडी मधून ठरलेल्या बनियाकडून घी आणले जाते, थेट किलोच्या मापात, कुठले पदार्थ गायीच्या तुपात कुठले म्हशीच्या तुपात ह्याचे कडक नियम असतात, समोर कोरडी चपाती आली जावयाच्या तर ते घर रितभात नसणारे म्हणवते, एका फुलक्याला किमान 2 चमचे तूप चोपडून दिले जाते, त्यातही सासू सासरे मेव्हणे मेव्हण्या सगळे एक एक घास स्वतः खायला घालणार, पुऱ्या तळल्या तर म्हशीच्या तुपात तळतात, मिठाई म्हणजे घट्ट रबडी, काजूकतली, रसगुल्ले असणार (किमान ५ मिठाया असतात) , हे सगळे नॉर्मल घरात असते, घर जर जाटाचे किंवा एखाद्या बिश्नोई माणसाचे असले तर विषयच कट. बिश्नोई समाजात लग्नाचा मेन्यू सुद्धा साध्या खिचडीचा असतो, पंगतीत समजा एक ओघराळे खिचडी (मुगाची) वाढली तर त्यावर 2 ओघराळी तूप असते, आपल्याकडे लग्नांत खट म्हातारे जसे मोतीचूर लाडू किंवा जिलबी मठ्ठा प्यायच्या पैजा लावतात तसे इकडे घी प्यायच्या लागतात, स्वतःच्या डोळ्याने मी लोकांना 2 ते 4 लिटर तूप पिताना पाहिले आहे, तूप खाऊन तोंड वशट झाले तर समोर तिखट भुजीया वगैरे असते त्याच्या फक्कया मारल्या जातात. राजस्थानी उन्हाळ्यात लोक सहज तूप पचवतात, माझ्या आयुष्यात मी जितके तूप घरी 15 जनावरांचा गोठा असताना खाल्ले नसेल तितके मी लग्नानंतर 2 वर्षात सासुरवाडीला खाल्ले आहे भाऊ. मजा असते एकंदरीत.

सोन्याबापू, आपल्या देशात अशीही खायचीप्यायची चंगळ असू शकते हे इथेच वाचल्यावर कळते आहे.....:)

(नाहीतर आम्ही आपले कायमस्वरुपी दुष्काळी / दरिद्री, सकाळचा नाष्टा/दुपारचे जेवण "वडापाव" वाले.... Uhoh )

अहो ज्या भागात जे पिकते, जशी हवा आहे जश्या रीती आहेत तसे हे चालणारच, जिकडे तूप त्या हवेत तुपच भारी, ज्या हवेत वडापाव त्या हवेत वडापाव भारी

पंगतीत समजा एक ओघराळे खिचडी (मुगाची) वाढली तर त्यावर 2 ओघराळी तूप असते, आपल्याकडे लग्नांत खट म्हातारे जसे मोतीचूर लाडू किंवा जिलबी मठ्ठा प्यायच्या पैजा लावतात तसे इकडे घी प्यायच्या लागतात, स्वतःच्या डोळ्याने मी लोकांना 2 ते 4 लिटर तूप पिताना पाहिले आहे,

>>>>बाप्पु, दमलो हे वर्णन वाचून. काय तूप खातात का चेष्टा. मागे मी एका मित्राच्या लग्नाला जयपूरला गेलेलो तेव्हाही नाष्ट्याला मुगाचा तुपाळ शिरा खाल्लावर दिवसभर काही खायची इच्छा नव्हती.

मला वाटते की राजस्थानसारख्या शुष्क प्रदेशात शरीरातली स्निग्धता टिकून रहावी म्हणून एवढे तूप खात असावेत का. कारण राजस्थानी पंजाब्यांसारखे धष्टपुष्ट दिसत नाही आणि गुजराती लोकांसारखे तुंदिलतनुही. इतके तूप पचते कसे देव जाणे.

Pages