स्फुट ३२ - त्या वृद्धाश्रमात

Submitted by बेफ़िकीर on 21 October, 2016 - 12:02

त्या वृद्धाश्रमात
गेटवर गुरखा आहे
बाजूला अवाढव्य पार्किंग लॉट आहे
आत ऑफिस आहे
चार स्टाफ आहे
ब्रोशर्स आहेत
पाट्या आहेत
सूचना आहेत
मोठा हॉल आहे
त्यात टीव्ही आहे
बैठे खेळ आहेत
बाग आहे
फुले आहेत
मंदिर आहे
उदास खोल्या आहेत
वृद्ध आहेत

ह्या वृद्धांना
दु:खी असणे
आणि
दु:खी दिसणे
दोन्ही अफलातून जमते

त्यांना दिसतात
भेटायला न येणारी मुले, नातवंडे वगैरे
हाकलून न देणारी घरे वगैरे
न आलेल्या फोनकॉलवर ते बराच वेळ बोलतात
न आलेली पत्रे हातात धरून बसतात
हात हातात न घेणारे हात त्यांना सोडवत नाहीत

त्यांना भेटतात
औदार्य सिद्ध करायला येणारे देणगीदार
त्यांच्यासमोर कसा चेहरा करायचा ते कळते त्यांना
ठराविक छापील वाक्ये बोलता येतात
समस्या ऐकवता येतात
खिन्न दिसत राहता येते
'परत याल ना' असे विचारता येते

त्यांना रोज खायला मिळते
आमरस, श्रीखंड, लाडू
कोरडे खाद्यपदार्थ
सुकामेवा
प्रत्येकाच्या पथ्यानुसार
जे ते मिळत राहते
असे पदार्थ मिळतात
जे त्यांना हाकलून देणार्‍यांना मिळत नसतील
कोणाचे श्राद्ध, कोणाचा वाढदिवस
कोणत्याही निमित्ताने
जेवणावळी उठतात त्यांच्याकडे

त्यांना तपासतात
विविध प्रकारचे डॉक्टर्स
आठवड्यातून विविध दिवशी
औषधे लिहून देतात
ती औषधे फुकटात मिळतात त्यांना

त्यांच्या निघतात सहली
तीर्थक्षेत्रांना, रम्य ठिकाणांना
फक्त
आपापल्या घरी कोणाला सहलीवरही जाता येत नाही

त्यांच्यात मग निर्माण होते
एक कोडगी वृत्ती
ज्यांना जन्माला घातले
ते प्रेम देत नाहीत
तर जे खोटे खोटे प्रेम देतात
त्यांच्याकडून फुकट तरी मिळवत राहावे
'फुल्ल एन्जॉय' तरी करावे लाईफ

मग जागृत होतात
त्यांच्यातील दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, मीनाकुमार्‍या
एकेकजण दिग्गज अभिनेते बनतात
ते पथ्यावरच पडते व्यवस्थापनाच्या
देणग्यांच्या राशी जमू लागतात

गेटच्या बाहेरचे जग आश्रमाकडे बघते
व्यथित नजरेने, दयेने
गेटच्या आतले जग बाहेरच्या जगाकडे बघते
आशेने, लोभाने, संधीसाधूपणाने

इतके परिवर्तन होण्यासाठी
खूप नालायक मुले मोठी, कमावती व्हावी लागतात

===========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानक खूपच भयानक पण वास्तव आहे. खेदाने सांगावा लागतंय पण माझ्या आईच्या आईला पण आम्हाला २ वर्ष वृद्धाश्रमात ठेवावे लागले. आजोळ पुण्यात वाड्यात भाड्याच्या घरात त्यामुळे तिच्या व्याधींमुळे वाड्यातील घरात ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे २ वर्ष वृद्धाश्रमात ठेवलं होता आमच्या आज्जीला. अजून सुद्धा हा विषय कधी निघाला तर मामाला अपराधी वाटत. दोन वर्षात मामाने फ्लॅट घेऊन तिला परत आणली. पण ती बोच अजून कायम आहे त्याला आणि आम्हाला पण.

खूप नालायक मुले मोठी, कमावती व्हावी लागतात

चला, आता आई बाबांना म्हातारपणासाठी पैसे साठवायला नकोत की मुलांना नीट वाढवायला नको, त्यांना नालायक करावे म्हणजे म्हातारपण सुखात जाईल. नि ज्यांची मुले नालायक नाहीत, ते दु:खाने म्हणतील, किती सांगितले मुलाला, पण तो नालायक झालाच नाही, आता घरी रहावे लागते, नातवंडात रमावे लागते!

Happy