शिकार (गझल)

Submitted by शार्दुल हातोळकर on 20 October, 2016 - 15:03

ना कुठला पापी होतो ना व्यसनी टुकार होतो
नियतीच्या खेळामध्ये मी दुबळी शिकार होतो

सन्मार्ग चाललो तरीही हे दारात उभे दुर्भाग्य
नजरेत जणु दैवाच्या मी अगदी भिकार होतो

दुःखात माखला जन्म त्या जखमा पदोपदीच्या
अनिवार यातना ज्यांचा मी मुकाच हुंकार होतो

त्या बेफाम सागरामध्ये मी क्षुद्र जणु नावाडी
प्रलयास द्यावया झुंज मी कुठे चमत्कार होतो

अविरत जरीही लढलो सुखशिल्प नवे कोराया
परि स्वर्ग निर्मिण्या येथे मी खुजा शिल्पकार होतो

ही गुढ भासली दुनिया स्वार्थाच्या जंजाळातील
पण गुढ उकलण्याजोगा मी कुठे जाणकार होतो

हे अंगण फितुर झाले त्या स्वप्नांच्या पर्णकुटीचे
अन् इतका असुन द्रोह मी कसा निर्विकार होतो

स्वप्नांत अडकला जीव परि राख जाहली त्यांची
स्वप्नांस रक्षिण्या तेव्हा मी थिटा प्रतिकार होतो

त्या फसव्या ललाटरेषा नि फसवेच पाप-पुण्य
नशिबाच्या वाटेवरचा मी भटका चुकार होतो

- शार्दुल हातोळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users