परीकथा - भाग बारा - फेसबूक स्टेटस २.५ - २.७ वर्षे

Submitted by तुमचा अभिषेक on 17 October, 2016 - 15:15

५ सप्टेंबर २०१६

पॉडर लगाना कोई बच्चोंका खेल नही है !

आंघोळ घालण्याचे काम बाथरूमपर्यंतच माझ्या हद्दीत येते. पण आज सारे गणपतीच्या नैवेद्याच्या तयारीत व्यस्त असल्याने अंग पुसून पावडर लावायचे कामही माझ्याकडेच लागले. टॉवेल खेचत अंग तिने स्वत:च पुसून घेतले, त्यामुळे हे एक त्रासदायक काम वाचले. अन्यथा तिच्या इच्छेविरुद्ध अंग पुसणे एक दिव्य असते.

त्यानंतर पावडर कशी, कुठे, आणि किती लावायची याच्या सूचना मी तिच्या मम्मीकडून घेईस्तोवर ईथे ही पावडरचा डब्बा घेऊन सुरूही झाली होती. मानेला पावडर स्वत:च लावून झाली होती. आता काखेत मी लावतो म्हणालो, तसे एका हातात डब्बा आणि दुसरया हातात पावडर घेत काखही रंगवून काढली.

मग तिची फिरकी घ्यायला मी विचारले, "आता दुसरया काखेत पावडर कशी लावणार?".. तसे दुसरा हात नाचवत म्हणाली, "या हातात घेणार आणि अशी लावणार Happy .. मी कपाळावर हात लावेपर्यंत अंमलबजावणी करूनही झाली होती.

थोडे तरी श्रेय मलाही मिळावे या आशेने निदान पाठीला तरी मला लावू दे म्हणून मी गयावया करू लागलो. पण एक हात कंबरेच्या मागे नेत तिथेही तीच सुरू झाली.
एक लास्ट चान्स म्हणत जिथवर तिचा हात पोहोचला त्याच्यावर बोट टेकवत मी म्हणालो, "ईथे नाही लागलीय, दे मी लावतो."
पण तिने पावडरचा डब्बा काही सोडला नाही. थोडी आणखी पावडर हातावर घेतली आणि खांद्याच्या वरून हात मागे नेत उरलेसुरले कामही तमाम करून टाकले.

आता माझ्यासाठी करण्यासारखे काहीच नव्हते. मी माझी हार पत्करली, आणि आपलेच हात चोळत बेडरूमच्या बाहेर पडलो!

.
.

७ सप्टेंबर २०१६

परीसोबत खेळायचे म्हणजे अधूनमधून तिच्या क्रिएटीव्हिटीची झलक झेलायला तयार राहायचे.

परवा चिऊला खोट्या खोट्या किड्यांचा खाऊ भरवायचा खेळ करून वैतागली आणि त्या किड्यांचा वेगवेगळा वापर करायला सुरुवात केली. एक किडा घेत त्याला बाहुलीच्या ओठांवर ठेवले आणि बाहुलीला मिशी आली म्हणू लागली. मी वाह म्हणत कौतुक केले तसे आणखी एका किड्याची जिलेबीसारखी गोल गुंडाळी केली आणि बाहुलीच्या कपाळावर ठेवत तिला टिकली लावून टाकली Happy

काल क्रिकेट खेळता खेळता तिने सहज बॉल आत दाबला. तसे त्याला पणतीसारखा खोलगट आकार आला. लगेच खेळ सोडून, "ए कप आईसक्रीम खा" म्हणत मला भरवायला आली Happy

रात्री जेवतानाचा तिचा एक फेव्हरेट खेळ म्हणजे आजीची टिकली काढणे.
काल तिने ती आजीच्या कपाळावरून काढून माझ्या कपाळावर लावली आणि म्हणाली, "तू मम्मा आहेस."
मग थोड्यावेळाने ती टिकली माझ्या कपाळावरूनही स्वत:च काढली आणि म्हणाली, "आता तू पप्पा झालास Happy

गणपतीचे दुपारी घरचे सारे झोपले असताना आम्ही दोघेच मस्ती करत जागे होतो. मध्येच तिला रिंगा रिंगा रोजेस खेळायचा मूड झाला. पण आमचा एक रूल आहे. या खेळात आम्हाला एकमेकांचा हात पकडून सर्कल बनवायला किमान तीन जण लागतात. जेव्हा मम्मा आणि ती दोघेच असतात तेव्हा तिसरा पार्टनर तिची बाहुली असते. पण आज बाहुलीही नव्हती. तिसरा पार्टनर कुठून आणणार होतो? आज्जी आजोबांना उठवायला गेली तसे मी तिला अडवत नकार दिला. मग तिने शक्कल लढवली. माझा एक हात आपल्या हातात घेतला, तर दुसऱ्या हाताने मला बेडरूमच्या दरवाज्याचे हॅन्डल पकडायला लावले. स्वत: वॉर्डरोबच्या दरवाज्याचे हॅन्डल पकडले आणि झाली तयार आमची गोलाकार साखळी Happy

.
.

९ सप्टेंबर २०१६

घरासमोर छानसं अंगण असावे. त्यात चारसहा कुंड्या असाव्यात. त्यात बरीचशी फूलझाडे असावीत. रोज सकाळी उठल्यावर अंगणात जाता, दोनचार नवी उमललेली फुले दिसावीत. मन प्रसन्न व्हावे..
बस्स असेच काहीसे..
हल्ली रोज संध्याकाळी घरी गेल्यावर भिंतीवर दोनचार नवे चेहरे उगवलेले दिसतात. हाताला धरून हे बघ हे बघ करत प्रेमाने ते दाखवले जातात. प्रत्येक चेहरयाचे नाव तितक्याच प्रेमाने सांगितले जाते. हे करताना त्या सांगणारीच्या चेहरयावर अफाट कौतुक असते. बस्स, मन प्रसन्न होते Happy

.
.

११ सप्टेंबर २०१६

शाळा कॉलेजात रोज डे, वॅलेंटाईन डे असायचे. आता प्रत्येक डे ला काही मी हातात गुलाब घेऊन जायचो नाही, पण मनात एक फॅन्टसी ठेवून नक्की जायचो. ती म्हणजे एखादी मुलगी स्वत:हून येऊन आपल्याला गुलाब देईन.. अगदीच लाल नाही तर निदान पिवळे तरी...

अर्थात, तसे कधी झाले नाही ती गोष्ट वेगळी, पण तो झाला एक भूतकाळ..

आता वर्तमानात आमच्याकडे वरचेवर 'चॉकलेट डे' साजरा होत असतो. बंद मुठीत चॉकलेट ठेवायचे. जे आमचे जीव की प्राण. त्यामुळे त्याबदल्यात गालावर पा मिळायची हमखास खात्री!

पण काल मात्र उलटे झाले. हातामागे बॉल लपवून परी माझ्याकडे आली. आणि म्हणाली, "तुला देणार नाही, आधी गालावर पा दे." मी आनंदाने चक्रावून गेलो. लगेचच घेतली. मग तिने दुसरा गाल पुढे केला. "आता या गालावर पण दे." मी खुश झालो. तिथेही दिली. मग हातामागे लपवलेला बॉल पुढे करत, "हे बssघ.." म्हणत माझ्या हातात ठेवला आणि वर म्हणाली, "पप्पा मी गंमत केली Happy

आता गंमत की आणखी काही माहीत नाही. पण लहानपणापासूनची फॅण्टसी आज प्रत्यक्षात उतरली Happy

.
.

१८ सप्टेंबर २०१६

परी'ज लॉ ऑफ ईमोशन - १ -

कधी कधी ती आपल्या अंगाशी मस्ती करताना जोरात चावते आणि आपण कळवळून निघतो. मग तिला सांगावे लागते. अग गधडे, दुखते. जरा हळू चाव. मग ती दात टेकवत हलकेच चावते आणि आपल्याला गुदगुल्या होत हसायला येते..
या सर्वाचे निरीक्षण करत तिने एक डायलॉग बनवला आहे..

जोरात चावले की बाऊ होतो, आणि हळू चावले की गुदगुल्या होतात Happy

....

परी'ज लॉ ऑफ ईमोशन - २ -

त्या दिवशी तिच्याशी बॅडमिंटन कम क्रिकेट खेळत होतो. चुकून मी फूल जरा जोरात फेकले आणि मारताना तिचा नेम चुकत अलगद ते तिच्या डोळ्याजवळ जाऊन आदळले. लागण्यापेक्षा घाबरलीच जास्त. म्हणून वातावरणातला ताण हलका करायला आणि फारसे काही झालेच नाही हे दाखवायला मी मुद्दाम हसायला लागलो.
लागलीच तिने आणखी एक नियम कम डायलॉग बनवला,

"कमी लागले की हसायचे, आणि जास्त लागले की रडायचे Happy

.
.

१९ सप्टेंबर २०१६

आज आमचा घोडा एक दोन अडीच झाला Happy Happy

.
.

२३ सप्टेंबर २०१६

दिवसभर ऑफिसच्या कामात साधा स्कोअरही चेक करता येत नाही. त्यात घरी येऊन हायलाईटस पाहाव्या म्ह्टले तर आई आणि बायको मी खर्राखुरा सिरीअल किलर असल्याच्या आविर्भावात माझ्याकडे बघतात. त्यातही कसोटी सामना असेल तर परीस्थिती आणखी अवघड होते. तरीही आज मुश्किलीने फारशी कुरबूर न करता जेवता जेवता हायलाईटस बघायची परवानगी मिळाली. पण आता आमच्या घरात तीन बायका झाल्या आहेत हे मी विसरून गेलो होतो. आज त्याचा प्रत्यय आला. तर त्या तिसरया बाईला अचानक काहीतरी मस्ती करायचा झटका आला आणि ती सरसर (ज्याचे एकेकाळी मला फार्फार कौतुक होते) टेबलवर चढत टिव्हीसमोर ठाण मांडून बसली.. आणि मला म्हणाली..,

"मी टिव्ही लपवून ठेवला आहे. आधी तू जेव. मग पाणी पी. आणि मग टिव्ही बघ..."

...आणि अश्या प्रकारे भारत विरुद्ध न्यूझीलंड ऐतिहासिक पाचशेव्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी, मी एलबीडब्ल्यू., म्हणजेच "लेक" बीफोर विकेट झालो Happy

.
.

३० सप्टेंबर २०१६

जेवण साग्रसंगीत असते तसे हातपाय धुणेही सांग्रसंगीत असू शकते.

हल्ली रोज संध्याकाळी मी ऑफिसहून घरी आलो की हातपाय धुताना परी बाथरूमच्या बाहेर उभी राहते आणि हातपाय हलवत, जागच्या जागी नाचत, गाणे गाऊ लागते.
गाणेही रोज एकच! आणि त्या गाण्यातील ओळही रोज एकच!... शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार Happy

मला बाथरूमचा दरवाजा बंद करू देत नाही. मला तिच्यासोबत नाचू गाऊ देत नाही. मी फक्त हातपाय एके हातपायच धुवायचे. आणि नाचगाण्याचे काम एक तीच करणार.
तर कधी मी हातपाय धुवायला उशीर केल्यास मला खेचून बाथरूममध्ये नेते आणि म्हणते "ए तू हातपाय धू ना, मी शेपटीच्या झुपक्याने करते Happy

मध्यंतरी आठवडाभर आम्ही मुंबईला होतो. आठदहा दिवसांनी परत आलो. तरी आठवणीने न विसरता शेपटीच्या झुपक्याने मागल्या पानावरून पुढे चालू झाले..

आज संध्याकाळी मात्र ऑफिसहून आलो तर ती घरी नव्हती. मला एकट्यालाच हातपाय धुवायला लागले. आणि मग अचानक जाणीव झाली............
एकट्याने हातपाय धुणेही किती बोअर असते ना Happy

.
.

८ ऑक्टोबर २०१६

मागे एकदा परीमुळे मी अंडे कसे उकडावे हे शिकलो होतो..

काल परीमुळेच फुटलेले अंडे साफ कसे करावे हे शिकलो

फिलिंग लिबलिबीत Happy

.
.

९ ऑक्टोबर

गिरे तो भी ...

मागे एकदा ती टेबल खुर्चीला लटकायची मस्ती करत होती. नको करूस, पडशील, असे सांगूनही ऐकत नव्हती. थोड्यावेळाने खरेच हात सटकला आणि धडपडली. टेबलखुर्चीवरच आदळली. मी तेवढाच रागवायचा चान्स घेणार आणि तिची मस्ती बंद करणार, याच्या आधीच ती म्हणाली, "लागलं नाही, नुसता आवाज आला Proud

.... आज आम्ही दोघे मिळून मस्ती करत होतो. "थांब मी तुला शिकवते" असा नेहमीचा शहाणपणाचा डायलॉग मारून ती सुरू झाली. मला आपले दोन्ही पाय जोडून सोफ्यावर बसायला लावले आणि माझ्या अंगावर चढू लागली.
"बघ बघ, मी तुला दाखवते. आधी एक पाय ईथे ठेवायचा..
"मग दुसरा पाय ईथे ठेवायचा..
"मग असे वर चढायचे..
आणि नेमके तेव्हाच पुढचा पाय सरकून सरळ खाली कोसळली. पण ते कबूल कसे करणार. म्हणून त्याच फ्लो मध्ये म्हणाली,
"मग असे पडायचे Proud

यालाच बहुधा म्हणतात, पडलं तरी नाक वर Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझीच कन्या .. हो Proud
आणि प्रत्येक प्रश्नाला वाक्याला तिच्याकडे ऊलटे उत्तर असतेच... आणि नसले तरी बोलायचे असतेच Proud

आणि प्रत्येक प्रश्नाला वाक्याला तिच्याकडे ऊलटे उत्तर असतेच... आणि नसले तरी बोलायचे असतेच
>>
इथे पण तुझीच कन्या Lol