सत्याला मरण नाही.

Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:25

एका राज्यात एक मोठा श्रीमंत व्यापारी होता. तो एकदा यात्रेला गेला. प्रदेश वाळवंटी होता. अंगाची लाही लाही सहन करून त्याने आपली यात्रा पूर्ण केली. यात्रेमध्ये अनेक माणसे होती. तसाच एक भिकारीही होता. त्याला भीक तर काही मिळालीच नाही. पण चालता चालता पायाखाली आलेल्या एका वस्तूने त्याचे लक्ष वेधून घेतले. तो एक बटवा होता. त्याने तो घेतला. काही तरी खायची वस्तू असेल म्हणून सहजच तो उघडून पाहिला. पण त्यात शंभर सुवर्ण मुद्रा होत्या. लखलखत्या उन्हात चकाकणाऱ्या मुद्रांनी त्याचे डोळे क्षणभर दिपले. तो भिकारी असला तरी खरं बोलणारा होता. त्याने तो बटवा ज्याचा त्याला परत करण्याचे ठरवले. थोडावेळ रस्ता कापल्यावर त्याच्या लक्षात आले की एक माणूस स्वतःचा बटवा हरवल्याने ओरडत होता. तो असेही म्हणत होता की , " जो मला माझा बटवा परत आणून देईल त्याला मी इनाम देईन " ते ऐकून भिकारी सापडलेला बटवा घेऊन त्या माणसाकडे गेला आणि म्हणाला, " हा घ्या तुमचा बटवा" असे म्हणून त्याने वर उल्लेखलेल्या व्यापाऱ्याला तो बटवा दिला.

बटवा मिळाल्यावर व्यापाऱ्याला बरे वाटले. त्याने तो उघडून पाहिला आतल्या मुद्रा मोजल्या आणि बटवा घेऊन जाऊ लागला. तेव्हा भिकारी म्हणाला, ' अहो शेटसाहेब माझं इनाम तरी द्या" त्यावर तो व्यापारी त्याला म्हणाला, " कसलं इनाम , या बटव्यात दोनशे मुद्रा होत्या. आता शंभरच आहेत. तू उरलेल्या शंबर चोरल्यास. उलट तुला नगर रक्षकांच्या ताव्यात देऊन न्यायालयात नेले तर शिक्षाही होईल. तेव्हा बऱ्या बोलाने नीघ. " पण भिकारी म्हणाला , " खरंच आहे तुमचं , आपण खरोखरीच न्यायालयात जाऊ. " व्यापारी आणि भिकारी मग त्या नगराच्या काझीसाहेबांकडे न्याय निवाड्यासाठी गेले. काझी साहेबांनी दोघांची बाजू ऐकून म्हंटले, " तुम्ही दोघेही मला सभ्य वाटता, मी योग्य न्याय करीन. " विचार करून थोड्यावेळाने काझी म्हणाले, " तुमच्या बटव्यात दोनशे मुद्रा होत्या , हो ना " श्रीमंत माणूस म्हणाला, ' अर्थातच. " त्यावर काझी म्हणाले, " यात शंभरच मुद्रा आहेत , याचा अर्थ हा तुमचा बटवा नाही. सबब हा बटवा तुम्हाला देण्याचा प्रश्नच येत नाही . राहता राहिला मुद्रांचा प्रश्न. यातल्या अर्ध्या मुद्रा मी लोककल्याण संघाच्या ताब्यात देत आहे. आणि उरलेल्या भिकाऱ्याला देत आहे. कारण त्याने सत्याची कास सोडली नाही. ..... त्यावर नाराज होऊन श्रीमंत माणूस काही बोलणार तेवढ्यात काझी साहेब म्हणाले, " मुकाटयाने निघा , नाहीतर तुम्हाला एका चांगल्या माणसाला त्रास दिल्याच्या आरोपावरून मी अटक करीन. " तो माणूस काही न बोलता निघून गेला.

(एका यहुदी लोककथेवरून )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालसाहित्य आहे म्हणून फार कीस पाडायची इच्छा नाही.
परंतु (प्रत्यक्ष आयुष्यात विचार करायचा तर) काझी साहेबांनी बायस्ड डिसिजन दिलेले उघड आहे.

प्रतिसादाबद्दल सचिन काळे आणि पियू यांचा आभारी आहे. डिसिजन बायस्ड असला तरी लबाड माणसाला असा डिसिजन द्यायला काहीच हरकत नाही . असे मला वाटते. अर्थात, ही माझी स्वतःची गोष्ट नाही. त्यामुळे मला त्यात बदल करता येत नाही.

परंतु (प्रत्यक्ष आयुष्यात विचार करायचा तर) काझी साहेबांनी बायस्ड डिसिजन दिलेले उघड आहे.>>
काझी साहेबांनी दोघंचीही बाजू ऐकून घेतली. तेव्हा भिकार्‍याने संगितल असणर की व्यापारी मुद्रा मोजून काही न बोलता चालू पडला होता. त्याचा अर्थ बटव्यात मुद्रा कमी न्हवत्या हे त्या काझी साहेबांनी जाणलं असणार. आणि त्यावरूनच बरोबर निर्णय दिला.