गप्पांचे सीमोल्लंघन...

Submitted by अतुल. on 11 October, 2016 - 09:00

"पांडू दा काय केलं?" म्हणत बाळू दा म्हशींच्या मागोमाग गावातून सडकेवर यायचा.

पांडू दा आणि अजून चार सहा माणसं सडकेला पिंपळाच्या पाराखाली एसटीची वाट बघत निवांत उभी असायची.

"मात्र बाई लै जिगरबाज वो" एकजण म्हणायचा

"तर काय वो... एकेकाला पुरून उरतीया. टाचेखाली कशी दाबून ठीवल्यात माणसं. जीतल्या तित्त. ह्या ह्या... सादं काम न्हायी त्ये..." दुसरा तंबाकू चोळता चोळता बोलायचा

"आता लावती ब कशी एकेकाला कामाला" लांबवर बसलेला कोणतरी वरच्या पट्टीत आवाज काढून बाकीच्यांच्या सुरात आपला सूर लावायचा.

बाळू दा म्हशी घेऊन यायच्या आधी ह्या माणसांच्या अशा काहीश्या गप्पा सुरु असायच्या. ह्या गप्पांमधली "बाई" म्हणजे दुसरी तिसरी कोण नव्हे तर साक्षात पंतप्रधान इंदिरा गांधी! मग बाळू दा पण ह्यात सामील व्हायचा. म्हशी जायच्या चरायला पुढंच्या माळावर. आणि बाळू दा सगळ्यांच्या बरोबर पार्लमेंट मध्ये.

मग बाळू पांडू किसन दौलू इत्यादी सगळ्यांचे तंबाकू चोळत अधिवेशन सुरु व्हायचे. त्यात दादा अण्णांपासून बाईंपर्यंत कोण कसे आहे, कोण कसे चुकले, पुढे काय करायला हवे, राज्याच्या आणि राष्ट्राच्या हिताकरिता कोणते निर्णय घ्यायला हवेत ह्याची पिंपळाच्या पाराखाली बसून गंभीर चर्चा व्हायची. मोठा फड रंगायचा. त्यात गावातल्या सरपंचांपासून अमेरिकेच्या अध्यक्षांपर्यंत कुणाकुणाची काय काय प्रकरणं, लफडी, भानगडी, लडतरी सगळे निघायचे. कधी कुजबुजत तर कधी मोठ्या आवाजात. पण गप्पांना कशा कशाचे वावडे नव्हते. सगळ्याचा यथेच्छ समाचार घेतला जायचा. कारण एसटीच्या येण्याला टायमिंग नसायचे.

मग कधी तासा दोन तासाने एसटी यायची. एसटीत सुद्धा अशा फडकऱ्यांचे फड रंगायचे. मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही अशी गर्दी घेऊन एसटी दण्णाट सुटलेली असायची.

त्या रेटारेटीत कोणतरी बाबू उभा असायचा. एकहात वरच्या हॅंडलला दुसरा बाजूच्या सीटला लावलेल्या आडव्या गजाला. त्यात दोनचार जण पाठीवर रेलेलेले. त्यामुळे पाठीला बाक आलेल्या अवस्थेत बाजूच्या सीटवर बसलेल्यांच्या अंगावर झोकांड्या देत बाबू ओरडून बोलायचा,

"राजकारण कितीबी करुंद्यात वो, राजकारणाचं काय वाटत न्हाइ... पण पाठिंबा काढून घेऊ नये. सरकार पडलं न्हाई पायजे"

आणि कंडक्टर कडे आपले पाच रुपये बाकी आहेत ह्या टेन्शन मध्ये असलेले कोणीतरी गुर्जी म्हणायचे,

"बरोबर! देशाची आर्तिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. काही झालं तरी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत"

तर गाडीच्या हादऱ्यामुळे अचानक जागा झालेला कोणतरी गप्पात सामील होण्यासाठी जे सुचेल ते वाक्य बोलायचा,

"तर तर... टाईम चांगला न्हाई वो. लष्कराने कायम सावध राहिलं पाहिजे बघा..." आणि पुन्हा घोरायला लागायचा.

असा काळ होता. पुढे बघता बघता काळ बदलला.

आता घरोघरी गाड्या आल्या. पण आताही एसटी आहेच. आताही पिंपळाचे पार कुठे कुठे आहेतच. एसटीची वाट बघत गप्पा मारत बसणारी माणसे आताही असतील. ते जग त्या ठिकाणी काही प्रमाणात तसेच आहे.

पण अमाप गर्दी घेऊन उभे असलेले पिंपळाचे मात्र झाड आता बदलले. त्याच्या फांद्यानी सीमोल्लंघन केले. त्या अनेक देशात गेल्या. त्याखाली बसणारे बाळू, पांडू, किसन, दौलू पण उच्चशिक्षित झाले. सीमोल्लंघन करून त्यांनीही देश पादाक्रांत केले. कोण अमेरिकेत, कोण युरोपात, कोण भारतात तर कोण ओस्ट्रेलियात आणि अजून अनेकजण इतर बऱ्याच देशात. बघता बघता वृक्ष जगभर पसरला. लोक त्याला सोशल नेटवर्क म्हणू लागले.

काळाच्या ओघात गप्पांचा पोत, ढंग बदलला. गप्पांनी सीमा पार केल्या (अनेक अर्थाने).

पण परंपरा मात्र कायम आहे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@atuldpatil, पण परंपरा मात्र कायम आहे>>>> अगदी खरंय!!
लेखाच्या सुरवातीला बाईंचा उल्लेख केलात, तेव्हा वाटलं त्या काळातील राजकारणावर काही लिखाण असेल. पण शेवटी तुम्ही गुगली टाकून क्लीनबोल्ड केलेत कि हो!!! Rofl

सचिन, धन्यवाद Lol हो त्या काळातल्या राजकारणावर पण खुमासदार लिहिता येईल. प्रयत्न करतो कधीतरी एकदा Wink

हो! नक्कीच प्रयत्न करा. ह्या लेखातच थोडेफार बीज अंकुरलेले दिसतेय. आणि त्या काळातील राजकारणाची बरीचशी माहिती तुमच्याकडे असावी असं वाटतेय. पुलेशु!!!

>> त्या काळातील राजकारणाची बरीचशी माहिती तुमच्याकडे असावी असं वाटतेय

नाही हो. बरीचशी असे काही नाही. चार चौघांना जितके माहित आहे तितकेच किंबहुना जरा कमीच Happy . शिवाय, राजकारण समजण्या इतका वयाने मोठा पण नव्हतो मी इंदिराजींच्या काळात. पण तरीही त्याकाळातील राजकीय घटनांची भवतालच्या समाजमनात जी प्रतिबिंबे उमटत असत, ज्या चर्चा होत असत ते मात्र बरेच आठवते. अर्थात लिहिण्यासाठी तितके भांडवलही पुष्कळ आहे नक्कीच Happy