जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग ११): अजमेर - चमत्कार झाला की हो

Submitted by आशुचँप on 10 October, 2016 - 08:33

http://www.maayboli.com/node/60392 - (भाग १०): डीडवाना- एक दुर्दैवी दिवस
======================================================================

आज आता टेंपोनेच अजमेर गाठायचे असल्यामुळे मी निवांत होतो. आता काय पहाटे उठायचे नाही. मस्त झोप काढायची, सकाळी जाग आल्यावर मस्त नाष्टा वगैरे करून निघायचे. पण काका मला सकाळी उठवायला आले तेव्हा त्यांनी शॉकच दिला.

म्हणलं, "अहो मी आज टेंपोने जाणार आहे ना, मग मी कशाला उठू लवकर?"

त्यावर ते म्हणे

"बाळा, आम्ही पुढे निघून गेलो आणि तुला टेंपो नाहीच मिळाला तर काय करणार आहेस, सायकल चालवत येणार आहेस का एकटा.?"

हायला, या गोष्टीचा विचारच मी नव्हता केला. मी आपला याच आनंदात की सायकलींग वाचले. पण टेंपो मिळालाच नाही तर जायचे कसे. कारण हा काय बिझी रोड नव्हता, दाखवला हात आणि बसलो गाडीत. मैलोन मैल काहीही वाहन दिसायचे नाही.

नशिब, त्यांनी याचा विचार केला होता, मग म्हणले काय करायचे

तर म्हणे, चल आमच्याबरोबर, असेही इतक्या पहाटे कुणीच टेंपोवाला मिळणार नाही. कुचमान सिटीपर्यंत चालवत ये. ४० एक किमी असेल, तिथे नक्की मिळेल. हा, आता ४० किमी जायला माझी काहीच हरकत नव्हती. तितक्याने काय पाय दुखला नसता.

मग काय उठून आवरायला घेतले, आजही ब्लिडींग झालेच, पण मला कल्पना होती ते कशामुळे होतंय ते आणि अजूनही म्हणावं तशी उपाययोजना झालेली नव्हती. आणि आज तर आरामच करायचा होता. डॉक्टर मिळाला असता तर त्याच्याकडून तेही विचारून घेतलं असतं. बघू आता जे काही ते अजमेर गाठल्यावर.

आराम करायचा असल्यामुळे मी मस्त खुशीत होतो, शीळ वगैरे वाजवत खाली आलो, तर सगळ्यांनी खेचायला सुरुवात केली. मी पण ते एन्जॉय केलं. एकंदरीत कालच्या गरमागरमीचा आज मागमूसही नव्हता. सगळ्यांनीच अतिशय संमजसपणे ते आपल्या स्मृतीपटलावरून काढून टाकले होते. इतके की त्यांनतर आजही जेव्हा त्या भांडणाचा विषय निघतो तेव्हा गंमत वाटते की कसे तेव्हा आपण लहान मुलांसारखे भांडत होतो. Happy

दरम्यान, काकांनी एक प्रस्ताव मांडला होता. रोज आम्हाला हॉटेल गाठायला बराच उशीर होत होता. याचे कारण हळू सायकल चालवण्यापेक्षा वाटेत एकदा थांबलो की बराच वेळ थांबणे होत होते. त्याला काहीतरी आळा घालणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी प्रस्ताव असा मांडला की तीन तासात ४० किमी करायचे. आणि दिवसाचे असे तीन तीन तासाचे भाग करायचे आणि त्याप्रमाणे सेक्शनवाईज टाईमटेबल फॉलो करायचे.

आता काहींना तीन तासात ४० म्हणजे अगदीच हळू वाटेल, पण हा राईड टाईम नाही तर पूर्ण टाईम. म्हणजे, त्यात नाष्टा, चहा ब्रेक, विश्रांती, पंक्चर, रस्ता शोधणे, हे सगळे फॅक्टर धरून. कसेही काही झाले तरी ४० किमी पार झालेच पाहिजेत. जर नाही झाले तर पुढच्या तीन तासाच्या सेक्शनमध्ये वाया गेलेला वेळ भरून काढायचा.

आणि याचा एक मानसिक फायदा असा होता, की एकदम आपल्याला १५० किमी जायचे आहेत म्हणल्यावर एक नाही म्हणले तरी दडपण यायचे त्यापेक्षा ४० किमी चे छोटे टारगेट डोळ्यासमोर रहायचे. बस्स आता इतकेच राहीले असे म्हणल्यावर वेग राखला जायचा.

त्यांची ही आयडीया इतकी अभूतपूर्व यशस्वी ठरली की पूर्ण राईडभर आम्ही ती वापरलीच पण अजूनही वापरतो. त्यांनी बीआरऐम देखील याच पद्धतीने पूर्ण केली होती.

तर, मजल दरमजल करत आम्ही निघालो कुचमनच्या दिशेने. मला माहीती होते की तिथून टेम्पो करायचा आहे पण पायाला कुठे माहीती होतं. त्याने नित्यनेमाच्या सवयीप्रमाणे थोडे किमी गेल्यानंतर दुखायला सुरुवात केली. म्हणलं बेट्या जरा धीर धर, पुढे आराम आहे. पण छे, त्याला काय धीर निघेना आणि त्याने गेल्या चार दिवसाप्रमाणे जीव नकोसा करायला सुरवात केली.

पुन्हा तोच प्रकार, तेच सायकल थांबवून पेनकिलर खाणे. इथे आता काहींना प्रश्न पडेल की मी मग सकाळी निघतानाच का खात नव्हतो पेनकीलर. तर त्याला उत्तर म्हणजे, आशावाद. की आज काहीतरी चमत्कार घडेल आणि दुखणार नाही असे मला वाटायचे. याचे कारण रात्रभर चांगली विश्रांती मिळून पाय पूर्वपदावर आलेला असायचा आणि मस्त ताजेतवाने वाटायचे. जणू काल काही दुखलेच नाही. आणि दुखत नसताना कशाला पेनकिलर खा म्हणून मी टाळायचो. अगदी घंटा वाजली दुखायची मगच घ्ययाची गोळी. कारण एकतर पेनकिलरचे साईड इफेक्ट मला माहीती आहेत, त्यामुळे शक्य तितके टाळण्याकडे कल असायचा, आणि अगदीच नाही शक्य वाटल्यावर घ्यायचो.

तर आज लक्षात आले की माझ्या शूजची कड घासून घासून तिथे आता जखम व्हायला आलीये. कारण दुखु नये म्हणून मी एकाच पोझीशनमध्ये पाय ठेवायचो. आता ही नवी भानगड कशी निस्तरावी या विचारात असताना काकांच्या पायाकडे लक्ष गेले. त्यांनी ट्रेकींगला आम्ही वापरतो ते केचुआचे फुल्ल अँकल लेग्थ शूज घातले होते. त्यांना म्हणलं बघु जरा तुमचे शूज. घातले तर एकदम माझेच माप. परफेक्ट बसले, म्हणलं, आता पुढे गेल्यावर देतो.

कहर म्हणजे मला ते इतके आवडले की पुढे काय, मी त्यांना डायरेक्ट पुण्याला पोचल्यावर दिले. Happy

वाटेत एके ठिकाणी मस्त गरमागरम चहा प्यायला थांबलो. मी ब्लिडींग आठवून दुधालाच पसंती दिली. सकाळच्या त्या मस्त वातावरणात गरमा गरम ताजे दुध प्यायला जी काय मज्जा आली त्याला तोड नाही. असेही हेम आणि सुह्द रोजच दुध रिचवायचे, त्यात माझी भर पडली, मग ओबीनेही दुध प्यायला सुरुवात केली.

सगळ्यात गंमत आली ती नाष्ट्याला थांबलो एके ठिकाणी तिथे. भाई गरमा गरम सामोसे तळून काढत होता. त्यावर वरणासारखे काहीतरी घालून कांदा, शेव वगैरे घालून सामोसा चाट विकत होता. लगेच आम्ही धाड घातली. समोर आला थर्माकोलच्या प्लेटमधून सामोसा आणि खायला आईस्क्रीमचा चमचा. आम्ही सगळे एकमेकांकडे बघतोय, ही कुठली पद्धत सामोसा खायची. त्याला विचारलं, तर म्हण, सब ऐसेही खाते है. Happy

म्हणलं, काकाने तुझ्या कधी असा खाल्ला होता, काय पण शेंड्या लावतो. आणि त्या चपट्या चमच्याने सामोसा खाणे खरंच कौशल्याचे काम होते. केवळ चॉपस्टीकने चायनिज खाऊ शकतात त्या धुरंधरांचेच ते काम होते. त्यामुळे चमच्याने ऐवज तोंडाजवळ ढकलणे आणि तिथून पोटात असला धेडगुजरी प्रकार करून कसेबसे ते प्रकरण संपवले.

आज सेक्शन पडल्यामुळे असेल किंवा कालच्या काकांच्या सेशनचा परिणाम असेल कदाचित पण सुसाट गँग आणि आम्ही एकत्रच चाललो होतो.

पुढे गेलो तर काकांना एकजण भेटला रस्त्यात. काय, कुठून आला चौकशी झाली आणि काय किस्सा तर तो माणूस पंढरपूरचा निघाला. आणि त्याहून कहर म्हणजे त्याचा स्वताचा एक ढाबा होता. मराठी माणूस आणि राजस्थानात ढाबा म्हणजे अगदीच भारी योग होता.

त्याने आम्ही पुण्यातून आलोय म्हणल्यावर सोडले नाहीच, चला म्हणे माझ्या धाब्यावर पाहुणचार घ्या. नुकतेच आम्ही सामोसे हादडले होते त्यावर आता काही खाणे अशक्य होते. पण तो ऐकेच ना. शेवटी चहावर तडजोड झाली आणि आम्ही सायकली त्याच्या ढाब्याकडे वळवल्या.

चहा पिता पिता काका गप्पा मारत होते तर माझे लक्ष एका वेगळ्याच गोष्टीने वेधले गेले. त्या धाब्यावर एकजण मालिश करून घेत होता. मालकांपैकीच एक असावा. असा पैलवान गडी होता आणि छानपैकी सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये उघडाबंब बसून मालिश करून घेत होता.

मी हळूच काकांची जर्सी खेचली आणि म्हणलं, त्यांना विचारा की ते माझ्या पायाला देतील का मालिश करून. कारण हेम मालिश करायचा त्याने बराच रिलीफ मिळायचा. आता प्रोफेशनल कडून करून घेऊ. काकांनी विषय काढायचा अवकाश, मालकांनी लगेच त्याला पुकारले आणि माझ्याकडे बघण्याचे फर्मान काढले.

तो माणूस कुठली भाषा बोलत होता हे मला अाजपर्यंत कळलेेले नाही. त्याने अगम्य भाषेत काहीतरी सांगतले. मग मालकच आमचे दुभाषी झाले. ते म्हणे तो म्हणतोय, की शूज काढा आणि सैल सोडा पाय.

ओक्के म्हणून मी शूज, क्रेप बँडेड काढून बसलो. त्याने थोडे निरिक्षण केले, कुठे दुखते हे मालकांकरवी जाणून घेतले. आणि मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणला,

"थोडा दुखेगा, सहनो"

म्हणलं, इतने दिनोंसे सहनो, सहनू सगळेच चाललेय. ते त्याच्या डोक्यावरून गेले. आणि त्याने पाय ताब्यात घेतला. आणि गुढग्याजवळ हलक्या हाताने चोळायला सुरुवात केली. मी आपला सांगायच्या बेतात की पाय खाली दुखतोय पण म्हणलं काय करतोय ते बघू आणि रिलॅक्स बसून राहीलो.

त्यामाणसाने बाटलीतले पिवळ्या धमक रंगाचे, बहुदा मोहरीचे असावे तेल घेऊन पायभर चोपडले आणि नंतर अक्षरश जादूई प्रकारे शिरा मोकळ्या करायला सुरुवात केली. सुरुवातीला दुखऱ्या शिरेवर जोर पडल्यावर ठणाणा कोकललो, पण त्यान धीर धरा असा इशारा केला आणि एकाच वेळी ताकतीने आणि तितक्यात नजाकतीने पाय चोळून काढला. गुढग्यापासून ते अंगठा, बोटापर्यंत. अहाहा, काय सुख वाटत होते त्यावळी अशी गुंगी आल्यासारखे वाटत होते. असाच किती वेळ गेला काही कल्पना नाही पण तो मन लाऊन मालिश करत होता, आणि पाय खाली ठेवला. मला म्हणला, अब देखो.

आणि काय अाश्चर्य, पायाचे दुखणे अक्षरश 'आला मंतर कोला मंतर छू' केल्यासारखे गायब. आयला, म्हणत मी दोन चार पावले टाकून पाहिले, पिसासारखे हलके वाटत होते. मग शूज घातले आणि तिथल्या तिथेच धावून पाहिले, ज्या अँगलमध्ये पाय दुखायचा तो घेऊन पाहिला,. पण छे, काहीसुद्धा नाही. मला म्हणजे विश्वास बसत नव्हता, हे प्रत्यक्षात घडलय. कदाचित हे स्वप्न असावे कारण रोज रात्री मी असे स्वप्न रंगवत होतो की आपला पाय अचानक दुखायचा थांबलाय आणि सगळ्यांसोबत मी मानाने राईड पूर्ण केलीये.

त्या दिवशी दैव जबरदस्त बलवत्तर असावे कारण अचानक तो माणूस भेटायला आणि त्याच्या धाब्यावर जायला आणि मालिश करून घ्यायला कसलेही कारण नव्हते. मला इतका आनंद झाला होता माझ्या त्या हिरोला घट्ट मिठी मारावी आणि पाप्या घ्याव्यात. पण आवरले आणि धावत माझ्या सायकलपाशी गेलो. पटकन पैशाचे पाकिट काढले आणि त्याला किती द्यावेत म्हणजे योग्य ठरेल हे कळेना. शेवटी मी हातात येतील त्या नोटा काढल्या आणि त्याला द्यायचा प्रयत्न केला पण तो भाई घेईच ना.

परत काहीतरी अगम्य भाषेत बोलला, ज्याचा मतितार्थ मालकांनी सांगितला, म्हणे आपकी खुशी बहोत है, आपका चेहरा देखके पता चल रहा है, वही हमारी बक्षीसी.

हाच तो पंढरपूरचा रहीवासी

मी थक्क झालो अक्षरश, अशी पण माणसे असू शकतात, मी जबरदस्ती त्याच्या खिशात नोटा कोंबायचा प्रयत्न पण त्याने हाणून पाडला. शेवटी म्हणलं, एक सेल्फी घेऊया. त्याला तो तयार झाला. त्याचे नाव विचारले तेही काही समजले नाही. चालताना जरी दुखले नसले तरी सायकल चालवताना दुखेल अशी भिती होती थोडी मनात. कारण ते दुखणे गेले चार दिवस इतके मनावर दाटून होते की त्याशिवाय सायकल चालवता येईल हेच मला वाटत नव्हते. त्यामुळे मी पुन्हा क्रेप बँडेड लावायला सुरवात केली तर तो म्हणे (अर्थातच मालकाच्या भाषेत) दिवसा लाऊ नका आणि रात्री झोपताना बांधा. मी इतके दिवस याच्या बरोबर उलट करत होतो. त्याला सल्ला मानला आणि सायकलवर टांग मारली.

आहाहा, कसले भारी वाटत होते, इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच मी मुक्तपणे सायकल चालवू शकत होतो. मी हजार नाही लाखवेळा त्या माणसाला धन्यवाद दिले. बेनिफिट अॉफ डाऊट म्हणून कालच्या इच्छापूर्ती बालाजी देवालाही दिले. हो, कालच प्रार्थना केली होती की बरे वाटावे म्हणून, २४ तासात त्याची प्रचिती आली होती.

मला असे आनंदाने ओरडावे वाटत होते, हातात काहीतरी घेऊन जोरात बडवावे, आवाज करावा, नाचावे आय मीन कसा आनंद व्यक्त करावा हेच सुचत नव्हते. मी मग पॅडल सैल सोडली आणि जे बांगबुग निघालो. पण काका म्हणे, जरा दमाने घे, एकदम बरे वाटले म्हणून उड्या मारू नको. मग मनाला आवर घातला आणि नेहमीच्या स्पीडने निघालो.

अशाच आनंदाच्या भरात कुचमन सिटी आलं. इथूनच मी टेम्पो करणारं होतो, काकांनी मिश्किलपणे विचारलंच, काय रे करू या का टेम्पो. म्हणलं, सगळे करणार असतील तरच. Happy

खरं सांगतो, जरी कितीही दुखत होतं तरी मला एकदाही राईड अर्धीच केली असा बट्टा नको होता. एक टप्पा जरी स्कीप केला असला तरी त्यात समाधान नाही. आणि मग ते शेवटपर्यंत तसेच राहते. त्यामुळे प्रबळ इच्छाशक्ती म्हणा किंवा काहीही, सुदैवाने पुढे एकदाही तसा योग आला नाही. काकांनाही खूप हायसे वाटले, ते नंतर म्हणालेच, तु ज्या पद्धतीने गडाबडा लोळत होतास ते बघून मी इतका टेन्शनमध्ये आलो होतो. तुला आता कसे पुण्याला पोचावता येईल याचाच विचार चालला होता. पण आता काही नाही, आता मस्त सगळे एकत्र जाऊ.

ही वाटेत एक मस्त फ्रेम मिळाली. मला अजून वेळ घेऊन अजून चांगला फोटो काढायचा होता पण बाकीचे पुढे निघाल्यामुळे माझा नाईलाज झाला. कुचमन हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे ९ व्या शतकातला सूर्यवंशी राजांनी बांधलेला प्रसिद्ध किल्ला आहे. पॅलेस ऑफ व्हिल्स च्या टूरमध्ये त्याचा समावेश आहे. द्रोणा हा अभिषेक बच्चनचा एक भयाण चित्रपट आणि जोधा अकबर चे काही शूटींग तिथे झाले आहे, अशी माहीती आंतरजालावर मिळाली.

पण अर्थातच, आम्हाला ते बघायला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मुकाट्याने बायपास पकडून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो.

पुढचे प्रसिद्ध शहर होते, ते मकराना. संगमरवरी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातूनच ताज महालसाठी संगमरवर पुरवण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर व्हिक्टोरीया मेमोरीयल, कलकत्ता, जयपूरचे बिर्ला मंदीर, अफगाणीस्थानचे पार्लीमेंट अशा अनेक इमारतींना इथून मार्बल पुरवला गेला आहे. आम्ही जरी इथेही शहरात आत प्रवेश करणार नसलो तरी वेस ओलांडली आणि तिथून पुढे नुसते संगमरवरी राज्य. जिथे नजर जाईल तिथे पांढरा शुभ्र दगड, मशिन्स आणि सगळीकडे टाईल्स कातण्याचे काम सुरु. त्यामुळे असा वातावरणात एक संगमरवरी धुळ पसरल्यासारखे वाटत होते.

त्याहून धोकादायक होते ते त्या मार्बल्सची वाहतूक करणारे ट्रक. उघड्या ट्रकमध्ये खचाखच संगमरवर भरलेले असत आणि त्यातून बारके बारके खडे ऊडून रस्त्यावर येत. त्यामुळे तिथेही असे चुराडा झालेले संगमरवर दिसत होते. म्हणलं, एखादा उडून डोक्यात बसला तर डायरेक्ट कपाळमोक्षच. त्यामुळे जितके शक्य तितक्या सावधगिरीने सायकल चालवत कसे तरी तो भाग पार केला.

तो पॅचपण भारी होता. जिथे नजर जाईल तिथे वैराण माळरान आणि त्यातून जाणारा अतिशय सुंदर खड्डेविरहीत डांबरी रस्ता. इतका भारी रस्ता पुण्यातपण मिळणार नाही.

मकरानानंतर एके ठिकाणी जेवायला थांबलो. तिथले शाही पनीर चांगलेच शाही होते, अगदी काजूची पखरण वगैरे.

मग काय दोन घास जास्तीचेच गेले आणि पुढे सायकल टांग मारल्यावर अंगाशी आले. एकतर पर्बतसरपर्यंत चांगलाच चढ लागला. असा अगदी दिसून येण्यासारखा नव्हता पण चालवताना जाणवत होतं. त्यातून नुकतेच जेवण झालेले आणि कडक शब्दाला लाजवेल असे उन्ह. गॉगल लाऊनही डोळे दुखल्यासारखे वाटत होते. त्यामुळे साहजिकच वेग मंदावला. अपवाद फक्त लान्स आणि वेदांगचा.

अमृतसरहून सहाशे किमी आलो सायकल चालवत

ते नेहमीच्याच वेगात बेफाट सायकल मारत होते. चढ असो वा उन्ह किंवा अजून काही, त्यांना काहीच फरक पडत नसे. हेमने त्यांना अहीरावण आणि महीरावण अशी नावे ठेवली शेवटी. कसेबसे पर्बतसर पार केले. ८० किमी टप्पा पार झाला आणि लक्षात आले की आपण अजूनही व्यवस्थित टाईमटेबल पाळत चाललोय. कितीही ब्रेक झाले तरी ३ तासात ४० किमी जमण्यासारखे आहे.

जिथे जाऊ तिथे सायकलींची गम्मत बघायला ही झुम्माड गर्दी व्हायची

मध्ये हे असले अगडबंब भरलेले ट्रॅक्टर दिसायचे. रस्त्यावरून जाताना पार आख्खा रस्ता व्यापून. त्यांचा ड्राफ्ट भारी मिळाला असता पण फार फास्ट जायचे, त्यामुळे मी एकदाही प्रयत्न केला नाही, सुह्दने एकदा कधीतरी थोडा वेळ घेतला.

आजचा दिवस पाहुणचाराचाच होता बहुदा. कारण किशनगढच्या अलीकडे एक पांढरी मारूती ८०० थांबलेली दिसली आणि एक तरूणी आम्हाला हात करून थांबा म्हणत होती. म्हणलं, बहुदा गाडी बंद पडलेली दिसतीये, आणि सायकलवाल्यांकडून मदत घ्यायची म्हणजे जरा टू मचच झाले नाही का. पण नाहीच, उलट त्या बाईने आम्हाला पास होताना गाडीतून पाहिले आणि पुढे जाऊन ती आमच्याशी बोलायला थांबली होती. सगळी चौकशी केली, कसे आले, कुठून आले, आता पुढे कुठे जाणार. एकदमच गप्पीष्ट होती. म्हणली, इथूनच पुढे माझे गाव आहे, किशनगढ, तुमचा पाहुणचार करायला आवडला असता.

पण आमचे कसे टाईट शेड्युल आहे हे काकांनी समजावल्यानंतर तिने आमच्याबरोबर एक फोटो काढून घेतला.

तोपर्यंत एक बाई प्रचंड अस्वस्थ होऊन कारमधून हातवारे करत होती. असे अनोळखी लोकांशी इतकी सलगी करावी हे तिला मुळीच पसंत पडलेले नव्हते. आम्हाला वाटले तिची आईच आहे. पण ती म्हणे तीची गुरुमाँ होती. किशनगढसारख्या गावात राहत असूनही बाई एकदम अपटूडेट होत्या, मॉडर्न ड्रेस आणि गाडीही स्वताच चालवत होत्या. एकंदरीत पेहराव आणि बिनधास्त वागण्या बोलण्यामुळे त्या बंडखोर म्हणून प्रसिद्ध असणार याबाबत शंकाच नव्हती. कौतुक वाटले मनापासून.

त्याही पेक्षा कौतुक वाटले ते पुढे गेल्यावर. किशनगढ पार करत असताना पुन्हा एकदा ती थांबलेली दिसली आणि पुन्हा हात करत होती. आता काय म्हणून थांबलो तर तिने एक मिठाईचे भले मोठे पुडके दिले. म्हणे

"ये हमारी यहां की खास मिठाई है, गजक करके, आप मेहमान हो, तो आपको मीठा दिये बिना कैसे जाने दे सकते है."

ती बाई सुरुवातीला जिथे थांबली होती तिथे माळरान होते, त्यामुळे तिने आपल्यागावात जाऊन मिठाईचे दुकान शोधून आमच्यासाठी विकत घेऊन ठेवली आणि आम्ही यायची वाट पहात थांबली होती. आता याला काय म्हणाल.

आणि मिठाईपण अशी पौष्टीक दिली होती. गुळ घालून केलेल्या तीळाच्या वड्या कशा लागतात तसे. साखर नाही आणि गूळ आहे म्हणल्यावर काकांनी तो बॉक्स हेमच्या ताब्यात दिला. त्याला म्हणजे लॉटरीच लागली. कारण आम्ही काय दिसेल ते चरत होतो पण व्रतस्थ असल्याने तो मोजकेच पदार्थ खायचा.

आता हे त्याच्या पठडीतले आणि पुन्हा पौष्टिक, म्हणल्यावर त्याने सगळ्यांना थोडा थोडा नमुना चाखायला दिला आणि सायकलच्या कॅरीअरवर बांधून टाकले. पुढे अजमेर येईपर्यंत निम्म्याहून अधिक फस्तही केला होता. Happy

वेदांगला आजही बाल्कनीतून सूर्यास्त बघण्याचे स्वप्न सोडून द्यावे लागले. ते दणादणा सायकल मारत पुढे आले आणि अजमेरच्या वेशीपाशी आमची वाट पाहत राहीले.

अजमेरपर्यंत अगदीच जोरदार चढ लागला, दम उखडून टाकणारा. आम्ही एक ग्रुप फोटो काढायला थांबलो तेव्हाच सूर्यमहाराज टाटा करत निघाले. तरी उजेड बराच होता आणि आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो तेव्हा अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या. बऱ्याच दिवसांनी, मला वाटते अमृतसरनंतर पहिल्यांदाच कुठल्या मोठ्या शहरात आज मुक्काम होता. मान वळवल्यावर काही प्रेक्षणीयही दिसत होते. सिव्हीलीयन जीव सुखावला. दोन तीन दिवस वाळवंटातून रखरख करत अाल्यावर हे तर म्हणजे ओअॅसिस होते आमच्यासाठी.

त्यातून अजमेर गावात इतके प्रचंड उतार लागले की पोटात गोळाच आला, म्हणलं हे उद्या चढून यायचे म्हणजे वैताग. अक्षऱश दोन्ही हात ब्रेकवर दाबून सायकल चालवावी लागत होती इतका तीव्र उतार, आणि ट्रॅफिक असल्यामुळे त्या उताराचा आनंदही घेता येत नव्हता.

तत्पूर्वी एका अंतराच्या पाटीमुळे बराच वाद झाला (खेळीमेळीतच). त्यावर मुंबई ८८५ किमी लिहीले होते.

पण आमचे एकंदरीत अंतर मोजले असता ते हजारच्या वर जात होते. मग प्रश्न पडला, हा एवढा शॉर्ट रूट सोडून आपण लांबचा रस्ता का घेतला. रूट ठरवला होता मी आणि मामांनी मिळून. त्यामुळे मी देखील कन्फुज झालो, कारण आम्ही अक्षरश सगळ्या पर्यायांची चाळणी केली होती. त्यामुळे हा जवळपास २०० किमी अंतर वाचवणारा रस्ता कसा काय सुटला याचे कोडे उलगडेच ना.
नंतर गुगलवरही पाहिले तर कुठलाही रस्ता १००० किमी च्या आत येणार नव्हता.

आता त्या नंबराचे खरे मानले तर कुठल्यातरी एका रस्त्याने ८०० किमी मध्ये मुंबई गाठता यायला पाहिजे होती. मला आजही त्या गुप्त रस्त्याचे गुपीत उलगडलेले नाही.

आजचे हॉटेल अगदी ए वन होते. आणि डिडवानाच्या तुलनेत तर अगदी फाईव्ह स्टार वगैरे वाटेल इतके. हेम आणि वेदांगने आज सगळ्यांना मसाज करून पाठ मोकळी करून देण्याचे पुण्य संपादन केले. त्या धांदलीत तिथली एक लाकडी पट्टीच तुटली. ती आम्ही कशीतरी डागडुजी करून बसवली.

बऱ्याच दिवसांनी आम्ही वेळेवर म्हणता येईल असे मुक्कामी पोचलो होतो आणि अजमेरचा प्रसिद्ध दर्गा जवळ होता, त्यामुळे त्याला भेट देणे अपरिहार्यच होते.

अजमेरचा दर्गा जशी अपेक्षा केलेला तसाच निघाला. टीपिकल देवस्थान, तिच फुले, परड्या, आणि बाकी वस्तू विकणाऱ्या लोकांचा घेराव, तसलीच गर्दी, जिथेतिथे पैसे काढण्याचे धंदे, फक्त खिसा गरम असणाऱ्यांना मान, बाकिच्यांना हाडतूड, एकंदरीतच बजबजपुरी. हिंदु काय, मुस्लिम काय आणि ख्रिश्चन काय देवाच्या दरबारात सगळे सारखेच ही म्हण अगदी सार्थ करत होते.

त्यामुळे मी मुळीच ते गर्दी करून दर्शन वगैरे घेण्याच्या फंदात पडलो नाही. तिथे मस्त चकचकीत दुकाने होती, त्याचीच फोटोग्राफी करत राहीलो, अकबराने दिलेली डेग होती, ती एवढी मोठी चूल कशी पेटवतात त्याची गंमत पाहिली. असेही इकडे तिकडे मनोरंजन करून घ्यायला बरेच काही होते.

...

...

या पाटीचाही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.

पण या दरम्यान एक भन्नाट गंमत मिस झाली. झाले असे की त्या चिश्ती कबर का तत्सम काहीतरी होते तिकडे झुम्मड गर्दी होती. नवविवाहीत दाम्पत्यांचीही भरपूर संख्या होती. त्यामुळे मुल्ला मौलवी पटापटा त्यांना पकडून त्यांच्या डोक्यावर पवित्र चादर धरून सुखी आयुष्यासाठी दुवा मांगत होते. असेच एक जोडपे आले, तिथल्या मौलवींनी भराभरा दोघांची डोकी खाली दाबली, डोक्यावर चादर घातली, दुवा मांगितली आणि अब मन्नत मांगो बेटी असे म्हणाले.
त्या बेटीने मन्नत काय मांगावी हे विचारायला आपल्या शौहरकडे नजर वळवली आणि जोरात किंचाळलीच. त्या गर्दीत मेजर उलटापालट झाली होती आणि तिच्या शौहरच्या जागी आमचा शुद्ध कऱ्हाडे ब्राह्मण वेदांग तिथे उभा होता. तोही इतका बावचळलेला की त्याच्या तोंडून शब्द फुटेना. बर हे इतक्या फास्ट झाले की कुणालाच कळले नाही कि तिचा मिँया मागे कुठेतरी सांडला होता. आणि इतक्या मेहनतीने गर्दीत दुवा मांगायच्या वेळीच तो गायब झाल्यामुळे आणि त्याच्या जागी भलताच पुरुष आल्यामुळे त्या बाईला काय एक्सप्रेशन द्यावेत ते सुचेना. Rofl Rofl
त्याहून कहर म्हणजे त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याची दुवा वगैरे मागून ते मौलवी मोकळे झालेले.

ओबी त्यांच्या मागेच होता, त्याची तर हसून हसून पुरेवाट झाली आणि बाहेर आल्यावर हा किस्सा रंगवून रंगवून सांगितला. त्यावरून आम्हीही वेदांगला जे काय पिडलेय.

असो, तर बाहेर खाऊगल्लीत काहीतरी खावे असा विचार होता, पण तीन दिवस झाले राजस्थानात येऊन आणि दाल बाटी खाल्ली नाही याला काय अर्थ आहे, असे वेदांगने मुद्दा मांडला. मग तिथे चौकशी केली, सगळ्यात भारी दालबाटी कुठे मिळते. ते अंतर होते बऱ्यापैकी लांब. पण आता माघार नाही, चक्क रिक्षा केली. ते ठिकाण खरेच प्रसिद्ध होते कारण रिक्षावाल्याने बरोबर हॉटेलसमोर आम्हाला सोडले.

पण खाताना लक्षात आले, की अन्य प्रसिद्ध खाण्याच्या ठिकाणांप्रमाणे हेदेखील ओव्हरहाईप्ड होते. ठिकठाकच होते. पण इतक्या दिवसांनंतर पहिल्यांदाच दाल बाटी मिळाल्यामुळे तुंबडून हाणली आणि नंतर गारेगार रुमवर येऊन पडी टाकली.

आजचा दिवस अगदीच भन्नाट झाला. एकतर पायाचे दुखणे थांबले, इथून पुढे घरापर्यंत सायकल चालवत जाऊ शकेन असा विश्वास आला आणि राजस्थान अंगी मानवायला लागले होते.

=================================================================='

आजचा हिशेब १४० किमी. ग्राफ पाहिला तर लक्षात येईल तसा चढ सतत होता, आणि उन्हही प्रचंड. पण त्यामानाने स्पीड चांगला पडला (आमच्या मानाने).

=================================
http://www.maayboli.com/node/60609 - (भाग १२): भिलवाडा - हजार किमी पार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ काका फोटो टाका
बाकी तुम्हारा पाय बऱ्या हो गया ये सून के हमको बहोत आछ्या लाग्या.

काय भानगड आहे कळत नाहीये, मला कॉम्पुटर आणि मोबाईल दोन्हीकडे व्यवस्थित दिसत आहेत. आता काय केले तर सगळ्यांना दिसतील

तुफ़ान झाला हा दिवस, पायाचे दुखणे दूर झाले हे वाचून फार बरे वाटले. पुढचे रायडींग कसे झाले असेल ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फोटो दिसत नाहियेत. पण तुझा पाय बरा झाला तो सुद्धा एका ढाब्यावर भेटलेल्या मालिशवाल्याकडून. प्रवास माणसाला शिकवतो ते उगीच म्हटले जात नाही.

फोटो दिसेनात की हो भाऊ! थोडं वाचलं...तुझा पाय बरा होईपर्यंतचं. उरलेलं फोटो दिसायला लागले की वाचेन असा नवस बोलल्ये! Proud

पण खरंच! कोण तो मसाजवाला! त्याला कशी ही मसाजची माहिती! नेमका कसा भेटला तुला! कमालच आहे!

तेच लिहायला आलो होतो, की आता बहुदा दिसत असावेत. काय घोळ झाला ते लक्षात आले, मी त्या अपलोड फोटोंची लिंक व्हीजीबल टू अॉल करायची विसरलो होतो. त्यामुळे ते फक्त मलाच दिसत होते.

उरलेलं फोटो दिसायला लागले की वाचेन असा नवस बोलल्ये! फिदीफिदी

फेडून टाका आता नवस :प

सर्वांना धन्यवाद, आता फोटोसह पुन्हा एकदा वाचून कळवा अभिप्राय Happy

जबरीच रे आशू... नेहमीप्रमाणेच जबरी लेखन..

जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.. अगदी ह्याचा प्रत्यय आला.. जर तू सकाळी सगळ्यांबरोबर निघालाच नसतास तर तो ढाबेवाला आणि मालिशवाला कोणीच भेटले नसते...

गजक हा पदार्थ मस्तच लागतो... तिळगूळाच्या वडीचा चुलत भाऊ आहे तो... राजस्थान, यूपी, एमपीतला एकदम फेमस गोड पदार्थ आहे..

आणि आधीच्या भागातला अ‍ॅव्हरेज स्पीड आणि ह्या भागातला अ‍ॅव्हरेज स्पीड ह्यात फार तफावत नाहीये बरका..

जर तू सकाळी सगळ्यांबरोबर निघालाच नसतास तर तो ढाबेवाला आणि मालिशवाला कोणीच भेटले नसते...

>>>>अगदी खरंय, हे सगळ इतकं स्वप्नवत वाटतं ना योगायोग, नियती, नशिब अशावर मग विश्वास ठेवावा वाटतो. अर्थात तेवढ्यापुरताच...

गजक हा पदार्थ मस्तच लागतो... तिळगूळाच्या वडीचा चुलत भाऊ आहे तो... राजस्थान, यूपी, एमपीतला एकदम फेमस गोड पदार्थ आहे.

>>>>हेमनेच आमच्या सगळ्यांच्य वाटचा खाल्ला, अर्थात त्याच्या वाटचे इतर गोड पदार्थ आम्ही फस्त करत होतो, त्यामुळे ओक्के.

आणि आधीच्या भागातला अ‍ॅव्हरेज स्पीड आणि ह्या भागातला अ‍ॅव्हरेज स्पीड ह्यात फार तफावत नाहीये बरका..
>>>>शेवटपर्यत तोच आहे, कारण आपला फंडा क्लिअर आहे.

मस्त , खुसखुशीत भाग. तो इच्छापूर्ती बालाजी पावला म्हणायचा शेवटी Happy तुमचा पाय बरा झाला हे छान झालं अखेर .

बाकी ती शौहरांची अदलाबदल वाचून हहपुवा Lol एकदम डेव्हिड धवन / गोविंदाच्या सिनेमात शोभेल असा प्रसंग !
गजक मिठाई आणून देण्याऱ्या तरुणीचेही कौतुक वाटलं. कोण कुठे भेटेल सांगता येत नाही Happy

मस्त झाला आहे हा भाग !
आमच्या कुर्ल्यात पण एक असा मालिशवाला आहे. त्याच्याकडे चालत जाताना आपण कसे चालतोय यावरुनच त्याला कुठे दुखतेय ते कळते आणि अर्ध्या एक तासात आपले दुखणे गायब करतो तो.

दोन भाग पाठोपाठ आल्यामुळे लिंक चांगली लागली. तुमच्या पायाचे दुखणे बरे झाल्याचे वाचून आनंद झाला!

हा भाग खूप आवडला. Heartfelt thanks for sharing this here.
तुम्ही लोक किती श्रीमंत झाले आहात ना, या ट्रिप्स मुळे.
तुमचा पाय ठीक होणं हा नक्कीच चमत्कार होता. माझ्याही पायाला सेम प्रकार झाला होता (कार चालवून :D) आणि माझ्या डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं की त्याला विश्रांती हाच उपाय आहे आणि ठीक कधी होईल याची हमी नाही!!

वाह खरंच चमत्कार झाला. अशा योगायोगांच आश्चर्य वाटतं.
आणि हो, गजक पुण्यातही मिळतं की. हल्दीरामचं. मस्त असतं.
तुमच्या पायाचे दुखणे बरे झाल्याचे वाचून आनंद झाला!>>> +१

तो इच्छापूर्ती बालाजी पावला म्हणायचा शेवटी

>>>हो बहुदा, काय आहे क्युमुलीटीव्ह एफर्ट होते, त्यामुळे कुणाला झुकतं माप देता येत नाही....:)

आमच्या कुर्ल्यात पण एक असा मालिशवाला आहे. त्याच्याकडे चालत जाताना आपण कसे चालतोय यावरुनच त्याला कुठे दुखतेय ते कळते आणि अर्ध्या एक तासात आपले दुखणे गायब करतो तो.

>>>>>साध्या साध्या दिसणाऱ्या माणसांकडे अतिशय अजिबोगरीब कला असतात, कौशल्ये असतात आणि दुर्दैव हे की त्याचा मोबदला त्यांना म्हणावा तितका मिळत नाही. आणि फारशी कौशल्ये नसतानाही चकचकीत दुकाने मांडून बसणाऱ्या लोकांचा गल्ला भरभरून वाहत असतो

तुम्ही लोक किती श्रीमंत झाले आहात ना, या ट्रिप्स मुळे.

यु सेड इट, हाच शब्द आहे तो..खरोखर

तुमचा पाय ठीक होणं हा नक्कीच चमत्कार होता. माझ्याही पायाला सेम प्रकार झाला होता (कार चालवून हाहा) आणि माझ्या डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं की त्याला विश्रांती हाच उपाय आहे आणि ठीक कधी होईल याची हमी नाही!!

>>>>माझेही तेच आहे. अजून मी त्याला फारसा राबवला नाहीये म्हणून गप्प आहे. पुढचे पुढे

आणि हो, गजक पुण्यातही मिळतं की. हल्दीरामचं. मस्त असतं.

>>>>अच्छा, नाही खाल्ल कधी, आता शोधतो

धन्यवाद सर्वांना

ग्रेट गोइंग चॅम्प

जर तू सकाळी सगळ्यांबरोबर निघालाच नसतास तर तो ढाबेवाला आणि मालिशवाला कोणीच भेटले नसते...
>>>>अगदी खरंय, हे सगळ इतकं स्वप्नवत वाटतं ना योगायोग, नियती, नशिब अशावर मग विश्वास ठेवावा वाटतो. अर्थात तेवढ्यापुरताच...

प्रवासात / निसर्गाच्या सानिध्ध्यात असे अनुभव जास्त वेळा येतात. हे तेवढ्यापुरतंं, अनेकवेळा झालं की पुर्ण बदलशील, त्या वेळी ही खात्री आहे की प्रामाणिकपणे मान्य करशील. नर्मदा परिक्रमेला जा Happy

अरे काय एकसे एक अनुभव घेता आहात रे तुम्ही..... हेवा वाटतो तुमचा.
पण नुस्ता हेवा वाटून काय उपयोग? त्याकरता तितकेच शारिरीक मानसिक कष्टही सहन करावे लागतात... अन त्यालाच तर आमची तयारी नसते, आम्ही नाना "व्यावहारिक(?)" सबबी सांगत बसणार, मग हे सगळे बसल्याजागी अनुभवास कसे मिळणार? तिथे तिथे जावेच लागेल.
मस्त वर्णन, भन्नाट अनुभव, नेत्रसुखद फोटो.....
इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

परिक्रमा विचाराधीन आहे पण त्याला असलेलं धर्मिकतेच कोंदण नकोसं वाटतं. अजून मी सर्टिफाईड नास्तिक नाहीये पण मला धर्माचे विशेषतः कर्मकांडाचे अवास्तव स्तोम अस्वस्थ करते.
त्याहून किस्सा म्हणजे मी किमान 8 ते 10 लोकांचे परिक्रमा अनुभव ऐकले आहेत, पुस्तकात वाचले आहेत, सीडी पहिली आहे. एकजात सगळ्यांना चमत्कार अनुभवायला मिळाले आहेत, असे वाटते की आता कुणी परिक्रमा करून आला आणि चमत्कार झाला नाही म्हणाल तर त्याने खरेच परिक्रमा केली का असा संशय घेतला जाईल इतके ते obvious झाले आहे

>>> प्रवासात / निसर्गाच्या सानिध्ध्यात असे अनुभव जास्त वेळा येतात. हे तेवढ्यापुरतंं, अनेकवेळा झालं की पुर्ण बदलशील, त्या वेळी ही खात्री आहे की प्रामाणिकपणे मान्य करशील. नर्मदा परिक्रमेला जा <<<

अगदी बरोब्बर हर्पेन Happy
(काहीं काहींन्ना पन्नासवेळा "हा सूर्य हा जयद्रथ" असे दाखवले/दिसले तरी विश्वास बसत नस्तो... Proud अन म्हणे मी अजुनही सर्टिफाईड नास्तिक नाही... Lol
अशी गरज नाही की दरवेळेसच प्रत्येकच नास्तिकाने सर्टिफाईड बनायला डोक्याला "लाल फडके" गुंडाळले पाहिजे.... Wink )

लाल फडके? कम्युनिस्ट का? नई नई, जेवढे भगवे नकोसे तितकेच लाल वाले पण.
आम्ही पापी लोक, आमचा रंग काळा- करडा. बाकीचे रंग उठत नाही त्यापूढे ☺

असे वाटते की आता कुणी परिक्रमा करून आला आणि चमत्कार झाला नाही म्हणाल तर त्याने खरेच परिक्रमा केली का असा संशय घेतला जाईल इतके ते obvious झाले आहे >>> Proud You said it.

लाल फडके? कम्युनिस्ट का? नई नई, जेवढे भगवे नकोसे तितकेच लाल वाले पण.
आम्ही पापी लोक, आमचा रंग काळा- करडा. बाकीचे रंग उठत नाही त्यापूढे ☺ >>> Lol

Pages