मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2016 - 15:02

मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे
भिन्न चेहरा जगात ज्यांचा, भिन्न चेहरा घरामधे

सुगंध शोधत होतो तेव्हा समजत नव्हते मला कधी
चाफ्याच्या वरताण घमघमे एक मोगरा घरामधे

चालवला तर खूप चालतो, नाहीतर नुसता बसतो
बापाच्या स्वरुपात वावरे खिन्न मोहरा घरामधे

संन्याश्यांची विचारशैली अंगी बाणा जमली तर
प्रवाह आहे विरक्तीमधे आणि भोवरा घरामधे

जेथे कोणी थोपटायला येऊ नाही शकत कधी
असा आपल्यासाठी ठेवा एक कोपरा घरामधे

फक्त मिसळणे निर्हेतुक ही एकच अट असते तेथे
रंग असो कुठलाही, राहो रंग पांढरा घरामधे

इतर कुठे नसताच कधीही, असे वावरा जगामधे
जणू घरी नसताच कधीही, असे वावरा घरामधे

लेक तुला म्हणण्याला आम्ही हपापलो आहोत बरे?
'बेफिकीर' होऊन येत जा रोज पाखरा घरामधे

===============

-'बेफिकीर'!

(मतल्यातील रदीफ वेगळी - भटसाहेबांच्या 'अजून गा रे अजून गा रे अजून काही, ह्या गझलेप्रमाणे)

(वाद होऊ नयेत म्हणून हे स्पष्टीकरण)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा.. खूप छान.

मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे
भिन्न चेहरा जगात ज्यांचा, भिन्न चेहरा घरामधे

फक्त मिसळणे निर्हेतुक ही एकच अट असते तेथे
रंग असो कुठलाही, राहो रंग पांढरा घरामधे

लेक तुला म्हणण्याला आम्ही हपापलो आहोत बरे?
'बेफिकीर' होऊन येत जा रोज पाखरा घरामधे

हे विशेष आवडले

ते सगळं ठी़कच आहे बेफिजी. अरे पण भेटली काय? लाभली म्हणावं झालं.

कुसुमाग्रजांनींच वर्णन केले आहे, "लाभले आम्हास ...."

वेका | 9 October, 2016 - 17:25 नवीन

ते सगळं ठी़कच आहे बेफिजी. अरे पण भेटली काय? लाभली म्हणावं झालं.<<<<

माणसं एकमेकांना भेटतात ना? तशी भेटली. आजकाल एखादी गोष्ट मिळण्याला भेटणे म्हणतात त्यातला भेटली हा शब्द नव्हे तो!

सर्वांचे आभार!

>>>मला भेटली नेहमी अशी माणसे घरा-घरामधे
भिन्न चेहरा जगात ज्यांचा, भिन्न चेहरा घरामधे>>>लाभायला कशाला हवीत अजून?भेटली तेवढंच पुरे की!

मतला,मोगरा,मोहरा...सुंदर शेर!

वा