लेमन चीज केक

Submitted by मामी on 8 October, 2016 - 03:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

साहित्य :

बेससाठी : न्युट्रिचॉईस डायजेस्टिव्ह बिस्कीटं (साधारण १५-१७) + मारी बिस्किटं (साधारण १२-१३). बिस्किटं थोडी जास्त झाली तरी चालतील. बेस जास्त जाड होईल. साधारण ४०० ग्रॅम अमुल बटर. थोडं कमी जास्त होतं. बटर कमी करायचं असेल तर थोडं थंड दूध. पण अगदी थोडं हां. फारतर १-२ टेबल स्पून. जर मीठ नसलेलं बटर वापरलं तर चिमूटभर मीठ.

चीजकेकसाठी : अंडी ३, क्रीम चीज (२०० ग्रॅमचे ३ डबे = ६०० ग्रॅम्स), दही (एक अर्धा किलोचा फुल क्रीम दह्याचा डबा आणला. त्यातील जवळ जवळ पाऊण दही वापरलं.), पनीर (२०० ग्रॅम) किसून, साखर (१०० ग्रॅम दळून) लेमन फ्लेवर, लेमन यलो कलर, लेमन झेस्ट (लिंबाच्या सालीचा कीस)

वरचं टॉपिंग / आयसिंग : (करणार असल्यास. नाही केलं तरी चालतं ) सावर क्रीम / चक्का / घट्ट दही. पिठीसाखर, लेमन इसेन्स.

साहित्याचा फोटो २०१२ सालचा आहे. पण चालून जाईल कारण घटक तेच आहेत.

हे चीज स्प्रेड आहे पण एक क्रीम चीजही मिळतं. यंदाच्या चीजकेकमध्ये मी क्रीम चीज वापरले.

क्रमवार पाककृती: 

२०१२ साली मी पहिल्यांदा चीजकेक केला. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी केला. दोन्ही चीजकेक एकाच रेसिपीनं केले. एकाच रेसिपीनं केले म्हणण्यापेक्षा एक रेसिपी वाचत त्यात थोडे इथे तिथे वाचून मनानी बदल करत केले. पण दोन्ही वेळेस चीजकेक्स उत्तम वठले.

मूळ रेसिपी इथे पहा.

एक आधीच सांगते की मी अगदी मोजून मापून घटक पदार्थ घेतले नाहीत. नक्की किती करणार याचा अंदाजच नव्हता. पण यादी करून गेले होते आणि डोळ्याला योग्य वाटतील त्या मापात पदार्थ आणले आणि एकत्र केले. आणि मग त्यावरून लक्षात आलं की थोडंफार प्रमाण इथे तिथे झालं तरी काहीच हरकत नाहीये.

वर दिलेलं साहित्याचं प्रमाण मी किती घेतलं ते आहे. मूळ प्रमाण मूळ रेसिपीतून मिळेल.

कृती :

आवन १८० डिग्री (३५० फॅरनहाईट) तापमानाला गरम करत ठेवा. मिक्सरमध्ये बिस्किटं हातानं थोडे तुकडे करून टाका आणि त्यांची बारीक पूड करा. एका भांड्यात ही पूड काढून घ्या. त्यात बटर वितळवून थोडं थोडं घाला. लाकडी / साधा चमचा / स्पॅच्युलानी एकत्र करत रहा. साधारण ओलसर दिसू लागलं की बस. वापरणार असाल तर बटर थोडं कमी करून लागेल तसं थंड दूध घाला.

ज्या भांड्यात चीजकेक बनवणार ते घ्या. जर चीजकेक मोल्ड मध्ये बनवणार असाल तर मूळ रेसिपीप्रमाणे तो मोल्ड तयार करून घ्या. मी एका साध्या सिरॅमिकच्या भांड्यात बनवला होता. त्या भांड्याला आतून थोडा बटरचा हात लावून त्यात बिस्किटांची ओलसर पावडर पसरवा आणि हातानं दाबून बसवा. कुठेही भोकं राहिली नाही पाहिजेत आणि सगळी कडे जाडी सारखी आली पाहिजे. हा बेस तळापासून थोडा वर कडेला चढायला हवा. त्यामुळे भांड्याच्या तळाशी बसवताना तो तसा बसवा. बेस ओलसर असणं आणि तो हातानं दाबून व्यवस्थित बसवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बेसमध्ये भोकं / मोकळ्या जागा राहिल्या तर मिश्रण यातून खाली जाईल. दाबून बसवला नाही तर सर्वांत शेवटी चीजकेक कापल्यावर तुकडा बाहेर काढताना बेस त्याबरोबर व्यवस्थित चिकटून येणार नाही.

मग हे भांडं त्या बेससकट गरम झालेल्या आवनमध्ये साधारण १० मिनिटं भाजून घ्या. बाहेर काढून थंड होऊ द्यात.

आता त्या पावडर काढलेल्या भांड्यात / किंवा मिक्सरच्या भांड्यात क्रीम चीज घेऊन मस्तपैकी फेटून घ्या. लाकडी चमच्यानं हातानं फेटलं तरी चालतं. साधारण मिक्स होऊन सैल झालं की बास. जास्त जोर लावून आणि जास्त वेळ फेटू नका. मग त्यात अंडी फोडून घाला. मिश्रण हळू हळू फेटा. अंडी मिक्स झाली की किसलेले पनीर घाला. मग साखर घाला. सर्वांत शेवटी लागेल तसं दही घाला. मिश्रण डोश्याच्या जाडसर पीठाइतकं सरबरीत झालं पाहिजे. सर्वांत शेवटी किसलेली लिंबाची साल, लिंबाचा इसेन्स आणि (हवा असल्यास) लेमन यलो रंग घाला.

हे मिश्रण मग त्या भांड्यातल्या / मोल्डमधल्या बेसवर हळूवार ओता. भांड्यात वर जागा राहिली पाहिजे. अर्धं किंवा त्याहून थोडं जास्त भांडं भरलं पाहिजे.

मग किमान दीडतासा करता आवनमध्ये १८० डिग्री से. वर बेक करा. मिश्रण जास्त पातळ झालं तर वेळ जास्त लागू शकतो.

वरचा थर भाजल्यासारखा दिसू लागेल. एक सुई अथवा पातळ सुरी / चमचा मधोमध खुपसून बघा. मिश्रण चिकटलं नाही तर चीजकेक तयार झाला.

आता आवनचं झाकण किंचित उघडं ठेऊन तो तिथेच हळूहळू थंड होऊ द्या. बाहेर काढल्यास चटकन थंड होऊन पृष्ठ्भागावर भेगा पडू शकतात.

थंड झाला की फ्रीजमध्ये ठेऊन गार होऊ द्या.

चीजकेक तयार आहे.

भाचीच्या वाढदिवसाला म्हणून हा केक केला होता. त्यामुळे २ वेगवेगळ्या भांड्यांतून केला होता. एक बहिणीच्या घरी घेऊन जायला (म्हणून स्टीलच्या डब्यात केलाय. झाकण लावायला बरं. Happy ) आणि एक घरच्यासाठी.

तर हा डब्यातल्या चीजकेकचा फोटो :

आणि हा यंदाचा चीजकेक :

जवळून फोटो. यात दोन थर व्यवस्थित दिसत आहेत. सुरी गरम करून घेतली असती तर काप अगदी छान आले असते. पण धीर कोणाला होता?

बरोबर मोईतो हवंच

वाढणी/प्रमाण: 
कॅलर्‍या मोजा आणि ठरवा! :)
अधिक टिपा: 

टिपा :

१. साधा चीजकेक बनवायचा तर लेमन इसेन्स, लेमन यलो कलर आणि लिंबाची किसलेली साल घालू नये. अशा केकमध्ये व्हॅनिला इसेन्स वापरावा. रंग हवा असेल तर थोडा लेमन यलो कलर वापरला तर चालेल.

२. साहित्यात काही घटकांऐवजी इतर काही तुम्ही वापरू शकता. उदा : दह्याऐवजी सावर क्रीम वापरता येतं. साखर पूर्णपणे वगळून त्याऐवजी कन्डेन्स्ड मिल्क वापरता येतं.

३. अंडी वापरली नाहीत तर बेक न करताही चीजकेक बनवता येतो. 'नो बेक' चीज केकची एक छान रेसिपी इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=ZjpmKjCApRg

४. मी ते वरचं आयसिंग कधी केलं नाही. त्याची गरज वाटली नाही. पण आयसिंग हवं तर सावर क्रीम मध्ये (या करता चक्का अथवा घट्ट दही हा पर्याय) पिठीसाखर आणि लेमन इसेन्स घालून ते व्यवस्थित फेटून चीजकेकवर लावू शकता. मग त्यावर इतर काही कलाकारी करता येईल. पण खरंतर याशिवायही चीजकेक अतिशय चविष्ट बनतो.

माहितीचा स्रोत: 
आंतरजालावरची मूळ रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी तुमचे धागे म्ह़्जे ना भारीच इनोदी असत्याल
पन याले काय वो मनावं Uhoh

नाय फॉटॉचा अत्ता नाय रेस्पिचा पता. खायला काळ आन भुईले भार. Proud lol

मामे.. छानै तुझी रेस्पी.. मस्तं दिस्तीये चीज केक..
मै भी ट्राय मारी थी..फिलाडेल्फिया क्रीम चीज वापरून एकदा आणी दुसर्‍यांदा सर्रळ बेट्टी क्रॉकर 'स नो बेक जिंदाबाद.. Wink

Happy

धन्यवाद जाई आणि वर्षुताई.

बेट्टी क्रॉकर 'स नो बेक जिंदाबाद.. >>> ही रेसिपी मस्त असेल. पुढच्या वेळी या प्रकारे करून बघेन.

वेका ..... सर्व ठीक आहे ना? Proud

वर्षू.(आलं का टिंब ;)) , यांची कमेंट वाचून मी तर ब्वा नीळीच पड्ले Proud

यास्ले म्हनत्यात "मान ना मान मय तेरा महमान" काय गं टींबक्टूच्या फुडे कुठंशी जानार व्हतीस ना Wink

हिचं म्हंजे, सितारों के आगे जहां और भी है तसं टींब(़टु) के आगे और गाव भी है (और सब में हम है का सब में हम) इथे सब हा शब्द substitute अर्थी घ्यायला कुणाची तत्वतः हरकत नसावी Happy

मामी, मी मराठी शिकतेय. माझ्या अल्पमतीत वरील उतारे (आपली आज्ञा असल्यास) मराठीत गणले जावेत. पायलागु मामीश्री Wink

Double post

मामी तुमचे धागे म्ह़्जे ना भारीच इनोदी असत्याल
पन याले काय वो मनावं अ ओ, आता काय करायचं

नाय फॉटॉचा अत्ता नाय रेस्पिचा पता. खायला काळ आन भुईले भार. फिदीफिदी lol. ,---------------------------------

मामीचं लिखान फकस्त हुश्शार मानसास्नीच पचतंय आनं कलतय.....

वेके काय झालं गं Uhoh
काय बोलतीयेस काहीही कळेना Uhoh

मामे, मी येईन तेंव्हा करून खाऊ घाल Proud