नसते उद्योग......

Submitted by विद्या भुतकर on 3 October, 2016 - 22:08

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीने रंगवलेल्या पणत्यांचे फोटो पाहिले आणि आपणही काहीतरी करावं असं वाटायला लागलं. उत्साहाने जाऊन कुंभारवाड्यातून पणत्या आणल्या, रंगही घेतले आणि एका पाठोपाठ एक पणती रंगवण्याचा सपाटा लावला. मी आणि संदीपने मिळून १००-१२५ पणत्या रंगवल्या. त्यात प्रत्येक वेळी नवीन रंगांचे मिळून बनणारे जे सुंदर चित्र शेवटी दिसायचे त्याचा जणू ध्यासच घेतला. मान मोडेपर्यंत त्या पणत्या रंगवल्या. आता त्या करायच्या काय? मग आम्हाला कल्पना सुचली आपण सर्वांना दिवाळीला पणत्याच भेट म्हणून दिल्या तर? मग आम्ही हिशोब काढला आणि अजून पणत्या, रंग घेऊन आलो. दिवाळीला ऑफिसमध्ये आणि घरी, बिल्डिंगमध्ये सर्वांना छान पॅक करून गिफ्ट केल्या.

मागच्या वर्षी पुण्यात नसल्याने मला इतक्या रंगवता आल्या नाहीत त्यामुळे वाईट वाटत होतं. त्यात माझ्या पुण्यातल्या मैत्रिणींनी बऱ्याच पणत्या सजवून विकल्याही. तेव्हा तर आपण खूप काही गमावतोय असं वाटत होतं. म्हणून थोड्या इथल्या इंडियन स्टोअर मधून घेऊन आले आणि रंगवलेल्या पणत्या इथे काहीजणांना दिवाळीला भेट दिल्या. मला आता असं वाटू लागलंय की दिवाळीच्या अनेक गोष्टींसोबत पणत्या हे अजून एक गणित जमलं आहे. तर त्यामुळे मी पुण्यातून येताना थोड्या जास्त पणत्या घेऊन आले. विचार आला, अनेकवेळा आपण बनवल्या आहेत तर मग यावेळी खरंच कुणी विकत घेणार आहे का हे पाहुयात.

का करायचं हे ? खरंतर न करण्यासाठी अनेक कारणं आहेत:

१. एकतर पणत्या केवळ दिवाळीसाठीच बनवले किंवा विकले जातात. म्हणजे सिझनल वस्तू म्हणतो तशी. त्यामुळे त्या नंतर शिल्लक राहिल्यास त्याचा उपयोग नाही.

२. छान वेळ देऊन रंगविण्यात बराच वेळ जातो त्यामानाने त्याची किंमत मिळेलच असे नाही.

३. त्याच्यापेक्षा सुमार दर्जाच्या का होईना पण कमी किमतीत पणत्या दुकानात मिळतातही.

४. जितका वेळ मी त्यात घालवून पैसे मिळतील त्यापेक्षा अनेकपटीने माझ्या नोकरीमध्ये मिळतात, त्यामुळे हे काही उपजीविकेचे साधन म्हणून मी बघू शकत नाही.

हे सर्व असूनही मला यावेळी पणत्यांची विक्री करून बघायची आहे कारण..... खाज, नसते उद्योग करायची, दुसरं काय? Happy

खरंतर मी सुरुवात करतानाच मला अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या इथे मांडायच्या आहेत म्हणून ही पोस्ट. आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारे कुठलीही वस्तू मी व्यवसाय म्हणून विकली नाहीये. एकदा एका मैत्रिणीच्या मामीच्या साड्यांच्या व्यवसायासाठी थोड्या आमच्या बिल्डिंग मध्ये घेऊन आले होते तेही माझी साडी मैत्रिणींना आवडली, म्हणजे केवळ मध्यस्थ म्हणून. आणि हो त्यानंतर स्वतःसाठी काही केले असेल तर जेव्हा माझे फेसबुक पेज सुरु केले तेंव्हा लोकांना 'like' करायला invite पाठवले होते. आता त्यात कुठेही ना त्यांचे पैसे खर्च होणार होते ना मला काही पैसे मिळणार होते. तरीही काही लोकांचा निरुत्तर पाहून मला खरंच यासाठी त्यांना पैसे पडले की काय असे वाटले होते. आधी मी माझ्या मैत्रिणींना माझ्या पोस्ट रोज व्हाट्स अप वर पाठवायचे, पुढे तेही बंद केले. हो ना, उगाच कशाला रोज लोकांना त्रास?

एकूण काय तर माझा एक विक्रेता म्हणून अनुभव शून्य आहे. त्यामुळे मला माझ्या ओळखीत असलेल्या अनेक घरगुती उद्योजक असलेल्या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटतं. बिल्डिंगमध्ये अनेक जण छोटा मोठा व्यवसाय करतात. घरगुती भाजणी वगैरे सारखे छोटे पदार्थ, कपडे, साड्या, टपरवेअर, ज्वेलरी, पर्स अशा तयार वस्तू तर कुणी केटरिंग करणारी कुणी केक बनवणारी. यासर्वांचे कष्ट पाहून मला खूप कौतुक वाटतं. त्यामुळे आणि त्यांच्या चांगल्या क्वालिटी मुळेही मी अनेकदा त्यांच्याकडून अनेक वस्तू घेतल्या आहेत. आता यातील बऱ्याचजणी हे पैसे कमावण्याचे साधन म्हणून करतात की हौस म्हणून की अजून काही हे मला माहित नाही. पण एक स्त्री उद्योजक म्हणून बऱ्याच गोष्टी येतात:

१. मुख्य विचार करणे, काय वस्तू विकायची ज्यामुळे खरंच त्यातून थोडा फार फायदा होईल.

२. केटरिंग, केक सारख्या गोष्टीत शारीरिक कष्टही आहेतच.

३. यात बरेच वेळा मोठी ऑर्डर आली तरच मोठा फायदा होऊ शकतो, नाहीतर मग गिऱ्हाईक येईल तसे थोडा थोडा.

४. आजकाल स्टॉल लावायचे पर्याय असतात, पण त्यासाठी दिवसभर घालवूनही स्टॉलचे कमिशन जाऊन किती फायदा होत असेल? मूळ भांडवल, गेलेला वेळ आणि स्टॉल चे कमिशन वजा जाता हातात काय राहतं?

५. स्टॉल सोडले तर मग, हे सर्व बरेचदा ओळखीतच विकले जातात. त्यात असेही होते की वस्तू आवडली आहे म्हणणारे खूप पण घेणारे कमीच असू शकतात.

६. ओळखीचे लोक असल्यावर, केकसारख्या किंवा केटरिंग मध्ये अनेक हॉटेल वाले लोक कमी दरात देत असताना, चांगल्या वस्तूसाठी लोक माल पाहून जास्त पैसे द्यायला तयार होतात का? अशा वेळी आपल्या वस्तूवरील विश्वास आणि आपला दर ठाम ठेवणे हे अवघडच होते.

७. शिवाय, कमी जास्त झाल्यास कधी कधी चांगले संबंध तुटण्याची भीती आहेच.

८. घरगुतीच असल्याने घरात काही कमी जास्त झाल्यास, मुलांच्या परीक्षा, अभ्यास यामुळे सर्व बंद होण्याचा संभव आहेच.

९. घरी येऊन कुणी घेऊन जाणारे असेल तर ठीकच, नाहीतर मग माल नीट पॅक करून पोहोचवणे इ. करूनही तो व्यवसाय परवडतो का?

१०. काहींची कलाकुसरीची वस्तूही असते. आता यात तर मन आणि वेळ दोन्हीही अडकलेलं असतं. अशावेळी त्याची योग्य किंमत ठरवून ती मिळवणं नक्कीच अवघड आहे.

११. आणि माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मुद्दा हा की, थोडे फार प्रॉब्लेम आल्यानंतरही पुढे व्यवसाय चालू ठेवण्याची किंवा त्याचे मार्केटिंग करण्याची हिम्मत करून पुढे चालू ठेवणे.

आता हे सर्व त्यांच्यासाठी ज्यांना नोकरी किंवा त्यांच्या नवऱ्याची नोकरी आहे. विचार करा, एखाद्या स्त्रीवरच तिचे कुटुंब अवलंबून असेल तर? कितीतरी कष्ट असतील त्यांचे. पणत्या घेताना जिच्याकडून घेतल्या ती कसे भागवत असेल? असो. माझी एक मैत्रीण बिल्डिंग बांधकाम व्यवसायात आहे, एक डॉक्टर आहे जिने नुकतेच नवीन क्लीनिक सुरु केले आहे. अशा ठिकाणी तर किती अडचणी येत असतील. एकदा त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत.

तर हे सर्व आणि असे बरेच मुद्दे डोक्यात आले. आज सकाळीच काही मैत्रिणींना मी पणत्यांचे फोटो पाठवले. एरवी गप्पा मरणाऱ्यांपैकी कुणीच काहीच बोलले नाही. तेव्हा जरा वेळ असं वाटलंही की जाऊ दे ना, कुठे त्या पणत्या विकून काय मिळणार आहे? पण प्रश्न पैशांचा नसून, त्यातून जे शिकायला मिळेल त्याचा आहे. म्हणून यावेळी हे एकदा करून बघणारच आहे. त्यामुळे आजच संध्याकाळी एकीला माझे डिसाईन दाखवले आणि तिला आवडलेही. थोड्यावेळ पूर्वीच तिने ८ बाजूला ठेवायला सांगितल्या आहेत. Happy बघू अजून पुढे काय काय होते. एक प्रयोग म्हणून करायला नक्कीच मजा येत आहे. Happy तुम्हाला कुणाला हव्या असतील तर नक्की सांगा हं ! पोस्टाचा खर्च मात्र तुम्हाला करावा लागेल. Happy

IMG_8463.JPGIMG_8453.JPGIMG_8462.JPG

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुक वर सेल युअर क्राफ्ट सारखे गॄप आहेत तिथे अगदी होलसेल मध्ये व्यवहार चालतात. तिथे मालाला जास्त उठाव मिळेल. पण आताची ट्रेंड खूप वेगळी आहे. दिव्यांचे व रांगोळ्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. सेंटेड कँडल्स, टीलाइट्स ला जास्त उठाव आहे.

तुमचे लोकेशन नक्की कुठे आहे म्हणजे काही पोस्टी अमेरिकेतून असतात व काही पुणयतून म्हणजे जर
ऑर्डर द्यायची तर नक्की कुठे द्यायची? व पेमेंट कसे करायचे हयची ही माहिती द्यावी लागेल. जनरली कुरीअर चा खर्च सेलर करतात तो तुम्ही बायर वर का टाकत आहात?

दिवाळीच्या आधी रंगवलेल्या पणत्यांनी इथले लोकल बाजार भरून जातात. बरोबरीने पुजा साहित्य,
नैवेद्याचे साहित्य, झाडू, फटाके, फुले असे सर्व एकाच गल्लीत एका फेरीत मिळून जाते. लिहिण्याचा उद्देश की तुम्ही असे काही पॅकेज सेल करू शकाल तर विचार करू.

बिग बास्केट वर पण हे उपलब्ध होईल पुढील आठवड्यात. पूजा नीड कॅटेगरीत.

पणत्या रंगवणे असले नसते उद्योग करून त्यातून पैसे मिळायला कश्या अडचणी येतात याचा विचार करण्यापेक्षा एक सुचवतो -

जर अमेरिकेत रहात असलात तर तुम्हाला कुठेहि वृद्ध नवरा बायको एकटे रहाताना दिसतील. त्यांच्या घरी नोकर, स्वैपाकी नसतात, त्यांना जर स्वयंपाक करून माफक दरात विकलात तर पैसेहि मिळतील नि उपयोगी पण उद्योग होईल.

आम्ही सांगू तसा नि तेंव्हा स्वैपाक करणारे कुणि मॉरिस काऊंटी न्यू जर्सी मधे असतील तर आपण बोलणी करू, पोचवून द्यायला नको, म्हणाल तिथे येऊन घेऊन जाऊ, भांडी आमची वापरा वाटल्यास.

सर्वान्चे मनापासून आभार. अमा, मी तुमची वेब्साईट पाहिली आहे. ती पण अशा छोट्या उद्योगाना प्रोत्साहन देते हे मला आव्डले होते. मी सध्या बोस्टन मधे आहे.
नन्द्या, 'नसते उद्योग' यासाठी म्हटले की मी 'business analyst' म्हणून नोकरी करते. गेले १३ वर्षे आय टि मधे आहे त्यामुळे पणत्या विकून पैसे कमावणे हा हेतू तितका नाहिये जितका एक प्र्योग म्हणून करणे आहे. नोकरीत बर्यापैकी पैसा मिळत असल्याने कधी उद्योग करायचा विचार केला गेला नाही. पण कधी सुरुवात केली तर काय अडच्णी असतील हे बाकी मैत्रिणिनचे पाहीले असल्याने त्यान्चे कोउतुक वाटते म्हणून नेटाने यावेळी पणत्या विकायच्या असे ठरवले आहे.
बाकी जेवणाबद्दल बोलाल तर बरेच दिवस झाले आम्च्या भागात पाणी पुरी आणि चाटचा स्टोल टाकून बघायचा आहे. तेही कधी केले तर त्याबद्दलही नक्की लिहीन. Happy

विद्या.

अहो मला पण असे खूप करावे वाट्ते. अत्तरे बाटलीत भरून विकणे, मण्यांची ज्वेलरी बनवणे. आणि तुम्ही म्हणता तसे चाट. बिर्यनी चिकन चे पदार्थ बनवून विकणे इत्यादि. पण तुम्ही लिहीले आहे तसे कॉस्ट बेनिफिट बघितले की काय उपवेग असे फ्र स्ट्रेशन येते. पण उत्साह परत येतो. मी कीचेन्स पण बनवल्या आहेत. प्रदरशनात भाग घ्यायला फार आवडते. जनसंपर्का साठी. मध्ये मी सोसायटीत कोजागिरी
मेळाव्यात अत्तरे विकली होती. लहान लहान मुलगे आईसाठी गिफ्ट म्हणून घेउन गेले. ते फार गोड वाट्ते.
कस्टमर कुठे कुठे छुपलेला असतो नै. असे वाटले.

इथे भारतात गणपती पासून दिवाळी परेन्त असंख्य प्रदर्शने , ग्राहक पेठा सोसायटी कलेक्षन लिटिल फ्ली वगैरे मार्केट भरत असतात. सध्या फेसबुक वरूनही मार्केटिंग होते. काला घोडा फेस्टिवल फेब्रुवारीत असते त्यातही एकदा भाग घ्यायचा आहे.

अमेरिकेत असाल तर क्राफ्ट बझार किंवा फार्मर्स मार्केट मध्ये माल ठेवता येइल किंवा पटेल दुकानात. बरोबरीने रांगोळी पण ठिवा. हार्दिक शुभेच्छा.

उद्योग फक्त आणि फक्त पैसा कमवून श्रीमंत व्हायला करतात. इतर कोणत्याही कारणासाठी इतर पर्याय आहेत . लोकांचे घर चालणे, प्रसिद्धी, आवडत्या गोष्टीत वेळ जाणें इ. बाय-प्रॉडक्ट आहेत.

पण तुम्ही लिहीले आहे तसे कॉस्ट बेनिफिट बघितले की काय उपवेग असे फ्र स्ट्रेशन येते. पण उत्साह परत येतो.>> अमा हे असेच होते नेहमी. यावेळी काहीतरी करुच असे ठरवले आहे. Happy

विद्या.

सुंदर आहेत पणत्या Happy
सध्या तरी कॉस्टचा विचार न करता करत रहा. बिझनेस अ‍ॅनॅलिस्ट आहात, थोडे दिवसात आयडीया येईल - how to turn this hobby into a business.

नन्द्या४३, तुम्ही सांगितलेली वृद्ध व्यक्तींना डबे देण्याची कल्पना चांगली आहे. फारसा फायदा झाला नाही तरी goodwill आणि समाधान नक्की मिळेल.