फ्री...? : भाग १

Submitted by पायस on 3 October, 2016 - 05:17

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60338

मार्चचा शेवटचा आठवडा, १९११
बॉम्बे, ब्रिटिश इंडिया

गार्डने हिरवा बावटा दाखवला. ट्रेनने शीळ घालत, वार्‍याला साद देत स्टेशन सोडले. त्या सेकंड क्लासच्या डब्यात टीसीने प्रवेश केला. खिडकीतून बाहेर बघणार्‍या त्या प्रवाशाने क्षणभर टीसीकडे बघितले आणि खिशातून त्याला हवा असलेला कपटा दाखवला. टीसीने त्याची नोंद घेता घेता मागे उभ्या असलेल्या प्रवाशाला आत येऊ दिले. हव्या त्या नोंदी झाल्यावर तो निघून गेला. डब्यातला नवा माणूस इंग्रज होता. डोक्यावरची बोलर हॅट काढून त्याने खुंटीला लटकावली. हलक्या तपकिरी रंगाचा कोटही काढून सीटवर ठेवला. टाय सैल केला, पांढर्‍या शर्टाचं गळ्याजवळील बटण काढलं आणि सुस्कारा टाकत म्हणाला, "किती उकडतंय ना आज!"
त्याच्या सहप्रवाशावर याचा काही परिणाम झालेला दिसला नाही. तो एक स्थानिक रहिवाशी वाटत होता. धुवट रंगाचे धोतर, त्यावर साधाच पण स्वच्छ असा धोतराला साजेसा सदरा. तेल चोपडून डोक्यावर बसवलेले काळे केस आणि जाड भिंगाचा चष्मा. चेहर्‍यावर बाकी काही नजरेत भरतील अशी वैशिष्ट्ये नाहीत. जरा रूक्षच वाटत होता तो. त्याच्या हूं या उत्तराने तर यावर शिक्कामोर्तबच केले. जणू त्याने प्रतिप्रश्न केला; मार्च संपत आला आहे मग उकडणार नाही तर काय बर्फ पडणार? इंग्रज प्रवाशाने मात्र नाऊमेद न होता आपली ओळख करून द्यायला सुरुवात केली. जॉर्ज, मूळचा वूस्टरशायर परगण्यातला. पंचविशी नुकतीच पार केलेली. आपण दोघे जवळपास समवयस्कच दिसतो आहोत (हूं). या 'हूं' च्या सरबत्तीने खरे तर इतर कोणीही कंटाळून गेला असता पण त्या इंग्रज तरुणाची टकळी अखंड चालू होती.
"मला माहित नव्हतं कि इंग्रजांना एका भारतीय प्रवाशाबरोबर गप्पा मारायला एवढं आवडत असेल."
"टू बी होनेस्ट, नाही. पण मला हिंदुस्थानी लोक आवडतात. त्यांच्याकडे सांगण्यासारखे कितीतरी अनुभव असतात. आम्ही लोक मात्र त्याच रुटीन इंग्लिश जीवनाला कंटाळलेलो असूनही ते मान्य करायला तयार नसतो."
कधी नव्हे तो तरुण मंदसा हसला. गेल्या काही तासात त्याने समजण्यासारखी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया होती. जॉर्जनेही स्मित केले. गाडीचा वेग थोडा मंदावला. भोर घाटातला वळणावळणाचा रस्ता सुरु झाला होता. जॉर्जने पाण्याची बाटली जवळ ठेवलेली होती. त्यातून पाणी पिता पिता तो थोडा पुढे वाकला. गाडीने अचानक वळण घेतले आणि त्याच्या हातून बाटली सुटली व दुसर्‍या तरुणाला ओले चिंब करून गेली. जॉर्जने दिलगिरी व्यक्त करून आपला रुमाल देऊ केला. रुमालाने चष्मा पुसता पुसता त्या दोघांची नजरानजर झाली आणि जॉर्जला जे हवे होते ते दिसले.
त्या तरुणाच्या चेहर्‍यावर खरेच काही नजरेत भरण्यासारखे नव्हते. चारचौघांमध्ये सहज मिसळून जाईल असा चेहरा. पण त्याचे डोळे, काळेभोर खोल गेलेले डोळे. त्या डोळ्यांमध्ये काहीतरी खास होते. त्यात तो डोळे बारीक करून बघत असताना त्याचे डोळे आणखीनच काळे दिसत होते. जॉर्जला आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत आहोत हे लक्षात आले आणि त्याने नजर वळवली. पण आता त्याला राहवत नव्हते. त्याने पुन्हा एकदा नजरेला नजर दिली. यावेळी तो भारतीय तरुणही त्याच्याचकडे बघत होता. त्याच्या डोळ्यांवर चष्मा असला तरी आता कुठे बघायचे हे जॉर्जला कळले होते. डोळ्यांच्या मध्यभागी बाहुली असते तर तिच्या आजूबाजूला पांढरा भाग असतो. कधी कधी डोळ्यांवर ताण पडला कि तो लालसर दिसू शकतो पण याच्या पांढर्‍या भागात काही विशेष होते. तो किंचित काळसर होता. अगदी रोखून बघितल्याशिवाय ते कळून येत नसे. पण जर रोखून बघितले तर त्याचे डोळे जणू काळ्या शाईने भरून गेले आहेत असे वाटत होते. जॉर्जकडे बघून त्या तरुणाने दुसर्‍यांदा स्मित केले. यावेळी मात्र ते स्मित मैत्रीपूर्ण नव्हते.
"कोणत्याही प्रकारची चलाखी करू नकोस. तू कुठेही पळू शकणार नाहीस. घाट संपत आला आहे. तास-दीड तासात आपण पुण्यात असू. वाचण्याचा एकमात्र मार्ग मला पार करून चालत्या गाडीतून उडी मारून निसटणे. पण तेवढी जोखिम तू पत्करशील असं मला वाटत नाही."
तो खदाखदा हसला. म्हणजे? हा असं काही करणार आहे? जॉर्ज अधिकच सावध झाला. पण तो निवांत खिडकीतून बाहेर बघत शीळ घालू लागला. ती शीळ काही प्रसन्न नव्हती. आधी ती करूण वाटत होती. नंतर ती जॉर्जला अस्वस्थ करू लागली. जॉर्जची अवघडलेली अवस्था बघून तो मजा घेत होता. तेवढ्यात त्याने गायला सुरुवात केली.
भालो बोंधू, आमार बोंधू, आमार गल्पो शुनो
(माझ्या भल्या मित्रा, माझी कहाणी ऐक)
जायेगा जेखाने, आमी ओखाने बासी
(जेथे मी राहतो त्या जागी)
भीतिकर दानब, घृण्य दानब आमार चारेपाशे
(भयंकर दानव, घॄणास्पद राक्षस सगळीकडे आहेत)
जोदि तादेर चोखे तुमी दॅखो ताकिये
(जर तू त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले)
तारा तोमार दिके फिरे ताकाबे
(तर तेही तुझ्याकडे बघणार आहेत)

*****

पुण्यास गाडी थांबली आणि तीन पोलिस गाडीत शिरले. गार्डला ते अपेक्षितच होते. तो त्यांना घेऊन त्या सेकंड क्लासच्या डब्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात तपकिरी कोटातला एक तरुण धावत धावत त्यांच्याकडे आला. त्यांना विचार करायची संधी न देता तो त्यातल्या एकाला जवळजवळ फरफटत त्या डब्यात घेऊन गेला. इतरही त्याच्या मागोमाग आले. आत सीटवर खिडकीपाशी सदरा धोतर घातलेला एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिक घालतात तशा पद्धतीची काळी टोपी त्याच्या तोंडावर होती. त्या तिघांपैकी मुख्य पोलिसाने पुढे होऊन ती टोपी बाजूला केली. तो जॉर्ज होता. एक गुप्ती त्याच्या तोंडात खुपसलेली होती व ती आरपार जाऊन सीटमध्ये घुसली होती. जणू त्याला सीट बरोबर पिनअप केला होता. ते सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. डब्यात आता चौघेच होते. तिकडे डोक्यावरची बोलर हॅट काढून घाम पुसत तो स्टेशनमधून बाहेर पडत होता.

~*~*~*~*~

"फणींद्र पुढे कुठे गेला? तो आत्ता कुठे असू शकेल? पुण्याला जाण्यामागे त्याचा काय हेतु होता? हे सर्व अनुत्तरित प्रश्न आहेत." जोसेफने गाडीतून बाहेर पडता पडता सांगितले. ख्रिसने मान डोलाविली. फणींद्र दत्त हा किती त्रासदायक मनुष्य आहे याच्याबद्दल त्याच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. बंगाल हा १९०५ ची फाळणी झाल्यानंतर कायम धगधगता राहिलेला होता. १९०६ मध्ये अरविंद घोष, त्यांचे बंधू बरिंद्र घोष, भूपेंद्रनाथ दत्ता, राजा सुबोध मलिक अशा जहाल मतवादी नेत्यांनी एकत्र येऊन युगांतरची स्थापना केली. १९०२ पासून बंगालमध्ये अनुशीलन समिती हा गट कार्यरत होता. खरे म्हटलं तर हा एक गट नसून त्यात अनेक गट होते जे स्वातंत्र्य या एका शब्दाने एकत्र आलेले होते. त्यापैकी युगांतर हा पुढे जाऊन सर्वाधिक जहाल ठरला. अरविंद तेव्हा सशस्त्र क्रांतीचे खंदे पुरस्कर्ते होते. युगांतरचा प्रत्येक कार्यकर्ता त्या सशस्त्र क्रांतीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करण्यास तत्पर होता. वर्षाभरातच अरविंद या गटापासून काहीसे दूर गेले व राष्ट्रीय मंचावर लाल-बाल-पाल यांच्याबरोबरीने मवाळ नेत्यांच्या विरोधात उभे ठाकले. १९०७ मध्ये कॉग्रेसची दोन शकले झाल्यानंतर अरविंद पश्चिम भारतात सक्रिय होते व १९०८ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. बाहेर पडल्यानंतर १९१० पासून ते फ्रेंच वसाहतीत योगसाधनेत मग्न असल्याची वार्ता होती. थोडक्यात अरविंदांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा होती.
पण युगांतरची कहाणी इथेच संपत नाही. युगांतरचे नेतृत्व जतिंद्रनाथ मुखर्जी, राशबिहारी बोस यांसारख्या तरुणांच्या हाती गेले. १९०८ मध्ये अलिपूरमध्ये हार्डिंग्जवर बाँब फेकणारे खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी युगांतरचेच सदस्य होते. (याच संदर्भात अरविंदांना अटक झाली) त्यातल्या काही नेत्यांना शस्त्र मिळवणे व जागतिक पातळीवर आवाज उठवण्याकरिता पाठवण्यात भारताबाहेर आले. यातून पुढे गदर पार्टीचा जन्म झाला. युगांतर याच नावाने गटाचे मुखपत्रही सुरु होतेच. त्यातील ज्वालाग्राही लेखांमुळे बरिंद्र घोष, जतिन मुखर्जी, राशबिहारी बोस ही नावे बंगालात गाजत होती. उल्लासकर दत्ता व हेमचंद्र दास या दोघा स्वशिक्षित रसायनतज्ञांना हाताशी धरून घोष व राशबिहारी बोस यांनी बाँबनिर्मितीही सुरु केली होती. त्या काळात ब्रिटिशांच्या दृष्टीने युगांतर इतका धोकादायक गट भारतात दुसरा नसावा. पण या सर्व नावांना प्रसिद्धी मिळाली कारण अलिपूर खटला व त्यांचे युगांतरच्या मुखपत्रात छापून येणारे लेख! याखेरीज काही धोकादायक व्यक्ती युगांतरमध्ये होत्या ज्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकार काहीही द्यायला तयार होते. फणींद्रनाथ दत्त हे नाव त्यात अग्रक्रमावर होते. इतर क्रांतिकारक हे जरी निधड्या छातीचे, देशासाठी काहीही करायला तयार असलेले असे होते तरी त्यांचा रोष हा मुख्यत्वे ब्रिटिश साम्राज्यावर होता. फणींद्र मात्र चालता बोलता बाँब होता, कोणावरही फुटेल. त्याला खरंच युगांतरचे तत्वज्ञान समजले होते का हा प्रश्न ख्रिसला कायम पडायचा. असा माणूस जर या खूनाशी खरंच संबंधित असेल तर काहीतरी भयंकर चालू आहे हे निश्चित!

~*~*~*~*~

"तर या खोलीत अल्बर्ट होनेस मृतावस्थेत आढळले?"
"हो ख्रिस. अगदी अचूक सांगायचे तर या इथे, पलंगाच्या पायाला पाठ लावून पडलेले होते. दोन्ही पाय पसरले होते. अंगावर शर्ट नव्हता व ......."
"थोडक्यात त्या मुलीला आणायचे कारण स्पष्ट आहे. होनेस वाटतो तितकाही सरळ नसावा." ख्रिसने जोसेफचे वाक्य मध्ये तोडत त्या जागेचे निरीक्षण चालू ठेवले. जोसेफला घसा खाकरून ख्रिसला सोशल एरर साईन द्यायची प्रचंड इच्छा झालेली पण ख्रिसचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही हे पाहून त्याने मोह आवरला. होनेसच्या खोलीत तो आधीही येऊन गेला होता. मधल्या वेळात जमा झालेली धूळ वगळता काही फरक पडलेला दिसत नव्हता. छोटीशीच खोली होती ती. झोपायला एक पलंग, एक टेबल खुर्ची व एक फडताळ. होनेसची सामानाची बॅग पोलिसांनी तेथून हलवली होती पण त्यातही काही विशेष नव्हतं. फडताळ वेगवेगळ्या पुस्तकांनी भरलेलं होतं. ख्रिसने त्यातली काही पुस्तके चाळली. त्यातल्या काही पुस्तके वेगळी काढून त्याने जोसेफकडे दिली. जोसेफने मोठ्या उत्सुकतेने ती पुस्तके पाहिली. सर्व जर्मनमध्ये असल्याने त्याने लवकरच तो नाद सोडला. ख्रिस एव्हाना त्या खिडकीतून खाली बघत होता.
"मरता मरता होनेसने याच खिडकीकडे इशारा केला?"
"हो. मी पाहिले तेव्हा खिडकीच्या चौकटीवर वाळलेल्या रक्ताचे डाग होते."
त्या खिडकीच्या बाहेर एक छोटासा चौथरा होता. त्या चौथर्‍याला अगदी छोटा कठडा होता. निश्चितच त्या जागेचा गच्चीसारखा उपयोग होणे अपेक्षित नव्हते. बहुधा छोटीशी बाग वगैरे करता आली असती तिथे. ख्रिसने पृच्छा करताच जोसेफ म्हणाला,
"इथे पक्ष्यांसाठी धान्य वगैरे ठेवले जात असे. होनेस राहायला लागल्यापासून धान्य ठेवण्याचे काम त्याने स्वतःकडे घेतले. त्यानेच मग खिडकीचे गज काढायला लावले. अर्थात त्यालाही अनेक वर्षे झाली."
अ‍ॅलेक्सी खाली घरमालक व त्याच्या परिवाराशी गप्पा मारत होता. त्यालाही हीच माहिती मिळाली. खोली पहिल्या मजल्यावर होती. जिना चढून मग एका बोळवजा वर्‍ह्यांड्याच्या दुसर्‍या तोंडाशी ही खोली होती. पळून जायला खिडकीशिवाय दुसरा मार्ग नव्हता.
"जोसेफ तुला काय वाटतं इथून उडी मारणं शक्य आहे?"
"कठीण नक्कीच आहे पण अशक्य नसावे. जर नीट उडी मारली तर फार फार तर पाय थोडासा दुखावेल. अगदी वाईट परिस्थितीत पाय मोडेल पण जिवंत निसटणे अशक्य नसावे."
ख्रिसने मान डोलाविली. त्याचेही हेच मत झाले होते. एकंदरीत खूनी भलताच चपळ असला पाहिजे. पाय मोडलेल्या अवस्थेत तो निश्चितच फार दूर पळू शकला नसता.
"कशावरून ती स्त्री सर्कसपटू नाही? बर्थोल्ट एक सर्कस पाहायला गेला होता ना?" ख्रिसने जोसेफला विचारले.
"शक्य आहे. त्या सर्कसची प्राथमिक स्वरुपाची तपासणी केली गेली पण तिथे काही गैर आढळले नाही. उलट तिथल्या एकाने, रादर एकीने, फणींद्र सर्कस बघायला आला होता अशी माहिती दिली."
"काय?" ख्रिससाठी हा धक्काच होता.
"मलाही हे अनपेक्षित होतं पण त्या मुलीने ते तसे काळेभोर डोळे असलेल्या एका तरुणाला पाहिल्याचे शपथेवर सांगितले. अजून एकाने त्या तरुणाला बघितले पण त्याचे डोळे कसे होते हे काही त्याने पाहिले नाही."
"मग?"
"पण ती अजून काहीच सांगू शकली नाही. तिचं नाव उमा. तिच्यावर संशय घेण्यात काही अर्थ नाही कारण ती कसरतपटू नाही."
ख्रिसचे पुरेसे समाधान झाले नाही. या दुव्याचीही अजून कसून तपासणी झाली पाहिजे.
"ही सर्कस कुठे आहे हे शोधलं पाहिजे जोसेफ. फणींद्रला बघून जिवंत राहिलेत आणि युगांतरशी संबंध नाही असे खूप कमीजण आहेत."
"फॉर वन्स आय अ‍ॅग्री विथ यू पण फणींद्रबरोबरचा तो ट्रेनमधला प्रसंग घडला आणि तपास पुण्याभोवती केंद्रित झाला. तिथून पुढे काही दिशा सापडत नाहीये. आता तू ऑन स्पीड आहेस तर आपण पुण्याला जायला पाहिजे."
"अ‍ॅग्रीड. त्या सर्कसबद्दल माहिती गोळा करायची व्यवस्था केली कि लगेच पुणे गाठूयात. अ‍ॅलेक्सी..."
"आय विल टेक केअर ऑफ द अ‍ॅरेंजमेंट्स सर"

~*~*~*~*~

उमाने आता सर्कसच्या वातावरणाशी पुरेसे जुळवून घेतले होते. तिच्या मिशांकडे बघून बुजणारे तिचे सहकलाकारही तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागले होते. नटराजा सर्कसचे देशभर नाव नसले तरी बंबई इलाख्यात ती बर्‍यापैकी प्रसिद्ध होती. आता हाताशी पैसा आल्यामुळे सर्कसची मालकीण मलिका हिच्या मनात देशव्यापी दौरा करावा असे घोळत होते. उमाला मात्र याच्याशी काही घेणे देणे नव्हते.
उमाने जेमतेम विशी पार केली असावी, कदाचित तेवढीही नाही. तिला स्वतःला तिचे नक्की वय सांगता येत नव्हते. कोकणातल्या एका छोट्या खेड्यात तिचा जन्म झाला होता. भातुकली खेळायच्या वयात तिचे लग्न करून दिले गेले. सासर कल्याणजवळ कुठेशी होतं. सोळावं सरेपर्यंत दोन बाळंतपणे झाली, दोन्हीवेळेस मूल दगावले. सासूच्या मनातून ती उतरायला तेवढं कारण पुरेसं होतं. तरीही तिच्या सुदैवाने तिचा शारिरिक छळ झाला नाही. झोंबतील असे शाब्दिक टोमणे क्षणाक्षणाला ऐकावे लागत असले तरी शारिरिक इजा करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नव्हता. याला कारण तिचा नवरा! चार बुके शिकल्यामुळे थोडा समंजस तर होताच पण पुण्यास येणेजाणे असल्याने तिथल्या सुधारक विचारांनी प्रेरितही झालेला होता. आता मात्र ती वयात आली होती. पहिल्यांदा आई बनण्याचे योग्य वय नसल्याने झालं ते झालं आता मात्र ती नक्की सुदृढ मुलाला जन्म देईल अशी त्याला आशा होती. या दरम्यान काही काळ तो मध्ये पुण्यात जाऊन राहिला. या काळात मात्र काहीतरी आक्रित घडले. उमेला मिसरुड फुटले. वयात येत असलेल्या पोर्‍याला जशी मिसरूड फुटते अगदी तश्शी! गुपचूप न्हाव्याला बोलावण्याचा उद्योग काही दिवस सासूने करून पाहिला. म्हणून गावात बातमी फुटायची राहते होय? उघड उघड कोणी बोलत नसले तरी कुजबूज व्हायची थांबते थोडीच? मुलगा घरात नाही हे पाहून सासूलाही थोडा जोर चढला. हात उगारणे, कामाचा प्रचंड बोजा इ. प्रकार सुरु झाले. उमेला ज्याचा आधार होता तो नवराही परत आल्यानंतर बिथरला. गावातल्या भगताला बोलावणे इ. प्रकार करेपर्यंत त्याची मजल गेली. याहून मोठा दांभिकपणा तो कोणता! तिथून ती कशी निसटली याचे तिला विस्मरण झाले पण तिचे सर्वस्व या पळापळीत हरवले हे तिच्या चांगलेच लक्षात होते. मग कधीतरी तिची वीरभद्राशी गाठ पडली व तो तिला सर्कशीत घेऊन आला. या पार्श्वभूमिवर ही सर्कस तिच्यासाठी नंदनवन होते. तिची मिशी उतरवणारा आता कोणी नव्हता, त्याची गरजही नव्हती.

*****

तशी नटराजा सर्कस खूप मोठी नव्हती. युरोपीय सर्कशींपुढे संख्याबळात ती फारच तोकडी होती. मलिका या सर्कशीची मालकीण होती. चाळीस-पंचेचाळीस वय असावं तिचं. अर्थात हे सर्व अंदाज गळ्यावरील हळू हळू सैल पडत चाललेल्या कातडीवरून केलेले. अन्यथा मोठ्या खुबीने ती आपले वय दहा वर्षांनी तरी कमी करत असे. तिचा गळा एक गोष्ट मात्र लपवत नव्हता, किंबहुना ती लपवायची चीजच नव्हती. तिचा मधुर आवाज! सर्कसच्या शोची सांगता मलिकाच्या गाण्याने होई. तेव्हा सर्वजण एकत्र येत व प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांचे आभार मानत. अशा या मलिकाचा एक अदृश्य असा दरारा त्या संपूर्ण सर्कशीवर होता. आतापर्यंत तरी उमाने तिला कोणावर चिडलेले, खेकसलेले पाहिले नव्हते. तरीदेखील सर्वजण तिला काहीसे बिचकून आहेत हे हेरण्याइतपत ती चतुर होती.
मलिका खालोखाल या सर्कशीत वजन होते ते वीरभद्राला. वीरभद्र शोचा सूत्रसंचालक होता. तसा तो प्राण्यांकडून खेळ करवून घेण्यात निपुण होता, निदान तो तरी असे सांगे. पण नटराजाकडे फारसे प्राणी नव्हतेच मुळी. प्राण्यांना खासकरून हत्तींना सांभाळण्याचा खर्च खूप म्हणून मलिकाने कटाक्षाने फारसे प्राणी सर्कशीत ठेवले नव्हते. वीरभद्र मग जवळपास सर्व खेळांमध्ये थोडा थोडा सहभाग घेत असे. त्याला सर्वजण भद्र असेच संबोधित. भद्राचा स्वतःचा असा एक छोटासा खेळही होता. तो व त्याचे पाळीव खवलेमांजर प्रेक्षकांमध्ये फिरत व भद्र प्रेक्षकांबरोबर गप्पा मारी. त्या खवलेमांजराला स्पर्श करण्याची अनेक प्रेक्षकांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असे. उमासाठी भद्र, छे भद्रदादा ही अत्यंत आदरणीय व्यक्ती होती. अखेर त्यानेच बिकट समयी तिची मदत केली होती. त्यामागे त्याचा स्वार्थ असेलही पण आज उमा ताठ मानेने जगू शकत होती याचे श्रेय त्यालाच होते.
त्यानंतर एक मोठा गट होता कसरतपटूंचा. त्यात अ‍ॅक्रोबॅट्स, स्ट्राँगमन, घोड्यावर कसरत करणारे मोडत. यातले बरेचजण हे रशियन होते. त्यांचं इंग्रजी आपल्या इतकंच तोडकं मोडकं आहे हे समजल्यावर उमा त्यांच्याशी बोलताना आता कचरत नसे. अर्थात भाषिक अडसरामुळे ती त्यांच्यात खूप मिसळत असे अशातलाही भाग नाही. त्यांचा नेता होता व्लादिमीर. व्लादिमीरचे नामकरण मलिका व भद्रने त्यांच्या सोयीपुरते मीर केले होते. मीर ट्रॅपीज मध्ये वाकबगार होता. तो व त्याची बायको येलेना यांचा ट्रॅपीज अ‍ॅक्ट प्रेक्षकांमध्ये बराच प्रसिद्ध होता.
यात एक कसरतपटू होती ओल्गा, उमाने पहिल्या दिवशी एकशे ऐंशी अंशातून मान वळवताना पाहिलेली मुलगी. उमाला ओल्गाच्या तंबूत राहायला सांगण्यात आले होते. पहिले काही दिवस दोघीही संभाषण करताना संकोचत होत्या. पण आता त्यांची चांगलीच मैत्री झाली होती. त्यात ओल्गाची आई भारतीय असल्याने तिला थोडी थोडी हिंदी येत होती त्यामुळे उमाला तिच्याबरोबर अधिक सहजतेने बोलता येत असे. ओल्गा एक कंटॉर्शनिस्ट होती. तिचे शरीर सामान्य माणसापेक्षा कितीतरी लवचिक होते. या लवचिकतेचे प्रदर्शन करून ती बर्‍याच टाळ्या मिळवित असे.
या खेरीज नागराज हा गारुडी देखील आब राखून होता. त्याच्या तंबूत विनापरवानगी जाण्यास सक्त मनाई होती. अर्थात हे इतरांच्या भल्यासाठीच होते. नागराज भलेही खेळापुरते बिनविषारी साप वापरत असला तरी अशी वदंता होती कि तो काही विषारी नागही बाळगून आहे. ओल्गाच्या म्हणण्यानुसार नागराजला विषाचे व्यसन होते. विषाची नशा करणारे लोक असतात हे उमाने लहानपणी कधीतरी ऐकले होते पण प्रत्यक्षात अशा कोणाला बघण्याची तिची पहिलीच वेळ होती. नागराजपासून शक्यतो थोडे दूरच राहिलेले बरे अशी तिने मनाशी खूणगाठ बांधली.
मग भद्राचा छोटा असिस्टंट होता. त्याचे खरे नाव बहुधा फक्त भद्र व मलिकाला ठाऊक असावे. सर्व त्याला छोटू मास्टर म्हणत असे. त्याला जगलिंग चांगले जमत असे. त्याशिवाय त्याचा मांजरींचा एक छोटा अ‍ॅक्ट होता. कोणतीही सर्कस विदूषकाशिवाय अपुरी असते. मग नटराजा त्याला कशी अपवाद असणार? केके द वंडर क्लाऊन अशी उपाधी बाळगणारा केके इथला विदूषक होता. ओल्गा खालोखाल उमा केके व छोटू बरोबर मोकळेपणाने बोले.
नटराजा सर्कसमध्ये उमाला तिचे जग सापडले होते. एकंदरीत मस्त जागा होती. मलिकाच्या अखत्यारीत इथे सर्वकाही आलबेल होतं. फक्त एकावर कोणाचीही सत्ता चालत नसे. इथे फक्त एक तंबू असा होता ज्याच्याविषयी उमाला प्रचंड आकर्षण वाटे पण तिथे जायची तिची कधीच हिंमत होत नसे. तसं बघायला गेले तर नागराजच्या तंबूप्रमाणे तिथे जायला मनाई नव्हती. पण का कोण जाणे त्याच्याकडे बघून उमाला एक जबरदस्त प्रतिकर्षक झटका बसत असे व तिची पावले आपसूक माघारी वळत. त्याचा कमालीचा नाजूक चेहरा बघून अनेकदा प्रेक्षकांना त्याच्या खेळाविषयी अंदाज येत नसे. त्याच्या वयाचा तर उमाला शून्य अंदाज होता. पण त्याच्यात काहीतरी खास होते. अगदी मलिकाही त्याला काहीशी टरकून असे. त्याचे नाव होते रुद्र!
रुद्र बहुतांशी वेळ आपल्या तंबूतच असे. तो क्वचितच काही शब्दांपेक्षा अधिक बोलत असे. तो कोण होता, कुठून आला होता याविषयी जवळपास सर्वजण अनभिज्ञ होते. रुद्रच्या चेहर्‍यावरून तो इतरांप्रमाणे सामान्य कुटुंबातला वाटत नसे. या सर्कशीत तो अत्यंत विजोड दिसे, किंबहुना तो या देशातलाच वाटत नसे. त्याचा नाजूक, देखणा चेहरा या विसंगतीची सर्वात ठळक खूण होती. ओल्गाच्या मते तो चेहरा जणू एक मुखवटा होता. असेलही! त्या चेहर्‍यामागे दडलेल्या मनातली एकही भावना जर समोर येणार नसेल तर त्या चेहर्‍याला मुखवटा म्हणणेच योग्य! एक मात्र नक्की, रुद्र या सर्कशीचा सर्वात जुना सदस्य होता. मलिकाचा पहिला साथीदार रुद्र होता. रुद्रचा खेळही चित्तथरारक होता. त्या खेळातला त्याचा साथीदारही त्याला साजेसा असाच होता. त्या सर्कशीत घोडे, मांजरी, नागराजचे साप व भद्राचे खवलेमांजर धरून आणखी एकच प्राणी होता. त्याचे पोट रुद्र कसे भरत असेल हा उमाला त्याला पाहिल्यापासून अनुत्तरित राहिलेला प्रश्न होता. जशी रुद्रवर मलिकाची सत्ता चालत नसे तशीच भद्राची त्याच्यावर सत्ता चालत नसे. अगदी नागराजचे सापही भद्राला काही करत नसत. पण याच्या पिंजर्‍याकडे जाताना भद्रही कचरत असे. रुद्राप्रमाणेच तोही या देशात, या सर्कशीत परप्रांतातला पाहुणा वाटे, विसंगत वाटे. खरे तर तो शब्दशः परप्रांतीय होता. त्याचे नाव रुद्राने संग्राम ठेवले होते. संग्राम लांबीला अकरा फूट तरी होता तर खांद्यापर्यंत त्याची उंची साडेचार फूट भरली असती. त्याने जांभई दिली कि त्याचे लांब सुळे दिसत असत. त्याच्या पंजाचा एक फटका एखाद्या हत्तीलाही सहज लोळवू शकला असता. त्याच्या आयाळीचे केस गडद तपकिरी होते. गडद असला तरी ती छटा मळखाऊ नव्हती. खासकरून त्याच्या कानांजवळील केस तर कमालीचे चमकदार होते. त्याच्या पोटावरही तसेच केस होते व ते त्या आयाळीला जाऊन जुळत होते. जणू ती आयाळ नसून शाही अंगरखा होता. भारतातील कोणताही सिंह संग्रामच्या पासंगालाही पुरला नसता. मलिकाने जे सांगितले ते खरे असेल तर संग्राम हा खर्‍या अर्थाने बब्बर शेर होता. संग्राम एक बार्बरी (Barbary) जातीचा सिंह होता.

~*~*~*~*~

शुक्रवार, २४ मार्च १९११
बॉम्बे

शुक्रवारचा दिवस असल्याने व त्यात दुपार असल्याने आज खूप गर्दी नव्हती. पण हा फक्त टीझर शो होता. मलिकाला पक्के ठाऊक होते कि हे प्रेक्षक जर खुश झाले तर रविवारसाठी पुरेशी हवा तयार होईल. रविवारचा शो खर्‍या अर्थाने पैसा वसूल करण्याचा शो होता. त्यामुळे आज सर्वकाही दाखवायची गरज नव्हती. मीर व येलेना केवळ झलक दाखवणार होते तर रुद्रही संग्रामला फक्त दर्शनापुरता आणणार होता. इतर खेळ हवा करायला पुरेसे होते असा मलिकाचा अंदाज होता. दोन दिवसांनी लोटलेली गर्दी बघता तो खराही ठरला पण उमाला जो अनुभव आला त्याच्याशी याचा काही संबंध नाही.
उमाचा अ‍ॅक्ट तुलनेने फार सोपा होता. तिच्या मिशांभोवती भद्राने एक हलकी फुलकी कहाणी गुंफली होती व ती, केके, छोटू व भद्र मिळून एखाद्या नाटकाप्रमाणे तो छोटा प्रयोग करून दाखवत. तिचा नेम बरा आहे हा शोध नुकताच लागला होता. सुरेफेकीचे काही प्रकार करायला तिने आता सुरुवात केली होती. पण तिचे मुख्य आकर्षण, तिच्या मिशा तो खेळ हिट करण्यासाठी पुरेशा होत्या. त्या खर्‍या आहेत यावर प्रेक्षकांचा चटकन विश्वास बसत नसे. कधीकधी त्या काहीजण ओढून बघत. तेव्हा भद्र वेळीच हस्तक्षेप करत असे. तेवढं सोडलं तर उमाचा जम बसू लागला होता.
आजचा तिचा प्रयोग उत्तमरित्या पार पडला. उमाला आता शेवटपर्यंत काही काम नव्हतं. वेळ आहे तर थोडे पाय मोकळे करावेत असा विचार करून तिने सर्कशीच्या तंबूला एक गोल चक्कर मारायला सुरुवात केली. जवळ जवळ ५० फूट व्यासाचा तो तंबू बराच मोठा होता. त्यात हजार जण सहज मावत. रविवारी असे अनेक शो व प्रत्येक शोला हजारांनी प्रेक्षक, नुसत्या कल्पनेनेच थरारून जायला होत होते. तेवढ्यात तिने एकाला कनात वर करून बाहेर पडताना पाहिले. मधूनच उठून बाहेर पडणारा हा कोण? तिने त्याला हटकले.
तो उमापेक्षा बराच उंच होता, म्हणजे तिला तरी तसे भासले. सहा फूट? नाही थोडासा कमी असेल. शिडशिडीत बांधा, केस राखलेले. पाटलोण व इंग्रज घालतात तसा सदरा. चेहर्‍यावर कोणतीही नजरेत भरतील अशी वैशिष्ट्ये नाहीत. सर्वसामान्य भारतीय चेहरा! नाही, याचे डोळे सामान्य नाहीत. बहुतांश भारतीयांचे डोळे काळे असतात, उमाचेही डोळे काळेच होते. आज काजळ लावल्यामुळे ते आणखीनच काळेभोर दिसत होते पण याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी संमोहित करून टाकणारे होते. ओह, याच्या डोळ्यांची बाहुली जरा जास्तच मोठी वाटते. याच्या बुबुळाचा रंग पांढर्‍याऐवजी काहीसा काळपट आहे. नजरेला नजर देऊन पाहिले तर संपूर्ण डोळा काळोखात बुडाल्यासारखा वाटत होता. त्याच्या चेहर्‍यावर ओशाळल्यासारखे स्मितहास्य आले. पण त्या हास्यात उमाला धोक्याची जाणीव होत होती.
"माफ करा. मला कल्पना आहे कि तुम्हाला असं मधूनच बाहेर पडणार प्रेक्षक पाहून नवल वाटले असेल. कदाचित सात्विक संतापही आला असावा. नव्हे आलाच पाहिजे. तो तुमचा हक्कच आहे. पण मला इथून जावंच लागेल. त्याची काही कारणे आहेत जी तुम्हाला सांगणे मी ठीक समजत नाही."
उमाच्या तोंडून एकही शब्द आला नाही. त्या दोघांमधील बोलणे, त्याचा वेग सर्वकाही त्याच्या नियंत्रणाखाली होते.
"असो. मला एक सांगा तुम्ही अशा टक लावून काय बघत होतात? माझ्या चेहर्‍यात असे काय दिसले जे पाहून तुमची नजर एकाच जागी स्थिर झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्मरणात ते कधीपर्यंत राहील?"
उमासाठी तो क्षण थिजला. त्याचा चेहरा अजिबात राकट नव्हता. तसा तो गहूवर्णीय होता. तरीही त्याचे ओठ विलग होताना उमाला एखादा कराल जबडा उघडझाप करीत असल्याचा भास झाला. जणू काळ्याकुट्ट अंधारात डोळे फाडून बघता बघता रात्रीने अचानक गिळंकृत करण्यासाठी आ वासावा तसा तो दिसत होता. तिला समजेपर्यंत तो तिच्या दिशेने सरकत सरकत तिच्या अगदी पुढ्यात उभा राहिला. तिच्या कानशीलामागून घामाची धार मानेवरून होत पाठीवर वाहत गेली. त्या स्पर्शाने ती अधिकच अस्वस्थ झाली.
"एवढी भीति? आणि मी तर अजून तुला स्पर्शही केलेला नाही. असो, मला माझे उत्तर मिळाले. आता काय करावे बरे? अं अं. असं करूया कि ...."
"उमा!!!" मागून आलेल्या खणखणीत हाकेने तो थिजलेला काळ पुन्हा वाहता झाला. उमाला जणू आपल्या अंगावरून मणामणाचे ओझे कोणीतरी उचलून फेकून दिले आहे असे वाटले. अचानक तिच्या डोळ्यांसमोर साचलेला काळोखही दूर झाला आणि सूर्यप्रकाशाने तिचे डोळे दिपले. अनेकवेळा उघडझाप केल्यानंतर तिला दिसले कि तो हाक देणारा रुद्र होता. रुद्र तिला कधीच इतका शक्तिमान भासला नव्हता. त्या तरुणाप्रमाणेच रुद्रही फार तगडा दिसत नव्हता. रुद्रचा चेहरा तर एखाद्या मुलीला लाजवेल एवढा नाजूक होता. किंचित सावळा होता खरा पण दिसायला रुद्र दृष्ट लागावी एवढा देखणा होता. रुद्र व तो तरुण एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून उभे होते. न जाणे किती क्षण ते तसे उभे होते. तो तरुण आता हसत नव्हता. एक दोन क्षण असेच गेले व दोघांनी जवळपास एकाच वेळेस खांदे उडवले. त्या तरुणाने उमाकडे कटाक्ष टाकला व एक सुस्कारा सोडला. झपाझप पावले टाकत तो बघता बघता गायब झाला.
"रुद्र, तू त्याला ओळखतोस?"
"नाही. कोणी याच्याबद्दल विचारले तर माझा सहभाग जेवढ्यास तेवढाच ठेव! अशा लोकांपासून इथून पुढे जपून राहा. तू आता सुरक्षित आहेस. मी जातो, मला माझ्या अ‍ॅक्टची तयारी करायची आहे."
अशा म्हणजे कशा लोकांपासून हे विचारण्याचा मोह उमाने आवरला. त्यानंतरचा शो निर्विघ्नपणे पार पडला. उमा त्याच्या विषयी कदाचित विसरूनही गेली असती. पण ते इंग्रज ऑफिसर्स या माणसाच्या शोधात काही दिवसांनी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन थडकले आणि तिला ते सर्वकाही आठवले. तिने रुद्रचा सहभाग जेवढ्यास तेवढाच ठेवला. कधी नव्हे तो रुद्र कोणाचे तरी बोलणे लक्ष देऊन ऐकत होता हे पाहून तिला नवल वाटले. रुद्रनेही जेवढ्यास तेवढी उत्तरे दिली व ते ऑफिसर्स तिथून निघून गेले. मलिकाने उमाला पुन्हा एकदा त्या तरुणाविषयी खोदून खोदून विचारले. एकंदरीत हे प्रकरण अंगाशी येत नाहीये याची खात्री पटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला व तिने उमाला जायची परवानगी दिली. त्या रात्री ओल्गाला मात्र उमाने सगळी कथा इत्थंभूत सांगितली.
"तुला काय वाटतं ओल्गा? रुद्र त्या तरुणाला ओळखत असेल?"
"माहित नाही गं. रुद्रच्या भूतकाळाविषयी कोणालाच काहीच माहित नसल्यामुळे ठामपणे काहीही सांगणे अशक्य आहे. तू सांग. त्या दोघांना पाहणारी तू एकटीच होतीस. तुला काय वाटतं?"
उमाने असहाय्यतेने हात वर केले. खरंच ठाम विधान करणे इथे अशक्य होते. पण उमाला एक जाणीव झाली होती. रुद्रने त्या तरुणाचा 'असे लोक' हा उल्लेख करण्याचे कारण काय असावे याचा तो एक अंधुकसा अंदाज होता. प्रथमच रुद्रचा मुखवटा थोडासा हलला होता. रुद्रचे डोळे सामान्य असले तरी त्या दिवशी प्रथमच उमाला अगदी तसाच काळोख रुद्रच्या डोळ्यांत जाणवला होता. त्या दिवशी इतका अंगावर येणारा, सुस्पष्ट व्यक्त होत नसला तरी त्यातले अंधाराचे गुणधर्म आज तिला जाणवले होते. बहुधा संग्रामच्या सहवासात राहून रुद्र 'अशा' लोकांना ओळखायला शिकला होता, नव्हे काहीसा त्यांच्यासारखा झाला होता. असे विचारचक्र चालू असताना उमाने कूस बदलली आणि चंद्रप्रकाशात तंबूवर पडणार्‍या ढगांच्या सावल्यांबरोबर निद्रादेवींनी उर्वरित रात्रीचा ग्रास घेतला.

क्रमशः

टीप : माझं बंगाली काही फार उत्तम नाही. त्यामुळे ट्रेनच्या प्रसंगात जर उच्चार इकडे तिकडे झाले असतील तर मी दिलगीर आहे
अपडेट : बंगाली भाषांतरासाठी chioo यांचे आभार

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60476

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालाय हा भाग सुद्धा. आपल्या वचनाला जागून तू या आठवड्यातला ही भाग टाकला आहेस. अशीच मालिका सुरू राहून लवकर संपू दे ! Wink

भालो बोंधू, आमार बोंधू, आमार गल्पो शुनो
(माझ्या भल्या मित्रा, माझी कहाणी ऐक)
जायेगा जेखाने, आमी ओखाने बासी
(जेथे मी राहतो त्या जागी)
भीतिकर दानब, घृण्य दानब आमार चारेपाशे
(भयंकर दानव, घॄणास्पद राक्षस सगळीकडे आहेत)
जोदि तादेर चोखे तुमी दॅखो/देखो ताकिये
(जर तू त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले)
तारा तोमार दिके फिरे ताकाबे
(तर तेही तुझ्याकडे बघणार आहेत)

----

मराठी अर्थाप्रमाणे बंगाली.

गोष्ट खूप रंगली आहे. आठवड्याला एक? Sad खूप वाट बघावी लागेल. Happy

सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद Happy

बंगाली शब्दांच्या मदतीसाठी chioo यांचे विशेष आभार!

@धनि - मला अगदी वचनबद्ध करून टाकलंस Lol

एक्स्ट्रॉ फीचर :
बर्नार्ड हर्मन माझ्या आवडत्या संगीतकारांपैकी एक आहे. त्याचा ट्विस्टेड नर्व्ह (१९६८) या चित्रपटाचा साऊंडट्रॅक माझा ऑल टाईम फेवरेट, कधीतरी निवांत ट्विस्टेड नर्व्हबद्दल लिहिन. या भागातले फणींद्रचे सीन्स लिहिताना मी त्यातलं जॉर्जीज् थीम गाणं लूपवर ठेवलं होतं. ते एक व्हिसल साँग आहे आणि त्यात जशी शीळ वाजते बहुधा फणींद्रही तशीच काहीशी शीळ घालत असावा.
ओरिजिनल (००:४० ला जॉर्जी शीळ घालायला सुरु करेल) - https://www.youtube.com/watch?v=1JsaNjEMdA4
अनेकजणांना या ट्यूनची भुरळ पडलेली आहे. उदाहरणादाखल,
किल बिल १ - https://www.youtube.com/watch?v=E84OWq6z3IQ
अमेरिकन हॉरर स्टोरी, मर्डर हाऊस - https://www.youtube.com/watch?v=bG_-dhNBZME

याशिवाय या गाण्यानेही माझ्या डोक्याला चालना द्यायला बरीच मदत केली
अनरॅव्हल - https://www.youtube.com/watch?v=7aMOurgDB-o

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे Lol

अरे वा ! ती किल बील मधली ट्युन बर्‍याचदा ऐकलेली आहे. किल बील चे सगळे म्युझिकच आयकॉनिक होते. बर्‍याच जुन्या ट्युन्स वापरलेल्या आहेत त्यात.