Submitted by फूल on 2 October, 2016 - 02:33
सकाळ झाली ऊन कोवळे
धरणीला कुरवाळू लागले
दहा दिसांचे गोड सानुले
कुशीत घेउन बाहेर गेले
दोन चिमुकले डोह मुखावर
इकडे तिकडे पाहू लागले
रवीकिरणाचा मोह अनावर
बालमुखासी चुंबू लागले
इतुक्यातच ढग त्वरे धावला
पाठी घातले रविकिरणाला
मिटले डोळे पुन्हा उघडले
टकमक सृष्टी पाहू लागले
ऊन-सावली खेळ आगळा
निसर्ग खेळी चिमण्यासंगे
झाडावरल्या सोनफुलांना
आनंदाचे येई भरते
झुळूक सुगंधी स्पर्शून गेली
गोड गुलाबी गालावरती
फुले सहर्षे गंधित झाली
नव्या जीवाच्या आगमनानी
रंगबिलोरी फूलपाखरू
भिरू भिरू आले पिल्लाभवती
चिमणपाखरे अंगणी माझ्या
गाणे गाती बाळासाठी
हातामधले बाळ सानुले
या साऱ्यांचे माझे नाही
निसर्ग माये सौख्ये दिधले
आंदण म्हणूनी माझ्या हाती
असे उमजता भिजली दृष्टी
सहज फिरवली बाळावरती
फुलले हासू इवल्या ओठी
गुज मनीचे कळले त्यासी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार सुंदर .
फार सुंदर .
सुरेखच...
सुरेखच...
क्या बात, क्या बात, क्या बात
क्या बात, क्या बात, क्या बात
वाह!! सुंदर.
वाह!! सुंदर.
सुंदर
सुंदर