मायबोली गणेशोत्सव २०१६ - समारोप

Submitted by संयोजक on 29 September, 2016 - 16:14

नमस्कार!

यंदा मायबोली गणेशोत्सवाचं सतरावं वर्ष. रूढार्थानं मायबोलीवरचा गणेशोत्सव जरी आता तारुण्यात पदार्पण करत असला, तरी खरंतर प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांची रेलचेल आणि मायबोलीकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा उस्फूर्त सहभाग यामुळे आंतरजालावर तो केव्हाच स्थिरावला आहे. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातही त्याचं विशेष मानाचं स्थान आहे. यावर्षी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, आपल्या मायबोलीला वीस वर्षं पूर्ण झाली. या घटनेला साजेसा सोहळा करायचा, म्हणजे मोठीच जबाबदारी संयोजकांवर होती. विघ्नहर्त्याच्या कृपेनं आणि मायबोली अ‍ॅडमिन टीमच्या मदतीनं सालाबादप्रमाणे तो दणक्यात पार पडला!

नेहमीप्रमाणेच आपला उत्सव पार पाडण्यासाठी अनेकांचा हातभार लागला. वास्तव जगात काय किंवा आभासी जगात काय, सर्वांच्या सक्रीय सहभागाशिवाय असा समारंभ पार पाडणं शक्य नसतं. त्यामुळे आपलीच माणसं असली, तरी त्यांचे आभार मानण्याची गोड कामगिरी आम्ही सर्वप्रथम आनंदानं शीरावर घेतो.

सर्वप्रथम गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा आणि उपक्रमा यांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मनापासून आभार. गणेशोत्सवाच्या काळात मायबोलीचं साजरं रूपडं खुलवायला मायबोलीकरांचा उत्साहच कारणीभूत असतो. हा गणेशोत्सव दिवसेंदिवस असाच वृद्धिंगत होत राहो, हीच श्रीचरणी प्रार्थना!

आम्हां सर्वांना यंदाच्या गणेशोत्सव मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल, तसंच उत्सवादरम्यान वेळोवेळी तांत्रिक मदत केल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेबमास्तर यांचे आभार. प्रताधिकार तसंच इतर कायदेशीर बाबी यांबद्दल लागेल ती मदत केल्याबद्दल चिनूक्सचे आभार. तसंच विविध कल्पना सुचवल्याबद्दल आणि त्या पूर्णत्वास नेण्यास मोलाची मदत केल्याबद्दल या सर्वांचे विशेष आभार!

मायबोलीकर आणि त्यांचं मित्रमंडळ संयोजकांकडून आलेल्या मदतीच्या कुठल्याही हाकेला नेहमीच 'ओ' देतात. या सर्व मित्रमंडळीचे संयोजक मंडळातर्फे विशेष आभार! त्यांचा ऋणनिर्देश पुढीलप्रमाणे -

गणेशवंदना गायन - अगो
गणेश-प्रतिष्ठापना फोटो - जिप्सी
गणेशोत्सव टिझरसाठीचे चित्र - मॅगी
मास्टरशेफ टिझरसाठीचे चित्र - अनन्या राणे (विनार्च यांची कन्या)
संगीतक टिझरसाठीचे चित्र - अमितव
बाप्पाच्या नैवेद्याचा फोटो - माणिकमोती
आपल्या घरच्या गणपतीचा फोटो - यशश्री शेंडे (भास्कराचार्य यांची मैत्रीण)
टिझर्समधील फोटो - जिप्सी आणि यो रॉक्स
खेळकर बाप्पा चित्रे - गौरी घैसास (भास्कराचार्य यांची पत्नी)
कथासाखळी कथा १ - मॅगी
कथासाखळी कथा २ - कविन
मायक्रोफोटोग्राफीचे अद्भुत विश्व : फोटोफीचर - कांदापोहे
’यथा काष्ठं च काष्ठं च’ (अभिवाचन) - श्री. महेश एलकुंचवार, श्री. मोहित टाकळकर, श्री. आशीष मेहता,
श्री. हृषिकेश पुजारी, ’आसक्त’ (पुणे)
’अभिव्यक्तिस्वातंत्र्य व आजची स्थिती ’ (भाषण) - श्री. सुनील सुकथनकर
’मोर देखने जंगल में’ (चित्रपट)- ’बायफ’ (पुणे), विचित्र निर्मिती (पुणे), श्री. सोहनी, श्रीमती मीना गोखले, श्रीमती सुमित्रा भावे - श्री. सुनील सुकथनकर
मुद्रितशोधन-साहाय्य - चिनूक्स
....

संयोजकांच्या कामाविषयी आम्हीच काय लिहावं? पण ते सांगण्याच्या निमित्तानं सर्वांच्याच आठवणी ताज्या होतील, म्हणून थोडंसं या अनुभवाविषयी. यावर्षी संयोजकांची संख्या नेहमीपेक्षा जरा कमी होती. काही अनुभवी चेहरे होते, तर काही संयोजक म्हणून पदार्पण करत होते. हातात असलेला वेळ आणि कमी संख्याबळ पाहता अगदी खूप कार्यक्रम नसतील तरी चालेल, पण कल्पक आणि सुनियोजित असा उत्सव साजरा करण्याबद्दल सर्वांचं एकमत झालं. प्रत्येकाला अनेक व्यवधानं असली, तरी मायबोली आणि व्हॉट्सअ‍ॅप यांच्या जोरावर आम्ही जोरदार चर्चा करायला लागलो.

झब्बू, पाककृती स्पर्धा, कथासाखळी हे श्रीगणेशाच्या नैवेद्याला हवेच असतात. कथासाखळीमध्ये दिसणार्‍या नवनवोन्मेषशाली प्रतिभेची आता सर्वांना चांगलीच ओळख आहेच. पाककृती स्पर्धेसठी मायबोलीला वीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 'मायबोली' ही थीम सुचली. तिच्या नियमांचा चर्चेत अक्षरशः कीस पाडला गेला! पुढे मायबोलीकरांनीही स्पर्धा जाहीर झाल्यावर या कार्यात साथ दिली, हे सांगणे न लगे. यावर्षी या स्पर्धेत प्रवेशिकांचा आणि कल्पनांचा पाऊस पाडला मायबोलीकरांनी! 'मायबोली' याच संकल्पनेवरून वेमांनी झब्बूचे काही विषय सुचवले. गणेशोत्सवात आपल्या मायबोलीचंही सेलिब्रेशन अशा रीतीनं विरघळून गेलं!

याउप्पर काय करता येईल, यावर बराच विचारविनिमय झाला. त्यातूनच पद्यातल्या विनोदी लेखनाची, अर्थात 'संगीतका’ची कल्पना पुढे आली. लेखक-मायबोलीकरांसाठी हे खास आकर्षण होतं. विनोदी लेखनाच्या या स्पर्धेला मायबोलीकरांचा अपेक्षेप्रमाणे उत्तम प्रतिसाद मिळाला. एकाहून जास्त प्रवेशिका एकाच मायबोलीकराकडून आल्या, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. 'उंदीरमामाची टोपी' हा इतका रंजक खेळ गेल्या वर्षी झाला होता की, तो या वर्षी आणणं क्रमप्राप्तच होतं. या खेळालाही यावर्षी इतका प्रतिसाद मिळाला की, दिवस असो वा रात्र, संयोजकांना ऑनलाईन राहून क्लू द्यायला लागत होते! लहान मुलांच्या उपक्रमासाठी ऑलिंपिकची संकल्पना पुढे आली. 'साक्षी आणि सिंधू' यांच्यातल्याच नाही, तर सर्वच स्त्रियांमधील आदिशक्तीची पूजा आपण आणि लहान मुलांनी श्रीगणेशाच्या रूपात केली, असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर अक्षररूपात गणेशाला रेखाटायची संकल्पना मोठ्या मुलांसाठी ठेवली. या सर्वांनाच भरघोस प्रतिसाद मिळाला. कलाकार मायबोलीकरांसाठी 'रंगावली गणेश' हे खास आकर्षण होतं. विविध रूपांत गणपतीचं दर्शन आपणा सर्वांना अशा प्रकारे व्हावं, ही संयोजक मंडळाची इच्छा या उपक्रमांनी पूर्ण केली.

याचबरोबर सालाबादप्रमाणे खास सांस्कृतिक कार्यक्रम आपण पाहिले. गणेशोत्सवाच्या सुरवातीलाच अगोच्या सुरेल गायनानं 'गणेशवंदना' सजली. गणेशवंदनेत प्रताधिकाराचा प्रश्न येऊ नये, म्हणून थोडी काळजी घ्यावी लागली. त्यातून मायबोलीची या विषयाबद्दलची संवेदनशीलता व जागरूकता प्रकर्षानं जाणवली. याचबरोबर कांदापोहे यांनी त्यांचे खास फोटोफीचर 'मायक्रोफोटोग्राफीचे अद्भुत विश्व - आंबोली' सादर केले. फोटोप्रेमी मायबोलीकरांना ही एक मेजवानीच झाली. त्याचबरोबर मायबोलीबाह्य दिग्गजांकडून आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम मिळाले. यासाठी खास मदत चिनूक्सची झाली. मोहित टाकळकर यांचं महेश एलकुंचवारांच्या 'यथा काष्ठं च काष्ठं च' या ललितलेखाचं अभिवाचन पहिल्या दिवशी सादर झालं. त्याचबरोबर सुनील सुकथनकरांचं 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि आजची स्थिती' या आजच्या काळाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावरचं भाषण मायबोलीकरांना ऐकायला मिळालं. 'मोर देखने जंगल में' हा चित्रपट आपण पाहिला. श्रीगणेशाच्या नैवेद्याचं ताट विविध पदार्थांनी सजावं, तसं आपलं सांस्कृतिक कार्यक्रमांचं ताट या विविध कार्यक्रमांनी सजलं. एवढंच नव्हे, तर दगडूशेठ हलवाई गणपतीची आरतीसुद्धा आपण मायबोलीवर बघू शकलो.

मायबोलीवरचे गणपतीचे दहा दिवस वेगळ्याच चैतन्यानं भारलेले असतात. या वर्षी एका धाग्यावर कोणाचीतरी 'घरचा गणपती मिस करत होते, पण इथे आले आणि तो सगळा उत्साह परत आला' अशा अर्थाची पोस्ट आली. आभासी जगातून आपला हा गणपती असा पटकन हृदयात जाऊन बसला, हे बघून संयोजक या नात्यानं खूपच समाधान वाटलं. संयोजक होणं हा खूप आनंददायी अनुभव आहे. या वर्षी संयोजन मंडळाकरता केलेल्या आवाहनाला काही कारणांनी कमी प्रतिसाद आला असेल, तरी पुढच्या सर्व वर्षी लोकांनी भरपूर प्रतिसाद द्यावा, असं आवाहन आम्ही सर्व संयोजक करतो. मायबोली गणेशोत्सवाचं रूप हे अत्यंत शुभ व सुभग आहे. मायबोलीकरांच्या जिव्हाळ्याचा आणि मायेचा हा परिणाम आहे. या सोहळ्याच्या यशाचं सर्व श्रेय या उत्सवासाठी झटलेल्या आणि उत्सवात सहभागी झालेल्या मायबोलीकरांचं आहे. या सर्व मायबोलीकरांना 'मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०१६' तर्फे मानाची सलामी! तसंच काही त्रुटी राहून गेल्या असतील, तर त्याची जबाबदारी सर्वस्वी संयोजक मंडळाची आहे. त्यांसाठी 'मोरेश्वरा बा मज घाल पोटी' अशी विनंती श्रीगणेशाला आणि मायबोलीकरांना करतो.

यावर्षी संयोजक मंडळात काम करता आलं, हे आमचं भाग्य आहे. मायबोली गणेशोत्सव असाच मोठा होत राहावा, ही श्रीचरणी प्रार्थना!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुंदर झाला यंदाही गणेशोत्सव! सर्व संयोजकांचे आणि मायबोली प्रशासनाचे अभिनंदन आणि आभार!

स्पर्धेत विजेत्या झालेल्या आयडीजना सर्टिफिकेट दिल्याबद्दल विशेष धन्यवाद. गेल्या वर्षी हे राहून गेलं होतं.

पाककॄती स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या सर्टिफिकेटचे डिझाईन एकदम आकर्षक आणि तोंपासू. ते डिझाईन कुणी बनवलंय त्याचेही नाव सांगावे.

हे समारोपाचं लेखनही छान झालंय.

मस्त झाला गणेशोत्सव. संयोजक मंडळ, अ‍ॅडमिन टीम आणि वर उल्लेख केलेल्या सगळ्यांचे आभार. स्पर्धेत आणि लहान मुलांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि बक्षिस मिळालेल्या अशा सगळ्यांचेही कौतुक आणि अभिनंदन!

स्पर्धेत विजेत्या झालेल्या आयडीजना सर्टिफिकेट दिल्याबद्दल विशेष धन्यवाद.
>>>>>
कुठे दिलेय सर्टीफिकेट Uhoh

हो हो.. शोधले.. धन्यवाद संयोजक.. भारी आहे खूप Happy
केले सुद्धा डालो ..
माझा आंतरजातीय शोध घेताना आता हे सर्टीफिकेट सुद्धा सापडेल..
फायनली मी चमचा गोटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी बक्षीस मिळवलेच Happy

आमचे घर बदलले, गणपती गावाला गेले, पहिल्यासारखी मजा राहिली नाही, गेले काही वर्ष मिसच करतोय ती मजा, त्यात यंदा कामाने एवढा जीव दाबला कि सण असा काही उपभोगताच आला नाही, गणपतीच्या काळात माबोवरही उपस्थिती मनासारखी लावता आली नाही, पण जिथे लावली तिथे आवर्जून प्रतिसाद दिले, त्यातूनही वेळ काढून पद्यात लिहायची कला नसताना भाग घ्यायचेच म्हणून संगीतक लिहिले, जमले आणि बक्षीस मिळाले ते नशीबाचा भाग, पण एकूणच जो काही थोडाफार गणेशोत्सव अनुभवला तो नव्वद टक्के इथेच, त्यामुळे सर्व संयोजकांचे मनापासून आभार, ही प्रथा परंपरा उत्सव मालिका अशीच वर्षानुवर्ष जब तक सूरज चांद रहेगा चालू द्या Happy

धन्यवाद संयोजक टीम आणि मायबोली प्रशासन ! गणेशोत्सव सुंदर पार पाडल्याबद्दल मनापासून अभिनंदन !!!

सर्व संयोजकांना धन्यवाद आणि शाबासकी!
गणेशोत्सवामधे मधेच सरपटणारे प्राणी किडे वगैरेंचे फोटोफिचर जरा मिसमॅच होते. कदाचीत ते दिवाळी अंकात जास्ती शोभुन दिसले असते. तरीही संयोजकांनी ते गणेशोत्सव समारंभात सामील करुन मला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार. Happy