पिंक - काही मतं (Pink - Not a Review !)

Submitted by रसप on 29 September, 2016 - 03:58

pink-movie-trailer-released-amitabh-bachchan-taapsee-pannu-kirti-kulhari.jpg

'पिंक'विषयी लिहायला बराच उशीर झालाय, पण लिहावंसं वाटतंय म्हणून लिहितोय. बहुतांश लोकांनी पाहून झाला आहे, भरपूर परीक्षणंही आलेली आहेतच. त्यामुळे मी कहाणी वगैरे न लिहिता फक्त काही मतं मांडतो. हे परीक्षण नव्हेच. फक्त मतप्रदर्शन !

१. 'पिंक' हे नाव आणि पोस्टरवरील त्याचं लेटरिंग/ डिझाईन मला खूप आवडलं. तेव्हढ्यातूनच एक संदेश पाहणाऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे, असं मला वाटलं.
# 'पिंक' हा रंग 'स्त्रीत्वा'चं प्रतिनिधित्व करतो. मुलगी असेल तर 'गुलाबी' रंग आणि मुलगा असेल तर 'निळा' रंग, असा एक सर्वमान्य समज जगभरात दिसून येतो.
# पोस्टरवर 'PINK' मोठ्या अक्षरांत (Capital Letters) आहे.
# 'PINK' मधल्या 'I' आणि 'K' च्या समोर हाताच्या दोन मुठी दिसून येतात. कुणी तरी बंदिस्त असल्याचं त्यातून दिसतं आणि बंड करून उठत आहे, असंही.
सिनेमाचं हे नाव व त्याचं हे डिझाईन विचारपूर्वक बनवलेलं आहे नक्कीच.

२. पूर्वार्ध काही जणांना लांबलेला वाटला. पण मला तर तो खूपच आवडला. पहिल्या प्रसंगापासून सिनेमा कहाणीला हात घालतो, हे खूप आवडलं. जी घटना घडली आहे, त्या घटनेचा पडसाद (aftermath) ह्या भागात दिसून येतो. मात्र घडलेल्या घटनेबाबतच तपशील अजिबात दाखवला जात नाही. महत्वाचं हे की, हा तपशील दाखवला न गेल्याने काहीच बिघडत नाही. कारण सर्व मुख्य व्यक्तिरेखा (अपवाद - बच्चन) इतक्या व्यवस्थित मांडल्या जातात की त्यावरुन 'काय घडलं असावं' ह्याचा साधारण अंदाज आपल्याला येतोच आणि संदर्भासाठी तो पुरे असतो. ह्या भागातलं बच्चनचं तोंडातल्या तोंडात बोलणं मात्र फारच वैताग आणणारं वाटलं. त्याच्या बोलण्याला त्या व्यक्तिरेखेची जराशी बिघडलेली मानसिक स्थिती कारणीभूत आहे, हे पुढे समजून येतं. मात्र ती तशी असण्याची कहाणीला काही एक गरज नसताना, ही जबरदस्तीची जुळवाजुळव कशासाठी ? तर बच्चनच्या व्यक्तिरेखेला एक वलय मिळावं म्हणून ? तसं असेल, तर हा डाव उलटलाच आहे.

३. नाट्यमय, कल्पक, वेगवान व संयतपणे हाताळलेल्या पूर्वार्धानंतर मात्र गाडी घसरतेच. मुलींनी समाजात कसं वागावं ह्याबाबतचं एक मॅन्युअल बच्चन कोर्ट रूममध्ये मांडतो. वेगवेगळ्या प्रसंगांत एक एक करून तो ह्यातले मुद्दे मांडतो आणि ते सगळं उपरोधिकपणे. हा सगळा भाग खरं तर त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये यायला हवा होता. पण 'क्लोजिंग'च्या प्रसंगाच्या अगदी आधीच त्याची आजारी पत्नी (की मैत्रीण?) मृत्यू पावते. त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये 'No means NO' वाला खूप मस्त भाग आहे. त्याच्या जोडीला हे मॅन्युअल असतं, तर विजोड वाटलं असतंच आणि लांबलचकही झालं असतं. एका धक्कादायी घटनेनंतर त्याचं भलंमोठं स्पीच विचित्रही वाटलं असतं, म्हणून ते असं तुकड्या तुकड्यांत पूर्ण केसभर घेतलं असावं कदाचित. पण असं आणि इतकं अवांतर बोलणंसुद्धा कोर्टातल्या वातावरणाला शोभलं नाहीच. एकूणच कोर्ट रूम ड्रामा जरासा अजून कंट्रोल करायला हवा होता. तो 'तारीख पे तारीख' पर्यंत गेला नाही, हेच नशीब. कारण पियुष मिश्राचा वकील तापसीला प्रश्न विचारत असताना एका प्रसंगात इतका आक्रस्ताळा आणि आवेशात येतो की हा दुसराच कुठला सिनेमा मध्येच लागला की काय, असंच वाटतं. त्यानंतर बच्चनही एका प्रसंगात आरोपीला प्रश्न करताना असाच भरकटत जातो. सुरुवातीच्या संयत हाताळणीनंतर कोर्टातला हा सगळा रंजित भाग मला तरी खटकलाच.

३. बऱ्याच काळानंतर बच्चनचं काम कृत्रिम वाटलं. ८० च्या आसपासचे त्याचे अनेक सिनेमे, खासकरून त्यांतले विनोदी प्रसंग बघवत नाहीत. पण अधिक 'ठहराव'वाल्या भूमिकांत तो नेहमीच आवडत आला आहे. पहिल्यांदाच 'ठहराव'वाल्या व्यक्तिरेखेत तो कृत्रिम वाटला, हे विशेष. बऱ्याचदा आपण लोक सिनेमाच्या विषयाला पाहून अपाल्म मत बनवत असतो. उदा. - 'प्रकाश बाबा आमटे' चित्रपट. लोकांना आवडला त्याचं कारण त्यातल्या व्यक्तिरेखा. पण सिनेमा म्हणून त्यावर विचार केला का ? तसंच इथेही होतं जरासं. बच्चनची व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या समर्थनार्थ ठाम उभी राहिलेली आहे, त्यामुळे ती आवडते. भिडते. पण पडद्यावर 'सहगल' न दिसता सतत 'बच्चन'च दिसत राहतो, त्याचं काय ?

४. बच्चनच्या इमेजपुढे सिनेमातल्या तीन अभिनेत्र्या झाकोळल्या गेल्या आहेत. खरं तर 'तापसी पन्नू'च मुख्य भूमिकेत आहे आणि तिचं काम खूपच जबरदस्त झालेलं आहे. तिच्या जोडीला इतर दोघी - कीर्ती कुल्हारी आणि अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग - ह्यांनीसुद्धा तोडीस तोड काम केलं आहे. मात्र त्यांना पुरेशी दाद दिली जात नाहीय. स्त्रीत्वाचा पुरस्कार करणारा विषय आहे इथेही पुरुषप्रधानता अशी डोकावते. हे विधान कुणाला अतिरंजित वाटेल, पण खरं आहे, ह्या विषयी मला स्वत:ला तरी अजिबात संशय नाही. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात ('झलक दिखला जा' बहुतेक) तापसी आणि बच्चन आले होते, 'पिंक'च्या प्रमोशनसाठी. संपूर्ण कार्यक्रमात तापसीला फक्त एकदा बोलायला मिळालं. बाकी अख्खा एपिसोड बच्चन, बच्चन आणि बच्चनच होतं.आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे आणि आपण तो कसा द्यायला हवा, ह्याचं भान ह्या इतक्या मोठमोठ्या लोकांना का असू नये ? खरोखर एखादा खमक्या असता, तर त्याने स्वत:हून म्हटलं असतं की 'चित्रपट माझा नाही, ह्या मुलींचा आहे, स्त्रीत्वाचा आहे. तापसीला बोलू द्या.' पण स्वत:ला ओवाळून घेण्याची संधी सोडवता सोडवत नाही बहुतेक. चित्रपटाच्या सगळ्याच प्रसिद्धीत हेच सूत्र दिसून येतं. युएसपी बच्चनच आहे. पोस्टरवर बच्चनचा चेहरा मोठा दिसतो, बाकीच्यांचा लहान किंवा नाहीच ! ज्या लोकांनी सिनेमाच्या नावावर व त्याच्या लेटरिंग/ डिझायनिंगवर विचार केला, त्यांना पब्लिसिटीसाठी असं स्टारलाचार व्हायला लागणं पटलं नाही.

५. मुख्य घटना संपूर्ण चित्रपटात दाखवलीच जात नाही. हे खूप आवडलं, असं म्हणत असतानाच अखेरीस श्रेयनामावलीसोबत सगळी घटना दाखवली जाते. ह्याची गरज काय होती ? ह्यामुळे तर सगळं कथन एकदम बाळबोध होऊन गेलं, असंही वाटलं.

६. एकंदरीत सिनेमा आवडला का ? - हो.
टीव्हीवर लागल्यावर मी पुन्हा पाहीन का ? - अर्थातच हो.
पण जितका उदो उदो चित्रपटाचा होतो आहे, तितकाही काही भारी मला वाटला नाही. पूर्वार्ध खरोखरच दमदार आहे. पण नंतर त्यावर बोळा फिरतो. बंगाली दिग्दर्शक 'अनिरुद्ध रॉय चौधरी' चा हा पहिलाच हिंदी चित्रपट (बहुतेक). पूर्वार्ध अप्रतिम आणि उत्तरार्ध कमजोर असं असलं, तरी हे काम त्यांच्या पुढील चित्रपटांबद्दल औत्सुक्य वाटेल, असं नक्कीच आहे. सुरुवातीला जो ताण त्यांनी कहाणीत आणला आहे, तो केवळ अनुभवावा असाच आहे. टिपिकल भडकपणा दाखवून वास्तवदर्शनाचा सोयीस्कर मुखवटा त्यांना ओढता आला असता, मात्र तसं न करता, त्याहीपेक्षा परिणामकारक मार्ग ते निवडतात आणि अस्वस्थ करतात. त्यासाठी मनापासून दाद !

एकदा तरी पाहावाच असा 'पिंक' आहेच. फक्त तो पाहताना बच्चनसाठी पाहण्यापेक्षा त्या तीन मुलींसाठी पाहायला हवा. त्यांतही तापसी पन्नूसाठी.
सरतेशेवटी तन्वीर ग़ाज़ी ह्यांनी लिहिलेली आणि सध्या प्रचंड गाजत असलेली 'पिंक' कविता -

तू खुद की खोज में निकल, तू किस लिये हताश है ?
तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है !

जो तुझसे लिपटी बेड़ियाँ समझ न इन को वस्त्र तू
यह बेड़ियाँ पिघाल के बना ले इन को शस्त्र तू

चरित्र जब पवित्र है तो क्यूँ है यह दशा तेरी
यह पापियों को हक़ नहीं की ले परीक्षा तेरी

जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है
तू आरती की लौ नहीं तू क्रोध की मशाल है

चूनर उड़ा के ध्वज बना गगन भी कपकपाऐगा
अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा

ही कविता बच्चनच्या दमदार आवाजात ऐकताना अंगावर काटा येतो !
बहौत बढ़िया !!

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/09/pink-not-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतं आवडली. तो टीव्ही वरचा कार्यक्रम मी बघितला होता. खरं तर बच्चन ची या चित्रपटाला आवश्यकताच नव्हती.
दिग्दर्शकाचा आत्मविश्वास कमी पडला का ? विषय चांगला असेल तर असे घटक आवश्यक वाटू नयेत.

रसप,

पूर्ण धागा वाचलेला नाही. पण थोडं अवांतर! आजकाल बच्चनचा खरोखरच उबग येऊ लागला आहे. एकेकाळचा माझा देव होता तो! पण नवरत्न तेल आणि नाही नाही त्या जाहिराती, केबीसीमध्ये सर्वांनी त्याचेच गोडवे गात राहणे आणि अभिनयातील तोचतोचपणा आता नको वाटू लागलेला आहे. ऋषी कपूरने कसा कंप्लीट रंगच बदलला स्वतःच्या प्रतिमेचा तसे काहीतरी बच्चनने करावे असे वाटू लागले आहे.

..ह्याची गरज काय होती ? ह्यामुळे तर सगळं कथन एकदम बाळबोध होऊन गेलं, असंही वाटलं.>> सहमत. सिनेमा संपे पर्यंत मुख्य घटना दिग्दर्शका ने नाही दाखवली म्हणुन कौतुक वाटत होते, आणि शेवटी उगाच दाखवली असे वाटलेच.

बेफ़िकीर | 29 September, 2016 - 14:16 नवीन
रसप,

पूर्ण धागा वाचलेला नाही. पण थोडं अवांतर! आजकाल बच्चनचा खरोखरच उबग येऊ लागला आहे. एकेकाळचा माझा देव होता तो! पण नवरत्न तेल आणि नाही नाही त्या जाहिराती, केबीसीमध्ये सर्वांनी त्याचेच गोडवे गात राहणे आणि अभिनयातील तोचतोचपणा आता नको वाटू लागलेला आहे. ऋषी कपूरने कसा कंप्लीट रंगच बदलला स्वतःच्या प्रतिमेचा तसे काहीतरी बच्चनने करावे असे वाटू लागले आहे.

>>

आता थकल्यासारखाही वाटायला लागला आहे. Sad

कविता दिल्यासाठी स्पेशल धन्यवाद. वाचतांना सुद्धा रोमांच उभे राहिले. भारतीय बायकांचं हे anthem बनायला पाहिजे आता!

मतं आवडली..

हे खालिल विधान नाही पटले थोडे .. त्या कार्यक्रमात बच्चन बच्चन होत होत कारण तो मोठा हिरो आहे म्हणुन.. त्यात स्त्रि - पुरुष समानता नाही असं काहिच नाही...
जर कोणी मोठी हिरोईन (माधुरी, काजोल, श्रीदेवी टाईप) कोणी आलं असत ज्युनिअर हिरो बरोबर तर हिरोइनचाच उधो झाला असता...
आणि तापसी बोलली पण असेल अजुन अ‍ॅक्च्युअल कर्य्क्रमावेळी पण टि.व्ही. वाल्यानी बच्चनलाच वेटेज दिल असणार

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
इथेही पुरुषप्रधानता अशी डोकावते. हे विधान कुणाला अतिरंजित वाटेल, पण खरं आहे, ह्या विषयी मला स्वत:ला तरी अजिबात संशय नाही. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात ('झलक दिखला जा' बहुतेक) तापसी आणि बच्चन आले होते, 'पिंक'च्या प्रमोशनसाठी. संपूर्ण कार्यक्रमात तापसीला फक्त एकदा बोलायला मिळालं. बाकी अख्खा एपिसोड बच्चन, बच्चन आणि बच्चनच होतं
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हा सोयीस्कर प्रतिवाद झाला.
१. प्रमोशन करण्यासाठी कार्यक्रमवाल्यांना त्यांनी (सिनेमावाल्यांनी) काही सूचना तर द्यायला हव्याच ना ?
२. पोस्टर्सचं काय ?

बच्चन मोठा हिरो म्हणूनच जन्माला आला होता का? मोठे स्वबळावर व्हावे लागते आणि मोठे झाले की वेटेज मिळतेच!

यू कान्ट हेल्प इट, शिवाय छोट्यांनी मोठ्यांना नावे ठेवली की लगेच ते मोठे होत नसतात.

असो.

आपण मागे राहात हिरोईनला कसे पुढे प्रमोट करावे हे शाहरूखकडून शिकावे.
सॉरी शाहरूखला धाग्यावर आणल्याबद्दल पण या मुद्द्यावर राहावलेच नाही.

पिंक बघितला नाही, पण बघायचा आहे. कधी कसा योग जमतोय बघायला हवे. मोजकेच चित्रपट येतात वर्षात हटके. ते बघायलाच हवेत.

अवांतर - रसप, तुम्ही हल्ली परीक्षण न लिहिता हे आकडे टाकून मतं लिहायची फॅशन का आणलीत? मजा नाही येत यात. उगाच चर्चेला वादाला धागा काढल्यासारखे वाटते. जरा जुन्या रसप मोड मध्ये या की. तुम्ही योग्य फॉर्मेटमध्ये परीक्षण लिहिलेत की खाली प्रतिसादांतही चर्चा चांगली होते. जिचा चित्रपटाबदल आणखी समजायला फायदा होतो.

ऋन्मेष,

लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे की ! एरव्ही लिहिताना मी आकडे टाकून लिहित नाही सहसा.

बेफिकीर अनुमोदन.

ती कविता मस्त आहे बाकी. तापसी पन्नू जबरी आहे हं बेबी मधला तिचा मारधाडीचा सीन लै भारी. आणि तरि किती सुरेख नाजूक दिसते.

सिनेमा पाहिला पण तो नाही आवडला
यातुन काय संदेश द्यायचा आणि काय घ्यायचा कळाले नाही
नो म्हनायचा अधिकार स्त्रियाना आहे/असावा हे ठिक आहे
पण सिग्रेट दारु पिणार्‍या बाया वाईट नसतात किवा त्याला वाईट समजु नये हे काय झाले?
स्त्रियानी पण पिवु नये व पुर्षांनी पण पिवु नये ! हा सिनेमा पाहून पोरी नि काय संदेश घ्यावा ?
पुरुषा नि संदेश घेतला की स्त्रीला नाही म्हणायचा अधिकार आहे पण स्त्रिया ना काय हवे आहे ?

पुरुषा नि संदेश घेतला की स्त्रीला नाही म्हणायचा अधिकार आहे पण स्त्रिया ना काय हवे आहे ?>>>>> नाही ला स्वीकारण्याचा.

पिंक पाहिला दोनेक आठवड्यापूर्वी. आवडला. कामं सगळ्यांचीच छान झाली आहेत. तिन्ही मुली एस्टॅब्लिश्ड नसल्या तरी मस्त अ‍ॅक्टींग. नो म्हणजे नो हे झालंच, पण त्याबरोबरच मुलींनी एक गोष्ट ह्या चित्रपटापासून नक्कीच शिकावी ती म्हणजे इतक्या कमी ओळखीवर कोणत्या मुला/मुलांबरोबर रिसॉर्टमध्ये वगैरे जाऊ नये. आपल्या संरक्षणाची पहिली जबाबदारी आपलीच असते.

पाहिला. आवडेल अशी जवळजवळ खात्री होती पण मला बर्‍यापैकी फसलेला सिनेमा वाटला.
स्त्रीचे कॅरेक्टर "एखाद्याच्या नजरेत क्वेश्चनेबल" " आहे म्हणाजे बलात्काराचे लायसन्स मिळते असे नाही, ती स्त्री अगदी वेश्या असेल तरी तिला नाही म्हणायचा अधिकार आहे हा थॉट उत्तम आहे. (त्यात पण , मायबोलीवर यावर अनेक चर्चा -वाद अनेक वेळा होऊन गेलेत त्यामुळे माझ्यासाठी हा विषय नविन असा नव्हता). पण तो विचार तितक्या इम्पॅक्ट ने आणि क्लॅरिटीने पोहोचत नाही. कोर्टरूम ड्रामा चा जो भाग आहे त्यात टेक्निकल चुका आहेत. त्या मला खटकत राहिल्या.

स्पॉयलर ****
मुलींना पैसे देण्या घेण्यावरून इतका कीस पाडला पण काहीच पुरावा किंवा कॅमेरा फूटेज नसताना ते अर्ग्युमेन्ट कसं स्टँड होणार होतं कोणत्याही कोर्टात ? इथेही काहीच फायदा होत नाहीच त्या अर्ग्युमेन्ट चा.
उगीच त्या पैसे देण्यावर जितकं फूटेज खर्च केलंय आणि त्या निमित्ताने मुलींच्या आयुष्यातली काही कॅरेक्टर्स वगैरे दाखावलीय्त ती अगदीच 'हाफ बेक्ड" वाटतात. उदा. तो घरमालक त्या मुलीच्या बापापेक्षा जास्त कस्न्सर्न्ड वाटतो. त्या मानाने त्या मुलीचा बाप खटल्यात इन्टरेस्ट नसल्यासारखा अगदीच अलिप्त !!

अजून म्हणजे शेवटी कोर्टाचा निकाल - खटला चालू असतो त्या मुलींवर- त्या राजवीर वर हल्ला केल्याबद्दल . मग निकाल त्या दोषी अथवा निर्दोष इतकाच असेल ना ? अचानक त्या फिर्यादींनाच कशी शिक्षा सुनावतात ?

अमिताभ चे पात्र फारसे इफिक्टिव वाटले नाही . तो कोर्ट मधे डिस्टृअ‍ॅक्टेड दाखवणे - झुरळाकडे बघताना वगैरे, मग त्याची बायको की जी कोणी असते ती मरणे हे अनावश्यक वाटले.

एकूणात सिनेमा अजून फार चांगला दाखवता आला असता. मांडलेला विचार योग्य वर्गापर्यन्त पोहोचवण्यासाठी जरा अजून क्लियर दाखवता आला असता असे वाटले.

मैत्रेयी..संपूर्ण पोस्ट ला अनुमोदन..
मलाही हा सिनेमा पाहिल्यावर असचं वाटत राहिलं की, काहीतरी कमी आहे. यापेक्षा अजून चांगला झाला असता.
अमिताभ ही खूप थकलेले वाटले. मे बी आजारी दाखवले आहेत म्हणून असेल.. पण समहाऊ इतका पोहचत नाही हा सिनेमा..

मी सिनेमा पाहिला.
सिनेमाचा फोकस, नो, मिन्स नो... त्याला दुसरा अर्थ नाही. अवांतर कथानक वगळले आहे. सर्व कॅरेक्टर्स उत्तम पकड घेतात. बच्चन मला तरी आवडला. त्याचे पहिल्यांदा तोंडातल्या तोंडात बोलणे मला पण खटकले... पण नंतर त्याने मस्त पकड घेतली. सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, बच्चन जेव्हा मॅन्युअल किंवा स्त्री हक्कांबद्दल बोललाय ते नुसतं अभिनय म्हणून, पैसे मिळतात म्हणून पाठ करून बोलल्यासारखं वाटलं नाही. तो स्वतः जे जगतो, विचार करतो ते तो बोलून दाखवतो असं वाटलं.

ज्यामुळे कोर्टरूम ड्रामा करावा लागतो तो प्रसंग नंतर दाखवण्या च्या उद्देश इतकाच असावा कदाचित की ज्यांना टोटल लागली नाही सिनेमा पाहून त्यांना निदान शेवट पाहून तरी लागावी Proud
तु हुशार आहेस रे रणजीत, सगळे असतीलच असं नाही ना... Happy

सकुरा - सिनेमाचे ध्येय मुळात स्त्री नाही म्हणू शकते आणि तिला तसा अधिकार आहे, तिच्या नाही चा आदर केला जावा आणि त्या नकाराचा वेगळा अर्थ घेऊन तिच्यावर जबरदस्ती करू नये हा विचार पसरवणे हा आहे. दारू हा दुय्यम धागा आहे. सगळेच सुविचार एकाच सिनेमात नाही ना दाखवू शकत. दारू कुणीच पिऊ नये की प्यावी हा वेगळाच विशय आहे, त्यावर एखादा नविन सिनेमा बनू शकतो.

मैत्रेयी - तुझी पोस्ट वाचली. मी समर्थन नाही करत सिनेमाचं पण पोरांची केस स्ट्राँग व्हावी यासाठीच तर मुलिनी पैसे मागितले असा खोटा आरोप करतात वकील, कारण मुलिंनी रूममध्ये पैसे मागितले असं सांगतात आणि रूम मध्ये कॅमेरे नाहीत त्यामुळे तो आरोप खोटं ठरवणं मुश्किल आणि खरं ही...घरमालक आणि वडिल यांच्यातली तुलना मात्र मला पटली... पण हतबल बाप अजुन काय करू शकतो असं पण असेल.
आणि राजवीर वर हल्ला केल्याबद्दल केस उभी असतेच, पण मुलिंनी केलेला एक आय आर पण बच्चन सिद्ध करतो की, राजवीर ने केलेली तक्रार बॅक डेटेड आहे हे ते पण सिद्ध करतो आणि उलटे चार्ज लावतो राजवीर वर... म्हणून त्यांना शिक्षा होते.

आणि राजवीर वर हल्ला केल्याबद्दल केस उभी असतेच..नाही आणि तिचा उल्लेख ही नाही. पोलिस केस नोंदवून घेत नाहीत पहिल्यांदा आणि दुसर्यंदा पण कमिशनर पर्यंत फोन जातात आणि केस होत नाही तर मुलींना च अटक होते.

>> तो स्वतः जे जगतो, विचार करतो ते तो बोलून दाखवतो असं वाटलं. <<

अतिशयोक्ती वाटली. तो स्वत: इतका खुल्या मनाचा, लिबरल वगैरे असता तर सुनेच्या चित्रपटातील 'संभावित' दृश्यांबद्दल रुसवे-फुगवे नसते त्याचे.

>> तु हुशार आहेस रे रणजीत, सगळे असतीलच असं नाही ना... <<

Lol
__/\__

No means NO
पॉइंट ऑफ कनसेन्ट चा मुद्दा मांडणारा हा एक हलका फुलका व्हिडीओ
In today's world of complicated relationships, breakups, rape, acid attacks and lawsuits, understanding consent is very important. This is our humble attempt of using lavani format to make this point clear
http://youtu.be/TLsqNCzSkZQ

जर कोणी मोठी हिरोईन (माधुरी, काजोल, श्रीदेवी टाईप) कोणी आलं असत ज्युनिअर हिरो बरोबर तर हिरोइनचाच उधो झाला असता...++1

तरी poster चा मुद्दा पटला .बच्चन जास्त आहे मुलीं पेक्षा

सिंबा.. तुम्ही दिलेली तमाशाबारीची लिंक प्रचंड आवडण्यात आलेली आहे.
खुप खुप धन्यवाद. "पॉईंट ऑफ कंसेन्ट" हा मुद्दा असाही मांडता येतो हे पाहून खूप मस्त वाटलं.

महानायक अमिताभ बच्चन ह्या गृहस्थाने आता टाटा स्काय ह्या उत्पादनाची एक अत्यंत टाकाऊ जाहिरात केलेली दिसत आहे.

आवरा त्याला प्लीज

धन्यवाद पियू,
भूषण कोरगावकर माझा मित्र आहे, त्याने हाच फॉरमॅट घेऊन स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल वेब सिरीज, यु ट्यूब चॅनेल काढावा म्हणून आम्ही मित्र त्याच्या मागे लागलो आहोत.

Pages