'अनसोशल' मीडियावरवरचा 'भगवा' मुळचा आहे तरी कसा ?.....

Submitted by अजातशत्रू on 29 September, 2016 - 02:17

मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.

म्हणजेच सुखवस्तू, खायला प्यायला ताटभर असणारा आणि पैसभर अंग पसरायला मोकळा असणारा, थोडाफार मोकळा वेळ असणारा किंवा अगदी पूर्ण वेळचा रिकामटेकडा शिक्षित माणूस सोशल मिडियावर हे उद्योग करत बसतो. एकमेकाचे भले व्हावे, चार चांगले अनुभव सांगावेत, वाचनाची साधने उपलब्ध होत नसल्यास इथे काही तरी चांगले वाचावे, विचारांची देवाण घेवाण करावी, अत्यावश्यक निरोप वा माहिती सर्वांना द्यावी. आपसातल्या गरजा भागवीत सामाजिक जाणिवांचा काही भार हलका करता आला तर तो करावा. शेवटी आपले काही छंद जसे की संगीत, सिनेमा, पर्यटन, गिरीभ्रमण, चित्रकला, शिल्पकला, ओरिगामी किंवा आणखी काही छंद असतील त्या अनुषंगाने काही शिकता आले वा त्यावर काही चांगले वाचनात आले तर ते वाचावे. सरते शेवटी दोन घटकांची निखळ करमणूक करावी. ही या सोशल मिडियामागची उद्दिष्टे आहेत म्हणूनच याचे नाव सामाजिक माध्यम - सोशल मिडिया असे आहे.

हे सर्व करूनही ज्यांना वेळ उरत असेल वा इतर अवांतर गोष्टींची फारच हौस असेल तर त्यांनी संयत भाषेत आपले राजकीय, सामाजिक व इतर विचार मांडावेत असं अपेक्षित असतं. ते सर्व राहते बाजूला आणि सुरु असते नुसती चिखलफेक ! बरे मुद्दे शांततेत,संयमात, सभ्य भाषेत, रूढ संकेतांचा आदर राखूनही मांडले जात नसतात. अश्लील, अर्वाच्च, गलिच्छ शिवराळ भाषा सहजगत्या वापरली जाते. मुद्देसूद व स्वतःच्या लेखनाच्या आधारे बोलणारे खूप कमी आढळतात. कुठून तरी काहीतरी कॉपी पेस्ट केलं जाते. त्याची खातरजमा मूळ लेखकासच नसते तिथं अन्य कॉपीपेस्ट बहाद्दरांची काय कथा ? या पोस्ट टाकणारया लोकांचे स्वतःचे काही संशोधन असते का ? स्वतःचे काही वेगळे ज्ञान त्याबाबतीत आहे का याचा साधा सारासार विचार न करता धडाधड पोस्ट व कॉमेंटचा मारा सुरु असतो. कोणाचा कोणाला पायपोस नसतो. सगळं कसं जोशात चालू असते. जातीधर्माच्या नावाचे जे समूह असतात त्यात तर अत्यंत विनाशकारक व अभद्र विखारी प्रचार सुरु असतो. त्यातीलच एखादी पोस्ट बाहेर काढून हा चिखलफेकीचा कार्यक्रम आणखी रंगतदार केला जातो. मग आडनावे बघून जाती धर्माचे अंदाज बांधले जातात अन सुरु होतो रोजचा रोजंदारीचा सोशल मिडियावरचा द्वेषपूरक खेळ ! यात झेंडे वापरले जातात. एकमेकांचे रंग ठरवले जातात !

भगवा नेमका आहे तरी कसा जाणून घेण्याआधी आपले कोणाला म्हणावायचे याची साधी सोपी व्याख्या तुम्हाला पाहिजे का ?
तुकोबा म्हणतात -
येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥
येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥
तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥

पृथ्वीतलावरील क्षणभंगुर शब्दअलंकाराने वा आभूषणाने केलेलं पूजन हे खरे पूजन नव्हे.
खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो, तेथे शाश्वत सुखाचा भांडार मिळते.
इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी तुम्हाला त्याचा मोहत पाडत नाही.
तुकोबा म्हणतात, वैकुंठाचा मार्ग चालणारे सर्व वैष्णव हेच माझे खरे गणगोत आहेत.

वारकरी सांप्रदायात सर्व जातीधर्माचे संत आहेत. चोखामेळा, गोरा कुंभार, सावता मेळा, सेना न्हावी, नरहरी सोनार, नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, जनाबाई, कान्होपात्रा, मुक्ताई, केशवदास, अमृतराय, सूरदास, शेख मोहम्मद, बहिणाई, निळोबा, विसोबा या सर्वांनी एकमेकाच्या जाती पाहिल्या नाहीत. सर्व जातींचे लोक वारकरी संप्रदायात आढळतात. वारीत जाताना हे सर्व एकत्र जातात आणि एकत्र परततात, तिथे तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे एकच गणगोत असते ते म्हणजे वैकुंठाचा मार्ग चालणारे हे सर्वच लोक माझे आप्त आहेत !
किती उदात्त विचार आहेत हे !

हे सर्व सोडूनही अमका काय म्हणाला आणि फलाणा काय म्हणाला यावर लोक आपली क्रयशक्ती आणि वेळ वाया घालवत बसतात. आपण पोस्ट वा कॉमेंट केली नाही तर जगबुडी होणार नाही किंवा आकाश पाताळ एक होणार नाही याची खात्री प्रत्येकाला असतेच ! तरीही सोम्या चिम्याबरोबर वाद घालतो आणि गोम्या गण्याबरोबर वाद घालतो ! किती मोठी क्रियाशक्ती वाया घालवतो आपण ! कधी येणार याचे भान ?
जरा जागे होऊन आपला समृद्ध वारसा प्रत्येकाने पाहिला तरी आपण भानावर येऊ शकतो अन आपल्या - परक्याच्या सीमा रेषा धूसर होऊ शकतात. एकमेकांना आपले मानले की आपापले झेंडे आणि अजेंडे देखील गळून पडतात.

सोबतच्या फोटोत वारकरयांच्या भगव्या झेंडेपताका आहेत, जे की वारकरयांच्या भागवतधर्माचे प्रतिक आहे. पुढे ह्याच पताका शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी निवडल्या आणि त्याचा भगवा जरीपताका रूढ केला. कालपरवा काही लोक 'तुझा भगवा खरा की माझा खरा, भगवा आमच्याच पक्षाचा वा भगवा आमच्याच संघटनेचा' यावरून भांडत होते. अरे बाबांनो हा भगवा तुमच्यापैकी कुणाचाही असू शकत नाही कारण तुम्ही जातधर्मावरून भांडत आहात. शिवरायांहून आधीपासून हा भगवा पताका आधी वारकऱ्यांच्या खांद्यावर आहे. सातशे वर्षापूर्वी पासूनची ही परंपरा आहे, आणि आजकालचे लोक इथे सांगत फिरत होते की हा भगवा ध्वज अमुक एका पक्षाचा वा संघटनेचा आहे ! तुम्ही अप्रत्यक्ष रित्या भगव्याची बदनामी करत आहात. अरे बाबांनो वारकरयांचा हा ध्वज भगवाच का आहे याची तरी निदान माहिती करून घ्या. भगवा रंग हे त्यागाचे प्रतिक आहे. सर्व विकारांचा त्याग करून ज्याने भागवताचे अनुसरण सुरु केले आहे त्याचा हा भगवा ध्वज आहे ! इथे लोक एकमेकाच्या नरडीचा घोट घेण्याची भाषा करण्यासाठी भगव्या ध्वजाच्या प्रतिकाचा वापर करतात, आपाआपल्या पक्ष संघटनांचा प्रचार करण्यासाठी हा भगवा आपलीच जहागीर असल्याचे सांगतात तेंव्हा त्यांची अत्यंत किव येते. किती हा विरोधाभास !

सोबतच्या फोटोतले भगवे ध्वज सारखेच आहेत. ते कोण कोठल्या जातीच्या लोकांनी लावलेले आहेत याच्याशी सच्च्या माणसाला काही देणे घेणे नसते पण ज्यांना केवळ झेंडे नाचवायचे असतात किंवा झेंड्यांचा वापर स्वहितासाठी करावयाचा असतो ते लोक मात्र ज्यांनी हे झेंडे इथं उभे केले आहेत त्यांचे जातधर्म बघत बसतील ! या झेंड्याला जी वीणा बांधली आहे तो या भगव्याचा धर्म आहे अन त्या भगव्याला जात नाही. साधे सोपे आहे पण आम्हाला मर्म समजून घ्यायचे नाही.काही संघटना आणि पक्षांचे झेंडे भगवे आहेत पण त्यांचे अजेंडे काय आहेत यावर बोलण्याची ही जागा नाही. पण मुळातला भगवा कसा होता आणि आताच्या 'अनसोशल' झालेल्या सोशल मिडियाचा 'भगवा' कसा आहे याचा फरक जरी काही लोकांना कळाला तरी लेखनाची फलश्रुती होईल.

खरे तर ही अत्यंत सोपी गोष्ट आहे कोणीही समजून घेऊ शकतो पण त्यासाठी हवी इच्छाशक्ती आणि संयम !
तो जर आमच्याकडे नसला तर आपण तो निर्माण करावा लागेल .....

- समीर गायकवाड.

ब्लॉगलिंक -
https://sameerbapu.blogspot.in/2016/09/blog-post_41.html

jhenda.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.

म्हणजेच सुखवस्तू, खायला प्यायला ताटभर असणारा आणि पैसभर अंग पसरायला मोकळा असणारा, थोडाफार मोकळा वेळ असणारा किंवा अगदी पूर्ण वेळचा रिकामटेकडा शिक्षित माणूस सोशल मिडियावर हे उद्योग करत बसतो. .>>>>>>:हहगलो: काय जबरी लिहीता हो तुम्ही. बेफिकीर यांच्या समवेत ज्यांचे लिखाण खूप नैसर्गीक आहे, त्यात तुम्ही पण नंबर वन. घाईत वरचे दोन पॅरा वाचलेय, सहमत आहे, बाकी निवांत वाचेन.

रश्मीशी सहमत.
बेफी नंतर जर मला कोणत्या लेखकाचा लेख विषय न वाचता वाचावासा वाटत असेल तर ते तुम्ही आहात समीर जी.
मनापासुन धन्यवाद तुम्हाला आमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी...
पु.ले.शु.