पोरं म्हणजे...... उपदव्याप

Submitted by विद्या भुतकर on 28 September, 2016 - 10:26

पोरं म्हणजे...... उपदव्याप
काल एकतर सोमवार त्यामुळे ऑफिसमधून घरी येऊन सगळी रोजची कामं करायची या विचारानेच वैतागलेला जीव. त्यात जरा वेळ रनिंग करायचं होतं. सुदैवाने डोशाचे पीठ तयार असल्याने, पळून आल्यावर पटकन पोरांना डोसे करून द्यायचं ठरवलं आणि पळायला घरातून बाहेर पडले. पोरं संदीपसोबत लेगोचे छोटे ब्लॉक्सचा ट्रक बनवत बसले होते. पळायला सुरुवात करून पाच मिनिटं झाली आणि नवर्याचा फोन आला. 'इतक्यात काय झालं?' म्हणून मी फोन उचलला तर मागून मुलाच्या (वय वर्षे ४) रडण्याचा आवाज येत होता आणि संदीप म्हणाला, 'घरी लवकर परत ये स्वनिकने नाकात लेगो चा ब्लॉक घातलाय'. त्याच्या आवाजानेच मला काही सुचेना. मी जोरात म्हणाले 'कॉल ९११' आणि जमेल तितक्या वेगाने पळत घरी यायला लागले.

आता विचार करा, घरापर्यंत पोहचेपर्यंत माझ्या डोक्यात इतके विचार येऊन गेले. त्यात अजूनही पोलीस किंवा ऍम्ब्युलन्सचा आवाज येत नव्हता. पुढचे तीन मिनिटं मी जीव तोडून पळाले. घरी पोचले तर स्वनिकच्या नाकातून रक्त येत होतं आणि तो रडत होता. ऍम्ब्युलन्स आली आणि मग मी त्याला घेऊन आत बसले. संदीप मागून गाडीतून येऊ लागला. स्वनिक आता थोडा शांत झाला होता. आत आमच्या सोबत असलेल्या पॅरामेडिकला जमेल तशी हळू आवाजात बऱ्यापैकी उत्तरं देत होता. त्याच्यासोबत हॉस्पिटलला पोचले. तिथे 'कसं झालं हे?' या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणारच होतं. आता खरंतर स्वनिक बराच समजूतदार मुलगा आहे आणि हे कसं झालं असावं हा आम्हालाही प्रश्नच पडला होता. पण नर्सला जेव्हा उत्तरं द्यायला लागतो तेव्हा असं वाटतं, एक पेरेंट म्हणून ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील? तिला कसं सांगणार की संदीप तिथे त्यांच्यासोबतच बसला होता तरीही हे असं घडलं? कधीतरी दोन मिनिटात हे घडलं होतं. आपण कितीही सावध असलो तरी एखादी घटना घडून जातेच, नाही का?

नर्सने मला विचारलं, 'तुम्ही ९११ का कॉल केला? त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता का?'. म्हणजे पेरेंट म्हणून आपण घाईत जरा जास्तच घाईत निर्णय घेतला की काय असेही वाटू लागते. पण त्या क्षणाला आई-वडील म्हणून जी भीती असते त्याच्यापलीकडे कसलाही विचार मनात येत नाही. नंतर कितीही ते योग्य किंवा अयोग्य वाटले तरीही. मुलीचाही सायकलवरून पडून एकदा हात फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा मी थोडी शांत राहिले होते की हाताला कास्ट घालतील आणि निघून जाऊ. पण जेव्हा तिला आमच्यासमोर डॉक्टरनी भूल दिली तेव्हा मात्र माझा संयम ढळला होता आणि रडू फुटलं होतं. त्यामुळे कुठलाही प्रसंग कमी लेखायचा नाही हे कळलं होतं. असो.

स्वनिकची सर्व माहिती भरून बेड मिळाला. रूममध्ये घेऊन गेले तोवर संदीप आलाच होता मागून. बेडवर बसलेला स्वनिक पाहून वाटत होतं की एरवी 'बिग बॉय' आहेस ना म्हणून त्याच्याकडून मोठेपणाच्या ज्या अपेक्षा आम्ही ठेवतो त्यापेक्षा किती छोटा आहे तो? त्याच्याच बाबतीत नाही, सानूच्या बाबतीतही तिच्याकडे पाहून असंच वाटलं होतं. आपल्या मुलांकडून समजूतदारपणे वागण्याची किती अपेक्षा करतो आपण? अशा संकटप्रसंगी ते किती लहान आहेत ती याची जाणीव होत राहते. नाही का? त्यांच्या घाबरलेल्या किंवा रडून थकलेल्या चेहऱ्याकडून पाहून अजूनच वाईट वाटायला लागतं. त्यात काही खाल्लंही नाही, उपाशी तसेच आहेत म्हणलं की चेहरा अजून छोटा होतो.

स्वनिकला आम्ही विचारलं कसं काय झालं हे? तर तो म्हणत राहिला की 'चुकून गेला'. अशा वेळी काही जास्त विचारताही येत नाही. पण ब्लॉक्स खेळताना मधेच तो २-३ मिनिट जागेवर नव्हता तर संदीपने त्याला विचारलं,'तू स्वतः ते काढायचा प्रयत्न केलास का?' तर तो 'हो' म्हणाला. म्हणजे आपल्याला रागवायला नको म्हणून त्याने स्वतःच ते काढण्याचा प्रयत्न केला असणार. आता अशा वेळी त्याला कसं सांगणार की 'आम्ही नाही रागावणार तुला, पण तू आधी आई-बाबांना' सांगायचं जे काही झालं असेल ते? बरं त्यासाठी म्हणून मग कायमच प्रेमाने सांगायचं का पोरांना? रागावून सांगायचे प्रसंग येतच असतात. त्यांच्यापासून हे वेगळे कसे करणार? आम्ही त्याला समजावून सांगितलं की तू आमच्याकडे आधी आला असतास तर नसते झाले हे सर्व. त्याच्यासोबत सान्वीलाही समजावले.तीही शांतपणे जमेल तशी मदत करतच होती.

साधारण पाऊण-एक तासाने डॉक्टर आले. त्यांनी चेक केले आणि हवेच्या पंपाने तो लेगोचा तुकडा ओढून निघेल असा प्रयत्न करून बघू म्हणून सांगितले. आणि नाही जमले तर एका बारीक वाकलेल्या लांब काडीने आतून ओढून काढायचा प्रयत्न करू असेही सांगितले. आता तेही यशस्वी झाले नाही तर मात्र काय हे विचारायची माझी हिम्मत नव्हती. सानूसमोर हे नको म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेले. थोड्या वेळाने डॉकटर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की तो तुकडा निघाला. तर सक्शन पंपाने ते निघाले नाही म्हणून त्यांनी तार घालून पटकन बाहेर काढले. हे ऐकून मी सुटकेचा निश्वास सोडला. संदीप त्यांच्याशी बोलत असताना, मी स्वनिकशी बोलत होते. तो मला म्हणाला,'मला दुखलं नाकात ते काढत असताना. पण मी रडलो नाही. एकदम ब्रेव्ह बॉय सारखा काढून घेतला.' हे ऐकून मात्र मला रडू फुटलं. खरंच कळत नाही काय करायचं या पोरांचं?

आई-वडील म्हणून आपल्यासमोर छोट्या-मोठ्या समस्या येतच असतात. पण अशा प्रसंगी मात्र खरंच कसोटी लागते. नियमितपणे मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे समजावणे, शिवाय त्यांचा विश्वासही मिळवणे, काही चुकू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि लक्ष असूनही चुकलंच काही तर घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हे म्हणजे अग्निपरीक्षा आहे रोजची. अशा अजून किती असतील काय माहित? आम्ही लवकरच घरी येऊन मुलांना जेवायला देऊन झोपवून टीव्ही बघत बसलो. रुटीन पुन्हा सुरु झालं होतं. आणि आज......पुन्हा एकदा तेच लेगो ब्लॉक्स घेऊन संदीप त्यांच्यासोबत उरलेला ट्रक बनवत आहे. आणि हो, नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे. आता काय करायचं? पोरं म्हणजे खरंच उपद्व्याप असतात एकेक.....पण शेवटी झालेल्या गोष्टी मागून टाकून पुढं जायला तर लागतंच..... होय ना?

विद्या भुतकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक पेरेंट म्हणून ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील >>>> त्यांना सवय असते अशा इमर्जन्सीजची. आपल्या पोरानं असा उद्योग केला याचा गिल्ट आपल्यालाच असतो आणि हे असे प्रश्न पडतात . अजून एक माझ्या लक्षात आलं आहे की भारतीय पालकांना इथल्या इमर्जन्सी विझिट्स किंवा ९११ कॉल करणे याचं काय ग्लॅमर वाटतं की काय पण फार रंगवून सांगतात असे किस्से.

रच्याकने, अशा काही कारणानं एकच पोर २-३ वेळा इमर्जन्सीत गेलं तर मात्र ते पोलिसांना बोलावून त्यांच्याकडून चौकशी करवून घेतात. माझ्या लेकाच्या मित्रानं टायलेनॉलची अर्धी बाटली प्यायली होती. पहिलाच इन्सिडन्स होता तरी हॉस्पिटलनं पोलिसांना बोलावलं होतं.

फार रंगवून सांगतात असे किस्से. >> Sorry रंगवून सान्गीतल्याबद्दल. अनेक इमर्जन्सि विसिट नन्तर शेवटी लिहावेच म्हटले. Happy

विद्या.

नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे.
>>> हे भारी Happy

पोरं म्हणजे...... उपदव्याप >>> बेसिकमध्येच घोळ आहे.

आपले उपदव्याप म्हणजे ...... पोरं हे समजले की parenthood सोपे होऊन जाते. म्हणजे सोपे नसतेच पण मनापासून केले जाते आणि म्हणून ते निभावून नेणे सोपे जाते. ज्या पालकांना ते कळत नाही त्यांच्या पोरांचे मात्र हाल असतात.

माधव काय हे अरे मी चुरमुरे खात होते तर हास्याचा फवारा उडाला ना....
लेगो ब्रिक्स वर चाइल्ड सेफ्टी सूचना असतात व ते सेट्स वयाप्रमाणे द्यायचे असतात मुलांना. अगदी लहानांसा ठी मोठे ड्यूप्लो सेट्स अस्तात. गेम आणलेले खोके ठेवले असेल तर त्यावर चेक करा. सेफ्टी
सूचना दिली नसेल तर तुम्ही कंपनीवर खटला भरू शकता.

९११ सुविधेचे मला पण फार कौतूक वाट्ते. इथे मरने दो साले को अ‍ॅटिट्यूड आहे ना.

नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे. >>> भारी आहे Happy
आपले उपदव्याप म्हणजे ...... पोरं >>> अरारारा Rofl
आता गंमत वाटणारे प्रसंग त्या त्या वेलेस ते प्रचंड अस्वस्थ करणारे असतात . >> + १००० .

आमच्या लेकाने कानात छोटा स्क्रू टाकण्याचा पराक्रम केला होता . त्यावेळी प्रचंड घाबरले होते .
हॉस्पिटल मध्ये नेउन RMO कडून काढून घेतला.
त्यानंतर त्याने कान तपासत जनरली विचारलं , "आणखी काही त्रास नाही ना ? "
नवर्याने चेहर्यावरती कोणतेही भाव न दाखवता म्हटले " आणखी काही नाही हो, हाच एक त्रास आहे "
आजूबाजूला हास्याचे स्फोट झाले .

मग काही महिन्याने चिरंजीवानी नाकात मनुका टाकला .दूपारपासून नाकात राहून चांगलाच ट्म्म फुगला होता . संध्याकाळ पर्यन्त नाक दूखायला लागले होते.
त्यावेळी नवरा बाहेरगावी होता . मी शांत चित्ताने , सासर्याना फॅमिली डॉक ची अपॉइन्टमेन्ट घ्यायला सांगितली.
तिथे जाउन काढून आणला .

आमच्या सुदैवाने , मग असले प्रकार नंतर बन्द झाले. देवाच्या क्रुपेने आता सगळं सुरळीत आहे. Wink

{{{ झाडू | 29 September, 2016 - 09:44 नवीन

स्वनिक नाव वेगळंच आहे. सॉनिक सारखं.

स्वनिक म्हणजे काय? काही देवाबिवाचं नांव आहे का? }}}

आधीच्या कुठल्यातरी धाग्यात उल्लेख आहे. संदीप + विद्या या आईवडिलांच्या नावांतील स्पेलिंग्जमधील अक्षरांचे परम्युटेशन / कॉम्बिनेशन करुन स्वनिक असे नाव बनविले आहे.

तुम्ही प्रसंगावधान दाखवून मुलाचा जीव वाचविलात याबद्दल तुमचे अभिनंदन. उपद्व्याप या एका शब्दामुळे एका गंभीर धाग्याचे विनोदी धाग्यात रुपांतर होऊ नये असे वाटते. खरंतर वाचताना मुलाचे काय शारिरीक आणि तुमचे मानसिक हाल झाले असतील याची कल्पना करुनच जीव अतिशय कासावीस होत होता. अशी वेळ कुणावरही न येवो हीच इच्छा.

बाकी असाच प्रकार भारतात घडला तर काय होते याची झलक अलका कुबल-आठल्ये या अभिनेत्रीच्या मुलाखतीत ऐकायला मिळाली. त्यांच्या लहान मुलीने असाच उपद्व्याप करुन फिनाइलची बाटलीच पिऊन रिकामी केली होती तेव्हा त्यांना पोलीस + हॉस्पिटलनी बराच मनस्ताप दिला होता. एका प्रथितयश अभिनेत्रीबाबत असे घडले तर सामान्यांना किती त्रास होत असेल?

मुल म्हटली की त्यान्चे काही ना काही उपद्व्याप चालूच असतात अस म्हणायच होत. असो. Happy त्या त्या वेळेला होणारी धावपळ मात्र भितीदायक असते.
स्वनिकचा अर्थ नेटवर असा मिळाला होता.

Screen Shot 2016-09-29 at 9.24.16 AM.png

आपले उपदव्याप म्हणजे ...... पोरं>> Happy ते तर झालच.

आई-वडील म्हणून आपल्यासमोर छोट्या-मोठ्या समस्या येतच असतात. पण अशा प्रसंगी मात्र खरंच कसोटी लागते. नियमितपणे मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे समजावणे, शिवाय त्यांचा विश्वासही मिळवणे, काही चुकू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि लक्ष असूनही चुकलंच काही तर घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हे म्हणजे अग्निपरीक्षा आहे रोजची. >> हे सान्गायचे होते.

विद्या.

"नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे." स्वनिक खरोखरंच ब्रेव्ह बॉय आहे!

'स्वनिक' नावही छान आहे.

"नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे." स्वनिक खरोखरंच ब्रेव्ह बॉय आहे!

'स्वनिक' नावही छान आहे.

"नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे." स्वनिक खरोखरंच ब्रेव्ह बॉय आहे!

'स्वनिक' नावही छान आहे.

हे वाचलं तेंव्हा वाटलं होत कस काय करतात मुलं अस? प्रत्य़ष अनुभव दिला चिरंजीवानी. शुक्रवारी संध्याकाळी चड्डीचे प्लास्टीक बटन काढुन (शर्ट चे असते तसे) नाकात घुसवले. लगेच त्याच्या पेडी कडे नेले त्याने आम्हाला बाहेर काढुन त्याचे हात पाय पकडुन काढायचा प्रय्त्न केला. तेंव्हा खूप रडला तो अन शिंक्ला . पेडी म्हणाला की त्याने बटन मधे घेतले म्हणून . प्रीकॉशन म्हणून त्याला २४ तास अ‍ॅडमिट करुन घेतले. मुलगा नॉर्मल होता . श्वास वगैरे घ्यायला त्रास होत नव्हता काही म्हणून शनवारी संध्याकाळी घरी आलो. बहुतेक गिळले असेल असे डॉ ला वाटले. शी वाटे २ दिवस झाले गेले नाहीये. एक्स रे मधे ही काहीच दिसत नाहीये. एक डॉ म्हणाला की प्लास्टीक असल्याने दिसत नाहीये. अजुन बटनचा शोध लागला नाही. Sad

हिम्स हो रे. त्यानेच काळजी वाटतेय.

दोन तीन डॉ झाले. त्याचे पेडी म्हणतायत नथिंग टु वरी. पण जोपर्यंत बटन दिसत नाही तोपर्यंत टांगणीलाच आहे जीव. डॉ पण फर्म संआगत नाहीत की एंडोस्कोपी कराच म्हणून . ते म्हणतायत की तो नॉर्मल आहे , खेळतोय खातोय व्यवस्थित ...

दीप्स, किती वर्षांचा आहे मुलगा?
तो खेळतोय वगैरे म्हणजे ठीकच असणार, पण तरी बटन दिसेपर्यंत चैन पडणार नाही हेही खरं.