जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग 9): सरदारशहर - वालुकामय वेदना

Submitted by आशुचँप on 26 September, 2016 - 14:59

http://www.maayboli.com/node/58684 - (भाग ८): हनुमानगढ - राजस्थानात प्रवेश
======================================================================

भल्या पहाटे जेव्हा जाग आली तेव्हा बाकीच्या सगळ्यांचे उरकून बॅगा भरणे सुरु होते. च्यायला, आपणच शेवटचे म्हणत भराभरा आवरले आणि पॅनिअर्सचा लळालोंबा करत खाली पोचलो तेव्हा सगळ्यांनी एकमुखाने जाहीर केले की आजचा लेट लतीफ पुरस्कार मला जाहीर करण्यात आला आहे. तोच मागून सुह्द उगवला आणि मला हायसे वाटले, पण नाहीच. पुरस्कार आम्हा दोघांना विभागून देण्यात आला.

त्याहून वैताग म्हणजे निघण्याच्या गडबडीत थर्मल्स बॅगेत भरायचे राहीले आणि रुमवरच विसरलो. अर्थात तेव्हा गरज नसल्याने लक्षात आले नाही, पण दुसरे दिवशी लक्षात आले तेव्हा स्वतलाच लाखोली वाहीली. एकतर ते मित्राने मोठ्या प्रेमाने दिले होते वापरायला. त्याला नवीन घेऊन देण्यापेक्षा विश्वासाने दिलेली गोष्ट सांभाळू शकलो नाही याची खंत मोठी होती.

हनुमानगड घग्गर नदीकिनारी आहे व या नदीला सरस्वती नदी मानतात. इथे किल्लाही आहे पण वेळ नव्हता व दिडशे किमी चा आकडा डोळ्यासमोर नाचत असल्याने निघालो. गांवातून निघतांनाच फ्लायओव्हर सुरु होत होता. म्हणून पहिली जी दिसली त्या टपरीवर चहापान झालं. फ्लायओव्हर चुकवू म्हणून खालून निघालो तेव्हा गंडल्याचं लक्षात आलं व पुन्हा वळसा मारत पाठी आलो व फ्लायओव्हर चढून निघालो.

नुकतेच झुंजुमुंजु झाले होते आणि भास्करराव छानपैकी आळोखेपिळोखे देत ढगांच्या पांघरूणातून बाहेर येत होते. तेव्हा त्यांचे ते रुपडे इतके मोहक होते की थांबून ते नजरेत भरल्याशिवाय पुढे जाववेना.
अर्थात ही जाणिव होतीच की एकदा त्यांचे काम सुरु झाले की खडूस बॉसप्रमाणे दिवसभर घाम काढणार. पण त्याला पर्याय नव्हता, स्वखुशीने राजस्थानातून जाण्याचा निर्णय घेतला होता. आलीया भोगासी. पण ती वेळ हे असले विचार करण्याची नव्हती.

पायाने पुन्हा एकदा असहकार पुकारला होता. सकाळच्या हवेत टाचेवरचा भाग इतका आखडला होता की मला पॅडल मारताना अक्षरश सटासट कळा येत होत्या. थोडा वेळ चालवून मी थांबलो. पाय असा दुखत होता की जणू जोरदार जखम झाली असावी. केवळ डोळ्यात पाणी यायचे बाकी होते. इतका बेचैन झालो, की काही सुचेना. गेल्या राईडला गुढगेदुखी आणि आता हे नवीन. बरे नक्की काय झालेय तेही कळेना. पाय कुठे मुरगळलाय म्हणावं तर तसेही नव्हते. नॉर्मल चालतानाही ठीकठाक होतो. इतकडे तिकडे जाताना, झोपल्यावर, बसल्यावर दुखणे थांबत होते पण सायकलींग करू शकत नव्हतो.

म्हणलं, असे आता मी किती कीमी अजून चालवू शकेन. आज जेमतेम पाचवा दिवस. अजून १२ दिवस सतत सायकल चालवल्यावर मी घरी पोचणार होतो. आणि पायाची अवस्था अशी बिकट होती की मी १२ किमी पण चालवू शकेन का नाही सांगता येत नव्हते. पण पर्याय काहीच नव्हता. त्यामुळे बॅगेतून रेलीस्प्रे काढला, मारला आणि पुढे निघालो. पुढे जाताच ओबी देखील सापडला. सकाळची मस्त प्रसन्न वेळ, फारशी रहदारी नसलेला सुंदर डांबरी सरळसोट रस्ता आणि हेडविंड्सपण नाहीत. यामुळे सुसाट गँग अधिकच सुसाट सुटली होती. ते कुठल्याकुठे दिसेनासे झाले होते. ओबीदेखील त्यांच्यात असला असता पण त्याच्या रणगाड्यामुळे तो देखील टेकीला आला होता आणि गपगुमान ओढत चालला आमच्यासोबत.

वाटेत रस्त्याच्या कडेला भरपूर गोधन दिसत होतं. गाईंची खिल्लारे च्या खिल्लारे. इतकी मोकाट सोडलेली की पाळलेली आहेत का भाकड जनावरे हे देखील कळत नव्हतं. आणि पुढे जाताच उलगडा झाला.

ओबीचे लक्ष रस्त्याच्या बाजूला पडलेल्या एका वासराकडे गेले आणि त्याने आम्हालाही थांबवले. जवळ जाऊन पाहिले तर बिचाऱ्याला ट्रक किंवा तस्सम वाहनाची जोरदार धडक बसलेली होती. अगदी मरणासन्न अवस्थेत बाजूला पडून होते. बाकी गाई त्याच्या आजूबाजूलाच घोळका करून होत्या. ओबीने तत्परता दाखवत त्याला आपल्याकडे पाणी पाजायचा प्रयत्न केला पण वासरू अगदी शेवटच्या क्षणाचे सोबती असल्याचे जाणवत होते. आणि मग सुरु झाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न.

आमच्याने त्याला काही करता येणे शक्यच नव्हते पण मग काकांनी तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला थांबवून त्या वासराला जवळच्या दवाखान्यात नेण्याची विनंती केली, पण कसानुसा चेहरा करत त्याने एक नजर आमच्याकडे टाकून पुढे चालता झाला. काकांनी अजून एक गाडी थांबवून त्यांना जवळपास काही गोरक्षण इ. संस्था किंवा तस्सम काही प्रकार आहे का असे विचारले, तर असेही काही अस्तित्वात नव्हते. तीन चार गाड्यांना विचारूनही हाच प्रकार. बरं बहुतांश लोक स्थानिक वाटत होते आणि त्यांना झाल्या प्रकाराची अगदीच सवय असावी. कारण वासरूच मरून पडलंय ना मग ही शहरी लोक इतकी आटापीटा का करातायत असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते.

काकाही आता वैतागले आणि त्यांनी शेवटी स्थानिक पोलिसांचा नंबर मिळवला, त्यांना फोन करून झाल्या प्रकाराची माहीती दिली आणि शेवटी संबधित व्यक्ती यात लक्ष घालतील असे आश्वासन मिळाले तेव्हाच आम्हीच पुढे निघालो. अर्थात मला खात्री होती की कुणीही काहीही करणार नाहीच.

आता जेव्हा गेल्या काही महिन्यात गोरक्षणावरून तापलेले वातावरण पाहतो तेव्हा ते राजस्थानातले मरणासन्न वासरू आणि स्थानिक बेपर्वाई इतकेच लक्षात राहते.

असो, पुढे गेलो तर सगळी गँग वाटच पाहत होती, एकतर ते सुसाट स्पीडने गेलेले आणि आम्ही रमत गमत त्यातून वासरू प्रकरणात आमचा नाही म्हणला तरी बराच वेळ गेलेला. सकाळची वेळ उलटून उन्हे वाढत चालल्याचा त्यांना वैताग पण आमचाही नाईलाज होत. मग त्यांना सगळे सांगितल्यावर त्यांची नाराजी थोडी कमी झाली.

सकाळी इतके दाट धुके असायचे, पहाटे अजून असले असते, त्यामुळे उजाडण्याच्या सुमारास बाहेर पडण्याचा निर्णय बरोबरच होता


वाट पाहून कंटाळलेले पण हास्य कायम असणारे लान्सदादा

पण वेगातला फरक आता जाणवत होता, मी तर अगदीच जायबंदी झालो होतो. डाव्या पायावर जास्त लोड येऊ नये म्हणून मी तो अगदी अलगद टेकवून पॅडल मारत होतो आणि सगळा जोर उजव्या पायावर येत होता. तरी त्यातल्या त्यात स्पीड राखण्याचा प्रयत्न करत होतो पण सुसाट गँगशी कुठेच तुलना नव्हती. मला कन्याकुमारी ट्रीपचे सुरुवातीचे दिवस आठवले. तेव्हासारखी हतबलता आणि फ्रस्ट्रेशन मनात डोकावत होते. पण यावेळी माझा खरेच नाईलाज होता.

पुढे रावतसरला एके ठिकाणी नाष्ट्याला थांबलो आणि मी काल जी भविष्यवाणी उच्चारली होती ती खरी झाल्याचे दृष्टीस आले. ते टीपीकल आपले राजस्थानी मिठाईचे दुकान होते. नाश्त्याला पराठे किंवा तसं भक्कम काहीच नव्हतं. त्या स्विटच्या दुकानात मराठी बोलणारा पोरगा निघाला. त्याने पिंपळगांवला हॉटेलात काम केलेलं होतं. त्याने थोडेफार मराठी बोलून धमाल आणली.

खायला फक्त सामोसे होते, आणि त्यावर चटणी टाकायला म्हणून त्याने चक्क कात्री घेतली, सामोसे कापले.... चक्क कापले आणि चटणी टाकून दिली. व्रतस्थ हेमने आता खाण्यापिण्याचे हाल होणार म्हणून गूळ दाणे मिळतील का कुठे याची चौकशी सुरु केली पण धक्का म्हणजे इथे आपल्यासारखे दाणे कुणीच विकत नाही म्हणे. इकडे शेंगदाणे कुणीच खात नाहीत म्हणे त्यामुळे दाणे मिळणार नाहीत. शेंगा मात्र मधेमधे दिसत पण सोलण्याचा कुटाणा कोण करेल!

माझा पाय चांगलाच ठणकत असल्याने ओबीच्या सल्ल्याने पहिल्यांदाच राईड सुरु असताना पेनकिलर खाल्ली, रेलीस्प्रे मारला, त्यावर क्रेप बँडेज बांधून पायाला कंफर्ट द्यायचा प्रयत्न केला. पुढे निघालो तेव्हा पेनकिलरच्या प्रभावामुळे का होईना बरे वाटत होते आणि जरा तरी स्पीड मॅच करू शकत होतो.
पुढे एक गाव लागले तिकडे मी आणि सु्हुदनी मिळून तब्बल दोन किलो संत्री घेतली उशीरा आल्याची पेनल्टी म्हणून आणि तेवढ्यावर भागवल.

सुरुवातीचे ५०-६० किमी सकाळचे ताजेतवाने असताना निघून गेले पण पुढचे ९०-१०० किमी जणू एक अंतहीन प्रवास असावा असे चालले होते. दोन्ही बाजूला नजर जाईल तोवर निस्तेज, भकास वाळू, रुक्ष बोडकी जमीन आणि थोडाा बदल म्हणून खुरटलेली झुडपे.

कित्येक किमी गेलो तरी हेच दृश्य. मध्येच एखादे छोटेसे गाव जायचे. हाताच्या बोटावर मोजावी इतकीच घरे. तीपण त्याच मातीच्या रंगाची, धूळभरली, एखादे बारके पोरगे अंगणात येउन काय गंमत चाललीये ते बघायला यायचे तितकेच. बाकी कुणी मनुष्यप्राणी दिसायचे नाही.
रस्तेही दुपारचे सामसूम, गेले तर एखादा ट्रक, ट्रॅक्टर नाहीतर उंटाची गाडी. मैलोन मैल गेलो तरी चित्रात बदल नाही, त्यामुळे मी टीजरमध्ये लिहीले होते तसे खरेच पुढे सरकतोय का जागच्या जागीच आहोत याबाबत संभ्रम व्हायला लागला होता. मनात त्या बदद्ल विचार करत होतो, की हॅल्युसिनेशन नक्की कधी होतात. वाळवटांत जाणाऱ्यांना मृगजळ भुलवते तसे आपले होईल का.

अर्थात हे सगळे मनाचे खेळ होते, आम्ही एकतर खऱ्याखुऱ्या वाळवंटापासून बरेच लांब होतो, जैसलमेर रुट घेतला असता तर मी म्हणतो तसले वाळवंट लागले असते. आम्ही त्यापासून कित्येक दूर होतो पण प्रदेशच इतका उजाड होता आणि प्रखर उन्ह.

रस्त्याच्या बाजूला अतिशय बारीक रेती होती आणि ती वाऱ्याबरोबर उडून नाका-डोळ्यात तोंडात जात होती त्यामुळे कितीही उकडले तरी नखशिखांत स्वताला लपेटून घेतले होते. ते सगळे ठीक आहे पण हा रस्ता संपणार कधी. धनसार, बरनसार, पुरबसार अशी गावेही मधून लागत होती. गावे म्हणजे पक्की घरे, एखादे दुमजली घर, दोन चार दुकाने, एखादा छोटेखानी चहाचा धाबा, त्यात बरण्यात फरसाण असले काय काय भरलेले. म्हणून मोठे गाव.

पल्लू हे त्यातल्या त्या एक मोठे गाव. बाकी वस्त्यांच्या मानाने शहरच म्हणता येईल असे. आता जरा माणसे दिसू लागली, रस्त्याच्या बाजूने धाबे, हॉटेल, फळविक्रेते, असे काहीबाही दिसू लागले आणि मग भूकेची जाणीव झाली.

तिथेही किस्साच झाला. असेच जेवायला काहीतरी स्वस्त आणि मस्त बघावे म्हणून डावी उजवीकडे बघत चाललो होतो. एका लायनीत दोन-तीन धाबे आणि पुढे एक दोन मजली हॉटेल होते. आम्हाला बघून त्या हॉटेलचा वेटर कम हरकाम्या धावत रस्त्यावर आला आणि आम्हाला बोलावू लागला. थांबून आम्ही विचार करू लागलो आणि वेदांगला मागे वळून म्हणालो की अरे हे हॉटेल जरा महागडे वाटंतय रे, धाब्यावर जाऊया का

नावामुळे चकू नका, याच नावाचे अतिशय प्रसिद्ध हॉटेल जयपूरमध्ये आहे. ते आणि हे म्हणजे अगदीच

च्यामारी त्या तीक्ष्ण कानाच्या वेटरने तेवढ्यात ते ऐकले आणि त्याला मतितार्थही समजला आणि जोरजोराने अरे हे महंगा हॉटेल नही है, महंगा नही है करत आग्रह करू लागला. आयला, याने तर सार्वजनिक रित्या अब्रुच काढायची शिल्लक ठेवली. मग काय झक मारत आत गेलो. तिथल्या मॅनेजरने तोंडभरून स्वागत केले, फॅन वगैरे लावला. तिथल्या बेसिनला मस्त थंडगार पाणी होते, मग काय बहुतांशजणांनी मीनी अंघोळच केली. हॉटेल तसे महाग नव्हते आणि स्वस्तही नव्हते. आणि विशेषता भाज्यांची क्वालीटी बघता आवर्जून जाण्यासारखे मुळीच नव्हते. पण त्या मॅनेजरलाच फार उत्साह. त्यानेच मग कुठे चालला, कसे चालला, जेवण आवडले का, रेट फार जास्त नाहीत ना असे करून आमच्याकडून वदवून घेतले.

काय करणार मीठ खाल्ले होते, त्यामुळे खाल्ल्या मीठाला जागलो आणि पुन्हा एकवार सायकलवर टांग मारून पुढे निघालो. तोवर आम्ही ८०-८५ किमी अंतर पार करून आलो होतो आणि ग्राफ पाहीला तर लक्षात येईल की आता एकसलग म्हणता येईल असा चढ होता. रस्त्यावर तो फारसा जाणवत नव्हता पण अगदी ग्रॅजुअली आम्ही उंचीवर चाललो होतो. आता ही उंची अजमेरपर्यंत वाढतच जाणार होती आणि अरवली पर्वतरांगा पार केल्यावर मग आम्ही उतरून भिलवाडा मार्गे गुजरातच्या सखल प्रदेशात प्रवेश करणार होतो. आता हे लिहीताना मस्त रोमांचक वाटतय, पण त्यावेळी पायाच्या दुखण्याने मी हैराण आणि त्यात ही पर्वतरांग पार करून जाणाच्या कल्पनेने हबकलो होतो.

चढावर सायकल रेटताना बाबुभाई

थकला भागला जीव Happy

आमचा स्ट्रेसबस्टर...वात उर्फ देवानंद उर्फ सुह्द

तरुणांचे आशास्थान.. आमचे युवा नेते... घाटपांडे काका

पण ते पुढचे पुढे, त्यावेळी मला तात्कालीक आराम हवा होता आणि मग मानसिक आणि शारीरीक पातळीवर जे यु्द्ध सुरु झाले होते त्यात मी खचत चाललो होतो. दुखऱ्या पायावर जोर येऊ नये म्हणून मी तो जास्त हलवतच नव्हतो, याचा परिणाम म्हणजे डावा पाय मांडीपासून आखडत होता. त्यामुळे सायकल थांबवून उतरलो की मला अक्षरश लंगडी घालत खाली बसकण मारावी लागे आणि मग हलक्या हाताने पाय चोळून त्यात जीव आणावा लागे. माझा हा त्रास बघून हेमने ते काम आपणहून स्वतकडे घेतले. थांबायचे झाले की तो पटदिशी सायकल लावायचा आणि मला पाय चोळून द्यायचा. आता दमत तोही होता, घामेघूम होतच होता आणि आम्हाला तरी आधीच्या राईडचा अनुभव होता, त्याची तर पहिलीच राईड होती. पण सख्ख्या भावाप्रमाणे त्याने माझी जी काय काळजी घेतली त्याला तोड नाही. आणि त्याला त्यासाठी धन्यवाद देण्यापेक्षा आयुष्यभर त्याच्या ऋणात राहणे मी पसंत करेन. हॅट्स अॉफ.

अर्थात घाटपांडे काकांचा उल्लेखही मस्ट आहे. ते असताना एकदाही असे झाले नाही की सगळे पुढे गेलेत आणि मी मागून एकटा सायकल ओढत येतोय. सर्वात शेवटच्या मेंबरला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोटी होती. ती त्यांनी इथेही कायम ठेवली होती. ते असल्यामुळे मनावरचे बरेच दडपण कमी व्हायचे.

हे सगळे असले तरी सायकलींग माझे मलाच करावे लागत होते आणि त्यातल्या त्या उतार आला की जरा बरे वाटायचे पण त्यातही काही नतद्रष्ट लोक आडवे यायचे. असाच एक छानसा उतार आला आणि मी सुखात पॅडल न मारता चाललो होतो. तोच समोर एक बाई मोठा भारा घेऊन कुठेही न पहाता रस्ता क्रॉस करत होती. हेम कसाबसा वळसा मारुन पुढे झाला आणि मी आता ब्रेक मारावे लागणार यामुळे वैतागून शुक शुक, जोरजोरात ओ काकू, ओ काकू करीत ओरडत गेलो. शेवटी त्या स्थितप्रज्ञ बाईचं लक्ष गेलं व ती थांबली. हेम पुढे थांबून हसत ही सगळी मजा पहात होतो. म्हणल, इथे पॅडल पॅडल चा हिशेब चाललाय, तुझं काय जातयं हसायला.

सूर्यास्त होतांना एके ठिकाणी सगळे एकत्र होऊन थांबलो. अजूनही विस किमी बाकी.. तेव्हा अतिशय हताश सुरात वेदांगचा डायलॉग..
"हॉटेलच्या गॅलरीतून सनसेट पहायला कधी मिळणार आहे आपल्याला ... !"

तेव्हा इतके थकलो होतो तरी हसू उमटले.
सरदारसर आलं तेव्हा एक मोठी चौफुली पार करुन पुढे गेलो तरी हॉटेल येईना तेव्हा प्रत्येकाचाच वैताग झाला. सुह्रुद मात्र मजेत जीपीएस लावून सायकल चालवत असे. हॉटेल जवळ यायला लागलं की सगळी सुत्रं आपसूक त्याच्याकडे जात.
आज हॉटेलात मी आणि बाबुभाई होतो तर हेम, वेदांग व सुह्रुद एका खोलीत. हॉटेल होते एकदम पॉश, ऐसपैस. दरम्यान हेम व वेदांगने आजपासून नवी टूम काढली की एकमेकांचं स्ट्रेचिंग करुन द्यायचं जे आम्ही शेवटपर्यंत केलं व ते फायदेशीरच ठरलं.

जेवण खालीच डायनिंग हॉलमधे केलं. ऑर्डर लवकर मिळाली नाही. आम्हांला दालबाटी हवी तर तिथे सगळं पंजाबी सगळीकडे मिळतं तसं..! जेवण ऐसपैस झालं नाही तरी रुम मात्र ऐसपैस. कढत पाण्याने आंघोळ. वेदांग पैलवानाकडून स्ट्रेचिंग.. बाबुभाईच्या वाक्यात सांगायचं तर ..और क्या चाहिये जिंदगी में..

======================================================================

नकाशा पुरेसा बोलका आहे, अजून काही लिहायची आवश्यकता नसावी...उजाड प्रदेश कसला दिसतोय. खालच्या भागात हिरवा रंग औषधालाही नाहीये
आजचे दिडशे पण तसे दमवणारे निघाले आणि मी तर खच्ची होत चाललो होतो. काय अवस्थेत हे अंतर पार केले आठवले तरी कसेतरी होते.

========================================
http://www.maayboli.com/node/60392 - (भाग १०): डीडवाना- एक दुर्दैवी दिवस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो या भागाला प्रचंड विलंब झालाय. सर्वांना त्यासाठी मनापासून सॉरी. पुढचे भाग आता लवकर टाकत राहीन.

एकतर पिकासा बंद झाल्यामुळे गुगल ड्राईव्हवरून फोटो कसे टाकावेत हे शोधण्यात बराच वेळ गेला. कसेतरी जमले पण आधीपेक्षा किचकट आहे. कंटाळा येतो ते सगळे करत बसायला.

फोटोची साईज पण काही वेडीवाकडी झालीये. पुढच्या वेळी सुधारून घेईन. आत्ता आहेत ते गोड मानून घ्या Happy

सलग चढ अगदीच दमवणारा दिसतोय. इतर वेळेस गाडीतून जाताना कळणारही नाही असा चढ पण सायकलवर असताना बरोबर अंगावर येईल शेवटी शेवटी.

आता लवकर भाग टाका Wink

बॅन असं काही वाटत तरी नाही. लेख लोड होताना फोटोच्या जागा रिकाम्या दिसतात, पण नंतर सगळे लिखाण एकत्रच दिसायला लागते. बघतो नंतर तपशिलात.

लेख वाचला प्रचित्रे दिसताहेत.
वाचून आणि फोटो बघून अंदाज येतोच आहे हे किती कंटाळवाणे असू शकते त्यातून तुझं दुखणं
भार्री आहात तुम्ही सगळे

काकू, ओ काकू करीत ओरडत गेलो.>>> Lol हे भारिच
मस्त जमलाय लेख - तुम्हा सर्वांच्या जिद्दिला __/|\__ Happy

"सख्ख्या भावाप्रमाणे त्याने माझी जी काय काळजी घेतली त्याला तोड नाही. आणि त्याला त्यासाठी धन्यवाद देण्यापेक्षा आयुष्यभर त्याच्या ऋणात राहणे मी पसंत करेन......."

सायकलबरोबरच तुम्हालोकांच एकमेकांशी जे नातं जुळल आहे तेहि तुमच्या यशामागचे एक छोटसं रहस्य आहे.

खूप दिवसांनी भाग आला. वासराचे वाचून कसेतरी झाले. पण क्या इलाज. मी असते तिथे तर नक्की मदत केली असती. ( असे मला वाटून गेले.) तुमचीच जास्त काळजी वाटली. गुढघे आणि पायदुखी चा अनुभव आहे.

फोटो काय दिसेना. मी आपले लेख वाचून घेतला.
पु भा प्र.

फोटो का दिसत नाहीयेत हे मलाही कळत नाहीये. आणि काहींना दिसतायत काहींना नाही.

कुणी इथे तांत्रिक सल्लागार मदत करू शकेल काय.

मी फोटो कसे टाकले सांगतो, म्हणजे त्यात काही चूक राहीली असल्यास कळवावे.

आधी गुगल ड्राईव्हला गेलो, तिथून फोटोवर राईट क्लिक करून इन्पेक्ट असा पर्याय निवडला. मग उजवीकडे बरीच तांत्रिक माहीती असलेली विंडो उघडली, त्यात एका भागावर हायलाईट झाले होते, तो भाग कॉपी करून इथे पेस्ट केला.

या नंतर फोटो साईज १०२४ः८०० अशी काहीतरी होती ती ८००ः६०० सहाशे केली.

त्यानंतर माझ्याकडे फोटो दिसत आहेत, काही लोकांकडे पण दिसत आहेत. आता ज्यांना दिसत नाहीयेत त्यांना का दिसत नाहीयेत हा प्रश्न आहे.

मला तरी सगळे फोटो दिसतायत, जरा स्क्यु झाल्यासारखे वाटतायत, पण हरकत नाही. क्रोममधे फोटो दिसतात, फायरफॉक्समधे दिसले नाहीत, तर आय. ई. मधे फक्त फुलीचा चौकोन दिसतोय. Uhoh
हा भाग पण वाचताना मजा आली.
बाकी ते वासरु आणी तुझा टाचेचा त्रास Sad

भाग मस्त जमुन आला आहे,
फोटो आणि वर्णन पण लई भारी आहे

"सख्ख्या भावाप्रमाणे त्याने माझी जी काय काळजी घेतली त्याला तोड नाही. आणि त्याला त्यासाठी धन्यवाद देण्यापेक्षा आयुष्यभर त्याच्या ऋणात राहणे मी पसंत करेन......."

सायकलबरोबरच तुम्हालोकांच एकमेकांशी जे नातं जुळल आहे तेहि तुमच्या यशामागचे एक छोटसं रहस्य आहे. >>>> अगदी बरोबर

अश्या मोहिमेत असे सुहृद असणं हेच मोहिमेच्या यशाचं गमक म्हणायला हवं

अवांतर : ड्राईव्ह वर तयार होणाऱ्या लिंक चं एक्स्टेंशन .webp आहे जे क्रोम ओळखतो पण फायरफॉक्स नाही म्हणून तिकडे ह्या लिंक्स दिसत नाहीये

मस्त लेख रे आशु.. नेहमीप्रमाणेच.. फोटो क्रोमवर दिसले.. तो वासराचा फोटो मात्र अस्वस्थ करणारा आहे..

मस्तच एकदम. मी या लेखमालेतल्या प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देत नसले तरी उत्सुकतेनी सगळे भाग वाचत असते. Happy

अरे वा! बरेच दिवसांनी भाग आला आशु भाऊ, बरे वाटले वाचून, दुखरी टाच सोबतीला घेऊन मरूस्थळातून सायकल हाकणे म्हणजे एक भयानक किचकट अन मेहनतीचे काम. राजस्थानात हे वाळवंटच खरे सौंदर्य आहे मात्र, संध्याकाळी आम्ही आमच्या सासुरवाडीला असलो की आमचा एक परिपाठ असतो मग आम्ही हनुमानगढला असो वा बिकानेर ला वा जोधपूरला. सायंकाळी गाडी काढून सरळ गावाबाहेर जातो, तिथे एखादी जागा पकडून बसायचे मग, मैलोनमैल फक्त पिवळसर वाळू असते, सूर्य अस्त होत असला की निखाऱ्या सारखी होते ती एकदम मस्त रंगाने.वाळूच्या टेकाडांस तिकडे धोरे म्हणतात.

वर्णन वाचुनच अंगावर काटा येतोय... ही अशी दुखणी अनुभवली आहेत त्यामुळे तेव्हा कशी परिस्थिती झाली असेल तुझी ते चांगलेच समजुन येतय
जानेवारीत पहाटे थंडी किती होती तिकडे? सकाळी गार, अन दुपारी आग ओकणारा सूर्य असे काहि होते का?
ऐकुन असे आहे की वाळवंटात रात्री फार गार असतात अन दिवस फारच गरम.
फोटोमुळे वाचायला मजा आली, सर्व दृष्ये वर्णन अन फोटोतुन नजरेसमोर येताहेत.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

संध्याकाळी आम्ही आमच्या सासुरवाडीला असलो की आमचा एक परिपाठ असतो>>सोन्याबापू मग मोठे असे लेख लिहा ना त्या अनुभवावर. आम्ही फक्त मोरनी बागां मां नाचे गाणे बघितले आहे किती पोएटिक व रोम्यांटिक वेळ व अनुभव असेल.

Pages