’संगीतक हे नवे’- मी टिळकांशी बोलते !

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 14 September, 2016 - 08:30

ऐन दुपारी, लेक लाडकी हट्ट धरी,
टिळकांचा फोटो हवाय एक तरी...

सोडिले फर्मान, अन गेली धूम ठोकून
मी मात्र बसले, गुगल समोर चष्मा लावून.

टिळकांचे कित्येक फोटो स्क्रीनवर दिसले
काही कळायच्या आत; ते प्रत्यक्ष अवतरले.

भारदस्त व्यक्तिमत्त्वाने मी थोडी गांगरले,
ते कमी कि काय म्हणून टिळक गर्जू लागले...

हसतच म्हणाले...

सापडले का चित्र?
मी मात्र गलितगात्र.

ओळख आहे का माझी?
चित्रासंगे द्यावी लागेल माहिती थोडी.

आगरकर आणि विष्णुशास्त्री यांसोबत केले न्यू इंग्लिश स्कुल सुरु,
केसरी अन मराठा ने जन जागृती झाली चालू..

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ अन ‘फर्ग्युसन कॉलेज’ ची झाली स्थापना,
राष्ट्रवादी जागृती घडवून आणण्याची होती भावना,

शिवजयंती अन गणेशोत्सव याचे बीज रोवले,
डोके ठिकाणावर नसलेल्या सरकार विरुद्ध जनमत एक केले.

जहाल मतवादी ठरलो तरी,
जन्मसिद्ध हक्क असलेल्या स्वराज्याची कास धरली.

स्वतःचे गोडवे गायची अजिबात इच्छा नाही,
पण अभ्यासात राहिलेल्या इतिहासाची थोडी तरी माहिती हवी...

ऐकत होते त्यांची गर्जना... ते थोडे थांबले...
मी मात्र संधी घेऊन माझे मत मांडले.

काळ बदलला, आम्ही बदललो , उत्सवाचे रूप पालटले ...
एकच समाधान,
शालेय शिक्षणातून संस्कार पेरले गेले..

तेजस्वी सूर्य हा कधी ढळत नसतो...
आज टेक्नोलॉजीतून समोरच अवतरतो...

समाधानाचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर खुलले..
जोरात मुलीने पाठीमागून हटकले,

भान येताच ते न दिसले...
"फोटो दे लवकर " हेच कानी पडले...

आई सापडला का फोटो, त्यांनीच सुरु केले ना ग गणपती डेकोरेशन...
सापडले ग टिळक मला पण ............... वेडे, त्यांनी तर सुरु केले गणपती सेलिब्रेशन...

............. मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!! आवडले!!!
त्यांनीच सुरु केले ना ग गणपती डेकोरेशन... >>>>>हे विशेष आवडले. लहान मुलांच्या मनातील विचार नेमकेपणाने उचललाय.