स्फुट ३० - महालात असते ती

Submitted by बेफ़िकीर on 13 September, 2016 - 02:21

महालात असते ती,
महालाला शोभेलशीच दिसते,
आब राखून,
पावित्र्याचा गंध उधळत,
निरंकुश सत्ता मिरवते भोवतालावर

महागड्या, चोखंदळपणे योजलेल्या
सौंदर्य द्विगुणित करणार्‍या
असंख्य शोभेच्या वस्तूंच्या गराड्यात
ती एकटीच दिसते चैतन्यमय
ओतत राहते जिवंतपणा वातावरणात

टाचणी पडली तरी कळेल
अश्या शांततेमध्ये
तिच्या वावरामुळे येतो
एक विलक्षण झंकार

ऐश्वर्य आणि साधेपणाच्या सीमारेषेवर
स्वतःचे व्यक्तिमत्व स्थिर करून
ती संवादत राहते जगाशी, अदृश्याशी आणि स्वतःशी

रोजंदारीच्या चिंतांचा केर जमत नाही असे नाही तिच्या मनावर

पण तो दिसत नाही कोणाला

तिचा नाद, आवाज असतो
एखाद्या गूढ वाद्याच्या स्वरासारखा

ती घराभोवतालच्या बागेतील पानांवर
दवासारखी पडत राहते स्वेच्छेने

संसाराच्या अश्या वळणावर
जेथे काही सिद्ध करायचे राहिलेले नसते
पुढचे सगळे नियोजित असते
सूत्रे द्यायची असतात नव्या, ताज्या दमाच्या पिढीकडे
त्या वळणावर
ती बसते जराशी अबोल होऊन

नीट बघितले तर
मला दिसतात
तिच्या पाणीदार डोळ्यातील
अनाकलनीय, असमर्थनीय उदास भाव

पण मी ते छेडत नाही

कारण

तिला तसेच राहू देण्यात
आणि तसेच पाहत राहण्यात
आपल्यालाही मिळत राहतो
एक मूक दिलासा

===============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users