भोवतालाचे तरी होवू

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 September, 2016 - 15:37

लागलेली लॉटरी होवू
वंचितांची भाकरी होवू

बेत फ़सतो हस्त होण्याचा ?
श्रावणामधल्या सरी होवू

योग नव्हता एकमेकांचा ?
भोवतालाचे तरी होवू

एव्हरेस्टाचे शिखर राहो
सांधते जी ती दरी होवू

उंबऱ्याचे भाग्य नव्हते तर !
अंगणाची ओसरी होवू

शक्य नाही वास्तवामध्ये
स्वप्न ठरणारी परी होवू

मोरपिस ना भरजरी शेला...
श्रीहरीची बासरी होवू

भरवसा नाही विठोबाचा
भाविकांची पंढरी होवू

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users