श्वासात कोंडलेला नि:श्वास उलगडावा ...

Submitted by बाळ पाटील on 30 August, 2016 - 04:23

हा जीव वेदनेवर ऐशापरी जडावा
ह्रदयातला निखारा बर्फामध्ये दडावा

कवटाळुनी मला तू घ्यावे उरी असे की
श्वासात कोंडलेला नि:श्वास उलगडावा

छिद्रातुनी सुईच्या पाहीन विश्व जेव्हा
माझ्यातला मला मी हलकेच सापडावा

आहे तुझ्या रूपाची महती अशी जगी की
कोणी विरक्त योगी मौनात बडबडावा

या विध्द पाखरांच्या पंखास सावरावे
अपराध तेवढासा जन्मात या घडावा

जेथे तनामनाने मी टेकवीन माथा
तेथे तुझ्याच माते होतील गे खडावा

ही आस या जीवाला लागो अशी तुझी की
पाण्यामधील मासा पाण्यात तडफडावा
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users