स्फुट २८ - चिंगारी कोई भडके

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2016 - 10:22

तो हनुमान
बांधला नरसप्पाने
नरसप्पा मेला
हनुमानापुढे रांग
दक्षिणा, प्रसाद, नारळ
साजिदमियाँने कंट्रोल घेतला
साजिदमियाँ घरचा बरा
मंदिराचे उत्पन्न दिले माछरेकरला
माछरेकर मग मंदिर साफ करू लागला
माछरेकर आजारी पडला
त्याला विल्फ्रेडने बरे केले
माछरेकरने विल्फ्रेडला तीन नारळ दिले
हनुमान गजबजलेलाच

मग एक भाषण झाले
"ह्यांनी शोषले आपल्याला"
मग अनेक भाषणे झाली
संदेश तोच
फक्त बाजू बदललेल्या
कोणी नरसप्पाचा आणि भक्तांचा
कोणी साजिदमियाँचा
कोणी माछरेकरचा
कोणी विल्फ्रेडचा

मग एक दंगा झाला
घोषणा
मोर्चे
दगडफेक
नुकसान
मारामार्‍या
अश्रूधूर
हत्या
बातम्या
जाळपोळ

बघितले तर
नरसप्पाच्या घरात
विल्फ्रेडचा मुलगा लपलेला
साजिदमियाँ
माछरेकरच्या झोपड्यात
माछरेकरला बेड्या पडलेल्या
विल्फ्रेड
साजिदमियाँला भात खायला देतोय
हळूच

भाषणे देणारे चौघे
गावाबाहेर 'बसलेले'

गावाकडे झपाटल्यासारखे बघत
विस्फारलेले डोळे
अंगार बरसणारा
आपण पसरवलेली आग
खोलवर गेलीच नाही
ह्यामुळे झालेली जळफळ

"हरामखोर साले"
"सगळे एक आहेत"
"सब एक है"
"ऑल आर वन अ‍ॅन्ड ईक्वल"

हे गाव कसे भडकेल?
कधी भडकेल?

एक तरी चांगली
परिणामकारक
विनाशक
ठिणगी पडायला हवी

"चिंगारी कोई भडके"

एका शिखाने लाथा घालून उठवले सगळ्यांना!

माछरेकरला कोणीतरी सोडवा तेवढे!
बाकी काही नाही!

=================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users