मोहोन्जो- दारो: एक हुकलेली संधी (स्पॉयलर अलर्ट: हाय!!!)

Submitted by ए ए वाघमारे on 23 August, 2016 - 00:50

Mohonjo Daro_web.jpg(स्पॉयलर अलर्ट लेवल: हाय !!!)

आशुतोश गोवारीकर हा एक प्रामाणिक सिनेमाकार आहे. तो जीव तोडून मेहनत करत सिनेमे काढतो. पण त्याचं दुर्दैव म्हणा किंवा प्रयत्नांची- अभ्यासाची कमतरता म्हणा, कुठेतरी कमी पडतो. त्याचा नवा 'मोहोन्जो-दारो'ही या लौकिकाला अपवाद नाही. लगान, जोधा अकबर यासारखं प्रत्येकवेळी मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढायाची हौस कितीही असली तरी चित्राच्या विषयात आणि ते चितारणार्‍या कुंचल्यात तेव्हढा दम हवा नाहीतर 'गवत खाणारी गाय' या चित्रासारखी त्याची गत होते आणि पाहाणार्‍याला गवतही दिसत नाही अन् गायही. मोहोन्जो-दारोचीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे.

मी वर हाय लेवल स्पॉयलर अलर्ट दिला आहे, तो केवळ 'शास्त्र' म्हणून. खरं म्हणजे त्याची काही गरज नव्हती इतका हा चित्रपट 'फ्रेम टू फ्रेम' प्रेडिक्टेबल आहे. १९७० च्या दशकातील कुठल्याही मसाला सूडपटाची मोहोन्जो-दारो शहराच्या पार्श्वभूमीवरची कहाणी एवढंच या चित्रपटाच्या कहाणीबद्दल सांगितलं तरी ते पुरेसं आहे. लेखाच्या ओघात इतर तपशील येतीलच. असो.

काही जुन्या सिनेमांच्या सेंसॉर सर्टिफिकेटवर चित्रपटाची भाषा 'हिंदुस्थानी' (बहुधा तीच ती महात्मा गांधींची!) अशी लिहिलेली आढळते. ही 'हिंदुस्थानी' भाषा कोणती हे मला अजून समजलेलं नाही पण मोहोन्जो-दारो पाहिल्यावर मात्र त्यातील पात्रांची भाषा हीच ती हिंदुस्थानी भाषा असावी असं वाटतं. संस्कृतप्रचुर हिंदी वापरायची की हिंदीयुक्त ऊर्दू वापरायची की 'तुरंत'च्या ऐवजी 'तुरितो' , 'सोना'च्या ऐवजी 'सोन' वगैरे वेगळीच थिअरी वापरायची या गोंधळात संवादलेखिका पडली आहे. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे हृतिक रोशनकडून स्पष्ट शब्दोच्चार करुन घेण्यात आले आहेत त्यामुळे त्याचे संवाद समजतात. ही रोशनच्या अभिनयातील सुधारणा अभिनंदनिय आहे. तसेच ४५०० वर्षांपूर्वींची प्राचीन नायिका चानी (पूजा हेगडे) एकविसाव्या शतकातील मॉडेल रॅम्प वर चालतात तशी सिनेमाभर वावरते आणि ओठाला ओठ न लागू देता बोलताना दिसते. एकविसाव्या शतकातील सिनेमाप्रमाणे हृतिक रोशन इथेही खांदे उडवत त्याच त्या स्टेप्स घेत नाचताना दिसतो. म्हणजे या गोष्टी किती प्राचीन आहेत हेही आपल्याला कळते.

जावेद अख्तर आणि ए.आर. रहमानची अनुल्लेखनीय व विस्मरणीय गाणी म्हणजे एक निराशाजनक सरप्राईज आहे. विशेषत: हरप्पाकालीन संगीताबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नसताना व सध्याच्या सिनेसंगीतात सूफी आणि पार्टीगीतांनी (पियानोवाली रडकी गाणी नव्हे तर 'चार बज गये लेकिन पार्टी अभी बाकी है' वाली बरं का!) वैताग आणलेला असताना गीत-संगीताबाबत अनेक प्रयोग करण्याची आणि नावीन्य आणण्याची एक उत्तम संधी वाया घालवण्यात आली आहे. 'मोहोन्जो...मोहोन्जो..दारो…' अशा सपक गाण्यांची तर नक्कीच अपेक्षा नव्हती.

चित्रपटाच्या एकूण टेकींग व ट्रीटमेंटवर ट्रॉय, ग्लॅडिएटर सारख्या रोमपटांचा तर काही ठिकाणी 'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रभाव स्पष्ट जाणवतो. कथानकावर तर मनमोहन देसाई व सलीम-जावेद इफेक्ट आहेच (हा आरोप नसून निरीक्षण आहे). चित्रपटाची विविध कारणांमुळे रखडलेली निर्मिती व त्यामुळे होणारे परिणामही सहज जाणवतात. उदा. स्पेशल इफेक्ट्स. विशेषत: क्लायमॅक्सच्या महत्वाच्या दृष्यांमधले इफेक्टस वेळ मारुन नेल्यासारखे, उरकल्यासारखे वाटतात. (कदाचित मी सिनेमा जिथे पाहिला त्या कार्बनचोर सिनेमागृहाचाही हा दोष असू शकतो. चूभूदेघे.) गाण्यांमधे नाचणारे उताडे, ग्लॅडिएटर-स्टाईल साहसदृष्यांमध्ये खचाखच भरलेले प्रेक्षागार, बाजाराची दृष्ये इत्यादी ठिकाणी सढळ हस्ते वापरलेली आणि दाखवलेली गर्दी ऐन क्लायमॅक्सला रोडावते व परिणाम उणावणारी ठरते. एकंदरीतच दिग्दर्शकाने मायक्रो पातळीवरचं डिटेलिंग प्रयत्नपूर्वक व पुरेसं केलं असलं तरी सर्वंकष पातळीवर जी एक भव्यता, एक स्केल आवश्यक होती, तिची उणीव भासते. त्यामुळे पडद्यावरची गोष्ट ही एका शहराची न वाटता पात्रांच्या वैयक्तिक वैमनस्याची एक साधारण गोष्ट वाटते. सिनेमा रखडल्यामुळे असेल की फायनल प्रॉडक्ट मनासारखे न बनल्यामुळे असेल, सिनेमाच्या जाहिरातीकडेही कुणी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. नाहीतर इतका 'महत्वाकांक्षी' वगैरे चित्रपट असताना त्याचा माध्यमातील पेड 'हवा' ऐकू आली नाही. एकंदरीतच हा चित्रापट सिनेमाकाराने जीवावर आल्यासारखा, आता सुरू केलाय तर संपवणे भाग आहे, कर्ज घेतलेय तर फेडणे भाग आहे अशा नाईलाजाने बनवल्यासारखा वाटतो.

काही गोष्टींचा तर कथानकाशी काय संबंध आहे हे मला शेवटपर्यंत कळलंच नाही. कदाचित हा माझ्या तोकड्या आकलनशक्तीचा वा मधूनच गेटकीपरच्या चोरून घेतलेल्या डुलकीचा दोष असावा. उदा. प्रधान महम (कबीर बेदी) हा स्वत: नगरप्रमुख आहे. त्याला हाकलून लावणार्‍या हरप्पा शहराचा सूड म्हणून मोहोन्जो-दारो हे शहर त्याला हरप्पापेक्षाही समृद्ध करायचे आहे, इथवर ठीक आहे. पण तो स्वत:च प्रमुख असतानासुद्धा सुमेरीयन व्यापार्‍यांकडून सोन्याच्या बदल्यात शस्त्रांची तस्करी का करतो हे काही कळलं नाही. बाकी कबीर बेदीमुळे चित्रपट थोडा सुसह्य झाला आहे, हे मात्र खरं. तसेच शहराच्या शेजारीच मोठी नदी, धरण, जंगलं असताना हरप्पासारख्या कृषी संस्कृतीचे महत्वाचे शहर असणार्‍या संपूर्ण मोहोन्जो-दारो शहरात एकही झाड नसावं याचंही मला आश्चर्य वाटलं. अशा बर्‍याच गोष्टी आहेत. असो.

एक अत्यंत वेगळा विषय डेवलप करत नेण्याची शक्यता, गोष्ट सांगायला उपलब्ध अनोखी पार्श्वभूमी, ऐतिहासिक पोषाखपट बनवण्याचा पूर्वानुभव, ए.आर रहमान-जावेद अख्तरसारखे दिग्गज साथीदार, हृतिक रोशनसारखा 'सामान्य+' कुवतीचा का होईना परंतु एक मेहनती मुख्य अभिनेता इ.इ सगळ्या अनुकूल गोष्टी असताना मोहोंजो-दारो 'अप टू द मार्क' अनुभव का देत नाही, हा प्रश्न खरं म्हणजे दिग्दर्शकाला पडायला हवा पण तो माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला पडतो. याचं उत्तर दिग्दर्शकाकातीररो- यच्या मनात असलेल्या गोंधळात व निर्मिती रखडण्यात असावं.

माझ्या अंदाजाप्रमाणे असं झालं असावं- आपल्याला मोहोन्जो-दारो/हरप्पा संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर सिनेमा काढायचा हे आधी निर्माता-दिग्दर्शकाने नक्की केलं. मग त्यात 'ष्टोरी' भरली असावी ती साधारणत: अशी:- मोहोन्जो-दारोचा अचानक झालेला र्‍हास ही मुख्य 'इव्हेंट' दाखवायची हे ठरलं. मग याचं कारण म्हणजे पूर (पुरातत्व संशोधनात असलेल्या एका मतप्रवाहानुसार) हे ठरलं. मग हा पूर धरण बांधल्यामुळे आला (किंवा नियोजशून्य धरणांमुळे पूर येतो) असं दाखवून चार-साडेचार हजार वर्षांपूर्वींच्या कथानकाचा संबंध एकदम आजच्या काळातील अनिर्बंध विकास व त्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास इत्यादींशी जोडायचा.(तसं हा सगळा भाग उत्तरार्धात येतो, जो अधिक रंजक आहे. कारण त्यावर जास्त काम झालं असावं.)

सोबतच मोहोन्जो-दारोत सापडलेले खालचे शहर- वरचे शहर हे वर्गभेदाचे प्रतीक आहेत असं सुचवायचं. एक दोन प्रसंगातून त्याकाळीही व्यापारी लोक शेतकर्‍यांचं शोषण कसं करत हे दाखवायचं. नायकाच्या तोंडी दोन-चार समाजवादी वाक्ये पेरायची. एकूण फोकस (व खर्च) मोहोन्जो-दारो 'जसं होतं तसं' उभं करण्यावर होत असल्यामुळे कथानकाकडे 'थोडं' दुर्लक्ष करत सोपं कथानक म्हणजे हिंदी सिनेमाचा ठरलेला फॉर्म्यूला अर्थात गरीब नायक- उच्चभ्रू नायिका, क्रूर खलनायक, नायकाचा विनोदी मित्र, करवलीसारखी मिरवणारी नायिकेची एक मैत्रिण, मुख्य नायक-नायिकांसोबतच त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फुलत जाणारं राजेंद्र नाथ / मेहमूद छाप प्रेम इ. दिग्दर्शकाने निवडलं असावं. तसं असायला काही हरकत नाही, ते त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु इतक्या अनेक गोष्टी एकाच पिशवीत कोंबणं म्हणजे टू मच होतं.

मोहोन्जो-दारो दाखवताना त्यात एक 'ऑथेंटिसिटी' आणणं गरजेचं होतं. ती तशी आणण्याचा सिनेमाकाराने प्रामाणिक प्रयत्नही केलेला आहे. त्याबद्दल त्याला दाद द्यायलाच हवी. त्यामुळे हा सिनेमा फीचर फिल्म आहे की डॉक्युड्रामा आहे अशीही शंका मला सुरुवातीला आली. मोहोन्जो-दारोला वास्तवात सापडलेल्या व त्याची ओळख बनलेल्या प्रसिद्ध वस्तू व वास्तू उदा. पशुपति प्रतिमा, डांसिंग गर्लची मूर्ती, नाणेसदृश विटा, खापरं, ग्रेट बाथ, दुमजली घरं, रस्ते, बाजारपेठा इ. बर्‍याच तपशीलात दाखवल्या आहेत. पण 'ब्योमकेश बक्शी'विषयीच्या लेखात मी म्हणालो तेच पुन्हा म्हणतो, या सगळ्या गोष्टींची माहिती असण्याची अपेक्षा सामान्य प्रेक्षकाकडून करणे हे अति होतं आणि सिनेमा त्याच्या डोक्यावरुन जाऊ लागतो. तो तसा जावू नये म्हणून लेखक-दिग्दर्शक उरलेलं पूरक कथानक सोपं करण्याच्या मागे लागतो आणि सूचक की सोपं या गोंधळात पडतो.

सूचक की सोपं हा समतोल साधणं फार कठीण आहे. उदा. वास्तवातील मोहोन्जो-दारोत विकसित अशी सांडपाण्याची यंत्रणा होती असं आपण शाळेत कधीतरी वाचलं असतं. आता ही गोष्ट सिनेमात दाखवायची कशी? तर त्यासाठी दिग्दर्शकाने एक शक्कल लढवली आहे. एका मारामारीच्या सीनमध्ये मार खाणारं एक पात्र एका नालीत जाऊन धडपडतं. तिथे काही सेकंदांकरताच आपल्याला घराच्या मोरीतून नालीत जाणारं सांडपाणी आणि वाहणारी नाली दिसते. अशा वेळेला, 'अच्छा! तर त्याकाळी मोहोन्जो-दारोत नाल्यासुद्धा होत्या तर!' असं आपण आपलंच समजून घ्यायचं असतं. (इथे तुम्ही एक अभ्यासू प्रेक्षक आहात हे सिनेमाकार गृहीत धरतो.) हे झालं सूचक तर सामान्य माणसांची, शेतकर्‍यांची त्याकाळीही कशी पिळवणूक होत होती हे दाखवायला दिग्दर्शकाने अनेक संवाद आणि एका शेतकरी नेत्यासकट दोन-चार कार्यकर्त्यांचे जीव नाहक खर्ची घातले आहेत; त्याकाळी वस्तूविनिमयाने व्यवहार होत अशा शाळकरी गोष्टी सांगण्यासाठीही काही लांबलचक प्रसंग टाकले आहेत. हे झालं सोपं.(इथे मात्र तुम्ही सामान्य प्रेक्षक आहे अशी सिनेमाकार समजूत करुन घेतो.) अशा अनेक अनावश्यक फ्लिपफ्लॉप्सनी पटकथा विनाकारणच क्लिष्ट होत जाते.

कुठलीही कलाकृती कलाकाराची एक रचना असते, कन्स्ट्रक्ट वा डिझाईन असते. मोहोंजो-दारोही याला अपवाद नाही. ही सुद्धा इतर कलाकृतींप्रमाणे एक मॅन्युफॅक्चर्ड, कृत्रिम पटकथा आहे. पण ही कृत्रिमता आपल्या व आपल्या सहकार्‍यांच्या प्रतिभेच्या अविष्करणातून कशी झाकता येईल, आवश्यक तेथे दुवे कसे सांधता येतील आणि या सगळ्या प्रक्रियेचा एकत्रित परिणाम म्हणून एक एकसंध, कन्विसिंग आणि तरीही रंजक अनुभव प्रेक्षकाला कसा देता येईल यातच लोकप्रिय सिनेमाचं यश असतं. या महत्वाच्या गोष्टीमध्येच हा चित्रपट फसला आहे. तरीही एकवेळ कथानक सोडलं तर इतर बाबींसाठीतरी 'मोहोन्जो-दारो' एकदा पाहण्यालायक निश्चितच आहे.

अखेरीस अनोखी पार्श्वभूमी, त्यासाठी (दावा) करण्यात आलेला रिसर्च वगैरे गोष्टींवर कथानकाचे जुनाटपण आणि जुनीच ट्रीटमेंट पाणी फेरते व आपल्याला कंटाळा येत जातो. आणि मग हा सिनेमा बघायला आपण इतक्या दुरुन टोले घेत का आलो, असा वैचारिक गोंधळ सिनेमागृहाच्या बाहेर पडताना माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनात सुरु होतो आणि यापुढे गड्या आपला 'वर्ल्ड टीव्ही प्रिमीयर'च बरा या विचारावर थांबून तो संपतो.

बाकी हिंदी-मराठी वृत्तवाहिन्यांकडे प्राइमटाईम मध्ये अनेकदा (काही जणांकडे तर दिवसातून तीन वेळा) दाखवण्यासारख्या काही बातम्या नसताना 'प्राचीन मिस्र के रहस्य', 'माया संस्कृती का सच', 'हिममानव का खौफ' यासारख्या छद्म माहितीपटांमध्ये फिलर म्हणून इकडचे तिकडचे इंटरनेटवरचे, सिनेमातले विडीओ दाखवतात तशा 'कहानी मोहोन्जो-दारो की' या कार्यक्रमात या सिनेमातील क्लिपिंग्सचा उत्तम उपयोग आपले 'क्रियेटीव्ह' पत्रकार-संपादक खात्रीने करतील हे मात्र नक्की.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीये लेख.. Happy
>>तसेच ४५०० वर्षांपूर्वींची प्राचीन नायिका चानी (पूजा हेगडे) एकविसाव्या शतकातील मॉडेल रॅम्प वर चालतात तशी सिनेमाभर वावरते आणि ओठाला ओठ न लागू देता बोलताना दिसते<< "निरोष्ठ" म्हणतात आपले पु.ल. अश्या बोलण्याला...बेनसन अँड जान्सन कंपनीतल्या केशर मडगांवकर सारखे Lol

चित्रपटात शेवटीला गावातले सगळे लोक पुरा पासुन वाचलेले दाखवलेले आहेत अपवाद फक्त कबिर बेदी आणि एक वेडा माणुस. एक ही कुटुंब वाहुन गेल्याचे दाखवले नाही, काही वस्तु वाहुन गेल्याचे दाखवले आहे, ते ही उत्खननात जे वस्तु सापडले त्या सदृश काही वस्तु दाखवले आहे, ते ही काही तरी ट्रिक सीन वापरुन.

सहजच

गुगल वर mohenjo dado असं सर्च केलं तर
Did you mean: mohenjo daro असं येतं

आणखी एकदा परत mohenjo dado असं सर्च केलं तर
Showing results for mohenjo daro
Search instead for mohenjo dado