एलिजाबेथ टेलर: आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-वेलवेट ब्राऊन...

Submitted by रवींद्र दत्तात्... on 22 August, 2016 - 11:29

आपल्या भारतीय समाजात लहानपणापासून मुलांच्या आवडी-निवडीकडे बारीक लक्ष्य दिलं जातं. त्यांचे सारे हट्‌ट पुरविले जातात, कौतुक केलं जातं. पण मुलींबद्दल असा दृष्टिकोण सहसा वापरला जात नाही. मुलीला प्रोत्साहन देऊन, तिला तिच्या मनाप्रमाणे वागू देणारी मंडळी फारच कमी, अगदी बोटांवर मोजण्या इतकी...(आता स्थिति बदलतेय) विशेष करुन चालीस-पन्नासच्या दशकांत तर भारतात हा विचार शक्यच नव्हता.

एलिझाबेथ टेलरच्या कारकीर्दीतील सुरवातीच्या चित्रपटांपैकी 1944 सालचा एक चित्रपट होता-‘नेशनल वेलवेट’ यात ती बालनटी होती. या चित्रपटांत आपल्या मुलीला प्रोत्साहन देणारया आईची भूमिका ऐनी रिवेयर या नटी ने केली होती.

ससेक्सच्या समुद्री किनारयावरील सेवेल्स या गावांत विक्टर हरबर्ट ब्राऊन दंपती (डोनाल्ड क्रिस्प व ऐनी रिवेयर) कुटुंबा सोबत राहतात. त्यांची 12 वर्षांची मुलगी वेलवेट आपल्या दोघी बहिणीं सोबत (एडविना व मालवोलिया) शाळेतून परत येत असते. तिघीजणी दुसरया दिवसापासून समर वेकेशन सुरू होणार या खुशीत असतांत. त्यांना एक मुलगा मी टेलर (मिकी रुनी) भेटतो. वेलवेट त्याच्याशी बाेलत असतांना एक घोडा त्यांच्या शेजारून वेगाने निघतो...त्याचा मालक मिस्टर ऐड त्याला पकडायचा प्रयत्न करतोय..घोड्याला बघून मी प्रभावित होतो. तो वेलवेट सोबत या विषयावर बोलतो...घोड्यांबाबत त्याची माहिती ऐकून वेलवेट इंप्रेस होते व त्याला घरी घेऊन जाते. डिनरच्या वेळेस ती आईला मी च्या वडिलांबाबत आणि मिस्टर ऐड च्या घोड्या बद्दल सांगून म्हणते की तो घोडा मला आवडतो. तेव्हां मिसेस ब्राऊनला ते दिवस आठवतात जेव्हां त्या वीस वर्षाच्या होत्या. मी चे वडील त्यांचे ट्रेनर होते. त्यांनी मिसेस ब्राऊन ना इंग्लिश चैनल सर करण्याची प्रेरणा दिली होती. इंग्लिश चैनल पोहून पार करणारया त्या पहिल्या तैराक (जलतरणपटू) होत्या. आता त्या मी ला आपल्या घरीच थांवबून घेतात. तो तबेल्यात राहतो. सकाळी मिस्टर ब्राऊन आपल्या दुकानात नोकर ठेवून घेतात. त्या दिवसा पासून तो वेलवेट सोबत गावात सामानाची डिलीवरी द्यायला जातो. एके दिवशी मिस्टर ऐड चा घोडा एका बगीच्याची भिंत ओलांडून पळून जातो. खरं म्हणजे मिस्टर ऐड आपल्या या घोड्यामुळे (पाई) त्रस्त असतात. तो नेहमी घरातून पळून जातो म्हणून ते त्याचा लिलाव करतात. नाटकीय घटनाक्रमांत पाईला मिस्टर ब्राऊन विकत घेतात.

आता पाई सोबत वेलवेट गावभर फिरत राहते...पाई बद्दलचं तिचं प्रेम, समर्पण बघून मी भारावून जातो. आणि ‘ग्रैंड नेशनल’ रेस साठी पाई चा प्रशिक्षक होणं स्वीकारतो. या करितां तो वेलवेटला जॉकी बनवून पाई ला प्रशिक्षण देतो. या दरम्यान पाईच्या आजारपणांत अख्खं ब्राऊन कुटुंब त्याची सेवा करतं. वेलवेट आणि मी पाई सोबत एन्ट्री ला पोचतात. तिथे त्यांना एकहि जॉकी सापडत नाही. वेलवेट मी ला जॉकी बनायला सांगते. तर मी म्हणतो मेनचेस्टर ला एका रेस मधे घोड्यावरुन पडल्यामुळे एका जॉकीचा जीव गेला होता...तो प्रसंग मनांत ठाण मांडून बसलाय...मी जॉकी नाही बनणार...हे ऐकून वेलवेट स्वत: जॉकी बनायला तयार होते.

बारा वर्षांची अल्लड वेलवेट रेस करितां इतकी आतुर आहे की आपले सुंदर, मानेवर रुळणारे केस बॉयकट करावे लागतील, याचं दु:ख तिला जाणवत नाही...चित्रपटांतील हे दृश्य फारच ह्रदयस्पर्शी हाेतं. मिकी तिला सांगतो की, मुलीं सारखे केस ठेवून तुला रेसमधे सहभागी होता येणार नाही. (कारण त्या रेस मधे मुली भाग घेऊं शकत नाही) हे ऐकून ती लगेच कैंची काढून मिकीच्या हातांत देते आणि म्हणते माझे केस बॉयकट करुन टाक...

पुढे ‘ग्रैंड नेशनल रेस’ मधे ती पहिलं स्थान पटकावते व रेस जिंकते. पण तो किताब, त्या बहुमाना ने ती वंचित राहते, कारण ती एक मुलगी आहे. पण छे...त्याने काही बिघडतं कुठे...? कारण हे गुपित रेस संपल्यानंतर उघडतं व रेस जिंकण्याचा मान तर तिने पटकावलेला असतो. अर्थातच नंतर तिला दुसरा क्रमांक देऊन उपविजेता घोषित करण्यांत येतं व वेलवेट ब्राऊन सर्वांची मनं जिंकून परत येते. आता तिचं निक नेम वेलवेट ब्राऊन आहे...

आईचा सार्थ विश्वास...

‘ग्रैंड नेशनल रेस’ मधे भाग घेण्यांकरितां वेलवेटला शंभर डॉलर्स हवे. रेसबद्दलची तिची उत्कंठा, आतुरता, तिची मेहनत बघून वेलवेटची आई ऐनी रिवेयर तिला स्टोर रूम मधे नेते. तिथे असलेल्या मोठ्या ट्रंकमधून एक अल्बम आणि पिशवी काढते. तिथे माय-लेकींच्या संभाषणातून प्रेक्षकांना कळतं की मिसेस ब्राऊन, त्यांच्या उमेदीच्या वयात पट्‌टीच्या पोहणारया होत्या व त्यांनी बरीच बक्षिसं मिळविली होती. तेव्हां मिळालेली रक्कम त्यांनी सुरक्षित ठेवली होती. ती रक्कम आपल्या मुलीच्या, वेलवेटच्या स्वाधीन करतांना मिसेस ब्राऊन म्हणतात-

‘मुली...आपल्याला जी गोष्ट आवडते ती जरूर करावी...अायुष्यांत मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करावा. पण हे देखील लक्षात राहू दे की आपल्या कर्तव्याचा कधीच विसर पडूं नये...’

आणि ती पिशवी वेलवेटला देतात. वरील वाक्यांतील त्यांचा अभिप्राय चित्रपटांतील शेवटच्या दृश्यांत अचूकपणे दिसून येतो.

वेलवेट रेस जिंकून, अापल्या घोड्यासह परत येते. तिच्यावर सगळीकडून पुरस्कारांचा वर्षाव होतोय. सगळे तिचं कौतुक करतात. घरी तर पत्रे, टेलिग्राम यांचा नुसतां ढीग लागलेला असतो. हे सर्व बघून मिस्टर ब्राऊन, बायको समोर आपल्या मुलीचं भरभरुन कौतुक करतांना म्हणतात-

‘आता तर वेलवेटला खूप पैसा मिळेल, तिला हॉलीवुडहून चित्रपटांची नायिका होण्याची ऑफर येतेय, ती नायिका होणार...बक्क्ल पैशांत खेलणार...!’

यावर मिसेस ब्राऊन शांतपणे उत्तरतात-

‘मिस्टर ब्राऊन...असं काही होणार नाहीये...’

ते भडकतात-‘तुला आपल्या मुलीचं सुख बघवत नाही...तू तिच्या प्रगतीच्या वाटेत अडथळा आणीत आहेस...’

मिसेस ब्राऊन म्हणतात-

‘तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटत असेल तर वेल्वेटलाच विचारा...’

रागाच्या भरात मिस्टर ब्राऊन वेलवेटला बोलावतात. ती आल्यावर ते तिला सांगतात-

‘हे बघ वेलवेट...तुला चित्रपटाची नायिका होण्यासाठी हॉलीवूड हून ऑफर आलीय...ते तुला व तुझ्या घोड्याला घेऊन चित्रपट बनविण्याचा विचार करीत आहेत. आता तुला तुझ्या घोड्यासोबत हॉलीवूडला जावं लागेल...’

काही न समजून वेलवेट आईला विचारते-

‘ममा, पपा हे काय म्हणताहेत...मला कळलं नाही...’

मिसेस ब्राऊन म्हणतात-‘तुझा आता पुढे काय करायचा विचार आहे...ते तूच आपल्या पपांना सांग...’

वेलवेट मिस्टर ब्राऊन ना सांगते-

‘पपा, रेस तर संपली...मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे...मला माझा अभ्यास करायला हवा...माझ्या शाळेच्या सुट्या देखील संपल्या...घोड्या वरुन रपेट खूप झाली...आतां शाळेत जायची तयारी करायला हवी...’

आणि तीे निघून जाते...

खजील झालेले मिस्टर ब्राऊन काहीशा हताशपणे बायकोकडे बघत निस्तब्ध उभे राहतात...नंतर मुलीच्या नावाने आलेली पत्रे, टेलिग्राम गोळा करुन ‘फायर एस्केप’ मधे टाकताना म्हणतात-

‘थैंक्स मिसेस ब्राऊन, दोनच मिनिटांकरितां कां होईना...मी डगमगलो होताे...मुलीच्या यशामुळे येणारा पैसा बघून मी वेडा झालो होतो...पण तू मात्र मला सांभाळलंस...थैंक्स...’

आईने मुलीवर दाखविलेला विश्वास कसा सार्थ होता, हे दृश्य याचं बाेलकं उदाहरण होतं.

बारा-तेरा वर्षांच्या एलिझाबेथ टेलरचा वेलवेटच्या रूपातील वावर मनाला भारुन टाकणारा होता. नेशनल रेस करितां उतावीळ, उत्सुक वेलवेट तिनं पडद्यावर अप्रतिम साकार केली होती. आज एलिझाबेथ टेलर हे नाव उच्चारताच सर्वप्रथम आठवतात ते तिचे रुपेरी पडद्यामागील प्रेमप्रसंग, तिची लग्नं, तिचे घटस्फोट...

पण ‘होनहार बिरबान के होत चीकने पात...’ या म्हणीप्रमाणे ती एक अभिनय संपन्न, गुणी नटी होती...याची प्रचीति तिच्या कारकीर्दीच्या सुरवातीचे चित्रपट बघतांना येते...

ऐनी रिवेयर चा सहज, सुंदर अभिनय...

‘नेशनल वेलवेट’ मधे मिसेस ब्राऊनच्या रुपात ऐनीचा वावर सहज होता...मुलीला तिच्या मनाप्रमाणे वागू देणारी आई तिने अप्रतिम साकार केली होती. ट्रेनर मिकी रुनी सोबत तिला पाठवतांनाचा खंबीरपणा किंवा रेस जिंकून परत आल्यावर पहिल्या भेटीतच मुलीचे बॉयकट झालेले केस बघून तिचा हळवेपणा एकदम नजरेत भरणारा होता. या दृश्यात वेलवेट गाडीतून उतरते तर तिच्या डोक्यावर कैप असते...ती गाडीतून उतरल्यावर थेट येऊन आईला बिलगते...आई तिची पाठ थोपटतांना हळूच तिची कैप काढते...आणि ज्या आपुलकीनं तिच्या केसांवरून हात फिरवते...त्या वेळी कैमरा आईच्या चेहेरयावर फोकस असतो...त्या चेहेरयावर मुलीने नाम कमावले याचं समाधान आणि या साठी तिला आपले केस गमवावे लागले याचं दु:ख स्पष्टपणे जाणवतं...

याचाच प्रत्यय तिचा ‘दि सांग आॅफ बेरनाडेट’ बघतांना आला होता...तो पिक्चरच मुळी सकाळच्या सीन ने सुरू होतो...नवरयाजवळ काही काम नाही...म्हणून तो कामाच्या शोधात निघतो...बायको म्हणजेच ऐनी रिवेयर देखील आपल्या तिघी मुलींना लाकडं गोळा करायला जंगलात पाठवते...त्यांतल्या त्यात मोठी मुलगी सतत आजारी...पुढे तिच्यावर मदर मेरी ची मेहेर नजर होते...त्यामुळे तिच्या समोर जी संकटं येतांत, त्या दरम्यान तिची काळजी घेणारया आईच्या भूमिकेला ऐनी ने पुरेपूर न्याय दिला होता.

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस...

एेनी रिवेयरनी हॉलीवुड मधे आईची भूमिका समरसतेनं केली. 1944 सालच्या ‘नेशनल वेलवेट’ करितां ऐनीने सपोर्टिंग एक्ट्रेस चा ऑस्कर पटकावला होता. त्याच प्रमाणे 1942 सालच्या ‘दि सांग ऑफ बेरनाडेट’ अाणि 1946 सालच्या ‘जेंटलमेन्स एग्रीमेंट’ साठी तिला बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेसचं नामिनेशन मिळालं होतं. 1951 मधे तिने हॉलीवुड सोडून स्टेज कडे मोर्चा वळविला. पुढे 1960 साली लिलियन होल्मनच्या ‘टवॉयस इन दि एटिक’ साठी टोनी एवार्ड पटकावला.

ही साइट बघा-

https://youtu.be/oB6oI04sMc4
-----------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सिनेमात एलिझाबेथ टेलरचं किशोरावस्थेतलं रूप व अभिनय पाहिल्यावर ती भविष्यात जगभर गाजली याचं जराही आश्चर्य वाटत नाही. मिकी रुनी या गुणी अभिनेत्यानेही या सिनेमामुळे नांवलौकीक मिळवलाच. छान वाटलं वाचून.