स्नेहालय परिसस्पर्श -४

Submitted by विक्रम देशमुख on 21 August, 2016 - 10:47

मायबाप स्नेहालय - लखन रोहित चव्हाण

मी कोण आहे, कुठून आणि कशाला या जगात आलो, याचे उत्तर मला ठाऊक नाही. परंतु हे खरे की, माझ्या जीवनाला आकार आणि ओळख स्नेहालयाने दिली. म्हणूनच माझे नाव-गाव काहीही असले तरी माझे माय-बाप कोण, असे विचारले तर मी सांगतो ‘स्नेहालय’. माझे लहानपण मला आठवतच नाही. कारण मी जिथे जन्मलो आणि वाढलो ती शेवगावच्या बदनाम शिवनगर भागातील एक अंधारी खोली होती. आईचा चेहरा मला आठवत नाही. तिचा प्रेमळ स्पर्श आठवतो. ती फार प्रेमळ होती. केव्हा तरी मध्यरात्री ती यायची. एका अंधाऱ्या खोलीत कधी सतरंजी तर कधी वर्तमानपत्रावर झोपलेल्या मला कुशीत घट्ट धरून झोपायची. जंगल आणि प्राणी यांची एक गोष्ट तिला यायची. तीच गोष्ट मी हट्ट केल्यावर ती मला सांगायची. फक्त प्रत्येकवेळी गोष्टीतल्या प्राण्यांनी त्यांचे कपडे बदललेले असायचे. कोल्हा आणि वाघ यांचे संवाद आलटून-पालटून तेच असायचे. तू मोठा झाला की, आपण या घाणीतून झोपडपट्टीत जाऊ, मस्त राहू, तुला रोज दूध देईल, असे काहीतरी मला कुरवाळत म्हणायची. इतरही काही महिलांची मुले माझ्यासोबत असायची. आजूबाजूला असणाऱ्या डुक्करांबरोबर आम्ही खूप खेळायचो. डुक्कराला मी कुरवाळायला लागलो की, आई ओरडायची. मी ४-५ वर्षांचा असेल, तेव्हाची एक आठवण आहे. आमच्या भागात नेहमी येणारे गिरीश सर त्या दिवशी आईला आणि इतर महिलांना भेटले. आमच्या घरी जमिनीवर बसून बैठक घेतली. अहमदनगरमध्ये सुरु केलेल्या स्नेहालयची माहिती दिली. येथील मुला-मुलींना मोफत शिकण्याची सोया असल्याचे त्यांनी सांगितले. मग कोण आय आपली मुले संस्थेत ठेवू इच्छितात, असे त्यांनी विचारले. हात वर फक्त माझ्या आईने केला. ‘माझे लेकरू हुशार आहे. त्याला शिकवा.’ ती म्हणाली. मला गिरीश सरांनी उचलून माझा मुका घेतला. चॉकलेट दिले. विचारले, ‘तू आमच्याबरोबर संस्थेत चलतोस का? तुला मी शाळेत घालीन. आई तुला भेटायला येईल. मग मोठा झाल्यावर तू आणि तुझी आई आनंदाने राहू शकाल.’ त्यांनी मला मांडीवर बसवून काही नाकाला करून दाखवल्या. मी खुश झालो. आईनंतर विश्वास ठवण्यासारखे प्रथमच कोणी तरी मला भेटले होते. त्यांच्या स्पर्शातून मी विश्वास अनुभवत होतो. मी सहजपणे सरांच्या खांद्यावर जाऊन बसलो आणि त्यांच्याबरोबर पुढे निघालो. आईने एक शर्ट आणि बिस्किटाचा अर्धा पुडा कॅरीबॅगमध्ये टाकून दिला. जाताना वळून पाहीले तर माझी आई आनंदाने हात हलवित होती. जाण्यापूर्वी तिने माझे ५-६ मुके घेतले. शेवटचेच. मी जेव्हा पहिल्या दिवशी स्नेहालयात गेलो, तेव्हा अस्वस्थ झालो. नवी मुले, नवे शिक्षक. सर्वात महत्वाचे म्हणजे रात्री उजेडाची मला सवय नव्हती. स्नेहालयात रात्री उजेड असल्याने मला झोपच येत नव्हती. वेगळेच काही तरी वाटायचे. नंतर मात्र हळूहळू सवय झाली. आईची आठवण येऊन उठायचो. मग गिरीश सर कुशीत घेऊन म्हणायचे, येणार आहे ती. तू शाळेत हुशार मुलगा म्हणून ओळखला गेलास की, ती तुला बक्षीस घेऊन येणार आहे. गर-गर फ्रुटी तिला मिळणार आहे. अनेकदा फ्रुटी घेऊन आलेली आई माझ्या स्वप्नात यायची. पण तीच चेहरा दिसायचा नाहीच.

मला आठवते की, त्या वेळेस एक गोलाकार इमारत होती, त्याला आम्ही डोम म्हणत असू. त्या डोममध्ये आम्ही तीन विद्यार्थी राहत असू. त्यावेळेस आमच्यावर देखरेख ठेवण्याकरिता आमची काळजी घेण्याकरिता दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. पौलस वाघमारे आणि पावन सर हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत. आम्हाला रोज सकाळी ५ वा उठवून व्यायाम करून घेत असत. निंबळक या गावात आमची शाळा होती. तिथे रस्ता काढत जावे लागायचे. समस्या भरपूर होत्या. परंतु प्रत्येक समस्येवर मार्ग काढायचा सरळ सोपा मार्ग आमच्या सरांकडे होता. आम्हाला या बिकट परिस्थितीत खाण्यापिण्याचा कधीच त्रास झाला नाही. कारण आमची काळजी करणारे आमचे शिक्षक आमच्याबरोबर नेहमी रहात असत. हळूहळू दिवसामागे दिवस निघून गेले. एकेक प्रकारे प्रगती व विकास होत गेला. हा विकास मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचा होता. तो अधिक व्यापक होत गेला. स्नेहालयातील शिक्षकांची संख्या वाढली. विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि प्रगतीचा आलेख वेळोवेळी उंचावत गेला. आज मी जो काही आहे त्याचे संपूर्ण श्रेय गिरीश सर आणि स्नेहालयातील लोकांनाच जाते. माझी प्रेमाची भूक सरांच्या स्पर्शातून काही प्रमाणात भागायची. तेव्हा एका तपकिरी रंगाच्या लॅम्ब्रेटा गाडीवरून सर बऱ्याचदा रात्री अपरात्री हॉटेल आणि लग्नातली उरलेली पावभाजी, पुलाव असे पदार्थ घेऊन यायचे. सकाळी ते खराब होतील म्हणून रात्रीच खाण्याचा आग्रह करायचे. तेव्हा स्नेहालयात कोणी आचारी नव्हते. संस्थेचे कार्यकर्ते आळीपाळीने स्वयंपाक करायचे. त्यामुळे कधीही विचारले तरी आम्हा मुलांना भूक असायचीच. आम्ही मध्यरात्री पार्टी आणि गम्मत करायचो. पोटभर जेवल्यावर झोपही छान लागायची. पहिले दोन वर्ष डोममध्ये फॅन नव्हता. त्यामुळे खिडकीजवळ झोपण्यावरून भांडणे व्हायची. नंतर सरांच्या सांगण्यावरून आम्ही लहान मुलांना प्राधान्य देऊ लागलो. सर्व प्रथम आपल्यातील लहानांचा विचार करायचा, असे स्नेहालयाने मनावर ठसवले. स्नेहालयाचा सागर चवनापुरे सतत आजारी असायचा. त्यामुळे त्याची सर्वात जास्त काळजी सर घ्यायचे. सुरुवातीला त्याचा द्वेष वाटायचा. परंतु नंतर आम्ही सर्वजण तसेच वागू लागलो.

बीज अंकुरले

आजचे स्नेहालय मी जेव्हा पाहतो मला अभिमान वाटतो की याच स्नेहालयात आपण कधी काळी शिक्षण घेत होतो. याच ठिकाणी लहानाचे मोठे झालो. खूप काही नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आज स्नेहालयात अनेक सोयी-सुविधा आल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. शाळा, संगणक आणि ग्रंथसंग्रहालय, खेळांच्या सुविधा, क्रीडांगण, बागेतले खेळ, झोपायला बंकबेड, स्वच्छ लाईट, भरपूर पाणी, प्रशस्त इमारती, शाळेत जायला-यायला वाहने हे सर्व पाहिल्यावर समाधान वाटते. कारण आई-वडील-घर नसलेल्या मुलांसाठी असे काही दर्जेदार निर्माण होईल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. मी स्नेहालयात जातो तेव्हा मुलांना विचारतो की, तुम्ही भविष्यात कोण होणार? याचे उत्तर आता ठामपणे मिळते. आम्हाला काय व्हायचे, हे कधीच सांगता येत नसे. मी सरांसारखे व्हायचे असे सांगायचो. पण गिरीश सर नक्की काय करतात, असे विचारल्यास लॅम्ब्रेटा चालवितात, खाऊ आणतात, जवळ घेतात, आजारी मुलांवर जास्त माया करतात, असेच काही तरी आम्ही मुले सांगायचो. स्नेहालयातील मुलामुलींना एक जीवन ध्येय मिळाले, हे वेगळेपण जाणवते. मोठ्या इमारती, अनेक प्रकल्प, जगातील अनेक मोठ्या माणसांच्या बेहती, खूप नावलौकिक स्नेहालयाला मिळाला आहे. खूप पूर्वी मला आठवते की, स्नेहालयात राहतो, हे सांगताना मनातून लाज आणि कमीपणा वाटायचं. परंतु आम्ही स्नेहालयात होतो किंवा आहोत, असे सांगताना आम्हा आजी-माजी विद्यार्थ्यांचा उर अभिमानाने भरून येतो. स्नेहालयने आमच्या सारख्या मुला-मुलींना सामावून एक मोठं प्रतिष्ठा दिली आहे, हे मी अनुभवाने सांगू शकतो.

माझी इच्छा होती की मी माझे सर्व आयुष्य स्नेहालयात व्यतीत करावे. परंतु सरांना वाटायचे की, मी घरात आणि आणि कुटुंबात राहावे. काही काळ मी गिरिशसरांच्या घरात त्यांचा मुलगा म्हणूनच राहिलो. परंतु नंतर सरांची धावपळ खूपच वाढली. पुढे एम. आय. डी. सी. त आम्हाला राहावे लागले. मग एखादे चांगले कुटुंब माझ्यासाठी शोधण्याची खटपट सरांनी सुरु केली. एक जबाबदार कुटुंब सरांनी शोधले. कन्हैया सत्यनारायण लाल येथील एका कंपनीत काम करायचे. त्यांचा मुलगा दगावल्याने ते खूप दुखी होते. त्यांनी मला मुलाप्रमाणे सांभाळावे असा प्रस्ताव गिरीश सरांनी त्यांना दिला. मला या कुटुंबाने खूप प्रेम दिले. मला ४ बहिणी आहेत. त्या सर्वांची लग्न झाली आहेत. त्या देखील आनंदाने आपला संसार करीत आहेत. सविता प्रजापती, अनिता पंडित, कविता कुलकर्णी, सुनीता प्रजापती अशी त्यांची नवे आहेत. मी आय. टी. आय. चा कोर्स केला. त्यानंतर सरांनी सांगितल्यानुसार नोकरी करत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. ए. चे शिक्षण पूर्ण करत आहे. भविष्यात मी एम. एस. डब्लू. करून स्नेहालयच्या कामात यावे असे मला वाटू लागले आहे. माझा हा मनोदय ऐकून सरांनी मला मिठीच मारली. माझ्या लग्नाचा प्रस्ताव आल्यावर मी सरांशी बोललो. चर्चा करून त्यांनी स्थळाला होकार दिला. त्यानंतर प्रीती या मुलीशी माझे लग्न झाले. ती उच्च शिक्षित आहे. तिच्या नोकरीसाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. आयुष्य शून्यातून सुरु झाले होते. स्नेहालयच्या स्पर्शाने अंधाऱ्या खोल्यातून प्रकाशवाटा माझ्यासाठी उजळली. निदान ४-५ मुलांसाठी असा हात मी देईनच.

मो. ९०२८८१७३४५

Group content visibility: 
Public - accessible to all site users