वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे...

Submitted by सत्यजित... on 21 August, 2016 - 08:37

कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे...
वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे!

खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले...
धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे!

मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी...
नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे!

अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली...
खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे!

वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही...
वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users