नव्या पिढीतील संस्कारक्षम गीते.... भाग १

Submitted by विहम on 17 August, 2016 - 06:17

नवीन चित्रपटांमधील गाण्यांवर ज्येष्ठ नागरिकांकडून कायम एकांगी टीका होत असते. अश्लीलता, कर्कश्यपणा, तंग आणि छोटे कपडे, ना सूर, ना ताल, असे अनेक आरोप या गाण्यांवर करून जुनी पिढी स्वतःच्याच काळातील गाणी कशी भारी याचा गोबेल्स पद्धतीने प्रचार करत फिरत असते. मुळात ते फक्त पॅकेजिंग वर भुलून कंटेंटकडे दुर्लक्ष करत असतात हि खरी समस्या आहे. आमची पिढी जास्त संस्कारी आणि नम्र असल्याने आम्ही जेष्ठ नागरिकांशी कधीही प्रतिवाद करत नाही. पण हे असे किती दिवस चालणार? त्यांना त्यांच्या या गैरसमजुतीतून बाहेर काढणे हि गरज आहे. आमची नाही त्यांची !

आमच्या या मालिकेमध्ये आम्ही जुन्या पिढीतील लोकांना नवीन पिढीतील संस्कारी गाण्यांचा परिचय करून देणार आहोत.
गाण्याची ओळख करून देताना संदर्भासहित स्पष्टीकरण देणे आणि रसग्रहण करणे या दोन पद्धती वापरल्या आहेत. आम्हाला या अतिशय कंटाळवाण्या वाटल्या तरी ज्येष्ठ नागरिकांना त्याच आवडतात या एकमेव कारणाने त्या वापरल्या आहेत.

गाणे:- गलत बात है।
चित्रपट:- मैं तेरा हिरो
गीतकार:- कौसर मुनीर
गाण्यातून होणारे संस्कार:- स्त्री पुरुष समानाता, स्त्रीमुक्ती, प्रामाणिकपणा, संयम.

चित्रपटांचा, त्यातील गाण्यांचा समाजमनावर, विचारशक्तीवर पगडा असतो (असे म्हणतात). कोणीतरी एका थोर व्यक्तीने सांगितले आहे की ' तुम्ही मला देशातील तरुणांच्या ओठांवरील गाणी सांगा, मी तुम्हाला त्या देशाचे भविष्य सांगतो'. "गलत बात है।" हे गाणे निश्चितच असे आहे जे सांगू शकेल कि या देशातील तरुणांचे विचार किती पुरोगामी आहेत. या देशाचे भवितव्य उज्वल आहे. या गाण्यातून तरुण पिढीवर होणारे संस्कार खरेच उदबोधक आहेत.

ओ मेरी जान तेरा यूँ मुस्कुराना तो गलत बात है ।
अपने आशिक को संकट में लाना तो गलत बात है ।।

गाण्याच्या सुरुवातीलाच नायक स्वतः नायिकेला सांगतोय तुझ हे असं हसणं बरं नाही ( इथे असं म्हणजे 'तसं'...आता तसं म्हणजे कसं? हे पण कळत नसेल तर तुम्ही पुढे न वाचता पोगो/आस्था पहा.). असं हसू नकोस आणि आपल्या प्रियकराला संकटात आणू नकोस.
पिढ्यांपिढ्या शर्मीली लडकी आणि आक्रमक पुरुष असली चित्रं रंगवत आणि कुरवाळत बसणाऱ्या जुन्या गाण्यांमधून कायम डोकावणाऱ्या प्रतिगामी विचारसरणीला हि सणसणीत अशी चपराक आहे. पहिल्याच वाक्याला स्टीरिओटाईप मोडला आहे. स्त्रियांना भावना असू शकतात आणि त्यांना त्या व्यक्त पण करता येतात, यायला हव्यात. हा या गाण्यातून होणारा पहिला संस्कार ! पण मुलगी एक पाऊल पुढे आली म्हणून आपण लगेच या असल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याऐवजी सुसंस्कृत मुलगा मुलीला सांगतोय कि हे चुकीचे आहे. दुसरा संस्कार !!!!!

छू कर दिल को छू हो जाना आदत है तेरी बुरी ।
हाये छुप के दिखना दिख के छुपना आफत है देखो बड़ी ।।
धीरे धीरे चढ़े जो है इश्क वही।
जल्दी जल्दी में लेना है रिस्क नहीं।।

पहिल्या अंतऱ्यात प्रियकर उतावीळ झालेल्या प्रेयसीला संयमाचा पाठ देत आहे. त्याला भेटायला, त्याला पहायला अत्युत्सुक असलेल्या प्रेयसीला तो सांगतोय "प्रिये, प्रेमाची खरी गंमत नाते हळूहळू उलगडण्यात आहे. आततायीपणा करून आपल्याला रिस्क नाही घ्यायची." आता इथे रिस्क या सदरामध्ये प्रेम आणि आकर्षण हि सीमारेषा न समजणे ते टीनेज प्रेग्नन्सी पर्यंत सर्वकाही येऊ शकते. सगळे विस्तृतपणे विस्कटून लिहू शकत नाही. समजून घ्यावे. महत्वाचे काय तर संयम, तिसरा संस्कार !!!!!

छोटे कपडे पहन के यूँ नचना
तो गलत बात है।।
ओ छोटे कपडे पहन के यूँ नचना
तो गलत बात है।।
ओ खोटे नैनों से हमको यूँ तकना
तो गलत बात है।।

दुसऱ्या अंतऱ्यात प्रियकर प्रेयसीला म्हणतोय कि छोटे कपडे घालून असे नाचणे चुकीचे आहे. इथे त्याचा आक्षेप हा छोटे कपडे घालण्यावर नसून छोटे कपडे घालून 'तसं' नाचण्यावर आहे हे प्लिज नोट(च). आणि परत एकदा तसं म्हणजे कसं हे कळत नसेल तर पोगो/आस्था......
त्याच्या या आक्षेपावर प्रेयसीचे बाणेदार उत्तर समाजाच्या पुरुषी विचारसरणीला आव्हान देणारे आहे. अश्लीलता हि बघणाऱ्याच्या नजरेत असते (असे म्हणतात). तू (पुरुषांनी) अशा भुकेल्या(वासनयुक्त) नजरेने बघणे हे चुकीचे आहे. मुलींना हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य, हवे तसे नाचण्याचे स्वातंत्र्य आहे. पुरुषांचे मन (परस्त्री बाबत!) निर्मळ असावे, स्त्रियांनी अस्सेच वागावे तस्सेच वागावे हे प्रवचन चालू करू नये. स्त्रीमुक्ती, चौथा संस्कार!!!!!

थोड़ी थोड़ी सी तेरे संग मैं भी फिसलने लगी।
ओ थोड़ी थोड़ी तुझसे लिपट कर।
मैं भी सम्भलने लगी।।
थोड़ा खुद को ओ कुडियो संभालो ज़रा।
यूँ खुले आम हमको पटाना है बुरा।
तुम करो तो सही हम करे तो।
क्यूँ गलत बात है।।

या गीतातील तिसरा अंतरा म्हणजे संस्कारांचा कळस आहे.
प्रेयसी म्हणतीये तुझ्यासोबत मी सुध्दा बहकते आहे. माझं पाऊल घसरतंय. किती तो प्रामाणिकपणा ! उगाच मुलाने एक एक पाऊल पुढे जायचे प्रयत्न करणे आणि मुलीने मला हे सगळं आवडतच नाही असे दाखवत त्याला अडवत रहाणे असला दांभिकपणा नावाला सुध्दा नाही. उगाच का डीनायल मोड मध्ये जगायचं? वाटतंय आकर्षण तर वाटतंय ना. नो बिग डिल. प्रामाणिकपणा ! पाचवा संस्कार !!!!!
स्त्रीने हा बोल्डपणा प्रामाणिकपणे दाखवला पण आपला नायक तर विचारी आहेच. त्याने आधीच त्याचा फंडा क्लिअर केला आहे की जल्दी जल्दी मे लेना है रिस्क नहीं। प्रेयसी जरी त्याला बिलगली आहे आणि तिला पण हे (रिस्क प्रकरण) कळले आहे. त्याला बिलगून पण ती हळूहळू सावरते आहे. तुम्ही विसरु नये म्हणून तिसरा संस्कार इथे परत एकदा अधोरेखित केला आहे. संयम !!!!

प्रियकर प्रेयसीला ते कळावं आणि तिच्यासोबत सर्वच मुलींना कळावं या उदात्त उद्देशाने सांगतोय कि स्वतःला जरा सावरा. असं सरळसरळ आम्हाला पटवणे चुकीचे आहे ( कशासाठी पटवणे हा संदर्भ समजून घ्या नाही कळलं तर पोगो/आस्था......)
यावर प्रेयसीने दिलेले उत्तर परत एकदा समाजाच्या पुरुषी विचारसरणीला आव्हान देणारे आहे. तू (पुरुषांनी)केले तर बरोबर आणि आम्ही (स्त्रियांनी) केले तर का चुकीचे ? तिने का कायम त्याच्या मुडवर डिपेंड रहावे? त्याने अप्रोच करत बसायची वाट पहात रहावे? तिला म्हणून काही भावना आहेत की नाही? तिने कधी अप्रोच केले तर लगेच चुकीचे ??? या विषयावर इतरत्र अनेकदा खूप काही लिहिले गेले आहे त्यामुळे आम्ही जास्त लिहीत नाही. समजून घ्यावे. आणि हे पण जर समजत नसेल तर मात्र खरेच..... जाऊन पोगो(च) पाहत बसावे.

तर अशा प्रकारे गीतकाराने पुरुषी, प्रतिगामी विचारसरणीला मोडून काढत स्त्रियांची बाजू मांडत स्त्री आणि पुरुष या दोघांनाही संयम आणि संस्कार यांचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी समतोल साधला आहे.

तळटिपा:-
१. हे लेखन कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी केलेले नाही, जर या लेखनामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तरी आम्ही अजिबात दिलगीर नाही.
२. यातील थोड्याफार ऍडल्ट कंटेंट बद्दल आम्हाला कल्पना आहे. तुम्हाला ते अश्लील वाटत असल्यास तुम्ही स्वतःच्या अश्लीलतेच्या व्याख्या तपासून पाहाव्या. हे लिखाण सात्विक ऍडल्ट मध्ये मोडते.

***अन्य संकेतस्थळावर पूर्वप्रकाशीत***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धाग्यापाठोपाठ प्रतिसाद पण तिकडून इकडे!
Wink

---
देर से आना , जल्दी जाना , ऐ साहब ये ठीक नही
रोज बनाना एक बहाना, चाहनेवालोंको तडपाना
ऐ साहब ये ठिक नही!
चित्रपट - खलनायक
भूमिका- गाण्यात- जॅकी श्रॉफ, माधुरी
टारगेट ऑडियन्स- पोलिस, सरकारी नोकर, रेशनवाला, डॉक्टर एकंदर कोणीही सरकारी/ प्रायवेट नोकर/ सेवादाता
संस्कार - टाईम मॅनेजमेंट, ऑनेस्टी, डेडीकेशन इत्यादी, इत्यादी!
तर यात काय सांगितलंय मुलांनो? की काम कसे करावे!
'देर से आना, जल्दी जाना,ऐ साहब ये ठिक नही'
अगदी मर्मावर बोट ठेवलंय. हापिसातील इतर क्लर्क मंडळी वेळेवर येतात पण हाफिसर लोक उशीरा येतात. क्लिनिकातील झाडूवाली, रिसेप्शनिस्ट, नर्सेस वेळेवर येतात पण डॉक्टर येत नाहीत.
'साहेब' लोकांनीवेळेवर यावं, वेळेवर जावं म्हणजे एकंदर सिस्टीमच योग्य चालते असा संस्कार यातून होतो.
आता पुढचा मुद्दा काय , तर 'रोज बनाना एक बहाना'
म्हणजे काय तर क्लायंटच काम न करण्यासाठी रोज एक कारण सांगणं
हापिसर लोकांनी हा कागद घेऊन या, तो कागद घेऊन या , हे प्रमाणपत्र आणा , ते प्रमाणपत्र आणा असं सांगणं ठिक नाही.
डॉक्टर लोकांनी आज ईसीजी काढा, उद्या एक्स रे काढा , परवा ब्लड टेस्ट करा मग औषध देते असं म्हणू नये. रोजरोज हेलपाटे घालायला लावण्यापेक्षा एकदाच काय ते सांगावे.
तिसरा मुद्दा काय- चाहनेवालोंको तडपाना - ठिक नही
आता या महान संस्कारी गीताची मेख बघा. ' चाहनेवालोंको' म्हटलंय. पण 'क्या चाहनेवालोंको' ते मुद्दाम स्पष्ट केलेले नाही.
यामुळेच या संस्कारगीताला सर्वसमावेशकतेचा एक वेगळा आयाम मिळतो.
म्हणजे कुणी न्यायाधीशाला- न्याय चाहनेवाला
डॉक्टरला - दवा चाहनेवाला
हापिसरला- सर्टीफिकेट चाहनेवाला
पोलिसाला- हरवलेली / चोरलेली वस्तू चाहनेवाला
हेच एक गाणं वापरू शकतो.
'चाहनेवालोंको तडपाना, ऐ साहब ये ठिक नही'
तर असे हे सर्वसमावेशक, अगदी नवे नाही पण आमच्या पिढीचे संस्कार गीत.
याच चित्रपटात 'चोली के पिछे क्या है' हे महान संस्कारगीत आहे.
पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!

साती, देर से आना , जल्दी जाना ह्या गाण्याचं संस्कारक्षम रसग्रहण तुम्ही केलंय का? छान आहे.
याच चित्रपटात 'चोली के पिछे क्या है' हे महान संस्कारगीत आहे.
पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!>>> अहो हेच गाणं आधी घ्यायला हवं होतं. Happy वयाच्या १०-१२ व्या वर्षात हे गाणे ऐकुन घरोघरी झालेले संस्कार(डोस) आठवले. Happy

गाण्यातून होणारे संस्कार:- स्त्री पुरुष समानाता, स्त्रीमुक्ती, प्रामाणिकपणा, संयम.

व्वा! फारच छान. अमेरिकेतल्या शाळेत शिक्षकांना माहित आहे की एकाच पद्धतीने शिकवून सगळ्यांना विषय समजत नाही. म्हणून सर्व विषयांच्या शिक्षणात प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवर बसवलेली गाणी, नृत्य यांचाहि समावेश असतो. मी बदली शिक्षक असताना सहावीच्या वर्गात पेरिमीटर बद्दल शिकवून फॉर्म्युला सांगितल्यावर मॅकेरेना या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर फॉर्मुला बसवून मुलांनी नाच केला!

असे करा,

अत्यंत कमी कपडे घातलेली, उत्तान हावभाव करणारी एक बाई, तिच्याभोवती तसल्याच दहा बारा बायका, बाजूला अंगचटीला येणारे, भडक रंगीबेरंगी कपडे घातलेले पंचवीस तीस पुरुष, यांना वेडेवा़कडे नाचायला सांगा. सोबत ढणाण ढण आवाज करणारी शंभर वाद्ये असा सगळा सरंजाम गोळा करा.

गीत गोविंद, मनाचे श्लोक वगैरेचे हिंदी किंवा पंजाबी उर्दू भाषेत भाषांतर करून, सिनेमात टाका.
स्त्री पुरुष समानता, स्त्रीमुक्ति, प्रामाणिकपणा, संयम सर्व काही आहे त्यात.

म्हणजे काय - आजकाल वरील सगळा उपद्व्याप केल्याशिवाय संस्कार होणारच कसे? नुसते वाचून सांगून कळत नाही सर्वांना.

Happy

Limbutimbu,

असं पूर्वग्रह ठेवू नये. कधी कधी चांगल्या चांगल्या गोष्टी मिस होतात.

साती, तुमचा प्रतिसाद छान आहेच. खलनायक मधील दुसऱ्या गाण्यातले संस्कार कधी समजावून सांगणार? प्रतीक्षेत आहोत Wink

सस्मित, धन्यवाद.

नंद्या४३,
आजकाल वरील सगळा उपद्व्याप केल्याशिवाय संस्कार होणारच कसे? नुसते वाचून सांगून कळत नाही सर्वांना.>>>>>
आमच्याकडून होतंय तितकं कार्य आम्ही करत आहोत. तुम्ही पण जरा हातभार लावा. आम्ही लिखाण करत आहोत , तुम्ही व्हिडीओ बनवायचे मनावर घ्या Happy

संशोधक,

तुम्ही अजून संस्कारक्षम वयात आहात. गाण्यांमधून योग्य ते संदेश घेऊन अंमलात आणा. Wink

कशासाठी पटवणे हा संदर्भ समजून घ्या नाही कळलं तर पोगो/आस्था......)>>> Lol
साती तुम्ही केलेल रसग्रहण ही छान Happy दुसर्या गाण्याच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत

साती,
याच चित्रपटात 'चोली के पिछे क्या है' हे महान संस्कारगीत आहे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी! .....))))) Wink Wink लवकर लिहा...हे वाचून काॕलेज चे दिवस आठवले..
असे विड्मबन माझा भाऊ करायचा ..